भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा
इंद्रजिताचे मेघपृष्ठावर गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
निकुंबिळेत वानरप्रवेश झाला तरी इंद्रजित ध्यानमग्न :
वानर बिळीं प्रवेशोन । जालें इंद्रजितदर्शन ।
बैसला आहे धरुन ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ १ ॥
वानरीं आंसुडितांचि जाण । तो न सांडी प्रेतासन ।
त्यांचें भंगेना तें ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ २ ॥
घाय हाणितां दारुण । इंद्रजिताचें भंगेना ध्यान ।
हातींचें न राहे अवदान । होमविधान जपनिष्ठा ॥ ३ ॥
वानरवीरांचिया श्रेणी । शंख करिती दोनी कानीं ।
इंद्रजित डंडळीना ध्यानीं । होमविधानीं सादर ॥ ४ ॥
कष्टतांही वानरगण । ध्याना भंगेना अणुप्रमाण ।
हातींचें न राहे अवदान । होमविधान खुंटेना ॥ ५ ॥
तये काळीं बिभीषण । त्याचें भंगावया ध्यान ।
मायामंदोदरी निर्माण । करित रुदन आणिली ॥ ६ ॥
रडत पडत आक्रंदत । आणिली होमशाळेआंत ।
जेथें बैसला इंद्रजित । शंख करीत तेथें आली ॥ ७ ॥
रावणाच्या दहाही शिरीं । भंरोनियां ओंटी भरी ।
नानापरींच्या दीर्घ स्वरीं । रुदन करीं तें ऐका ॥ ८ ॥
रणीं मारिला दशानन । अजून कायसें रे ध्यान ।
उघडोनि निजनयन । पाहें दर्शन पित्याचें ॥ ९ ॥
माझा करसील कैवाड । घेशील रावणाचा सूड ।
आलें तंव तूं ध्यानरुढ । हा मूढ अभिचार ॥ १० ॥
निघालें रावणाचें मडें । कायेसें ध्यानाचें सांकडें ।
दहाही शिरें पाहें पुढें । म्हणोनि रडे अति दीर्घ ॥ ११ ॥
रणीं छेदिला दशमुख । मी पावलें परम दुःख ।
अजून कायसें अभिचारिक । महामूर्ख झालासी ॥ १२ ॥
रावणाचें निजशरीर । विदारिती गीध घार ।
तूं उरलासी ज्येष्ठ कुमर । परी संस्कार न करिसी ॥ १३ ॥
सांडून अभिचारविधान । करीं पित्याचें पिंडदान ।
भंगेना त्याचें ध्यान । होमावदान राहीना ॥ १४ ॥
होमकुंडातून रथाचे आगमन :
इतुक्या अवसरांत । होमकुंडी अजित रथ ।
आला वारुंवासहित । तेणें तळमळीत बिभीषण॥ १५ ॥
इंद्रजित न पडे हो दुश्चित । न करवेचि कर्मघात ।
होमीं प्रकतला साश्व रथ । करील प्राणांत अवघ्यांचा ॥ १६ ॥
सप्तावरणें भेदून । राक्षसांसीं करोन रण ।
यक्षिणीवटमूळ उघडून । अवघे जण येथें आलों ॥ १७ ॥
अवघे जण आलों येथ । तो उद्योग गेला व्यर्थ ।
होमीं प्रकटला रथ । आक्रंदत बिभीषण ॥ १८ ॥
भाक देवोनि श्रीरामासी । म्यां आणिलें सौमित्रासी ।
होमीं प्रकटल्या रथासी । इंद्रजितास न मारवे ॥ १९ ॥
रथीं बैसोनि इंद्रजित । करील लक्ष्मणाचा घात ।
अवघ्यां आला पैं प्राणांत । आक्रंदत बिभीषण ॥ २० ॥
इतुका काळपर्यंत । उगाचि होता हनुमंत ।
आक्रंदतां शरणागत । काळकृतांत खवळला ॥ २१ ॥
तो म्हणे बिभीषणा पैं तूतें । मज निरविलें श्रीरघुनाथें ।
तुज कोण मारिता येथे । वृथा कां चित्तें भितोसी ॥ २२ ॥
हनुमंताने होमकुंडातील रथाला पाराळात दडपला :
मारिलिया शरणागत । धिक् जीवित धिक् पुरुषार्थ ।
ऐसें बोलोनियां हनुमंत । काळकृतांत खवळला ॥ २३ ॥
थरकत माथांची पैं शेंडी । वळोनी निजपुच्छाची वेढी ।
होमकुंडामाजी तांतडीं । घाअली उडी हनुमंतें ॥ २४ ॥
अश्वशस्त्रेंसीं समवेत । कुंडीं निघत होत रथ ।
हनुमंतें देवोनि लात । पाताळगत तो केला ॥ २५ ॥
सवेंचि उसळोनि तांतडीं । रागें इंद्रजित आंसुडी ।
वाचेसी पडली बोबडी । कर्म निर्वडी भंगलें ॥ २६ ॥
स्रुवा आंसडोनि कराग्रे । उलंडलीं अशुद्धपात्रें ।
ख्याति लाविली वायुपुत्रें । निशाचरें हडबडलीं ॥ २७ ॥
कर्म न होतां समाप्त । कैसेनि आला हनुमंत ।
जव पाहे विवरांत । अत्यद्भुत देखिलें ॥ २८ ॥
निधडा योद्धा वीर धीर । अचुकसंधानी सौमित्र ।
सवें वानरांचा भार । वीरीं विवर दाटलें ॥ २९ ॥
अति दुर्गम पंथ दारुण । भेदोनियां सप्तावरण ।
कैसेनि आले अवघे जण । पाहे आपण इंद्रजित ॥ ३० ॥
तंव देखिला बिभीषण । आमचें गुह्य गुप्तस्थान ।
दाखविता हा एक जण । कुळनिर्दळण हा आम्हां ॥ ३१ ॥
तंव बोलिला हनुमंत । युद्धी इंद्र धरिला जीत ।
ब्रीदें पढविसी इंद्रजित । तो पुरुषार्थ आजि दावी ॥ ३२ ॥
ब्रीदें पढविसी इंद्रजित । शेखी लपसी विवरांत ।
कळला तुझा पुरुषार्थ । कपटी निश्चित अभिचारत्वें ॥ ३३ ॥
तुजसी करावया रण । निधडा आलासे लक्ष्मण ।
दावीं आपली आंगवण । धनुष्या बाण सज्जूनी ॥ ३४ ॥
उत्तस्थाविंद्रजिच्छीघ्रमवस्थाप्यैव कर्मकृत् ।
स तु कर्मण्यनिर्वृत्ते मनः शल्यमिवोद्वहन् ॥१॥
रथेनादित्यवर्णेन बलवान्रावणात्मजः ।
इंद्रजित्कवची खड्गी सध्वजः प्रत्यदृश्यत ॥२॥
लक्ष्मणस्तमुवाचाथ रावणिं रगुनंदनः ।
समाहृये त्वां संग्रामें स्ॐय युद्धं प्रयच्छ मे ॥३॥
कर्म न होतां समाप्त । उठतां इंद्रजित तळमळित ।
होमकुंडी प्रकटतां रथ । केला हताहत हनुमंतें ॥ ३५ ॥
हनुमंताएवढा वैरी । आणिक नाहीं संसारीं ।
राक्षसांतें नानापरी । करीत बोहरी येथें आला ॥ ३६ ॥
याचेनि कर्मभंगें जाण । मज अलोट आलें मरण ।
आतां सौमित्रासीं रण । करीन निर्वाणसंग्रमा ॥ ३७ ॥
संग्राम करावया मर्गळा । सांडोनिया होमबिळा ।
शीघ्र आला वटमूळा । संमुख पावला सौमित्र ॥ ३८ ॥
परतोनि होमबिळाआंत । रिघों नेदी हनुमंत ।
बीळ आवरोनि समस्त । राहिला कृतांत बिळद्वारीं ॥ ३९ ॥
पूर्वील जो कामग रथ । आदित्यतेजें लखलखित ।
कामग अश्वसंयुक्त । सालंकृत ध्वजेंसीं ॥ ४० ॥
मुकुटकुंडलें मेखळा । वीरकंकणें कंठमाळा ।
कवच लेइला तो मर्गळा । खड्ग करतळां तुकित ॥ ४१ ॥
इंद्रजिताचें लक्ष्मणाला आव्हान :
ध्वजच्छत्रपताकान्वित । सारथ्यानें आणिला रथ ।
तेथें बैसला इंद्रजित । रणीं गर्जत साटोपें ॥ ४२ ॥
संमुख देखोनि लक्ष्मण । इंद्रजित बोलिला आपण ।
आम्ही तुम्ही दोघे जण । करुं निर्वाणसंग्राम ॥ ४३ ॥
तुझे हातें मज प्राणांत । कां माझेनि हातें तुझा घात ।
हाचि आजिचा युद्धार्थ । जाण सुनिश्चित सौमित्रा ॥ ४४ ॥
ऐसें बोलोनि विस्मित । इंद्रजित स्वयें असे पाहत ।
क्रमोनियां दुस्तर पंथ । कैसेनि येथ स्वयें आला ॥ ४५ ॥
भेदूनियां सप्तावरण । कैसेनि आले वीर दारुण ।
तंव देखिला बिभीषण । कुळनिर्दळण हा आम्हां ॥ ४६ ॥
किंकृतं शाठ्यमच्छिद्रं प्रहरस्यात्मजे मयि ।
शोच्यरत्वमसि दुर्बुद्धे निम्दनीयश्च साधुभिः ॥४॥
यस्त्वं स्वजनमुत्सृज्य परेषां भृत्यतां गतः ।
न जातित्वं न सौहार्द न भ्रातृत्वं न बंधुता ॥५॥
रक्षितं नैव शूरत्वं क्लीबत्वं प्रकटीकृतम्॥६॥
देखोनिया बिभीषण । कोपें इंद्रजित जाला अग्न ।
कैसें बोले तो निर्भर्त्सून । अनुलक्षून पितृव्या ॥ ४७ ॥
साधुसज्जनसुहृदभावेंसीं । रावणें दिधलें यौवराज्यासी ।
ज्येष्ठसन्मान सभेसीं । तुज राक्षसीं वंदिजे ॥ ४८ ॥
प्रधान आणि सेनाकुमर । केले तुझे आज्ञाधर ।
तो तूं सांडोनि दशशिर । गेलासी सत्वर श्रीरामा शरण ॥ ४९ ॥
जैसा पिता चुलता । तो तूं मिळोनि रघुनाथा ।
करावया मज अपत्याचा घाता । गुह्यार्था दाविसी ॥ ५० ॥
सांडून आमचें सुहृदपण । श्रीरामासी रिघोनि शरण ।
करावया कुळनिर्दळण । वर्में संपूर्ण सांगसी ॥ ५१ ॥
दांडा जन्मोनि वृक्षावरी । मिळोनि कुर्हाडीमाझारी ।
तो कुळाचाचि छेद करी । तैशापरी तूं येथें ॥ ५२ ॥
नाहीं राखिला जातिधर्म । नाहीं राखिला कुळानुक्रम ।
साधूंमाजी तूं पापी परम । निंद्य जन्म पैं तुझा ॥ ५३ ॥
सांडून यौवराज्यासीं आगळिक । जालासी श्रीरामाचा सेवक ।
शठ नष्ट तूं नपुंसक । परम दांभिक साधुत्वें ॥ ५४ ॥
कुद्धेनेंद्रजिता वाक्यं पुरुषं रावणानुजः ।
इत्युत्को भ्रातृपुत्रेण प्रत्युवाचं बिभीषणः ॥७॥
अजानन्निव मच्छीलं किं त्वमेवं व्रवीषि माम् ।
राक्षसेंद्रसुतानार्य पारुष्यं त्यज गौरवात् ॥८॥
परोपि हितवान्बंधुर्बंधुरप्यहिते रतः ।
अहितो देहजो व्याधिर्हितमारण्यमौषधम् ॥९॥
परस्वानां च हरणं परदाराभिमर्षणम् ।
सुहृदामपि संकोपस्त्रयो दोषाः क्षयावहाः ॥१०॥
बिभीषणाचे प्रत्युत्तर :
इंद्रजिताचें निंद्य वचन । ऐकोनियां बिभीषण ।
काय बोलिला आपण । धर्मवचन धर्मात्मा ॥ ५५ ॥
ऐक बापा इंद्रजिता । तुज कळलीसे माझी शिळता ।
जाणोनि निंदिसी कां वृथा । दुर्मदता साभिमानें ॥ ५६ ॥
तुज संग्रामीं नाहीं बळ । नष्ट कपटी तूं केवळ ।
अभिचार हें तुझें शीळ । पापी प्रबळ तूं एक ॥ ५७ ॥
करोनियां अभिचारता । मारुं पाहसी श्रीरघुनाथा ।
तुझा साक्षेपें घात करितां । पाप सर्वथा असेना ॥ ५८ ॥
परद्रव्याचें ज्यासी हरण । परदाराभिलाषण ।
सुहृदांचा द्वेष पूर्ण । तेथें मरण सहजचि ॥ ५९ ॥
सीताभिलाषे हताहत । पापें निमालेत समस्त ।
तुम्हांसी तुम्ही केला घात । आत्मा रघुनाथ द्वेषितां ॥ ६० ॥
सखा बंधु करी अनहित । तोचि वैरी पैं निश्चित ।
निरपराध जो हितान्वित । तो परम आप्त निजसखा ॥ ६१ ॥
अहित देहींचा देहज व्याधी । जो कां आपला आपण बाधी ।
हित अरण्यस्थ ओषधी । जे आधिव्याधिच्छेदक ॥ ६२ ॥
तेंवी आप्त तुम्ही उन्मादता । मज हाणोनियां लाथा ।
केलें माझिया स्वहिता । शरण रघुनाथा धाडिलें ॥ ६३ ॥
परदारपरद्रव्यहरण । या पापे बुडाला रावण ।
तुम्ही अवघे पापी पूर्ण । पावाल मरण निजपापें ॥ ६४ ॥
बिभीषणवचः श्रुत्वा रावणिः क्रोधमूर्च्छितः ।
अब्रवित्परुषं वाक्यं स्मयन्हेत्वर्थसंयुतम् ॥११॥
प्रागेव विश्वविजयी न निषेधयिता मम ।
यदा जहार रत्नानि भुवनेभ्योsखिलान्यपि ॥१२॥
तदा त्वमपि रत्नानां भागभागभवः स्वयम् ।
निहतं वालिनं दृष्ट्वा सुग्रीवमभिषोचितम् ॥१३॥
त्वया तद्राज्यलुब्धेन दुरात्मनसमनुष्ठितम्॥१४॥
इंद्रजिताची घोषणा :
बिभीषणाचें निजवचन । धर्मार्थरुप अति तीक्ष्ण ।
तेणे इंद्रजित क्षोभोन काय आपण बोलत ॥ ६५ ॥
त्रिभुवनींच्या संपत्ती । हरुनि आणि लंकापती ।
वांटा घेसी हातोहाती । उल्लास चित्तीं मानिसी ॥ ६६ ॥
वांटा घेतां आपण । परद्रव्यापहरण ।
न म्हणसीच पापाचरण । शठ संपूर्ण तूं एक ॥ ६७ ॥
छेदोनियां वाळीचा कंठ । सुग्रीवा केला राज्यपट ।
तेंवी राज्यलोभें तूं कपटी नष्ट । श्रीरामीं वरिष्ठ शरणागत ॥ ६८ ॥
बिभीषण भला साधुसंत । ऐसा पवाडा विख्यात ।
शेखीं राज्यलोभीं ठेवोनि चित्त । शरणागत श्रीरामीं ॥ ६९ ॥
इंद्रजित स्वमुखें आपण । निंदितां बिभीषण ।
तें देखोनि लक्ष्मण । आला आपण साटोपें ॥ ७० ॥
सज्जोनियां धनुष्यबाण । मांडून माहेश्वरी ठाण ।
घ्यावया इंद्रजिताचा प्राण । आला लक्ष्मण साटोपें ॥ ७१ ॥
संमुख देखोनि लक्ष्मण । इंद्रजित गर्जे आपण ।
मजसीं करावया रण । आंगवण तुम्हां केंची ॥ ७२ ॥
इंद्रजिद्धनुरादाय शरांश्चाशीविषोपमान् ।
उवाच चेदं संरब्धः सौमित्रिं स बिभीषणम् ॥१५॥
तांश्च वानरशार्दूलान्पश्यध्वं मत्पराक्रमम् ।
अद्य वो मामका बाणा महाकार्मुकनिःसृता ॥१६॥
गात्राणि विधमिष्यंति तूलराशिमिवानलः ।
अद्य वो गमयिष्यामि सर्वानेव यमक्षयम् ॥१७॥
धनुष्यासीं घालोनि हात । इंद्रजित रणरंगी गर्जत ।
तुम्ही जे जे आलेति येथ । तुम्हां प्राणांत माझेनि ॥ ७३ ॥
लक्ष्मण आणि बिभीषण । प्रथम यांचा घेईन प्राण ।
हनुमान वज्रदेही मारीन । निर्वाणबाण विंधोनी ॥ ७४ ॥
अंगद नळ नीळ जांबवंत । आणिक वानर समस्त ।
बाणीं करोनि क्षतविक्षत । मारीन येथ संग्रामीं ॥ ७५ ॥
माझे धनुष्याचा बाण । व्यर्थ न वचे पैं जाण ।
घेईन अवघियांचा प्राण । रणनिर्वाण हें माझें ॥ ७६ ॥
राम लक्ष्मण तुम्ही दोन्ही । दोन वेळां शरबंधनी ।
घोळसिले रणांगणीं । तेही विसरोनी आलेती ॥ ७७ ॥
तच्छुत्वा रावणेर्वाक्यं गर्वितं लक्ष्मणस्तदा ।
अभ्यधावत्सुसंक्रुद्धो राक्षसं वाक्यमब्रवीत् ॥१८॥
न वाचां दुर्गमं पारं कार्याणां राक्षसाधम ।
वाचा व्याहृत्य जानीषे कृतार्थोsस्मीति दुर्मते ॥१९॥
अंतर्ध्यानगतेनावां यत्त्वयाभिहतौ रणे ।
तस्कराचरितो मार्गो यः स शूरैर्न सेवितः ॥२०॥
तदाहवपथे प्राप्य स्थितोsह तव राक्षस ।
दर्शयस्वाद्य यत्तेजो वाचा किं बहु कत्थसे ॥२१॥
लक्ष्मणाचे इंद्रजिताला उपहासगर्भ भाषण :
इंद्रजिताचे ऐसे वाक्यार्थ । ऐकोनियां गर्वान्वित ।
लक्ष्मण बोले उपहासत । गर्वहत करावया ॥ ७८ ॥
वाचेचे बाणप्रहारीं । कोणीं मारिले नाहीं वैरी ।
तुझ्या शूरत्वाची थोरी । जे बोलवरी वाढिव ॥ ७९ ॥
शूराचें मुख्य लक्षण । करोनियां दाविती रण ।
तूं तंव तोंडभांड जाण । भंडपुराण वाढीव ॥ ८० ॥
बडबडेची आंगवण । तुझे ठायीं दिसे संपूर्ण ।
संमुख न करवे रण । जासी पळोन कपटत्वें ॥ ८१ ॥
अंधारीं लपोनि आपण । आम्हांसी केलें शरबंधन ।
तो तंव चोरीचा मार्ग जाण । नव्हे लक्षण शूराचें ॥ ८२ ॥
संमुख करावया संग्रामता । तुज नाहीम् सामर्थ्यता ।
मारुन मायेची सीता । विवरा आंतौता लपसी तूं ॥ ८३ ॥
अतिकाय मकराक्ष जाण । संमुख करोनियां रण ।
क्षात्रधर्में दिधला प्राण । कपटी संपूर्ण तूं एक ॥ ८४ ॥
ज्यासीं लाविलें शरबंधन । तो मी आलों स्वयें लक्ष्मण ।
करोनि दावीं आंगवण । बडबडोन काम काय ॥ ८५ ॥
एवमुक्तो धनुर्भीम परामृश्य महाबलः ।
विससर्ज शितान्बाणानिंद्रजित्समितिंजयः ॥२२॥
तदोत्सृष्टा बलवता शरास्तीक्ष्णा विषोपमाः ।
संप्राप्य लक्ष्मणं पेतुः श्वसन्त इव पन्नगा ॥२३॥
सशरौघेश्च विद्धांगो रुधिरेण च भूषितः ।
शुशुभे लक्ष्मणः श्रीमान्विधूम इव पावकः ॥२४॥
इन्द्रजित्वात्मनः कर्म प्रसमीक्ष्याथ राक्षसः ।
विनद्य च महानादमिदं वचनमब्रवीत् ॥२५॥
अद्य मत्कार्मुकोत्सुष्टाः शरास्तीक्ष्णाः सुपत्रिणः ।
आदास्यंति शरीरात्ते जीवितं जीवितच्छिदः ॥२६॥
ऐकोनि लक्ष्मणाचें वचन । इंद्रजित अति कोपायमान ।
उग्र शरचाप सज्जून । तीक्ष्ण बाण विंधिले ॥ ८६ ॥
जैसे धंधुवात विखार । तैसें सोडिले उग्र शर ।
ओरखडोनियां शरीर । वाहे रुधिर सौमित्रा ॥ ८७ ॥
अभेद्यकवची श्रीलक्ष्मण । त्यास भेदूं न शकती बाण ।
रुधिरोक्षित शोभायमान । रणगर्जन राक्षसां ॥ ८८ ॥
सर्वांगीं वाहतां रुधिर । जैसा तेजस्वी वैश्वानर ।
तैसा शोभतसे सौमित्र । निशाचरचरणमर्दीं ॥ ८९ ॥
देखोनि लक्ष्मणाचें रुधिर । इंद्रजित म्हणे मी योद्धा थोर ।
बाणीं भेदला सौमित्र । गर्जे थोर सिंहनादें ॥ ९० ॥
जे जे तुम्ही आलेति येथ । ते बाणीं भेदोनि समस्त ।
सौमित्रेंसी समवेत । जीवितांत करीन ॥ ९१ ॥
माझे सुवर्णपत्राचे बाण । घेतील अवघ्यांचा प्राण ।
ऐकोनि इंद्रजितगर्जन । काय लक्ष्मण बोलत ॥ ९२ ॥
नाहीं आंगवण गाढी । नुसती बोलाची प्रौढी ।
काय जिंतिलें रणनिर्वडीं । उभवोनि गुढी गर्जसी ॥ ९३ ॥
इत्युक्त्वा पंचपर्वाणमाकर्णापूरितं शरम् ।
निचखान महावेगं लक्ष्मणो रावणात्मजम् ॥२७॥
स शरेणाहतस्तेन सरोषो रावणात्मजः ।
सुप्रमुत्कैः शितैर्बाणैः प्रतिविव्याध लक्ष्मणम् ॥२८॥
स बभूव महाभीमो नरराक्षससिंहयोः ।
विमर्दस्तुमुलो युद्धे परस्परवधैषिणोः ॥२९॥
इंद्रजित – लक्ष्मण – द्वंद्व :
इंद्रजितगर्वितगर्जन । ऐकोनि स्वयें लक्ष्मण ।
घेवोनि पंचपर्वीं बाण । विंधी आपर साटोपें ॥ ९४ ॥
लक्ष्मणें रणनिर्वडीं । शर चाप जोडोनि जोडी ।
ओढी आकर्ण कानडी । प्रतापप्रौढीं साटोपें ॥ ९५ ॥
अभेद्य कवच भेदूनि जाण । लागतां लक्ष्मणाचा बाण ।
घायें इंद्रजित तळमळून । अमित बाण वर्षला ॥ ९६ ॥
येतां इंद्रजिताचे शर । सौमित्र सोडी बाण अनिवार ।
दोघे जण महाशूर । अति दुर्धर संग्रामीं ॥ ९७ ॥
लघुलाघवी अति चपळ । दोघे वर्षती शरजाळ ।
नर राक्षस सिंह शार्दुळ । दोघे कुशळ संग्रामी ॥ ९८ ॥
वर्मीं विंधोनियां बाण । येरयेरांचा घ्यावा प्राण ।
टपताती दोघे जण । रणप्रवीण रणयोद्धे ॥ ९९ ॥
उभौ हि बलसंपन्नावुभौ विक्रमशालिनौ ।
उभावपि च विख्यातौ सर्वशस्त्रास्त्रकोविदौ ॥३०॥
उभौ परमदुर्धर्षावुभौ परमतेजसौ ।
युयुधाते महात्मानौ व्याघ्रकेसरिणविव ॥३१॥
भूतैर्बहुमिराकाशं विस्मितैरावृतं बभौ ।
ऋषयः पितरो देवा गंधर्वा गरुडोरगाः ॥३२॥
शतक्रतुं पुरस्कृत्यं ररक्षुर्लक्षणं रणे॥३३॥
दोघे जण बळवंत । दोघे जण अति विख्यात ।
दोघे जण प्रतापवंत । दोघे समर्थ संग्रामी ॥ १०० ॥
दोघे धनुर्विद्यानिपुण । दोघे शस्त्रास्त्रप्रवीण ।
लघुलाघवी दोघे जण । दुर्धर रण दोघांचें ॥ १ ॥
दोघे जण महावीर । दोघे जण महाशूर ।
दोघे जण परम धीर । दोघे दुर्धर संग्रामीं ॥ २ ॥
दोघां वाढीव प्रसिद्ध । दोघां नाहीं श्रमस्वेद ।
दोघां चढला रणमद । दोघे सन्नद्ध संग्रामीं ॥ ३ ॥
एक केवळ सत्वस्थिती । एक केवळ कपतमूर्ती ।
एकामाजी अगाध शांती । एक छळणोक्तीं निपुण ॥ ४ ॥
दोघांचेहीं युद्ध दुर्धर । पाहूं आले सुरवर ।
यक्ष गंधर्व किन्नर । विद्याधर किंपुरुष ॥ ५ ॥
दैत्य दानव मानव पितर । देव ऋषी सनत्कुमार ।
युद्धा पाहूं आला इंद्र । वरुण कुबेर यम सोम ॥ ६ ॥
ब्रह्मा आला अति सत्वर । पाहूं आला युद्ध दुर्धर ।
उमेसहित श्रीशंकर । सहपरिवार भूतगणीं ॥ ७ ॥
रणीं रक्षावया सौमित्र । अवघें आले पैं सत्वर ।
विमानीं दाटले अंबर । विजयमंत्र ऋषींचें ॥ ८ ॥
लक्ष्मण देखोनि दुर्धर । रणीं क्षोभला निशाचर ।
अनुलक्षोनि सौमित्र । काय उत्तर बोलत ॥ ९ ॥
अद्य ते दर्शयिष्यामि तिष्ठेदानीं स्थिरो भव ।
इत्युक्त्वा सप्तभिर्बाणैरभिविव्याध लक्ष्मणम् ॥३४॥
दशभिश्च हनूमंतं तीक्ष्णधारैः शरोत्तमैः ।
ततः शरशतेनैव सुर्पयुक्तेन वीर्यवान् ॥३५॥
क्रोधाद्विगुणसंरंभ निर्बिभेद बिभीषणम् ।
स दृष्ट्वा राक्षसेंद्रस्य कर्म रामानुजस्तदा ॥३६॥
अचिंतयित्वा प्रहसन्नैतत्किंचिदपि ब्रौवन् ।
अब्रवीच्च शरन्घोरानुद्यम्य नरपुंगवः ॥३७॥
लघवश्चाल्पवीर्याश्च शरा हीमे सुखास्तव ॥३८॥
इंद्रजितें करुनि गर्जन । विंधिला सात बाणीं लक्ष्मण ।
हनुमंतासीं दहा बाण । अति दारुण विंधिले ॥ ११० ॥
मारावया बिभीषण । पोटांतून क्रोध दारुण ।
विंधिले शतानुशत बाण । घ्यावया जाण प्राण त्याचा ॥ ११ ॥
इंद्रजिताचे सर्व बाण । येतां देखोनि लक्ष्मण ।
वरच्यावरी तोडी आपण । बिभीषण रक्षावया ॥ १२ ॥
छेदूनि इंद्रजिताचे बाण । त्याही कर्माचा अभिमान ।
स्वमुखें न वदे लक्ष्मण । गंभीर पूर्ण संग्रामीं ॥ १३ ॥
बिभीषण शरणागत । कोणी लावितांचि हात ।
त्याचा करावया घात । सावचित्त सौमित्र ॥ १४ ॥
इंद्रजिताप्रति लक्ष्मण । स्वयें सांगताहे आपण ।
पुण्यप्राय लागती बाण । आंगवण तुज नाहीं ॥ १५ ॥
कपटें भस्म शौर्यवृत्ती । नाहीं सामर्थ्य ना शक्ती ।
रणीं वल्गसी किती । निर्लज्ज निश्चितीं तूं एक ॥ १६ ॥
ऐसें बोलोनि लक्ष्मण । घ्यावया इंद्रजिताचा प्राण ।
दुर्धर विंधिले पैं बाण । रणविंदान लघुहस्तें ॥ १७ ॥
तस्य बाणैरपध्वस्तं कवचं कांचन महत् ।
व्यशीर्यत रथोपस्थे ताराजालमिवांबरात् ॥३९॥
निकृत्तवर्मा नाराचैर्बभूव स कृटव्रणः ।
इंद्रजित्समरे शरः सर्वतो रुधिरोक्षितः ॥४०॥
स शक्रासनसंस्पशैलक्ष्मणेन हतः शरैः ।
मुहूर्तमभवन्मूढः सर्वतः क्षुभितेंद्रियः ॥४१॥
उपलभ्य मुहूर्तेन संज्ञां प्रत्यागतेंद्रियः ।
ददर्शावस्थितं वीरमाजौ दशरथात्मजम् ॥४२॥
लक्ष्मणाच्या बाणाने इंद्रजिताला मूर्च्छा :
इंद्रजित रथगत आपण । त्यासीं लक्ष्मणें विधोन बाण ।
हेमकवच शोभयमान । पाडिलें छेदून रणभूमीं ॥ १८ ॥
वर्षेनिया शरजाळीं । घायें कवचा केली रांगोळी ।
शोभे लखलखित भूतळीं । नभोमंडळी जेंवी तारा ॥ १९ ॥
कवच छेदोनि सत्वर । निधडा इंद्रजित झुंजार ।
घायवट केला जर्जर । वाहे रुधिर सर्वांगीं ॥ १२० ॥
वज्रप्राय दुर्धरशर । वर्मीं विंधितां सौमित्र ।
मूर्च्छित पडला निशाचर । महावीर इंद्रजित ॥ २१ ॥
घायें लागली अर्धचंद्री । प्राण पांगुळला शरीरीं ।
इंद्रियें तटस्थ व्यापारीं । धरेंवरी पाडिला ॥ २२ ॥
चेतना लपाली अंतरीं । आठव नाठवे शरीरीं ।
मूढमति धरेवरी । घटका चारी मूर्च्छित ॥ २३ ॥
उपलब्धि येतां जाण । इंद्रजित होतां सावधान ।
भोंवतें पाहे आपण देखे लक्ष्मण रणरंगी ॥ २४ ॥
सावध झाल्यावर इंद्रजिताचे पुन्हा युद्ध सुरु :
हातीं वाहोनियां मेढा । अंतका अंतक निधडा ।
महाकाळाचा संवगडा । देखिला पुढां सौमित्र ॥ २५ ॥
लक्ष्मणाचा खटाटोप । देखोनि युद्धाचा साटोप ।
इंद्रजितासी आला कंप । रणाभिदर्प मावळला ॥ २६ ॥
निधडा देखोनि लक्ष्मण । इंद्रजित जाला कंपायमान ।
पावोनियां अंतर्धान । करावया छळण विचारी ॥ २७ ॥
करावया लक्ष्मणासीं छळण । इंद्रजित वर्षे अमित बाण ।
तैसेच वर्षे लक्ष्मण । बाणीं गगन व्यापिलें ॥ २८ ॥
तौ प्रयुक्तौ पुनर्वीरौ रणे लक्ष्मणराक्षसौ ।
शरवर्ष हि वर्षंतौ जघ्नतुस्तौ परस्परम् ॥४३॥
इंद्रजिल्लक्ष्मणश्चैव परस्परजयैषिणौ ।
चक्रतुस्तुमुलं घोरं सन्निपातं मुहुर्महुः ॥४४॥
पुढती दोगे महावीर । नरशूर निशाचर ।
युद्धा मिसळले सत्वर । दुर्धर शर वर्षोनी ॥ २९ ॥
बाण वर्षतां दोघां वीरां । रणीं उठला रणधुळोरा ।
बाणीं खिळिली धरा । बाणीं अंबरा व्यापिलें ॥ १३० ॥
बाण कोंदले दश दिशांत । बाणीं व्यापिले दिगंत ।
आच्छादिले चंद्रादित्य । दोघे उन्मत्त रणमारें ॥ ३१ ॥
साधकता बाधकता युद्धस्थितीं । रणमारका माराच्या युक्ती ।
दोघां धनुर्विद्याव्युत्पत्ती । दोगे भिडती निःशंक ॥ ३२ ॥
येरयेरांचा करावया घात । शस्त्रास्त्रीं मिरवत हस्त ।
शस्त्री शस्त्रांचा निःपात । वीर कंदनार्थ करिताती ॥ ३३ ॥
मेघपृष्ठाच्या आडून इंद्रजिताचा कपटाने लक्ष्मणावर हल्ला :
लक्ष्मण वीर रणोन्मत्त । निधडा याचा पुरुषार्थ ।
जाणोनियां इंद्रजित । निजकपटार्थ मांडिला ॥ ३४ ॥
बाणीं झांकिले रविकर । रणीं पडतां अंधार ।
गुप्त केला रहंवर । अश्वयंत्यांसमवेत ॥ ३५ ॥
मेघ जिणोनि विविध । नांव पावला मेघनाद ।
त्यांचे पृष्ठावरी सन्नद्ध । बाण सुबद्ध विंधित ॥ ३६ ॥
इंद्रजित जावोनि मेघपृष्ठीं । दुर्धर वर्षे बाणवृष्टी ।
लक्ष्मण मारीन उठाउठीं । वानरकोटीसमवेत ॥ ३७ ॥
जेणें मार्गें आलेति येथ । तो बाणें आच्छादिला लंकापथ ।
पावों न शकां रघुनाथ । तुम्हां प्राणांत माझेनि ॥ ३८ ॥
खुंटली श्रीरामाची भेटी । खुंटली श्रीरामासीं गोष्टी ।
येथें माझिया बाणवृष्टीं । उठाउठीं मराल ॥ ३९ ॥
ऐकतां इंद्रजिताचें गर्जन । आक्रंदला बिभीषण ।
निशाचरें केलें छळण । गेला निघोन मेघपृष्ठीं ॥ १४० ॥
निधडा वीर लक्ष्मण । घायें त्याचा घेतला प्राण ।
युद्धासंधीं करोनि छळण । गेला निघोन मेगपृष्ठीं ॥ ४१ ॥
तेथें न चले अनुसंधान । त्याचे आम्हां लागती बाण ।
कैसेनि वांचेल लक्ष्मण । बिभीषण आक्रंदे ॥ ४२ ॥
लक्ष्मणासह हनुमंत इंद्रजितासमोर आला :
सौमित्रासीं रणाभिघात । वानर मारील समस्त ।
आम्हांसी आला प्राणांत । आक्रंदत बिभीषण ॥ ४३ ॥
आक्रंदता बिभीषण । आले हनुमंता स्फुरण ।
शरणागता आलें मरण । धिक् आंगवण पैं माझी ॥ ४४ ॥
माझेनि भरंवसें जाण । स्वयें श्रीरामें आपण ।
शरणागत बिभीषण । आणि लक्ष्मण धाडिले ॥ ४५ ॥
जीवें जीता मी हनुमंत । कोण करुं शके घात ।
आश्वासोनि शरणागत । रणीं गर्जत साटोपें ॥ ४६ ॥
इंद्रजित केवळ कपटमूर्तीं । त्याचे बळ तें छळणोक्ती ।
यालागीं आक्रंदसी किती । क्षणानुवृत्तीं मारीन ॥ ४७ ॥
करावया इंद्रजिताची शांती । लक्ष्मणा वाहोनियां हातीं ।
वेगें वाढला मारुती । दुर्धर वृत्ती अत्युग्र ॥ ४८ ॥
तळहातीं वाहोनियां जाण । जेथून इंद्रजित विंधी बाण ।
तेथें आणोनि लक्ष्मण । केलें गर्जन हनुमंतें ॥ ४९ ॥
ऐकोनि हनुमंतगजर । प्रत्यक्ष देखोनि वानर ।
येथेंही आणिला सौमित्र । निशाचर दचकला ॥ १५० ॥
एका जनार्दना शरण । इंद्रजित लक्ष्मण ।
दोघे करिती निर्वाण । सावधान अवधारा ॥ १५१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे एकाकारटीकायां
इंद्रजिन्मेघपृष्ठगमनं नाम अष्टत्रिंशत्तमोsध्यायः ॥ ३८ ॥
ओंव्या ॥ १५१ ॥ श्लोक ॥ ४४ ॥ एवं ॥ १९५ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा