भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा

नारद रावण संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मंदोदरीच्या भवनात धर्मऋषींचे आगमन :

श्रीरामपदांबुजीं नित्य न्हातां । श्रीरामकीर्ती अखंड गातां ।
श्रीरामरुपीं मन वसतां । श्रीरामता उन्मनेंसीं ॥ १ ॥
मंदोदरीचिया भवानासी । स्वभावें आला धर्मऋषी ।
तिणें पुजोनियां त्यासी । अत्यादरेंसी पूसिलें ॥ २ ॥
नारदमुनींच्या वचनासी । परम विश्वास रावणासीं ।
हे पूर्व कथा जाली कैसी । विदित तुम्हांसी तरी सांगा ॥ ३ ॥

मंदोदरीच्या प्रश्नाला धर्मऋषींचे उत्तर :

ऋषि म्हणे मी स्वधर्मता । जाणें भूतभविष्यार्था ।
तुझ्या पश्नाची निजकथा । सावधानता अवधारीं ॥ ४ ॥
पूर्वी भेटी सनत्कुमारांसी । त्यांच्या वचनार्था श्रद्धेसीं ।
तेंचि पुसतां नारदापासीं । आला विश्वासी परमार्थी ॥ ५ ॥
परी विरोधें घ्यावी मुक्ती । हेचि आवडी रावणाचे चित्तीं ।
विरोध करावयाची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ६ ॥

पुरा कृतयुगे नाम प्रजापतिसुत प्रभुम् ।
सनत्कुमारमासीनं रावणो राक्षसाधिपः॥१॥
सद्दशं सूर्यसंकाशं ज्वलंतमिव तेजता ।
विनयावनतो भूत्वा ह्यभिवाद्य कृतांजलिः॥२॥
उक्तवान्‍रावणो राजा तमृर्षि सत्यवादिनम् ।
को ह्यस्मिन्प्रवरे लोके देवानां बलवत्तरः॥३॥
यं समाश्रित्य विबुधा जयंति समरे रिपून ।
कं जयंति द्विजा नित्यं कं ध्यायंति च योगिनः ॥४॥
एतन्मे शंस भगवन्विस्तरेण तपोधन ॥५॥

सनत्कुमार व रावणाची भेट रावणाचा प्रश्न :

रावण बैसोनि विमानीं । स्वभावें जातां गगनीं ।
सनत्कुमार देखिले नयनीं । देदीप्यमान तजस्वी ॥ ७ ॥
जयांचिया अंगप्रभा । रविसोमांची हरिली आभा ।
रात्रिदिवसांची लोपली शोभा । सच्चिद्‌गाभा तेजस्वी ॥ ८ ॥
ऐसे ते तेजस्वी सदोदित । ब्रह्मयाचे मानससुत ।
रावणें देखिले अकस्मात । जाला विस्मित मानसीं ॥ ९ ॥
कृतयुगाचे परम प्रांतीं । सनत्कुमार तेजोमूर्ती ।
ते भेटले लंकापती । ऐक उपपत्ती तयांची ॥ १० ॥
श्रद्धायुक्त स्वयें रावण । घालोनियां लोटांगण ।
मस्तकीं वंदोनियां चरण । विनीत प्रश्न पूसत ॥ ११ ॥
ब्रह्मयाचा नातू आपण । माझें नांव पैं रावण ।
कृपा करोनि संपूर्ण । पुसतों प्रश्न सांगावा ॥ १२ ॥
द्विज कोणाचें करिती यजन । योगी कोणाचें धरिती ध्यान ।
भक्त कोणाचें करिती भजन । तुम्हांसी चिंतन कोणाचें ॥ १३ ॥
कोणाचें बळें देवगण । रणीं करिती रिपुदळन ।
ऐसा बलवत्तर कोण । कृपा करुन सांगावें ॥ १४ ॥
तुमचे गांठी तपोधन । भगवद्‌भाव सनातन ।
त्याचे श्रेष्ठ महिमान । चरणां शरण सुरश्रेष्ठ ॥ १५ ॥
शिव विष्णु शक्र ब्रह्मा । त्रिपदा गायत्री उमा रमा ।
चरणा शरण येती तुम्हां । तपाचा महिमा अगाध ॥ १६ ॥
तपोधना भीती सुरासुर । तपोधना भीती यक्ष किन्नर ।
तपोधना देखोनि समोर । स्वयें हरिहर वंदिती ॥ १७ ॥

विदित्वा हृद्‌गतं तस्य ध्यानदृष्टिर्महायशाः ।
उवाच रावणं प्रेक्ष्य श्रुयतामिति पुत्रक ॥६॥
यो वै भर्ता जकत्कृत्स्नं यस्योत्पत्तिं न विद्महे ।
सुरासुरैर्नतो नित्यं हरिर्नारायणः प्रभुः ॥७॥
येन सर्वमिदं सृष्टं विश्वं स्थावरजंगमम् ।
समाश्रित्यं विबुधा विधिना हरिमध्वरे ॥८॥
पिबंति ह्यमृतं चैव मानवाश्च यजन्ति तम् ।
ध्यायंति योगिनी नित्यं क्रतुमिश्च यजन्ति तम् ॥९॥
दैत्यदानवरक्षांसि ये चान्ये वामरद्विषः ।
सर्वाञ्जयति संग्रामे सदा सर्वैः सुपूज्यते॥१०॥

श्री विष्णुंच्या भक्तांना अपयश येत नाही असे धर्मऋषींचे उत्तर :

रावणाचें मनोगत । ध्यानदृष्टीं समस्त ।
जाणोनियां ते संत । मग सांगत प्रश्नातें ॥ १८ ॥
आदि मध्य निधन । जो सदोदित सनातन ।
तो स्वामी श्रीनारायण । ज्यासी त्रिभुवन सदा वश्य ॥ १९ ॥
ज्यासी वंदिती सुरासुरगण । ज्याचें योगी करिती ध्यान ।
यज्ञी यजिती ज्या ब्राह्मण । तो स्वामी नारायण सर्वांचा ॥ २० ॥
जो विश्व स्रजी संपूर्ण । जो अंगें विश्व आपण ।
ज्याचेनि बळें सुरगण । अमृतपान करिताती ॥ २१ ॥
ज्याचिया गा निजस्थितीं । तिळभरी वाट नाहीं रिती ।
जो कोंदलासे त्रिजगतीं । जो सर्वां भूतीं सबाह्य ॥ २२ ॥
ऐसा जो कां जगत्स्वामीं । जो कां वद्य आगमनिगमीं ।
ज्याचेनि बळें सुरोत्तमीं । रिपु संग्रामी निर्दळिले ॥ २३ ॥
ज्याचेनि आश्रयें नर । यक्ष राक्षस किन्नर ।
रणीं जिंकिती सुरासुर । तो स्वामी साचार स्वयें विष्णु ॥ २४ ॥
नामीं रत जे पुरुष । ते स्वप्नी न देखती अपेश ।
त्रिभुवनीं न माये यश । हृषीकेश निजस्वामी ॥ २५ ॥
इंद्रियां प्रेरिता वारिता । ऐसी ज्याची निजसत्ता ।
हृषीकेश तो तत्वतां । साह्य निजभक्तां सर्वार्थी ॥ २६ ॥
जनीं जनार्दन निजीं निज । जनीं जनार्दन सहजीं सहज ।
जनीं जनार्दन भजनीं भज्य । सर्वांर्थीं पूज्य जनार्दन ॥ २७ ॥
ऐकोनि ऋषीचे वचन । विनीत अति प्रीती प्रश्न ।
स्वयें पुसत रावण । वंदून चरण ऋषीचे ॥ २८ ॥

श्रुत्वा महेर्षेस्तद्वाक्यं रावणो राक्षसाधिपः ।
उवाच प्रणतो भूत्वा पुनरेव महामुनिम् ॥११॥
दैत्यदानवरक्षांसि ये हताः समरे सुराः ।
कां गतिं प्रतिपद्यंते किंवा ते हरिणा हताः ॥१२॥
रावणस्य वचः श्रुत्वा प्रत्युवाच महामुनिः ।
दैवतैर्निहता नित्यं प्राप्नुवंति नभस्तलम् ॥१३॥
पुनस्तस्मात्परिभ्रष्टा जायंते वसुधातले ।
पूर्वार्जितैश्च सुकृतैर्जायंते च म्रियंति च ॥१४॥
ये ये हताश्चक्रधरेण राजन्त्रैलोक्यनाथेन जनार्दनेन ।
ते ते गतास्तन्नियं नरेंद्र क्रोधापि देवस्थ वरेण तुल्यः ॥१५॥

सायुज्यमुक्ती मिळेल असा देव कोणता ? असा रावणाचा प्रश्न :

परम श्रद्धा अति प्रीतीं । रावण पुसे मुनीप्रती ।
सुरसुरांते मारिती । त्यांसी कोण गती मज सांगा ॥ २९ ॥
जे कां श्रीविष्णूच्या हातीं । निधडे वीर रणीं पडती ।
त्यांसी होय कोण गती । तेंही मजप्रती सांगावें ॥ ३० ॥

रावणाच्या पश्नाला सनत्कुमारांचे उत्तर :

ऐकोनि रावणाचा प्रश्न । सनत्कुमार स्वयें आपण ।
सांगे ते गतींचे लक्षण । सावधान अवधारा ॥ ३१ ॥
सुरवरहस्तें जे मरती । त्यांसी स्वर्गपंथ उर्ध्वगती ।
क्षीणपुण्यें तेथोनि रिचवती । माघारे येती गर्भवासा ॥ ३२ ॥
गर्भवासाचें सांकडें । अतिशयेंसीं दुःख गाढें ।
रावणा तें मी सांगेन तुजपुढें । निजनिवाडें अवधारी ॥ ३३ ॥
केवळ रजस्वलेचें रुधिर । माजी पित्याचें रेत मात्र ।
तें हें विटाळाचें शरीर । अपवित्र निंद्यत्वें ॥ ३४ ॥
मातेचिया उदरकुहरी । विष्ठामूत्रांचे दाथरावरी ।
जठराग्नीमाझारीं । नवमासवरी उकाडा ॥ ३५ ॥
गर्भवासाचें दुःख गाढें । विष्ठालेप चहूंकडे ।
नाकीं तोंडीं रिघती किडे । कोणापुढें सांगेल ॥ ३६ ॥
देखोनि गर्भींची आटक । जीव अनुतापें करी शंख ।
विषयसुखगर्भींचें दुःख । आक्रंदें हाक स्वयें मारी ॥ ३७ ॥
विषयांपासीं जन्ममरण । विषयें गर्भदुःख दारुण ।
विषयसुख ते नागवण । विषय ते जाण महामैंद ॥ ३८ ॥
विषय देहदरीचा वाघ । विषय विश्वासी मारक मांग ।
विषय तोचि सर्वांगदाघ । विषय सांग महावैरी ॥ ३९ ॥
गर्भवासापुढें देख । अंधतामिस्र महानरक ।
ते तंव बापुडे मशक । परमदुःख गर्भवासीं ॥ ४० ॥
जे देवांचेनि हाते मरती । ते ते मरती ।
ते ते पडती दुःखावर्ती । स्वर्गसंसारआवर्तीं । जन्म भोगिती अविश्रम ॥ ४१ ॥
विष्णूचे हातें जे जे मरती । तयां सद्यः ब्रह्मप्राप्ती ।
सायुज्यादि चारी मुक्ती । शरण येती तयांतें ॥ ४२ ॥
चक्रधर जो जनार्दन । त्याचेनि हातें सभाग्य मरण ।
अभाग्या नाठवे नामस्मरण । मग दर्शन तें कैंचें ॥ ४३ ॥
क्रोध आणि सुप्रसन्न । विष्णूच्या ठायीं दोनी समान ।
भक्ता आणि वैरिया जाण । समान दान ब्रह्मसायुज्य ॥ ४४ ॥
ऐकोनि ऐसें रावण । अतिशयें विस्मयापन्न ।
अति श्रद्धें उल्लासोन । पुढती प्रश्न पुसत ॥ ४५ ॥

श्रुत्वा ततस्तद्वचनं निशाचरः ।
सनत्कुमारस्य मुखाद्विनिर्गतम् ।
तथा प्रहष्टः स बभूव विस्मितः ।
कथं नु यास्यामि हरिं महाहवे ॥१६॥
एवं चिंतयतस्तस्य रावणस्य दुरात्मनः ।
पुनरेवापरं वाक्यं व्याजहार महामुनिः ॥१७॥
मनश्चोत्कंठितं यत्त भविष्यति तदाहवे ।
सुखी भव महाबाहो कंचित्कालमुदिक्षय ॥१८॥

श्री विष्णूंच्या हातून मुक्ती मिळते हे ऐकून रावणास संतोष :

विष्णूचेनि हातें मरण । तें ब्रह्मसायुज्य कृतकल्याण ।
मुनिमुखें ऐकोनि रावण । सुखसंपन्न स्वयें जाला ॥ ४६ ॥
ऐसा सभाग्य काळ कोण । मज विष्णूसीं घडे रण ।
विष्णुहस्तें जाय माझा प्राण । स्वयें रावण हेंचि वांच्छी ॥ ४७ ॥
श्री विष्णुसीं करितां रण । केव्हां जाईल माझा प्राण ।
हेंचि वांच्छी स्वयें रावण । आवडी गहन युद्धाची ॥ ४८ ॥
श्रीविष्णूसीं महारण । स्वयें पावेल रावण ।
ऐसें बोलिले मुनिगण । तेथें विलंबन काळाचें ॥ ४९ ॥
यथाकाळें पावे रण । तंव प्रतीक्षा करावी आपण ।
पुढें युद्ध अति दारुण । अलोट जाण होईल ॥ ५० ॥
जैसें तुझे मनोगत । तैसें युद्ध करील रघुनाथ ।
हे ऐकोनि लंकानाथ । उल्लसित स्वयें जाला ॥ ५१ ॥
करोनियां प्रदक्षिणा । लागोनि मुनीच्या चरणा ।
रावण निघे ब्रह्मसदना । मुनी अनुष्ठाना स्वयें गेले ॥ ५२ ॥
श्री विष्णुसीं महारण । कैं मी देखेन आपण ।
ऐसें अहोरात्र जाण । करी ध्यान युद्धार्थीं ॥ ५३ ॥

ब्रह्मलोकान्निवर्तंतं समासाद्य ममुनिम् ।
उवाच हृष्टमनसा नारदं रावणस्तदा ॥१९॥
आब्रह्यभुवनाल्लोकास्त्वया दृष्टा ह्यनेकशः ।
कस्मिंल्लोके महाभाग मानवा बलवत्तराः ॥२०॥
तान्ममाख्याहि धर्मज्ञ पितामे त्वंहि धर्मतः ।
चिंतायित्वा मुहूर्तं तु नारदः प्रत्युवाच तम् ॥२१॥
श्रूयतां सर्वमाख्यास्ये तव राक्षसपुंगव॥२२॥

नारद ब्रह्मभवनाकडून येत असता रावणाची भेट :

ब्रह्मभवनाहूनि रावण । परतोनि येतां आपण ।
झालें नारदाचें दर्शन । तेणें दशानन आल्हादी ॥ ५४ ॥
रावण म्हणे मी सफळितार्थ । नारदमुनि भेटला येथ ।
याचेनि माझे मनोरथ । कृतकृत्यार्थ मुनिवाक्यें ॥ ५५ ॥
ऐसें बोलोनि आपण । रावण घाली लोटांगण ।
वंदोनि नारदाचे चरण । आदरें प्रश्न पूसत ॥ ५६ ॥

ब्रह्मभुवनलोकात युद्ध करण्यास समर्थ कोण ? असा नारदाला रावणाचा प्रश्न :

आब्रह्मभुवन लोक । स्वामींनीं देखिले अशेख ।
मजसीं युद्ध करावया देख । बळी पुरुष आहे कोणी ॥ ५७ ॥
माझिया भुजांचे त्राण । पुरे ऐसें करावया रण ।
सृष्टीमाजी बळिया कोण । त्याचें लक्षण मज सांगा ॥ ५८ ॥
त्याची कैसी कैसी स्थिती । त्याची कैसी कैसी गती ।
त्याची अवयव आकृती । यथानिगुतीं मज सांगा ॥ ५९ ॥
ऐसा रावणें पुसतां प्रश्न । नारद अंतर्यामीं आपण ।
जाणोनि हृदयस्थ संपूर्ण । त्याचेंचि लक्षण अनुवादे ॥ ६० ॥
रावणा आवडी तुझी पूर्ण । मुख्य देवासीं करावें रण ।
त्याचें द्विविध लक्षण । सगुणनिर्गुण-विभागें ॥ ६१ ॥
सगुण निर्गुण विभागोन । तें मी सांगेन विवंचून ।
रावणा ऐक सावधान । कृतकल्याण पावावया ॥ ६२ ॥

स हि सर्वगतो देवः सूक्ष्मोऽव्यक्तः सनातनः ।
तेन सर्वमिदं व्याप्तं त्रैलोक्यं सचराचरम् ॥२३॥
अहश्च रात्रिश्च उभे च संध्ये दिवाकरश्चैव यमश्च सोमः।
स एव कालो ह्यानिलोऽनलश्च स एव सर्व ॥२४॥
ॐकारश्चैव सत्यं च सावित्री पृथिवी च सः।
धराधरधरो देवो ह्यनंत इति विश्रुतः॥२५॥

नारदाचे उत्तर :

जेथोनि नाना अवतार । सबळ बळें उठती साचर ।
तें मुख्य स्वरुप निराकार । निर्विकार तें ऐका ॥ ६३ ॥
भूतां सबाह्य भगवंत । कोंदला आहे सदोदित ।
अति सूक्ष्मत्वें नव्हे व्यक्त । जेंवी गुळांत निजगोडी ॥ ६४ ॥
गुळा सबाह्य निखळ गोडी । तेथें गूळ हे वार्ता कुडीं ।
तेंवी मिथ्या भूतपरवडी । चित्सत्ता रोकडी सबाह्य नांदे ॥ ६५ ॥
जेंवी सूक्ष्म लक्षितां तंत । वस्त्रमात्र मिथ्या मात ।
तेंवी लक्षितां भगवंत । प्रपंच व्यर्थ मिथ्यात्वें ॥ ६६ ॥
दोराअंगीं सर्पत्व नसे । नसताचि सर्प भ्रातांसी भासे ।
तेंवी भगवंती प्रपंच नसे । मिथ्या आभासे मूर्खासी ॥ ६७ ॥
स्वरुप लक्षितां साचार । मिथ्या ब्रह्मा विष्णु शिव शक्र ।
तेथें कैंचे गा चराचर । वस्तु चिन्मात्र सदोदित ॥ ६८ ॥
नाहीं आकारविकारविलास । नाहीं आयुष्य मग कैंचा नाश ।
यालागी अव्यय अविनाश । म्हणती परेश परमात्मा ॥ ६९ ॥
तेथें नाहीं अहोरात्र । नाही नक्षत्रें रवि चंद्र ।
नाहीं वरुणादि यम कुबेर । काळ दुर्धर तेथें मिथ्या ॥ ७० ॥
ऐसी वस्तु जे अविनाशी । तेचि कोंदलीसे जगासीं ।
तिचेनि गति इन्द्रियांसी । तिचेनि प्राणांसी प्राणत्व ॥ ७१ ॥
तिचेनि प्रकाशें अहोरात्र । तिचेनि तपती रवि चंद्र ।
तिचेनि पंचभूतें साचार । चराचर तिणें अति व्याप्त ॥ ७२ ॥
तिचेनि ओंकार आपण । तिचेनि सत्या सत्यपण ।
तिचेनि गायत्री पावन । वंद्य ब्राह्मण तेणें तेजें ॥ ७३ ॥
ब्रह्मा विष्णु शंकर । हेहीं वस्तुचे गुणावतार ।
वस्तु निर्गुण निर्विकार । चराचर व्यापूनि ॥ ७४ ॥
उभें आडवें विणून सूत । त्या नांव पैं वस्त्र म्हणत ।
तेंवी व्यापक भगवंत । त्यासीच म्हणत प्रपंच ॥ ७५ ॥
तोचि धरा तोचि धराधर । तोचि विश्व तोचि विश्वाधार ।
तोचि भूत भूतात्मा साचार । त्यासी संसार मानिती मूर्ख ॥ ७६ ॥

नारदाच्या उत्तराने रावणाला उद्विग्नता :

ऐकोनि नारदांचें वचन । रावण झाला अति उद्विग्न ।
पुढती करोनियां नमन । काय आपण पूरत ॥ ७७ ॥
रुप सांगितलें निर्गुण । त्यासी करितां नये रण ।
माझ्या भुजांचें पुरे त्राण । तैसा संपूर्ण बळी सांग ॥ ७८ ॥
नारद म्हणे दशानन । तुजसीं करावया रण ।
देव दानव मानव जाण । नाहीं आंगवण ये समयीं ॥ ७९ ॥
मज पाहतां लोक तीन्हीं । युद्ध करावया तुझे ठायीं ।
बळिया न दिसे ये समयीं । सत्य पाहीं लंकेशा ॥ ८० ॥
रावण अनुवादे आपण । दिग्विजयो करितां जाण ।
नाहीं योद्धा मजसमान । हेंही संपूर्ण मी जाणें ॥ ८१ ॥
मजसीं करावया रण । थोरल्या देवासी आंगवण ।
इतर योद्धे मजपढें तृण । त्यांचें लक्षण मज सांग ॥ ८२ ॥
थोरल्या देवासी आंगवण । तो कां न ये करावया रण ।
तोही लपतो मज भेण । त्याचें भेडपण दिसताहे ॥ ८३ ॥

नारदाचा रावणाला प्रश्न :

ऐसें बोलतां दशानन । नारद विस्मयें हास्यवदन ।
मुख्य देवासीं करावया रण । काय कारण तें सांग ॥ ८४ ॥
देवांशी करीतां रण । निमाल्या न सोडी जन्ममरण ।
मुख्य देवें वधिल्या जाण । ब्रह्मत्व परिपूर्ण अवाप्त ॥ ८५ ॥
हेही मजलागीं निजखूण । सनकादिकीं सांगितली जाण ।
यालागीं मुख्य देवासीं रण । करावया मन उद्यत ॥ ८६ ॥
ऐकोनि रावणाची उक्ती । नारद संतोषला चित्तीं ।
जेणें पावे ब्रह्मप्राप्ती । ते श्रीराम मूर्ती स्वयें सांगे ॥ ८७ ॥

नीलोत्पलदलश्यामः किंजल्कारुणवाससः ।
प्रावृट्काले यथा व्योम्नि सतडित्तोय-दस्तथा ॥२६॥
श्रीमान्मेघवपुश्यामः शुभपंकजलोचनः ।
श्रीवत्सेनोरसा युक्तः शशांककृतलक्षणः ॥२७॥

योग्यकाली योद्धा येईलच असे नारद रावणाला सांगतात :

नीलोत्पलदलश्याम । राजीवलोचन श्रीराम ।
ज्याचिया श्यामता लोपलें व्योम । घनश्याम श्रीराममूर्ति ॥ ८८ ॥
श्रीरामश्यामता संपूर्ण । मेघश्यामता त्यापुढें तृण ।
ज्याची श्यामता देखिल्या जाण । सुखसंपन्न सबाह्य ॥ ८९ ॥
नेत्रोपम कमळदळें । तीं तंव नश्वर तत्काळें ।
श्रीरामाचे देखणे डोळे । सर्वकाळ सद्रूप ॥ ९० ॥
विजू घालोनियां पुटीं । सबाह्य शोधिली गोमटी ।
तैसा पीतांबर माळगाठीं । शोभे परवंटी श्रीरामा ॥ ९१ ॥
श्रीरामकांसे लागोनि जाण । विज विसरली अस्तमान ।
दिव्य तेजें विराजमान । सर्वदा जाण लखलखीत ॥ ९२ ॥
मुकुट कुंडलें मेखळा । कांसे कसिला सोनसळा ।
कंठीं मनोहर माळा । तुळसीदळासमयुक्त ॥ ९३ ॥
बाहुअंगदें रत्‍नभूषणें । करमुद्रिका करकंकणें ।
श्रीराम लेणियांचे लेणें । कैसा कवणें वानावा ॥ ९४ ॥
लक्ष्मी डावलोनि संपूर्ण । दक्षिणांगीं विप्रचरण ।
शोभे श्रीवत्सलांछन । शशांकचिन्ह जेंवी नभीं ॥ ९५ ॥
श्रीरामपदसामुद्रिका । चतुर्मुखा पंचमुखा ।
न वर्णवे षण्मुखा । सहस्रमुखा निजमौन ॥ ९६ ॥
वांकीअंदुवांचा गरज । चरणीं गर्जती तोडर ।
बळियां बळी श्रीरामचंद्र । सुरासुर कांपती ॥ ९७ ॥
मांडून माहेश्वरी ठाण । सज्जूनियां धनुष्यबाण ।
श्रीरामासीं करावया रण । संमुख कोण राहिला ॥ ९८ ॥
श्रीरामासीं करावया रण । बापुडें कायसें रावण ।
ऐके बाणें घेईल प्राण । सत्य जाण लंकेशा ॥ ९९ ॥
ऐकोनियां नारदाची मात । रावण आल्हादें नाचत ।
श्रीरामासीं युद्धकंदनार्थ । कोण्या काळीं होईल ॥ १०० ॥
युद्धीं तगटे श्रीरामचंद्र । तें युद्ध व्हावें अति शीघ्र ।
ऐसे पुसतां निशाचर । मुनिश्वर सांगत ॥ १ ॥
भूत भविष्य वर्तमान । नारदासीं नित्यज्ञान ।
श्रीरामाचें समूळ कथन । स्वयें आपण सांगत ॥ २ ॥
श्रीरामाचें निजलक्षण । नारद सांगे संतोषोन ।
सावध ऐकें दशानन । युद्धकारण लक्षूनी ॥ ३ ॥

कृते युगे व्यतीते तु मुखे त्रेतायुअगस्य च ।
हितार्थं देवमर्त्यानां भविता नृपविग्रहः ॥२८॥
इक्ष्वाकूणां कुले राजा भाव्यो दशरथो भुव ।
तस्य सूनुर्महातेजा रामो नाम भविष्यति ॥२९॥
महातेजा महाबुद्धिर्महाबलपराक्रमः ।
महाबाहुर्महासत्वः क्षमया पृथिवीसमः ॥३०॥
आदित्य इव दुष्प्रेक्ष्यः समरे शत्रुभिः सदा ।
भविता हि तदा रामो नरो नरायाणः प्रभुः ॥३१॥

श्रीरामांचे निजलक्षण नारदाकडून रावण ऐकतो :

कृतयुगाचा होतां प्रांत । त्रेतायुगाचे प्रारंभांत ।
होईल राजा दशरथ । त्याचा सूत श्रीराम ॥ ४ ॥
देव स्थापावया निजपदीं । भक्तां द्यावया मोक्षसिद्धी ।
मनुष्य लावावया सुबुद्धी । श्रीराम त्रिशुद्धी अवतार ॥ ५ ॥
सूर्यवंशी वंशभूषण । ककुत्स्थकुळीं उत्पन्न ।
अवतार श्रीरघुनंदन । चैतन्यघनविग्रही ॥ ६ ॥
जे आदिकारणा कारण । ज्यासी श्रुती म्हणती नारायण ।
तेंचि श्रीरामस्वरुप जाण । स्वामी संपूर्ण सर्वांचा ॥ ७ ॥
ज्याचेनि तेजःप्रतापें । चंद्रसूर्यांची प्रभा लोपे ।
आकाश शून्यत्वें हरपे । श्रीरामदीपें निजतेजें ॥ ८ ॥
धन्य श्रीरामाची निजबुद्धी । वैरिया दे सायुज्यसिद्धी ।
वोखटे करुं नेणे त्रिशुद्धी । बुद्धीची सुबुद्धी श्रीराम ॥ ९ ॥
श्रीराम बळाचिये सिद्धी । समूळ छेदी देहबुद्धी ।
मीतूंपणाचिये विधी । स्वयें त्रिशुद्धी निर्दळी ॥ ११० ॥
आजानुबाहु श्रीरघुनाथ । द्वैतदळणीं निजपुरुषार्थ ।
भवभीता अभयहस्त । रक्षी निजभक्त वरदहस्तें ॥ ११ ॥
अगाध श्रीरामाचें सत्व । जग जन्ममरण विकाररहित ।
सकळ विश्व प्रतिपाळीत । न करितां घात निर्दळी ॥ १२ ॥
श्रीरामशांतीची नवलपरी । अपकार साहोनि अंगावरी ।
अपकारिया होय उपकारी । अगाध थोरी शांतीची ॥ १३ ॥
ऐसिया श्रीरामशांतस्थितीं । साहोनि भूतांची उद्धती ।
पृथिवीस आली परम शांती । सहजस्थिती निजशांती ॥ १४ ॥
मध्यान्हकाळींच्या सूर्यापुढें । पाहतां दृष्टीं अंधार पडे ।
तेंवी संग्रामीं श्रीरामापुढें । कोण बापुडें राहील ॥ १५ ॥
देखतां श्रीरामाचे बाण । धाकेचि विरांचे जाती प्राण ।
त्यासीं संमुख करावया रण । राहे कोण संग्रामी ॥ १६ ॥
श्रीरामस्वरुपदर्शन । सहसा पावों शके कोण ।
तेही विषयींचे निरुपण । सावधान अवधारीं ॥ १७ ॥

न शक्यते सुरैर्द्रष्टुं नासुरैर्न च पन्नगैः ।
यस्य प्रसादं कुरुते स वै तं द्रष्टमर्हति॥३२॥
न हि यज्ञफलैस्तात न तपोभिश्च संचितैः ।
शक्यते भगवान्द्रष्टुं न दानेन न चेज्यया॥३३॥

श्रीरामांच्या दर्शनप्राप्तीचे मार्ग नारद रावणाला सांगतात :

ज्यासीं श्रीराम सुप्रसन्न । त्यासीच भेटे रघुनंदन ।
इतरांचें ज्ञान ध्यान । तृणासमान श्रेष्ठत्व ॥ १८ ॥
हृदयीं वैराग्य संपूर्ण । त्यांना राम सुप्रसन्न ।
वैराग्यवीण ज्ञान ध्यान । तृणासमान श्रेष्ठत्व ॥ १९ ॥
देखावया श्रीराममूर्तीं । सुरवरांची न चले शक्ती ।
असुरपन्नगादि सिद्धपंक्ती । त्यांसीही रघुपति दुष्प्रेक्ष्य ॥ २० ॥
तपस्वई तपोयुक्तीं । संचिती देहें तपःसंषत्ती ।
तपाची स्वर्गावरी गती । त्यांसी रघुपती भेटेना ॥ २१ ॥
करुनियां पशुहनन । यज्ञीं करिती यजन ।
तेथें हिंसेचें आयतन । रघुनंदन न भेटे ॥ २२ ॥
देता नानाविध दान । दातेपणाचा अभिमान ।
दानफळही वांच्छित मन । तेथें रघुनंदन न भेटे ॥ २३ ॥
यज्ञ दानतपःसंपत्ती । याची योगा सामर्थ्यशक्ती ।
श्रीरामाची नव्हे प्राप्ती । जाण निश्चितीं लंकेशा ॥ २४ ॥
पावावया श्रीरामप्राप्ती । दृढ वैर कां अनन्य भक्ती ।
येणें पाविजे रघुपती । जाण निश्चितीं लंकेशा ॥ २५ ॥
अनन्य भक्तीचें लक्षण । पाहिलें सांगेन परिपूर्ण ।
पाठीं वैराचें कारण । केल्या निर्वाण ते साधे ॥ २६ ॥

तद्‌भक्तैस्तद्वतप्राणैस्तच्चितैस्तत्पराणैः ।
शक्यते भगवान्द्रष्टुं ज्ञाननिर्दग्धकिल्बिषैः ॥३४॥
अथवा पृच्छ राजेंद्र यदि तं द्रष्टुमिच्छसि ।
कथयिष्यामि ते सर्वं श्रुयतां यदि रोचते ॥३५॥

स्त्रीहरण केल्याने वैर उत्पन्न होते :

सांडोनियां प्रपंचसाधन । देह केला रामार्पण ।
श्वासोच्छवासीं श्रीरामसेवन । तद्‌गतप्राण या नांव ॥ २७ ॥
सोहंहंसाच्या अनुवृत्ती । ज्याच्या प्राणवृत्ती विचरती ।
तद्‌गतप्राण त्यातें म्हणती । हे योगस्थिति अति गुह्य ॥ २८ ॥
सांडोनि प्रपंचचिंता । नित्य चिंतितां निजात्मता ।
चित्त रातलें भगवंता । मच्चित्तता या नांव ॥ २९ ॥
नाना चिंतेचे प्रबळ अर्थ । पुढें येवोनि झाल्या प्राप्त ।
चित्त विसरेना भगवंत । जाण मच्चित्त अहर्निशी ॥ ३० ॥
उत्तममध्यमाधमा भूतीं । भगवद्‌भाव अहोरातीं ।
या नांवे मुख्य भगावद्‌भक्ती । स्वप्नसुषुप्तीं भगवंत ॥ ३१ ॥
जागृति स्वप्नसुषुप्तीं । ज्यांसी स्फुरेना देहस्फुर्ती ।
ऐशा चालीं वेदोक्तीं । जाण तो निश्चितीं मत्पर ॥ ३२ ॥
सद्‌गुरुवाक्य अति निपुण । जाणोनि देहाचे मिथ्यापण ।
मी आत्मा परिपूर्ण । मत्परायण या नांव ॥ ३३ ॥
देहीं देहाचें नाहीं स्फुरण । वेदोक्त चालवी कर्माचरण ।
ज्यासीं नुठे आत्माभिमान । मत्परायण तो भक्त ॥ ३४ ॥
नित्य करितां भगवद्‌भजन । संकल्प विकल्प गेले विरोन ।
त्यासींच भेटे रघुनंदन । अनन्यभजन या नांव ॥ ३५ ॥
वैर करावया आवडी पूर्ण । अंगी असेल आंगवण ।
तरीच वैराचें पूर्ण कारण । सांग संपूर्ण सांगेन ॥ ३६ ॥
मुख्य वैरांचे कारण । करावें गादारहरण ।
तेचि विषयींचे निरुपण । नारद आपण सांगत ॥ ३७ ॥

तस्य पत्‍नी महाभागा लक्ष्मी सीतेति विश्रुताः ।
दुहिता जनकस्यैषा प्रोत्थिता वसुधातलात्॥३६॥
रुपेणाप्रतिमा लोके सर्वलक्षणलक्षिता ।
छायेवानुगता रामं निशाकरमिव प्रभा ॥३७॥
शीलाचारगुणोपेता साध्वी धैर्यसमन्विता ॥३८॥

नारद सीतेचे स्वरुपलक्षण सांगतात :

त्या श्रीरामाची निजकांता । परम सुंदर पतिव्रता सीता ।
तिच्या स्वरुपासीं समता । नाहीं सर्वथा तिहीं लोकीं ॥ ३८ ॥
रंभा उर्वशी तिलोत्तमा । तृणप्राय़ यांची उपमा ।
खद्योतप्राय उमा रमा । सीतेंसीं समा त्या नव्हती ॥ ३९ ॥
रुपावेगळी नव्हे छाया । तेंवी सीता श्रीरामराया ।
वेगळी नव्हे कांहीं केलिया । अनुगत तया अहर्निशीं ॥ १४० ॥
जेंवी चंद्राची द्योतकता । वेगळी न करवे सर्वथा ।
तेंवी श्रीरामावेगळी सीता । नव्हे तत्वतां निश्चित ॥ ४१ ॥
ते जनकाची निजदुहिता । नित्यानुकूल श्रीरघुनाथा ।
शिलसाध्वी पतिव्रता । सती सीता निजसत्वें ॥ ४२ ॥

एवं ते सर्वमाख्यातं मया रावण विस्तरात् ।
महते देवदेवस्य शाश्वतस्याव्ययस्य च ॥३९॥
एवं श्रुत्वा महाबाहो राक्षसेन्द्र प्रतापवान् ।
त्वया सह विरोधेच्छुश्चिंतयामास राघवः ॥४०॥

सावध करोनि रावण । नारद अनुवादे पैं आपण ।
श्रीरामाचें स्वरुपलक्षण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ४३ ॥
सगुण आणि निर्गुण । दोहीं स्वरुपीं राम पूर्ण ।
हे म्यां सांगितलें विवंचून । स्वरुपलक्षण सीतेचें ॥ ४४ ॥
देवाधिदेव श्रीरघुनाथ । अजन्मा अव्यय अच्युत ।
त्याचा सांगितला वृत्तांत । समूळ साद्यंत लंकेशा ॥ ४५ ॥
यावरी तुजला उचित । जो देखसी निजहितार्थ ।
तो तो करावा निश्चित । हें नारदोक्त ऐकोनी ॥ ४६ ॥

सीताहरण कसे करावे, असे रावण नारदाला विचारतो :

स्वयें बोलतो रावण । युद्धीं माझा जाय प्राण ।
ऐसें श्रीरामें करणें रण । तें वैरकारण मज सांगें ॥ ४७ ॥
भूत भविष्य वर्तमान । स्वामीसीं आहे निजज्ञान ।
श्रीरामासीं वैरकारण । कृपा करुन मज सांगा ॥ ४८ ॥
श्रीरामासीं झोंटधरणी । दुर्धर युद्ध करणें रणीं ।
ऐसी आवडी माझे मनीं । ते स्वामींनीं पुरवावी ॥ ४९ ॥
श्रीरामहस्तें निमाल्या जाण । मी पावेन ब्रह्म पूर्ण ।
यालागीं करावया रण । उद्यत मन पैं माझें ॥ १५० ॥
ऐसें पुसत दशानन । नारद वदे हास्यवदन ।
मुख्य वैरासीं कारण । वनप्रयाण श्रीराम ॥ ५१ ॥

पितुर्नियोगात्स विभुर्दंडके विविधे वने ।
विचरिष्यति धर्मात्मा सह भ्राता सपत्‍निकः ॥४१॥

श्रीराम सीतेसह वनवासाला येतील, त्यावेळी
सीताहरण कर, असे नारद रावणाला सांगतात :

दशरथाज्ञा श्रीरघुनाथ । वनीं वनवासीं दंडकारण्यांत ।
लक्ष्मणसीतासमवेत । येईल निश्चित जनस्थाना ॥ ५२ ॥
तेथें करोनियां छळण । करावें त्याचें दारहरण ।
हें वैराचें कारण । रणीं रावण मारावया ॥ ५३ ॥
श्रीरामबाणांच्या आघातीं । निमोनि देह पडे क्षितीं ।
तंव न सोडावी सीता सती । सायुज्यमुक्ती पावावया ॥ ५४ ॥

नारदस्य तु तद्वाक्यं चिंतयित्वा मुहुर्मुहः ।
रावणो मुमुदे श्रीमान्युद्धार्थी विचचार ह ॥४२॥

नारदाचा सल्ला ऐकून रावण सीतेला मुक्त न करिता
श्रीरामांच्या हातून मुक्ती मिळविण्याचा निर्धार करतो :

ऐकोनि नारदाचे वचन । आल्हादें नाचे दशानन ।
श्रीरामासी करावया रण । हर्ष पूर्ण युद्धाचा ॥ ५५ ॥
साक्षेपें सांगितलें बहुतीं । रावण न सोडी सीता सती ।
श्रीरामहस्तें पावावया मुक्ती । मुनिवचनोक्तीं विश्वासें ॥ ५६ ॥
हा इतिहास पुरातन । धर्मऋषीनें आपण ।
मंदोदरीप्रति सांगोन । केलें गमन स्वाश्रमा ॥ ५७ ॥
एका जनार्दना शरण । जाहलें पूर्व निरुपण ।
पुढील कथा अति गहन । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ ५८ ॥
स्वस्ति श्री भावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
नारदरावणसंवादो नाम चतुर्विशतितमोऽध्यायः ॥ २४ ॥
ओंव्या ॥ १५८ ॥ श्लोक ॥ ४२ ॥ एवं ॥ २०० ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोविसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *