संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा

श्रीरामांकडून रावण छत्राचा भंग

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

शार्दूळ परत येतो, त्याची बिकट अवस्था व त्याचे कथन :

पूर्वप्रसंगवृत्तांत । रडत पडत कुंथत ।
शार्दूळ आला रुधिरोक्षित । तयासी पुसत लंकेश ॥ १ ॥

वीक्ष्यमाणो विषण्णं तु शार्दूलं शोककर्षितम् ।
उवाच प्रहसन्नेव रावणो भीमदर्शनः ॥१॥
अयथावच्च ते वर्णो दीनश्चासि निशाचर ।
नासि कश्चिदमित्राणां क्रुद्धानां वशमागतः ॥२॥
इति तेनानुष्टस्तु वाचं मंदमुदीरयत् ।
न ते चारयितुं शक्या राजन्वानरपुंगवाः ॥३॥
नापि संभावितुं शक्यं संप्रश्र्नोपि न लभ्यते ॥४॥

शार्दूळ देखोनि अति दुःखीत । त्यासी पुसे लंकानाथ ।
वैरिसासी जालासी हस्तगत । रुधिरोक्षित दिसतोसी ॥ २ ॥
सादरें पुसतां रावण । शार्दूळ बोले अति कुंथोन ।
असंख्यात वानरांचें सैन्य । संख्या कोण करुं शके ॥ ३ ॥
अमुके एक वानर असती । ऐसी भावना न करवे चित्तीं ।
संख्या पुसतां वानरांप्रती । तेही सांगती असंख्य ॥ ४ ॥
वाचस्पतीची वाचा मुरडे । वेदवाचा बोबडी पडे ।
रामसैन्याची संख्या न घडे । निजनिवाडें लंकेशा ॥ ५ ॥
श्रीरामसैनाचें गणित । करावया ब्रह्मा नसे समर्थ ।
आम्ही काय मशक तेथ । संख्या समर्थ करावया ॥ ६ ॥
श्रीरामकतकीं चारपण । सर्वथा न करवे जाण ।
मुख्य वैरी आम्हां बिभीषण । तो ओळखोन धरितसे ॥ ७ ॥

बिभीषणेन ज्ञातोऽहं वानरैश्च प्रधर्षितः ।
परिणीय च सर्वत्र नीतोऽहं रामसंसदि ॥५॥
हरिभिर्वध्यानश्च याचमानः कृतांजलिः ।
राघवेण परित्रातो जीवन्नेव विमोचितः ॥६॥

आम्ही अति गुप्त मायावेषीं । माव न चले बिभीषणापासीं ।
तेणें धरोनि अति वेगेंसी । वानरांपासीं दिधलें ॥ ८ ॥
वानरीं नेतां कटकाआंत । स्तोमें स्तोमें हींडवीत ।
लाता बुक्य़ा टोले देत । तेणें कल्पांत मज जाला ॥ ९ ॥
बळ सांगावया रावणापासीं । दळ दाखवितां मजसी ।
वानरीं करोनि कासाविसी । रामसभेसीं मज नेलें ॥ १० ॥
हेर मारल्या कोण पुरुषार्थ । ऐसें बोलिला रघुनाथ ।
तेणें मज केलें निर्मुक्त । जीवें जीत मग जालों ॥ ११ ॥

श्रीरामांची सूचना :

श्रीरामांचें प्रतापबळ । असंख्य त्याचें दळ सबळ ।
त्यासीं न चले युद्धकल्लोख । जनकबाळ अर्पावी ॥ १२ ॥
सीता अर्पिल्या श्रीरघुनाथा । मरणोन्मुक्तीं लंकानाथा ।
स्वस्थता राक्षसां समस्तां । निर्भयता तिहीं लोकीं ॥ १३ ॥

पुरप्राकारमायांति क्षिप्रमेकतरं कुरु ।
सीतां वा संप्रयच्छाशु युद्धं वा संप्रदीयताम् ॥७॥
शार्दूलस्य महद्वाक्यं श्रुत्वोवाच स रावणः ।
यदि मां प्रतियोत्स्यंति देवगंधर्वदानवाः ॥८॥
नैव सीतां प्रदास्यामि सर्वलोकक्षयादपि ॥९॥

उडोनिया वानरवीर । लंका घेती सप्राकार ।
अझुन कायसा विचार । शिघ्रतर करीं एक ॥ १४ ॥
युद्धा निघावें लंकानाथा । कीं श्रीरामा द्यावी सीता ।
येविषयीं विलंबू करितां । कुळक्षयार्था पावाल ॥ १५ ॥
ऐकोनि शार्दूळवचन । रावण झाला कंपायमान ।
मिथ्या धरोनि दुरभिमान । स्वयें गर्जोन बोलत ॥ १६ ॥
आदि करोनि श्रीराघव । युद्धा आलिया देवदानव ।
साह्य दैत्यादि गंधर्व । सीता स्वयंमेव मी न सोडीं ॥ १७ ॥
राक्षस मारिल्या समस्त । श्रीरामें केल्या कुळघात ।
मजही मांडल्या प्राणांत । तरी मी सीता सोडींना ॥ १८ ॥
मज रावणा जिवें जितां । सर्वथा मी न सोडीं सीता ।
ऐसें बोलणें बोलतां । परम चिंता पावला ॥ १९ ॥
चार मारणें नाहीं रघुनाथा । तेथूनि चार येथें येतां ।
श्रीरामा अर्पी शीघ्र सीता । मज तत्वतां सांगती ॥ २० ॥
ऐसा बोलिला बिभीषण । तैसंचि बोलिला शुकसारण ।
शार्दूळ सांगतो आपण । भय दारुण रामाचें ॥ २१ ॥

वानरवीरांचे वर्णन :

श्रीरामापासीं वानरवीर । कोण धुरा थोर थोर ।
आतुर्बळीं कोण झुंजार । दशशिर पूसत ॥ २२ ॥

तदपारमसंख्येयं वानराणां महद्‌बलम् ।
निशम्य रावणो राजा शार्दूलं पर्यपृच्छत ॥१०॥
एवं के वानराः शूराः के मुख्याः के महाबालाः ।
के पूर्वमभिवर्तंतः के महोत्साहसंस्थिताः॥११॥
क्षिप्रमाचक्ष्व शार्दूल सप्रधानाः प्लवंगमाः ।
श्रुत्वा तद्राक्षसेंद्रस्य वचनं परिपृच्छतः ॥१२॥
संख्यातुमुपचक्राम प्राज्ञो मुख्यन्प्लवंगमान् ॥१३॥

रावणें पुसिले जुत्पत्ती । वीर झुंजार आहेत कीती ।
शार्दूळ आपुल्या व्युत्पत्तीं । संकळित सांगत ॥ २३ ॥
नळ नीळ रंभ पनस पन्नक । मैंद द्विविद सुमुख दुर्मुख ।
केशरी शतबळी दधिमुख । गवय गवाक्ष महावीर ॥ २४ ॥
विनीत प्रमाथी क्रोधन । ऋषभ शरभ गंधमादन ।
फरश नाग सुषेण । इंद्रजानु जाण महावीर ॥ २५ ॥
गज गोरभ तार तरळ । उन्नाह सन्नाह कुमुद कुशळ ।
क्रकच कराळ विकराळ । गोळांगूळ रणयोद्धे ॥ २६ ॥
जांबवंताचा ज्येष्ठ बंधु । धुम्राक्षनामा अति प्रसिद्धु ।
रीससमुदाय सन्नद्‍धु । अतत अन्नद्‍धु रणमारा ॥ २७ ॥
श्रीरामाजवळी जांबवंत । आतुर्बळीं बुद्धिवंत ।
मशकें राक्षसां मानित । कुंभकर्णा तृणप्राय ॥ २८ ॥
वीर दुर्धर हनुमंत । लंकेंत केला अति आकांत ।
तो अग्रणी सैन्यांत । त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणा ॥ २९ ॥
ऋषिरामायणीं वीर । सांगितले अति अपार ।
तितुका न धरींच मी विस्तार । कथा अपार वाढेल ॥ ३० ॥
हनुमंताचेनि नांवे । रावण दचकला जीवें भावें ।
इतर महावीरांचे यावे । कोण साहे लंकेशा ॥ ३१ ॥
श्रीरामांचें प्रतापबळ । ऐकोनि वानरसेना सबळ ।
रावणा लागली तळमळ । जनकबाळ जिरेना ॥ ३२ ॥

एवमुक्त्वा महातेजा रावणः पुनरब्रवीत ।
चारिता भवता सेना शूराः के तत्र वानराः ॥१४॥
किंप्रजाः किदृशाः स्ॐय वानरा ये दुरासदाः ।
कस्य पुत्राश्च पौत्राश्च तत्वमाख्याहि राक्षस ॥१५॥
अथैवमुक्तः शार्दूलो रावणं पुनरब्रवीत ।
इदं वचनमारेभे वक्तुं रावणसंनिधौ ॥१६॥

वानरवीर अति अपार । कोण कोणाचा पुत्र पौत्र ।
सत्कूळ किंवा वनचर । हेंही समग्र मज सांगा ॥ ३३ ॥
मुख्य ब्रह्मयाचा सुत । आतुर्बळी बुद्धिवंत ।
नांवें जांबवंत ऋक्षनाथ । अति विख्यात रणयोद्धा ॥ ३४ ॥
सूर्याचा निजसुत । सुग्रीवराजा वीर विख्यात ।
करावया राक्षसांचा घात । लंकेआंत रिघों पाहे ॥ ३५ ॥
अंगद युवराज विख्यातु । जो कां स्वयें शक्राचा नातु ।
लंका उपडून न्यावया शक्तु । काळकृतांतु रणयोद्धा ॥ ३६ ॥
धर्मसुत सुषेण देख । सोमसुत दधिमुख ।
दोघे वीर अति नेटक । अंतका अंतक रणमारा ॥ ३७ ॥
समुख दुर्मुख मृत्यूपुत्र । केवळ मृत्यूचाच अवतार ।
रणीं मर्दिती निशाचर । यांसमोर कोण राहे ॥ ३८ ॥
अग्निपूत्र नामें नीळ । त्या अधीन वानरदळ ।
सेनापति स्वयें प्रबळ । राक्षस कुळ मारावया ॥ ३९ ॥
मैद द्विविद महावीर । अश्विनौदेवांचे कुमर ।
यमाचें पंच पुत्र । अति दुर्धर ते ऐका ॥ ४० ॥
गज गवाक्ष गवय जाण । शरभ आणि गंधमादन ।
वैवस्वतपुत्र पांचही जाण । वीर दारुण रणमारा ॥ ४१ ॥
विश्वकर्म्याचा नळ सुत जाण । जेणें बांधिलें सेतुबंधन ।
उतरोनि वानरसैन्य । लंकादहन करुं आला ॥ ४२ ॥
केशरीचा क्षेत्रज सुत । वायुपुत्र जो कां विख्यात ।
दोहों बापांचा हनुमंत । ज्याचा पुरुषार्थ तिहीं लोकीं ॥ ४३ ॥
हनुमान वीर अति बळी । लंका करुं पाहे रांगोळी ।
शिरें खेळत चेंडूफळी । रणरवंदळी राक्षसां ॥ ४४ ॥

दशवानरकोट्याश्च सुराणां युद्धकांक्षिणाम् ।
श्रीमतां देवपुत्राणां शेषं नाख्यातुमुत्सहे ॥१७॥

वानरांची संख्या व व्यक्तिशः वर्णन :

दशकोटी वानरवीर । श्रेष्ठ अग्रणी सेनाधर ।
याहुनि अपार । सांगावया वक्त्र सरेना ॥ ४५ ॥
गणवेल पृथ्वीच्या अंकुरां । सुखें गणपती पर्जन्यधारा ।
तरी न गणवे वानरभारां । दशशिरा हें सत्य ॥ ४६ ॥
वानरांचा सबळ सद्‌भावो । एकैकातळीं सैन्यसमुदावो ।
कोट्यनुकोटी अर्बूदें खर्व । सेना सर्व वागविती ॥ ४७ ॥
वीरानुवीरीं सैन्यवृत्तांत । प्रत्येकें लिहितां वाढेल ग्रंथ ।
आतां सांगेन मुख्यार्थ । सैन्यसख्यार्थ दोघांचा ॥ ४८ ॥
अंगद युवराजा कपिपती । सुग्रीव महाराजा भूपती ।
त्या दोघांची सैन्यसंपत्ती । संकळितार्थी सांगेन ॥ ४९ ॥

एवं वानरराजेन सुग्रीवेणाभिभाषितः ।
वीरपद्मसहस्त्रेण वृत्तः शंकुशतेन च ॥१८॥
युवराजोंऽगदो नाम त्वामाहृयति संयुगे ॥१९॥

श्रीरामाज्ञा यथोचित । अंगदा युवराज्य प्राप्त ।
सुग्रीव राजा अभिषिंचित । मंत्रयुक्त उल्लासें ॥ ५० ॥
अंगदाची सैन्यसंपत्ती । ऋषि वाल्मीक वदला ग्रंथी ।
तेचि सांगेन उपपत्ती । यथानिगुतीं अवधारा ॥ ५१ ॥
शतसहस्त्रीं लक्ष म्हणती । शतलक्षीं कोटी गणिती ।
शतकोटी अर्बूद ख्याती । निर्बुद म्हणती तच्छतें ॥ ५२ ॥
शत निर्बुदीं खर्व गणिती । शतखर्वीं निस्त्रर्व म्हणती ।
शतनिखर्वीं पद्म वदती । जाण निश्चितीं महाराजा ॥ ५३ ॥
पद्मसहस्त्र वीर रणरंगीं । चालती अंगदाच्या वामभागीं ।
दक्षिणभागींच्या प्रयोगीं । वीरविभागी अवधारा ॥ ५४ ॥
पद्मशताच्या गणती । शंकुशद्ध त्यातें म्हणतीं ।
शंकुशतें वीर विख्याती । दक्षिणहस्तीं अंगदा ॥ ५५ ॥
अंगद बोलिला पुरुषार्थी । सैन्य प्रधान मशक किर्ती ।
रणीं मारीन लंकापती । तुज युद्धार्थी पाचारी ॥ ५६ ॥
अंगद सेनासंख्यास्थिती । पद्मसहस्र वामभागार्थी ।
शंकुशतें दक्षिणहस्तीं । रणकंदनार्थी महाबळी ॥ ५७ ॥
ऐकतां अंगदसैन्यसंपत्ती । राक्षस महाशंख करीती ।
रावण दचकला चित्तीं । चिंतावर्ती प्रधान ॥ ५८ ॥
शार्दुळ म्हणे दशानना । रानचिन्ही गडगर्जना ।
आली सुग्रीवराजसेना । तिची गणना तूं ऐकें ॥ ५९ ॥
सुग्रीव श्रीरामाकिंकर । रामें केला राज्यधर ।
त्याचा सैन्याचा संभार । सविस्तर अवधारीं ॥ ६० ॥

रामेण वालिनं हत्वा तस्य राज्येऽभिषेचितः ।
सुग्रीवस्तस्य यत्सैन्यं तत्सर्वं कथायामिते॥२०॥
शतं शतसहस्त्राणां कोटिमाहुर्मनीषीणः ।
शतं सहस्त्रकोटीनां शंकुरित्यभिधीयते ॥२१॥
शतं शंकुसहस्त्राणां वृंदमाहुर्मनीषिणः ।
शतं वृंदसहस्त्राणं महावृंदभिहोच्यते ॥२२॥
महावृंदसहस्त्राणां शतं पद्ममिति स्मृतम् ।
शतं पद्मसहस्त्राणां महापद्ममिति स्मृतम् ॥२३॥
एवं कोटिसहस्त्रेण पहापद्मशतेन च ।
एवं वृंदसहस्रेण महावृंदशतेन च ॥ २४॥
एवं पद्मसहस्रेण महापद्मशतेन च ।
सुग्रीवः सहितो राजा संप्रहारार्थमुद्यतः ॥२५॥

श्रीरामें मारुनि वाळीसी । राज्य दिधलें सुग्रीवासी ।
ते राजसेना तयापासीं । समुदायेंसीं सन्नद्ध ॥ ६१ ॥
सहस्रांचें जें शत । त्यातें लक्ष ऐसें बोलत ।
लक्षाचें जें शत गणित । त्यातें म्हणत कोटि ऐसें ॥ ६२ ॥
वाल्मीक बोलिला येथ । तोच श्लोकींचा श्लोकार्थ ।
सहस्रकोटी शतसंख्यात । शंकु निश्चित त्या नांव ॥ ६३ ॥
शतशंकूंचें सहस्र गणित । वृंद ऐसें त्यातें म्हणत ।
वृंदशतें सहस्र संख्यात । महावृंद निश्चित त्या नांव ॥ ६४ ॥
महावृंदशतसहस्रीं । पद्मसंख्या निजनिर्धारीं ।
पद्मशतें सहस्रवरी । ते संख्या खरी महापद्म ॥ ६५ ॥
सहस्रकोंटी आणि शंकुशतक । सुग्रीवापुढें नित्य संमुख ।
वीर वाढिवें चालती देख । एक एक रणयोद्धे ॥ ६६ ॥
सहस्रवृंदें वीर नेटक । महावृंदें शतानुएक ।
दक्षिणबाहू सुग्रीवा देख । येती सुमुख दशमुखा ॥ ६७ ॥
गणितां सहस्रपद्में पद्म । सुग्रीवाचे बाहू वाम ।
वीर वाढिवें प्लवंगम । अति दुर्गम रणयोद्धे ॥ ६८ ॥
शतसंख्या महापद्म । सुग्रीवासाठी कपिसत्तम ।
चालती वीर निरुपम । रणकर्दम करावया ॥ ६९ ॥
आणिक वानर अति उद्‌भट । सुग्रीवा मागेंपुढें थाट ।
वाम सव्य घनदाट । भट सुभट महाबळी ॥ ७० ॥
याही समुदायीं वीर वानर । सुग्रीवासवें अति दुर्धर ।
ठाकोनि आले लंकापुर । दशशिर मर्दावया ॥ ७१ ॥
करावया राक्षसांचें दळण । लंकाशिखरावरी उड्डाण ।
करिताति वानरग्ण । मुख्य रावण दंडावया ॥ ७२ ॥
ऐसेंचि वेगळे वेगळे वीर । सांगों जातां सैन्यसंभार ।
कथा वाढूं पाहे फार । तरी वानर न गणवती ॥ ७३ ॥

यदत्रानंतरं कार्यं तद्‌भवान्कर्तुमर्हति ।
इत्युक्तो रावणः क्रुद्ध उत्थितः परमासनात् ॥२६॥
आरुरोह ततः श्रीमान्प्रसादं हिमपांडुरम् ।
बहुतालसमुत्सेधं रावणो यद्दिदृक्षया ॥२७॥
ताभ्यां चराभ्यां सहितः स ददर्श महाबलम् ॥२८॥

रावण उंच जागी गोपुरावर जाऊन वानरसैन्य पाहतो :

शार्दूल म्हणे दशानना । सांगितली वानरसेना ।
याउपरी जें येईल मना । त्या साधना शीघ्र साधीं ॥ ७४ ॥
ऐकोनि वानरांची सेना । कोप आला दशानना ।
सांडोनियां निजसिंहासना । पहावया नयनीं ऊठिला ॥ ७५ ॥
सातखणी प्रासाद थोर । त्याहीवरी दीर्घ गोपुर ।
तेथें चढला दशशिर । वानरभार पहावया ॥ ७६ ॥
उंची सप्तताळ अधिक । पांडुरवर्ण प्रासाद चोख ।
तेथ चढला दशमुख । कपिकतक पहावया ॥ ७७ ॥
हेर चार साही प्रधान । गोपुरीं चढला दशानन ।
पाहूं चढले लंकाजन । वानरसैन्यसमुदावो ॥ ७८ ॥
समुद्रतटीं लंकानिकटीं । दातली वानरांची थाटी ।
सुवेळेपुढें वानरदाटी । रिती सृष्टी दिसेना ॥ ७९ ॥
लंकेसभोंवता वेढा । वानरीं घातला गाढा।
सरों नयें मागां पुढां । हडोहुंडां वानर ॥ ८० ॥
मुंग्या झोंबतीं गुळासीं । तेंवी वानर लंकेच्या चौपासीं ।
झोंबताती अति आवेशीं । रावणासी लक्षूनी ॥ ८१ ॥
वानरी कोंदलें जळ स्थळ । वानरीं कोंदलें कुलाचळ ।
दशदिशा गोळांगूळ । नभीं कपिकुळ कोंदलें ॥ ८२ ॥
अति साक्षेपें पाहतां वानरसेना । दृष्टी टणकली दशानना ।
मूर्च्छा आली विसां नयनां । वानरसेना असंख्य ॥ ८३ ॥
पाहतां वानरसेना गाढी । दृष्टि मागली बापुडी ।
पडली डोळियां झांपडी । रिती सवडी दिसेना ॥ ८४ ॥
वानरसेना देखोनि दृष्टीं । लंकेमाजी बोंब उठी ।
अति विस्मय दशकंठीं । राक्षसकोटी किलकिलिती ॥ ८५ ॥
वानरसेना अपरिमित । पाहतां रावण तटस्थ ।
घरोघरीं अति आकांत । चळीं कापत राक्षस ॥ ८६ ॥

रावणाच्या छत्राची छाया पडलेली बिभीषणाने पाहून ती श्रीरामांना दाखविली :

दहाही छत्रें रावणशिसीं । छाया पडली कपिकटकासीं ।
श्रीराम पुसे बिभीषणासी । अभ्रें कायसीं अकाळीं ॥ ८७ ॥
बिभीषण म्हणे रघुनाथ । तुझा शत्रु सेना पाहत ।
त्याचे छत्रांची येथ । छाया पडत समस्तांवरी ॥ ८८ ॥
ऐकोनि बिभीषणाचें वचन । कोपा चढला रघुनंदन ।
सज्जोनियां धनुष्यबाण । काय आपण बोलत ॥ ८९ ॥

रामांचे शरसंधान व रावणाचे छत्र दुभंगिले :

शत्रुछाया सैन्यावरी । हे तंव मज लज्जा भारी ।
रागें धनुष्य सज्जोनि करीं । बाण सांवरी साटोपें ॥ ९० ॥

रामःश्यामः कमलनयनस्तत्र धन्वी सरोषं ।
लंका पश्यन्भ्रमयति शरं पाणिना दक्षिणेन ॥२९॥

नवजलदघनतन । कांसें पीतांबर विराजमान ।
श्रीराम राजीवलोचन । बाहु आजानु सांगद ॥ ९१ ॥
मुकुट कुंडलें वनमाळा । कंठीं पदक कटीं मेखळा ।
तोडर गर्जे चरणकमळां । तेणें कळिकाळा अति धाक ॥ ९२ ॥
वीरकंकणें करीं मुद्रिका । दशावतारी सुरेख टीका ।
धनुष्य सज्जोनियां देखा । पाहे लंका सरोष ॥ ९३ ॥
दक्षिण करीं भ्रमे बाण । जीवें मारावया रावण ।
दुश्चिता मारुं आपण । छत्रछेदन करावें ॥ ९४ ॥

श्रीरामांच्या अचुक शरसंधानाने रावण मोहितः

चमत्कारें सोडून बाण । दहाही छत्रें पैं छेदून ।
लंकेबाहेर पडोन । शर परतोन रिघे भातां ॥ ९५ ॥
देखोनियां छत्रसंपात । रिपुगुणा रिझला लंकानाथ ।
परम धार्मिक श्रीरघुनाथ । शिरसंपात न करीचि ॥ ९६ ॥

संमतीचे वाक्यः – शत्रोरपि गुणा गाह्याः

त्याचा रावणावर झालेला गंभीर परिणामः

जेणें छेदिलीं दाही छत्रें । तो क्षणें छेदिता दहाही शिरें ।
अधर्मा न करिजे रघुवीरें । दशशिरें गुण घेइजे ॥ ९७ ॥
गुणा रिझतां दशानन । प्रहस्त बोलिला प्रधान ।
दुसरा सुटलिया बाण । करील कंदन लंकेशा ॥ ९८ ॥
ऐकोनि प्रहस्ताचें वचन । श्रीरामाच्या बाणाभेण ।
रावण गेला पळोन । अचुक मरण चुकविलें ॥ ९९ ॥
अचुकसंधानी श्रीरघुनाथ । लक्ष भेदोनि जेथींचा तेथे ।
बाण परतोनि भातां येत । अत्यद्‍भुत धनुर्वाडा ॥ १०० ॥
मूळींच झालें छत्रच्छेदन । हाचि मुख्य अपशकुन ।
रणीं मरेल रावण । लंकाजन जल्पती ॥ १ ॥
श्रीरामाच्या अनुसंधानां । देखोनि वानरांची सेना ।
कल्पांत मांडला दशानना । छत्रभंजन अपशकुन ॥ २ ॥
एका जनार्दना शरण । पुढें गोड निरुपण ।
कपट करील रावण । त्यांचें निर्दळण श्रीरामें ॥ ३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणच्छत्रभंगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
ओंव्या ॥ १०३ ॥ श्लोक ॥ २९ ॥ एवं ॥ १३२ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय दुसरा

View Comments