संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा

लक्ष्मण शुद्धीवर आला

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम शांत होतात :

श्रीराम प्रार्थितां वानरगण । शरणागत बिभीषण ।
सृष्टिघाता कळवळोन । केलें उपशमन क्रोधाचें ॥ १ ॥
शांत करोनि कोपासी । आविष्टोनि मोहावेशीं ।
काय बोलत सुग्रीवासी । सावकाशीं परियेसा ॥ २ ॥

प्रशांतिमगमत्कोपो राघवस्य महात्मनः ।
भूयः शोकसमाविष्टो रामो दशरथात्मजः ॥१॥
अब्रवीद्राघवो दीनः सुग्रीवं वानरेश्वरम् ।
सुग्रीव गच्छ किष्किंधां सहवानरसेनया ॥२॥
कृतं मित्रसहायं तु यदन्यैर्भुवि दुष्करम् ।
अहं चाद्य महाबाहो यत्करिष्यामि तच्छृणु ॥३॥

श्रीरामांची सुग्रीवाकडे निर्वाणीची भाषा :

पुढे घेवोनि लक्ष्मण । सुग्रीवातें बोलावोन ।
अदीन परी दीनवचन । दशरथनंदन बोलत ॥ ३ ॥
सुग्रीवा परीस विनंती । तूं अवंचक मित्रकार्यार्थीं ।
तुझे उपकार किती । म्यां वचनोक्तीं बोलावे ॥ ४ ॥
मज न बोलावे सर्वथा । काय तोंड दावूं समस्तां ।
कुढावीन शरणागता । वचन वृथा वल्गलों ॥ ५ ॥
माझें अंतकाळीचें वचन । तुवां नुल्लंघावें आपण ।
सवे घेवोन वानरगण । किष्किंधे गमन करावें ॥ ६ ॥
बिभीषणही सवें न्यावा । सर्व प्रकारें संरक्षावा ।
रावण करोनियां मावा । घेईल जीवा याचिया ॥ ७ ॥
वृथा जल्पलों यासीं । संहारीन रावणासी ।
अभीषेकीन बिभीषणासी । निजगजरेंसीं अति वोजा ॥ ८ ॥
वृथा गेला तो पण । न मारवेचि रावण ।
न कुढाविता बिभीषण । प्राणें लक्ष्मण वेंचला ॥ ९ ॥
सौ‍मित्राचें निजबळें । छेदीन रावणाचें शिसाळें ।
तें अवघेंची वृथा गेलें । रणीं मोकलिलें सौ‍मित्रें ॥ १० ॥
रावण बापुडें किती । सौ‍मित्रबळें त्रिजगती ।
नागवें मी रघुपती । ते शक्ति प्रतिहत झाली माझी ॥ ११ ॥
सौ‍मित्र माझा निजप्राण । सौ‍मित्रें मी सबळ जाण ।
त्रिभुवन आक्रमीं ॥ १२ ॥
सौ‍मित्र माझी स्थिति गती । सौ‍मित्र माझी धृति विरक्ती ।
सौ‍मित्र माझी अढळ शांती । त्रिजगती माझारी ॥ १३ ॥
सौ‍मित्र माझा निजावा । सौ‍मित्र माझा विसावां ।
सौ‍मित्र माझा वोलावा । सौ‍मित्रेंवीण जीवा जीवपण कैंचें ॥ १४ ॥
सौ‍मित्रें मोकलितां येथ । कांही नाहीं मी रघुनाथ ।
जळो जळो हें जीवित अति निंदित लौकिकीं ॥ १५ ॥
बिभीषणाचा ऋणी । मी झालों सकळ जनीं ।
उत्तर बोलवे वचनीं । लाज मनीं वाटत ॥ १६ ॥
तुज असेल सामर्थ्य । तरी निवटोनि लंकानाथ ।
अभिषकीं शरणागत । मज ऋणमुक्त तूं करीं ॥ १७ ॥
इतुकेनि मी तुमचा । कृतोपकारी जन्माचा ।
ऋणी आहे सकळांचा । बहुत वाचा काय बोलूं ॥ १८ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । सुग्रीवा तुझे धरिले चरण ।
करावें किष्किंधागमन । बिभीषणसमवेत ॥ १९ ॥
कृपा करावी वानरांसीं । सुख द्यावें प्रजेसी ।
भोगीं स्त्रीपुत्रराज्यासी । शरणगतासी कुढावीं ॥ २० ॥
सौ‍मित्रावाचून जाण । माझे न वांचती प्राण ।
सौ‍मित्र गेला मोकलून । उभ्यां प्राण सांडीन ॥ २१ ॥
चेतवूनि योगाग्नी । देह जाळीन तत्क्षणीं ।
लोकालोकीं झाडा घेऊनी । सौ‍मित्रासी भेटेन ॥ २२ ॥
जेथें गेला लक्ष्मण । तेथें स्वयें जाईन ।
प्राण न राहती अर्ध क्षण । करीन गमन सांगतें ॥ २३ ॥
जेंवी शुष्क काष्ठ जळे । सर्वांग माझें तेवी होरपळे ।
गात्रें विकळ झाली सकळें । शरीर चळचळें कांपत ॥ २४ ॥

एवमुत्कस्तु रामेण सुग्रीवो वाक्यमब्रवीत् ।
किमर्थ मुह्यसे देव त्वादृशो नैव मुह्यति ॥४॥

सुग्रीव म्हणे रघुनाथा । हें बोलणें न घडे सर्वथा ।
तुजवीण राज्य भोगितां । महादोष माथां वाजती ॥ २५ ॥
तुजवीण जें राज्य भोगणें । तें जेंवी अभक्ष्य भक्षणें ।
तुजवीण स्त्री सेंवणें । मातृगमन तो दोष ॥ २६ ॥
तुजवीण जो विषयभोग । तो जाणावा क्षयरोग ।
कैंचा संसारस्वर्ग । नरकभोग भोगावा ॥ २७ ॥
तुजवीण भोगणें सुख । त्याहून मरण भलें देख ।
सांडून जातां रघुकुळटिळक । आकल्प नरक भोगावा ॥ २८ ॥
तुज सांडितां रघुपती । तेव्हांचि आम्हां क्षीण शक्ती ।
रावण येवोनि शीघ्रगती । घात निश्चिती करील ॥ २९ ॥
मरावें जैं रावणहस्तें । तैं येथेंचि सांडू देहातें ।
अनुसरल्या श्रीरामातें । केंवी मागुतें परतावें ॥ ३० ॥
श्रीरामा ऐक सावधान । एकाएकीं निर्वाण ।
करूं नये गा आपण । तूं रघुनंदन विवेकी ॥ ३१ ॥
दृढ न विचारितां चित्तीं । निर्वाण न करावें निश्चितीं ।
गेला आहे मारुती । तो कार्य सिद्धीप्रती साधील ॥ ३२ ॥
संधी लोतली तीन प्रहर । रात्र उरली एक प्रहर ।
आतां येईल कपींद्र । ओषधिभार घेऊनी ॥ ३३ ॥
हनुमान येथोनि गेला । समाचार देखोनि राहिला ।
तेणें विलंब लाविला । तो रिता वहिला परतेना ॥ अ३४ ॥
कांही पडली असेल गुंती । क्षणें उठवी मारुती ।
अतुळ तयाची शक्ती । त्रिजगतीं नाटोपे ॥ ३५ ॥
अदट दाटुगा महावीर । मुखीं रामनाम निरंतर ।
त्या कोण अर्थ दुस्तर । कार्य सत्वर साधील ॥ ३६ ॥
ब्रह्मादिकां दुर्धर शक्ती । तो रिता परतेल मारुती ।
ऐसें न मानावें रघुपती । शिघ्रगतीं येईल ॥ ३७ ॥

इति तेषां बुवाणानां हनूमान्मारुतात्मजः ।
प्रदिप्त इ शैलेंद्रो गगने समदृश्यत ॥५॥
किमेतदिति संभ्रांताः कपयो जातविस्मयाः॥६॥

उत्तर दिशेकडून हनुमंताची चाहूल :

तंव उत्तरेच्या दिशाभागीं । जैसी धगधगीत आगी ।
दिसताहे लागवेगीं । येत स्वमार्गीं देखियेला ॥ ३८ ॥
आधीच हनुमान ढिसाळ । पुच्छीं पर्वत सबळ ।
देखोनियां वानरपाळ । एक सहेळ पळाले ॥ ३९ ॥
एकीं लंघिलीं गिरिकंदरे । एकीं पर्वतशिखरें ।
एकीं समुद्राची तीरें । वेगवत्तर पळाले ॥ ४० ॥
एक रिघाले कपाटीं । एक रिघाले दिक्पुटीं ।
एकीं झाडां घातली मिठी । एक संकटीं पडियेले ॥ ४१ ॥
एक भरले दशदिशां । एकांचा दाटला घसा ।
एकां बोलवेना सहसा । एकीं धिंवसा सांडिला ॥ ४२ ॥
एक सरसावले युद्धासीं । एक वृक्षासें हातवसी ।
एक घेवोनि पर्वतासी । संमुख रणांसीं चालिले ॥ ४३ ॥
एकीं वळियेल्या मुष्टी । दांत खाती करकराटीं ।
एकीं वळली पुच्छाटी । भ्यासुर दृष्टीं देखोनी ॥ ४४ ॥

आगच्छंतं प्रधावंति ऊर्ध्वपुच्छा इतस्ततः ।
मायावी राक्षसः कोऽयमस्मान्हंतुसुपागत ॥७॥
इति तत्संभ्रमं दृष्ट्वा रामः सुग्रीवमब्रवीत् ।
वानरधिप मा भैषीरियं रक्षोबिभीषिका ॥८॥
निर्भीर्भव महाबाहो निहन्म्येनं पतत्रिभिः॥९॥

हनुमानाचे आगमन :

वानर महाभयभीत । इतस्ततां पळत ।
अंतरिक्षीं काय दिसत । झाले विस्मित सकळिक ॥ ४५ ॥
देखोनि कपींचा आकांत । क्रोधें झाला क्रोधान्वित ।
चाप करोनि सज्जित । काय बोलत रघुवीर ॥ ४६ ॥
सुग्रीव आणि बिभीषण । अंगदादि वानरगण ।
स्वस्थ करोनि अंतःकरण । माझें वचन परिसावे ॥ ४७ ॥
भेणें पळती वानरगण । त्यासी द्यावें अभयदान ।
मायावी राक्षस दारुण । येतो धांवोन आकाशीं ॥ ४८ ॥
रुप धरोनि ढिसाळ । जैसा दिसे अग्निकल्लोळ ।
मारुं आला गोळांगूळ । रुपें विशाळ भासत ॥ ४९ ॥
भेडसावीतसे सर्वासी । पळवीतसे वानरांसी ।
बाणीं निवटीन मी यासी । निमेषार्धेंसीं सत्वर ॥ ५० ॥
क्षोभोनियां श्रीरामचंद्र । करावा जंव संहार ।
चापीं सज्जितां शर । तंव कपींद्र ओळखिला ॥ ५१ ॥
सवें बाण पुच्छीं डोगर । जैसा दिसे कालाग्निरुद्र ।
रुप धरोनि भयंकर । तेथें सत्वर पावला ॥ ५२ ॥

एतस्मिन्नंतरे वीराः सोऽवतीर्य नभस्तलात् ।
निक्षिप्य पर्वत भूमौ नानारत्‍नविभूषितम् ॥१०॥
विनीतः प्रांजलिर्भूत्वा राघवं वाक्यमब्रवीत् ।
विशप्तिः श्रुयतां देव ससुग्रीवबिभीषण ॥११॥
ओषधिं नाधिगच्छामि विदित्वापि नरेश्वर ।
व्यतिक्रमवेहि त्वं क्षंतुमर्हसि सुव्रत ॥१२॥
बहुविघ्नाश्च तत्रासन्येनाहं च विलंबितः ॥१३॥

हनुमंताचे वृत्तांतकथन व क्षमायाचना :

सैन्याचे मेळीकारी । गिरि ठेवोनि पृथ्वीवरी ।
नमाया कपिकेसरी । वानरभारीं चालिला ॥ ५३ ॥
क्षेम सांगावे भरतासी । उठवीन या सौ‍मित्रासी ।
निर्दळून रावणासी । अयोध्यासीं शीघ्र येऊं ॥ ५४ ॥
आजापित भरतबाण । बाणें करोनियां नमन ।
गगना उसळला जाण । अर्ध क्षण न लागता ॥ ५५ ॥
बोळवितां भरतबाणासी । बाण उसळला गगनासीं ।
विजु तळपे आकाशीं । तेणें वेगेंसीं चालिला ॥ ५६ ॥
लखलखीत डोंगर । जैसा दिसे रत्‍नाकर ।
ठेवोनि मेळीकारीं सत्वर । दर्शना कपींद्र चालिला ॥ ५७ ॥
लोटांगण श्रीरामचरणां । पुढती पुढती करि नमना ।
नमन सुग्रीवा बिभीषणा । अंगदही जाणा नमियेला ॥ ५८ ॥
नळ नीळ जांबवंत । नमिले जुत्पति समस्त ।
होविनि अति विनीत । काय बोलत कपींद्र ॥ ५९ ॥
मज विलंब लागला तेथ । विघ्नें उठली बहुत ।
ओषधी आच्छादी पर्वत । वेडा निश्चित लाविलें ॥ ६० ॥
शक्ति झाली प्रतिहत । कांहींच नाठवे मत ।
बहुत चुकुर जालों तेथ । मग रघुनाथ स्मरियेला ॥ ६१ ॥
अंतरात्मा श्रीरामचंद्र । बुद्धि दिधली खडतर ।
समूळ उपडोनि डोंगर । मग सत्वर चालिलों ॥ ६२ ॥
मार्गीं येता सत्वर । आश्चर्य वार्तलें थोर ।
बाण पातला वेगवत्तर । अति सुंदर नामांकित ॥ ६३ ॥
बाणीं रामनाम देखतां । अति विस्मय झाला चित्ता ।
नामीं अनुसरोनि तत्वतां । गेलों रघुनाथा बाणसंगें ॥ ६४ ॥
मी अविवेकी पालेखाइर । कर्कट नेणें विचार ।
भुलविलें अंतर । गेलो सत्वर बाणासंगें ॥ ६५ ॥
नामीं चित्त वेधलें पाहीं । निजकार्याचा आठव नाहीं ।
पुढें अपूर्व देखिलें काही । ते तुझे पायी निवेदूं ॥ ६६ ॥
बाणासवे पर्वतासहित । आलों नंदिग्रामा त्वरित ।
देखिला बंधू भरत । जैसा मूर्तिमंत श्रीराम ॥ ६७ ॥
रामभ्रमे भ्रमले माझें चित्त । क्रोधावेश झाला तेथ ।
सौ‍मित्र सांडोनि त्वरित । येथे रघुनाथ कां आला ॥ ६८ ॥
अविचारी मीवानर । बोल बोलिलों खडतर ।
अति तिखट वाग्वज्र । तें रघुवीर क्षमा करुं ॥ ६९ ॥
भरतप्रेमा अद्‍भुत । तेमें लोभलेंसें चित्त ।
देह गेह न सांभाळित । प्रेमें डुल्लत सर्वदा ॥ ७० ॥
धन्य भरताचें जीवत । धन्य भरताचें आचरित ।
धन्य भरताचें व्रत । राम सेवित सर्वदा ॥ ७१ ॥
धन्य भरताचें जीवन । धन्य भरताचें भजन ।
धन्य भरताचे ज्ञान । राम चिद्धन सेवी सर्वदा ॥ ७२ ॥
धन्य भरताचा भावार्थ । धन्य भराचा इत्यर्थ ।
धन्य भरताचा सिद्धार्थ । श्रीरघुनाथ सर्व कर्मी ॥ ७३ ॥
धन्य भरताचें कुळ । धन्य भरताचें शीळ ।
धन्य सूर्यवंशमाळ । अविकळ रामभजनीं ॥ ७४ ॥
भरत रामप्रेमा लोभला । भरत रामें कोंदला ।
भरत श्रीरामें धाला । सबाह्य भरला श्रीराम ॥ ७५ ॥
भरत देखोनि राघवा । मन लोभलें भरतभावा ।
भरतें गिळिलों आघवा । देहभावा विसरलों ॥ ७६ ॥
देखतां भरतप्रेम गहन । नेत्रांची वृत्ति झाली क्षीण ।
देखणेपणे भरतें जाण । माझे नयन व्यापिले ॥ ७७ ॥
ऐकतां भरतताथानिरुपण । श्रवणीं कोंदले श्रवण ।
नभ झालें शब्दायमान । अनाहन गहन लागलें ॥ ७८ ॥
चाखतां भरतप्रेमगोडी । रसना रसातें ओसंडी ।
अद्वैतचवी धडफुडी । सप्रेम आवडी भरतची ॥ ७९ ॥
घेतां भरतभजनगंध । घ्राण विसरे गंधावबोध ।
घ्राणीं कोंदला परमानंद । प्रेममकरंद भरताचा ॥ ८० ॥
अवचट भरतसंगी । वायु लागतां अंगीं ।
अंगत्व विसरलों निजांगीं । स्पर्शता आंगीं प्रेमें वायु ॥ ८१ ॥
भरतप्रेम मनीं भरलें । संकल्पविकल्पा मुकलें ।
चंचलत्व हारपलें । निश्चळ झालें प्रेमभावे ॥ ८२ ॥
नाठवे देहगेहभान । नाठवे कार्याची आठवण ।
नाठवे भरता भरतपण । मज कपीसीं कपिपण नाठवे ॥ ८३ ॥
भरतें आकर्षिली वृत्ती । मावळली उभयस्फूर्तीं ।
कैचा राम कैंचा मारुती । ऊर्मिलापति स्मरे कोण ॥ ८४ ॥
ऐसा गोविलों सर्वशक्ती । मर्कट नेणें कार्यस्थिती ।
उशीर लागला रघुपती । क्षमा निश्चितीं मज करणें ॥ ८५ ॥

भरतप्रेमामुळे श्रीरामांची तन्मयता :

म्हणोनि घातलें लोटांगण । सदृढ माथां धरिले चरण ।
मज क्षमा करे रघुनंदन । अविवेकी हीन मर्कट ॥ ८६ ॥
ऐकतां कपीचें वचन । तटस्थ झाला रघुनंदन ।
रामीं नाठवे रामायण । भरत संपूर्ण कोंदला ॥ ८७ ॥
प्रेमें भुलला रघुनाथ । पुढें देखे भरत ।
उठोनि आलिंगूं धांवत । प्रेम अद्‍भुत भरताचें ॥ ८८ ॥
मजलागीं कष्टलासी । व्रतें तपें सायासीं ।
उग्रकर्में आचरलासी । उपवासी मजलागीं ॥ ८९ ॥
उठीं दोघे करुं भोजन । सुंदर षड्रसें राजान्न ।
सांडीं हें वल्कलाभरण । करीं परिधान दिव्य वस्त्रें ॥ ९० ॥
करी अभ्यंगमज्जन । सोडीं जटांचें बंधन ।
रत्‍नखचित मुकुटाभरण । सुंदर भूषण अंगीकारीं ॥ ९१ ॥
भरतभावें कपीसी । राम आलिंगी हृदयेंसीं ।
देखतां अंगदसुग्रीवांसी । प्रेम उत्कर्षीं न संटे ॥ ९२ ॥
जुत्पति सकळ वानरागण । अवघे झाले मूर्च्छापन्न ।
भरतप्रेम अति गहन । रघुनंदन भुलविला ॥ ९३ ॥
सकळां टकमक झाली । शब्दासीं कुलुपें पडलीं ।
भरतप्रेमें उलथलीं । समाधि लागली सर्वांसी ॥ ९४ ॥
बिभीषण शरणागत । श्रीरामभजनीं सावचित्त ।
सत्त्वावस्था गिळोनि तेथ । काय बोलत रामासी ॥ ९५ ॥
श्रीरामा पाहें सावाधान । विसरोनियां रामायण ।
आलिंगिला कपिनंदन । कार्या आठवण तुज नाहीं ॥ ९६ ॥
भरतप्रेमें भुललासी । भरत म्हणोनि कपीसी ।
आलिंगोनि राहिलासी । निजकार्यासी विसरोनी ॥ ९७ ॥
बिभीषणाचें वचन । ऐकोनि हनुमान जाण
स्वयें झाला सावधान । रघुनंदना विनवितो ॥ ९८ ॥
स्वामी ऐकें रघुनंदन । भरत नव्हें हनुमान जाण ।
आलों पर्वत घेऊन । ओषधि गहन जेथे असती ॥ ९९ ॥
वेडी जाती प्रेमाची । वेळ नेणें कार्याची ।
गोष्टी सांगितली भरताची । तेणें श्रीरामचि भूलला ॥ १०० ॥
शक्तिभेदें सौ‍मित्र जाण । पडिलासे विसज्ञ ।
यासी करावें सावधान । रावणकंदन करावया ॥ १ ॥
मर्कट पालेखाईर । नेणें कार्यकार्यांतर ।
बहुत लाविलासे उशीर । क्षमा रघुवीर मज करो ॥ २॥
ऐसें बोलोनि हनुमंत । चरणां लागला त्वरित ।
सावध होवोनी रघुनाथ । काय बोलत कपीसी ॥ ३ ॥

हनुमंतो वचः श्रुत्वा रामो वचनमब्रवित् ।
साधु वीर महाबाहो यस्य चेदृक्पराक्रमः ॥१४॥

ऐकतां भरतगोष्टी । प्रेम उथळलें पोटीं ।
कांही न देखों दृष्टीं । तुजचि मिठी घातली ॥ ४ ॥
हा भरतप्रेमें भुलला । मी म्हणें भरतचि आला ।
म्हणोनि कपि आलिंगिला । भला चेषविला हनुमंतें ॥ ५ ॥
ब्रह्मादिकां न करवती । ऐसीं कर्मे निश्चितीं ।
तुवां साधिलीं मारुती । निमेषगती न लागतां ॥ ६ ॥
तुझ्या उपकारा तत्वतां । मी ऋणी झालों कपिनाथा ।
वाचा खुंटली सर्वथा । कांही तत्वतां न बोलवे ॥ ७ ॥
तुझ्या कर्माची कथा । काय सांगों हनुमंता ।
सीताशुद्धीची कथा । ऐकतां चित्ता चळकांप ॥ ८ ॥
इंद्रजितवधालागीं सांग । तुवां ओढविलें सर्वांग ।
ते गोष्टी ऐकतां सवेग । होती उद्वेग चित्तासीं ॥ ९ ॥
एकएका उपकारा उत्तीर्ण । जीवे न होईजे कपिनंदन ।
सर्वस्वेंसीं आपण । ऋणी संपूर्ण मी तुझा ॥ ११० ॥
कांही न बोलवे सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा ।
येरें वारोनि तत्वतां । चरण रघुनाथाचे वंदिले ॥ ११ ॥
राम मारुतिवृत्तांत । देखतां झाला विस्मित ।
सुषेण वैद्यराज तेथ । त्यासी बोलत सुग्रीव ॥ १२ ॥

सुषेण औषधी आणतो :

हे दोघेही प्रेम बोधले । निजकार्यातें विसरले ।
आपण जावोनि वहिले । ओषधिभार शोधावे ॥ १३ ॥
विशल्य होय लक्ष्मणा । ते कार्य साधीं सुषेणा ।
म्हणोनि लागला चरणां । कार्यसाधना साधावें ॥ १४ ॥
ऐकोनि सुग्रीव‍उत्तर । सुषेण निघाला सत्वर ।
सकळ वानरांचा भार । पर्वतशिखर वळघले ॥ १५ ॥

सुग्रीवस्य वचः श्रुत्वा सुषेणोन्ये च वानराः ।
गिरिमारुह्य तं रम्यं नानाधातुविभूषितम् ॥१५॥

सवे वानरांचा भार । सुषेण वैद्यराज सत्वर ।
वळंघेले पर्वतशिखर । ओषधिभार शोधावया ॥१६ ॥
अति दीर्घ पर्वतशिखरें । रमणिय गिरिकंदरे ।
जळें पूर्ण सरोवरें । कमळें मनोहर शोभती ॥ १७ ॥
अगराचीं झाडें बहुत । चंदनडोंगर बहकत ।
पुन्नाग चांफे पारिजात । पर्वतीं बहुत पुष्पजाती ॥ १८ ॥
सरोवरीं कर्णिकारें । सेविती निरंतर चकारें ।
पक्षिकुळें विचित्रें । चौफेर किलकिलती ॥ १९ ॥
अति रम्य पर्वत । वानरें सैरा हिंडत ।
सुषेण वैद्यराज तेथ । ओषधि शोधित अति वेगें ॥ २० ॥
स्मरोनियां रघुनंदन । पर्वत पाहतां सावधान ।
झालें ओषधीचें दर्शन । वैद्य सुषेण हरिखत ॥ १२१ ॥

तामोषिधिं गृहीत्वासौ ह्यवतीर्य महीतले ।
शिलायां पेषयित्वा तु नस्यं तस्मै प्रयोगयत् ॥१६॥
महौषध्याः प्रभावेण लक्ष्मणः परवीरहा ।
विशल्यो नीरुजश्चैव उत्थितः स महीतलात् ॥१७॥

रामनामें सत्वर । उपटोनि ओषधिसंभार ।
करीत नामाचा गजर । वानरभार चालिला ॥ २२ ॥
उतरोनि पृथ्वीतळीं । ओषधि चूर्ण केल्या शिळीं ।
रस घेवोनि तत्काळीं । शक्तिबिळीं ओतला ॥ २३ ॥
रस घालितां तस्वर । सावध नव्हेचि सौ‍मित्र ।
सुषेण झाला चिंतातुर । कांही विचार स्फुरेना ॥ २४ ॥
ब्रह्मादिकां अनुल्लंघ्य पूर्ण । एवढा प्रयत्‍न केला दारुण ।
शेखीं सावध लक्ष्मण । अद्यापि जाण होईना ॥ २५ ॥
सुग्रीवादेखतां । स्वामी रघुनाथ ऐकतां ।
वल्गलों मी इतस्ततां । सौ‍मित्रातें उठवीन ॥ २६ ॥
ऐसें बोलबोलून । पाठविला वायुनंदन ।
महाविघ्ने जिणोन । पर्वतचि जाण आणिला ॥ २७ ॥
ओषधिसंभार सगळा । अंगे पिळोनियां वाहिला ।
घायीं रस ओतिला । तो वृथा झाला प्रयत्‍न ॥ २८ ॥

औषधीचा प्रभाव न पडल्याने सुषेणाचा गोंधळ :

तरी वैद्यक लटिकें झालें । शास्त्र वृथा रचिलें ।
शिष्टाचारा दूषण आलें । काय झालें मज न कळे ॥ २९ ॥
नाहीं रसायन चुकलें । धातूसीं अंतर नाहीं पडिलें ।
नाहीं अनुपान चुकलें । नाहीं सांडिलें क्रियेसी ॥ १३० ॥
काय झालें तत्वता । मज न कळे सर्वथा ।
धांव पाव गा रघुनाथा । शास्त्रसंमता संरक्षीं ॥ ३१ ॥
तव आवेशें वायुनंदनी । जो भक्तांमाजी चूडामणी ।
बोलता जाला हांसोनी । सुषेणा लक्षोनी अनुवादे ॥ ३२ ॥
सुषेणा चुकलासी मत्त । ज्याचेनि शास्त्रांसीं शास्त्रार्थ ।
जो वेदीं वेदार्थ । शिष्ट सनाथ ज्याचेनि ॥ ३३ ॥
जेणें चिकित्सा पाहाळी गेली । जेणें शास्त्रें बुझविलीं ।
पुराणें वर्तो लागली । ज्याची चाली जाणोनी ॥ ३४ ॥
त्या विसरोनी रघुनाथा । स्वबुद्धी वैद्यक करितां ।
शीण पावलासी वृथा । स्वकार्यही न साधेचि ॥ ३५ ॥
उगवतां दिनमणी । हरपे तत्काळ रजनी ।
नक्षत्रेंसह चंद्र गगनीं । ठाकती होवोनी खद्योत ॥ ३६ ॥
तेंवीं देखतां रघुनाथ । ओषधिभार समस्त ।
शक्ति झाली प्रतिहत । तुझें तेथ काय चाले ॥ ३७ ॥

श्रीराम – चरणतीर्थ देण्याची हनुमंताची प्रार्थना :

ऐसें न करावें आपण । प्रार्थोनियां रघुनंदन ।
घ्यावें चरणतीर्थ मागोन । वाचेल लक्ष्मण तें करी ॥ ३८ ॥
ओषधिरसामाजी देख । वेगीं घालोनि चरणतीर्थ मागोन ।
वाचेल लक्ष्मण तें करी ॥ ३८ ॥
ओषधिरसामाजी देख । वेगीं घालोनि चरणोदक ।
रस देतां एकाएक । सकळ दुःख निरसेल ॥ ३९ ॥
कोणासी न कळे जनीं । नाम अमृतसंजीवनी ।
तो प्रत्यक्ष असतां अनुदिनीं । निजाभिमानीं कष्टती ॥ १४० ॥
आम्हीं वैद्य चिकित्सक । क्षणमात्रें प्रतीति ते देख ।
दावूं लागतांचि निमेख । तेणेंचि देख नाडिले ॥ ४१ ॥
सिद्धासीं सिद्धिलाभ होतां । अभिमान उठला अवचितां ।
तरी अवघेंचि गेलें तत्वतां । कष्ट वृथाचि सोसिले ॥ ४२ ॥
सर्व दुःखांच्या आपदा । प्राप्त झाल्या प्रल्हादा ।
नाम स्मरतां सर्वदा । दुःखबाधा छेदिली ॥ ४३ ॥
तो श्रीराम प्रत्यक्ष असतां । तुझा अभिमान झाला वृथा ।
चरणीं ठेवोनियां माथा । चरणतीर्था मागावें ॥ ४४ ॥
तीर्थासमवेत ओषधी । घायीं घालितां त्रिशुद्धी ।
सौ‍मित्र उठेल सत्वबुद्धी । युक्ति साधीं हे माझी ॥ ४५ ॥

श्रीरामचरणतीर्थाने लक्ष्मण सावध झाला :

ऐकोन कपीचें वचन । संतोषला सुषेण ।
म्यां केला जो अभिमान । तो रघुनंदन क्षमा करो ॥४६ ॥
मर्कट नेणें मी सर्वथा । क्षमा करणें रघुनाथा ।
चरणीं ठेवोनियां माथां । चरणतीर्था घेतलें ॥ ४७ ॥
ओषधी तीर्थासमवेत । घायीं पिळितां समस्त ।
सौ‍मित्र झाला सावचित्त । श्रीरघुनाथप्रसादें ॥ ४८ ॥
तीर्थे प्रोक्षितां शरीर । सत्वर उठिला सौ‍मित्र ।
बाप कृपाळु रघुवीर । वानरभार हरिखला ॥ ४९ ॥
रामनामें भुभुःकार । करीत उठिले वानर ।
नादें कोंदलें अंबर । चराचर दुमदुमिलें ॥ १५० ॥
नामें कोंदला भूगोळ । नामें व्यापिलें अंतराळ ।
नामें भेदलें पाताळ । ब्रह्मांडगोळ कोंदला ॥ ५१ ॥
नामें हर्षित झालें चित्त । स्वशरीर न सांभाळित ।
एक लोटांगण घालित । एक झेलित द्रुमवल्ली ॥ ५२ ॥
एक पर्वत झेलित । एक पर्वतीं वळंघत ।
येर येरां धके देत । येर टाकित येआवरी ॥ ५३ ॥
रामसंमुख बैसती एकें । तोंड करिती रडकें ।
सौ‍मित्रे केलें नाही निकें । मज सांडून देखें निगाला ॥ ५४ ॥
म्हणवोनि करीत रुदन । उपहासिती रघुनंदन ।
हरिखें नाचती वानरगण । विस्मित मन रामाचें ॥ ५५ ॥
स्वयें उठोनी आपण । आलिंगिला लक्ष्मण ।
सुग्रीव अंगद बिभीषण । आनंदें पूर्ण कोंदले ॥ ५६ ॥
नवा लक्ष्मण उपजला । येणें मानें सुखावला ।
उत्साह ऐसा कोंदला । विसरला राम आपणा ॥ ५७ ॥
उचलोनियां लक्ष्मण । नाचों लागला रघुनंदन ।
एका जनार्दना शरण । निजजनकृपाळू ॥ १५८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें युद्धकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणोत्थापनंनाम एकोनपंचाशत्त-मो‍ध्यायः ॥ ४९ ॥
ओंव्या ॥ १५८ ॥ श्लोक ॥ १७ ॥ एवं ॥ १७५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणपन्नासावा

View Comments