भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोपन्नावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चोपन्नावा

अहिरावणाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वप्रसंगीं निरुपण । श्रीहनुमंते महिरावण ।
रणीं मारिला देखोन । अहिरावण क्षोभला ॥ १ ॥
हनुमंताच्या पुच्छावर्ती । राक्षस पडीले नेणों किती ।
निधडे निधडे वीर पुढती । बळें लोटती संग्रामा ॥ २ ॥
आम्ही निधडे महावीर । राक्षसांचे भार अपार ।
एक वानर दोघे नर । करुं चकचूर क्षणार्धे ॥ ३ ॥

हनुमंत रामाना आज्ञा देण्याची विनंती करितो :

ऐकोनि राक्षसांच्या युक्ती । विनवी श्रीरामासी मारुती ।
मज आज्ञापीं श्रीरघुपती । यांची शांती करीन ॥ ४ ॥
श्रीराम म्हणे गा पवनात्मजा । सदा यशस्वी तुझिया भुजा ।
प्राणदात तूं रघुराजा । कीर्तिध्वजा ब्रह्मांडी ॥ ५ ॥
जानकीमनोरथाची वल्ली । प्रतापजीवनें त्वां जीवविली ।
मज रघुनाथा वेळ पडली । सांभाळिली त्वां एकें ॥ ६ ॥
तुझिया उपकारांचे ओझें । मस्तक उचलूं न शके माझें ।
तुझें कर्तृत्व तुजला साजे । केलीं काजें अतर्क्य ॥ ७ ॥
सीताशुद्धीपासूनि कर्मे । जीं जीं केलीं तीं तीं दुर्गमें ।
ऐसें बोलोनि रघूत्तमें । मिठी प्रेमें घातली ॥ ८ ॥
श्रीरामें देतां आलिंगन । हनुमान झाला सुखसंपन्न ।
ब्रह्मप्राप्तीहूनि गहन । समाधान पावला ॥ ९ ॥
आतां ऐकें वचन । तुवां मारिला महिरावण ।
माझा वांटा अहिरावण । कृपा करुन मज द्यावा ॥ १० ॥

अहिरावणाशी युद्ध करण्याची रामांची इच्छा व
हनुमंताच्या खांद्यावर बसून रामलक्ष्मणांची युद्धाची सिद्धता :

ऐसें बोलतां श्रीरघुनाथें । आवेश न धरवे हनुमंतातें ।
नमस्कारोनि श्रीरामातें । उभयतांते उचलिलें ॥ ११ ॥
उभयस्कंधी दोघेजण । घेवोनि श्रीरामलक्ष्मण ।
केलें हनुमंते उड्डाण । बळें गर्जोन भुभुःकारे ॥ १२ ॥
तया भुभुःकाराच्या घोषें । कित्येक निमालीं राक्षसें ।
अहिरावणही निजमानसें । धाकें त्रासे कपीच्या ॥ १३ ॥
शेष विष्णु श्रीशंकर । तिन्ही झाले एकत्र ।
श्रीराम हनुमंत सौ‍मित्र । अति विचित्र शोभती ॥ १४ ॥
असंख्य राक्षसांचें सैन्य । तिहीं वेढिले तिघे जण ।
युद्ध मांडलें दारुण । सावधान अवधारा ॥ १५ ॥
शक्ति शूळ गदा मुद्‌गर । फरश पट्टिश लहुडीचक्र ।
लक्षनियां नर वानर । शस्त्रें अपार टाकिती ॥ १६ ॥
झणें लागती श्रीरामासीं । म्हणोनि हनुमंत आकाशीं ।
उडोनि पुच्छें राक्षसांसी । अति आवेशीं ठोकित ॥ १७ ॥
क्षणैक भासे भूमंडळी । क्षणैक भासे नभोभंडळी ।
पुच्छें राक्षसा खंदळी । आतुर्बळी करीतसे ॥ १८ ॥
धन्य त्या पुच्छाचा प्रताप । राक्षसांसी सुटला कंप ।
कंपामाजी मारी थाप । पाडी अमूप पदघातें ॥ १९ ॥
असो यापरी हनुमंतें । रणीं मारिलें राक्षसांतें ।
तें देखोनि श्रीरघुनाथें । आश्चर्यातें मानिलें ॥ २० ॥
अहिरावण जों पाहे नयनीं । पाठिराखा नाहीं कोणी ।
क्रोधें अधरोष्ठ चावूनी । धांवे रणीं साटोपें ॥ २१ ॥
घेवोनियां धनुष्यबाण । मांडिलें माहेश्वरीं ठाण ।
अवलोकोनि रघुनंदन । काय आपण बोलत ॥ २२ ॥
जेंवीं होतां सन्निपात । यद्वा तद्वा बडबडत ।
तैसा लक्षोनि रघुनाथ । अहा जल्पत अविचारें ॥ २३ ॥
जेंवी सुरापानी उन्मत । वेदश्रुतीतें निंदित ।
किंवा अधर्मी अदत्त । साधुसंत उपहासी ॥ २४ ॥
तेंवी म्हणे रे रघुनंदना । तूं तंव कौसल्येचा तान्हा ।
केंवी आलासि समरांगणा । व्यर्थ प्राणां द्यावया ॥ २५ ॥
नरमांसाची प्रीत मोठी । हें रावणें जाणोनि पोटीं ।
तुज पाठविलें उठाउठीं । आम्हां साठीं आप्तत्वें ॥ २६ ॥
आतां पाहें रणकौतुक । बाणें छेदोनि मस्तक ।
तोरण देवीच्या संमुख । बांधीन देख निर्धारें ॥ २७ ॥
ऐसें ऐकोनिया वचन । हास्य करोनि रघुनंदन ।
मी कीटक हीन दीन । गिळीन गगन म्हणतसे ॥ २८ ॥
राक्षसांचा कुळांतक । दाशरथि मी रघुकुळटिळक ।
युद्ध करितां मज संमुख । क्षणें देख मरशील ॥ २९ ॥
निद्रिस्थ देखोनि केसरी । जंबुक त्याची चेष्टा करी ।
जिव्हा देखोनि मांसावरी । बळें बाहेरी वोढित ॥ ३० ॥
जागृत होतां कुंजरारी । त्याचा एकचि ग्रास करी ।
तैसी तुजला झाली परी । दृढ विचारीं मानसीं ॥ ३१ ॥
वैर नसतां तुज आम्हांसी । चोरोनि आणिलें दोघांसी ।
आतां केलें तें पावसी । होई युद्धासीं सावध ॥ ३२ ॥
ऐसें बोलतां रघुनंदन । क्रोधे क्षोभला अहिरावण ।
धनुष्य सज्जोनियां पूर्ण । तीक्ष्ण बाण विंधिले ॥ ३३ ॥
तें देखोनि रामचंद्र । बाण सोडोनि दुर्धर ।
निवारोनि अति सत्वर । शर अपार वर्षला ॥ ३४ ॥
श्रीरामाचें बाणजाळ । तेणें व्यापिले नभोमंडळ ।
अद्‍भुत राक्षसांचे बळ । तेणें सकळ छेदिलें ॥ ३५ ॥
निवारोनि श्रीरामबाण । केलें राक्षसें विंदान ।
शक्तिवरदाचा तीक्ष्ण । शर दारुण विंधिला ॥ ३६ ॥
परम योद्धा श्रीरघुनंदन । क्षणें चूर्ण करितां बाण ।
शक्तिवरदालागीं मान । स्वयें आपण देतसे ॥ ३७ ॥
बाण साहोनि श्रीरघुनाथें । राक्षस विंधिला बाणें शतें ।
तेणें निवारितां बाण त्यातें । कपाळातें खोंचिले ॥ ३८ ॥

अहिरावणाच्या रक्तबिंदूपासून अनेक अहिरावणांची निर्मिती :

बाण लागतां भाळावरी । तेथें झाली नवलपरी ।
रक्तबिंदु व्रणद्वारीं । भूमिवरी पडतांचि ॥ ३९ ॥
जितुका रक्तबिंदु पडत । तितुका अहिरावण उठत ।
तें देखोनि श्रीरघुनाथ । बाण सोडित आवेशें ॥ ४० ॥
वेगळाले शर विंधित । लागतां रक्तबिंदु पडत ।
पडतांचि अहिरावण घडत । अति अद्‍भुत मांडलें ॥ ४१ ॥
एकापासून झाले शत । शतापासून लक्ष होत ।
लक्षांचे कोटिपर्यंत । अर्बुदांत कोटीचे ॥ ४२ ॥
ऐसें गगन आणि मेदिनी । बाणीं व्यापिलीं अहिरावणीं ।
ऐसें देखोनियां मनीं । कोदंडपाणी खवळला ॥ ४३ ॥
समस्त मिळोनि अहिरावण । गदा परिग मुसळ बाण ।
घेवोनियां श्रीरघुनंदन । चहूंकडून वेढिला ॥ ४४ ॥
श्रीराम धनुर्वाडा चोखट । तितुकियांचे छेदिले कंठ ।
कंठ छेदितां उद्‌भट । चालिले लोट रक्ताचे ॥ ४५ ॥
तया रक्ताचे मागुती । रुपें घडती नेणों किती ।
गदापरिघ मुसळ हातीं । घेवोनि धांवती युद्धासीं ॥ ४६ ॥
धन्य तयांचे तपश्चरण । धन्य शिवाचे वरदान ।
प्रतापी रघुनंद । अणुप्रमाण ढळेना ॥ ४७ ॥
लावोनियां अग्निबाण । करोनि रक्तांचे शोषण ।
त्यांचा घ्यावा यासी प्राण । अशक्य कोण श्रीरामा ॥ ४८ ॥
सहज संकल्पाची प्रौढी । रची ब्रह्मांडांच्या कोडी ।
घडोनि सवेंचि मोडी । घडी विघडी संकल्पें ॥४९ ॥
तेथें बापुडें अहिरावण । मारावया नवल कोण ।
परंतु शिवाचें वरदान । रघुनंदन प्रतिपाळी ॥ ५० ॥
शुद्ध ग्रंथाचा ग्रंथार्थ । पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ ।
हाचि जाणावा भावार्थ । त्याचें सामर्थ्य विशेष ॥ ५१ ॥
लीलामात्रें अहिरावण । मारावयासी अशक्य कोण ।
परंतु भक्ताचें महिमान । स्वयें आपण वाढवी ॥ ५२ ॥
अहिरावणाच्या वधानुवृत्तीं । देखोनियां अपार व्यक्ती ।
आश्चर्य करोनि रघुपती । काय चित्तीं विचरी ॥ ५३ ॥
बाण सोडितां रिपुवधार्थी । वैरी अधिकचि वाढती ।
परम अद्‍भुत वर्तलें क्षितीं । काय याप्रती करावें ॥ ५४ ॥
मारितां न मरे एक जण । चिंतावला रघुनंदन ।
उगाचि राहिला आपण । घाय दारुण टाळित ॥ ५५ ॥
श्रीरामें न सोडितां बाण । युद्धा पेटले अहिरावण ।
घाय हाणिती अवघे जण । श्रीरघुनंदन टाळित ॥ ५६ ॥

हनुमंत रामाज्ञाने मकरध्वजाच्या मातेला उपाय विचारतो :

ऐसें देखोनि हनुमंत । पर्म झला चिंताक्रांत ।
उपाय कीजे कोण येथ । श्रीरघुनाथ वांचवावया ॥ ५७ ॥
येथें न चले रणव्युत्पत्ती । येथें न चले प्रतापशक्ती ।
मारितां अधिक अद्‍भवती । युक्ति कोणती करावी ॥ ५८ ॥
किंवा अवघे अहिरावण । पुच्छप्रतापे आकळून ।
इतुकियांचे घेऊं प्राण । कळ लावून कंठासीं ॥ ५९ ॥
ऐसें विचारितां मारुती । युक्ती आठवली निजचित्तीं ।
जाऊन पुसूं पुत्रापती । तो हें निश्चितीं सांगेल ॥ ६० ॥
ऐसें चिंतोनियां जाण । केलें श्रीरामाचें स्मरण ।
हनुमंतें करोनि उड्डाण । पुत्रसदन पावला ॥ ६१ ॥
तेणें नमस्कारिलें ताता । येणें सांगितलें वृत्तांत ।
मकरें पाचारिली माता । समूळ वार्ता ते सांगे ॥ ६२ ॥

मकरध्वजाच्या मातेचे उपायकथन :

मगरी म्हणे प्रतापरुद्रा । वचन ऐकें गुणसमुद्रा ।
संकट पडिलें श्रीरामचंद्रा । त्या परिहारा सांगेन ॥ ६३ ॥
धर्म पत्‍नी अहिरावणा । तिचें निजनाम चंद्रसेना ।
तुम्ही जावोनि तिच्या सदना । तियेसी जाणा पुसावें ॥ ६४ ॥
पतिव्रता ते सत्यवचनी । परम साध्वी तपस्विनी ।
तियेसी पुसतां तत्क्षणीं । तुजलागोनी सांगेल ॥ ६५ ॥
कैसें सांगेल भ्रतारमरण । ऐसी आशंका घेईल मन ।
तरी तेविषयीं निरुपण । सावधान अवधारा ॥ ६६ ॥
नागपाशीं श्रीरघुनंदना । बांधोनि आणितां राजसदना ।
तेथें आली चंद्रसेना । मनमोहना देखिलें ॥ ६७ ॥
सुंदर देखोनि रघुपती । चंद्रसेनेची मनोवृत्ती ।
श्रीरामीं वेधिली निश्चितीं । ऐसा पति असावा ॥ ६८ ॥
श्रीरामीं गुंतलें तन मन । नाठवेचि प्रपंचस्फुरण ।
कांत व्हावा रघुनंदन । ऐसें जाण वांछित ॥ ६९ ॥
मी अनुचरी तियेची जाण । तेथें माझें गमनागमन ।
तिचे हृद्‍गत कळलें पूर्ण । तैंपासून मजलागीं ॥ ७० ॥
श्रीरामीं गुंतली वासना । त्यालागीं सांगेल कांतमरणा ।
एतद्विषयीं अनुमाना । पवननंदना न करावें ॥ ७१ ॥

अहिरावणपत्‍नी चंद्रसेनेच्या सदनात हनुमंताचे आगमन :

ऐसें ऐकोनियां वचन । हनुमान उल्लासला पूर्ण ।
म्हणे कृपाळु रघुनंदन । मजलागून तुष्टला ॥ ७२ ॥
स्मरोनि श्रीरामपायांसी । तेथोनि उडाला वेगेंसी ।
आला चंद्रसेनेपासीं । देखोनि तियेसी ध्यानस्थ ॥ ७३ ॥
जैसा श्रीराम देखिला नयनीं । तैसा बिंबला अंतःकरणी ।
तेणें ध्यासें श्रीरामध्यानीं । बाह्यकरणीं तटस्थ ॥ ७४ ॥
डोळस सुंदर घनसांवळा । कांसे कसिला सोनसळा ।
आपाद वैजयंती माळा । कतिमेखळा शोभत ॥ ७५ ॥
मुकुतकुंडलें शोभायमान । श्यामसुंदर राजीवनयन ।
वदन सर्वानंदसदन । कुंदरदन साजिरा ॥ ७६ ॥
सुरेख भ्रकुटी शुकनासिक । भाळीं कस्तूरीची रेख ।
ऐसा देखोनि रघुकुळटिळक । लागली देख समाधी ॥ ७७ ॥
कोटिमदनांचें सांडणें । श्रीरामावरोनि ओंवाळणें ।
चंद्रसेना आपले मनें । भोगी तेणें तटस्थ ॥ ७८ ॥
जैसा साधक हृदयभवनीं । आत्मस्वरुपातें लक्षूनी ।
तटस्थ राहे सहजासनीं । तेंवी कामिनी देखिली ॥ ७९ ॥
नातरी देखोनि सर्पासी । तटस्थता जेंवी अजेसीं ।
तेंवी देखोनि श्रीरामासी । चंद्रसेनेसी समाधी ॥ ८० ॥
हनुमान पाहे आत्मज्ञानीं । तंव ते वेधली श्रीरामध्यानीं ।
म्हणे धन्य इयेची जननी । इयेलागूनी प्रसवली ॥ ८१ ॥
राक्षसयोनीमाजी जनन । आणि इयेसी श्रीरामध्यान ।
श्रीरामाचें महिमान । होतां दर्शन समाधि ॥ ८२ ॥
अति चंचळत्वें मन विकारी । एकाग्र राहोनि निर्विकारी ।
त्याचिया भाग्याची थोरी । मज वैखरीं न वर्णवे ॥ ८३ ॥
मनें गोंविलें साधकांतें । मनें भ्रमविलें ज्ञानियातें ।
मनें नाडिलें योगियातें । तापसातें दंडिलें ॥ ८४ ॥
ऐसें जें मन विकारवंत । चंद्रसेनेनें नेमस्त ।
करोनी हृदयीं श्रीरघुनाथ । असे भोगित स्वानंदें ॥ ८५ ॥
धन्य इयेचा भावार्थ । धन्य इयेचा संचितार्थ ।
धन्य इयेचा परमार्थ । श्रीरघुनाथदर्शनें ॥ ८६ ॥
ज्याचे हृदयीं श्रीरघुनाथ । त्याचें भाग्य अति समर्थ ।
ऐसें बोलतां हनुमंत । सद्‌गदित जाहला ॥ ८७ ॥
आत्मप्रत्ययाची गोष्टी । ऐकतां हर्ष होय पोटीं ।
नातरी प्रेमळ देखोनि दृष्टी । पडे मिठी प्रेमळा ॥ ८८ ॥
वस्तु देखोनि आवडती । कोणा एका उपजे प्रीती ।
तैसें देखोनियां सती । झाला मारुति तटस्थ ॥ ८९ ॥
हनुमंताची ध्यानमूर्ती । ब्रह्मानंदें श्रीरघुपती ।
ते देखोनि तिचे चित्तीं । झाला मारुति सद्‌गद ॥ ९० ॥
देहीं श्रीरामाचें उदेलें । नयनीं प्रेमाश्रु पातले ।
स्वेदकंपादि दाटले । पूर्ण झाले मनोरथ ॥ ९१ ॥
तेणें विसरला मीतूंपण । विसरला स्थूल लिंग देह कारण ।
विसरला विश्व तैजस प्राज्ञ । महाकारण विसरला ॥ ९२ ॥
विसरला अवस्था उन्मनी । परमानंद कोंदला मनीं ।
नेत्र राहिले उन्मळोनी । जनीं वनीं श्रीराम ॥ ९३ ॥
हनुमान विसरला देहस्फुर्ती । हृदयीं कोंदला श्रीरघुपती ।
ऐसें ऐकोनि निश्चितीं । आज्ञेपिता जरी श्रोते ॥ ९४ ॥
दाशरथि श्रीरघुनंदन । पाहतां त्याची मूर्ति सगुण ।
त्याचें एवढे महिमान । फळ तें कोण निर्गुणाचें ॥ ९५ ॥
परवस्तुची होतां प्राप्ती । जैसी तियेची फळश्रुती ।
ते त्वां सगुणध्यानस्थितीं । तैसी निश्चितीं स्थापिली ॥ ९६ ॥
ऐसी श्रोतियांची युक्ती । ऐकोनि वक्ता करी विनंती ।
सावध होवोनिया चित्तीं । यथानिगुतीं ऐकावें ॥ ९७ ॥
अणूमाजी ब्रह्म पूर्ण । हें तों प्रसिद्ध वदे वचन ।
कांहीं रिते नाहीं जाण । जग संपूर्ण परब्रह्म ॥ ९८ ॥
आपलें स्थान न सोडून । कार्यकारणीं होय उत्पन्न ।
मायामहत्तत्वादि त्रिगुण । ब्रह्मापासून जाहले ॥ ९९ ॥
धरणी आदि पंचभूतें । तेथूनि पावलीं जननातें ।
परंतु मुकलीं ब्रह्मातें । हे कोणातें न बोलवे ॥ १०० ॥
सुवर्णापासून नग जाला । तरी सुवर्णत्वा काय मुकला ।
त्यासी अधिक लाभ झाला । नाम पावला अलंकार ॥ १ ॥
तेंवी जें जें आलें व्यक्ती । तें तें ब्रह्मरुप निश्चितीं ।
मग पूर्णावतार श्रीरघुपती । ब्रह्ममूर्ति केंवी नव्हे ॥ २ ॥
अणुही परी ब्रह्मत्वेंसीं । कांही नसतां प्रतापासी ।
हा तरी प्रतापाची राशी । ब्रह्मत्व यासीं केंवी नसे ॥ ३ ॥
ज्याचे गृहीं सर्व संपत्ती । आणि स्वामित्व लोकांप्रती ।
भगवद्‌गीतेंत श्रीपती । माझी विभूति ते म्हणे ॥ ४ ॥
ऐसिया राजियांच्या चळथा । नित्य सेविती श्रीरघुनाथा ।
ज्याचा चतुरानन खेळता । वंदी माथां शंकर ॥ ५ ॥
श्रीराम चूडामणि रघुवीर । ज्यासी वंदिती नर सुरवर ।
पूर्णब्रह्म हा निर्धार । केंवी साचार न मानावा ॥ ६ ॥
आणीकही दुसरा अर्थ । रावणभयें सुर समस्त ।
क्षीरसागरा जावोनि त्वरित । रमाकांत प्रार्थिला ॥ ७ ॥
त्यांचे ऐकोनियां स्तवन । शेषशायी श्रीनारायण ।
स्वयें झाला रघुनंदन । हें तों वचन वाल्मीकी ॥ ८ ॥
नारायण तो श्रीरघुनंदन । शेष तोचि लक्ष्मण ।
शंख चक्र भरत शत्रुघ्न । वाल्मीकवचन प्रसिद्ध ॥ ९ ॥
पूर्णब्रह्म श्रीनारायण । तोचि झाला श्रीरघुनंदन ।
झाला म्हणणें हेंही गौण । तोचि आपण प्रकटला ॥ ११० ॥
जोचि देखिला वाराणसीं । तोचि भेटला अन्य देशीं ।
तरी काय भेद झाला त्यासीं । देशकाळासीं भेदत्व ॥ ११ ॥
जैसा होता शेषशयनीं । तोचि झाला अयोध्याभवनीं ।
पूर्णब्रह्मत्व रघुनंदनीं । निश्चियेंकरोनी पैं असे ॥ १२ ॥
सगुण असतां श्रीनारायण । त्यासी ब्रह्मत्व कैसेन ।
ऐसें म्हणती त्यांचे ज्ञान । अति अज्ञान जाणावें ॥ १३ ॥
सगुण मानिती श्रीहरीतें । त्यांचें ज्ञान असो परतें ।
त्याहून आहे म्हणतां वरतें । सरतें पुरतें अज्ञान ॥ १४ ॥
असो हे भेदाची मात । पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ ।
स्वलीला अवतार धरित । नाना दावीत चरित्रें ॥ १५ ॥
ब्रह्म नसतां रघुनंदन । तरी कैसेनि तरती पाषाण ।
जीवनात्मा श्रीराम आपण । स्वसत्तें जाण तारिले ॥ १६ ॥
आणीक दुसरा चमत्कार । लंकेपुढें घोरांदर ।
होतां मरती निशाचर । आणि वानर उठती ॥ १७ ॥
समुद्री पाषाण तरती । हे ईश्वरत्वाची प्रतीती ।
आत्मत्वाची दुजी ख्याती । कपि वांचती संग्रामीं ॥ १८ ॥
बाण फिरोनि भातां रिघती । हे व्यापकत्वाची प्रतीती ।
आणि स्वकर्मत्वाची ख्याती । कपि मारिती राक्षसां ॥ १९ ॥
हेचि आशंका पार्वतीसी । सीता होवोनि वानासीं ।
छळो आली श्रीरामासीं । श्रीरामें तिसी ओळखिलें ॥ १२० ॥
ब्रह्म नसता श्रीरघुपती । तरी कैसेनि ओळखता पार्वती ।
सर्वज्ञत्वाची हे प्रतीती । श्रीराम निश्चितीं परब्रह्म ॥ २१ ॥
ऐसें ईश्वरत्व आत्मत्व सर्वज्ञत्व । व्यापकत्व आणि सर्वकर्तृत्व ।
त्यासीं न मानितां ब्रह्मत्व । अज्ञानत्व म्हणजें यासी ॥ २२ ॥
सच्चिदानंद आत्माराम । तो श्रीराम पूर्णकाम ।
ज्याचें सहज घेतां नाम । उडे परम अज्ञान ॥ २३ ॥
त्याचें भजन तेंचि साधन । त्याचें स्मरण तेंचि मनन् ।
त्याची प्राप्ति तोचि जाण । ब्रह्म पूर्ण त्रिसत्य ॥ २४ ॥
ऐसियापरी श्रीरघुनंदन । पूर्ण ब्रह्म सनातन ।
त्यांचें हृदयीं करितां ध्यान । झाला लीन हनुमंत ॥ २५ ॥
ऐसें ऐकोनियां वचन । सुखावले श्रोतेजन ।
म्हणती वक्ता विचक्षण । समाधान पैं केलें ॥ २६ ॥
पूर्णब्रह्म श्रीरघुनंदन । आम्हां ठावें असे पूर्ण ।
तुझें पहावयासी ज्ञान । केला प्रश्न कौतुकीं ॥ २७ ॥
सद्‌गुरुकृपाघनतुषारें । आनंदविलीं मनमयूरें ।
झालें समाधान पुरें । चालवीं त्वरें कथेसी ॥ २८ ॥
श्रोतियांसी करोनि नमन । वक्ता म्हणे सावधान ।
समधि पावला हनुमान । पुढील कथन अवधारा ॥ २९ ॥
सर्व वृत्तींचा निरास । करोनि स्वरुपीं सावकाश ।
लीन असतां हनुमंतास । श्रीरामास अति चिंता ॥ १३० ॥
स्वरुपीं वेधल वायुकुमर । झाला मत्कार्याचा विसर ।
ऐसें जाणोनि रघुवीर । करी सत्वर सावध ॥ ३१ ॥
श्रीराम चैतन्याचें चित्त । श्रीराम आनंदाचें जीवित ।
स्फुरणरुपेंसी प्रकटत । सावध करी रघुनंदन ॥
येतां वृत्तीवरी हनुमान । झालें स्मरण कार्याचें ॥ ३३ ॥
अवस्था जिरवूनि उदरीं । हनुमंत विचारी अंतरीं ।
श्रीराम सांडोनि संगरीं । काय करीं मी येथें ॥ ३४ ॥
आलों वर्म पुसावयासी । ते स्मरण नाहींच मानसीं ।
काय गुंतलों समाधीसी । वेगीं कार्यासी करावें ॥ ३५ ॥
श्रीराम सर्वांसी बुद्धिदाता । श्रीराम चैतन्या चेतविता ।
तेणें चेतविलें हनुमंता । पुढील कथा अवधारा ॥ ३६ ॥

हनुमंताकडून चंद्रसेना सावध होऊन प्रश्न करते :

हनुमान उघडोनि पाहे नयना । तंव ते ध्यानस्थ चंद्रसेना ।
करोनि हरिनामें गर्जना । टाळी जाणा पिटिली ॥ ३७ ॥
ऐकतां हनुमंताची टाळी । तिची उघडली कर्णटाळी ।
सावध होवोनि नेत्रकमळीं । पाहे बाळी सचकित ॥ ३८ ॥
म्हणे नवल कैसें झालें । कैचें वानर येथें आलें ।
यासी पुसोनि पाहों वहिलें । नमन केलें तंव तेणें ॥ ३९ ॥
देखोनि बोले राक्षसभार्या । कपि आलासी कोण्या कार्या ।
तेजें दिससी समान सूर्या । वानरवर्या सांगावें ॥ १४० ॥

हनुमंताचे वृत्तांतकथन व वर्म‍उपायाची याचना :

हनुमंत म्हणे चंद्रवदनें । शुभलक्षणे कुंदरदने ।
गुणचातुर्यसौंदर्यसदने । माझी वचनें परिसावीं ॥ ४१ ॥
रावणें निजसामर्थ्येसीं । बंदीं घातलें देवांसी ।
सुरवरीं प्रार्थिलें श्रीहरींसी । अति करुणेसी भाकूनी ॥ ४२ ॥
त्यांचे ऐकोनियां स्तवन । स्वयें अवतरे नारायण ।
सूर्यवंशी श्रीरघुनंदन । ब्रह्म पूर्ण प्रकटला ॥ ४३ ॥
त्याचा बंधु तो लक्ष्मण । तोचि सहस्रवदन ।
शंखचक्रावतार पूर्ण । भरतशत्रुघ्न जाणावे ॥ ४४ ॥
पुढें दशरथाचे वचनें । वना पातला श्रीरघुनंदन ।
सीता हरिली दशाननें । कपटभावेंकरोनी ॥ ४५ ॥
तिची करावया सोडवण । मेळवोनि वानरसैन्य ।
लंके आला श्रीरघुनंदन । समुद्रीं पाषाण घालोनी ॥ ४६ ॥
वानरीं करोनि घोरांदर । रणीं मारिले निशाचर ।
रावणाचे बंधुपुत्र । श्रीरामें समग्र मारिले ॥ ४७ ॥
तेणें दुःखें दशानन । अहिमही दोघे जण ।
त्यांसी जाणवी वर्तमान । साह्य पूर्ण करावें ॥ ४८ ॥
तिहीं ऐकिलें वचन । निद्रिस्थ श्रीरामलक्ष्मण ।
येथें आणिले चोरोन । त्यांचे हवन करावया ॥ ४९ ॥
ऐसें कळतां मज हनुमंता । वेगीं धांवोनि तत्वतां ।
केलें महिरावणाच्या घाता । श्रीरघुनाथा सोडविलें ॥ १५० ॥
हें देखोनि अहिरावण । दुःखे क्षोभला दारुण ।
पडखळोनि रघुनंदन । दुर्धर रण मांडिले ॥ ५१ ॥
दुर्धर रणयोद्धा श्रीराम । केला अद्‍भुत संग्राम ।
तेथें कौतुक झाले परम । न कळे वर्म राक्षसीं ॥ ५२ ॥
बाण लागतां शत्रुशरीरीं । रुधिर पडतां पृथ्वीवरी ।
बिंदुपासाव होती वैरी । नवलपरी हे माते ॥ ५३ ॥
चंद्रसेना सत्यवचनी । ऐसें ऐकोनियां कानीं ।
वर्म पुसावयासी जननी । तुजलागोनी मी आलों ॥ ५४ ॥
वैरी कैसेनि उद्‌भवती । त्यांची कैसी हो शांती ।
हें मज सांगावें निश्चितीं । श्रीरघुपतिसुखार्थ ॥ ५५ ॥
रणसंकटीं पडिला श्रीराम । त्याचा जेणें होय निगम ।
ऐसें सांगावें निजवर्म । मनोधर्म हा माझा ॥ ५६ ॥
निजधर्माचें संरक्षण । करावया साधूचें पाळण ।
मारावया दुष्टजन । रघुनंदन अवतरला ॥ ५७ ॥
श्रीराम भक्तांचे माहेर । श्रीराम ज्ञानाचें जिव्हार ।
श्रीराम विश्वाचा आधार । पूर्णावतार श्रीराम ॥ ५८ ॥
श्रीराम मुनिजनांचे ध्यान । श्रीराम योगियांचें भजन ।
श्रीराम सुरांचें देवतार्चन । मदनमोहन श्रीराम ॥ ५९ ॥
श्रीरामाऐसें निधान । राक्षसीं घेतलें वेष्टून ।
त्यासीं उपाय कीजे कवण । कृपा करुन सांगावा ॥ १६० ॥
ऐसें बोलतां हनुमंता । चंद्रसेनेसीं परमावस्था ।
संकट ऐकोनि श्रीरघुनाथा । झाली तत्वतां विव्हळ ॥ ६१ ॥
श्रीराम सर्वांगसुकुमार । सुवर्णतनु सुंदर ।
राक्षसांचे शस्त्रप्रहार । केंवी रघुवीर साहेल ॥ ६२ ॥
आणि असावा ऐसा भर्ता । पूर्वसंकल्प चित्तीं होता ।
ऐसिया बुद्धीची विकळता । सांगे तत्वतां पतिमरण ॥ ६३ ॥
म्हणे ऐकें श्रीरामदूता । परमसाधु परम भक्ता ।
माझिया पुरविसी मनोरथा । तरी मी तत्वतां सांगेन ॥ ६४ ॥
साच ऐकोनियां वचन । हृदयीं हर्षला हनुमान ।
म्हणे सांगसी मजलागून । तें पूर्ण करीन मी ॥ ६५ ॥
चंद्रसेना म्हणे त्यातें । सत्य मिथ्या न कळे मातें ।
जरी तूं देसील भाकेतें । तरी मी तूते सांगेन ॥ ६६ ॥
आपुला साधावया कार्यार्थ । भाक देवोनि हनुमंत ।
म्हणे काय तो सांग त्वरित । मनोरथ मी कर्ता ॥ ६७ ॥

चंद्रसेनेचे हनुमंताला अटीसह उपायकथन :

हर्षे बोले चंद्रसेना । म्हणे ऐक पवननंदना ।
म्यां भोगावें श्रीरघुनंदना । मुख्य वासना हे माझी ॥ ६८ ॥
कांत व्हावा श्रीरघुपती । ऐसी वांच्छा आहे चित्तीं ।
पूर्ण करीं तूं मारुती । म्हणोनि सती वंदित ॥ ६९ ॥
कांत व्हावा श्रीरघुनंदन । म्हणोनि सांगतें पतिमरण ।
अवश्य हनुमंतें बोलोन । पुसे फिरोन ते गोष्टी ॥ १७० ॥
मग म्हणे गा ऐकें सत्य । अहिरावण जो माझा कांत ।
तेणें तप केलें अद्‌भुत । तोही वृत्तांत अवधारीं ॥ ७१ ॥
लोहकंटकीं एकनिष्ठ । येणें रोवोनि अंगुष्ठ ।
तप केलें अति उत्कृष्ट । श्रीनीळकंठप्रीत्यर्थ ॥ ७२ ॥
प्रसन्न होवोनि त्रिनयन । तेणें दिधलें वरदान ।
रक्तबिंदु पडतां जाण । अहिरावण जन्मावे ॥ ७३ ॥
भ्रमराळी शिवकंधरीं । पाताळ अमृत लवकरीं ।
आणोनि रुधिरीं घालिती ॥ ७४ ॥
तेणे उठती अहिरावण । हें हनुमंता सत्य जाण ।
असत्य न वदे माझें वदन । पुढील कारण करावें ॥ ७५ ॥

हनुमंताचे उड्डाण व भ्रमरसंहार :

ऐसें ऐकतां हनुमंत । चंद्रसेनेतें वंदित ।
मज वोळला श्रीरघुनाथ । असे डुल्लत निजप्रेमें ॥ ७६ ॥
करोनियां श्रीरामस्मरण । केलें हनुमंतें उड्डाण ।
वेगीं पातला पाताळभुवन । जेथें स्थान अमृताचें ॥ ७७ ॥
सादरें पाहे हनुमंत । तंव भ्रमरीं झांकिलें अमृत ।
म्हणे सतीचें वचन सत्य । वर्म निश्चित सांगितलें ॥ ७८ ॥
त्या अमृतरुद्रातें रक्षण । लोकपाळ ठेविले जाण ।
येरें करोनि आंगवण । मारिले पूर्ण निमषें ॥ ७९ ॥
पुढें येतां वायुसुत । भ्रमर देखिले अमृत नेत ।
एकामागें एक पळत । त्वरान्वित अति वेगें ॥ १८० ॥
तेणें क्षोभला हनुमंत । थापा हाणोनि समस्त ।
अवघ्यां करोनि प्रांणात । निर्जीवित पडिले ॥ ८१ ॥
कोणी उरले पांच सात । ते पळाले भयभीत ।
मुख्य जो कां भ्रमरनाथ । जाणवीत तयासी ॥ ८२ ॥
तो अति उग्र स्थूळशरीरी । मेरु भ्रमरमाळेवरी ।
गरुडाऐसा फडत्कारीं । आला सत्वरी धांवोनी ॥ ८३ ॥
वज्रप्राय चंचु कठिण । हाणि हनुमंता धांवोन ।
येरें दोनी पक्ष धरोन । पाडिला जाण भूतळीं ॥ ८४ ॥
पाय देवोनि वक्षाप्रती । पक्ष उपडितां दोहीं हातीं ।
येरू येवोनि काकुलती । म्हणे मारुती वांचवीं ॥ ८५ ॥
तुझिया उपकारा उत्तीर्ण । मी एकदां होईन जाण ।
जेव्हां माझें करिसी स्मरण । मी पावेन ते समयीं ॥ ८६ ॥
म्हणसील भ्रमर हीन दीन । होसी उतराई कैसेन ।
तरी कीटक समुद्रा उत्तीर्ण । झालें म्हणून ऐकिजे ॥ ८७ ॥
ऐसें ऐकोनि दीनवचन । कृपें कळवळिला हनुमान ।
त्यासी भाकें गोंवून । दिल्हा सोडून भ्रमरेंद्र ॥ ८८ ॥
तेथें बैसोनि हनुमंत । स्वेच्छा प्राशिलें अमृत ।
येरीकडे श्रीरघुनाथ । काय करित तें ऐका ॥ ८९ ॥

आकाशवाणीने रामांना निर्दालक बाण सोडण्याची सूचना :

सज्जोनियां चापशर । युद्ध मांडिले घोरांदर ।
बाणीं निवटी राक्षसभार । श्रीरघुवीर दृढ योद्धा ॥ १९० ॥
तंव गर्जली आकाशवाणी । बाण सज्जीं कोंदडपाणी ।
तुझे शत्रु तुझिया बाणीं । येच क्षणीं निमतील ॥ ९१ ॥
शत्रु जेणें पावती जनन । तया उपाय पडिलें खान ।
अमृतवृष्टी सरली जाण । विजयी पूर्ण तूं होसी ॥ ९२ ॥
ऐसें अशरिरिणीचें वचन । ऐकोनि श्रीरघुनंदन ।
चापीं सज्जी अग्निबाण । घ्यावया प्राण शत्रूचा ॥ ९३ ॥
सबीज मंत्रे आव्हानिला । सुसाटध्वनि शर सूटला ।
शत्रुकाननीं लागला । निघती ज्वाळा धडधडां ॥ ९४ ॥
बाणें शोषोनि रुधिर । अवघे करोनि एकत्र ।
कंठ छेदिले सर्वत्र । निमेषमात्र न लागतां ॥ ९५ ॥
जितक्या झाल्या होत्या व्यक्ती । तितक्यांची केली शांती ।
धन्य धनुर्वाडा रघुपती । निमेषगती न लागतां ॥ ९६ ॥

अहिरावणाचा वध :

मुख्य जो कां अहिरावण । तयाचें शिर छेदून ।
बानें वंदोनि रघुनंदन । निघे परतोन भात्यांत ॥ ९७ ॥
समुद्रीं नाना तरंग उठती । वायु त्यांची करी शांती ।
तेंवी निजबाणें श्रीरघुपती । राक्षसव्यक्ती निवटितां ॥ ९८ ॥
नातरी मनाचे संकल्प । साधक करी निर्विकल्प ।
तेंवी अहिरावण अमूप । रविकुळदीपक संहारी ॥ ९९ ॥
जेंवी नाना भूतकृती । असतां नाशे ब्रह्मसंपत्ती ।
तेंवी राक्षसांच्या व्य्क्ती । श्रीरघुपति संहारी ॥ २०० ॥
भेदवाद्यांचे शब्दार्थ । जेवी वेदांत दूषित ।
तैसियापरी श्रीरघुनाथ । संहारित राक्षसां ॥ १ ॥
जेंवी उगवतां सूर्यकिरणें । लोपोनि जाती तारांगणें ।
ऐसियापरी श्रीरघुनंदनें । रणीं मारणें शत्रूंतें ॥ २ ॥
क्रोधांवाचून संहार । काम नसतां कामाचार ।
लोभावांचून परिवार । श्रीरघुवीर संपादी ॥ ३ ॥
असो त्याची अतर्क्य गती । तोचि जाणे निश्चितीं ।
किंवा त्याचे भक्त जाणती । येरांप्रती टकमक ॥ ४ ॥
ऐसियापरी श्रीरघुनंदन । मारोनियां अहिरावण ।
विजयी झाला संपूर्ण । पुढील कथन अवधारा ॥ ५ ॥
अहिरावण पडिला रणीं । ऐसें देखोनियां नयनीं ।
पळों लागल्या राक्षसश्रेणी । जीव घेवोनि श्रीरामभयें ॥ ६ ॥
धर्मयोद्धा श्रीरघुनंदन । पळत्यावरी न घाली बाण ।
रणीं उभा रणप्रवीण । सहलक्ष्मण स्वानंदे ॥ ७ ॥

हनुमंताचे राक्षससैन्यात आगमन व राक्षसांची दाणादाण :

येरीकडे श्रीहनुमंत । उड्डाण करोनियां त्वरित ।
आला राक्षससैन्यांत । नाम गर्जत श्रीरामाचें ॥ ८ ॥
पुच्छ वाढिविलें थोर । आवर्त घालोनि चौफेर ।
राक्षसांसी केला मार । अति दुर्धर तो ऐका ॥ ९ ॥
गज धरोनि हस्तकीं । हाणी गजाचे मस्तकीं ।
रथ घेवोनि एकाएकीं । बळें टाकी रथावरी ॥ २१० ॥
मोठा युद्धा आवेश । झोडी राक्षसेराक्षस ।
पायीं मारिलें बहुवस । सावकाश रणरंगीं ॥ ११ ॥
एक आकाशीं झुगारिले । एक सागरीं बुडविले ।
एक पायींच तुडविले । एक झोडिले कराघातें ॥ १२ ॥
पुच्छ पसरिलें दुर्धर । राक्षस आकळोनि समग्र ।
लोहार्गळा घेवोनि थोर । केला चूर अस्थींचा ॥ १३ ॥
भयें भ्रमविलें निशाचरां । पळों लागले सैरावैरां ।
एकीं घेवोनि भेदरा । रणीं थरथरां कांपती ॥ १४ ॥
एक पळती आकाशांत । भला सांपडला पंथ ।
ऐसें वदतां पुच्छकेत । पायीं धरित अतर्क्ये ॥ १५ ॥
पुच्छ नव्हे हा काळकेत । लपोनि राहतां विवरांत ।
पुच्छ पातलें उमगित । ओढोनि काढित बाहेरी ॥ १६ ॥
ऐसी राक्षसां करोनि बोहरी । पुच्छें प्रवेश करोनि नगरीं ।
हनुमान मर्कटचेष्टा करी । नवलपरी ते ऐका ॥ १७ ॥
नगरीं वागती नगरलोक । तेथें पुच्छ आलें देख ।
पायीं धरोनि एकाएक । बळें सकळिक आपटिले ॥ १८ ॥
पळोनि जातां निजगृहांत । पुच्छ पातलें अकस्मात ।
महानाटकी हनुमंत । राक्षसांत मांडिला ॥ १९ ॥
पुच्छ घालितां नासिकांत । राक्षस सटसटां शिंकत ।
नाकीं वदनीं सकसळित । बुळबुळित बृहतीमाजी ॥ २२० ॥
अधोद्वारा दाटित । वदनद्वारीं काढित ।
तेणें राक्षसां प्राणांत । कळकळित कपिभयें ॥ २१ ॥
नगरी मांडिला आकांत । राक्षस ठायी ठायीं लपत ।
सर्वदेखणा हनुमंत । पुच्छ धाडित त्या ठाया ॥ २२ ॥
सर्वभूतीं श्रीरगुनाथ । त्यासी भजतां हनुमंत ।
झालें सर्वज्ञत्व प्राप्त । जाणे समस्त विश्वहृदय ॥ २३ ॥
सर्वभूतीं श्रीरघुनाथ । ऐसे जाणोनि हनुमंत ।
राक्षस मारिले किमर्थ । तोही वृत्तांत अवधारा ॥ २४ ॥
श्रीराम सर्वांचा हृदयस्थ । हृदयीं असोनि साक्षिभूत ।
सर्वी साक्षित्वें नांदत । नव्हे लिप्त पापपुण्य ॥ २५ ॥
घटीं रविबिंब देखिलें । आणि घटासी फोडिलें ।
तरी काय सूर्यातें भेदिलें । बोलतां बोल् मानेना ॥ २६ ॥
सहज फोडितां तरंगासी । काय फोडिलें समुद्रासी ।
तैसें मारितां इतरांसी । श्रीरामासी काय लागे ॥ २७ ॥
आणि प्रवृत्तिशास्त्रसंमत । देवद्रोही मदोन्मत्त ।
ब्रह्मद्वेषी अधर्मरत । त्यांचा घात करावा ॥ २८ ॥
आणिकही दुसरा अर्थ । मुक्त जें जें कर्म करित ।
तें तें त्यासी अबाधत । न लागे निश्चित पापपुण्य ॥ २९ ॥
गोकुळामाजी श्रीअनंतें । भोगिलें नाना योषितातें ।
पाप कोणतें जडलें त्यातें । हेंचि निश्चितें सांगावें ॥ २३० ॥
तयाचपरी श्रीहनुमंतें । रणीं मारिलें राक्षसांतें ।
नाहीं मानिले हत्येतें । तन्मयत्वें संग्राम् ॥ ३१ ॥
असो यापरी हनुमंत । निजात्मध्यासें युद्ध करित ।
रणीं खवळला अत्यद्‍भुत । पुच्छकेत सोडिला ॥ ३२ ॥
आला आला रे पुच्छकेत । नगरीं मांडिला आकांत ।
राक्षस शंखस्फुरण करित । सैरा धांवत दशदिशा ॥ ३३ ॥
पुच्छ येतां बाजारांत । चाटे दिंडांमाजी लपत ।
वाणी लपती पोत्यांत । पुच्छ ओढित तेथूनी ॥ ३४ ॥
तेली लपती घाण्यांत । साळी दडती निजगर्तेत ।
पानपसारे अटक्यांत । पुच्छ काढित तेथूनी ॥ ३५ ॥
विचारोनि युक्ती शूद्रीं । लपती कडब्यामाझारी ।
पुच्छ अवचितें पायीं धरी । काढी बाहेर ओढोनी ॥ ३६ ॥
एक तळघरीं देती दडिया । एक समुद्रीं देती बुडिया ।
एक टाकिती पेवीं उडिया । पुच्छ पायां सोडीना ॥ ३७ ॥
कोट्यनुकोटी राक्षसभार । मारिले हनुमंतें समग्र ।
नगरीं उठिला हाहाकार । रजनीचर पळताती ॥ ३८ ॥
धांवत आले राजगृहासी । जानविलें चंद्रसेनेसी ।
येरी जाणोनि मानसीं । निजयुक्तीसी सांगत ॥ ३९ ॥
पुच्छ् जवळी येतां जाण । घाला जानकीची आण ।
तेचि युक्तीतें करोनी कित्येक जाण वांचले ॥ २४० ॥

हनुमंताचे रामचंद्रासन्निध आगमन व कथन :

ऐसें करोनि चरित्र । उड्डाण करी वायुपुत्र ।
येथें उभे श्रीराम सौ‍मित्र । मित्र तिकडे सत्वर परतला ॥ ४१ ॥
अगाध हनुमंताची ख्याती । स्वर्गी सुरवर वानिती ।
लिहितां न पुरे एवढी क्षिती । यथामती बोलतां ॥ ४२ ॥
येरीकडे श्रीरघुनंदन । अनुलक्षूनि लक्ष्मण ।
म्हणे युद्धाचें लक्षण । कैसें जाण भासलें ॥ ४३ ॥
वैरी कोठून उद्‍भवले । कैसेनि नासातें पावले ।
हें तव महाआश्चर्य झालें । कोणें केलें कळेना ॥ ४४ ॥
ऐकोनि बोले सुमित्रासुत । वाढ वेळ गेला हनुमंत ।
त्यावीण हा कार्यार्थ । नव्हे निश्चित दुजियाचा ॥ ४५ ॥
ऐसें दोघे संवादती । तंव आकाशपंथें मारुती ।
उतरोनियां शीघ्रगतीं । श्रीरघुपति नमियेला ॥ ४६ ॥
देवाभक्तां होतां भेटी । निजानंदें कोंदली सृष्टी ।
गगनीं केली पुष्पवृष्टी । सुखसंतुष्टीं सुरवरीं ॥ ४७ ॥
हनुमंतासी श्रीरघुनंदन । म्हणे आम्हांतें सांडोन ।
कोठें केलें होते गमन । मजलागून सांगावें ॥ ४८ ॥
ऐसें बोलतां श्रीरघुपती । वरतें न पाहे मारुती ।
म्लानवदन दीनवृत्ती । श्रीरामाप्रती अनुवादे ॥ ४९ ॥
दुर्धर देखोनि अहिरावणा । जावोनि प्रार्थिली चंद्रसेना ।
तुझ्या देवोनि अंतुरीपणा । जय आंदणा घेतला ॥ २५० ॥
तुझें एकपत्‍नीव्रत । हें तों घडेना निश्चित ।
अतएव माझा संचितार्थ । पैं विपरीत फळिन्नला ॥ ५१ ॥
तुझें नाम स्मरतां वदनीं । पापीं वसती वैकुंठभुवनीं ।
माझे पूर्वज नरकायतनीं । तुझे कारणीं पडियेले ॥ ५२ ॥

श्रीरामांची प्रतिक्रिया :

ऐसें बोलतां हनुमंत । कृपेनें कळवळला रघुनाथ ।
तूं तंव माझा परम आप्त । भला कार्यार्थ साधिला ॥ ५३ ॥
जैसें निवारिलें संकट । तैसें निवारीं हे दुर्घट ।
आम्हांसीं अणुमात्र खटपट । नलगे स्पष्ट तव धर्मे ॥ ५४ ॥

हनुमंताची चंद्रसेनेला तयारीची सूचना :

ऐसें बोलतां श्रीरघुवीर । वेगें उडाला वायुकुमर ।
चंद्रसेनेचें मंदिर । अति सत्वर ठाकिलें ॥ ५५ ॥
तियेसी बोले हनुमंत । तुझे पुरवावया मनोरथ ।
येथें आणितों श्रीरघुनाथ । सावचित्त तूं ऐस ॥ ५६ ॥
श्रींराम सर्वात्मा सर्वज्ञ । श्रीराम त्रैलोक्यातें मान्य ।
त्याचें आतिथ्य करितां सामान्य । सत्य जाण महादोष ॥ ५७ ॥
ब्रह्मादिका पडे दृष्टी । तो येतसे तुझे भेटी ।
भाग्य तुझे न वदवे होटीं । धन्य सृष्टीं तूं एक ॥ ५८ ॥
तरी ऐकें एक वचनार्थ । शेज करावी सुनिश्चित ।
अणुमात्र भंगल्या श्रीरघुनाथ । उठोनि त्वरित जाईल ॥ ५९ ॥

हनुमंताची भ्रमराला मंचक कोरण्याची आज्ञा :

येरी बरें म्हणोनि पाहीं । शेज सांवरी लवलाहीं ।
हनुमंतानें तेचि समयीं । भ्‍रमर हृदयीं आठविला ॥ २६० ॥
तो स्मरतांचि पातला तेथें । नमस्कारिलें हनुमंतातें ।
काय आज्ञा करीं मातें । निजभावार्थे पूसत ॥ ६१ ॥
ऐकोनि बोलिजे हनुमंतें । चंद्रसेनेच्या मंदिरातें ।
तुवां जावोनि गुप्तपंथे । मंचकातें कोरावें ॥ ६२ ॥
पोंचट करावा मंचक । वरी बैसतां रघुकुळटिळक ।
भंगोनि जाय एकाएक । ऐसा देख करावा ॥ ६३ ॥
आज्ञा म्हणोनि मधुकर । वेगें पावला राजममंदिर ।
मंचक कोरुनि समग्र । किंचिन्मात्र रक्षिला ॥ ६४ ॥
कर्दळीपत्रप्रमाण । त्वचा रक्षोनियां जाण ।
वेगें करोनि उड्डाण । पवननंदन वंदिला ॥ ६५ ॥
तुवां दिधलें जीवदान । त्याचें न होववे उत्तीर्ण ।
परंतु स्वल्प सेवा जाण । तुजलागून अर्पिली ॥ ६६ ॥
हनुमान येवोनि श्रीरामापासीं । भ्रमर भेटविला श्रीरामासी ।
श्रीरामें देवोनि आलिंगनासी । मधुकरासी गौरविलें ॥ ६७ ॥
भ्रमर म्हणे पवनात्मजा । तुवां उद्धार केला माझा ।
मज भेटविला श्रीरामराजा । झालों तुझा उपकारी ॥ ६८ ॥
ऐसें स्तवोनि उभयतांसी । भ्रमर गेला निजधामासी ।
हनुमंतानें श्रीरामासी । राजगृहासीं चालविलें ॥ ६९ ॥

श्रीरामांचे चंद्रसेनेच्या निजमंदिरात आगमन व मंचकभंग :

श्रीराम येतां निजमंदिरा । आडवी धांवोनि सुंदरा ।
नमस्कारोनि श्रीरघुवीरा । निजवोंवरा आणिलें ॥ २७० ॥
श्रीराम बैसतां मंदकावरी । झाली मंचका चकचूरी ।
तैंच उठोनि झडकरी । निघे बाहेरी श्रीराम ॥ ७१ ॥

चंद्रसेनेचा हनुमंतावर क्रोध :

कपट कळलें चंद्रसेनेसी । मग भरोनि क्रोधावेशीं ।
काय बोलिली हनुमंतासी । कपटी होसी तूं एक ॥ ७२ ॥
अरे कपटिया श्रीरामदूता । आपुलें कार्य साधिलें धूर्ता ।
मारवोनि माझ्या कांता । हितस्वार्था नागविलें ॥ ७३ ॥
अति भावार्थे पुसोनि वर्म । शेखीं केलें घातक कर्म ।
कोठें राहिला सत्य धर्म । महा अधर्म त्वां केला ॥ ७४ ॥

श्रीरामांकडून सांत्वन व उपदेश :

आतां शाप घेई माझा । म्हणोनि बोलली राक्षसभाजा ।
कृपा आली राघवराजा । पवनात्मजाकारणें ॥ ७५ ॥
माझ्या कार्यालागीं जाण । येणे केलें हें विंदान ।
आणि शाप दारुण । किमर्थ आपण घालावा ॥ ७६ ॥
ऐसें विचारुनि पोटीं । आत्मज्ञानाचे परिपाठीं ।
चंद्रसेनेसी सांगे गोष्टी । कृपादृष्टीं कृपाळू ॥ ७७ ॥
मी सर्वाअत्मा सर्वदेशीं । व्यापक नव्हे एकदेशी ।
व्यापकता नाना आकारांसी । निजदेहासीं व्यापक ॥ ७८ ॥
श्रीरामें धरली धरा राहे । श्रीरामें जीवन जीवताहे ।
श्रीरामप्रतापें वायु आहे । चाळविताहे सर्वांसी ॥ ७९ ॥
श्रीरामें दिधला अवकाश । म्हणोनि नांदताहे आकाश ।
श्रीरामें तेजासी प्रकाश । श्रीराम सर्वांसीं व्यापक ॥ २८० ॥
श्रीराम बुद्धीसी बोधविता । श्रीराम चित्तासी चेतविता ।
अंतःकरणीं सर्व सत्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥ ८१ ॥
श्रीरामें सबळ अहंकार । श्रीरामें मनाचा व्यापार ।
श्रीराम प्राणांसीं परिचार । श्रीराम साचार सर्वगत ॥ ८२ ॥
श्रीरामें नयनांसी द्रष्टेपण । श्रीरामें श्रवणांसी होय श्रवण ।
श्रीरामें सुवास घेणे घ्राण । श्रीरामेंविण तें व्यर्थ ॥ ८३ ॥
श्रीरामें गोडी जाणे रसना । श्रीरामें प्राणी मीतूंपणा ।
जाणे जाणा तत्वतां ॥ ८४ ॥
श्रीराम शरीर उठवी बैसवी । श्रीराम शरीर निजवी फिरवी ।
हें जाणते स्वानुभवी । येरां पदवी अतर्क्य ॥ ८५ ॥
श्रीराम प्राणांचाही प्राण । श्रीराम जीवाचें जीवन ।
श्रीराम मनाचें उन्मत । चैतन्यघन श्रीराम ॥ ८६ ॥
ऐसा श्रीराम तो सर्वगत । भोगीत राहें तूं निवांत ।
सद्‍गुरुमुखें करोनि प्राप्त । आन किमर्थ वांछिसी ॥ ८७ ॥
म्हणसी सद्‍गुरुसी पुसों जातां । हातीचा जासील तूं आतां ।
तरी एतद्विषयीं ऐक कथा । तुज सर्वथा सांगेन ॥ ८८ ॥
सकळ सृष्टीचा मी कर्ता । ईक्षणमात्रें सृष्टीचा हर्ता ।
सर्वांमाजी आत्मसत्ता । तों मी तत्वतां उपदेशीं ॥ ८९ ॥
ब्रह्मा माझा नित्यांकित । शंकर माझे ध्यान करित ।
विष्णु तो मी मूर्तिमंत । उपदेशित तुजलागीं ॥ २९० ॥
म्यां बोलविल्या वेद बोले । म्यां चालविल्या सूर्य चाले ।
म्या हालविल्या देह हाले । तो मी बोलें तूजसीं ॥ ९१ ॥
ईश्वराचा मी ईश्वरु । गुरुचाही आदिगुरु । मजहूनि
परता सद्‍गुरु । कोण सधरु असेल ॥ ९२ ॥
यथा देव तथा गुरु । या श्रुतिवाक्याचा निर्धारु ।
तो मी स्वमुखें सद्‍गुरु । करीं सधरु उपदेश ॥ ९३ ॥
तुझ्या देहाचा चाळक । तो मी आत्माराम देख ।
त्यासीं भोगितां हें चोख । आवश्यक अंतरीं ॥ ९४ ॥
तया भोगाचें लक्षण । तेंही ऐक सावधान ।
सर्वसाक्षी चैतन्यघन । तो मी पूर्ण हा ध्यास ॥ ९५ ॥
तया ध्यासाच्या परिपाठीं । दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी ।
समूळ मावळली हे गोष्टी । पाठीपोटीं श्रीराम ॥ ९६ ॥
द्वैताचा ठाव नाहीं जेथें । भोक्ता कैंचा तेथें ।
मज भोगिजे श्रीरघुनाथें । हें कोणातें नाठवे ॥ ९७ ॥
असो ऐसिया निजात्मध्यासें । सांडी दुजेपणाचें पिसें ।
हेंचि भोगीं निजमानसें । तुज म्या जैसें सांगितलें ॥ ९८ ॥
तथापि आवडीच्या भरें । श्रीराम भोगावा शरीरें ।
म्हणसी तरी या अवतारें । हे निर्धारे घडेना ॥ ९९ ॥

पुढील अवतारी चंद्रसेनेला कामनापूर्तींचे रामाचे आश्वासन :

तथापि भक्तभावासाठीं । मज अवतरणें शुष्ककाष्ठीं ।
तुझिये प्रीतीस्तव गोरटी । करीन गोष्टी ते ऐक ॥ ३०० ॥
यादवकुळीं द्वापारांत । कृष्णरुपें श्रीरघुनाथ ।
तुजला वरील निश्चितार्थ । वचन सत्य हें जाण ॥ १ ॥
तेथें राजा सत्राजित । त्याचे उदरीं तूं जनित ।
सत्यभामा होसी सत्य । तुज मी तेथ वरीन ॥ २ ॥
अतिशयेंसीं भावार्थ । असे तुजपासीं नांदत ।
तुझा होईन मी अंकित । माझे भक्त मज प्रिय ॥ ३ ॥
भक्त जैसा मज नाचवित । तैसा तैसा मी नाचत ।
आतां राहें तूं निवांत । मज भोगित अंतरीं ॥ ४ ॥
मातें गावें मजला ध्यावें । मातें पहावें मज स्मरावें ।
मद्रूप होवोनियां रहावें । ऐसेनि हरावें काळातें ॥ ५ ॥
ऐसें बोलतां श्रीरघुनंदना । तन्मय झाळी चंद्रसेना ।
विसरली मी तूंपणा । श्रीरामवचना अनुसरली ॥ ६ ॥
बरवें म्हणोनि श्रीरामासी । नमस्कारिलें साष्टांगेंसीं ।
म्हणे उद्धरिलें दीनासी । धन्य होसी श्रीरामा ॥ ७ ॥
माझा सदगुरु वायुकुमर । तेणें भेटविला श्रीरघुवीर ।
त्याचा न वर्णवे उपकार । दासी किंकर मी त्याची ॥ ८ ॥
परम कृपाळु दशानन । वैकुंठासी करितां गमन ।
आमुचें त्यासी झालें स्मरण । श्रीरघुनंदन पाठविला ॥ ९ ॥
आपण गेलिया मोक्षासी । कोण उद्धरील त्यांसी ।
श्रीराम न येचि पाताळासी । म्हणोनि यासी धाडिलें ॥ ३१० ॥
येथें धाडोनि श्रीरघुनंदन । सकुळ तारिला अहिरावण ।
धन्य धन्य दशानन् । वाटे पूर्ण कृपाळु ॥ ११ ॥
धन्य धन्य तो राक्षसराज । धन्य धन्य तो पवनात्मज ।
धन्य श्रीराम विजयध्वज । जेणें मज उद्धरिलें ॥ १२ ॥
ऐसें करोनियां स्तवन । केलें श्रीरामासी नमन ।
घालोनियां पद्मासन । बैसली जाण ध्यानस्थ ॥ १३ ॥

मकरध्वजाला महिकावतीचे राज्यपद :

यानंतर श्रीरघुनाथ । मकरध्वज जो हनुमंतसुत ।
महिकावतिये अभिषेकित । राजा करित तयासी ॥ १४ ॥
आशीर्वाद वदे श्रीरघुनंदन । जोंवरी लंकेसी बिभीषण ।
तोंवरी राजसिंहासन । तुजलागोन पाताळीं ॥ १५ ॥

रामलक्ष्मणाचे हनुमंतासह वानरसैन्यांत पुनरागमन :

ऐसें देवोनि आशीर्वचन । श्रीराम हनुमंत लक्ष्मण ।
वेगें निघाले तेथून । लंकाभुवन पावावया ॥ १६ ॥
मग हनुमंतें दोघे जण । स्कंधीं बैसविले आपण ।
वेगें करोनि उड्डाण । आला जाण बिलद्वारा ॥ १७ ॥
विवरीं अवघा अंधकार । श्रीराम स्वयें प्रकाशकर ।
दर्शनें केला विवरोद्धार । पंथ दुर्धर क्रमियेला ॥ १८ ॥
आलें एकाएकीं बाहेरी । वानरसैन्यामाझारीं ।
अग्निशशांकसूर्यापरी । वानरवीरीं देखिले ॥ १९ ॥
तिन अहोरात्रें श्रीराम । कोठें होता पूर्णकाम ।
आतां आला विश्रामधाम । आल्हाद पूर्ण वानरां ॥ ३२० ॥
कोणी नमिती श्रीरामासी । कोणी भेटती लक्ष्मणासी ।
कोणी वंदिती हनुमंतासी । हरिनामेंसीं गर्जती ॥ २१ ॥
आला आला दीनदयाळ । आला आला भक्तवत्सल ।
अला आला प्रणतपाळ । पूर्ण कृपाळ श्रीराम ॥ २२ ॥
आला आला सत्यप्रतिज्ञ । आला आला हो सर्वज्ञ ।
आला आला रघुनंदन । दीनोद्धारण श्रीराम ॥ २३ ॥
आला आला भक्तकैवारी । आला आला अहल्योद्धारी ।
आला आला पौलस्त्यारी । वानरभारीं आल्हाद ॥ २४ ॥
आला आला भक्तांतरंग । आला आला सीतारंग ।
आला आला विश्वतरंग । अंतरंग जो आत्मा ॥ २५ ॥
ऐसीया प्रेमाचिया पडिभारें । गर्जो लागलीं वानरे ।
देखोनि श्रीरघुवीरें । आत्यादरें आलिंगिलीं ॥ २६ ॥
मग सुग्रीव बिभीषण । करीं धरोनि श्रीरघुनंदन ।
शिबिरामाजी नेले जाण । सुखसंपन्न बैसले ॥ २७ ॥
पुढील कथेचें अनुसंधान । रावणहोमविध्वंसन ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ २८ ॥
श्रोते म्हणती नवलकथा । श्रीरामकाव्यामाजी नसतां ।
कोठोनि काढिली ही कथा । ऐकोनि वक्ता बोलत ॥ २९ ॥
शतकोटी श्रीरामचरित्र । वदलें वाल्मीकाचें वक्त्र ।
कोठें कैसें चित्रविचित्र । कोणें समग्र शोधिलें ॥ ३३० ॥
परी प्रस्तुत अग्निपुराण । श्रोतीं पहावें शोधून ।
सेतुबंधनमाहात्म्यीं जाण । हें आख्यान सविस्तर ॥ ३१ ॥
आळस सांडोनियां चित्तें । क्षणभरीं करोनि अवकाशातें ।
पहावें शोधून ग्रंथातें । आशंकेतें फेडावें ॥ ३२ ॥
एकनाथी रामायण । केले सप्तकांडकथन ।
त्यांत अहिरावणाख्यान । काय म्हणोन विसरलें ॥ ३३ ॥
ऐसें न वदावें उत्तर । ते तंव विष्णुचा अवतार ।
त्यांसी स्वप्नी नाहीं विसर । महाचतुर ग्रथकर्ते ॥ ३४ ॥
परंतु झाले बहुत दिवस । मुखीं पाळितां ग्रथास ।
गाहाळिलें ह्या अध्यायास । तिहीं तयास काय कीजे ॥ ३५ ॥
मग साक्षेपें जयरामसुतें । करोनि घातलें अध्यायातें ।
हृदयीं रिघोनि एकनाथें । हें मजहातें करविलें ॥ ३६ ॥
माझें नव्हे हें ज्ञान । कांही नेणें मी व्याख्यान ।
माझे हृदयीं प्रवेशून । केले कथन श्रीरामें ॥ ३७ ॥
श्रीराम नयनांचाही नयन । श्रीराम श्रवणांचाही श्रवण ।
श्रीराम मनाचें आदिमन । तेणें लेखन हें केलें ॥ ३८ ॥
श्रीराम सर्वां बुद्धिदाता । सर्वीं सर्वत्र त्याची सत्ता ।
हेंही करणें श्रीरघुनाथा । काय आतां मी सागूं ॥ ३९ ॥
ऐसें श्रोत्यांसी प्रार्थून । जयरामात्मजें करोनि नमन ।
म्हणे पुढील अनुसंधान । सावधान परिसावें ॥ ३४० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अहिरावणवधश्रीरामगमनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५४ ॥
ओंव्या ॥ ३४० ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *