संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा

लक्ष्मण – सीतेचे समाधान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

त्रिगुणांची जटा शिरीं । सर्वथा युगाचे सुरासुरीं ।
स्वयें त्याची केली बोहरी । भजनेंकरी रामाच्या ॥ ॥
लागोनियां भजनवाटा । सोडिला त्रिगुणांचा कुरुठा ।
नांवें साचार त्रिजटा । भजननिष्ठा उगवली ॥ २ ॥
ऐसी त्रिजटेची ख्याती । चरित्र पावन त्रिजगतीं ।
बिभीषणें करोनि विनंती । विमान रघुपती अर्पिलें ॥ ३ ॥
तें न घेच रघुनाथ । तेणें बिभीषण सचिंत ।
विमाना न शिवे रघुनाथ । भाग्यहत मी करंटा ॥ ४ ॥
विमानेंकरोनि तत्वतां । कांहीं सेवा रघुनाथा ।
माझी पावेल अल्पता । सकळ वृथा तें झालें ॥ ५ ॥

बाह्म उपचारांनी राम वश होणें नाही :

तरीं ऐसें केंवी घडे । जे बाह्म पदार्थी सेवा जोडे ।
बाह्य सर्वथा रामा नावडे । वृथा वेडे शिणताती ॥ ६ ॥
ऐसा निश्चिय मानोनि चित्तीं । मौनें नमिला रघुपती ।
तंव झाली नवलगती । आला निश्चितीं विश्वकर्मा ॥ ७ ॥

श्रीरामांसाठी विश्वकर्म्याने नवे कामग विमान तयार करून दिले :

घालोनियां लोटांगण । विनविला रघुनंदन ।
करावया अयोध्यागमन । नवें विमान करीन मी ॥ ८ ॥
विश्वकर्मा अति निगुतीं । रचिता झाला विमानस्थिती ।
आजन्म कष्टांची विश्रांती । श्रीरघुपती सेविलिया ॥ ९ ॥
येणें संतोषेंकरोनि जाण । निर्मिता झाला विमान ।
संकल्पमात्रें करी गमन । म्हणोनि अभिमान कामग ॥ १० ॥

विमानाची पर्वताकार विशालता :

अति प्रचंड पर्वताकार । रचिलें अति मनोहर ।
तेथील खणांचा विचार । संक्षेपाकार सांगेन ॥ ११ ॥
कोणी म्हणती एक खण । कोणी भाविती त्रिखण ।
कोणी भाविती पंचखण । कोणी दशखण भाविती ॥ १२ ॥
एक भाविती षोडश । एक सांगती एकवीस ।
एक सांगती पंचवीस । स्वमतें असोस बोलती ॥ १३ ॥
निश्चय पाहतां संपूर्ण । एकीं अनेक भाविती खण ।
एक अनेक हे वणवण । नाहीं जाण दुखण्यासी ॥ १४ ॥
अठ्ठावीस छत्तीस म्हणती । ते जाणावी अवघी भ्रांती ।
एकीं अनेकांची स्थिती । स्वमतें बोलती बहुविध ॥ १५ ॥
तळींहून चढती खण । शेवटिल्या खणा जातां पूर्ण ।
हरपे खणांची खणखण । ऐसें विंदान साधिलें ॥ १६ ॥
सात पौळी अति सुटंका । दहा गवाक्षें पैं देखा ।
पंचप्रकारीं रचिलें चोखा । गाडोरा सुरेख त्रिगुणांचा ॥ १७ ॥
किंकिणीं ज्वाळमाळांचे परी । पन्नास आगळ्या दोनी वरी ।
तयांमाजी मुख्य चारी । निरंतरीं वाजत ॥ १८ ॥
इतर माळांचिया हारी । शोभताती नानापरी ।
गुंफिलिया त्रिप्रकारीं । नादाची परी अलोलिक ॥ १९ ॥
जे जे काळीं प्रीत जैसी । ध्यनि उमटे तैसी तैसी ।
दहा चाळक मुख्य त्यासी । इतर नादांसी नाहीं संख्या ॥ २० ॥
नित्य प्रकाशालागूनी । दीपशिखा पै धरोनी ।
शशिसूर्य अनुदिनीं । दिवारजनीं तिष्ठत ॥ २१ ॥
नवलक्ष दीपावळी । नित्य शोभती अंतराळीं ।
औटकोटी भूमंडळी । पताकाओळी मंडित ॥ २२ ॥
मध्यखणीं हुताशन । नित्य करितसे पाचन ।
क्रियाशक्तिसंपादन । पाकशासन करीतसे ॥ २३ ॥
अरुचि उपजेल भोजनीं । म्हणोनि वैद्यराज दोनी ।
अश्वनीदेव अनुदिनीं । ओषधि घेवोनि वोळंगती ॥ २४ ॥
भक्तिज्ञान वैराग्य चौखट । अति सुरस त्रिकूट ।
यथाकाळें एकनिष्ठ । अति निर्दुष्ट पुरविती ॥ २५ ॥
दशधा वायूचे पदर । तेचि दशदिशा अलंकार ।
जावों न देती सैर । मर्यादापर वागविती ॥ २६ ॥
चाळक तयासीं मारुती । संकल्पमात्रें गमनस्थिती ।
नित्य वर्तवी मनोवृत्ती । श्रीरघुतिनिजमतें ॥ २७ ॥
आज्ञाशासन निरंतर । कर्ता स्वामी सौमित्र ।
त्याचेनि अनुमतें साचार । गगनसंचार विमाना ॥ ८२ ॥
अति जिवलग पूर्ण । शुद्धभावार्थी बिभीषण ।
वागवावया विमान । आज्ञापन त्यासी केलें ॥ २९ ॥
बिभीषणासीं सखा जाण । सुष्ठबुद्धि सुग्रीव पूर्ण ।
विवेक वैराग्य समान । निजसमान वागविती ॥ ३० ॥
ऐसी निजकळा नागर न । धात्यानें रचिलें विचित्र ।
जेथें साक्षी श्रीरामचंद्र । असे अगोचर होउनी ॥ ३१ ॥
ऐसें साधोनि विंदान । विश्वकर्मा आपण ।
पुढें ठेवोनि विमान । रघुनंदन नमियेला ॥ ३२ ॥

लंकेमध्ये श्रीरामांची पूजा घडणार नाही म्हणून बिभीषणाच्या मातेला अतीव दुःख :

येरीकडे लंकाभुवनीं । बिभीषणाची जननी ।
श्रीरामगमन ऐकोनी । झाली मनीं अति दुःखी ॥ ३३ ॥
ऐसें होतें निजमानसीं । राम प्रवेशेल लंकेसीं ।
तेणें काळे अति प्रीतीसीं । यथा सामर्थ्येंसीं पूजीन ॥ ३४ ॥
रूप पाहेन डोळेभरी । गोष्टी सांगेन तोंडभरी ।
वचन ऐकेन कानभरी । तैसेंच अंतरीं पै ध्यान ॥ ३५ ॥
अनंत जन्मांचें कल्मष पूर्ण । जें पुढेही करीन दुराचरण ।
त्याचें करावया क्षाळण । श्रीरामागमन वांछित ॥ ३६ ॥
श्रीरामभजनीं प्रीती गाढी । तेणें सर्वसंसारबेडी ।
तुटे न लागतां अर्धघडी । योनिसांकडी पै निरसे ॥ ३७ ॥
याचि आशा उत्कंठित । श्रीरामाची वाट पाहत ।
तंव ऐकिलें विपरीत । राम गमनस्थ अयोध्ये १३८ ॥
तरी आपलेंचि भाग्य हीन । उत्कंठा न होतां पूर्ण ।
आम्हांसि न देतां दर्शन । अयोध्यागमन मांडिलें ॥ ३९ ॥
श्रीरामचरणीं नव्हेचि भेटी । वज्र पडो ये ललाटी ।
भाग्ये अतिशयें करंटी । फुंदे गोरटी अति दुःखी ॥ ४० ॥
करें पिटी ललाट । हृदयावरी हाणी चपेट ।
रामें उद्धरिला दशकंठ । उपेक्षा निष्टंक आम्हांसी ॥ १४ ॥
चोरोनि आणिली निजभाज । तो उद्धरिला राक्षसराज ।
आम्हां मोकलोनि रघुराज । केंवी प्रयाणवोज करितसे ॥ ४३ ॥
धन्य मंदोदरी पतिव्रता । निजांगेंचि तत्वतां ।
भेटोनिया श्रीरघुनाथा । संसारखता फाडिलें ॥ १४ ॥
श्रीरामतेजें आपण । पतीसवेसहगमन ।
करोनियां जन्ममरण । क्षणें जाण निरसिलें ॥ ४४ ॥
करोनियां निजख्याती । सायुज्यिला रघुपती ।
तैसीच सुलोचना सती । निजमुक्ती साधिली ॥ १४५ ॥
मंदभाग्य मी करंटी । निजांगेंचि उठाउठीं ।
श्रीरामाची निजभेटी । कडकडाटीं न घेचि ॥ १४६ ॥
म्हणोनियां अति उद्विग्न । उकसाबुकसीं स्कृंदन ।
स्वयें करीतसे आपण । तेणें राम पूर्ण कळवळला ॥ ४७ ॥

कैकसीची तळमळ पाहून तिला भेटीसाठी आणण्यास श्रीरामांची आज्ञा :

अंतर्यामीं श्रीरघुनाथ । तेणें जाणोनि अवचित ।
स्वयें बिभीषणा सांगत । तुमची माता येथें न येचि भेटी ॥ ४८ ॥
तुम्हांसी स्मरण नाहीं निश्चित । आम्ही निजकार्यीं दुश्चित ।
मातेची भेटी न घेत । केवी निघत अयोध्ये ॥ ४९ ॥
येरु मस्तक ठेवोनियां चरणां । स्वयें विनवी रघुनंदना ।
स्वामीचिया निजदर्शना । उत्कंठा मना मातेसीं ॥ ५० ॥
स्वामीनें स्मरण न करितां । केंवी आणू न पुसतां ।
यालागीं रघुनाथा । नाहीं माता आणिली ॥ ५१ ॥

मातेला आण्ण्यासाठी बिभीषण दूतांना धाडतो :

आज्ञेप्रमाणें आतां । घेऊन येईन निजमाता ।
म्हणोनि ठेवी चरणावरी माथा । धाडी सत्वरता दूतासी ॥ ५२ ॥
आज्ञापिलें रघुनंदनीं । भेटों आणी निजजननी ।
तुम्हीं सवेग जाऊनी । भेटीलागोनी आणावी ॥ ५३ ॥
माझें सांगोनी लोटांगण । श्रीरामभेटीलागून ।
स्वयें आणावी आपण । अविलंबें करू न जाण येथें ॥ ५४ ॥
वंदोनियां तें वचन । लंकेमाजी येऊन ।
माते कैकसीलागून । केलें नमन सेवकीं ॥ ५५ ॥
अयोध्येसीं प्रयाण करितां । तुझे भेटीलागीं यथार्थता ।
राहणे झालें रघुनाथा । मूळ तत्वतां धाडिलें ॥ ५६ ॥

दूतांनी कैकसईक्त विमानातून येण्याचे विनविले कैकसी आनंदित :

अंगीकारोनी श्रीरामाज्ञा । वेगीं बैसोनि विमाना ।
शीघ्र करावें प्रयाणा । श्रीरामदर्शनालागूनी ॥ ५७ ॥
ऐकोनियां तो वचनार्थ । झाली पूर्ण आनंदभरित ।
पूर्वार्जित जे मनोरथ । ते समस्त आजि कळले ॥ ५८ ॥
श्रीरामदर्शना चित्त । होतें अत्यंत उत्कंठित ।
बाप कृपाळु रघुनाथ । अंतरवृत्त जाणता ॥ ५९ ॥
भेटावया रघुपती । न चले यानाची निजगती ।
यानारूढ विषयस्थिती । सर्वथा रघुपती भेटेना ॥ ६० ॥
भाग्य फळा आलें माझें । जें स्मरण केलें रघुराजें ।
चरणीं चालत निजवोजें । भेटी जाइजे हेंचि भले ॥ ६१ ॥
म्हणोनियां राजमाता । चरणीं चालली तत्वतां ।
भेटावया रघुनाथा । हर्षितचित्ता निघाली ॥ ६२ ॥
निघोनि नगराबाहेरी । आली रामसैन्याभीतरी ।
पुढें येवोनि झडकरी । धरिली करी बिभीषणें ॥ ६३ ॥

श्रीरामदर्शनाने कैकसीला अत्यंत प्रेमानंद होतो :

नेतां श्रीरामासंमुख । आनंदभरित रघुकुळटिळक ।
माता देखोनि एकाएक । आलिंगी देख निजप्रेमें ॥ ६४ ॥
आलिंगितां देख एकाएक । कैकसी सुखाची झाली देख ।
जन्म मृत्यु जरा अशेख । स्वयें निःशेख विसरली ॥ ६५ ॥
विसरली ते पुत्रशोक । विसरली ते द्वंद्वदुःख ।
इहलोक परलोक । लोकालोक विसरली ॥ ६६ ॥
श्रीरामीं देतां आलिंगन । विसरली देहाचे भान ।
विरोनि गेली स्वयें आपण । जेंवी लवण जीवनीं ॥ ६७ ॥
श्रीराम भेटलिया तत्वतां । तुच्छ त्यापुढें समाधि अवस्था ।
सलोकता स्वरूपता । सायुज्यता सरेना ॥ ६८ ॥
ऐसें पडिलें आलिंगन । ते स्वरूपीं समावे संपूर्ण ।
युक्ती सोडवून रघुनंदन । मनोहर आपण वचन बोले ॥ ६९ ॥

रावणाचे दोष त्याच्या मातेला सांगून राम तिची समजूत घालतात :

रावण आणि कुंभकर्ण । तुझें पुनीत संतान ।
वधिता झाला रघुनंदन । ऐसें आपण न म्हणावें ॥ ७० ॥
अभिलाषितां पतिव्रता । सकुळ रावणा क्षोभली सीता ।
तिणें करविलें त्याच्या घाता । बोल सर्वथा आम्हांसी ॥ ७१ ॥

परनारीचा अभिलाष हेच सर्वनाशाचे आदिकारण :

जी अभिलाषी परनारी । पतिव्रता त्याहीवरी ।
त्यासी ठाव नेदी धरित्री । पचें अघोरीं कल्पकोटी ॥ ७२ ॥
सीता जन्मली धरेभीतरीं । ते अभिलाषी कपटेंकरीं ।
म्हणोनि क्षोभली धरित्री । केली बोहरी कुळेंसीं ॥ ७३ ॥
परदारगामी नर । त्याचा भार अति दुर्धर ।
धरा साही न शके अणुमात्र । जाय सत्वर रसातळा ॥ ७४ ॥
महापर्वत पाषाण । चतुर्विध सृष्टि संपूर्ण ।
त्याचा भार अणुप्रमाण । नाहीं जाण धरेंसीं ॥ ७५ ॥
विषयी विषयलुब्ध देख । परदारगामी विशेख ।
पतिव्रते विक्षेपक । भार देख धरेसी ॥ ७६ ॥
तेणें अधर्म दाटली । धरा अतिशयें क्षोभली ।
सकुळ समाप्ति केली । रावण धुळीं मेळविला ॥ ७७ ॥

रावण विश्वद्रोही होता, सीताराम ही निमित्तमात्र :

एका क्षोभली जनकबाळी । सर्वथा न घडे हेही बोली ।
विश्वद्रोहाची इंगळी । समूळ मूळीं पडिलासे ॥ ७८ ॥
ब्राह्मणांचे वृत्तिहरण । स्वधर्माचें विच्छेदन ।
बंदीं घातले सुरगण । विरोध पूर्ण त्रैलोक्या ॥ ७९ ॥
मुख्य ध्येय श्रीशंकर । ज्याचेनि सकळ दुस्तर ।
निरसोनि पाविजे परात्पर । जो सुखसार निजभक्ता ॥ ८० ॥
त्याचे ठायीं उन्मादता । सेव्यासेव्य न विचारितां ।
भोगूं मागे स्वामीची कांता । गुरु तल्पगता रावण ॥ ८१ ॥

रावणाने पार्वतीची अपेक्षा केल्यामुळेच तिने रावणाचे भस्म केले :

उमा क्षोभली अति क्रोधेंसी । सकुळसैन्यपुत्रेंसीं ।
भस्म केलें रावणासी । बोल आम्हांसी न ठेवावा ॥ ८२ ॥
देवद्रोही ब्रह्मद्रोही । विश्वाचा तो विश्वद्रोही ।
जगद्‌गुरु शंकराचापाही । गुरुद्रोही रावणा ॥ ८३ ॥
सकळ पापांहूनि विशेषतां । मुख्य पाप गुरुतल्पगता ।
सकुळ तेणें पावला घाता । जाण तत्वतां कैकसी॥ ८४ ॥

बिभीषणाच्या पुण्याईची थोरवी राम वर्णितात:

निजपापेंकरोनि पूर्ण । जावा अधःपाता रावण ।
शुद्ध धर्मात्मा बिभीषण । तेणें तो जाण उद्धरिला ॥ ८५ ॥
बंधूच्या सख्यत्वें पूर्ण । श्रीशंकरें कृपा करून ।
केला निष्पाप रावण । अपराधी पूर्ण जाणतांही ॥ ८६ ॥
रावणाची सगर्वता । कळों आली पै समस्तां ।
क्रोधें हाणितल्या ज्यासीं लाता । तेणेंचि तत्वतां उद्धरिले ॥ ८० ॥
सावध ऐकें कैकसी । धन्य धन्य तुझी कुसी ।
बिभीषणातें प्रसविलीसी । सकळ कुळासी उद्धरण ॥ ८८ ॥
रावणाच्या पापें त्वरित । नरका जावें कुळासहित ।
धन्य भाग्याचा हा हरिभक्त । सकळ कुळ निश्रित उद्धरिलें ॥८९ ॥
दोहींची स्थिती निश्चितीं । प्रत्यक्ष दिसे हातोहाती ।
असत्पुत्रें नरकप्राप्री । उद्धारगती सत्पुत्रें ॥ ९० ॥
रावणाचेनि दुराचरणें । जग निंदी मातेकारणें ।
बिभीषणाचेनि साधुपणें । जनें वानणें तुजलागीं ॥ ९१ ॥

कुलं पवित्रं जनजी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन ।
अपारसंवित्सुखसागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः ॥ १ ॥

कृतार्थ माता कोणती ? :

हरिभक्त ब्रह्मसंपन्न । ज्याच्या कुळी होय उत्पन्न ।
तेणें सकळ कुळ पावन । ब्रह्मसंपन्न पै होत ॥ ९२ ॥
हरिभक्त जन्मे जिचे कुसीं । अवघें त्रैलोक्य वंदी तिसी ।
तें प्रत्यक्ष घडलें कयाधूसीं । झाली जगासी अतिवंद्य ॥ ९३ ॥
प्रल्हाद नुपजतांचि पूर्वी । नारद मानी सर्वभावीं ।
बंदिमोचन इंद्रादि देवीं । प्रसूति भावी ऐकतां ॥ ९४ ॥
जेथें राहती भगवद्‌भक्त । तें भूमंडळ होय पुनीत ।
कीर्तनसुखें डुल्लत । जग उद्धरत ज्यांचेनि ॥ ९५ ॥

वाग्गद्‌गदा द्रवते यस्य चित्तं रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च ।
विलज्ज उद्‌गायति नृत्यते च मद्‌भक्तियुक्तो भुवनं पुनाति ॥ २ ॥

भगवद्‌भक्ताची लक्षणे :

ज्याचेनि भूमडळ पावन । ऐक त्या भक्ताचें लक्षण ।
स्वयें बोलिला भगवान । जडउद्धरण ज्याचेनि ॥ ९६ ॥
आनंदें करिती हरिकीर्तन । नामें सर्व गर्जे गगन ।
श्रोतिया वक्तयाचें अंतरक्षाळण । न लागतां क्षण पै होय ॥ ९७ ॥
क्षाळलेनि अंतरे । परमानंद अंतरीं भरे ।
चित्त चित्तपणा विसरे । न देखे दुसरें जगामाजी ॥ ९८ ॥
जगाचे ठायीं विषमता । चित्तपणें भासे चित्ता ।
तेणें श्रवण कीर्तन करितां । स्वयें भगवंता रातले ॥ ९९ ॥
तेणें अंतर सुखावे तत्वतां । विषम जगामाजी पाहतां ।
बुडाली विषमाची वार्ता । चिदाभासता सर्वत्र ॥ १०० ॥
जेथें दुजेपणाचें भान । तेंचि लाजेसीं आयतन ।
हारपलें द्वैतभान । लज्जा पूर्ण निमाली ॥ १०१ ॥
उन्मत्ताचे परी जाण । निर्लज्ज करी कीर्तन ।
तेणें कीर्तने सदा आपण । करी नर्तन तालच्छंदें ॥ १०२ ॥

मद्यरसाने संसार विरण्यापेक्षा ब्रह्मरसाने देहातीत होणे केव्हाही चांगले :

जो मोलें घेऊनि मद्यासी । स्वयें होय विषयविलासी ।
तो विसरे देहभावासी । द्वैत त्यासी भासेना ॥ १०३ ॥
उन्मादरस विचित्र । मेळवूनी केलें एकत्र ।
त्याचा एवढा बडिवार । क्षणें संसार विसरवी ॥ १०४ ॥
सकळ रसाचें रसपान । जे गोडियेमाजी होती निमग्न ।
तो ब्रह्मरस सेविलिया जाण । संसारभान केंवी उरे ॥ १०५ ॥
ऐसे ब्रह्मरसमहायोगें । जगीं मद्‌भक्त दाटुगे ।
कळिकाळातें जिणोनि वेगें । नामबळें जग उद्धरती ॥ १०६ ॥
एवढें भक्ताचें महिमान । तो तुझा पुत्र बिभीषण ।
भगवद्‌भजनें अति पावन । जंग उद्धरणे याचेनि ॥ १०७ ॥
हरिभक्तांची नाममाळा । प्रातःस्मरणीं स्मरतां अबळा ।
महापातकांचा पाळा । एके हेळां भस्म होत ॥ १०८ ॥

बलिर्बिभीषणो भीष्म प्रल्हादो नारदो ध्रुव: ।
षडैते वैष्णवा ज्ञेयाः स्मरणं पापनाशनम् ॥ ३ ॥

महाविष्णूचें वरद ऐसें । भक्तस्मरणें पाप नासे ।
तुझें भाग्य उत्कट कैसें । पुत्र बैसे भक्तओळी ॥ १०९ ॥
ऐसें मातेचें शांतवन । स्वयें करी रघुनंदन ।
येरी घालोनि लोटांगण । करी विनवण स्वामीचें ॥ ११० ॥
ऐकें स्वामी रघुनंदन । तुझ्या निजभजनें सकळ कल्याण ।
भजनास्तव कुसवा धन्य । धन्य संतान तुझेनि ॥ १११ ॥
धन्य रावण कुंभकर्ण । तुवां निजहस्तें विंधोनि बाण ।
पुत्रां दिधलें सायुज्यसदन । भाग्य कोण त्याहूनी ॥ ११२ ॥
एकल्या न देतां मुक्ती । उद्धरिली सकुळ संतती ।
अगाध रामभजनाची ख्याती । राक्षसां मुक्ति हटेंतटें ॥ ११३ ॥
विरोधें पावले मुक्तीसी । न कळे भजे त्या काय देसी ।
काय वानूं बिभीषणासी । म्हणोनि चरणांसी लागली ॥ ११४ ॥
उठोनियां वेगेंसीं । श्रीरामें धरिली हदयेंसीं ।
धन्य धन्य ते कैकसी । श्रीराम भजनासीं विनटली ॥ ११५ ॥

कैकसी- रामभेटकथा क्रौंचरामायणातील आहे :

श्रोते विषम मानिती पोटीं । मूळीं देखिली नाहीं दृष्टी ।
कैकसी श्रीरामाची भेटी । नवी गोष्टी हे कैंची ॥ ११६ ॥
तरी ज्याचे पोटीं असेल आशंका । तेणें क्रौंचरामायण पहावें देखा ।
तेथील हा भाव निका ॥ असेल ठाउका ज्ञात्यांसी ॥ ११७ ॥
तरी शरण येतां रामासीं । माता तुष्टली बिभीषणासीं ।
श्रीरामीं प्रेमा कैकसीसीं । तेणें भेटीसीं सुचविलें ॥ ११८ ॥
अनंत कथा रामायणी । शतकोटि वदली वाल्मीकाची वाणी ।
सकळ कथा आलोडोनी । कोणी शोध न करूं शके ॥ ११९ ॥
माझें लोटांगण तत्वतां । कोप न मानावा श्रोतां ।
एका जनार्दनी वक्ता । तोचि वावयार्था चाळिता ॥ १२० ॥
असो आतां परिहारता । सैराट करी रामकथा ।
पावनकरी श्रोतां वक्ता । नित्यमुक्तता श्रीरामें ॥ १२१ ॥
यालागीं श्रोतेजन । आप्त इतर परिपूर्ण ।
त्यांसी-माझे लोटांगण । क्षमा आपण करावी ॥ १२२ ॥
श्रीरामें पावन श्रोता । श्रीरामें पावन वक्ता ।
श्रीरामकथा अनुमोदितां । उद्धरी तत्वतां श्रीराम ॥ १२३ ॥
पुढील कथानुसंधान । सवडी पाहोनि पूर्ण ।
सांडूनि श्रीरामअंकासन । जनकनंदिनी ऊठली ॥ १२४ ॥
होतां इतर संवादासीं । उठतां नयेचि जानकीसीं ।
उच्छ्रंखळता नाहीं तिसीं । मर्यादेशीं मंडन ॥ १२५ ॥

रामांच्या अनुज्ञेने सीता लक्ष्मणाचे चरणवंदन करून त्याची क्षमा मागते :

भेटावया सौमित्रासीं । आज्ञा पुसोनि राघवासी ।
जवळी येवोनि वेगेंसी । लागली चरणांसी अति प्रीतीं ॥ १२६ ॥
क्षमा करावी निश्चित । मी तुझें निजअपत्य ।
नेणतां दोघांचें महत्त्व । वचन दुरुक्त बोललें ॥ १२७ ॥
श्रीरामाचा जिवलग । त्यासीं छळितां सवेग ।
महापापिणी निजडाग ४ । मज सवेग लागला ॥ १२८ ॥
महापाप तें अल्प । भक्तच्छळण तें वज्रपाप ।
निरय भोगिजे आकल्प । नाहीं अल्प उद्धार ॥ १२९ ॥
तेणें पापें त्वरित । मज धरोनियां लंकानाथ ।
वेगें नेले लंकेआंत । श्रीरघुनाथ अंतरला ॥ १३० ॥
नित्यछळण रावणाचें । राखण क्रूर राक्षसींचें ।
खाऊं गिळू त्यांचें । दुर्ग लंकेचे सभोंवतें ॥ १३१ ॥
सकृत्‌ छळितां लक्ष्मण । पूर्ण क्षोभला रघुनंदन ।
नित्य रावणाचें छळण । सोसलें पूर्ण षण्मास ॥ १३२ ॥
श्रीराम भक्तांचा अंकित । श्रीराम भक्तांचा विक्रीत ।
भक्तां सबाह्य श्रीरघुनाथ । नित्य नांदत सर्वदा ॥ १३३ ॥
म्हणोनियां यथार्थ । जेणें पूजिले रामभक्त ।
तेणें पूजिला रघुनाथ । उपचारयुक्त षोडश ॥ १३४ ॥
घृतप्लुतअवदानीं । भक्त सुखावले भोजनीं ।
तेणें षड्रसें करोनी । केला रघुनंदनीं नैवेद्य ॥ १३५ ॥
जेणें विरोधिले रामभक्त । तेणें विरोधिला रघुनाथ ।
अमूर्त होवोनियां मूर्त । क्षणें घात करी त्याचा ॥ १३६ ॥
दुर्धर आयुधें अलोलिक । सुदर्शन गदादिक ।
अक्षयी भाते कोदंड देख । रघुकुळटिळक वागवीं ॥ १३७ ॥
भक्तविरोधी दारुण जाणा । तोचि वैरी रघुनंदना ।
त्याच्या करावया हनना । करी प्रेरणा शस्त्रांची ॥ १३८ ॥
प्रल्हादाची विरोधितां । मरण पावला त्याचा पिता ।
भगवद्‌भक्तांचा द्वेष करितां । विघ्नघाता वरपडा होय ॥ १३९ ॥
इतरांच्या कायशा गोष्टी । सौमित्र छळिलियासाठीं ।
राम लागोनि माझे पाठीं । क्षणें दिक्पटीं लाविलें ॥ १४० ॥
रामसेवेलागीं तत्वतां । वनवास घेतला माथां ।
ते नायकें श्रीरामकथा । ऐसी अवस्था मज झाली ॥ १४१ ॥
भक्तद्वेषी महापापिणी । अंतरलें रघुनंदनीं ।
तें उपसाहावें म्हणोनी । लोटांगण घातलें ॥ १४२ ॥
सौमित्रचरणीं माथा । ठेवोनियां जनकदुहिता ।
उकसाबुकसीं स्फुंदतां । अति अवस्था पै झालीं ॥ १४३ ॥

लक्ष्मणाचे सीतेस वंदन व स्वतःचे दोषदिग्दर्शन :

तें देखोनि सुमित्रानंदन । घालोनि सीतेसी लोटांगण ।
अश्रुपूर्ण झाले नयन । करी रुदन अट्टाहास्थें । १४४ ॥
तुझेनि वियोगें तत्वतां । अति अवस्था रधुनाथा ।
अंगीकारोनि पिशाचता । होय हिंडता वनोवनीं । १४५ ॥
एवढिया विघ्नासी कारण । मुख्य माझें अधैर्यपण ।
न साहवेचि एक वचन । महापापी पूर्ण मी एक । १४६ ॥
सीता लाविली दिक्पटीं । राम पाडिला अति संकटीं ।
विवरद्वारा उठाउठीं । नेती जगजेठी बांधोनी ॥ १४७ ॥
दुर्दशा श्रीरघुपती । मारावया उभा करिती ।
दैवे पातला मारुती । राक्षसपंक्ती निवटिल्या ॥ १४८ ॥
संदिसें तेथोनि निघतां बाहेरी । सवेंचि युद्धमहामारी ।
रावणेंसीं जुंझारी । शरधारीं वर्षती ॥ १४९ ॥
आणीक सांगों तें किती । शरबंधनीं रघुपती ।
विसंज्ञ पडिला क्षिती । हेही ख्याती पै माझी ॥ १५० ॥
रावणें केलें तुझें छळण । श्रीरामासी दृढ बंधन ।
इतुकियासी मूळ मी पापी पूर्ण । सत्य जाण जानकिये ॥ १५१ ॥
ऐसें परस्पर दोघें जण । येरयेरांचा गळा धरून ।
निजापराधी अति उद्विग्न । करिती रुदन अट्टाहास्यें ॥ १५२ ॥
तंव आश्चर्य झाले तेथ । श्रीरामचरण अवचित ।
दृष्टि पडतां निश्चित । शोक समस्त निमाला ॥ १५३ ॥
घालोनियां लोटांगण । विनविता झाला लक्ष्मण ।
मानू नको याचें दूषण । रघुनंदन लाघवी ॥ १५४ ॥

मूळ प्रेरणा देणारे श्रीराम आहेत, असे सांगून सीतेचे सांत्वन :

पूर्ण त्याचें मनोगत । राक्षस प्रबळले बहुत ।
त्यांचा करावया घात । विंदान येथ रचियेलें ॥ १५५ ॥
सर्वांतर्यामी श्रीरघुनाथ । सकुळ लाघव त्याचें येथ ।
तेणें संचरोनि हदयांत । उभयवृत्त संपादिलें ॥ १५६ ॥
तुझे छळणबुद्धीसीं कारण । मुख्य परमात्मा रघुनंदन ।
माझ्या अधैर्यासीं मूळ पूर्ण । तोचि जाण जानकिये ॥ १५७ ॥
शब्दे हाय वर्ण नाहीं होत । शब्दे प्राण नाही जात ।
शब्दे नव्हे देहपात । हें मी जाणत सर्वदा ॥ १५८ ॥
तेणें म्यां आपण । तुज शब्दासाठी जावें सोडून ।
हें माझें अधैर्य नव्हे जाण । केलें विंदाण श्रीरामें ॥ १५९ ॥
अति दुरात्मा रावण । केलें सकळांचे अवरोधन ।
त्यासीं वधावया जाण । करविले छळण तुजकरवीं ॥ १६० ॥
श्रीरामशक्ती तत्त्वतां । ते तूं बोलसी छळणवार्ता ।
त्यासीं मूळ श्रीराम कर्ता । विषाद सर्वथा न मानावा ॥ १६१ ॥
म्हणोनि घातले लोटांगण । वंदिले जानकीचे चरण ।
मजवरी कृपा करावी पूर्ण । विषाद आपण न मानवा ॥ १६२ ॥
ऐसी परस्परें विनवण । करिती येरयेरांची आपण ।
तेणें विस्मित बिभीषण । वानरगण विस्मित ॥ १६३ ॥
लाघव करोनि अद्‌मुत । निजापराधें पायां पडत ।
आपण साक्षी होवोनि तेथ । चरित्र पाहते दोघांचें ॥ १६४ ॥

श्रीराममहिमा :

स्मरतां श्रीरघुनाथ । महापातकी उद्धरत ।
यांचा अपराध किती तेथ । नित्यमुक्त श्रीरामें ॥ १६५ ॥
श्रीरामें पावन वक्ता । श्रीरामें पावन श्रोता ।
श्रीरामें पावन कथा । जगदुद्धारता श्रीरामें । १६६ ॥
श्रीरामें पावन वदन । श्रीरामें पावन श्रवण ।
श्रीरामें कर पावन । करितां पूजन चराचर ॥ १६७ ॥
करितां श्रीरामाचें ध्यान । श्रीरामे पावन होय मन ।
श्रीरामें चित्त पावन । करितां चिंतन रामाचें ॥ १६८ ॥
सांडूनि प्र्पंचआथी । श्रीरामी निश्चये धरितां बुद्धी ।
तेथें झाली विपरीत विधी । स्वयें समाधी होवोनि ठाके ॥ १६९ ॥
तेथें अभिमानाचें चिन्ह । स्वयेंचि पालटे आपण ।
सांडोनियां देहाभिमान । स्वयें रधुनंदन होऊनि ठाके ॥ १७० ॥
अगाध श्रीराममहिमान । मनचि होवोनि उन्मन ।
चित्त होय चैतन्यघन । बुद्धि ते जाण समाधी ॥ १७१ ॥
अहं तेंचि आपण । होवोनि ठाके सोहं पूर्ण ।
एका जनार्दना शरण । लाघवी पूर्ण श्रीराम ॥ १७२ ॥
पुढें अयोध्येचें गमन । श्रीरामाचें अभिषिंचन ।
सुरस कथा अति गहन । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ १७३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सौमित्रिजानकसिमाधानं नाम द्विससतितमोऽध्याय ॥ ७२ ॥
॥ ओंव्या १७३ ॥ श्लोक ३ ॥ एवं १७६ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बाहत्तरावा