संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा

हनुमंत- भरत भेट –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥
क्रिशमात्रमयोध्यायाश्चीरकृष्णाजिनाम्बरम् ।
ददर्श भरतं दीनमृषिभिः सह वासिनम् ॥ १ ॥
जटिलं मलदिग्धांगं भ्रातृव्यसनकर्पितम् ॥ २ ॥

हनुमंताला भरत कसा दिसला ? :

अयोध्येहूनि क्रोशमात्र’ । नंदिग्राम भरतनगर ।
तेथें येवोनि कपिकुंजर । पातला घर भरताचें ॥ १ ॥
तंव वसिष्ठादि ऋषीश्वर । भरतासमीप थोर थोर ।
व्रतस्थ झाले समग्र । वल्कलांबर कृष्णाजिनीं ॥ २ ॥
तापसवेषी वनचर । कंदमूळफळाहार ।
व्रतें धरियेलीं दुर्धर । कृशोदर पैं भरत ॥ ३ ॥
अस्थि चर्म झालें एक । मांस आटलें सकळिक ।
रुधिर शोषिलें निःशेख । पंजर देख उरलासे ॥ ४ ॥
श्रीरामाचेनि स्मरणें जाण । भरतदेह वांचला पूर्ण ।
तेणें भासे देदीप्यमान । जीवन आन असेना ॥ ५ ॥
श्रीराम स्वयें वना गेला । विषयभोग सहज चुकला ।
विषयीं असोनि त्याग केला । धैर्याथिला महामेरू ॥ ६ ॥
राज्यभोग पै समस्त । असतां सर्वथा नातळे चित्त ।
भोगीं असोनि भोगातीत । अति विरक्त देहभावा ॥ ७ ॥
सकळ भोगा देवोनि पाणी । देहा तुच्छत्वें मानोनी ।
अहर्निशीं रामचिंतनीं । ख्याति त्रिभुवनीं भरताची ॥ ८ ॥
सर्वथा ज्यासीं न मिळे भोग । त्यासीं सहजचि झाला त्याग ।
भोगीं असोनियां विराग । अभिनव भाग्य भरताचें ॥ ९ ॥
जेवीं चंदनाच्या संगतीं । सकळ वनींच्या वनस्पती ।
अवघ्याचि चंदन होती । बहुत शोभती चौफेर ॥ १० ॥
तैसें भरतें केलें पूर्ण । सकळां श्रीराम भजन ।
सांडोनियां मानाभिमान । श्रीराम गुण वर्णिती ॥ ११ ॥
एक झाले ते वीतराग । एकीं निःशेष केला त्याग ।
एक ध्यानस्थ अभंग । कीर्तन चांग पै एकां ॥ १२ ॥
नगरींचे सकळ लोक । श्रीरामालागीं त्यक्तोदक ।
भरतनमनालागीं देख । आले सकळिक समकाळें ॥ १३ ॥

मुदत संपली तरी राम आले नाहीत म्हणून भरताला चिंता :

तंव भरत चिंताक्रांत । श्रीरामवियोगें संतप्त ।
अति दुःखें विलाप करित । श्रीरघुनाथ कां न ये ॥ १४ ॥
पादुका पूजोनि अति निगुती । सकळ ऋषिवरांप्रती ।
भरत पुसतसे प्रीतीं । श्रीरघुपति कां न ये ॥ १५ ॥
चवदा वषै लोटली पुरीं । दोन दिवस अधिक वरी ।
श्रीराम न येचि निर्धारीं । केली खरी उदासता ॥ १६ ॥
श्रीराम पहिलेंचि विरक्त । राज्यभोगा उदासभूत ।
वरी वनवास झाला प्राप्त । सुख अद्‌भुत तेणें त्यासीं ॥ १७ ॥
आत्माराम पै निश्चित । सुचिंतनेनें नित्यतृप्त ।
कायसा राज्य राज्यार्थ । विषय तेथ अति मिथ्या ॥ १८ ॥
मिथ्या पदार्था रघुपती । नातळे सर्वथा निश्चितीं ।
आम्हासी लागली आहे भ्रांति ॥ वांछू चित्तीं रामभेटी ॥ १९ ॥

भरत स्वतःलाच दोष देतो :

काय आम्ही केली भक्ती । कोण आचरलों तपःस्थिती ।
अथवा नव्हों अंतरवृत्ती । सहोदर निश्चितीं रामाचे ॥ २० ॥
तिळ एक भासे भेदभान । तेथ सर्वथा न मनी मन ।
आम्ही तरी केवळ सापत्‍न । केंवी रघुनंदन भेटेल ॥ २१ ॥
पूर्वी विषयलोभें ठकलो । मायामातुळें नागवलों ।
श्रीरामासीं अंतरलों । भोगबुद्धी करोनी ॥ २२ ॥
तेथोनि येतां पै प्रयासीं । सद्‌गुरुचि मातें उपहासी ।
अंगाकारीं तूं राज्यासीं । अभिषेकासी करूं दे ॥ २३ ॥
मजसन्मुख सकळ जन । बोलती अभिषाप दारुण ।
मारू जातो रघुनंदन । म्हणोनि जग निंदिती ॥ २४ ॥
भेटों गेलों वनवासीं । तेथेंही झालों अपेशी ।
सौमित्र मारूं धांवे वेगेंसीं । राज्याभिलाषी म्हणवोनी ॥ २५ ॥
श्रीराम स्वयें आपण । वचन बोलिला अति कठिण ।
तुज करूं अभिषिंचन । म्हणोनि आपण सरसावला ॥ २६ ॥
तेचि काळे देहपात । माझा व्हावा त्वरित ।
कां वांचला जीवें जीत । पाषाणवत् भूमिभार ॥ २७ ॥
पुढें अर्थही तैसाचि झाला । विषयाभिलाषें वहिला ।
राज्य घेवोनि परतला । दृढत्वें कळला लोभ रामा ॥ २८ ॥
हनुमंत ओषधींसमवेत । गगनीं जातो मार्गस्थ ।
त्यांसींही केलें उद्धत । बाण अवचित सोडिला ॥ २९ ॥
श्रीरामभक्तावरी संधान । दृढ न विचारितां केलें जाण ।
महापापी आन कोण । मजहूनि पै आहे ॥ ३० ॥
अगाध हनुम्याचा बडिवार । विषाद न मानीच अणुमात्र ।
समाधान वेगवत्तर । मज सत्वर दीथलें ॥ ३१ ॥
ऐसें जाणतांही तत्वतां । कोण माझी विषयासक्तता ।
सर्वे न वचेंचि हनुमंता । लोभें सर्वथा नाडिलो ॥ ३२ ॥
नाहीं वैराग्य कडाडी । निजांगें घालोनियां उडी ।
भेटी न घेंचि तांतडी । धरिली गोडी विषयांची ॥ ३३ ॥
महापातकाचें फळ दारुण । निश्चयेसीं हेचि जाण ।
विषयगोडी पुनःपुन । सर्वथा मन सांडीना ॥ ३४ ॥
महापातकी विषयिपण । म्हणोनियां रघुनंदन ।
निश्चये झाला उदासीन । सर्वथा वदन न पाहे ॥ ३५ ॥
कशाशी आहें जीवें जीत । इये पृथ्वीसीं भारभूत ।
वृथा जीवोनि काय येथ । अति निंदित लौकिकीं ॥ ३६ ॥
उदास होवोनि श्रीराम पाहे । ज्याचें हृदय सांडूनि जाये ।
जळो त्याचें जीवित्व काये । भार न साहे धरित्री ॥ ३७ ॥
आम्ही तरी अत्यंत आप्त । बंधु रामाचे म्हणवीत ।
त्यासीं न पाहे रघुनाथ । गेला निश्चित सांडूनी ॥ ३८ ॥

भरतासहित इतरांचाही रामवियोगामुळे विलाप, भरताला मूर्च्छा :

म्हणोनियां शोकाकुलित । विलाप करी दुःखाक्रांत ।
नेत्रीं अश्रुधारा स्रवत । पडिला मूर्च्छित धरेवरी ॥ ३९ ॥
शोकें जाळिलीं अंतर । प्राण जावों पाहे सत्वर ।
तैसाचि शत्रुघ्न महावीर । दुःखें तत्पर रामविरहें ॥ ४ ० ॥
ऋषीश्वरां तेचि अवस्था । श्रीरामवियोगें भरतें चित्ता ।
नेत्रीं जलबिंदु स्रवतां । रोमांचितता शरीरीं ॥ ४१ ॥
कंठीं बाष्पें पै दाटती । गात्रें चळचळा कांपती ।
अनावर प्रेमस्थिती । ऋषी लोळती गडबडां ॥ ४२ ॥
नागरिक लोक समस्त । श्रीरामवियोगें संतप्त ।
देहभाव न सांभाळित । अवघे मूर्च्छित पडियेले ॥ ४३ ॥
देखोनि भरताची अवस्था । प्रेम न साहेचि हनुमंता ।
मूर्च्छित पडिला तत्वतां । होय आवरिता विवेकें ॥ ४४ ॥
सत्वावस्था आवरोनि तेथ । अगोचर हनुमंत ।
येवोनि पहातसे वृत्त । तंव अद्‌भुत आणिक झालें ॥ ४५ ॥

दशरथाच्या स्त्रियांना भरताच्या ठिकाणी रामांचा भास :

सकळ दशरथाच्या कामिनी । सवें कैकेयी सुमित्रा दोनी ।
कौसल्या ज्येष्ठपत्‍नीं । त्वरेंकरोनी पातल्या ॥ ४६ ॥
तंव येथे वेगवत्तर । माता देखती विचित्र ।
भरत पाहतां रघुवीर । दिसे गोचर सकळांसी ॥ ४७ ॥
तेणें झाल्या हाहाभूत । काय झाला तो भरत ।
कोण्या योगें रघुनाथ । येथें मूर्च्छित पडियेला ॥ ४८ ॥
काय झाला तो लक्ष्मण । कोठे गेली जनकनंदिन ।
रामें तयांतें सांडून । केलें आगमन एकलें ॥ ४९ ॥
म्हणोनि अवघी दुःखाक्रांत । करमकळीं ललाट पिटित ।
सकळा हंबरडा हाणित । देहपात होऊं पाहे ॥ ५० ॥
रामरूपें भरतासी । माता धरोनि पोटासीं ।
रुदन करी आक्रोशीं । झणें मोकलिसी श्रीराम ॥ । ५१ ॥
रायासवें सहगमन । करितां तुझे भेटीलागून ।
अति युक्ति करोनि जाण । सस्तुरूनें आपण राहविलें ॥ ५२ ॥
रामाचे भेटीपुढें । सहगमन तें बापुडें ।
म्हणोनियां वाडेंकोडें । निजनिवाडें राहविलें ॥ ५३ ॥
यालग्रिन मुखचुंबन । माता करितसे जाण ।
कां बा न देसी प्रतिवचन । कायसें मौन धरियेले ॥ ५४ ॥
धन्य भाग्य तें भरताचे । ध्यान करितां श्रीरामाचें ।
सबाह्म तदूप झालें साचें । ऐसें ध्यानाचे महिमान ॥ ५५ ॥

भरत शुद्धीवर आल्यावर तो राम नाही
हे कळल्याने कौसल्या अधिकच दुःखी :

श्रीरामरूप देखोनि माता । अति आक्रोशें विलाप करितां ।
भरत सावध झाला चित्ता । दुःखित माता देखिली ॥ ५६ ॥
येरी पाहे सावधान । तंव राम नव्हे भरत जाण ।
तेणें अत्यंत उद्विग्न । रघुनंदन न देखे ॥ ५७ ॥
राम आतां येथें होता । तूतें देखिलें नाहीं भरता ।
ऐसे बोल बोलतां । झाली माता विव्हळ ॥ ५८ ॥
तेणें भरत अत्यंत । सवें झाला दुःखाक्रांत ।
कां पां न येचि रघुनाथ । काय ऋषिभाषित लटिकेंचि ॥ ५९ ॥
अनागत रामायणीं । वदली वाल्मीकाची वाणी ।
ते लटकी झाली कैसेनी । श्रीराम असूनी न येचि ॥ ६० ॥
हनुमान येवोनियां येथ । स्वयें बोलिला पुरुषार्थ ।
शीघ आणीन रघुनाथ । तेंही भाषित लटिकें काय ॥ ६१ ॥
असो हनुमंताची गोष्टी । असो ऋषीची चावटी ।
श्रीराम स्वयें वाक्पुटीं । बोलिला गोष्टी तेही लटिकी ॥ ६२ ॥
पितृआज्ञा पै नेमस्त । चौदा वर्षे वनवासाव्रत ।
संपादोनि इत्थंभूत । येई निश्चित नेमातीं ॥ ६३ ॥

रामांची भेट नाही म्हणून भरताचा प्राणत्यागाचा निर्धार :

श्रीरामाचीं वचनें ऐसीं । तीही वृथा झालीं कैसीं ।
आतां ठेवोनि काय देहासीं । जीवघातासी करीन ॥ ६४ ॥
रामांवाचूनि धडफुडी । देहहाडाची कोरडी ।
कोण सोशील जन्मबेडी । घालूं कडाडीं देहपाता ॥ ६५ ॥
तें देखोनि हनुमंत । झाला अत्यंत भयभीत ।
कठिण भारी रघुनाथ । चिन्ह पाहवीत काय याचें ॥ ६६ ॥
याहीउपरी पाहतां चिन्ह । याचें होईल प्राणोत्क्रमण ।
ऐसें दिसताहे निर्वाण । रामागमन नायकतां ॥ ६७ ॥

त्या बिकट प्रसंगी हनुमंताचे तेथे आगमन :

म्हणोनि हनुमान लवडसवडी । आठां भावांची परवडी ।
उभवोनि स्वानंदाची गुढी । हाक फोडी रामनामें ॥ ६८ ॥

अनुशोचति काकुत्स्थे हनुमान्वाक्यमब्रवीत् ।
प्रियमाख्यामि ते वीर शोकं जहि सुदारुणम् ॥ ३ ॥
अस्मिन्मुहूर्ते रामेण भ्रात्रा त्वं संगमिष्यसि ।
निहत्य रावणं रामो प्रियां लभ्य च मैथलीम् ॥ ४ ॥

सीता व लक्ष्मण यांसह श्रीराम येत
असल्याचे मारुतीने सर्वांना सांगितले :

सत्वमूर्ती राया भरता । सांडू नको गा जीविता ।
घेवोनि आलों रघुनाथा । सौमित्रसीतासमवेत ॥ ६९ ॥
उठवोनियां लक्ष्मण । क्षणें निवटिला रावण ।
बंदींचे सोडविले सुरगण । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥ ७० ॥
सोडवोनि जनकनंदिनी । राया दशरथा भेटोनी ।
विजयी झाला राम त्रिभुवनीं । येत विमानीं अति वेगें ॥ ७१ ॥
मार्गी भरद्वाजें आपण । प्रार्थोनिया रघुनंदन ।
राहविलें फळभोजना । तेथें जाण गुंतले ॥ ७२ ॥
तुज होत असेल चिंता । म्हणोनि कळवळा रघुनाथा ।
याचिलागीं तत्वतां । पुढें मज आतां पाठविलें ॥ ७३ ॥
तंव तैसेचि देखों येथ । श्रीरामवियोगें समस्त ।
अवघेही दिसता दुःखाक्रांत । जैसी प्रेते जीवहीन ॥ ७४ ॥
शोक सांडोनि निश्चिती । व्हावें सावध समस्तीं ।
पैल आला रघुपती । भाक निगुतीं ही माझी ॥ ७५ ॥

रामांच्या आगमनाची वार्ता ऐकताच सर्वांना
अपार आनंद. भरताचे मारुतीला दृढालिंगन :

ऐकतांचि तो वचनार्थ । अवघे झाले सावचित्त ।
येवोनि नमिती हनुमंत । आनंदभरित ते सकळी ॥ ७६ ॥
प्राणोत्क्रमणसंकटीं । जेवीं होय अमृत वृष्टी ।
तेंवी श्रीरामागमनगोष्टी । कपिवाक्पुटीं ऐकिली ॥ ७७ ॥
दुकाळिया जेंवी मिष्टान्न । कीं अवर्षणीं वर्षे घन ।
तेंवी हनुमंताचे वचन । आलें जीवन घेवोनी ॥ ७८ ॥
देखोनियां हनुमंतातें । मिठी घालोनियां भरतें ।
आलिंगोनी ठेविला तेथें । झाली समस्तें सजीव ॥ ७९ ॥
भ्रमबुद्धी हरपे रत्‍न । तें स्वबुद्धी पाहतां न लभे जाण ।
दीपागमन होतांचि पूर्ण । सांपडे क्षण न लागतां ॥ ८० ॥
तेंवी रामागमनसुखाचा । हनुमान दीप हर्षाचा ।
मोहांधकारीं बुडतां साचा । झाला प्रकाशाचा सुकाळ ॥ ८१ ॥
निरसोनियां मोहांधकार । उजळलें सकळांचें अंतर ।
अंतरीं प्रकाशला रघुवीर । दुःख समग्र निरसिलें ॥ ८२ ॥
दुःख निरसोनि सुखदाता । श्रीरामासीं भेटी करिता ।
ऐसिया सद्‌गुरूसीं तत्वतां । उत्तीर्णता केंवी घडे ॥ ८३ ॥
चिंतामणि दे चिंतितार्था । कल्पतरू कल्पिले देता ।
सद्‌गुरू दे निर्विकल्पता । त्यासीं आता काय द्यावें ॥ ८४ ॥
कामधेनूची दुभणी । कामनारूप त्याची देणी ।
अचिंत्य देणें सद्‌गुरूवचनीं । उत्तीर्ण त्यालागूनी केवीं होय ॥ ८५ ॥
देऊं परिस धातु अर्थ । अर्थ तितुकाही अनर्थ ।
तेणें न घडेचि उत्तीर्णत्व । अगाध दातृत्व सद्‌गुरूचें ॥ ८६ ॥
देहें उतराई होऊं सद्‌गुरूसीं । तरी नैश्वर्य देहासीं ।
नैश्वर्ये पै अनैश्वर्यासीं । उत्तीर्ण त्यासीं घडेना ॥ ८७ ॥
आतां एकचि विवंचन । तनुमनसहित धन ।
कीजे सद्‌गुरूसीं निवेदन । तरी उत्तीर्ण कांहीएक ॥ ८८ ॥
त्याहूनि वेगळा आणिक । न दिसे पदार्थ असंख्य ।
सर्वस्वें अर्पोनियां देख । चरणीं मस्तक ठेवणें ॥ ८९ ॥

सर्वांचें मारुतीला वंदन व आनंदोत्सव साजरा करतात :

ऐसा करोनि निर्धार । चरणीं माथा पै सत्वर ।
ठेवोनि नमिला कपींद्र । मौनेंकरोनि सत्वर पै भरतें ॥ ९० ॥
कौसल्यादि माता अशेष । सुमंतादि प्रधान देख ।
आनंदभरित होवोनि लोक । कपिनायक नमियेला ॥ ९१ ॥
दुःख निरसिलें सकळिक । आनंद झाला अलौकिक ।
नामें गर्जती एकएक । रघुनायक निजविजयी ॥ ९२ ॥
येरयेरां क्षेम देती । येरयेरां आलिगिती ।
खांदीं घेवोनि मारुती । नाचताती आनंदें ॥ ९३ ॥
दीपावली नीराजनें । हनुमंतासी अक्षय वाणें ।
जीवभावाची बळिदानें । सांडितीं पवनपुत्रावरूनी ॥ ९४ ॥
त्राहाटिल्या निशाणभेरी । गगन गर्जे मंगलतुरीं ।
गुढिया तोरणे घरोघरीं । प्रीतीं थोर उत्साहो ॥ ९५ ॥
घरोघरीं मंगलार्चनें । प्रीतीं मांडिली कीर्तने ।
मृदंग श्रुतिमधुर गाणे । टाळ चिपळ्यांसमवेत ॥ ९६ ॥
उपांगे वाजती अतिगहिर । तुळसीमाळा परिकर ।
सुमनवृष्टि अति सादर । होती अपार कीर्तने ॥ ९७ ॥

रामाच्या दर्शनासाठी निघण्याची तयारी
करावी असे मारुतीने सुमंत प्रधानाला सांगितले :

तें देखोनिं हनुमंत । अत्यंत झाला आनंदभरित ।
प्रधान बोलोवोनि सुमंत । स्वयें सांगत तयासी ॥ ९८ ॥
निवांत काय होसी मानसीं । जाणें श्रीरामभेटीसीं ।
करावया सामग्रीसीं । दळभारेंसीं संजोगा ॥ ९९ ॥
प्रेमें विकळ भरत । शत्रुघ्न तैसाचि तेथ ।
तुम्ही संपोदोनि समस्त । चला रधुनाथदर्शना ॥ १०० ॥
ऐकोनियां ते वाणी । भरत उठला तत्क्षणी ।
लागला हनुमंताच्या चरणीं । भली आठवण दीधली ॥ १०१ ॥
नाहीं तरी आम्ही येथ । पडिलों असतों तटस्थ ।
कोण करिता सावचित्त । श्रीरघुनाथदर्शना ॥ १०२ ॥

हनुमंतकृत भरतगुणवर्णन :

ऐकोनि भरताचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
करीत अति प्रीतीं विनवण । सावधान परियेसीं ॥ १०३ ॥
प्रेमा म्हणिजे सत्वावस्था । राम तिहीं गुणांपरता ।
गुणी पहातो तत्वतां । राम सर्वथा भेटेना ॥ १०४ ॥
म्हणोनियां अति सावधान । निःशेष रज तम त्यागून ।
सत्वावस्था उठली जाण । तीही आपण जिरवावी ॥ १०५ ॥
प्रेमावस्थामूर्च्छितवृत्ती । येथें श्रवण कोणाप्रती ।
कोण पावे अर्थप्राप्ती । श्रोते निश्चिती तटस्थ ॥ १०६ ॥
जेथें गुणाचें आवरण । तेथें कैंचे रामदर्शन ।
म्हणोनि साधके आपण । सर्वथा गुण जिंकावे ॥ १०७ ॥
निःशेष गुणांचा निरास । तैं मोक्षपुरीसी होय वास ।
तुम्ही तरी तेथींचे क्षितीश । आणि अनुज रामाचे ॥ १०८ ॥
म्हणोनि तुम्ही तत्वतां । गिळोनिया सत्वावस्था ।
चला भेटूं रघुनाथा । अति सत्वरता निघावे ॥ १०९ ॥
पाक जरी आला निगुतीं । तरी वाफ जिरों देती ।
बाहेर निघाल्या शीघ्रगतीं । राहे निश्चितीं अपक्व ॥ ११० ॥
तेंवी रजतमाचे निरास । सत्य वाढलें असमसाहस ।
तेंही जिरतां सावकाश । राघवेश तैं भेटे ॥ १११ ॥
विषयेंद्रियगुणग्राम । रहित स्वसुखआराम ।
तैं बोलिजे श्रीराम । सिद्धांत परम उपनिषदीं ॥ ११२ ॥
ऐसी श्रीरामसंस्था । आम्ही ऐकों परंपरता ।
तरी हे उफराटी वार्ता । तुजप्रति कथा आम्ही सांगों ॥ ११३ ॥
तूं आमचा माता पिता । स्वामी गुरु कुळदेवता ।
जैसा राम तैसा तूं भरता । अति उद्धतता म्यां केली ॥ ११४ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । क्षमा करावी आपण ।
आणीक एक ऐकें चिन्ह । अधिकार पूर्ण असे आम्हां ॥ ११५ ॥
बाळका बोलों शिकवी माता । तीपुढें तें वाचाळता ।
करितां सुखावे माता । परी सर्वथा क्षोभेना ॥ ११६ ॥
तेंवी तुमची बाळे आम्ही । म्हणोनि वल्गेजों निजधर्मी ।
न विचरितां सेवकस्वामी । निजकृपा तुम्ही संतोषा ॥ ११७ ॥

हनुमंताची विनम्रता पाहून भरताने त्याला आलिंगन दिले :

ऐकोनि हनुमंताचे वचन । भरत झाला सुखायमान ।
हृदयीं धरिला आलिंगून । तूं जिवलग पूर्ण रामाचा ॥ ११८ ॥
आम्ही म्हणवू सहोदर । परी राम नेणों साचार ।
वृथा वाहों शरीरभार । देवोनि आहार नाशित ॥ ११९ ॥
रामविस्मरणें आहार देख । जठराग्नि त्याचा शुद्ध पाक ।
सर्वथा न करी देख । करोनि पै नरक सांडी ॥ १२० ॥
अग्नि क्षोभलियाचें लक्षण । अहर्निशीं विषयचिंतन ।
अवस्था उन्मत्त पूर्ण । नरक लक्षण या नांव ॥ १२१ ॥
शुद्ध पाकाचें लक्षण । सर्वेद्रियें सावधान ।
अनिमेष रामस्मरण । होवोनि प्रसन्न अग्नि करी ॥ १२२ ॥

हनुमंताची भरतकृत प्रशंसा :

आपुली निजतेज दीप्ती । श्रीरामभक्तांच्या हातीं ।
अग्नि देत संतोषस्थितीं । तेणें शोभती देदीप्यममान ॥ १२३ ॥
हें तुझ्या ठायी प्रत्यक्ष । हनुमंता दिसे सावकाश ।
श्रीरामतेजें स्वप्रकाश । त्रैलोक्यास मंडन ॥ १२४ ॥
आतां असोत या उत्पती । असदारोपण म्हणजे स्तुती ।
तरी ते न घडे निश्चिती । तुझी ख्याती अनिवार ॥ १२५ ॥
जितकी श्रीरामाची कीर्ती । तितकी तुझी ख्याति मारुती ।
म्हणोनिमाथा चरणाप्रती । ठेवोनि कपिपति नमियेला ॥ १२६ ॥

प्रत्याख्यानं न मे वीर वदामि वद किं प्रियम् ।
गवां शतसहस्रं वा त्यामाणां व शत वरम् ॥ ५ ॥

भरताने प्रसन्न होऊन मारुतीला वर देण्याची तयारी दर्शविली :

प्रेमाचेनि पडिभरें । योग्यायोग्य पै न सरे ।
हनुमंतासी अत्यादरें । नृपवरें विनविलें ॥ १२७ ॥
अति प्रिय रामकथा । विजययात्रा हनुमंता ।
तूं सांगितली तत्वतां । काय आतां तुज देऊ ॥ १२८ ॥
प्रीतिपूर्वक परियेसीं । जे उपेक्षा असेल मानसीं ।
ते सांगावी मजपासीं । शंका मानसी न धरावी ॥ १२९ ॥
देऊं गाईंची शतसहसस्रें । देश नगरें अपारें ।
किंवा धान्याची कोठारे । धनभांडारें असंख्यात ॥ १३० ॥
इंद्रपद लोकपाळेंसीं । पाताळपन्नग अमृतेंसीं ।
सत्यलोक पै मागसी । कैलासवैकुठासी देईन ॥ १३१ ॥
काय अपेक्षित तुझ्या चित्ता । शीघ्र आलापी पवनसुता ।
तेणें आश्चर्य हनुमंता । भरतप्रताप देखोनी ॥ १३२ ॥

भरताच्या दातृत्वाची प्रशंसा :

अतिशयें सुखावोनि चित्तीं । हनुमान विनवित भरताप्रती ।
अगाध तुझी उदारशक्ती । बंधु निश्चितीं रामाचा ॥ १३३ ॥
जैसी श्रीरामाची निजख्याती । तैसीच तुझी प्रतापशक्ती ।
दानी देता त्रिजगती । अटक निश्चितीं नाहीं तुम्हां ॥ १३४ ॥
आम्ही तुमचे अनुचर । केवळ श्रीरामाचे किंकर ।
श्रीरामभजनें चराचर । नाहीं दुस्तर हरिभक्ता ॥ १३५ ॥

रामभक्तांना कसलीच अपेक्षा नसते :

श्रीरामाचें ध्यान करितां । ब्रह्मादिकां दुस्तर चिंता ।
आमचे पद घ्यावया तत्वतां । ध्यान रघुनाथाचे करितात ॥ १३६ ॥
म्हणोनि ब्रह्मादि अमरकोडी । विघ्नें उठविती कडाडीं ।
दावोनि नाना विषयगोडी । पाडिती मुरकुंडी मनाच्या ॥ १३७ ॥
तथापि निश्चयाचे भक्त । सर्वथा न होती ध्यानच्युत ।
ते विषयींचा फ्लोकार्थ । सावचित्त परियेसीं ॥ १३८ ॥

त्रिधुवनविभवहेतवेप्यकुंठस्मृति रजितात्मसुरादिप्भिर्विमृग्यात् ।
न चलति भगवत्पदारविंदा- लवजिमिषार्धमपीह वैष्णवाग्र्य: ॥ ६ ॥

हनुमंताने वर्णिलेला ध्यानमहिमा :

सुरासुरांचिया पंक्ती । ज्यालागीं नाना साधनें करिती ।
तरी ज्यांसी नव्हे प्राप्ती । दुष्प्राप्य निश्चितीं त्रिलोकीं ॥ १३९ ॥
तेंवी त्रिलोकींचें राज्य सर्वही । महासिद्धींसमवेत पाहीं ।
हात जोडोनि भक्ताच्या ठायी । तिष्ठत लवलाही दासत्वें ॥ १४० ॥
भगवच्चरणारविंदाहून । जरी क्षण एक काढी मन ।
तरी तितुकेंही त्यासी देऊन । म्हणवोनि जाण तिष्ठती ॥ १४१ ॥
परी हा निष्टंक दादुला । दुस्तर धैर्याथिला ।
चरणध्याना वहिला । क्षणही मनाला काढीना ॥ १४२ ॥
चरणध्यानाचा तो क्षण । त्रिमुवनविभव त्यावरून ।
सिद्धिंसहित ओवाळून । निंबलोण सांडित ॥ १४३ ॥
भक्त जिज्ञासु साधक ज्ञानी । तयांमाजी अग्रगणी ।
लवनिमिषार्धही चरणींहूनी । लोभें मन काढीना ॥ १४४ ॥
कोणते म्हणती चरण । ऐक त्यांचेहीं लक्षण ।
आदिकरोनि त्रिनयन । करिती ध्यान जयाचें ॥ १४५ ॥
ब्रह्मा जो को सृष्टिकर्ता । त्रैलोक्यासीं सर्जन करिता ।
सत्यलोकराज्यभोक्ता । वेद मूर्तिमंत तये स्थानी ॥ १४६ ॥
जेथें सत्य मूर्तिमंत । तप मूर्तिमंत तेथ ।
महासिद्धि होवोनी मूर्त । नित्य नांदत जये स्थानी ॥ १४७ ॥
ऐसियां भोगांची विश्रांतीं । ब्रह्मयासीं न मनेचिं सर्वार्थी ।
मग बैसोनी एकांती । चरण चिंती हरीचे ॥ १४८ ॥
तरी सहसा नव्हे प्राप्ती । मग लाजोनी प्रजापती ।
पोटा आला लक्ष्मीप्रती । चरणप्राप्ती तरी नव्हे ॥ १४९ ॥
तैसाच जाण शूळपाणी । त्रिनयन कैलासभुवनी ।
उमेसारिखी कामिनी । अनुदिनीं भोगासीं ॥ १५० ॥
नंदी भृंगी आदि महागण । विद्यानिधि हृदयरत्‍न ।
तेणें न पवेचि समाधान । मग त्यागून निघाला ॥ १५१ ॥
सर्वस्वें त्यागोनी शूळपाणी । हातीं पायीं राख लावोनी ।
ध्यानस्थ बैसला श्मशानी । चरणचिंतनीं रामाच्या ॥ १५२ ॥
हृदयीं ध्यान चरणांचें । मुखीं नाम श्रीरामाचें ।
मुकुटीं भूषण निष्कर्माचें । तीर्थ रामाचें परिकर ॥ १५३ ॥
तोही ठकिला हरिमाया । सांडोनी श्रीरामाच्या पायां ।
आलो मोहिनी पुसावया । द्रवोनी वीर्या पडिला तो ॥ १५४ ॥
तेथें इंद्र वरुण कुबेर जाण । यांची गणना करी कोण ।
पावावया हरिचरण । सामर्थ्य जाण तया नाहीं ॥ १५५ ॥
ऐसें दुष्प्राप्य श्रीरामचरण । ते भक्तां लाधले संपूर्ण ।
ते सांडूनि इच्छी आन । ऐसा अभागी कोण त्रिजगतीं ॥ १५६ ॥
तूं सूर्यवंशी नृपती । आणि अनुज रघुपती ।
याचकें याचितां तुजप्रती । स्वयें त्रिजगती अर्पिसी ॥ १५७ ॥

सदैव रामचरणांची प्राप्ती व्हावी अशी
मारुतीने भरताजवळ मागणी केली :

मी किंकर तुझे साचार । हेंचि मागें उत्तरोत्तर ।
श्रीरामचरणाहूनी अन्यत्र । वांछा कोठे न वचावी ॥ १५८ ॥
म्हणोनी घातलें लोटांगण । तेथे भरत सुखायमान ।
श्रीरामाचें यथार्थ ज्ञान । तुजसी जाण कळलेसें ॥ १५९ ॥
श्रीराम सांडोनी आन । जो जो कां वांछी धन मान ।
त्यासीं श्रीरामाचें ज्ञान । सर्वथा जाण दुर्लभ ॥ १६० ॥

भरताचा दानधर्म :

नमन करोनी कपीसीं । आलिंगिला अति प्रीतीसीं ।
दान उद्धारिलें वाचेसीं । तें तें याचकांसीं देता झाला ॥ १६१ ॥
दिधलें गाईंचे सहस्त्र । धान्यकोठारें अपार ।
अश्व गज दानांचे भार । भरतें अपार वांटिले ॥ १६२ ॥
दिधलीं धनाचीं भांडारे । देश पुरें नगरें ।
भरतें वाटिलीं परिकरे । आशा दानभरें निमाली ॥ १६३ ॥
श्रीरामगमनें विशुद्ध । याचकांसी झाला-परमानंद ।
पेललें संतृप्तीचें दोंद । आनंदकंद श्रीराम ॥ १६४ ॥
भरत वांटीत प्रीतीकरीं । याचकांचे इच्छेवरी ।
तंव याचकांचा दुकाळ भारी । रामागमने करी संतृप्त याञ्चा ॥ १६५ ॥
ऐसें देवोनियां दान । भरत आनंदी-निमग्न ।
तंव विनवी वायुनंदन । चला रघुनंदनदर्शना ॥ १६६ ॥

”रामदर्शनार्थ लवकर चला” हनुमंत :

येथेंचि विलंब लागला पाहें । श्रीराम येईल लवलाहें ।
मग पुढें जावोनी काये । चला लवलाहें दर्शना ॥ १६७ ॥
ऐकोनि हनुमताचें उत्तर । अवघे उठले वेगवत्तर ।
सिद्ध होवोनी समग्र । जाती रघुवीरदर्शना ॥ १६८ ॥
शरण एका जनार्दना । भरत आणि रघुनंदना ।
सप्रेम भेटी दोघां जणा । त्या निरूपणा राम वदवी ॥ १६९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
भरतहनुमंतदर्शनं नाम एकोनाशीतितमोऽध्यायः ७९ ॥
॥ ओंव्या १६९ ॥ श्लोक ६ ॥ एवं १७५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणऐंशीवा