भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा

श्रीराम- भरतभेट –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

गुहकाचा भाव पूर्ण । भावे भेटला रघुनंदन ।
भाव तेथें तिथे ज्ञान । विज्ञानेसी जाण सर्वदा ॥ १ ॥

न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृण्मये ।
भावे हि विद्यते देवस्तस्माद्‌भावो हि कारणनम् ॥ १ ॥

भावार्थाचा महिमा :

भावार्थी प्रेम आगळे । भावार्थे तत्व आकळे ।
वैकुंठीचे-भाव बळे । सर्वकाळें भेटती ॥ २ ॥
भावावीण व्यर्थ श्रवण । भावावीण व्यर्थ कीर्तन ।
अर्थावबोध नाही पूर्ण । चित्त वळघे रान विषयाचें ॥ ३ ॥
भावार्थावीण व्यर्थ ज्ञान । भावार्थावीण व्यर्थ ध्यान ।
अंतरीं विकल्प नांदतां पूर्ण । ज्ञान ध्यान लटिकेंचि ॥ ४ ॥
भावार्थावीण वृथा भक्ती । भावार्थावीण वृथा कीर्ती ।
भावार्थावीण विरक्ती । बाह्य मिरविती लटिकीचि ॥ ५ ॥
भावावीण वृथा विचार । भावावीण वृथा आचार ।
भावावीण कर्माचार । जाण समग्र लटिकाचि ॥ ६ ॥
तो भावार्थ मूर्तिमंत । सत्य जाण बंधु भरत ।
श्रीराम भेटीसी प्रेमयुक्त । त्रषीसमवेत निघाला ॥ ७ ॥

रामदर्शन होईना म्हणून भरताचा आक्रोश :

हनुमंतें दिधलें समाधान । तरी भरता अवस्था पूर्ण ।
सर्वथा स्थिर नव्हे मन । विना रघुनंदन देखिलिया ॥ ८ ॥
परम अवस्था भरतासी । अंग टाकितसे भूमीसीं ।
श्रीरामें मोकलिले आम्हांसी । गति कायसी जिण्याची ॥ ९ ॥
श्रीराम आठवूनि मनीं । पदोपदी घाली लोळणी ।
रुदन करी आक्रंदोनी । राम असूनी दिसेना ॥ १० ॥
राम माझीं माता पिता । बंधु कुळगुरु तत्वतां ।
रामावीण सकळ वृथा । जिणें सर्वथा भूमिमार ॥ ११ ॥
राम माझें निजधन । राम नयनींचें अंजन ।
राम इंद्रियांचा चाळक पूर्ण । तयावीण तीं विकळ ॥ १२ ॥
पडे उठे विकळ होय । गात्रकंपें चांचरी जाये ।
तेणें आम्हां वंचिलें पाहें । करूं काये हनुमंता ॥ १३ ॥
माझा विषयलोभ दारुण । राज्याभिलाषी मी निंद्य पूर्ण ।
जाणोनियां रघुनंदन । येतां जाण परतला ॥ १४ ॥

रामदर्शन घडवावे म्हणून हनुमंताला साकडे :

काय करूं गा हनुमंता । वेगें करूं देहपाता ।
भेटी केंवी रघुनाथा । विचार तत्वतां मज सांग ॥ १५ ॥
ऐसा होतसे खेदक्षीण । हनुमंतासी केलें नमन ।
चरणीं मिठी घातली पूर्ण । रघुनंदन भेटवीं ॥ १६ ॥

हनुमंताने भरताला धीर दिला :

येरें उठवोनि भरतासी । आलिंगिलें हृदयेसीं ।
करूं नको देहपातासी । तेणें श्रीरामासी नव्हे भेटी ॥ १७ ॥
देहपातें होय भेटी । तरी कां साधक रिघती कपाटीं ।
योगी चढती योगपीठीं । श्रीरामभेटीलागूनी ॥ १८ ॥
मरणें भेटतां रघुपती । तरी यमपुरी कायसा वसती ।
कोण पावता अधोगती । मरणे मुक्ति जरी होत ॥ १९ ॥
सांडीं कुबुद्धि परती । सावध होईं निश्चितीं ।
पैल आला रघुपती । सहित कपिपती गर्जत ॥ २० ॥

जानकीसहित रामांचे विमान आले :

रीस वानर गोळांगूळ । करीत नामाचा कल्लोळ ।
व्यापिलें दिसे नभोमंडळ । आलें तत्काळ विमान ॥ २१ ॥
सवें बिभीषण लंकापती । सुग्रीव अंगद वानरपती ।
अमित वानरांच्या पंक्तीं । अंकाप्रति जनकजा ॥ २२ ॥

एतस्मिन्भ्रातरौ वीरौ वैदेह्याः सह राघवौ ।
सुग्रीवश्व महातेजा राक्षसश्र बिभीषणः ॥ २ ॥
स्त्रीबालयुववृद्धानां रामोऽयमिति कीर्तनन् ।
हर्षेण महताविष्टो निःस्वनो दिवमस्पृशत् ॥ ३ ॥
तं विमानगतं दृष्ट्वा सोमं नभसि वै यथा ।
प्रांजलिर्भरतो भूत्वा प्रहृष्टो राघवोन्मुख ॥ ४ ॥
ददर्श ब्रह्मणा सृष्टे विमाने भरताग्रजम् ॥ ५ ॥

नामघोषाच्या गजरांत राम अयोध्येजवळ आले :

सौमित्रसीतासमवेत । महावीरीं विराजित ।
विमानी देखिला रघुनाथ । नामें गर्जत वानर ॥ २३ ॥
भुभुःकार जयजयकार । नादें गर्जत अंबर ।
विमानस्थ रघुवीर । येतां सत्वर देखिला ॥ २४ ॥
नक्षत्रेश रजनीपती । गगनीं शोभे स्वप्रकाशस्थितीं ।
तेंवी विमानीं रघुपती । वानरपंक्तीसमवेत ॥ २५ ॥
चंद्रासवें नक्षत्रपाळें । तेवी रामासवें गोळांगुळें ।
गर्जत नामाच्या कल्लोळें । आले जवळी अयोध्येच्या ॥ २६ ॥

वानरांचा आनंदोत्सव :

अयोध्येच्या आरामवनीं । वानरीं टाकिल्या सेलाणी ।
द्रुम आसंडिती सत्राणीं । फळभक्षणीं आनंद ॥ २७ ॥
फळें खाती गटगटां । मिटक्या देती मटमटां ।
गोष्टी सांगती चटचटां । सुखें वरिष्ठां विटाविती ॥ २८ ॥
एकमेकां वांकुलिया । एकमेकां गुदगुदलिया ।
एकमेकां करिती रळिया । श्रीरामरायाचेनि धर्में ॥ २९ ॥

श्रीरामांच्या शौर्याची गाथा :

वाळी मारिला बाणेंकरी । राजचिन्हे सुग्रीवा शिरीं ।
शिळा तारोनियां सागरी । वानर परपारीं उतरले ॥ ३० ॥
पाडोनि त्रिकूटाचे कडे । खंदक बुजोनि धडफुडे ।
लंकादुर्गीं चहूंकडे । सैरा माकडें गर्जती ॥ ३१ ॥
धांडोळोनि घरोघर । कुंभकर्णा केला चूर ।
इंद्रजितासी थोर मार । करोनि सत्वर निवटिला ॥ ३२ ॥
सीतेचा सूड घ्यावयासी । अद्‌भुत शक्ति मारुतीसी ।
विध्वंसिलें रावणयागासी । आवरणांसी भेदिलें ॥ ३३ ॥
जावोनियां कुंडापासीं । मूत्रपुरीषें विझविलें त्यासी ।
पात्रे फोडोनि वेगेंसी । रावणासी गांजिलें ॥ ३४ ॥
तरी तो नव्हे सावधान । अंगदें साधोनि विंदान ।
मंदोदरीचें केशग्रहण । करोनि जाण गांजिली ॥ ३५ ॥
आक्रंदतां ते सुंदरी । रावण पोळला अंतरी ।
नेत्र उघडोनि पाहे बाहेरी । तंव बोहरी यागाची ॥ ३६ ॥
तेणें खवळला दारुण । युद्धा निघाला सत्राण ।
लक्षोनियां रघुनंदन । निर्वाण रण करूं आला ॥ ३७ ॥
रामें एकेचि बाणेंकरीं । रावण उडविला अंबरीं ।
शिरें छेदोनि लक्षांतरीं । क्षणामाझारीं निवटिला ॥ ३८ ॥
रामें रावण कुंभकर्ण । इंद्रजितासी लक्ष्मण ।
उरले राक्षस दारुण । ते हनुमंतें निवटिले ॥ ३९ ॥
राज्यासीं स्थापोनि बिभीषण । सोडविली जानकी जाण ।
सुरवरांचें बंदिमोचन । रघुनंदन निजविजयी ॥ ४० ॥
भेटोनियां दशरथासी । संस्थापना रामेश्वरासीं ।
आनंद होवोनि त्रैलोक्यासी । राम अयोध्येसी पातला ॥ ४१ ॥

वानरांचा आनंदोत्सव पाहून भरत हर्षभरित झाला :

ऐसें गर्जती अद्‌मुत । वानर आनंदें नाचत ।
ते देखोनि भरत । सुखें अद्‌भुत उथळला ॥ ४२ ॥
चातका मेघाचें सिंचन । चकोरा चंद्रामृतपान ।
मृता जेंवी अमृतप्राशन । घनगर्जत मयूरा ॥ ४३ ॥
चुकल्या बाळकासी माता । पतिव्रता भेटे निजकांता ।
निधि सांपडे तत्वतां । जेंवी अवचिता भणंगासी ॥ ४४ ॥
मूकिया जोडे वाक्सिद्धी । अंधासी रत्‍नपरीक्षेची बुद्धी ।
श्रीराम देखता त्रिशुद्धी । हर्षानंदी होय भरत ॥ ४५ ॥

श्रीरामदर्शनाने भरताची भावावस्था :

सवेग उठोनि घातली कव । आकाशावरी घेतली धांव ।
शून्य सारोनि स्वयमेव । स्वयें राघव वंदिला ॥ ४६ ॥
कोणाचें न ऐकतां श्रवण । न देखतां कोणाचें नयन ।
नेणतां कोणाचें महिमान । रघुनंदन नमियेला ॥ ४७ ॥
सांडोनि मीतूंपणाची स्फूर्ती । जागी न होतां चित्तवृत्ती ।
मिठी घातली रघुनाथीं । अभिनव ख्याती भरताची ॥ ४८ ॥
उठतां मनाची स्फूर्ती । नायकतां बुद्धीची वृत्ती ।
निःशेष त्यागोनि अहंकृती । श्रीरघुपति नमियेला ॥ ४९ ॥

भरत-राम यांची भेट जणू म्हणजे गंगा -सगराचे मीलनच ते! :

भरतरामाआलिंगनीं । रामीं हारपले दोनी ।
तटस्थल्या अवस्था तीनी । सुरसिद्ध मनीं विस्मित ॥ ५० ॥
तैसाचि शत्रुघ्नही जाण । अहंकोहंसोहंविहीन ।
भेटतांचि रघुनंदन । येरयेरां जाण गीळिलें ॥ ५१ ॥
गंगासागरी मिळणी जैसी । श्रीरामभरतां भेटी तैसी ।
स्वादासी आण साखरेसी । भेटी जैसी अभेद ॥ ५२ ॥
तैसीच भेटी सौमित्रेंसीं । भरत आणि शत्रुघ्नेंसीं ।
भेटी झाली एकत्वासी । त्रिधा भेदासी सांडूनी ॥ ५३ ॥
सच्चिदानंदपदें देख । त्रिधा भेद वस्तु एक ।
तेंवी वेगळे देखतां आणिक । रघुकुळटिळक वस्तुतां ॥ ५४ ॥
द्रुति मार्दव पिंवळी । त्रिधा भेदें चापेकळी ।
तेंवी श्रीरामस्वरूपमेळीं । तिघे तत्काळीं अद्वय ॥ ५५ ॥
मूळीं एकत्वें एक ॐकार । तोचि झाला त्रिधा प्रकार ।
अकार उकार मकार । तेंवी रघुवीर बंधूंसीं ॥ ५६ ॥
पन्नास आगळ्या दोनीवरी । प्रणवी मात्रांची उभारी ।
तेचि गुंफोनि श्रुतिशास्त्रीं । अर्थाकारीं विराजे ॥ ५७ ॥
तेंवी श्रीरामाचें सैन्य देख । नरवानरादि अशेख ।
अयोध्येचे नागरिक । एक एक तद्‌रूप ॥ ५८ ॥
जेंवी न लक्षितां कोणासी । ऐक्यता जैसी जीवशिवासी ।
तेंवी भेटी बंधुबंधूंसीं । अलक्ष्यतेसी पै झाली ॥ ५९ ॥
पुढें सकळ सैनिकांसी । माता गुरु प्रधानांसी ।
राम आळवील आलिंगनेंसी । निजउल्लासीं निजस्वरूपें ॥ ६० ॥
अति अद्‌भुत गुहा ज्ञान । सकळीं सकळ रघुनंदन ।
अभेदत्वें आलिंगन । देवोनि जाण निववील ॥ ६१ ॥

श्रीराम – भरतभेटीचे वर्णन करणे हा माझा अधिकार नव्हे असे गावबा सांगतात :

अति सखोल निरूपण । बोलावया मज कैंचें वदन ।
वक्ता एका जनार्दन । निरूपण चालविता ॥ ६२ ॥
जनार्दन वदनीं वक्ता । गुह्यज्ञान रामकथा ।
निजनिरूपण चालविता । वचनवदता होवोनियां ॥ ६३ ॥
जनार्दनें डोळस नयन । जनार्दन निजअंजन ।
देखणें दावी देखणा होऊन । रघुनंदन विश्वमूर्ति ॥ ६४ ॥
मनाचें जें निजमन । स्वयें एका जनार्दन ।
निरसोनि मनाचें मनपण । श्रीरामकथन स्फुरवित ॥ ६५ ॥

श्रीएकनाथांच्या कृपेने मी रामायण लिहीत आहे :

मनीं कर्मी वचनी पूर्ण । चाळक एका जनार्दन ।
निजकथा रामायण । प्रीतीकरोनि चालवित ॥ ६६ ॥
ते ग्रंथकथनअहंता । मज द्यावया तत्वतां ।
संबंध नाहीं सर्वथा । कर्ता करविता तो एक ॥ ६७ ॥
यालागीं सकळ श्रोतेजन । तयांसी माझें लोटांगण ।
सावध करोनियां मन । श्रीरामकथन परिसावें ॥ ६८ ॥
श्रोतियांसी सावध म्हणतां । लागों पाहे उद्धतता ।
त्यांसी नित्यसावधानता । बोलिलों वार्ता बाळत्वें ॥ ६९ ॥
क्षमा करोनि अपराधासी । श्रीरामें सुखाविलें सर्वांसी ।
भेटोनि अयोध्येच्या लोकांसी । त्या निरूपणासी परिसावें ॥ ७० ॥

श्रोत्यांनी रामकथा पुढे सांगण्याची घाई केली म्हणून गावबाला उत्साह :

तंव कृपालु निजसच्चन । संतोषयुक्त अभयवचन ।
बोलते झाले आपण । अमृताहून सुखकारी ॥ ७१ ॥
आम्हां रामकथेचा आदर । रसाळ निरूपण साचार ।
सुचूं नको परिहार । कथा सत्वर चालवीं ॥ ७२ ॥
एकोनि संतांचें वचन । उल्लासला चौगुण ।
जेंवी ऐकतां घनगर्जन । आनंद पूर्ण मयूरा ॥ ७३ ॥
आज्ञापिलें संतोषें । तरी ऐका स्वामी सावकाशें ।
सकळां भेटोनि राघवे । सुख कैसें दीधलें ॥ ७४ ॥

श्रीरामांच्या भेटीला सर्वजण आले :

भरत आणि शत्रुघ्न । वसिष्ठमुख्य ऋषिगण ।
श्रीराममाता स्वये घेऊन । आले आपण भेटीसीं ॥ ७५ ॥
सुमंतादि प्रधान मुख्य । आले सकळही सैनिक ।
जनपद नागरिक । आले असंख्य भेटीसी ॥ ७६ ॥
चतुराश्रम चतुर्वर्ण । षड्दर्शनी आले गहन ।
अखिल जातींचें जन । आले रघुनंदनभेटीसी ॥ ७७ ॥
देखतांचि रघुवीर । निःशेष विसरले संसार ।
पुढें केंवी चाले व्यवहार । हाही विचार विसरले ॥ ७८ ॥
देखतांचि रघुनाथा । धाकें निःशेष निमाली चिंता ।
कार्यकारणकर्तव्यता । निःशेष चित्ता नाठवे ॥ ७९ ॥
न देखतांचि राघवासी । दंड लागला संन्याशांसी ।
तेही देखतां श्रीरामासी । निजदंडासी उबगले ॥ ८० ॥
देखतां श्रीरामासी । ओंवाळूनि सांडिलें दंडासी ।
निष्कर्मता बाणली कैसी । देहभावासी विसरले ॥ ८१ ॥
विसरोनि श्रीरामासी । वनस्थ वनीं झाले पिशीं ।
आश्रमाभिमानें गिळिलें त्यासी । नित्यकर्मासी आचरतां ॥ ८२ ॥
तेंही देखतां रघुपती । आश्रमाभिमान शीघ्रगतीं ।
केव्हां गेला नेणों केउती । सुखसंवित्ती श्रीराम ॥ ८३ ॥
विसरोनियां रघूत्तम । गृहस्थां होत गृहधर्म ।
शिश्नोदरव्यवसाय परम । व्यवसायकर्म सर्वदा ॥ ८४ ॥
तिंही देखतां रघुरावो । गृहथर्म झाला वावो ।
विषयेंद्रियांचा झाला अभावो । निजानंद पहा हो कोंदला ॥ ८५ ॥
नाममात्र ब्रह्मचारी । ब्रह्मत्व नाहीं इंद्रियांवरी ।
राम देखतां निर्धारीं । सत्यत्वें थोरी ब्रह्मचर्या ॥ ८६ ॥

सत्संगानेच श्रीरामदर्शनाचा अलभ्य लाभ :

इतुकियासी मूळ कारण । मुख्यत्वें सत्संगचि प्रमाण ।
सत्संगें रघुनंदन । वोळगणा पूर्ण सर्वांगें ॥ ८७ ॥
सत्संगें साधन केलें । सत्संगें तत्व आकळले ।
सत्संगाचेनि भावबळे । परब्रह्म लोळे दोंदावरी ॥ ८८ ॥
सत्संगें साधनसिद्धी । सत्संगें अढळ बुद्धी ।
चालतां बोलतां समाधी । जाण विद्धि सत्संगें ॥ ८९ ॥
तो सत्संग मूर्तिमंत । श्रीरामभ्राता राव भरत ।
त्याचेनि संगे यथार्थ । श्रीरघुनाथ भेटला ॥ ९० ॥
रामनामाच्या दीर्घध्वनीं । आनंदें पूर्ण झाली अवनी ।
नाद न समाये गगनीं । सकळां मनीं उत्साहो ॥ ९१ ॥
स्त्रीशुद्रादि चांडाळ । भरतसंगती तत्काळ ।
देखोनि रघुकुळपाळ । झाले सकळ सुखमय ॥ ९२ ॥
रंगारीं उडविलीं रावलगें । पाटवीं पाटावें अनेगें ।
सोनारीं सुवर्णसुमनें । वेगें हर्षयोगें उडविलीं ॥ ९३ ॥
वैराळ मोत्याच्या झालरी । रत्नें उडविती जोहारी ।
सर्व स्वयें कुरवंडी निर्धारीं । करिती गजरीं रामावरी ॥ ९४ ॥
देखोनियां रधुनाथा । सर्वस्वाचा त्याग करितां ।
उल्लास जनाचिया चित्ता । लोभ सर्वथा नाहीं कोणा ॥ ९५ ॥
सकळीं सकळ संपत्ती । ओवाळिली श्रीरघुपती ।
तरी अधिक आनंद चित्तीं । भेटीची स्थिती अवधारा ॥ ९६ ॥

श्रीरामांचे ऋषींना व मातांना वंदन :

देखोनियां ऋषिवरांसी । विमान सांडोनि वेगेंसीं ।
उडी घातली आवेशीं । ऋषिनमनासी श्रीरामें ॥ ९७ ॥
परमात्मा स्वयें श्रीराम । तो ऋषिनमना सकाम ।
निष्कर्माचें निजरूप परम । द्विजोत्तम रामाचें ॥ ९८ ॥
आपण आपणासी करावी प्रीती । आपुली आपणा निजभक्ती ।
वाढविती अति निगुती । म्हणोनि रघुपति द्विज नमी ॥ ९९ ॥
गुरुदास्येंवीण तत्वतां । ठाव नाहीं परमार्था ।
ऐसें जाणोनि वस्तुतां । ठेविला माथा गुरुचरणीं ॥ १०० ॥
गंगा निजओघें सर्वस्वेंसीं । येवोनि भेटे सागरासी ।
तेंवी रामे अति प्रीतीसी । वसिष्टासी नमियेलें ॥ १०१ ॥
हेत ठेवोनि अर्थस्वार्थी । तीर्थव्रतादि भजन करिती ।
ते जाणावी अवघी रीती । फळप्राप्ती तयां नव्हे ॥ १०२ ॥
चित्ते चितेंसीं जीविता । गुरूचरणी पे अर्पिता ।
अति उल्लास ज्याच्या चित्ता । तेंचि रघुनाथाचें स्वरूप ॥ १०३ ॥
येणें भावें वसिष्ठासी । रामें नमियेलें अति प्रीतीसीं ।
वसिष्ठें उचलोनि वेगेंसीं । निजहृदयेंसी आलिंगिला ॥ १०४ ॥
श्रीरामहृदया हृदय नमिलें । एकचे सुख पूर्ण झालें ।
जेंवी दीप एक झाले । भांडार उघडले प्रकाशाचें ॥ १०५ ॥
सुवर्ण आणि अलंकारा । भेटी एकत्वें उभारा ।
तेंवी वसिसरघुवीरां । मिठी एकाकारा पडियेली ॥ १०६ ॥
जैसी प्रीति सद्‌गुरूसी । तेणें भावें सकळ कधी ।
रामें नमिलें अति प्रीतीसीं । अद्वयेसीं ब्रह्मत्वें ॥ १०७ ॥
कैकेयी माता भरतासी । रामें आधीं नमिलें तिसी ।
येरीं आलिंगिला अति प्रीतीसीं । कोप मानसीं नेघे रामा ॥ १०८ ॥
म्यां तुजसी वैर केलें । परी त्वां रामा मनी नाहीं धरिलें ।
ऐसें तुझें महिमान आगळे । सुखी केलें मजलागीं ॥ १०९ ॥

उपकारिषु य: साधु: साधुत्वे तस्य को गुण: ।
अपकारिषु यः साधुः स साधु सद्‌भिरुच्यते ॥ ६ ॥

कैकेयीची रामस्तुती :

वनवासा धाडिलें तुज । जग निंदी म्हणोनि मज ।
तोंड दावितां लोक लाज । रघुराजद्वेषिणी ॥ ११० ॥
अतीत अनागत वर्तमान । सर्वज्ञ ज्ञाता तूं रघुनंदन ।
बाह्मेंद्रियें क्रियाचरण । वर्तविता आन कोणी नसे ॥ १११ ॥
प्राण्याच्या माथां निमित्त जाण । वृथा ठेविती आबाल जन ।
चाळक वर्तवी वर्तन । कर्मे जाण तेंवी होती ॥ ११२ ॥
श्रीराम राज्यासी विस्त । करावया मी मशक कोण ।
राम परमात्मा परिपूर्ण । क्रिया संपूर्ण करवीत ॥ ११३ ॥

जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर्जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ।
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥ ७ ॥

कैकेयी म्हणाली तूच कर्ता -करविता आहेस :

श्रीरामराज्यासी विघ्न । सर्वथा करूं नये आपण ।
ऐसें जाणताजाणतां पूर्ण । उपरति मन पैं नेघे ॥ ११४ ॥
स्वधर्म जाणोनि प्रवृत्ती । अधर्म जाणोनि निवृत्ती ।
सर्वथा न करवे निश्चितीं । याची स्थिति परयेसीं ॥ ११५ ॥
अंतरवासी कोणी एक । भविष्य जाणोनियां देख ।
प्राचीनसूत्र अलौकिक । निजलाघवें देख नाचविता ॥ ११६ ॥
त्या सूत्राचेनि बळें जाण । उत्तम मध्यम अधम जन ।
निजसत्ता नाचवी पूर्ण । होय वर्तन तदनुरूप ॥ ११७ ॥
प्राचीनाची चाळकता । कर्म कार्य कर्तव्यता ।
तुजअधीन रघुनाथा । कर्ता करविता तूंचि तूं ॥ ११८ ॥
ब्रह्मा धरोनि मुंगीवरी । राम चाळक चराचरीं ।
तो माझे दुष्टाचारीं । केंवी निर्धारीं आन होईल ॥ ११९ ॥
राम चाळक इंद्रियांचा । राम वाचक वाचेचा ।
राम कल्पक मनाचा । बोध बुद्धीचा श्रीराम ॥ १२० ॥
राम चित्ताचें चेतव्य । राम अहंकारा अहंभाव ।
प्राणमर्यादेची धांव । स्वयें स्वयमेव श्रीराम ॥ १२१ ॥
तेथें सत्कर्म असत्कर्म । कर्ता स्वयें श्रीराम ।
जेथें निपजे जो धर्माधर्म । सुखदुःखादि परम परिपाक ॥ १२२ ॥
भोग्य भोग आणि भोक्ता । स्वयें श्रीरामचि तत्वतां ।
तेथें आमचे माथां कर्तव्यता । केवी रघुनाथा येईल ॥ १२३ ॥
कर्ता कार्य कर्माचरण । स्वयें तूंचि तूं आपण ।
वनवासासी बुद्धि दारुण । तुवांचि जाण प्रेरिली ॥ १२४ ॥
जावोनियां वनवासासी । निर्दाळावें राक्षसांसी ।
सोडवावे सुरवरांसी । नवग्रहांसी सोडवावे ॥ १२५ ॥
दंडकारण्य करोनि मुक्त । द्विजवरां सुख अद्‌भुत ।
संस्थापोनि शरणागत । त्रैलोक्यांत निजविजयी ॥ १२६ ॥
इतुकें चरित्र तत्वतां । तुज करणें होते रघुनाथा ।
वृथा अपराध माझे माथां । जगनिंद्यता कां केली ॥ १२७ ॥
समर्थ करीतसे बरर्वे । त्यासी काय कोणे म्हणावें ।
अपेश कैकेयीनें भोगावे । कीर्ति राघवें विजयाची ॥ १२८ ॥

श्रीरामांचें कैकेयीला वंदन व तिची स्तुती :

ऐसे बोलतां कैकेयीसी । निजखूण पावली रामासी ।
घालोनि लोटांगण मातेसी । निजहृदयेंसीं आलिंगिली ॥ १२९ ॥
तूं आमची निजमाता । तुझेनि कीर्ति रघुनाथा ।
जगदुद्धाराची कथा । जाण तत्वतां तुझेनि ॥ १३० ॥
आपणावेगळे आम्हांसी । जरी न करिसी परियेसीं ।
तरी कोण पुसते आम्हांसी । कीर्ति रामासी तें कैंची ॥ १३१ ॥
तुंवा देवोनि आशीर्वचन । करविलें वनप्रयाण ।
तेणें झालें परम पावन । कीर्ति गहन तिही लोकीं ॥ १३२ ॥
तुझेनि मुक्त दंडकारण्य । तुझेनि वधिले रक्षोगण ।
तुझेनि निवटिला रावण । सुरमोचन तुझेनि ॥ १३३ ॥
तुझी प्रीति आम्हावरी । सापत्‍नभावें लोकाचारीं ।
कृपेनें धाडितां वनांतरी । ब्रह्मांडभरी कीर्ति माझी ॥ १३४ ॥
मज मानिती सकळ जन । ते तुझी कृपा पूर्ण ।
तयां दोघांचा संवाद जाण । निजबोध गहन जगासी ॥ १३५ ॥
रामें घालोनि लोटांगण । कैकेयी आलिंगिली पूर्ण ।
यश जोडलें संपूर्ण । रघुनंदन जगद्वंद्य ॥ १३६ ॥
कैकेयी श्रीरामाचें वचन । ऐकतांच तत्क्षण ।
उडालें कर्मकर्तेपण । निराभिमान निजबोध ॥ १३७ ॥
ऐसा बाणला वचनार्थ । धर्मचाळक रघुनाथ ।
वृथाभिमान धरितां येथ । नरकपात अभिमानें ॥ १३८ ॥
कैकेयीवचनें तत्वतां । सर्व कर्मी निष्कर्मता ।
स्वयें बाणली तत्वतां । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥ १३९ ॥
पुढें होवोनि रघुनंदन । कौसल्येसी केलें नमन ।
येरीं आलिंगोनि पूर्ण । केलें अवघाण मस्तकीं ॥ १४० ॥

कौशल्या व सुमित्रां व कैकेयीमभ्यवादयन् ।
मूर्धन्याधाय कौसल्या तावुभौ रामलक्ष्मणौ ॥ ८ ॥
अक्के सीता समारोप्य बाष्पमानंदहर्शजम् ॥ ९ ॥

कौसल्यादि सर्वांना श्रीरामांचे नमन :

परमप्रिय दशरथासी । जिचेनि कीर्ति श्रीरामासी ।
आधी नमूनि ते कैकेयीसी । मग कौसल्येसी नमियेलें ॥ १४१ ॥
तैसेचि सुमित्रेसी आदरें । स्वयें नमिलें रघुवीरें ।
जानकीं जाण सौमित्रें । माता सत्वर नमियेल्या ॥ १४२ ॥
श्रीरामासी देतां आलिंगन । वियोगदुःखक्लेश दारुण ।
निःशेष गेले हारपोन । समाधान जीवशिवां ॥ १४३ ॥
कौसल्येनें जानकी । प्रीतीं बैसविली अंकीं ।
अवघाण मस्तकीं । केलें तिघांसी कौसल्या ॥ १४४ ॥
सकळ जन अयोध्यावासी । प्रीतीं भेटों आले श्रीरामासी ।
श्रीरामें त्यांचिये भेटीसी । युक्ति कैसी योजिली ॥ १४५ ॥
मजलागीं आर्तभूत । भरतसंगतीं निश्चित ।
सकळ झाले व्रतस्थ । सुखी त्यातें करावें ॥ १४६ ॥
त्यांसी न देतां आलिंगन । सकळ होती दुःखमग्न ।
पृथकू पृथक् देतां पूर्ण । अति विलंबन लागेल ॥ १४७ ॥
एकेंचि काळें सकळांसी । आनंदवावे उल्लासीं ।
तरीच सुख वाटेल त्यांसी । दुःखराशी अन्यथा ॥ १४८ ॥
यांसी न देतां आलिंगन । व्यापकत्या पडे खान ।
आर्तबंधु है अभिधान । वृथाचि जाण होऊं पाहे ॥ १४९ ॥
श्रीराम लाघवी निर्धारीं । प्रकाशोनि सकळांतरीं ।
कैसी केली नवलपरी । निजनिर्धारीं परिसावे ॥ १५० ॥
अंतरीं प्रवेशोनि आपण । मनचि राम झालें पूर्ण ।
मग जें जें दिसे दृश्य भान । तें तें जाण श्रीराम ॥ १५१ ॥
सकळातरी प्रवेशोन । सकळरूपें झाला आपण ।
जो ज्यासी दे आलिंगन । तेथेंचि जाण श्रीराम ॥ १५२ ॥
भरत शत्रुघ्न ऋषीश्वर । नागरिक जन समग्र ।
एक वेळे लहानथोर । स्वयें रघुवीर दिसतसे ॥ १५३ ॥
पामर जो कां चांडाळादिक । सदाचार आणि श्वपाचक ।
राम दिसे एकाएक । अलोलिक लाघव ॥ १५४ ॥
अयोध्येच्या तृणचरा गायी । श्रीराम दिसे त्यांच्या ठायीं ।
व्याप्र सर्प क्रूर पाहीं । त्यांच्या ठायीं श्रीराम ॥ १५५ ॥
वृक जंबुकादि वृश्चिक । पक्षिआदि श्येन काक ।
कृमिकीटक पतंगादिक । एक एक राम झाले ॥ १५६ ॥
द्रुम पर्वत पाषाण । गिरिकंदरें वन कानन ।
स्थावर जंगम संपूर्ण । रघुनंदन स्वयें दिसे ॥ १५७ ॥
दृश्यमात्रीं रघुनंदन । देखता दृश्याचे भान ।
सर्वथा उडालें संपूर्ण । चैतन्यघन कोंदलें ॥ १५८ ॥
श्रीरामरूपें आलिंगन । परस्परें देती आपण ।
विश्वरूप जाहला पूर्ण । सर्वांतरी आपण प्रगटोनी ॥ १५९ ॥
माता भेटे पुत्रासी । राम म्हणोनि आलिंगी त्यासी ।
माता न देखोनि पुत्रासी । अति प्रीतीसीं आलिंगित ॥ १६० ॥

परस्परांचे प्रेमालिंगन :

बंधु देखोनि भगिनी । प्रीतीं आलिंगी राम भावूनी ।
येरें बंधुपण विसरोनी । रघुनंदनीं आलिंगन ॥ १६१ ॥
पिता पुत्रासी पुत्र पित्यासी । कन्या मातापितरांसी ।
विसरोनि अहंममतेसी । श्रीरामासी आलिंगत ॥ १६२ ॥
स्वीतें आलिंगित निजभर्ता । श्रीराम भासे तत्वतां ।
प्रियातें१ आलिंगितां कांता । श्रीरघुनाथा भेटी होय ॥ १६३ ॥
सासरा आणि जांवई । अति प्रीतीं लवलाहीं ।
रामरूपें भेटती पाहीं । लज्जा ठायीं निमाली ॥ १६४ ॥
सासू देखोनि जांवयासी । राम म्हणोनि निजावेशीं ।
प्रीतीं मिठी घातली तिसी । लाज मानसीं येवों न शके ॥ १६५ ॥

परस्परांच्या आलिंगनाने सर्वांना आनंदीआनंद :

आदिकरोनि दासदासी । रामरूपें आलिंगन त्यांसी ।
रामें विसरविलें देहासी । स्वामिसेवकांसीं श्रीराम ॥ १६६ ॥
पशु जे कां तृणचर । तिर्यगादि योनि समग्र ।
कृमिकटिकादि विचित्र । भेटीं रघुवीर सुखावे ॥ १६७ ॥
आलिंगनें परस्परीं । श्रीरामरूपें निर्धारी ।
देते झाले अत्यादरीं । प्रीती थोरी श्रीरामी ॥ १६८ ॥
राम म्हणोनि परस्परीं । खांदा घेती अत्यादरी ।
नृत्य करिती हर्षे थोरीं । देहविसरी स्वानंदे ॥ १६९ ॥
द्विज सुखावले अवघे । झेलिती गोपीचंदनरवे ।
धोत्रे झेलिती घडीपालवें । बंदी राघवें सोडविले ॥ १७० ॥
नागरिक जन समस्त । त्यांसी भेटला रघुनाथ ।
होवोनियां आनंदभरित । सकळीं नृत्य मांडिलें ॥ १७१ ॥
हर्ष दाटला सकळांसी । कोणी नोळखे कोणासी ।
श्रीरामें अवघीं केली पिसीं । आपआपली कैसीं नाचती ॥ १७२ ॥
वानर मानव समग्र । अवघे झाले एकत्र ।
अवघीं केला जयजयकार । श्रीरघुवीर निजविजयी ॥ १७३ ॥
राम सौमित्र सीता सती । तिघे भेटलीं एकस्थितीं ।
आनंदविलें सकळांप्रती । श्रीरधुपति कृपाळू ॥ १७४ ॥
सुग्रीव आणि बिभीषण । श्रीरामें हातीं धरोनि जाण ।
करविलें वसिष्ठनमन । येरें आलिंगन दीधलें ॥ १७५ ॥

भरतभेट व आलिंगन :

तैसेचि सकळ ऋषिगण । त्यासीं करोनियां नमन ।
मातांसी घालोनि लोटांगण । भरता आलिंगन दीधलें ॥ १७६ ॥
नळ नीळ अंगद जांबवंत । सुषेणदधिमुखादि समस्त ।
हातीं धरोनियां रघुनाथ । भेटवीत भरतासी ॥ १७७ ॥
भरत लागला पायांसी । तुम्ही साहाकारी श्रीरामासी ।
निवटोनियां लंकेशासी । निजविजयासी दीधलें ॥ १७८ ॥
तुमचेनि श्रीरामासी कीर्ती । तुमचेनि अमरां बंदिमुक्ती ।
सोडवोनियां सीता सती । श्रीरघुपती भेटविली ॥ १७९ ॥
ऐकोनि भरताचें बोलणें । सकळीं पातलीं लोटांगणें ।
त्रैलोक्य पावन रधुनंदने । विजयी होणें त्याचेनि ॥ १८० ॥
श्रीरामें पावन तीर्थ । श्रीरामें पावन व्रत ।
श्रीरामें याग पुनीत । येरवीं पूर्ण व्रत अपायी ॥ १८१ ॥
श्रीरामें क्षेत्र पावन । श्रीरामें पावन ध्यान ।
श्रीरामें पावन दान । येरवीं पूर्ण अपायी ॥ १८२ ॥
चुकोनियां श्रीरघुनंदन । जें जें कीजे कर्माचरण ।
तें ते निश्चये अनर्थी जाण । राखता कोण तयासी ॥ १८३ ॥
श्रीरामेवीण क्रिया घडे । तेथें अपाय रोकडे ।
चुके ठके विकळ पडे । पतन गाढें तयासी ॥ १८४ ॥
ऐसें परस्परें जाण । अंतरप्रीतीं आलिंगन ।
देवोनियां स्तविती रघुनंदन । प्रेम गहन श्रीरामीं ॥ १८५ ॥
तेणें डोलत रघुनंदन । होवोनियां सुखैकघन ।
निजभक्तांचा प्रेमा गहन । प्रेमें पूर्ण प्रीति रामा ॥ १८६ ॥
पुढील कथानुसंधान । श्रीरामाचें अभिषिंचन ।
अत्यंतगोड निरूपण । एका जनार्दना विनवित ॥ १८७ ॥
जनीं जनार्दन देख । जनार्दनीं सकळ लोक ।
ऐसा निश्चय जो सम्यक । जाणे निःशेख आपणासी ॥ १८८ ॥
त्यासी कथा रामामृत । निश्चयें कळलें यथार्थ ।
त्याचा भोक्ता तोचि एक । जो कथामृत चवी जाणे ॥ १८९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामभरतदर्शनं नाम एकाशीतिमोऽध्याय ॥ ८१ ॥
॥ ओंव्या १८९ ॥ श्लोक ९ ॥ एवं १९८ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्याऐंशिवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *