भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा
श्रीरामांना राज्याभिषेकाचा निर्णय –
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भरताची श्रीरामांना प्रार्थना :
भेटोनियां सकळांसी । भरत आला रामापासीं ।
करोनि साष्टांग नमनासी । लोटांगणेंसीं राम वंदिला ॥ १ ॥
बद्धांजलि विनयवृत्ती । भरत सत्यें सत्वमूर्तीं ।
विनविता झाला श्रीरघुपती । मधुरोक्तीं नम्रत्वे ॥ २ ॥
श्रीरामा तुजवीण । झालों होतों अति दीन ।
मृतप्राय कळाहीन । जीवनेंवीण जेंवी धान्य ॥ ३ ॥
भ्रतारेंवीण जेंवी कांता । उपहत२ जैसी सर्वथा ।
शुंगारभोग सकळ वृथा । तेंवी रघुनाथा तुजवीण ॥ ४ ॥
मातृहीन पै बाळक । मृतप्राय दिसे देख ।
नाहीं बाळसें कैंचें सुख । स्तनपान निःशेख असेना ॥ ५ ॥
तुजवांचोनियां रघुनंदन । तैसी आमची दशा पूर्ण ।
केवळ भूमिभार जाण । मागों मरण तरी न ये ॥ ६ ॥
जितां जीववेना रामेंवीण । काळावांचोनि न ये मरण ।
सर्वांगी तळमळ पूर्ण । जेवितां अन्न रुचेना ॥ ७ ॥
केवळ माझीच नव्हे अवस्था । आदिकरोनि तुझ्या माता ।
अयोध्येच्या जनां समस्तां । दुखावस्था अनिवार ॥ ८ ॥
त्या दुःखाचा परिहार । आजि झाला समग्र ।
देखोनियां रघुवीर । आनंदपूर लोटला ॥ ९ ॥
अद्य मे सफलं जन्म सफलश्च मनोरथः ।
यत्वां पश्यामि राजानमयोध्यां पुनरागतमू ॥ १ ॥
भरताने जन्म सफल झाल्याचे रामांना सांगितले :
श्रीरामदर्शनेंकरून । वियोगदुःख गेलें पूर्ण ।
प्रेमाश्रुपूर्ण झाले नयन । बाष्पेंकरून दाटला कंठ ॥ १० ॥
त्यातें आवरोनि तत्वतां । जिरवोनियां सत्वावस्था ।
चरणीं ठेवोनियां माथा । श्रीरघुनाथा विनवित ॥ ११ ॥
अमितां जन्यांचे दुःख । जननीजठरीं येवोनि देख ।
निमोनि गेलें सकळिक । रघुकुळटिळक देखिलिया ॥ १२ ॥
सकळ जन्मांची सार्थकता । आजि झाली गा तत्वतां ।
तुज देखोनियां रघुनाथा । उत्तीर्णता जन्माची ॥ १३ ॥
श्रीरामाचें विस्मरण । तेथें प्रतिपदीं मरण ।
तो देखतां रघुनंदन । सर्वथा मरण निमालें ॥ १४ ॥
मृत्यूचा मृत्यू रघुनंदन । त्यासी देखतां निमालें मरण ।
येणें जन्में जन्मनिवारण । निजात्मा रघुनंदन देखिला ॥ १५ ॥
रामदर्शनें जन्म सफळ । राम दर्शनें सफळ कुळ ।
रामदर्शनें पावन सकळ । व्रत सुशीळ श्रीरामें ॥ १६ ॥
श्रीरामेंसीं नव्हे भेटी । तंवचि व्रताची आटाआटी ।
तंवचि पुरश्चरणें कोटी । श्रीराम दृष्टी जंव न पडे ॥ १७ ॥
विसरोनियां रघुराया । जे जे केली तपश्चर्या ।
साधनाभिमानें गिळिले माया । श्रमचि वायां वाढविला । 1 १८ ॥
स्मरणभक्तीचे सामर्थ्य :
अनिमिष जें रामस्मरण । तें उग्र तप दारुण ।
स्मरणापरतें निजसाधन । सर्वथा आन असेना ॥ १९ ॥
स्मरणाविरहित साधनभक्ती । ते जाणावी अवघी भ्रांती ।
नटाचेपरी वृथा नटती । जीविकावृत्तिसाधनें ॥ २० ॥
येथे वस्तूचें विस्मरण । त्यातें साधन मानी कोण ।
जपतपादि व्रत दान । स्मरणें जाण सार्थक ॥ २१ ॥
तीं आमुची सकळ व्रते । श्रीरामस्मरणें सनाथें ।
प्रसन्न होवोनि समस्तें । श्रीरामातें भेटविलें ॥ २२ ॥
निवटोनियां लंकानाथ । त्रैलोक्यविजयी रघुनाथ ।
आम्हीं देखिला अयोध्येआंत । व्रतें समस्त आजि फळली ॥ २३ ॥
स्मरण कीर्तन रघुनाथा । अनिमिष तुझें ध्यान करितां ।
जना अखंड सुखावस्था । तिन्ही अवस्था नासती ॥ २४ ॥
श्रीरामकीर्ति मकरंद । झेपावले कृष्णषट्पद ।
गुजारत अति साल्हाद । निजानंद सेविती ॥ २५ ॥
श्रीरामा तुझ्या कीर्तिपासीं । संत समर दूरवासी ।
तेहीं ऐकोनि वेगेंसीं । उडी आपैसीं घालिती ॥ २६ ॥
स्वर्गमृत्यूपाताळवासी । साधु जे कां अति तापसी ।
तेही सांडून तपश्चर्येसी । रामकीर्तीसी ठाकून आले ॥ २७ ॥
अवेक्ष्य तु भवान्कोशं गोष्ठागारं तु पुष्कलमू ।
भवतस्तेजसा सर्वं कृतं व द्विगुणं मया ॥ २ ॥
तथा ब्रुवाणं भरतं दृष्ट्वा तं भक्तिवत्सलमू ।
मुमुचुर्वाजरा नादंनागराश्च जनास्तदा ॥ ३ ॥
ततः प्रहष्टं भरतमंकमारोप्य राघव: ।
ययौ तेज विमानेन ससैन्यो भरताश्रमम् ॥ ४ ॥
भरताने केलेली श्रीरामस्तुती ऐकून वानरांचा आनंद :
श्रीरामकीर्ति अत्यद्भुत । साधुसंतसमवेत ।
अयोध्यानगरीं अत्यंत । अपरमित वस्ती झाली ॥ २८ ॥
पहावें स्वामी रघुपती । पहिली अयोध्या होती किती ।
आतां किती जाहली वस्ती । श्रीरामकीर्ती ख्याति केली ॥ २९ ॥
श्रीरामकीर्तीचे महिमान । ऐकोनियां भरतवचन ।
हरिखले वानरगण । भुभुःकारें पूर्ण गर्जिन्नले ॥ ३० ॥
भुभुःकार जयजयकार । माजि रामनामाचा उच्चार ।
किराणें देती अपार । श्रीरघुवीरजयजयकीर्ती ॥ ३१ ॥
तें देखोनि अलोलिक । अयोध्यावासी एकएक ।
नामें गर्जिन्नलें असंख्य । श्रीरघुकुळटिळक विस्मित ॥ ३२ ॥
देखोनि भरताच्या प्रेमासी । सुख उथळलें श्रीरामासीं ।
जेवीं चंद्रोदयीं आकाशीं । सागरासी ये भरतें ॥ ३३ ॥
सागर एकदेशी जण । तरिया दाटती तेणें भरतेन ।
श्रीराम स्वयें चैतन्यघन । ब्रह्मांड पूर्ण सुखें धालें ॥ ३४ ॥
श्रीराम स्वयें सुखैकघन । तथापि प्रेम अति गहन ।
हृदयीं धरोनि भरता जाण । श्रीरामें आपण आलिंगिला ॥ ३५ ॥
श्रीरामांनी भरत, वसिष्ठ व मातांना विमानात बसविले :
वसिष्ठादिक कषींसमवेत । विमानीं बैसोनि रघुनाथ ।
अंकी बैसविला भरत । प्रेम अद्भुत भक्तीचें ॥ ३६ ॥
वामांकीं जानकी सुंदरी । भरत विराजे दक्षिण अंकावरी ।
समस्त माता रधुवीरीं । विमानाभीतरीं बैसविल्या ॥ ३७ ॥
सेनापति आदिप्रधान । त्यातें आज्ञापीं रघुनंदन ।
निजवहनीं आरोहण । स्वयें आपण करावें ॥ ३८ ॥
ऐकोनि रामाचें वचन । अवघे झाले सुखैकघन ।
जयजयकारें गर्जोन पूर्ण । केलें आरोहण निजवहनीं ॥ ३९ ॥
गज रथ वाजी वहनें । आपुलालीं आरोहणें ।
सौमित्रासहित शत्रुघ्नें । विमानीं रघुनंदनें विराजिजे ॥ ४० ॥
मोक्षपुरी अयोध्येचे आध्यात्मिक रूपक :
सांडोनि देहत्रिकूट । चौथें पैणें घडघडाट ।
मोक्षपुरी अयोध्यापीठ । झाले प्रविष्ट पै तेथें ॥ ४१ ॥
श्रवण मनन निदिध्यासन । चौथा साक्षात्कार पूर्ण ।
हीचि चारी पेणी पूर्ण । ऐका विवंचन तयांचें ॥ ४२ ॥
पहिलें पेणें रामेश्वरी । दुसरें अग्रहार रामनगरीं ।
तिसरे भारद्वाजश्रमाभीतरीं । मो क्षपुरी पैं चौथी ॥ ४३ ॥
आत्माराम सवें असतां । श्रवण मनन कोण्या अर्था ।
ऐसा आशंकेचा ठाव आतां । परी सर्वथा न धरावा ॥ १४४ ॥
जीवा आत्मयासीं वेगळीक । कल्पांतीही नाहीं देख ।
निजभ्रमें भेद आवश्यक । एकाएक पैं भासे ॥ ४५ ॥
जेंवी विसरोनि जागृतीसी । स्वप्नभ्रमें कासाविसी ।
स्वयें होय अनायासीं । सावध त्यासी केलिया नव्हे ॥ ४६ ॥
तेंवी जीवा आत्मयाची एकात्मता । स्वतःसिद्ध स्वयें असतां ।
श्रवण मनन न करितां । भ्रम सर्वथा निरसेना ॥ ४७ ॥
चौथें पेणें रघुनंदन । स्वयं पावला निजभवन ।
बंधुबंधूं आलिंगन । जीवशिव पूर्ण जेवी भेटती ॥ ४८ ॥
भरताच्या आश्रमाला येताच रामांना परमानंद :
आपुलाले निजवहनीं । आरूढोनि तत्क्षणीं ।
रामनामाचे दीर्घध्वनीं । करित गर्जन चालिले ॥ ४९ ॥
आले भरतआश्रमासी । तेथें उतरिले विमानेंसी ।
आश्रम देखता राघवासी । प्रेम मानसीं न संडे ॥ ५० ॥
आश्रमाचे व भरताचे वर्णन :
देखे दर्भांची आसने । तृणशेजा शयनस्थानें ।
प्रावरणासी कृष्णाजिनें । आणि वल्कलें बहुवस ॥ ५१ ॥
फळमूळांचें संभार । देखे आश्रमीं अपार ।
उदंड मिनले ऋषीश्वर । त्यांसी फळाहार करावया ॥ ५२ ॥
भरतमुखें रामकथा । अत्यंत प्रेमें श्रवण करितां ।
धणीन पुरे ऋषी समस्तां । आश्रमी त्या अर्था मीनले ॥ ५३ ॥
देशोदेशींचे ऋषीजाण । निजाश्रम त्यगून पूर्ण ।
भरतापासीं आले ठाकून । करावया श्रवण रामकथा ॥ ५४ ॥
भरताश्रम रघुनाथा । स्वयें देखतांचि तत्वतां ।
अति उल्लास झाला चित्ता । प्रेमावस्था अनिवार ॥ ५५ ॥
वनवासी जी जी व्रतें । होतीं धरिलीं रघुनाथे ।
तीं तीं समस्तें भरतें । प्रेमें अद्भुतें अंगीकारिलीं ॥ ५६ ॥
माथां दृढ जटाभार । पादुकामंडित परिकर ।
खपाटीं लागलें उदर । वल्कलांबरपरिधान ॥ ५७ ॥
निजवृत्तिअलंकृत । श्रीरामें देखोनियां भरत ।
सुखझालें अत्यद्भुत । निजहृदयांत आलिंगी ॥५८ ॥
श्रीरामाचेनि आलिंगनें । सुख उथळलें चौगुणें ।
सर्वस्वें ओवाळिलें तेणें । निंबलोणें कुरवंडिया ॥ ५९ ॥
भरताश्रमा येवोनि निरुतें । सुखावले निजचित्तें ।
आज्ञापिलें श्रीरघुनाथे । सावधचित्तें परिसावें ॥ ६० ॥
अब्रवीच्च तदा रामस्तद्विमानमनुत्तममू ।
वह वैश्रवणं देवमजुजानामि गम्यतान् ॥५ ॥
आपले कामग विमान आपणास परत मिळावे अशी कुबेराची अपेक्षा :
निवटोनियां लंकनाथ । सुर सोडविले समस्त ।
निजवैभवा समवेत । झालें प्राप्त निजभवन ॥६१॥
कुबेराचें निजविमान । कामग अति शोभायमान ।
रावणें आणिलें हिरोन । दुखीनिमग्न तेणें तो ॥ ६२ ॥
निवटोनियां लंकेशासी । संस्थापिलें सकळासी ।
मुक्त केलें नवग्रहांसी । परी आपणासी उपेक्षिले ॥ ६३ ॥
माझें कामग विमान । मज देता रघुनंदन ।
तरी मी जाणतों संपूर्ण । कृपाळूपण रामाचें ॥ ६४ ॥
ज्याचा जेथें अतिशयो पूर्ण । तें त्यासी न पावतां जाण ।
स्वयें होवोनि दुःखनिमग्न । बोले पैशून्य सर्वदा ॥ ६५ ॥
लोभमहिमा :
जेथे दृढत्वें लोभाची वस्ती । तेथें कैंची विवेकस्थिती ।
अंध होवोनि ठाके वृत्ती । दृढविषयार्थी लोभिष्ठ ॥ ६६ ॥
लोभ तेथें कैंचे ज्ञान । लोभ तेथे कैचें ध्यान ।
लोभ तेथें समाधान । सर्वथा जाण पै नाही ॥ ६७ ॥
लोभ तेथें कैंची भक्ती । लोभ तेथें कैंची मुक्ती ।
जेथें लोभ तेथें विरक्ती । नाही निश्चितीं सर्वथा ॥ ६८ ॥
लोभाचें ठाणें अंतरीं असतां । समूळ साधनें होती वृथा ।
गुरूसी चाळी विकल्पता । ज्याचेनि तत्वतां मोक्ष लाभे ॥ ६९ ॥
माता पिता इतर जन । त्यांची कथा गणी कोण ।
है लोभाचे स्वाभाविक चिन्ह । कुबेर जाण नव्हे तैसा ॥ ७० ॥
तथापि ज्याची वस्तु त्यासी । पाववितां श्रेय आम्हांसी ।
विमान अर्पावे कुबेरासी । हेंचि आम्हांसी निजमंडन ॥ ७१ ॥
कुबेराचे विमान बिभीषणाला दिल्यामुळे स्वतःचे
विमान कुबेराला देण्याची रामांची इच्छा :
कुबेराचे निजविमान । शरणागता दिधलें दान ।
आमुचें कामग सुलक्षण । करावें अर्पण धनदासी ॥ ७२ ॥
आज्ञापितां रघुनाथ । भरतें वंदिला वचनार्थ ।
निर्लोभ शुद्धशास्त्रार्थ । निजसिद्धार्थ श्रीराम ॥ ७३ ॥
श्रीरामांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे विमान भरताने आपल्या दूताबरोबर कुबेराकडे पाठवून दिले :
भरताचेनि भजनें पूर्ण । ग्रा त्रिलोकीं गमन ।
त्यासी करोनि आज्ञापन । धाडिलें विमान कुबेरासी ॥ ७४ ॥
उत्तरेचा लोकपाळ । अलकावती नगर विशाळ ।
श्रीरामभांडार सकळ । राखे अविकळ कुबेर ॥ ७५ ॥
तेथें जावोनियां दूत । सांगितलें श्रीरामवृत्त ।
विमान अर्पोनियां त्वरित । आला पुसत कुबेरा ॥ ७६ ॥
देखोनि श्रीरामगण । येरें घातलें लोटांगण ।
देखतां श्रीरामविमान । आनंदमग्न पैं झाला ॥ ७७ ॥
कुबेराकडून दूताचा सत्कार व रामस्तुती :
श्रीरामरूपें रामगणासी । षोडशोपचारीं परियेसीं ।
पूजोनियां अति प्रीतीसीं । काय तयासी बोलत ॥ ७८ ॥
श्रीराम सकळांची माउली । आर्त श्रांतांची साउली ।
आश्रितजनां कल्पवल्ली । ख्याति केली अवतारी ॥ ७९ ॥
निवटोनियां दुष्ट रावण । गौरविले सकळ सुरगण ।
मजलागोनि स्वविमान । अर्पिलें आपण रघुनाथें ॥ ८० ॥
भक्तजनां कृपाळ । ऐसा ब्रीदाचा कल्लोळ ।
साच करोनि दावी तत्काळ । निजभक्त सकळ गौरविले ॥ ८१ ॥
ऐसें करोनि स्तवनासी । पूजोनियां अति प्रीतीसीं ।
बोळविलें श्रीरामगणासी । कुबेर मानसीं सुखमय ॥ ८२ ॥
श्रीराम दशरथाच्या सिंहासनास वंदन करण्यास निघाले :
येरीकडे रघुनंदन । प्रवेशोनि स्वभुवन ।
दशरथाचें सिंहासन । नमावया जाण निघाला ॥ ८३ ॥
तुरें लागलीं घनदाट । उठला नाद अचाट ।
नादें गर्जती सुभट । कीर्ति निर्दुष्ट रामाची ॥ ८४ ॥
विचित्र वाद्यांचा ध्वनी । रामनामाच्या दीर्घ श्रेणी ।
नाद कोंदला गगनीं । वीर तेथोनी चालिले ॥ ८५ ॥
निराळ वोळलें नामेंकरोनी । वर्षों लागलें अमृतकणीं ।
हर्षें तिंबली अवनी । सुखसमाधानी श्रीराम ॥ ८६ ॥
सुवासिनींकडून श्रीरामांची मंगल दीपांनी ओवाळणी :
हर्षाचेनि गदारोळें । नगरवनितांहीं मंगल केलें ।
दधिमधु अक्षता दूर्वामेळें । दीप प्रबळें ओवाळिती ॥ ८७ ॥
ऐसे पातले राजभवन । गजरें करोनि ससैन्य ।
करोनियां नीराजन । सिंहासन नमियेलें ॥ ८८ ॥
पितुर्भवनमासाद्य प्रसाद्य सुमहद्यशः ।
कौसल्या व सुमित्रां व कैकेयीमभ्यवादयत् ॥ ६ ॥
वाद्यांच्या गजरांत श्रीरामांचा राजभवनात प्रवेश :
प्रसन्नोन्मख तिघी माता । श्रीरामें नमिल्या तत्वतां ।
सहित सौमित्र आणि सीता । आनंद समस्तां उथळला ॥ ८९ ॥
श्रीराम प्रवेशतां राजभवन । तुरे वाद्यें गर्जे गगन ।
नामें कोंदलें त्रिभुवन । जयजयकार पूर्ण प्रवर्तला ॥ ९० ॥
नागरिक जना सकळां । नरनारी अबळां बाळां ।
तृणचरादि सकळां । देखोनि घननीळा आनंद ॥ ९१ ॥
नागरिकांची रामराज्याभिषेकाची इच्छा :
सकळ जन नगरवासी । आदिकरोनि दासदासी ।
राज्याभिषेक राघवासी । पहावयासी इच्छिती ॥ ९२ ॥
ऐसें सकळांचें मनोगत । त्याहूनि भरताचें अत्यंत ।
राज्याभिषेकीं रघुनाथ । देखां इच्छित अत्यादरें ॥ ९३ ॥
अथाब्रवीद्राजपुत्रो भरतं धर्मिणां वरम् ।
अर्थोपहितया वाचा मधुरं रघुनन्दन ॥ ७ ॥
ती इच्छा भरताने श्रीरामांना निवेदन केली :
सत्वाथिला अति सात्विक । परमधर्मे अति धार्मिक ।
श्रीरामभजनविश्वासक । निजरंक रामभजनीं ॥ ९४ ॥
सकळांसमवेत हर्षनिर्भर । होवोनि अत्यंत नम्र ।
लोटांगण अत्यादर । भरतें रघुवीर विनविला ॥ ९५ ॥
वनवासाचीं सकळ व्रतें । स्वामी विसर्जावीं समस्तें ।
जटाबंधनें करोनि मुक्तें । मंगलस्नानातें करावें ॥ ९६ ॥
करोनि व्रतविसर्जन । राज्याभिषेक घेवोनि पूर्ण ।
अंगीकारावें सिंहासन । राजचिन्ह छत्रादि ॥ ९७ ॥
अति सुकुमार जानकी माता । उपवासें गांजिली तत्वतां ।
मलिन अंग मलिन माथा । अस्थिपंजरता उरलीसे ॥ ९८ ॥
मलिन वस्त कृशोदर । तांबूलहीन म्लान वक्त्र ।
श्रमेंकरून लागले नेत्र । बहुत सुंदरी गांजिली ॥ ९९ ॥
दुरात्मा रावणाच्या घरीं । अत्यंत गांजिली सुंदरी ।
मंगलस्नानीं आज्ञा करीं । दीनोद्धारी नाम तुझें ॥ १०० ॥
तैसाच सौमित्र भ्राता । बहु कष्टला रघुनाथा ।
आहार नातळे सर्वथा । तुज तत्वतां सेविलें ॥ १०१ ॥
त्या श्रमाचा परिहार । कर्ता तूं एक रघुवीर ।
अंगीकारोनि राज्यभार । सुख सत्वर यासी द्यावें ॥ १०२ ॥
रामआज्ञेप्रमाणे आपण चौदा वर्षे राज्य केल्याचे भरताने रामांना सांगितले :
आणिक एक विज्ञापन । स्वामींनी ऐकावे सावधान ।
तुझे आज्ञेप्रमाणें पूर्ण । राज्यशासन पै केलें ॥ १०३ ॥
पितृआज्ञा तुझें व्रत । झालीं चौदा वर्षें नियत ।
तितकियांत कीर्ति अद्भुत । त्रैलोक्यांत विस्फारिली ॥ १०४ ॥
निवटोनियां रक्षोगण । मुक्त करोनियां जनस्थान ।
ब्राह्मणा दिधलें दान । न लागतो क्षण श्रीरामा ॥ १०५ ॥
जो नागवे सुरासुरीं । कांखे सूदला दशशिरीं ।
त्या वाळीची केली बोहरी । एकें बाणेंकरीं श्रीरामा ॥ १०६ ॥
मुक्त करोनि किष्किंधाभवन । सदा राज्याभिषिंचन ।
सुग्रीवासी केले जाण । निमिषेंकरोन श्रीरामा ॥ १०७ ॥
सागरीं तारोनि पाषाण । क्षणें उतरिले वानरसैन्य ।
लंकेमाजी घालोनि खाण । सकुळ रावण निर्दाळिला ॥ १०८ ॥
मुक्त करोनि सुरमांदी । संस्थापिले निजपदीं ।
नवग्रह हर्षानंदीं । स्थापिले त्रिशुद्धी ग्रहचक्रीं ॥ १०९ ॥
अलोलिक लंकाभवन । क्षणें हिरोनियां जाण ।
बिभीषणा दिधलें दान । संपत्ति गहन समवेत ॥ ११० ॥
निर्लोभी कळा ऐसी । आचार्यत्व दृढ जगासी ।
संस्थापिलें निजभजनासीं । कृपाकुत्वेंसीं श्रीरामा ॥ १११ ॥
आमच्यासाठी राज्याचा स्वीकार करावा अशी भरताची रामांना कळकळीची प्रार्थना :
त्या तुज राज्याची आस्था । सर्वथा नाहीं रघुनाथा ।
आमचे कृपेलागीं तत्वतां । राज्यभार आतां अंगीकारीं ॥ ११२ ॥
सिंहासनीं सचिन्ह देख । सालंकृत रघुकुळटिळक ।
आमचे नेत्र आत्यंतिक । देखावया भुकेले ॥ ११३ ॥
आमच्या नेत्रांचे पारणे । स्वामी फेडावे कृपाळुपणें ।
मी तुझें निजतान्हें । लळे पाळणे पै माझें ॥ ११४ ॥
राज्यलोभ राघवासी । नाहीं सर्वथा मानसी ।
निश्चये कळलें आम्हांसी । संदेह ह्मासीं असेना ॥ ११५ ॥
परी लळे पाळावे भक्तांचें । हेंचि व्रत श्रीरामाचें ।
तेथें काय विज्ञापन आमुचें । वृथा करील श्रीराम ॥ ११६ ॥
श्रीरामांवरील प्रेमातिरेकामुळे भरतादि सर्वांचा गळा दाटून आला :
म्हणोनि घातलें लोटांगण । सुदृढ माथां धरिले चरण ।
प्रेमें चालिलें स्फुंदन । करी रुदन अट्टहासें ॥ ११७ ॥
जेंवी भरताची अवस्था । तैसीच शत्रुघ्नाची तत्वतां ।
सौमित्र सीता सहित माता । प्रेमावस्था नावरे ॥ ११८ ॥
सुग्रीव बिभीषण वानरगण । सुमंत सेनानी प्रधान ।
अयोध्येचे सकळ जन । प्रेमें स्फुंदन चालविलें ॥ ११९ ॥
ऋषिवरांही दशा तैशी । प्रेमें स्फुंदती आवेशीं ।
तें देखोनि हनुमंतासी । आवेश मानसीं पै आला ॥ १२० ॥
भरताची इच्छा पूर्ण करावी असे त्या वेळी मारुतीचे स्पष्ट सांगणे :
करोनियां साष्टांग नमन । मृदुमंजुळ मधुर वचन ।
विनविला श्रीरघुनंदन । भरत वचन मानावे ॥ १२१ ॥
तुजलार्गी आर्तभूत । तुझीं व्रतें जी समस्त ।
असोनि राज्यभोगाआंत । स्वयें भरत आचरला ॥ १२२ ॥
तुम्ही असतो वनांतरीं । सहज भोग केले दुरी ।
भोगीं असोनि अलिप्त परी । ख्याति थोरी भरताची ॥ १२३ ॥
तुजलागीं आर्तभूत । भोग भोगोनि त्यजी समस्त ।
झाला वनवासी व्रतस्थ । वल्कलयुक्त जटाधारी ॥ १२४ ॥
आहार सांडोनि निःशेख । श्रीराम भेटावया देख ।
फळभोजनीं अति हरिख । कवि सकळिक समवेत ॥ १२५ ॥
त्रिकाळ पादुका पूजितां । क्षण अवकाश नाहीं भरता ।
श्रीरामकीर्ती वाखाणितां । नाहीं तत्वतां अवकाश ॥ १२६ ॥
श्रवण कीर्तन पूजन । सत्संगती कथा गहन ।
अखंड श्रीरामाचें ध्यान । समाधान तेणें त्यासी ॥ १२७ ॥
भरताला आपण काहीच उत्तर देत नाही हे योग्य नाही :
ऐसी असोनि अवस्था । लोटांगणीं विनवितां ।
उत्तर न देसी रघुनाथा । हें सर्वथा अनुचित ॥ १२८ ॥
राज्यलोभ पै भरतासी । सर्वथा नाहीं मानसीं ।
कळलें निश्चये आम्हांसी । प्रमाणासी तुझे चरण ॥ १२९ ॥
ऐकोनि मारुतीचे वचन । संतोषला रघुनंदन ।
भरत उठोनिया जाण । हृदयीं पूर्ण आलिंगिला ॥ १३० ॥
आपली आज्ञा नाही म्हणून रामांनी मौन धरले
हे जाणून वसिष्ठांची रामांना राज्य स्वीकारण्याची आज्ञा :
हृदयीं आलिंगोनि पूर्ण । काहीं नेदी प्रतिवचन ।
सस्तुरूसी कळले चिन्ह । माझें वचन पाहतसे ॥ १३१ ॥
श्रीराम मर्यादेचा मेरू । राम भावार्थसागरू ।
राम आज्ञेचा किंकरू । पूर्णावतारू श्रीराम ॥ १३२ ॥
राम गुणांचे मंडन । राम प्रेमाचें जीवन ।
गुरूचा निजगुरु आपण । देतो मान गुरूत्वा ॥ १३३ ॥
गुरुमर्यादा पाळितां । विजय आला रघुनाथा ।
उत्तरोत्तर होती कथा । स्वधर्मता स्थापिली ॥ १३४ ॥
जें जें आचरती श्रेष्ठ । आबाळां तोचि पडे पाठ ।
राम अवतार श्रेष्ठ । पुराणपाठ श्रीराम ॥ १३५ ॥
पितृज्ञाप्रतिपाळण । तुझें वनवास गमन ।
चौदा वषै नियत पूर्ण । राज्यशासन तेंचि भरता ॥ १३६ ॥
होता दोघांचा जो नेम । सिद्धि पावला सर्वोत्तम ।
आज्ञा पाळावी निःसीम । भरत सप्रेम सुखावी ॥ १३७ ॥
अंगीकारोनि राज्यासी । ब्राह्मणदास्यें अहर्निशी ।
सुख द्यावें गोविप्रांसी । स्वधर्मासी संरक्षीं ॥ १३८ ॥
संरक्षावे गोब्राह्मण । पितृवतू प्रजापाळण ।
धरा आनंदवावी पूर्ण । स्वधर्मेकरोन श्रीरामा ॥ १३९ ॥
अश्वमेधादि महा यज्ञ । तेणें गौरवीं अमरगण ।
वसुधारा दंडायमान । हव्यवाटरे जाण सुखी करी ॥ १४० ॥
ऐसें वसिष्ठआज्ञापन । हनुमंताचा संदेश पूर्ण ।
भरताचें प्रेम गहन । तेणें रघुनंदन सुखमय ॥ १४१ ॥
श्रीसद्गुरूंची आज्ञा श्रीरामांना शिरोधार्य :
सद्गुरूचें आज्ञापन । माथां वंदोनि आपण ।
बोलता झाला रघुनंदन । आला कोण उल्लंघी ॥ १४२ ॥
ऐकोनि श्रीरामवचन । भरत झाला सुखैकघन ।
अंगद गर्जिन्नला पूर्ण । रधुनंदननिजराज्य ॥ १४३ ॥
अयोध्येचे सकळ जन । आणि सकळ वानरगण ।
शरणागत बिभीषण । करित गर्जन उठिले ॥ १४४ ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामाचें राज्याभिषिंचन ।
श्रोतीं द्यावें अवधान । निजनिरूपण राम वदवी ॥ १४५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां ।
श्रीरामभिषिंचननिर्णयो नाम द्व्यशीतितमोऽध्यायः ॥ ८२ ॥
॥ ओंव्या १४५ ॥ श्लोक ७ ॥ एवं १५२ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय ब्याऐंशीवा