भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा
राक्षस – वानरांचे युद्ध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लगबगीने रावण सभेत येतो; त्याची बिकट अवस्था :
प्रबळ बळें रघुनंदन । आला ऐकोनि रावण ।
अतिशयें चितानिमग्न । म्लानवदन सभेसी ॥ १ ॥
तेन शंखविमिश्रेण भेरीशब्देन रावणः ।
मुहूर्तं ध्यानमास्थाय सचिवानभ्युदैक्षत ॥१॥
ततस्तु सुमहाप्राज्ञो माल्यवान्नाम राक्षसः ।
उवाच रावणं मंत्री कृतबुद्धिर्बहुश्रुतः ॥२॥
तन्मह्यं रोचते संधिः सह रामेण रावण ।
यदर्थमभियुक्तोसि सीता तस्मै प्रदीयताम् ॥३॥
तस्य देवर्षयः सर्वे गंधर्वाश्च जयैषिणः ।
विरोधं मा गमस्तेन रामेणाभिततेजसा ॥४॥
सभे संचित दशानन । तंव शंख भेरी ढोल निशाण ।
श्रीरामकटकीं त्राहाटिले पूर्ण । तेणें रावण गजबजिला ॥ २ ॥
ऐकोनि वाजंत्रांचा गजर । त्यामाजी वानरांचा भुभुःकार ।
तेणें दचकला दशशिर । मुहूर्तमात्र तटस्थ ॥ ३ ॥
कार्यकारणकर्तव्यता । काहीं नाठवे लंकानाथा ।
तेव्हा माल्यवंत जाला बोलता । निजहितार्था शिकवाया ॥ ४ ॥
माल्यवानाचे दुश्चिन्हकथन :
रावणाचा परम आप्त । वृद्ध राक्षस माल्यवंत ।
बहुश्रुतत्वें बुद्धिवंत । धर्मी धर्मवंत सुनीति ॥ ५ ॥
म्हणे ऐक लंकानाथ । दिवी भुवि अंतरिक्षांत ।
त्रिविध उत्पातीं लंकाव्याप्त । आला कुळघात राक्षसां ॥ ६ ॥
माध्यान्हीं उल्कापात । राजद्वारी भूस्फोट होत ।
दिवाभीते घराआंत । बळेंचि रिघत झडपोनी ॥ ७ ॥
रुधिरवृष्टी होत नागरीं । गोमायु गर्जती चौबारीं ।
भाणी झडपोनि नेती घारी । आली महामारी राक्षसां ॥ ८ ॥
त्याची गंभीर सूचना :
यालागीं ऐक लंकानाथा । सीता अर्पूनि रघुनाथा ।
रामरावणां अतिसख्यता । करीं सर्वथा क्षणार्धे ॥ ९ ॥
येथें कलहाचें कारण । मुख्यत्वे सीताचि जाण ।
ते केलिया रामार्पण । कृतकल्याण सर्वांसी ॥ १० ॥
श्रीरामाची निजकांता । रामार्पण करितां सीता ।
रावणा तुज कां व्यर्थ व्यथा । हेचिं कुळघाता निजमूळ ॥ ११ ॥
श्रीरामाचा प्रताप पूर्ण । समुद्रीं तारिले पाषाण ।
लंके आणिलें वानरसैन्य । त्यासमुख कोण राहूं शके ॥ १२ ॥
गजापुढें मशक जाण । सिंहापुढें भुंके श्वान ।
तेंवीं श्रीरामीं रावण । करितां रण निमेल ॥ १३ ॥
सूर्यासीं करावया रण । उठावले घृतकण ।
तैसा श्रीरामीं रावण । मरेल पूर्ण रणरंगीं ॥ १४ ॥
पतंग अग्नीसीं झगडा । करुं पाहे पंखझडाडा ।
तेंवीं रावण रामापुढां । मरेल रोकडा बाणें एकें ॥ १५ ॥
धरोनिया शहाणपणा । सुगुद्धि ऐकावी रावणा ।
सीता अर्पूनि रघुनंदना । कुशकल्याणा साधावें ॥ १६ ॥
तत्तु माल्यवतो वाक्यं हितमुक्तं दशाननः ।
न मर्षयति दुष्टात्मा कालस्य वशमागतः॥५॥
अमर्षात्परिवृत्ताक्षो माल्यवंतमथाब्रवीत् ।
मानुषं कृपणं राममेकं शाखामृगाश्रयम्॥६॥
समर्थं मन्यसे केन त्यक्तं पित्रा वनाश्रयम् ।
वीरद्वेषेण वा शंके पक्षपातेन वा रिपोः॥७॥
एवं बुवाणं संरब्धं क्रुद्धं विज्ञान रावणम् ।
व्रीडितो माल्यवांस्तूर्णं रस्माद्देशादपाक्रमत्॥८॥
रावणाने माल्यवानाचा केलेला धिक्कारः
क्षीर ज्वरिता कडू विख । तेंवी हितवाक्य दशमुख ।
माल्यवंताचें न मानूनी सुख । परम दुःख पावला ॥ १७ ॥
परम क्रोधें दशकंठ । वटारुनि नेत्रवाट ।
स्वमिनिंदक तूं अति दुष्ट । शठ नष्ट माल्यवंता ॥ १८ ॥
राम बापुडें मनुष्यमात्र । घेवोनि आलें वानरभार ।
त्यासीं वानिसी थोर थोर । मी राज्यधर मज निंदिसी ॥ १९ ॥
शत्रुपक्षाचा अभिमान् । वानिसी श्रीराममहिमान ।
निखंदिसी दशानन । कुळनिर्दळण श्रीरामें ॥ २० ॥
श्रीरामासीं करितां रण । रणीं राक्षसां निर्दळण ।
मुख्य मरेल रावण । ऐसें कठिण वदतोसी ॥ २१ ॥
तुवां भेडसाविल्या जाण । मज रामाचें भय कोण ।
रणीं मारीन राम-लक्ष्मण । वानरगणसमवेत ॥ २२ ॥
विरुधद अनुवादतां येथ । तुझा कराव् म्यां घात ।
अति वृद्ध परम आप्त । म्हणोनि हात राखिला ॥ २३ ॥
त्यामुळे माल्यवान निघून जातो :
कोपला दशवदन । माल्यवंत स्वयें सरकोन ।
सत्वर गेला पैं निघोन । मुख परतोन पाहेना ॥ २४ ॥
सीता अर्पावी रघुनाथा । ऐसें माल्यवंत सांगतां ।
रावण करुं पाहे घाता । तो अदृश्यता फडकला ॥ २५ ॥
माल्यवंत गेलिया जाण । प्रधाना सांगे रावण ।
दुर्ग सज्जून दारुण । वीरीं सावधान राहावें ॥ २६ ॥
लंकायास्तु तदा गुप्तिं कारयामास राक्षसः ।
प्रहस्तं व्यादिदेशाथ पूर्वद्वारे निषूदनम् ॥९॥
दक्षिणे तु महावीर्यौ महापार्श्वमहोदरौ ।
पश्चिमे तु तथा द्वारे पुत्रमिंद्रजितं तदा ॥१०॥
उत्तरे चापि स द्वारे व्यादिश्य शुकसारणौ ।
स्वयमत्र भविष्येहमिति तान्मंत्रिणोऽब्रवीत् ॥११॥
राक्षसं तु विरुपाक्षं महाबलपराक्रमम् ।
मध्ये संस्थापयामास बहुभिः सह राक्षसैः ॥१२॥
रावणाचें सैन्यनियोजन :
रावण करी दुर्गसंस्था । पूर्वद्वारीं ठेवी प्रहस्ता ।
दक्षिणद्वारीं होय ठेविता । महोदर तथा महापार्श्व ॥ २७ ॥
पश्चिमद्वारीचा निर्धार । इंद्रजित ठेविला ज्येष्ठ कुमर ।
कोट्यनुकोटी निशाचर । सहपरिवार सहसैन्य ॥ २८ ॥
उत्तरद्वारीं पैं जाण । तेथें ठेविले शुकसारण ।
सहपरिवारें रावण । ते द्वारीं आपण स्वयें राहे ॥ २९ ॥
उत्तरद्वारी श्रीरघुनाथ । निश्चयें येईल येथ ।
यालागीं तेथें लंकानाथ । स्वये राहत सावधान ॥ ३० ॥
अमित सैन्य देवोनि त्यासी । मध्यगुल्मीं ठेविलें विरुपाक्षासी ।
उणें देखावें ज्या द्वारासी । साह्य त्यासी तेणें जावें ॥ ३१ ॥
देखोनियां लंकाभुवन । दुर्ग घ्यावया वानरगण ।
रामापासीं अवघे जण । कर जोडून राहिले ॥ ३२ ॥
मिळोनियां वानरवीर । नमस्कारोनि रामचंद्र ।
आम्हांसी घ्यावया लंकापुर । आज्ञा सत्वर दे स्वामी ॥ ३३ ॥
आज्ञा पुसतां जुप्तत्ती । बिभीषण श्रीरामाप्रती ।
सांगें दुर्गाची पातळी । प्रथानाहस्तीं जे आणविली ॥ ३४ ॥
अथ तेषु ब्रुवाणेषु रावणावरजोऽब्रवीत् ।
अनलः पनसश्चैव संपतिः प्रमतिस्तथा ॥१३॥
गत्वा लंकाममात्या मे पुरीं पुनरिहागताः ।
भूत्वा शकुनयाः सर्वे प्रविष्टाश्च रिपोर्बलम् ॥१४॥
संविधानं यदाहस्ते रावणस्य दुरात्मनः ।
राम ते ब्रुवतः सर्वं यथातथ्येन मे शृणु ॥१५॥
बिभीषण दुर्गरक्षणाची केलेली योजना सांगतो :
लंका घ्यावया हातोहातीं । गर्जत उठतां वानरपंक्ती ।
बिभीषणें थांबवोनि जुत्पत्ती । दुर्गपाळती स्वयें सांगे ॥ ३५ ॥
करुं जातां रणकंदन । रणीं पडे पारखें सैन्य ।
ऐसें दूर्गाचें विंदान । बिभीषण स्वयें सांगे ॥ ३६ ॥
यंत्रें शतघ्नी गुप्तगोळ । दारुयंत्रें पाषाण प्रबळ ।
निर्दळावया पारीखें दळ । दुर्ग प्रगळ सज्जिले ॥ ३७ ॥
माझे चौघेही प्रधान । धांडोळोनि लंकाभुवन ।
दुर्गाचें मारक विंदान । पाळती पूर्ण घेवोनि आले ॥ ३८ ॥
तुझ्या चौघां प्रधानांसी । ओळखी सर्वत्र सर्वांसीं ।
पाळती आणिली कैसी । बिभीषणासी पुसे राम ॥ ३९ ॥
माझे चौघे प्रधान । ऐक त्यांचे नामभिधान ।
अनळ हर प्रघस संपाती जाण । अति विचक्षण कामरुपी ॥ ४० ॥
पक्षिवेषाचे अनुवृत्ती । रिघोनिया लंकेप्रती ।
तिहीं दुर्गाची पाळती । यथार्थगतीं आणिली ॥ ४१ ॥
पूर्वे प्रहस्त अति प्रसिद्ध । दक्षिणे महोदर माहापार्श्वद ।
पश्चिमे इंद्रजित अगाध । सन्नद्ध बद्ध सैन्येंसीं ॥ ४२ ॥
उत्तद्वारीं शुकसारण । ठेविले नाममात्र जाण ।
सकळ सैन्येंसी आपण । राहे रावन ते द्वारीं ॥ ४३ ॥
सैन्यसमुदाय मध्यगुल्मासीं । अग्रगणी केलें विरुपाक्षासी ।
मोड जाल्या ज्या द्वारासीं । साह्य त्यासीं तेणें जावें ॥ ४४ ॥
मारावया वानरपंक्ती । हडोहडीं गुप्तगतीं ।
यंत्रे जोडिलीं नेणो किती । क्रोधानुवृत्ती रावणें ॥ ४५ ॥
दुर्गासीं झोंबता वानरें । मारावया गुप्तमारें ।
चर्याचर्या सज्जिले यंत्रें । दशशिरें रणमारा ॥ ४६ ॥
दुर्ग सज्जिले दारुण । दुर्गी झोंगतां वानरगण ।
यंत्रमारें मरती पूर्ण । ऐसें आपण न करावें ॥ ४७ ॥
यंत्रोयंत्रीं दीर्घ ध्वजा । श्वेत पीत आरक्त विरजा ।
दुर्गवेष्टणीं समसमजा । उभविल्या बोजा शोभती ॥ ४८ ॥
हलमुखे दीर्घ हडे । विचित्र निर्वाळिले कडे ।
पताका सज्जिल्या चहूंकडे । राक्षस गाढे राखिती ॥ ४९ ॥
ती योजना ऐकून वानरांवर काहीच परिणाम होत नाही.
वानरांनी आकाशातून हल्ला केल्यामुळे राक्षसांचा एकच गोंधळ उडतो :
ऐकोनि बिभीषणाची युक्ती । वानर गदगदां हांसती ।
आमच्या उड्डाणव्युपत्ती । दुर्ग किती यंत्रेंसीं ॥ ५० ॥
लंकेचिया शिखरावरी । उड्डाण किजे वानरीं ।
तेथें दुर्गाच्या यंत्रमारीं । कवणावरी पडावें ॥ ५१ ॥
ऐकोनि वानरांची मात । बिभीषण अति विस्मित ।
श्रीराम स्वानंदें हासत । अति पुरुषार्थ वानरां ॥ ५२ ॥
दुर्गातळीं जे राहती । यंत्रमारें ते मरती ।
वानरां दुर्गावरी गती । यंत्रें जाती सुनाट ॥ ५३ ॥
ऐशी बिभीषणाची पाळती । ऐकोनि दुर्गाची संस्थिती ।
श्रीराम सांगे सुग्रीवाप्रती । द्वारानुवृत्ती निरोधा ॥ ५४ ॥
दुर्गामाजि तडा पडे । तैसीं धरावीं पाणियाडें ।
दुर्ग वेढावें चहुंकडे । मागेपुढें ढळों नेदीं ॥ ५५ ॥
भितरिल्या बाहेर नव्हे गती । बाहेरील भीतरी जावो न शकती ।
कपीनामुग्रवीर्याणां सहस्त्रैर्बर्वहुभिर्वृतः ।
नीलः प्रहस्तं प्लवगो राक्षसं प्रति धावताम्॥१६॥
अंगदो वालिनः पुत्रो बलेन महता वृतः ।
दक्षिणे धावतां द्वारे महापार्श्वमहोदरौ ॥१७॥
हनूमान्पश्चिमं द्वारं निष्पीड्य पवनात्मजः ।
प्रविशत्वप्रमेयात्मा कपिभिर्बहुभिर्वृतः ॥१८॥
परिक्रामति यत्सर्वाल्लोकान्संतापयन्प्रजाः ।
तस्याहं राक्षसेंद्रस्य रावणस्य वधे ध्रृतः ॥१९॥
उत्तरं नगरद्वारमहं सौमित्रिणा सह ।
निपीड्याभिप्रवेक्ष्यामि सबलो यत्र रावणः ॥२०॥
वानरेंद्रश्च बलवान्ऋक्षराजश्च वीर्यवान् ।
राक्षसेंद्रानुजश्चैव गुल्मे भवतु मध्यमे ॥२१॥
प्रहस्त पूर्वद्वारनुवृत्ती । त्यासीं भिडावया नीळ दळपती ।
सवें वानर भद्रजाती । दुर्गगती निरोधा ॥ ५७ ॥
दक्षिनद्वारीं महावईर । महापार्श्वद महोदर ।
त्यांवरी अंगद वाळिकुमर । द्वारनिर्धार रणकंदना ॥ ५८ ॥
पश्चिमद्वारी इंद्रजित । त्याचा करावया घात ।
बळिया ठेविला हनुमंत । रणकंदनार्थ राक्षसां ॥ ५९ ॥
मुख्यत्वें कपटी पूर्ण । उत्तरद्वारी असे रावण ।
त्याचें करावया कुळनिर्दळण । रामलक्ष्मण आम्ही दोघे ॥ ६० ॥
राजा सुग्रीव जांबवंत । बिभीषण शरणागत ।
यांही रागावें मध्यगुल्मांत । सैन्य समस्त लक्षूनी ॥ ६१ ॥
कोणे द्वारीं कैंसें रण । वीरां वानरां युद्धकंदन ।
भंगलिया बळासी जाण । साह्य संपूर्ण इहीं व्हावें ॥ ६२ ॥
ऐसा मध्यगुल्मवृत्तांत । दुर्ग रोधूं सांगे रघुनाथ ।
ते वानरीं ऐकोनि मात । लंकाग्रहणार्थ मांडिला ॥ ६३ ॥
ज्यांच्या वांट्या जें द्वार । ते ते द्वारीं वानरवीर ।
करिते झाले चरित्र । अति विचित्र अवधारा ॥ ६४ ॥
दुर्गतळीं राहतां वीर । होईल यंत्रांचा महामार ।
हें जाणोनियां वानर । करिती दुर्धर तें ऐका ॥ ६५ ॥
लंकेहूनि उंच पर्वत । आणोनियां योजनांत ।
वानर निजद्वारीं स्थपित । राक्षसांत करावया ॥ ६६ ॥
पर्वतीं वेंधले वानर बळी । लंकादुर्ग राहिलें तळीं ।
राक्षसदुर्गाचिये पौळी । घायातळीं आतुडले ॥ ६७ ॥
त्यासीं हाणितां शिळाशिखर । घायीं अष्टांगें होती चूर ।
वानरीं करितां महामार । दुर्गधर पळाले ॥ ६८ ॥
वीर धीर सपुरते । हुडोहुडां नित्य जागते ।
वानर देखोनि आपणावरते । तेही निश्चितीं गजबजिले ॥ ६९ ॥
आम्ही तळीं ते दुर्गावरी । येथें झाली विपरीत परी ।
वानरीं आणोनि महागिरी । आम्हांहीवरी वळंघले ॥ ७० ॥
हुडोहुडां वीर अमित । वानर करिती पर्वतघात ।
शतसहस्र चूर्ण करित । हुडे खचत आघातें ॥ ७१ ॥
पारख्या करितां महामारी । दुर्गी जोडल्या यंत्रहारी ।
त्याही उचलोनि वानरीं । नेवोनि सागरीं घातल्या ॥ ७२ ॥
दुर्गासभोंवते याचिपरी । हुडोहुडां पै वानरीं ।
राखणाइतां महामारी । अपांपरी राक्षसां ॥ ७३ ॥
एकें निमालीं प्राणांत । एकें निमालीं प्राणांत ।
एकें घायवट हुंबत । उरलीं जीव घेवोनि पळत । दुर्गनिर्मुक्त कपिभयें ॥ ७४ ॥
दुर्गाचिया पौळोपौलीं । राक्षसां करोनि रवंदळी ।
वानरवीरीं आतुर्बळीं । नगरधांडोळी मांडिली ॥ ७५ ॥
एकाचे मुकुट आसुंडती । एकाचीं शस्त्रें हिसकिती ।
वीर हाणितां आघातीं । उडोनि जाती आकाशीं ॥ ७६ ॥
न घेतां रत्नें मुक्ताफळें । हाटवाटींचीं विकतीं फळें ।
आणोनिया निजबळें । सुखसमेळें भक्षिती ॥ ७७ ॥
आणोनि गुळचिया भेंडा । वानर खाती मतमटां ।
दुकानींचा काढोनियां सांटा । मधु घटघटां सेविती ॥ ७८ ॥
आणोनियां फुटाण्यांची पाटी । वानर खाती लाळघोटी ।
चारें बोरें लुटिती हाटीं । नाचती चौहाटीं लंकेच्या ॥ ७९ ॥
देखोनि वानरांची धाडी । निशाचरीं दिधली उडी ।
घरोघरीं कडाफोडी । केलीं बापुडीं राक्षसें ॥ ८० ॥
श्रीराम म्हणे सुवेळागिरी । वळंघोनियां तयावरी ।
युद्ध होत लंकागिरीं । विरीं वानरीं तें पाहों ॥ ८१ ॥
स तु कृत्वा सुवेलस्य मतिमरोहणं प्रति ।
लक्ष्मणानुमतो रामः सुग्रीवमिदमब्रवीत् ॥२२॥
बिभीषणं च धर्मज्ञमनुरक्तं निशाचरम् ।
लंकामालोकयिष्यामो निलयं तस्य रक्षसः॥२३॥
रामः सुवेलमारोहद्वासार्थं चित्रकाननम् ।
अध्यारोहंत शतशः सुवेलं यत्र राघवः॥२४॥
शासनादथ रामस्य सुग्रीवस्य बिभीषणः ।
द्वारे द्वारे प्लवंगानां कोटिं कोटिं न्यवेशयत्॥२५॥
नंतर सुवेळागिरीवर आक्रमण :
राम जावया सुवेळेप्रती । लक्ष्मणाच्या विचारवृत्तीं ।
आणी सांगोनियां सुग्रीव कपीप्रती । बिभीषणानुमतीं निघे राम ॥ ८२ ॥
आतां येथून अहर्निशीं । नित्यवस्ती सुवेळेसीं ।
ऐसें सांगोनि सर्वांसी । निघे वेगेंसीं श्रीराम ॥ ८३ ॥
ऐसी ऐकतांचि गोष्टी । वानरवीर कोट्यानुकोटी ।
धावोनियां सुवेळापृष्ठीं । शिळा समपृष्ठीं आंथुरिती ॥ ८४ ॥
लंकेआंतील वृत्तांत । सुवेळेहुनि असे दिसत ।
याचि अनुलक्षीं रघुनाथ ।सुवेळाआंत राहिला ॥ ८५ ॥
लावोनियां निशाण भेरी । श्रीराम चढे सुवेळागिरी ।
परिवारिला वानर भारीं । निजगजरीं पैं आला ॥ ८६ ॥
राक्षस तळात असताना वानरांचे लंकेवर व दुर्गावर आकाशातून आक्रमण :
लंका देखोनि रघुपती । स्वयें सांगे वानराप्रती ।
दुर्ग घ्यावें हातोहातीं । लंकापती गांजोनी ॥ ८७ ॥
राक्षसीं भय घेतलें भारी । कोणी नये लंकेबाहेरी ।
आपण रिघोनिया भीतरीं । सहपरिवारीं दुर्ग घ्यावें ॥ ८८ ॥
ऐकोनि श्रीरामाची मात । सुग्रीव वानरां सांगत ।
करोनि राक्षसांचा घात । दुर्गाआंत रिघावें ॥ ८९ ॥
बिभीषण सांगे रामाजवळी । जे जे आले लंकेच्या मूळीं ।
त्या त्या सैन्या हाती रांगोळी । यंत्रानुमेळीं महामारें ॥ ९० ॥
लंकेसीं वारा वाजतां भीत । पक्षी भोंवों न शकती तेथ ।
रावणें राखिली अति गुप्त । जालें विपरीत ते ठायीं ॥ ९१ ॥
लंकेहूनि उंच योजनांत । वानरीं आणिले पर्वत ।
वीर वळंघोनि तेथ रणकंदनार्थ राक्षसां ॥ ९२ ॥
श्रीरामप्रतापनव्हाळी । लंकादुर्ग राहिलें तळीं ।
पर्वतावरुनि वानर बळी । करिती रांगोळी राक्षसां ॥ ९३ ॥
लाहोनि श्रीराम सामर्थ्य । वानरीं केला विपरीतार्थ ।
जोडोनियां पर्वता पर्वत । लंका समस्त रोधिली ॥ ९४ ॥
पाडोनि दुर्गाच्या पौळी । यंत्रें उचटून संमूळीं ।
सागर भरिला यंत्रगोळी । आतुर्बळी वानर ॥ ९५ ॥
वानरांच्या भयेंकारीं । हाट चौहाटा लंकापुरीं ।
कोणी वागेना बाहेरी । अपांपरी राक्षसां ॥ ९६ ॥
ऐसे बोलोन बिभीषण । वानरां सांगे आपण ।
आतां घ्यावें लंकाभुवन । रणभुवन । रणकंदन करीतही ॥ ९७ ॥
श्रीरामा असतां पाठिराखा । कायसा पाड दशमुखा ।
कांहीं न धरोनि शंका । अवश्य लंका तुम्ही घ्यावी ॥ ९८ ॥
ऐसें एकतां उत्तर । वानरीं केला जयजयकार ।
देवोनि रामनामें भुभुःकार । लंकापुर ठाकिलें ॥ ९९ ॥
लंकेला वेढा व आत प्रवेश :
श्रीरामाज्ञेची थोरी । लंका वेढिली वानरीं ।
गुळीं जैशा मुंग्यांच्या हारी । तैशापरी झोंबती ॥ १०० ॥
न लगे अर्गळा काढणें । न लगे शृखला तोडणें ।
न लगे कपाटें उघडणें । वानर किराणें गड घेती ॥ १ ॥
राक्षसी हाणावें हातियेरीं । वानर उंच पर्वताग्रीं ।
मारावें जों यंत्रमारी । वानरी यंत्रें बुडविलीं ॥ २ ॥
लंकेभोंवतीं दुसरी । पर्वतलंका केली वानरीं ।
त्यावरी वळंघोनि महावीरीं । दुर्गाभीतरीं प्रवेश ॥ ३ ॥
वानरवीर जगजेठी । असंख्य निगाले लंकात्रिकुटीं ।
मारितां राक्षसांच्या कोटी । सुग्रीवें पाठी राखिली ॥ ४ ॥
करितां राक्षसां महामारी । वानर ढेंसले लंकेभीतरीं ।
बोंब सुटली घरोघरी । अपांपरी राक्षसां ॥ ५ ॥
ततः सहस्त्रय्थाश्च कोटियूयाश्च यूथपाः ।
कोटियूथशताश्चान्ये लंकामारुरुहुस्तदा ॥२६॥
जयत्युरुबलो रामो लक्ष्मणश्च महाबलः ।
राजा जयति सुग्रीवः श्रीरात्रेणानुपालितः॥२७॥
परिखां पूरयंतश्च गंभीरविमलोदकाम् ।
पांसुभिस्तृणकाष्ठैश्च पर्वतागैश्च वानराः॥२८॥
इति ते घोषयंतश्च गर्जतश्च प्लवंगमाः ।
अभ्यधावंत लंकायाः प्राकारं कामरुपिणः॥२९॥
श्रीरामाज्ञासन्निष्ठी । वानर लक्षानुलक्षकोटी ।
वृंदानुवृंद जगजेठी । लंकापीठीं प्रवेशले ॥ ६ ॥
यृथपावरी यूथप । वानर आले सप्रताप ।
विध्वंसावया मठ मंडप । अति साटोप चालिलें ॥ ७ ॥
फाडिती पताका तोडिती तोरणें । पाडिती मंदिरें सप्तखणें ।
राजमंदिरें शोभायमानें । करिती कंदनें वानरें ॥ ८ ॥
खंदक बुजिती आतुर्बळी । खंदकामाजी घालिती धुळी ।
पर्वतशिखरें काष्ठें शिळीं । परिघ समूळीं बूजिला ॥ ९ ॥
करिती राक्षसांची होळी । पाडिती दुर्गाचिया पौळी ।
वानर येवोनि आतुर्बळी । पिटिटी टाळी जयाची ॥ ११० ॥
आम्ही श्रीरामाचे दूत । प्रवेशलों लंकेआंत ।
श्रीराम जाला यशवंत । हर्षे गर्जत वानर ॥ ११॥
श्रीराम नित्य विजयान्वित । लक्ष्मण सदा यशवंत ।
श्रीरामें सुग्रीवा राज्य प्राप्त । तोही निश्चित निजविजयी ॥ १२ ॥
जयजयकाराचा गजर । रामनामें गर्जती वानर ।
लंका घेतली सत्वर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥ १३ ॥
लंकाराज्य समस्त । बिभीषणासी जालें प्राप्त ।
ऐसें वानर गर्जत । हर्षयुक्त स्वानंदें ॥ १४ ॥
यापरी स्वयें लंकेआंत । वानर गर्जत नर्तत ।
राक्षस त्रासले समस्त । सांगती आकांत लंकेशा ॥ १५ ॥
ततस्ते राक्षसास्तत्र गत्वा रावणमंदिरम् ।
न्यवेदयत्पुरी रुद्धा रामेण सह वानरैः॥३०॥
रुद्धां तु नगरीं श्रुत्वा जातकोपो दशाननः ।
विधानं द्विगुणं कृत्वा प्रासादं चाप्यरुरुहत्॥३१॥
स ददर्शावृतां लंकां सशैलवनकाननाम ।
असंख्यातैर्हरिगणैः सर्वतो योद्धुमाहवे ॥३२॥
सदृष्ट्वा वानरैः सर्वैंः काननं कपिलं कृतम् ।
कथं क्षपयितव्याः स्युरिति चिंतापरोऽभवत्॥३३॥
वानरीं त्राशिले निशाचर । रावणा सांगती सत्वर ।
पर्वतशिळाशिखरांचा मार । करीत वानर पैं आलें ॥ १६ ॥
दुर्गाहूनि योजनांत । लंकेसभोवतें पर्वत ।
वानर वळंघोनि तेथ । केला निर्घात राक्षसां ॥ १७ ॥
वानर पर्वताग्रीं महाबली । लंकादुर्ग राहिलें तळीं ।
वर्षोनि पर्वतशिखरशिळीं । केली रांगोळीं राक्षसां ॥ १८ ॥
कपींसी न चाले हतियेर । उंच पर्वताग्रीं वानर ।
त्यांसी न चले यंत्रमार । निशाचर चडफडती ॥ १९ ॥
वानरां न लगे दुर्ग पाडणें । न लगतीं कपाटें उघडणें ।
त्रिकूट घेतलें जी निजकिराणें । अति सत्राणें उडोनी ॥ १२० ॥
उड्डाणबळें जगजेठी । वानरांच्या कोट्यनुकोटी ।
पैल पाहे लंकापीठीं । वीर त्रिकुटी दाटले ॥ २१ ॥
वानरांचे माराभेण । राक्षस जाले पलायमान ।
राक्षस पळती जीव घेऊन । दुर्गरक्षण असेना ॥ २२ ॥
यापरी गा लंका एथ । वानरीं करोनि निर्मुक्त ।
प्रवेशले रामदूत । कपि गर्जत रामनामें ॥ २३ ॥
वृथा वानिती प्रौढी । आम्ही मारुं वानरकोडी ।
आल्या वानरांच्या धाडी । देवोनि दडी लपताती ॥ २४ ॥
सवेग येतां वानरधाडी । दुर्गींच्या फांजी पौळी पाडी ।
खंदक बुजिले निर्वडीं । कडाफोडी लंकेसीं ॥ २५ ॥
ऐकोनि राक्षसांची मात । गजबजिला लंकानाथ ।
वानर भरले लंकेआंत । पाहूं चढत अटाळीं ॥ २६ ॥
रावण चढोनि गोपुरीं । पाहे तंव वानरहारी ।
दाटले लंके आंतबाहेरी । वनोवनांतरीं कपिभार ॥ २७ ॥
वानरसैन्य असंख्यात । न समाये लंकेआंत ।
पौळीं वानर समस्त । वनीं वृक्षस्थ ढेंसले ॥ २८ ॥
वानरसभेच्या समेळीं । पिंवळ्या दिसती दुर्गपौळी ।
कपिप्रभा आणि प्रभावळी । दिसती पिंवळीं वृक्षवनें ॥ २९ ॥
लंकां सबाह्य संपुटीं । देखोनियां वानरथाटी ।
रावणा चळकांप उठी । कैशी निकटीं कपिधाडी ॥ १३० ॥
रावण देखोनि गोपुरीं । जो तो वानर उपराउपरी ।
युद्धालागीं स्वयें पाचारी । निघें बाहेरी नपुंसका ॥ ३१ ॥
एकीं देवोनी किराण । ढिलावूं पाहती रावण ।
तें देखोनि दशानन । अति उद्विग्न स्वयें जाला ॥ ३२ ॥
मज दशमुखासमोर । वनचरें पालेखाइर ।
युद्धां धांवती सत्वर । वानरवीर महाबळी ॥ ३३ ॥
वानर देखोनि दुर्धर । तळीं उतरला दशशिर ।
कपींसीं करावया रणमार । सैन्य सत्वर मोकली ॥ ३४ ॥
ततःकोपपरीतात्मा रावणो राक्षसाधिपः ।
निर्याणं सर्वसैन्यानां दुतमाज्ञापयत्तदा ॥३४॥
निष्पतंति तदा सेना हृष्टा रावणचोदिताः ।
एतस्मिन्नंतरे रौद्रः संग्रामः समपद्यत ॥३५॥
राक्षसानां वानराणां घोराणां कामरुपिणाम्ः ।
ते दगाभिः प्रवृत्ताभिः शूलशक्तिपरश्वधैः॥३६॥
निर्जघ्नर्वानरोन्घोरान्कंपयंतः स्वविक्रमान् ।
तदा वृक्षैमहाकायाः पर्वताग्रैश्च वानराः॥३७॥
निर्जघ्नुरथ रक्षांसि नखैर्दतैश्च वेगिताः ॥३८॥
त्यामुळे रावणाचा क्रोध, राक्षस वानरांचे युद्धः :
कपि प्रवेशले लंकेआंत । तेणें कोपला लंकानाथ ।
निजसैन्या स्वयें मोकलित । रणकंदनार्थ वानरा ॥ ३५ ॥
सैन्य पाठवीलें सत्वर । तेथें वानर निशाचर ।
युद्ध करिती घोरांदर । येरयेरां नोकूनी ॥ ३६ ॥
राक्षस आले करीत गजर । नामें वानरांचा भुभुःकार ।
घाय हाणिती निष्ठुर । येरयेरां उपमर्द ॥ ३७ ॥
राक्षसांचा शस्त्रसंपात । वानर तळपोनि चुकवित ।
कपींनी करितां पर्वतघात । रणीं हुंबत राक्षस ॥ ३८ ॥
वानर धरोनिया पुच्छीं । उपटितां अति आवेशीं ।
वानरें ओरबडोनि नेत्रांसी । आणिलें राक्षसांसी अंधत्व ॥ ३९ ॥
वामहस्तें नेत्र फोडी । दक्षिणहस्तें देवोनि थापडी ।
राक्षसांतें तळीं पाडी । नाक कान करांडी अतिरागें ॥ ४० ॥
वानर धरोनि चरणकमळीं । उपटूं जातां आतुर्बळीं ।
पुच्छें त्यांची निमटून नळीं । पाडिती भूतळीं राक्षसां ॥ ४१ ॥
राक्षसीं वानरां उठाउठीं । रणीं झाली लटापटी ।
झोंटी धरोनि पाडितीं सृष्टीं । हाणिती मुष्टी निष्ठुरा ॥ ४२ ॥
गदा मुदगल शूळ शक्ती । राक्षस निजबळें हाणिती ।
शालताल शिळापर्वतीं । वानर मारिती राक्षसां ॥ ४३ ॥
दंडीं मुंडपीं उरीं शिरीं । थडका हाणिती शिरोदरीं ।
पुच्छ आणोनी उरावरी । पाडिती हारी राक्षसांच्या ॥ ४४ ॥
शस्त्रास्त्रासीं घडघडाट । आले राक्षस रथथाट ।
तें देखोनियां मर्कट । रथानिकट स्वयें आलें ॥ ४५ ॥
शस्त्रें हाणितां राक्षसीं । वानर उसळले आकाशीं ।
वर्शोनियां पर्वतांसी । सहित रथेंसीं चकचूर ॥ ४६ ॥
वानर वेगीं निमेषार्धांत । मकरतोंडीं धरोनि रथ ।
बळें भूतळीं उपडित । केलें भस्मांत असंख्य ॥ ४७ ॥
राक्षसरथ कोट्य्नुकोंटी । वानरीं उपडितां सृष्टीं ।
रणीं एक बोंब उठी । लंकात्रिकूटीं आकांत ॥ ४८ ॥
वानरश्रेणी पडतां रणीं । श्रीरामाच्या नामस्मरणीं ।
व्यथा जावोनि तत्क्षणीं । उठतीं रणीं संग्रामा ॥ ४९ ॥
नाम स्मरतां प्रल्हादासीं । शस्त्रें न रुपती अंगासीं ।
श्रीराम असतां पाठीसीं । वानरांसी भय काय ॥ १५० ॥
आम्ही श्रीरामाचे दूत । वानर निजनामें गर्जत ।
गजवाजिरथांचा निःपात । असंख्यात राक्षसां ॥ ५१ ॥
स संप्रहारस्तुमुलो मांसशोणितकर्दमः ।
राक्षसानां वानराणां बभूवादभुतदर्शनः ॥३९॥
वनौकसां तत्र तु सन्निनादो ।
लंकागतानां च निशाचराणाम् ।
प्रक्ष्वेडितास्फोटितनर्दितानां ।
व्दाभ्यां महद्भ्यांमिव सागराभ्याम् ॥४०॥
वानर राक्षस रणांगणीं । भिडिन्नले आयणींपायणीं ।
मांसशोणितकर्दम धरणीं । पर्वतपाषाणीं विमर्द ॥ ५२ ॥
वानर पर्षती पर्वत । निवारण न चलेची तेथ ।
अनिवार पर्वतघात । तेणें प्राणांत राक्षसां ॥ ५३ ॥
आड धरितां वोढण । वोढणेंसीं वीरां मरण ।
पर्वतघातें शतचूर्ण । अचुक मरण राक्षसां ॥ ५४ ॥
राक्षस दुर्गाचिया पौळीं । वानर पर्वताग्रीं आतुर्बळी ।
वर्षोनि वृक्षपर्वतशिळीं । केली रांगोळीं राक्षसां ॥ ५५ ॥
पर्वतीं न चले शस्त्रासंपात । पर्वतीं न चले बाणावर्त ।
राक्षस पावोनि आकांत । लंकेआंत पळाले ॥ ५६ ॥
दोनी समान सैन्यसागर । समान बळ समान शूर ।
युद्ध केलें घोरांदर । अति दुर्धर रणमर्द ॥ ५७ ॥
परस्परें गर्जत । परस्परें नर्तत ।
परस्परें नोकित । रणोन्मत्त भिडिंनले ॥ ५८ ॥
वानरांचा पर्वतघात । राक्षस त्रासले अद्भुत ।
तें पळाले लंके आंत । अति कुंथत घायाळ ॥ ५९ ॥
राक्षससैन्या बोहट तेथ । श्रीरामसैन्य विजयभरित ।
हें देखोनि श्रीरघुनाथ । सुग्रीवादि तोषले ॥ १६० ॥
एका जनार्दना शरण । लंकावेष्टन राक्षसकंदन ।
पुढें अंगदशिष्टाईकथन । सावधान अवधारा ॥ ६१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटिकायां
प्रथमयुद्धकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
ओव्या ॥ १६१ ॥ श्लोक ॥ ४० ॥ एवं ॥ २०१ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौथा