भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अकरावा
इंद्रजिताकडून श्रीरामांना शरबंधन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
इंद्रजिताचा मांत्रिक रथ अग्नीतून बाहेर आल्यवर रणामध्ये आगमन :
पूर्वप्रसंगी इंद्रजित वीर । होम करुनी अभिचार ।
शस्त्रें पावला रहंवर । तेणें तो दुर्धर खवळला ॥ १ ॥
अभंग रथ अश्व अमर । रथीं दिव्यास्त्रसंभार ।
ऐसा पावोनि रहंवर । रणीं जावया निघाला ॥ २ ॥
बैसोनि तया रथावरी । अदृश्य इंद्रजित गगनांतरीं ।
येतां रणभूमीवरी । देख जुंझारी नरवानर ॥ ३ ॥
स ददर्श महावीर्यस्तावुभौ रामलक्ष्मणौ ।
क्षिपंतौ शर जालानि कपिमध्ये व्यवस्थितौ ॥१॥
स तु वैहायसं प्राप्य रथं तौ रामलक्ष्मणौ ।
आचचक्ष रणे तस्मिन्विव्याध निशितैः शरैः ॥२॥
तौ तस्य शरवेगेन पतितौ भ्रातरावुभौ ।
गृहित्वा धनुशी व्योम्नि घोरान्मुमुचतुः शरान् ॥३॥
देखिले राम लक्ष्मण वीर । वानरभार सहपरिवार ।
करिती निशाचरां मार । रणीं वानर खवळोनी ॥ ४ ॥
श्रीरामांच्या शब्दवेधी बाणांच्या हल्ल्याने राक्षसांची धांदल :
इंद्रजित नभीं रथस्थिती । राहोनियां अदृश्यगतीं ।
राम लक्ष्मण उभयमूर्ती । शरसंपातीं विंधिले ॥ ५ ॥
बाणीं वेढिले राम सौमित्र । बाणीं व्यापिलें अंबर ।
बाण वर्षोनि दुर्धर । धरा समग्र खिळियेलीं ॥ ६ ॥
गगनाहून अति दुर्धर । येतां देखोनियां शर ।
क्षोभोनि राम सौमित्र । धनुष्य सत्वर वाहिलें ॥ ७ ॥
पुढें लक्षेना लक्ष जाण । कशावरी विंधावे बाण ।
ऐसें लक्षितां रघुनंदन । ऐके गुणगुण राक्षसांची ॥ ८ ॥
आकाशीं अदृश्यगती । इंद्रजिताची परम शक्ती ।
स्वयें आल्हादें अनुवादती । धरुं रघुपती शरबंधें ॥ ९ ॥
राम शब्दवेधी निपुण । अचुक बाणीं अनुसंधान ।
शब्दानुगतीं विंधोनि बाण । छेदी वदन वक्त्याचें ॥ १० ॥
वीर सांगती वाढिव लाठी । शब्दासवें शर उठीं ।
बाण भेदोनियां कंठीं । पाडी सृष्टीं राक्षसां ॥ ११ ॥
राक्षस गर्जती चवकोन । गजरासवें विंधोनि बाण ।
सब्दवेधी रघुनंदन । करी कंदन राक्षसां ॥ १२ ॥
बाणीं त्रासिले देतां हाक । हाकेसवे बाण असंख्य ।
विधोनियां एक एक । निर्दाळीं कतक शत्रूचें ॥ १३ ॥
वीरीं वानितां आंगवण । शब्दासवें विंधोनि बाण ।
जिव्हा सदंत छेदून । करी कंदन राक्षसां ॥ १४ ॥
घायवट वीर कुंथतां जाण । कुंथासवें येवोनि बाण ।
त्यांचे कंठनाळ छेदून । करी कंदन राक्षसां ॥ १५ ॥
उंच करुं जातां गोष्टी । बाण येवोनि भरती कंठीं ।
बोंबलूं जातां पैं शेवटीं । सपिच्छ ओठीं बाण भरती ॥ १६ ॥
इंद्रजितधनुष्याचा झणान । ऐकोनियां रघुनंदन ।
नादासवें विंधोनि बाण । चाप छेदून पाडिलें ॥ १७ ॥
श्रीराम आहे शब्दवेधी । इंद्रजित जाणों सरला बुद्धी ।
बोलणें सांडोनि त्रिशुद्धी । निःशब्दवादी राहिला ॥ १८ ॥
कांहीं बोलतां आपण । अंगीं वाजती श्रीरामबाण ।
वीरीं सांडून अनुवादन । महामौन राक्षसां ॥ १९ ॥
अदृश्यगती गुप्त गमन । तेथें येवोनि श्रीरामबाण ।
राक्षसांसी केलें कंदन । रघुनंदन दृढ योद्धा ॥ २० ॥
शब्दवेधें श्रीरामशर । येवोनियां अति दुर्धर ।
मारिले राक्षसांचे भार । श्रीरामचंद्र दृढ योद्धा ॥ २१ ॥
श्रीराम आहे शब्दवेधीं । इंद्रजितें जाणोनि त्रिशुद्धी ।
तेणें कैसी केली बुद्धी । तोही विधी अवधारा ॥ २२ ॥
सैन्य सेनानी प्रधान । त्यांसीं इंद्रजित सांगे आपण ।
येथोनि धरावें दृढ मौन । बोलतां मरन रामबाआणीं ॥ २३ ॥
नैव ज्यातलनिर्घोषो नापि नेमिखुरस्वनः ।
शुश्रुवे चरतस्तस्य न च रुपं स्म दृश्यते ॥४॥
संविधायांधकाराणि मायाबलसमन्वितः ।
दिशश्चांतर्दधे वीरो नीहारतिमिरावृत्तः ॥५॥
राघवौ सूर्यसंकाशौ घोरैर्दत्तवरैः शरैः ।
बिभ्रद समरे क्रुद्धः सर्वगावेषु रावणिः ॥६॥
इंद्रजित राक्षसांना शब्द न करण्याची आज्ञा देतोः
अवचट वारु हिंसल्या जाण । सवेग येती श्रीरामबान ।
धाकें अश्वरसना बांधोन । रथचक्रें पूर्ण वाजों नेदी ॥ २४ ॥
निःशब्दवादें निशाचर । वाजों न देती अश्वांचे खुर ।
अंधारीं देखणा श्रीरामचंद्र । झांकी स्वशरीर धुईमाजी ॥ २५ ॥
करोनि अविद्याअभिचार । धुई उठली दुर्धर ।
गुडुप दाटलें कुहर । इंद्रजित वीर त्यामाजी विचरे ॥ २६ ॥
जैसे अपर दिवाकर । तैसे राम सौमित्र वीर ।
त्यांवरी इंद्रजित वर्षे शर । रामसौमित्र लक्षोनी ॥ २७ ॥
अंधारी दाटलें कुहर । त्यांत कपटी इंद्रजित वीर ।
गगनींहूनि वर्षे शर । अति दुर्धर कोपोनी ॥ २८ ॥
तौ हन्यमानौ नाराचैर्धाराभिरिव पर्वतौ ।
हेमपुंखान्नरव्याघ्रौ घोरान्मुमुचतुः शरान् ॥७॥
अंतरिक्षत्वमासाद्य ते रिपुं कंकवाससः ।
निपेतुरुर्व्यां विशिखाः शराः शतसहस्रशः ॥८॥
रामलक्ष्मणांच्या शब्दवेधानें राक्षसांचे निर्दालन :
लक्ष्मण आणि रघुनाथ । निशाचरें विंधिले अत्यद्भुत ।
धारावर्शी जैसे पर्वत । तैसे बाणांत झाकोळले ॥ २९ ॥
देखोनि शत्रूची शरवृष्टी । लक्ष्मण वीर जगजेठी ।
धनुष्य सज्जोनि निजमुष्टी । सावधदृष्टीं विंधित ॥ ३० ॥
श्रीराम नित्यसावधान । येतां इंद्रजिताचे बाण ।
निजबाणीं ते छेदून । पाडिलें पूर्ण दुखंडी ॥ ३१ ॥
एक दोन पांच सात । शत सहस्र असंख्यात ।
बाण छेदिले समस्त । सूक्ष्मलक्ष्यार्थें श्रीरामें ॥ ३२ ॥
धन्य धनुर्वाडा श्रीरामराणा । सूक्ष्मदृष्टीचा देखणा ।
लक्षून इंद्रजिताच्या बाणां । छेदोनि जाणा पाडीलें ॥ ३३ ॥
अभिचाराचे वरद शर । रामें छेदिले समग्र ।
इंद्रजित म्हणे मर मर । रणीं रघुवीर नाटोपे ॥ ३४ ॥
रणीम् जिंकावया रघुपती । इंद्रजित जावोनि शिवाप्रती ।
सर्पबाण शिववरदोक्ती । शीघ्रगती आणिले ॥ ३५ ॥
पन्नगैस्तु शरोद्भूतै रावणिः प्रहसन्नणे ।
अतिमात्रशरौघेन पीडयामास राघवौ ॥९॥
तानिपून्पततो भल्लैरनेकैर्निचकर्ततुः ।
तेन विद्धाश्च हरयो निहताश्च गतासवः ॥१०॥
राघवार्थे परिक्रांता धरण्यामुपशेरते ।
लक्ष्मणस्तु सुसंक्रुद्धः क्रोधादद्भुतमब्रवीत् ॥११॥
ब्राह्ममस्त्रं प्रयोक्ष्यामि वधार्थे सर्वरक्षसाम् ॥१२॥
सर्प जे कां शिवभूषण । तेचि स्वयें होवोनि बाण ।
करावया श्रीरामा शरबंधन । विंधी गर्जोन इंद्रजित ॥ ३६ ॥
रामाचा शिववरद बाणांना मान देण्याचा संकल्प :
शिवाचे शिववरद बाण । त्यासीं राम न करी निवारण ।
मिथ्या होऊं नेदी शिवचरण । निजांगें बाण खडतरतां ॥ ३७ ॥
जीव जाईल तरी जावो । परी शिववचन मिथ्या न होवो ।
ऐसा श्रीरामाचा भावो । बाणवर्षाव स्वयें साहे ॥ ३८ ॥
वानरवीर भिडतां रणीं । मूर्च्छित पडियेले धरणीं ।
तेही विंधोनियां बाणीं । रामकारणीं देहत्याग ॥ ३९ ॥
श्रीरामाच्या निजकार्यार्था । वानरीं वेंचिता जीविता ।
अधिकाधिक उल्लासता । पाय मागुता न काढिती ॥ ४० ॥
देह वेंचितां रामकार्यार्थीं । ठाकठोक ब्रह्मप्राप्ती ।
पळोनि जातिचि मागुती । अधोगति नरकांत ॥ ४१ ॥
पळोनि जातां ऐसें घडे । श्रीरामसेवे अंतर पडे ।
भुक्तिमुक्तींसीं कीर्ति उडे । नरकीं पडे । नरकीं पडे आकल्प ॥ ४२ ॥
निधडी वानरांची आंगवण । श्रीरामकाजीं वेचिती प्राण ।
आम्हांसी नाही जन्ममरण । ब्रह्मप्राप्ती पूर्ण सुगमत्वें ॥ ४३ ॥
ऐसिया निर्धार सन्निष्ठी । वानरवीर कोट्यानुकोटी ।
सुखें साहसी शरवृष्टी । राम दृष्टीं लक्षोनी ॥ ४४ ॥
पडिले देखोनि वानरगण । निजअंगीं खडतरतां बाण ।
अति क्रोधें लक्ष्मण । श्रीरामीं आपण बोलत ॥ ४५ ॥
पडिलें आमुचे वानरगण । अंगी भेदती दुर्धर बाण ।
तुजही रुपले शर दारुण । उगाचि आपण काय पाहसी ॥ ४६ ॥
मारावया राक्षसांसी । ब्रह्मास्र आहे मजपासीं ।
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । होईल जगासीं प्राणांत ॥ ४७ ॥
इंद्रजित अपराधासाठीं । मारुं नये सकळ सृष्टी ।
दीन जन कोट्यनुकोटी । वृद्धें धाकुटीं मरतील ॥ ४८ ॥
अंडजजरायुजादि जीवांला । चराचरां भूतां सकळां ।
नाश होईल स्त्रियां बाळां । अस्त्रसमेळां प्रळयांत ॥ ४९ ॥
ऐसे अस्त्राचें महिमान । प्राणांतें करुं नये प्रेरण ।
आणिक एक माझें वचन । सावधान अवधारीं ॥ ५० ॥
शिववरदाचे सर्पबाण । सर्वथा छेदूं नयेति आपण ।
मिथ्या करितां शिववचन । परम दूषण आम्हांसी ॥ ५१ ॥
आम्ही शिवाचे निजभक्त । मिथ्या करुं नये शिववरदार्थ ।
हाचि आमचा परमार्थ । मुख्य पुरुषार्थ या नांव ॥ ५२ ॥
विचारितां मूळन्वयीं । मज तुज दोघां मरण नाहीं ।
शिववरदबाण साहतां देहीं । भय कायी आम्हांसी ॥ ५३ ॥
यालागी शिववरदबाण । स्वयें साहावें शरबंधन ।
ऐसें सांगतां रघुनंदन । पावली खूण लक्ष्मणा ॥ ५४ ॥
प्रतिपाळावा शिववरदार्थ । दोघांचें एक हृद्गत् ।
पुढील कथेचा कथार्थ । सावचित्त अवधारा ॥ ५५ ॥
ततस्तौ राघवौ वीरौ सर्वमर्मातिगैः शरैः ।
भृशमावेदयांचक्रे रावणिः समितिजयः ॥१३॥
सरामं लक्ष्मणं चैव घोरैर्दत्तवरैः शरैः ।
बिभेद समरे क्रुद्धः सर्वगात्रेषु रावणिः ॥१४॥
तौ संप्रचलितौ वीरौ वेधितौ मर्मभेदिभिः ।
निपेततुमहिष्वासौ जगत्यां जगतीपती ॥१५॥
शिववरदाच्या बाणांचा समोरुन आघात केल्याने
स्वतःच्याच जीवाला धोका म्हणून इंद्रजिताचे आडून शरसंधान :
ते काळीं इंद्रजित आपण । श्रीराम आणि लक्ष्मण ।
वर्मीं विंधितां संपूर्ण । निःश्वासें बाण उडोनि जाती ॥ ५७ ॥
इंद्रजित वर्षे जे जे बाण । श्रीरामश्वासमात्रें जाण ।
वाहुटळीमाजी उडे तृण । तैसे उडोन शर जाती ॥ ५७ ॥
इंद्रजिताचे जे जे बाण । न करितां निवारण ।
श्वासमात्रें गेले उडोन । नव्हे सामान्य श्रीराम ॥ ५८ ॥
म्यां विंधिले जे शर सत्राण । ज्याचें श्वासें उडती बाण ।
त्याचें सुटल्या शरसंधान । करील कंदन राक्षसां ॥ ५९ ॥
इंद्रजित क्षोभोनि दारुण । शिववरदाचे वरद बाण ।
रागें घेवोनि आपण । अति सत्राण विंधिले ॥ ६० ॥
शिववरद वदे सम्यक । शरबंधनीं रघुकुळटिळक ।
राक्षस येतां संमुख । छेदिल मस्तक निमेषार्घें ॥ ६१ ॥
शरबंधनीं सर्पबाण । करिती श्रीरामाचें स्तवन ।
राम शरबंधीं सावधान । सत्य जाणे इंद्रजित ॥ ६२ ॥
शिववरदानाचे वरद शर । तिहीं भेदिले राम सौमित्र ।
बाणें खिळिलें गात्रेंगात्र । प्रवाहे रुधिर धरणीसीं ॥ ६३ ॥
शिववरदाचें वरद बाण । अंगीं रुपतां राम लक्ष्मण ।
स्वयें न करिती निवारण । आंगवण असतांही ॥ ६४ ॥
किंशुक फुलले वसंतीं । तैसे दोघे शेंदुराकृती ।
अशुद्धें बंबाळले शोभाती । रघुपति सौमित्र ॥ ६५ ॥
वर्मी भेदले वरद बाण । तेणें दोघे कंपायमान ।
श्रीराम आणि लक्ष्मण । मूच्छापन्न अते पडिले ॥ ६६ ॥
इंद्रजिताच्या बाणांचा रामलक्ष्मणावर परिणाम :
सौमित्र आणि श्रीराममूर्ती । जगतीं पडिले जगत्पती ।
ते काळीं स्वयें क्षिती । जाली मृद्वती पुष्पप्राय ॥ ६७ ॥
अंगीं खडतरले बाण । लागती जैसे चंद्रकिरण ।
श्रीराम आणि लक्ष्मण । सावधान शरबंधीं ॥ ६८ ॥
पतितः प्रथमं रामःशरतल्पे निपीडितः ।
पुनश्च लक्ष्मणो वीरो निश्चेष्टो धरणीं गतः ॥१६॥
पश्चात्स राक्षसेंद्रो वै बबंध शरपंजरे ।
नालीकैरर्धनालीकैर्भल्लैर्मुक्तैः सहस्त्रशः ॥१७॥
नाराचैर्वत्सदंतैश्च सिंहदंष्टैः शितैः शरैः ।
तौ तु वीरौ शरैर्बद्धौ राक्षसाः कामरुपिणः ॥१८॥
युद्ध्यामनं न क्षमते शक्रोपि त्रिदशेवश्वरः ।
द्रष्टुमासादितुं वापि न शक्तः किं पुनर्युवा ॥१९॥
शरबंध शरतल्पाच्या ठायीं । प्रथम राम पाडिला पाहीं ।
सवेंचि लक्ष्मण तोही । भूमिशायी पाडिला ॥ ६९ ॥
इंद्रजित कपटी निशाचर । वरदबाणांचा शरपंजर ।
बांधले दोघे राम सौमित्र । गात्रेंगात्र खिळोनी ॥ ७० ॥
नाळीकसंख्या अरत्निमात्र । अर्धनाळीक वितस्तिशर ।
निकट वेधाचा पैं मार । अति दुर्धर जयाचा ॥ ७१ ॥
विद्युत्प्राय तेजाकार । भाळी धगधगीत वैश्वानर ।
त्यांहीं विंधोनि अपार । राम सौमित्र बांधले ॥ ७२ ॥
चांफेकळीच्या जैशा अग्रा । सगज भेदिती पाखरा ।
नाराच म्हणती तयां शरां । विंधिले अपार शराबंधा ॥ ७३ ॥
वत्सदंतांचिया परी । ज्या भाळींसी दोनी हारी ।
केल्या सतेज कुसरी । ऐसिया शरीं शरबंध ॥ ७४ ॥
भाळी ज्या कां अर्धचंद्रा । सिंहदंष्ट्रा अत्यंत उग्रा ।
शरबंधनीं श्रीरामचंद्रा । अति विचित्रा विंधिल्या ॥ ७५ ॥
रामलक्ष्मण निश्चेष्ट पडलेले पाहून इंद्रजितास हर्ष :
श्रीराम आणि लक्ष्मण । शरबंधनीं बांधोनि पूर्ण ।
इंद्रजित स्वयें जाण । करीत गर्जन तें ऐका ॥ ७६ ॥
पायां लागती सुरगण । अमरेंद्र जो आपण ।
त्यासीही अलक्ष्य युद्धमहिमान । आणिला बांधोनि शरबंधें ॥ ७७ ॥
माझ्या युद्धाची गुप्तगती । पावों न शके अमरपती ।
तुम्ही दोघे मनुष्य किती । व्यर्थ मरणार्थी आलेती ॥ ७८ ॥
लक्ष्मणाचा त्वेष :
ऐकोनि इंद्रजिताचें वचन । खवळला स्वयें लक्ष्मण ।
श्रीरामा पुसत आपण । शरबंधन छेदावया ॥ ७९ ॥
मी तंव शेषावतार पूर्ण । निवारीन सर्पाद्भुतबाण ।
नरवानरां निर्बंधन । करीन जाण निमषार्धें ॥ ८० ॥
देवोनियां फुत्कार । मारीन इंद्रजित निशाचर ।
बोहरी करीन लंकापुर । दशशिर निवटोनी ॥ ८१ ॥
राक्षसांच्या शिरकमळीं । आजी खेळेन चेंडुफळीं ।
माजवीन रणकंकाळी । रणरवंदळी राक्षसां ॥ ८२ ॥
वाहती अशुद्धाचे पूर । भूतें भक्षिती मांस रुधिर ।
तृप्त होती श्येन घार । ऐसें चरित्र करीन ॥ ८३ ॥
आज्ञा देईं श्रीरामचंद्रा । ऐसें पुसतां सौमित्रा ।
हांसूं आलें रघुवीरा । निजनिर्धारा सांगत ॥ ८४ ॥
प्रकट करितां शेषावतार । आम्हीं उच्छेदिलें वेदशास्त्र ।
उच्छेदिलें पुराणमात्र । अनागत चरित्र उच्छेदिलें ॥ ८५ ॥
उच्छेदिली धर्मनीती । उच्छेदिली लोकस्थिती ।
उच्छेदिली भगवद्भक्ती । ऐसी अपख्याती होईल ॥ ८६ ॥
श्रीरामानी सांत्वन केल्यावर लक्ष्मणाचे उत्तर :
बहुरुप्याचीं राव राणी । मिथ्या स्त्रीपुरुष जाणोनी ।
तेचि करिती संपादणी । स्त्रीपुरुषपणीं सत्यत्वें ॥ ८७ ॥
तैसेंच अवतारचरित्र । प्रतिपाळावें वेदशास्त्र ।
स्वधर्मलौकिकाचें सूत्र । अति अत्पर रक्षावें ॥ ८८ ॥
समूळ मूळींचें लक्षण । आम्हा दोघां नाही मरण ।
साहतां शिववरदाचे बाण । कठिण कोण सौमित्रा ॥ ८९ ॥
सौमित्रा एक सावधान । शिववरदाचें शरबंधन ।
आम्हांसी न बाधी अणुप्रमाण । सुप्रसन्न शिव आम्हां ॥ ९० ॥
ऐकोनि श्रीरामचें वचन । मस्तकीं वंदोन श्रीरामचरण ।
लक्ष्मण घाली लोटांगण । काय आपण अनुवदे ॥ ९१ ॥
श्रीरामा तुझी आगाध स्थिती । श्रीरामा तुझी अगाध कीर्तीं ।
श्रीरामा तुझी अगाध शांती । तेथें मी किती जाणावया ॥ ९२ ॥
जेथें वेदां मौन पडे । शात्रानुवाद न चले पुढें ।
तुझें महिमान अगाध गाढें । केंवी मी वेडें अनुवादू ॥ ९३ ॥
राम अभिमानीं निरभिमान । सगुण वर्ततां निर्गुण ।
देहीं असोनि विदेहपण । राम परिपूर्ण परब्रह्म ॥ ९४ ॥
ऐसें श्रीरामस्तवन । आल्हादें अनुवादोनि पूर्ण ।
शरबंधीं लक्ष्मण । पडे आपण रामाज्ञा ॥ ९५ ॥
लक्ष्मणाचा क्रोध अद्भुत । श्रीरामें करोनि शांत ।
दोघे जण शरबंधांत । पडिले दिसत निचेष्टित ॥ ९६ ॥
इंद्रजिताला हर्ष होतो :
हातीं धनुष्य पाठीसी भाते । सुवर्णपात्री बाण तेथें ।
पडिले देखोनि दोघांतें । इंद्रजितातें आल्हाद ॥ ९७ ॥
शरबंधीं स्वयें आपण । श्रीराम आणि लक्ष्मण ।
बांधलें सत्यत्वें मानून । इंद्रजितें पूर्ण वल्गिजे ॥ ९८ ॥
श्रीरामीं लागला शरबंध । इंद्रजितासी आल्हाद ।
निजपुरुषार्था करी अनुवाद । परमानंद जयाचा ॥ १९ ॥
शिववरदाचें वचन । मिथ्या न करी लक्ष्मण ।
स्वयें सत्य मानून शरबंधन । केलें विंदान तें ऐका ॥ १०० ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामा लागलें शरबंधन ।
शिववरदाचे सर्पबाण । रामें आपण मानूनी ॥ १०१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकाराटीकायां
श्रीरामशरबंधनं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
ओंव्या ॥ १०१ ॥ श्लोक ॥ १९ ॥ एवं ॥ १२० ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अकरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अकरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अकरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अकरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अकरावा