भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा
हनुमंताचे रामप्रेमाचे वर्णन –
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांनी हनुमंताची स्तुती करून त्याला वरदान देण्याची इच्छा दर्शविली :
धन्य हनुम्याचा भावार्थ । धन्य हनुम्याचा पुरुषार्थ ।
धन्य हनुम्याचा सिद्धार्थ । जेणें रघुनाथ वोळला ॥ १ ॥
न मागतांही निश्चयेंसीं । माग म्हणे आवडीसीं ।
निजदासीं कृपा ऐसी । हर्षे त्यासी मग म्हणे ॥ २ ॥
प्रसन्नो हि हतूमंतमुवाच रघुनन्दनः ।
वरं वृणीष्व चाद्य त्वं महत्कार्य कृतं त्वयां ॥ १ ॥
तुझिया महत्कार्याची कथा । वाचे न बोलवे सर्वथा ।
तुझा ऋणी मी हनुमंता । जाण तत्वतां निश्चये ॥ ३ ॥
काय अपेक्षी तुझें चित्त । जें दुष्प्राष्य त्रैलोक्यांत ।
तें तें मागावें निश्चित । कृपा रघुनाथ वोळला ॥ ४ ॥
एवमुक्तोऽब्रवीद्रामं हर्षपर्याकुलेक्षणः ।
यावद्रामकथा देव पृथिव्यां विचरिष्यति ॥ २ ॥
तावदेव मयि प्राणांस्तिष्ठंस्तु वरदोसि मे ।
यावद्रामकथा लोके चंद्रसूयौ ग्रहादयः ॥ ३ ॥
हनुमंताची प्रेमावस्था :
देखोनि कृपेचा उत्कर्ष । हनुमान झाला हर्षमानस ।
प्रेमाश्रु चालिले नेत्रांस । कंप गात्रांस पै आला ॥ ५ ॥
अंगी रोमांच बाष्प कंठासी । स्वेद चालिला सर्वांगासी ।
लोटांगण अति प्रीतीसीं । मिठी चरणांसी घातली ॥ ६ ॥
प्रेमा जिरवोनियां पोटी । गद्गद बोले वाक्पुटी ।
स्वामी बोललेति कृपादृष्टीं । सभाग्य सृष्टी मी एक ॥ ७ ॥
जोपर्यंत पृथ्वीवर रामकथा अस्तित्वात आहे तोपर्यंत
माझे प्राण असावेत अशी रामांजवळ हनुमंताची मागणी :
कृपा वोळली रघुनाथा । तरी ऐसें करावें स्वामिनाथा ।
जंव पृथ्वीवरी रामकथा । तंववरी असावे तत्वतां प्राण माझे ॥ ८ ॥
जेथे जेथें रामकथन । तेथें तेथें मस्तकांजली पूर्ण ।
असावें माझें अधिष्ठान । हेंचि वरदान मज द्यावें ॥ ९ ॥
जिणयाचें फळ तत्वतां । नित्य श्रवणी रामकथा ।
वाचेंसीं रामगुण वर्णितां । उसंत चित्ता नसावी ॥ १० ॥
ऐसी नामाची काय प्रीती । स्वामी ऐकावे तदर्थी ।
तुझ्या नामाची निजख्याती । यथानिगुतीं सांगेन ॥ ११ ॥
आकृष्टिः कृतचेतसां समुहतामुच्चाटजं चांहसा-
माचांडालममूकमात्रसुलभो वश्यश्च मोक्षश्रियः ॥
नोदीक्षां न च दक्षिणां न च पुरश्चर्यामनागिष्यते
मंत्रोयं रसनास्पृगेव फलति श्रीरामनामात्मकः ॥ ४ ॥
रामनाममंत्राचे असाधारण महत्त्व मारुतीने विशद केले :
वैरी उच्चाटावया पूर्ण । लोभें करिती अभिचारण ।
ते उच्चाटन गौणजाण । ऐक लक्षण तयाचें ॥ ११२ ॥
सांग झालें कर्माचरण । तेणें एका शत्रूचे होय हनन ।
तरी वैर न खंडे जाण । आणिक पूर्ण उठती शत्रु ॥ ११३ ॥
कामक्रोधादि वैरी क्रूर । व्यापून ठेले अंतर ।
ते क्षणोक्षणां करिती मार । योनि अघोर भोगविती ॥ ११४ ॥
विषयलोभें करोतनि पूर्ण । जे करिती दुराचरण ।
त्या भोगविती अधःपतन । बांधोनि जाण श्रीरामा ॥ ११५ ॥
जें त्या विषयाचरणारहित । तें पापाचें खाणोनि खत ।
कामक्रोधांचा निजघात । कर्ते निश्चित नाम तुझें ॥ ११६ ॥
म्हणसी पाहिजे अधिकार । ऐक तयाचा विचार ।
नलगे शास्त्रांचा संभार । श्रुतिउपचार पै नलगे ॥ ११७ ॥
नलगे काव्यनाटक व्युत्पत्ती । पुरश्चरणाची कायसी स्थिती ।
तीर्थाची कायसी गती ।योगवृत्ति जे नव्हे ॥ १८ ॥
त्या कल्मषाचा महाकंद । खाणावया अति अगाध ।
द्विअक्षर मंत्र प्रसिद्ध । द्वेषद्वंद्वदाहक ॥ ११९ ॥
राम ऐसे वर्णद्वये । रसनेसी स्पर्श होता पाहें ।
मुक्ति वोळंगती स्वयें । दास्यत्वेंसीं तत्वता ॥ २० ॥
न लगे दीक्षा न लगे दान । योग याग पुरश्वरण ।
मंत्र तंत्र तीर्थाटण । व्रतादि जाण कांहीं न लगे ॥२१ ॥
रामनामाक्षरद्वयासी । भेटी होतांचि रसनेसीं ।
जाळोनि कल्पषांच्या राशी । मोक्षश्रियेसी वरी स्वयें ॥ २२ ॥
हें तुझ्या नामाचें महिमान । सांगितलें अत्यंत गौण ।
त्याहूनि नाममहिमान । सांगतां वचन सरेना ॥ १२३ ॥
तथापि कांहीं संकेताकारें । नाममहिमा प्रेमभरें ।
सांगेन तेथें रघुवीरें । अत्यादरें कृपा करणें ॥ १२४ ॥
तेचि विषयींचा श्लोकार्थ । स्वामीपरसा सावचित्त ।
नाममहिमा अत्यद्भुत । श्रोते परिसोत अत्यादरें ॥ १२५ ॥
वेपंते दुरितानि मोहमहिमा संमोहमालंबते ।
सातंकं नखरं जनं कलयति श्रीचित्रगुप्तः कृती ।
स्वानंदं मधुपर्कसंभृतिविधा वध्वा करोत्यद्युमम्
वक्तुं नाम्नि तवेश्वराभिलषिते ब्रूमः किमन्यत्परम् ॥ १ ॥
श्रीरामनाममहिमा :
तुझिया नामाची आवडी । जीवी उपजतां रोकडी ।
कोण कोणां पडे सांकडी । ऐक निर्वडी श्रीरामा ॥२६ ॥
तुझे नामोच्चारीं आदर । ऐक तयांचा बडिवार ।
महापातकांचा संभार । कांपे थरथर निजधाके ॥२७ ॥
वाचे उच्चारावया तुझें नाम । जीवी धरिले असे प्रेम ।
क्षणें आमुचें करील भस्म । भय दुर्गम नामाचें ॥२८ ॥
नाम उच्चारिलें नाहीं येणें । तंव तें स्थळ टाकोनि जाणें ।
अन्यथा नुरिजे जीवें प्राणे । निश्चय करणें महापापी ॥२९ ॥
जेणें भ्रमे उपजे पातक । तो भ्रमचि भ्रमातें पावे देख ।
नामोच्चारीं आवडी-चोख । करी निःशेख निर्मोह ॥ १३० ॥
पाप लिहिती चित्रचिचित्र । त्यांसी अलोट पडे विचार ।
हा करू पाहे नामोच्चार । पापाचार केंवी राहे ॥ १३१ ॥
म्हणोनि खुंटलें लेखन । लेखनि सर्वथा न चाले जाण ।
वर्णाक्षरउच्चारण । निश्चयें पूर्ण नाठवे ॥ ३२ ॥
असो या क्षुद्रांची गती । मुख्य ब्रह्मा लोकपती ।
त्यासींही पडे विचार चित्ती । दूतांप्रती करी आज्ञा ॥ १३३ ॥
आनंदमय होवोनि पूर्ण । दूतां आज्ञापी चतुरानन ।
पैल करू पाहे नामस्मरण । पूजाविधान सिद्ध करा ॥ १३४ ॥
विधिपूर्वक अभिषेक । मधुपर्कविधि पूजा देख ।
करोनि पावावया ब्रह्मलोक । चतुर्मुख तिष्ठत ॥ १३५ ॥
नामोच्चारीं आवडी धरितां । ऐसी पदवी रघुनाथा ।
ते सर्वदा नाम जपतां । कोण अर्था न पाविजे ॥ १३६ ॥
जेथे रामनाम तेथे माझी उपस्थिती असावी अशी मारुतीची मागणी :
यालागीं स्वामी रघुपती । जेथे जेथें तुझी नामकीर्ती ।
निमेष असेल होती । तेथें मारुतीने असावें ॥ १३७ ॥
जेथे श्रीराम संकीर्तन । तेथे म्यां मस्तकांजलि संपूर्ण ।
तिष्ठत असावें अनवच्छिन्न । हे वरदान मज द्यावें ॥ ३८ ॥
श्रवणीं श्रवणाची आवडी । वाचेसी हेचि नित्य गोडी ।
नाम गर्जतां अति प्रौढी । उद्धरी कोडी पतितांच्या ॥ ३९ ॥
तुझ्या निजनामेंकरून । महापापाचें करोनि कंदन ।
प्रायश्चित्ता बोळवण । जगउद्धरण श्रीरामें ॥ ४० ॥
केवळ नव्हे माझी अवस्था । ज्यासी नामी आवड चित्ता ।
त्याचेनि जगासी पावनता । नित्य मुक्तता श्रीरामें ॥ ४१ ॥
रामनामस्मरणाने कोणाचाही उद्धार करावा अशी मारुतीची रामांना प्रार्थना :
माझें मागणें हेंचि परम । उत्तममध्यमादि अधम ।
सकळीं स्मरावा श्रीराम । मरणजन्मच्छेदक ॥४ २ ॥
वेदशास्त्री अधिकारता । ज्यासीं नाहीं तत्वता ।
त्यासी नाम द्यावें रघुनाथा । उद्धारता श्रीरामें ॥ ४३ ॥
स्तीशूद्रादि केवळ । नीचयोनीचे चांडाळ ।
महापतित अमंगळ । नामें सकळ उद्धरावे ॥ ४४ ॥
जे एकवार जपती नाम । ते करावे नित्य निष्काम ।
जे नाम ऐकती सप्रेम । सर्वोत्तम करावे ते ॥ ४५ ॥
श्रोत्यां वक्त्यांतें देखोन । संतोष पावे ज्यांचें मन ।
त्यांहीं पावावें कल्याण । रघुनंदननिजकृपा ॥ ४६ ॥
नामधारकांतें निर्भत्सिती । द्वेषिती त्रासिती उपाहासिती ।
नानापवाद घालिती । उपद्रविती दुष्टत्वें ॥ ४७ ॥
त्यांची जावोनि दुष्टवृत्ती । शुद्ध निर्विकल्प स्थिती ।
पावोनियां निश्चितीं । श्रीरधुपति उद्धरावें ॥ ४८ ॥
विकल्पाचा विकल्प तोडीं । अधर्माचे दौरात्म्यी मोडीं ।
संदेहाचा संदेह फेडीं । निजप्रौढी श्रीरामा ॥ ४९ ॥
सकळ जन स्वानंदमग्न । सकळ जन संकल्प निरसोन ।
नामें करावे सुखसंपन्न । हेंचिं वरदान मज द्यावे ॥ ५० ॥
सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिदुःखमाप्नुयात् ॥ ६ ॥
जे जपहीन तपोहीन । व्रतपुरश्चरणदानविहीन ।
योगयागतीर्थाटन । कांहीं साधन जाणती ना ॥ ५१ ॥
सत्संगाचे नेणती सुख । वैराग्याचा गंध निःशेख ।
श्रवणाचें न देखती मुख । ते सकळिक उद्धरावे ॥ ५२ ॥
संसाररोग अति दुर्धर । पापभोगांची यातना क्रूर ।
पीडिजेती जीवमात्र । भोगिती अघोर नीचयोनी ॥ ५३ ॥
त्यांसी रामनाम रससार । देवोनि उपचारावें सत्वर ।
मोडोनि भवरोगाचा थार । नित्य अक्षर करावें ॥ ५४ ॥
निरसोनियां द्वेषद्वंद्व । करावे निर्विकल्प शुद्ध ।
भोगावया परमानंद । सदानंद श्रीरामें ॥ ५५ ॥
विश्व अवघें सुखसंपन्न । सदा असावें स्वानंदमग्न ।
हेंचि द्यावें वरदान । म्हणोनि लोटांगण घातलें ॥ ५६ ॥
विश्वोद्वारासाठी हनुमंताची मागणी ऐकून सर्वजण व श्रीराम संतुष्ट :
ऐकोनि हनुम्याचें वरदान । सकळ झाले आनंदमग्न ।
हनुम्यानें संदेह फेडिला पूर्ण । दीन जन उद्धरिले ॥ ५७ ॥
श्रीरामाची प्रसन्नता । हनुमंतीं बाणली तत्वतां ।
विश्व उद्धरिलें सर्वथा । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥ ५८ ॥
म्हणोनियां देव दानव । यक्ष किन्नर गंधर्व ।
सिद्धचारणादि सर्व । पन्नग मानवादि करोनी ॥ ५९ ॥
खेचर भूचर जलचर । बिभीषणादि निशाचर ।
नामें गर्जती वानर । जयजयकार प्रवर्तला ॥ ६० ॥
तुझेनि नामें साचार । म्यां उद्धरावें चराचर ।
हनुम्यानें मागतां ऐसा वर । पूर्ण चराचर सुखमय ॥ ६१ ॥
बहुकाळ प्राण वांचणें । म्यां मागितलें याचिकारणें ।
ऐसे मागतां वायुनंदनें । श्रीरघुनंदनें अगिकारिले ॥ ६२ ॥
जग उद्धरावया साचे । अचाट मागणे हनुमंताचे ।
अचाट देणें श्रीरामाचें । प्रेम भक्ताचे अति गहन ॥ ६३ ॥
हनुम्याच्या प्रेमावेशीं । राम वोळला प्रीतीसीं ।
स्वयें देतो वरदानासी । कृपा मानसीं अनिवार ॥ ६४ ॥
ततस्तु राघवः प्रीत: परिष्वज्यांजनासुतमू ।
एवं भवतु भद्रं ते यावद्भूमिर्धरिष्यति ॥ ७ ॥
पर्वताश्व समुद्राश्च तावदायुरवाप्नुहि ।
मैथिल्यापि तदा चैव प्रददौ वरमुत्तममू ॥ ८ ॥
उपस्थास्यन्ति भोगास्त्वां स्वयमेव जिता हरे ।
देवदानवगंधर्वास्तथैवाप्यरसां गणाः ॥ ९ ॥
यत्र तिष्ठसि तत्रैव सेविष्यन्ति तथामरम् ।
एवमस्त्विति चोक्त्वा वै प्रययौ साश्रुलोचनः ॥ १० ॥
श्रीरामाचे वरदान व हनुमंतप्रतापवर्णन :
चित्तस्नेहाच्या निजावेशीं । राम वोळला वरदेसीं ।
आलिंगोनि अति प्रीतीसीं । काय त्यासी बोलत ॥ ६५ ॥
कुरवाळोनि अमृतहस्तीं । प्रेमाचिया अति प्रीतीं ।
बोलतसे रघुपती । ऐक मारुति सावध ॥ ६६ ॥
तुवां मागितलें वरदान । तेथें तुझें नाहीं कारण ।
विश्वोद्धारा कळवळोन । वरद संपूर्ण मागितले ॥ ६७ ॥
हें माझें अवतारकार्य जाणा । तुवां संपादिले वायुनंदना ।
कळवळोनि दीनजनां । विश्वोद्धारणा तुवां केलें ॥ ६८ ॥
जैसे मागितलें वरदासी । त्याहूनि विशेष पावसी ।
वर देवोनि हनुम्यासी । कर मस्तकासी ठेविला ॥ ६९ ॥
तुझेनि नामें काळ कांपे । कामक्रोध उभाचि करपे ।
तुझिया नामाचेनि दर्पे । द्वंद्वें निष्पापे स्वये होती ॥ ७० ॥
काळ काम भवभ्रम । तुझेनि नामें होय भस्म ।
प्राणी होवोनि निष्काम । विश्रामधाम पावती ॥ ७१ ॥
तुझेनि सनाथ रामकथा । तुझेनि सनाथ अवतारता ।
तुझेनि श्रीराम सर्वथा । जाण तत्वतां मारुति ॥ ७२ ॥
तुझेनि विख्यात माझे नाम । तुझेनि विख्यात माझें कर्म ।
तुझेनि सरता श्रीराम । विश्रामधाम जगाचें ॥ ७३ ॥
अहिरावणें धरोनि नेले । दोघां बंधूंसी विटंबिलें ।
शिरच्छेदासी उभे केलें । सामर्थ्य हरिलें आमुचें ॥ ७४ ॥
आम्हां करोनि कृपण । म्हणती तुमचा बळिया कोण ।
वेगीं करा त्याचें स्मरण । शिरःपतन जाण करावया ॥ ७५ ॥
स्मरण करितांचि मारुती । तुझी उडी आली अवचितीं ।
येवोनि केली बंधमुक्ती । केली शांति निशाचरा ॥ ७६ ॥
मज सोडवोनि रघुनाथा । निवटोनियां राक्षसनाथा ।
सपरिवारें लंकानाथा । शरणागता स्थापिलें ॥ ७७ ॥
सोडवोनि सीता सुंदरी । विकल्प निरसोनि निर्धारीं ।
दिव्यीं उतरोनि झडकरी । प्रीती थोरी भेटविली ॥ ७८ ॥
अयोध्ये आणोनि वेगेंसीं । भेटवोनियां भरतासी ।
अभिषेकोनि आम्हांसी । रामचरितासी संपविलें ॥ ७९ ॥
तेथें कायसें माझें वरद । तुझा प्रताप अति अगाध ।
भक्तिप्रतापें अगाधबोध । परमानंद जगासी ॥ १८० ॥
हनुमंतनामाचा महिमा स्वत: श्रीराम वर्णितात :
तुझेनि सनाथ रामकथा । तुणेनि श्रवणें उद्धरें श्रोता ।
तुझेनि संगे नाम पढतां । उद्धरे वक्ता तत्काळ ॥ ८१ ॥
असो श्रोतयां वक्तयांची कथा । तुझेनि भजनीं आदर धरितां ।
निष्काम होवोनि तत्वतां । नित्यमुक्तता तो पावे ॥ ८२ ॥
जंव पृथ्वी वाहे सकळ भूतें । जीवन जीववी जगातें ।
वायु चाळवी विश्वातें । चंद्रार्क असती निश्चितें गगनीं ॥ ८३ ॥
सुस्थिर बैसका कुळाचळा । तंववरी तुझें आयुष्य गोळांगूळा ।
चिंरजीवियांमाजि आगळा । प्रताप सोज्ज्वळ पै तुझा ॥ ८४ ॥
बुटि लव निमेष पळ । घटिका मुहूर्त काळ ।
श्रीरामभजनें अचंचळ । लोक सकळ उद्धरसी ॥ ८५ ॥
तुझेनि स्मरणें मारुती । भयभीता प्रतापशक्ती ।
अविरक्तासी विरक्ती । होय निश्वितीं सर्वथा ॥ ८६ ॥
संदेहपणाचा संदेह । तुझेनि होय नि संदेह ।
विकल्प निर्वकल्पभाव । नामनिर्वाह करी तुझा ॥ ८७ ॥
कुतर्क्याचे कुतर्क मारुती । तुझेनि नामें भस्म होती ।
शठकपटियांच्या वृत्ती । निष्कपट होती तुझेनि ॥ ८८ ॥
नास्तिकांचे शून्यवाद । दांभिकांचे दंभभेद ।
तुझेनि नामें निर्द्वंद्व । महाबोध पावती ॥ ८९ ॥
कामक्रोधलोभादिक । महापिशाच दुर्जय देख ।
तुझेनि नामें एकाएक । भस्म निःशेख पैं होती ॥ ९० ॥
इतर पिशाचाच्या कोण कथा । भस्म होती क्षणार्धता ।
तुझेनि नामें वायुसुता । निर्मुक्तता जगासी ॥ ९१ ॥
स्वतःच्या नामाचा महिमा ऐकून मारुती आश्चर्यचकित :
वरद वदतां रघुनाथा । येरें चरणीं ठेविला माथा ।
म्यां प्रार्थिलें कोण्या अर्था । कोण कथा तेथें झाली ॥ ९२ ॥
तुझेनि नामें रघुपती । चराचरा व्हावी मुक्ती ।
ऐसें मागतो स्वामीप्रती । झाली वरदोक्ती विपरीत ॥ ९३ ॥
सांडोनि स्वामीचें नाम । आड घालणे च्छवंगम ।
ऐसा नव्हे भजनधर्म । लोकही विषम मानिती ॥ ९४ ॥
ऐसें न करावें स्वामिनाथा । म्हणोनि लोटांगण घालितां ।
तंव हास्यवदनें तत्वतां । झाला वदतां श्रीराम ॥ ९५ ॥
त्या वेळी रामांनी हनुमंत व राम यांतील अभेदत्व सांगितले :
श्रीराम आणि हनुमान जाण । स्वरूप एक नामे भिन्न ।
भेद नाहीं अणुप्रमाण । ऐक विवेचन सांगेन ॥ ९६ ॥
विचारितां वस्तुविचारें । मज रूप नाहीं निधीरें ।
नाम तेथे कोठे सरे । भ्रममोहिरें नामरूप ॥ ९७ ॥
ऐसिया नामरूपातीतासी । भक्तीं आणोनियां रूपासी ।
स्वामित्व देवोनि प्रीतीसी । वैकुंठवासी मज केलें ॥ ९८ ॥
लक्ष्मीऐसी अनुचर । कौस्तुभादि अलंकार ।
भक्तीं देवोनि अपार । राज्यधर मज केलें ॥ ९९ ॥
हषीकेशादिक नांवें । भक्तीं अर्पिलीं निजगौरवें ।
नामें विश्व उद्धरावे । हेहीं करावें निजभक्ती ॥ १०० ॥
असो इतर भक्तांची हे कथा । पूर्वी मज रघुनाथा ।
सर्वथा कोणी जाणत नव्हता । वनी फिरतो अनाथत्वें ॥ १०१ ॥
सीतावियोगें दुःखातुर । दोघे बंधु जैसे किंकर ।
झालों होतो वनचर । नेदी आधार पै कोणी ॥ १०२ ॥
तुवां भेटोनि कपिनाथा । सुग्रीव सखा मज रघुनाथा ।
तुवां करोनि दिला तत्वतां । वाळिघाता करविले ॥ १०३ ॥
निर्दाळोनि राक्षसमांदी । तुवां आणिली सीताशुद्धी ।
महा पाषाणीं जळनिधी । निमेषामधीं बांधिला ॥ १०४ ॥
विश्वेश्वरासी भेटोन । निमेषार्धे लिंग आणोन ।
सेतुबंधमाहात्म्य गहन । जगदुद्धार तुझेनि ॥ १०५ ॥
विध्यंसोनि लंकाभवन । सकळ सैन्य प्रधान ।
निवटिला दशानन । अर्थ क्षण न लागतां ॥ १०६ ॥
सुरवरांचे बंदिमोचनी । शरणागता संस्थापूनी ।
सोडवोनि जनकनंदनी । समाधान जनी दीधलें ॥ १०७ ॥
गुढी आणोनि प्रीतीसी । भेटविले भरतासी ।
सुरवरांच्या गडगर्जेसी । अयोध्यानगरासीं प्रवेश ॥ १०८ ॥
अस्थत ख्याति करोनि जाण । अभिषेक केला मजलागून ।
जगद्वंद्य केलें पूर्ण । तुवां एकलेनि हनुमंता ॥ १०९ ॥
एवढा तुझा कृतोपकारी । हेहीं सांगितलें संक्षेपाकारीं ।
याहूनि तुझी अगाध थोरी । केंवी वैखरी बोलो शके ॥ ११० ॥
सत्यत्व मानीं माझिया बोला । मी श्रीराम तुझा केला ।
तुझेनि जगद्वंद्य झाला । प्रताप वाखाणिला तुझेनि ॥ १११ ॥
तुझेनि माझी शौर्यशक्ती । तुझेनि माझी प्रतापख्याती ।
नामें महापापी उद्धरती । हेही वरदोक्ती तुझेनि ॥ ११२ ॥
माझ्याप्रमाणे माझ्या भक्ताचा महिमा आहे :
यालागीं निजनिर्धारीं । मी तुझ्या सबाह्माभ्यंतरीं ।
तुझ्या इंद्रियाचे व्यापारी । निरंतरी मी वर्तें ॥ ११३ ॥
याचे नवल नव्हे मारुती । जे तुझें नाम स्मरती ।
त्यांपासीं मी रघुपती । तिष्ठें निश्चितीं सर्वदा ॥ ११४ ॥
मजपरीस हनुमंता । सर्वस्वें भजतां माझ्या भक्ता ।
अति आल्हाद मज रघुनाथा । तें सुख सर्वथा न बोलवे ॥ ११५ ॥
जेंवी पूजिल्या निजबाळक । माता सुखावे आत्यंतिक ।
तेंवी मजक पूजिल्या देख । सुख अलोलिक मज तेणें ॥ ११६ ॥
मद्भक्तांचें झालिया भक्त । त्यांचें सकळ मनोरथ ।
म्यां पुरवोनियां कृतकृत्य । नित्य निर्मुक्त करीं त्यांसी ॥ ११७ ॥
भक्तसंगतीचे महिमान :
माझी आवडी ज्यांचें चित्ती । तिहीं सांडोनि इतर संगाप्रती ।
करितां भगवद्धक्तसंगती । चारी मुक्ती वोळंगण्या ॥ ११८ ॥
सांडोनि इतर संगती । महापापियां नित्यमुक्ती ।
सनकादिकांच्या निजख्याती । स्वयें गर्जती पुराणें ॥ ११९ ॥
ब्रह्मयाची निजांधवृत्ती । उत्तर न देववे पुत्रांप्रती ।
हंसगीता दावोनि युक्ती । आत्मस्थिती आणिला ॥ १२० ॥
चोरटा वाल्मीक नारदवचनें । जगद्वंद्य रामभजने ।
प्रल्हाद वंदिजे पुराणे । अंगीं द्वंद्वें साहणें मी त्यांची ॥ १२१ ॥
गर्भी ऐकतो वचनासी । अगाध स्थिती बाणली त्यासी ।
तुवांचि उद्धरिलें संपातीसी । मधुरवचनेंसीं क्षणमात्रें ॥ १२२ ॥
अति गूढ विवरामथीं । हेमा पडली होती बंदी ।
तिसी भेटोनि त्रिशुद्धी । निजानंदीं उद्धरिली ॥ १२३ ॥
ऐसे आणिक सांगो किती । जग निर्मुक्त सत्संगती ।
ऐसीं श्रुतिशास्त्रें गर्जती । आणि प्रतीती प्रत्यक्ष ॥ १२४ ॥
ऐसें सांगतो रघुनाथा । प्रेम न सांवरे हनुमंता ।
चरणी ठेवानियां माथां । मूर्च्छावस्था पडियेला ॥ १२५ ॥
सत्संगतीचे माहात्म्य :
सत्संगाची निजस्तुती । स्वमुखें करितां रघुपती ।
आनंदमय त्रिजगती । नित्यनिर्मुक्ती जडजीवां ॥ १२६ ॥
आनंद उथळला सर्वांसी । नामें गर्जती अट्टाहासी ।
नित्यमुक्ति सत्संगासी । अनायासीं जडजीवां ॥ १२७ ॥
योग याग तप साधन । कृच्छ अतिकृच्छ चांद्रायण ।
पर्वतपात नलगे जाण । कर्वतभेदन निजमाथां ॥ १२८ ॥
ऐशा दुर्जयसाधनस्थितीं । सकळ सांडोनि निश्चितीं ।
भावे धरितां सत्संगती । जगनिर्मुक्ती सत्संगें ॥ १२९ ॥
ऐसें वरदवचनेंकरून । रामें केलें मारुतिपूजन ।
तेणें जडजीवां उद्धरण । झाले पूर्ण अनायासें ॥ १३० ॥
याच रीतीं बिभीषण । अनिवार प्रेम दारुण ।
श्रीराम त्याची बोळवण । स्वानंदें पूर्ण पै करील ॥ १३१ ॥
तें अति गोड निरूपण । देवभक्तांचे प्रेम पूर्ण ।
एका जनार्दना शरण । रामायण राम वदवी ॥ १३२ ॥
धन्य भक्ति बिभीषणाची । थन्य प्रीति श्रीरामाची ।
बोळवण करितां भक्ताची । प्रेम रामासीं अनिवार ॥ १३३ ॥
आज्ञा देवोनि समस्तांसी । रामराज्य अयोध्येसीं ।
अंती अवघीं नेली वैकुंठासीं । सुख सर्वांसीं दीधलें ॥ १३४ ॥
शरण एकीं एकनाथी । जनार्दन कृपावंता ।
रसाळ रामायणी कथा । तुझा वक्ता तूं स्वामी ॥ १३५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमत्प्रेमवर्णनं नाम नवाशीतितमोऽध्याय ॥ ८९ ॥
ओंव्या ॥ १३५ ॥ श्लोक ॥ १० ॥ एवं ॥ १४५ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणनव्वदावा