संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा

वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कुंभकर्ण नारदाची उक्ती सांगतो :

नारदसंवाद–लक्षण । समूळ मूळीचें रामायण ।
रावणासी कुंभकर्ण । स्वयें आपण सांगत ॥ १ ॥

शृणुष्वेदं महाराज मम वाक्यमरिंदम ।
यदर्थं तु पुरा सौ‍म्य नारदाच्छुतवानहम् ॥१॥
षण्मासाद हमुत्थायअशित्वा भक्ष्यमुत्तमम ।
नच तृप्तोऽस्मि राजेंद्र ततोऽहं प्रस्थितो वने ॥२॥
बहूनि भक्षयित्वाहं सत्वानि विविधानि वै ।
भुवत्वा चाप्रीणनं कृत्वा शिलातलमुपाविशत ॥३॥

शत्रुदमनीं अति समर्था । ऐकें बापा लंकानाता ।
नारदमुखें मी ऐकिली कथा । सावधानता अवधारीं ॥ २ ॥

कुंभकर्ण – नारद भेट :

सहा मासां मज जागेपण । खातां उत्तम अन्नपक्वान्न ।
तृप्ती न पवेचि संपूर्ण । मग मी आपण वना गेलों ॥ ३ ॥
जावोनियां वनाप्रती । भक्षितां जींव नानाजाती ।
तेणें मज जाली तृप्ती । अति विश्रांती पावलों ॥ ४ ॥
अति विस्तीर्ण शिळातळ । वरी छाया सुशीतळ ।
तेथें बैसलों मी निश्चळ । नभोमंडळ निरीक्षोनि ॥ ५ ॥
तंव ब्रह्मवीणाझणत्कार । करीत रामनामाचा गजर ।
येतां नारदमुनीश्वर । नभी स्तवर म्यां देखिला ॥ ६ ॥
दिव्य चंदनाची उटी । त्रिपुंड्र रेखिला ललाटीं ।
दिव्य वनमाळ कंठी । स्वानंदपुष्टीं डुल्लत ॥ ७ ॥

शिलातलस्थोऽपश्यं वै नारदं शशिसमप्रभम् ।
आकाशेन दुतं यांतं मां च दृष्ट्वा स तु स्थितः ॥४॥
अवतीर्णश्च सहसा मया चैवाभिवादितः ।
उपविष्टः शिलायां तु ततोऽहं तु तमब्रुवम ॥५॥
कुत आगम्यते ब्रह्मन्कुतो वा प्रतिगम्यते ।
एवमुक्तो महाराज नारदो मामुवाच ह ॥६॥
देवानाभालयं मेरुं गतोऽहं देवसंसदि ।
युष्मत्तो भयभीतानां समाजस्तत्र सम्बभौ ॥७॥

मेरुपर्वतावर झालेल्या देवसभेचा वृत्तांत :

तपस्तेजें देदिप्त । तेजें शशिसूर्य लपत ।
नारद नभोमंडळी येत । अकस्मात देखिला ॥ ८ ॥
मज नारदें देखोनि नयनीं । क्षणैक स्थिरावला गगनीं ।
सवेंचि उतरोनि अवनीं । आला मुनि मजपासीं ॥ ९ ॥
मग म्या उठोनि आपण । मुनीस घातलें लोटांगण ।
मस्तकीं वंदोनियां चरण । शिळातळीं बैसविला ॥ १० ॥
शिळातळी बैसविल्या जाण । मुनीसी म्यां पुसिला प्रश्न ।
कोठोनि तुमचें आगमन । पुढारें गमन तें कोठें ॥ ११ ॥
ऐसा पुसतां प्रश्न । नारद हांसे गदगदोन ।
मग साक्षेपें आपण । सकारण गुज सांगे ॥ १२ ॥
मेरुगिरीवर देवसभेंत । तुमचेनि भयें भीत ।
समाज मिळाला समस्त । रावणांत‍उपाय ॥ १३ ॥
देव दानव मानव । यक्षोरग ऋषि गंधर्व ।
ब्रह्मा विष्णु सदाशिव । सर्व समुदाय मिळाला ॥ १४ ॥

मंत्रं संमंत्रिरे तत्र वधे रक्षः कुलस्य च ।
देवराजो निबद्धश्च यमः संख्ये पराजितः ॥८॥
जितौ तु सबलौ संख्ये कुबेरवरुणावपि ।
यज्ञा विध्वंसिताः विध्वंसिताः सर्वे धर्मिष्ठाश्च हता नृपाः ॥९॥
देवोद्यानानि भग्नानि स्त्रियो नीता यथेप्सितम् ।
चिंतयध्वं वधोपायं रावणस्य दुरात्म्नः॥१०॥
एवमुक्ते तु वचने ब्रह्मा देवानुवाच ह ।
अवध्यत्वं मया दत्तं दैवदैत्यैश्च राक्षसैः॥११॥
मानुषेभ्यो भयं तस्य वानरेभ्यश्च देवताः॥१२॥

रावणाच्या अतिक्रमणाबद्दल देवांच्या सभेत वाटाघाट :

तेथें मिळोनि देवसमुदाय । रावणवधाचा उपाव ।
मुख्य रावणाचा अन्याव । साभिप्राव तो ऐका ॥ १५ ॥
मुख्य इंद्र घातला बांधवडीं । आणीक देव तेहतीस कोडी ।
कुबेर जिंतला रणधांदडीं । केलीं बापुडीं यमवरुणें ॥ १६ ॥
विध्वंसिले याज्ञिक यज्ञ । मारिले धार्मिक जन ।
मारिले अग्निहोत्री ब्राह्मण । अन्याय संपूर्ण लंकेशा ॥ १७ ॥
चैत्रवन नंदनवन । विध्वंसूनि देवोद्यान ।
येणें वाढविलें अशोकवन । स्त्रियांसी रमण रमावया ॥ १८ ॥
देवस्त्रिया असुरस्त्रिया । नागकन्या पद्मिनी प्रिया ।
बळेंचि आणिल्या धरोनियां । मुख्य अन्याया हे मूळ ॥ १९ ॥
परदारांचें जें हरण । हाचि अन्याय अति दारुण ।
यालागीं रावणाचें जें मरण । अवघे जाण चिंतिती ॥ २० ॥
तेथें बोलिला ब्रह्मदेव । माझ्या वचनाचा अभिप्राव ।
मिळाल्या सुरसमुदाव । तरी दशग्रीव अवध्य ॥ २१ ॥
दारहरणकैवारा । करुं आल्या नरवानरां ।
तत्काळ मरण दशशिरा । सत्य साचार ब्रह्मवाणी ॥ २२ ॥

सुरासुरसमूहेऽपि वधस्तस्य विद्यते ।
तस्मादेष हरिर्देवः पद्मनाभस्त्रिविक्रमः॥१३॥
पुत्रो दशरथस्यास्तु चतुर्व्यहः सनातनः।
भवंतो वसुधांगत्वा विष्णोरस्य महात्मनः॥१४॥
वानराणां तनुं धृत्वा सहायत्वं करिष्यथ ।
एवुमक्त्वा ततो ब्रह्मा तत्रैवांतरधीयत॥१५॥
एतदाख्यातवान्मह्यं नारदो भगवानृषिः ।
यथातत्त्वमशेषण ततो यातः सुरालये॥१६॥
सोऽयं विष्णुः सुरैः सार्द्धं वानरत्वमुपागतैः ।
तन्मह्यं रोचते सीता रामाय प्रतिदीयताम्॥१७॥
नमस्व रामं राजेंद्र रक्ष चात्मानमात्मना।
योग्यश्च राघवो मित्रं संधिश्चैवोत्तमो भवेत्॥१८॥

ब्रह्मवराने सुरासुरी अवध्यता आणि वानर
मानवांकडुन रावण वध होईल असा वृत्तांत :

सुरासुरीं अवध्यता । ब्रह्मवरदें लंकानाथा ।
नरवानर याच्या घाता । होय सांतता स्वयंभू ॥ २३ ॥
पद्मनाभ विष्णु विख्यात । तो होईल दशरथाचा सुत ।
रामलक्ष्मणशत्रुघ्न भरत । व्यूह चतुर्थ पुरुषार्थे ॥ २४ ॥
रणीं गांजावया दशशिर । सकळ जे कां सुरवर ।
होती दुर्धर वानरभार । निशाचर मारावया ॥ २५ ॥
वानर साह्य श्रीरामासीं । श्रीराम रक्षिता वानरांसी ।
ऐसें ब्रह्मयानें देवांपासी । निश्चयेंसी नेमिलें ॥ २६ ॥
मिळोनियां वानरभार । रणीं मारिती निशाचर ।
श्रीराम मारील दशशिर । सबधुंपुत्र ससैन्य ॥ २७ ॥
परम कपटी इंद्रजित । अभिचारी निकुंभळेआंत ।
त्याचा सौ‍मित्री करील घात । निजपुरुषार्थप्रतापें ॥ २८ ॥
नरवानर मिळोन । करितील राक्षसां निःसंतान ।
ऐसें विरंचिवरदान । ब्रह्मवचन नव्हे मिथ्या ॥ २९ ॥
वर वदोनियां स्पष्ट । ब्रह्मा जाला अदृष्ट ।
ते हे नरवानर सुभट । आले यथेष्ट लंकेसीं ॥ ३० ॥

रामांना सीता परत करुन शरण जावे
अशी कुंभकर्णाची रावणाला सूचना :

आमच्या नाशासी कारण । समुद्रीं तरती पाषाण ।
रावणा निश्चयेंसीं जाण । आलें मरण आम्हांसी ॥ ३१ ॥
मिथ्या न होय नारदवचन । जालें प्रत्यक्ष प्रमाण ।
ते हे वानर जाण । आले गर्जोन लंकेवरी ॥ ३२ ॥
राक्षस मरती कपि न मरती । तुवांचि सांगितलें मजप्रती ।
काळ साह्य रघुनाथीं । जाण निश्चितीं लंकेशा ॥ ३३ ॥
श्रीराम परमात्मा ब्रह्ममूर्ती । विरोध न करावा त्याप्रती ।
त्यासी अर्पून सीता सती । सुखसंवित्ती भोगावी ॥ ३४ ॥
राक्षस मरती कपि न मरती । हे आत्मत्वाची निजप्रातीती ।
समुद्रीं पाषाण तरती । दुजी प्रतीती ईश्वरत्वाची ॥ ३५ ॥
जेणें भंगिलें शिवचाप । त्यासीं न चले गा प्रताप ।
देखतां विरोधें श्रीरामरुप । येतो चळकांप सर्वांगीं ॥ ३६ ॥
श्रीरामासी करितां रण । प्रणांते जालासी क्षीण ।
रणीं रामें दिधलें जीवदान । त्यासीं कां शरण न रिघावें ॥ ३७ ॥
आत्मसत्ता ईश्वरसत्ता । नित्य अधीन श्रीरघुनाथा ।
त्यासीं न ये विरोध करितां । अर्पून सीता करी सख्य ॥ ३८ ॥
घालोनियां लोटांगण । सीता करोनि रामार्पण ।
श्रीरामासीं रिघाल्या शरण । सुखसंपन्न सर्वदा ॥ ३९ ॥
श्रीरामासीं रिघोनि शरण । मुख्यत्वें वांचवीं निजप्राण ।
तोचि सकळ कुळा संरक्षण । आमचेंही मरण चुकेल ॥ ४० ॥
श्रीरामासीं रिघाल्या शरण । स्वप्नी नाहीं जन्ममरण ।
विघ्नाचें होय निर्विघ्न । सुखसंपन्न सर्वदा ॥ ४१ ॥
सती श्रीरामाची सीता । स्वयें श्रीरामासी अर्पितां ।
तुज संदेह कोण लंकानाथा । विरोध वृथा कां करिसी ॥ ४२ ॥

कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
तूष्णींभूतश्चितयित्वा ततो वाक्यमुवाच ह ॥१९॥
कुंभकर्णमहाप्राज्ञ कुरुष्व वचनं मम ।
कोऽसौ विष्णुरिति ख्यातो यस्मात्वं तात बिभ्यसे ॥२०॥
दैवत्वेन न मन्येऽहं तथान्ये देवदानवाः ।
मानुषत्वं गते तस्मिन्किं भयं त्वामुपस्थितम ॥२१॥
नित्यमाहारभूतास्तु मानुषाःस्म सदाबलाः ।
खादयित्वा तु यं पूर्वं कथं पश्चान्नमाम्यहम् ॥२२॥
प्रणम्य मानुषं रामं सीतां दत्वा तु तस्य वै ।
हास्यस्पदत्वं लोकानामनुयास्यामि पृष्ठतः ॥२३॥

कुंभकर्णाची सूचना रावणाला अमान्य :

ऐकोनि कुंभकर्णाचें वचन । रावणा पडियेलें मौन ।
महादूःखें आंदोलायमान । अति उद्विग्न सचिंत ॥ ४३ ॥
ज्याचेनि बळें करावें रण । तोचि कुंभकर्ण आपण ।
सीता श्रीरामासी अर्पून । रिघावें शरण सांगत ॥ ४४ ॥
बिभीषण येच अर्थी। नाना परींचिया उपपत्ती ।
चाळूनियां सर्व युक्ती । शरण रघुपती रिघा म्हणे ॥ ४५ ॥
संमुख लक्षोनि कुंभकर्ण । सरोष बोले रावण ।
झोंपें जालासि सज्ञान । बोलसी वचन चापल्यें ॥ ४६ ॥

रावणाची विचारसरणी :

विष्णु विष्णुपणें असतां । मज संमुख न येचि युद्धार्था ।
तो नीचत्वें आला मनुष्यता । त्याची सभयता ते किती ॥ ४७ ॥
मनुष्य विष्णु स्वयें सांगती । सांगसागों स्वयें भिसी ।
शेखीं मजसी भेडसाविसी । थोर जालासी पुरुषार्थी ॥ ४८ ॥
मनुष्य आमचें खाजुकें । सगळीं भक्षूं यथासुखें ।
तूं भितोसी त्याचेंनि धाके । थोर तवकें पुरुषार्थी ॥ ४९ ॥
अति धाकें धाकोनि थोर । अजासी वंदितां लाजे व्याघ्र ।
तेंवी म्यां वंदितां श्रीरामचंद्र । लज्जा थोर मज माझी ॥ ५० ॥
मनुष्य आमचा आहार । त्यासी म्यां करावा नमस्कार ।
तैं मज हांसती सुरासुर । निशाचर उपहासिती ॥ ५१ ॥
रणीं इंद्र आणितां बांधोन । बंदी घालितां सुरगण ।
विष्णु लपता भेण । न करीच रण अतिं धाकें ॥ ५२ ॥
विष्णूसकट इंद्रादि देव । दैत्य दानव मानव ।
म्यां तृणप्राय केले सर्व । त्या मज भय मनुष्याचें ॥ ५३ ॥
श्रीराम मनुष्यमात्र जाण । सीता अर्पून रिघावें शरण ।
हे मज लज्जा अति दारुण । भय कोण रामाचें ॥ ५४ ॥
सर्पें वंदावे मुषकासी । गरुडें वंदावे सर्पासी ।
तेंवी भक्ष्यभूत श्रीरामासी । केंवी म्यां त्यासी वंदावे ॥ ५५ ॥
पूर्वीं भक्षिले मनुष्यांसी । तेंचि मनुष्यत्व श्रीरामासीं ।
मज शरण रिघतां त्यासी । उपहासासी पावेना ॥ ५६ ॥
श्री रामाचे शरणपणें । नित्यावृत्ती त्यांचें होणें ।
पाठीसीं चालतां रावणें । लाजिरवाणें तिहीं लोकीं ॥ ५७ ॥

यदि वा राघवो विष्णुर्व्यक्तं ते श्रोत्रमागतः ।
देवतानां हितार्थाय प्रविष्टो मानुषीं तनुम् ॥२४॥
अत्यंतं वैरिणं रामं यं नमस्कर्तुमिच्छसि ।
अस्मान्हंतुं किलायातः स संधेयः कथं मया ॥२५॥
यदि रामः स्वयं विष्णुर्लक्ष्मणः शेषसंमितः ।
स वानराणां राजानं सुग्रीवं शरणं गतः ॥२६॥
अहोस्य सदृशं सख्यं तिर्यग्योनिगतैः सह ।
वीर्यहीनस्तु किं विष्णुर्योगतो ऋक्षवानरान् ॥२७॥

रावणाची दर्पोक्ती :

श्रीराम विष्णु तत्वता । मुनि मुखें त्वां ऐकिली कथा ।
तो देवांचियां हितार्था । आमुच्या वधार्था मनुष्य जाला ॥ ५८ ॥
विचारितां निजनिर्धारीं । श्रीराम आमुचा अत्यंत वैरी ।
त्यांसी अर्पूनि सीता सुंदरी । म्हणसी तूं करीं नमस्कार ॥ ५९ ॥
आमुच्या वधाकारणें । श्रीरामें मनुष्यत्व धरणें ।
त्यासीं म्या सख्य करणें । जीवें प्राणें घडेना ॥ ६० ॥
सर्पा मुंगसासीं सौजन्य । करीवी ऐसा आहे कोण ।
तेंवी राम आण रावण । सख्य संपूर्ण घडेना ॥ ६१ ॥
श्रीरामासीं सौजन्य । करुनि देतां अलिंगन ।
खेंवा सवेंचि मी गिळीन । मनुष्यभक्षण तें आम्हां ॥ ६२ ॥
केळें दिधल्या वानरा करीं । तें काय आठ प्रहर धीर धरी ।
तत्काळचि गटका करी । तेंवी खेंवामाझारीं श्रीराम ॥ ६३ ॥
श्रीराम विष्णु जरी आपण । सौ‍मित्र शेषावतार संपूर्ण ।
तरी कां सुग्रीवा गेला शरण । शुद्ध्यर्थ जाण सीतेच्या ॥ ६४ ॥
श्रीरामासीं विष्णुत्व कदा न घडे । सीतेलागीं होवोनि वेडें ।
वनीं रडे पडे झडे । विष्णुत्व घडे कैसेनि ॥ ६५ ॥
तिर्यग्योनी जे वानर । पालेखाइरे वनचर ।
त्यांच्याशीं सख्य करी रामचंद्र । तो राघवेंद्र अति नीच ॥ ६६ ॥
विष्णुसीं नाहीं पुरुषार्थ । बळींसीं न करीच युद्धार्थ ।
छळणें झाला तो अतीत । यज्ञ समयीं याचक ॥ ६७ ॥
स्वयें वामनरुपें मागोन । त्रिविक्रमाक्रमें घेतां जाण ।
समुद्रमेखळा पृथ्वी दान । करोनी छळण घेतली ॥ ६८ ॥
पृथ्वी घेवोनियां दान । सवेंचि कैसा कृतघ्न ।
दैत्यासीं लाविलें बंधन । कपटी पूर्ण श्रीविष्णु ॥ ६९ ॥
पुढिलासी करितां छळ । सदाचें अपेशी कपाळ ।
बळीनें केला द्वारपाळ । सर्व काळ तिष्ठत ॥ ७० ॥
कुडा कपटी हीन दीन । विष्णूसीं नाहीं आंगवण ।
त्यांतही आलें मनुष्यपण । आम्हीं कां शरण रिघावें ॥ ७१ ॥
उपकार अपकार करणें । याच परी विष्णूचें जिणें ।
त्यासीं म्यां शरण रिघणें । लाजिरवाणें तिहीं लोकीं ॥ ७२ ॥

यदा मे निर्जिता देवाःस्वर्गं गत्वा त्वया सह ।
तदा किं नास्ति विष्णुत्वं तस्य देवस्य राक्षस॥२८॥
सांप्रतं कुत आयातः स विष्णुर्येन बिभ्यसि ।
शरीररक्षणार्थाय ध्रुवं ते वाक्यमिदृशम्॥२९॥
नायं क्लीबयितुं कालःकालो युद्धे निशाचर ।
आयुःपितामहात्प्राप्तं त्रैलोक्यं च वशीकृतम्॥३०॥
रागवं प्रणमे कस्माद्धीनवीर्यपराक्रमम् ।
गच्छ स्वशयनीयाय शश्वत्वं विजतज्वरः॥३१॥
शयानं न च हन्यात्वां राघवो लक्ष्मणस्तदा ॥३२॥

कुंभकर्णाचा धिक्कार करुन रावणाची सिद्धता :

पूर्वी तुजसमवेत म्यां जाण । स्वर्गी जिंतिले देवगण ।
तै कां विष्णु न करी रण । आतां आंगवण त्या कैंची ॥ ७३ ॥
विष्णूस असतें विष्णुपण । तैं मजसीं न करीच रण ।
आतां आलें मनुष्यपण । त्यांसीं कुंभकर्ण भयभीत ॥ ७४ ॥
श्रीरामासी करवे रण । आपुला वांचवावया प्राण ।
रघुनाथा रिघावें शरण । भय संपूर्ण आम्हां सुचविसी ॥ ७५ ॥
क्लीब आणि दिससी लाठा । वृथा वाढलासी काग दिवटा ।
हीन दीन तूं मांसमोठा । अति करंटा नपुंसक ॥ ७६ ॥
आपुलिया मरणाभेण । श्रीरामा रिघा म्हणसी शरण ।
हें तुझें भ्याडपण । मज संपूर्ण कळों सरलें ॥ ७७ ॥
आजिंचा युद्धकाळ दारुण । तुवां सांडिली आंगवण ।
आतां जावोनि करीं शयन । अनुद्विग्न सुचित ॥ ७८ ॥
तुज निजलिया जाण । निद्रितासि रामलक्ष्मण ।
सर्वथा न मारिती जाण । निजावें आपण सुचित्त ॥ ७९ ॥
तुझी थोर आस होती देख । तिसी म्यां दिधलें तिळोदक ।
दावूं नकों काळें मुख । जाय आवश्यक करीं निद्रा ॥ ८० ॥
दीर्याय दिधलें ब्रह्मयानीं । ते म्यां वश केली अवनीं ।
तुवां निजोनि दीर्घशयनीं । केली हानि आयुष्या ॥ ८१ ॥
कुंभर्णा भागलासी । निदसुरा तूं डुकली जासी ।
जाऊन करावें पूर्ण निद्रेसीं । रण रामासीं मी करीन ॥ ८२ ॥

अहं रामं वधिष्यामि ससुग्रीवं सलक्ष्मणम् ।
वानरांश्च वधिष्यामि ततो देवान्महारणे ॥३३॥
विष्णुं चैव वधिष्यामि ये च तस्यानुयायिनः ।
गच्छ गच्छ स्वकं धाम चिरंजीव सुखी भव ॥३४॥
जानामि सीतां धरणीप्रसुतां जानामि रामं मधुसूदनं वा ।
अहं हि जाने स्वयमस्यवध्य् स्तेनाहृता मे जनकात्मजैषा ॥३५॥
न कामाच्चैव न क्रोधात्यजामिजनकात्मजाम् ॥३६॥

करोनिया रणकंदन । मुख्यत्वें श्रीरामे वधीन ।
सुग्रीव वधीन सहलक्ष्मण । वानरगण रणमारें ॥ ८३ ॥
सुरवरांच्या साह्यासीं । राम आला मृत्युलोकासी ।
श्रीराम विष्णु सुरवरांसी । मृत्युपासीं धाडीन ॥ ८४ ॥
सुरवरांचिया थाटी । रणीं मारीन उठाउठीं ।
मग लागोनि विष्णूच्या पाठीं । रिघोन वैकुंठी मारीन ॥ ८५ ॥
जे विष्णूचे उपासक । आणि विष्णूचे सेवक ।
रणीं शोधशोधोनि देख । एक एक मारीन ॥ ८६ ॥
असो हे वाढिवेची कथा । कोण श्रीराम कोण ते सीता ।
हें मज कळलें तत्वतां । सावधानता अवधारीं ॥ ८७ ॥
धरणीपासाव प्रसूता । अयोनिजा सती सीता ।
परब्रह्मत्व रघुनाथा । मजही तत्वतां कळलेंसे ॥ ८८ ॥
श्रीरामाचे स्वबोधबाण । त्यांसी म्यां अर्पिला जीवप्राण ।
तरी सीता देवोनि आपण । श्रीरामा शरण रिघेंना ॥ ८९ ॥
अभिलाषितां जनकदुहिता । श्रीराम करील माझ्या घाता ।
तरी श्रीरामा अर्पून सीता । शरण रघुनाथा रिघेंना ॥ ९० ॥
सीता अभिलाषितां मज मरण । जाणोनि केलें सीताहरण ।
सीता न करीं रामार्पण । न रीघें शरण श्रीरामा ॥ ९१ ॥
राज्यलोभसकामता । न सांडीं मी जनकदुहिता ।
श्रीराम आला सक्रोधता । तरी मी सीता सोडींना ॥ ९२ ॥
देहलोभसभयता । मृत्युभय वाजतां माथां ।
तरी मी न सोडीं गा सीता । निजपरमार्थाचेनि लोभें ॥ ९३ ॥
ऐकें कुंभकर्णा सावधान । तुझ्या अंगी भेडसपण ।
वांचवावया निजप्राण । निगावें शरण श्रीरामा ॥ ९४ ॥
सेवितां श्रीरामाचे पाय जाण । तुज बाधेना जन्ममरण ।
नित्य निर्भय व्हावया जाण । रिघावें शरण श्रीरामा ॥ ९५ ॥
सेवितां श्रीरामाचे पाय तुज । बिभीषण होईल साह्य ।
यालागीं तूं शीघ्र जाय । शरण लवलाहें श्रीरामा ॥ ९६ ॥
आतां जावोनी करी शयन । कां श्रीरामा रिघें शरण ।
ऐसें गर्जतां रावण । कुंभकर्ण क्षोभला ॥ ९७ ॥

कुंभकर्णः पुनर्वाक्यं साश्रुपूर्णमभाषत ।
अलं राक्षसशार्दूल संतापमुपगम्य हि ॥३७॥
रोषशोकौ परित्यज्य स्वस्थो भवितुमर्हसि ।
अवश्यं तु हितं वाच्यं सर्वावस्थं महीपतिम् ॥३८॥
बंधुवादादभिहितं भ्रातुः स्नेहाच्च पार्थिव ।
सदृशं यत्तु कार्येऽस्मिन्कर्तुं स्निग्धेन बंधुना ॥३९॥
अनभिज्ञा हि शास्त्राणां बहवः पशुबुद्धयः ।
कूर्खमंत्रिगणोपेतो भ्राता मे पापबुद्धिभिः ॥४०॥
वस्त्रांतेनाहरन्नग्निं पापैर्न प्रतिषेधितः ॥४१॥

रावणाचा धिक्कार ऐकून कुंभकर्णाला क्रोध, परंतु वस्तुस्थिती सांगतो :

रावणाचे कठिण वचन । ऐकोनियां कुंभकर्ण ।
कोपे नेत्रीं अश्रुपूर्ण । तरी शांत वचन अनुवादे ॥ ९८ ॥
ऐकें सुबंधो सावधान । परापवादानुवादन ।
तेणें तुज सुख कोण । करिसी गर्जन दशमुखें ॥ ९९ ॥
इतरांची गोष्टी कायसी । मजचि सख्या निजबंधूसीं ।
वर्मीं वाग्बाण विंधिसी । अति क्षोभेंसी क्षोभोनी ॥ १०० ॥
विनंती ऐकें दशानना । कोप आंवरुन मना ।
स्वस्थ बैसोनि सावधान । कार्यकारणा विवंची ॥ १ ॥
बंधूनें बधूच्या होतोत्की । न पुसतां सांगाव्या भूपती ।
ऐसी आहे स्नेहाची जाती । तूं कां तदर्थीं कोपसीं ॥ २ ॥
निजबंधूचें निजहित । स्वयें सांगती कालोचित ।
आप्तवादें निग्रहांत । नेमून सांगत बंधुत्वें ॥ ३ ॥
बिभीषणें हित सांगतां । वृथा क्षोभलासी लंकानाथा ।
त्यासी हाणोनिया लाता । शरण रघुनाथा धाडिला ॥ ४ ॥
त्याचि बिभीषणाच्या वचना । प्रतीति आली दशानना ।
आतां करितोसी रुदना । स्वहितज्ञाना नेणसी ॥ ५ ॥
माझा बिभीषण येथें असता । तरी तो चुकविता अनर्था ।
ऐसें बोलसी लंकानाथा । शेखीं स्वहिता नेणसी ॥ ६ ॥
राजा रावण तूं अगाध । सहावा बंधूचा अपराध ।
स्वहित मानूनि विरोध । सखा बंधु दवडिला ॥ ७ ॥
स्वयें राजा तूं अज्ञान । प्रधान पशुबुद्धिसमाना ।
रामें करितां सेतुबंधन । तैं कां विघ्न न करीचि ॥ ८ ॥
सेतु बांधिता रघुनाथा । गर्वें न कळलें लंकानाथा ।
प्रधान अति उन्मादता । कोणे स्वहिता लक्षावें ॥ ९ ॥
लावोनियां भेरी निशाण । लंके आला रघुनंदन ।
देखोनि वानरांचे सैन्य । आतां उद्विग्न होतसां ॥ १० ॥
अग्नि बांधोनि वस्त्रांसी । जेंवी नेसविजे शरीरासी ।
तैसी दशा रावणासीं । केली पापराशी प्रधानीं ॥ ११ ॥
आणितां श्रीरामपरदारा । कोणी निषेधिना लंकेश्वरा ।
अनुमोदून दशशिरा । पापाचारा प्रवर्तविलें ॥ १२ ॥
सीताकोपतेजानुवृत्तीं । राक्षसांची शौर्यशक्ती ।
निःशेष गेली गा भस्मांतीं । उरले दिसती निर्वींर्य ॥ १३ ॥
अभिलाषितां सीता सती । रावणाचीं यशःकीर्ती ।
अवघी जाली गा अपकीर्ती । जग निंदिती नष्टत्वें ॥ १४ ॥
रावण भोगी सीतारत्‍न । आम्ही रामासीं करुं रण ।
ऐसें बोलिले प्रधान । काळें वदन तयांचें ॥ १५ ॥
तुमची यश कीर्ति शौर्यवृत्ती । जळाली सीताक्रोधानुवृतीं ।
अवघियांची क्षीण शक्ती । रणीं मारुति न जिंकवे ॥ १६ ॥
एकला एक हनुमंत । तेणें मारिला अखया सुत ।
इंद्रजित करोनि हताहत । केला निःपात सैन्याचा ॥ १७ ॥
ते काळीं कपींसीं रण । करावया नाही आंगवण ।
पळाले सैन्येंसी प्राधान । जीव घेऊन लंकेशा ॥ १८ ॥
येथें आणिली सीता सती । तुमची भस्म जाली शक्ती ।
रणीं न ये यश कीर्ती । जाण निश्चिती लंकेशा ॥ १९ ॥

कुभकर्णाला रावणाची युद्ध करण्याविषयी विनंती :

रावण म्हणे कुंभकर्ण बंधु । किती लाविसी गतापराधु ।
पुढां ओढवला युद्धसंबंधु । आला सन्नद्ध कपितभार ॥ २० ॥
ऐकोनि रावणाचें वचन । कुंभकर्णा आले स्फुरण ।
करावया रणकंदन । काय गर्जोन बोलत ॥ २१ ॥

नैवमर्हसि वत्कुं त्वं मयि जीवति पार्थिव ।
तमहं शासयिष्यामि यत्कृते परितष्यते ॥४२॥
शत्रुणां कदनं पश्य क्रियमाणं मयानघ ।
अद्य पश्य महाबाहो मया समरमूर्द्धनि ॥४३॥
हतं रामं सह भ्रात्रा द्रवंतीं कपिवाहिनीम् ।
अद्य रामस्य दृष्ट्रवा त्वंमया नीतं रणे शिरः ॥४४॥
सुखी भव महाराज सीता भवतु दुःखिता ।
अद्य रामस्य निधनं पश्यंतु सुमहत्प्रियम् ॥४५॥

कुंभकर्ण युद्धावर जाण्याची तयारी दाखवितो :

त्रिसत्य सत्य नारदवचन । श्रीरामबाणीं आम्हां मरण ।
हेंचि बोलता आपण । दुःखी रावण होतसे ॥ २२ ॥
आम्हां अवश्य आलें मरण । दुःखी न करावा रावण ।
जेणे पावे सुख संपूर्ण । तैसे आपण अनुवादे ॥ २३ ॥
कुंभकर्ण म्हणे रावणा । मज जीवें जिता जाणा ।
तुज मी जाऊं नेदीं रणा । रघुनंदनासी युद्धार्थी ॥ २४ ॥
मी घरचा सेवक निजबंधु । असतां स्वामींसीं युद्धसंबंधु ।
पडो देतां सेवक मंदु । परम बाधु सेवकत्वा ॥ २५ ॥
स्वयें करावया जाईन रणा । ऐसें न बोलावें वचना ।
तुझ्या शत्रूचे मर्दना । मी करीन लंकेशा ॥ २६ ॥
ज्याचा धाक अहोरातीं । नित्य वाहसी लंकापती ।
ते म्यां मारिले रणख्याती । मानीं निश्चितीं लंकेशा ॥ २७ ॥
राम लक्ष्मण निधडे दोनी । मी मारीन रणांगणीं ।
मारीन वानरांच्या श्रेणी । रणभंगाणी कपिकुळा ॥ २८ ॥
रणीं मारिले राम सौ‍मित्र । हे बोलणें अनुमानकर ।
दोहींचें देईन आणूनि शिर । तरी मी साचार सेवक ॥ २९ ॥
आणिल्या श्रीरामाचें शिर । सुखीं होईल दशशिर ।
दुःखी होईल सीता सुंदर । ऐसा रणमार करीन ॥ ३० ॥
रणीं पाडिले राम सौ‍मित्र । स्वर्गी देखती सुरवर ।
भूतळीं देखती नर किन्नर । ऐसा रणमार करीन ॥ ३१ ॥

अद्य रामं ससौ‍मित्रिं ससुग्रीवं समारुतिम् ।
सर्वानेकायने हन्मि प्रतिज्ञा मे तवाग्रतः ॥४६॥

कुंभकर्णाची आत्मप्रौढी :

गर्जोनि बोले कुंभकर्ण । आजिंचें माझें मुख्य रण ।
शत्रु मारोनि संपूर्ण । आंगवण दावीन मी ॥ ३२ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । अंगद सुग्रीव हनुमान गहन ।
अवघे मारीन वानरगण । एकला जाण मी एक ॥ ३३ ॥
रणप्रवीण दोघे येथ । सौ‍मित्री आणि रघुनाथ ।
त्यांसीं भिडेन रणाआंत । जंव पुरुषार्थ पुरे त्यांचा ॥ ३४ ॥
दोघे मारुन रणाआंत । वानर भक्षीन समस्त ।
सुग्रीव अंगद हनुमंत । लोणच्यार्थ खाईन ॥ ३५ ॥
एकला एक मी आपण । ऐसें करीन रणकंदन ।
रावणा वाहतों तुझी आण । परम प्रमाण हें माझें ॥ ३६ ॥
म्हणसी ऐसें कोणे काळीं । आजचि आतां ये वेळीं ।
मर्दून शत्रूंची समफळी । तुजजवळी येईन ॥ ३७ ॥
सायुध सज्ज सन्नद्ध जाण । युद्धा निघतां कुंभकर्ण ।
मंदोदरी आली आपण । रणकंदन वारावया ॥ ३८ ॥
युद्धा जातां कुंभकर्ण । क्षणार्धे राम घेईल प्राण ।
रणीं निमाल्या कुंभकर्ण । शिष्टाई पूर्ण चालेना ॥ ३९ ॥
श्रीरामासीं करितां रण । अवश्य मरेल कुंभकर्ण ।
रावणातें निवारावया जाण । आली आपण मंदोदरी ॥ ४० ॥
एका जनार्दना शरण । पुढें गोड निरुपण ।
मंदोदरी आणि रावण अनुवादन निजगृह्य ॥ ४१ ॥
स्त्रीपुरुषांचा एकांत । विवादामाजी परमार्थ ।
बाप लाघवी रघुनाथ । वैरियां देत सायुज्य ॥ ४२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां रावण
कुंभकर्णसंवादो नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥ २२ ॥
ओंव्या ॥ १४२ ॥ श्लोक ॥ ४६ ॥ एवं ॥ १८८ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाविसावा