भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तिसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तिसावा

रावणाला नलकुबेराचा शाप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचे कैलासावरील उपवनांत आगमन :

पौलस्तितनयचूडामणी । निशी मधुपुरीस क्रमोनी ।
तदनंतरें कैलासाचे उपवनीं । अलकावतीसमीप आला ॥१॥
देखोनि अग्रजाचें नगर । तेथें राहिला सहित निशाचर ।
तंव अस्तमाना गेला भास्कर । प्रकट झाली शर्वरी ॥२॥
क्षीराब्धिसुतें उदय केलियावरी । चांदणें प्रकटले अंबरीं ।
दिशा धवळिल्या तेजेंकरीं । कैलासगिरी शोभला ॥३॥
राक्षसवीर आतुर्बळी । शस्त्रें उसां घालोनि निद्रासमेळीं ।
तंववरी सुरारि इकडे ते काळीं । वन न्याहाळीत पैं होता ॥४॥

चंदण्यात दिसणारे वनसौंदर्य :

शैलपाठारींचे उपवन । आनंदवनाहूनि गहन ।
चैत्रगहन अशोकवन । त्या समान पैं नव्हती ॥५॥
नाना तरूंच्या याती । कण्हेर नाना वर्णांचें शोभती ।
कदंब कुसुमें लागले असती । नानापरींच्या कमळिणी ॥६॥
रम्य मंदाकिनीचें तीर । चंपकवृक्ष मनोहर ।
अशोक पुन्नाग मांदार । गगनचुंबित वाढले ॥७॥
आंबे पाटली लोध्राचें वृक्ष । केतकी अर्जुनवृक्ष असंख्य ।
केळी नारळी पळस अनेक । जांबळी रायाआंवळी ॥८॥
हरितकी आणि चंदन । खैर धामोडे बिल्ववृक्ष गहन ।
ताड माड सिंदी गगन । स्पर्धा करिती उंचपणें ॥९॥
आणिक वृक्षांसी नाहीं मिती । सांगितले आहेत अनेकीं ग्रंथीं ।
तितुके सांगतां विस्तारप्रती । कथा जाईल ज्ञाते हो ॥१०॥
ऐसें सुशोभीत वन । तेथें किन्नर करिती गायन ।
मधुर नाना मूर्च्छन । सारी गमादि पैं गाती ॥११॥
जयांचें ऐकतां गायन । मनासि सुख वाटे गहन ।
तेथें विद्याधर मद्य सेवोन । आरक्तलोचन करोन डुल्लत ॥१२॥
योषिता तेथें नेणों किती । नाना परींचें शिंपणें शिंपिती ।
हर्षे उल्लासें क्रीडती । चांदणे रातीं वसती सदा ॥१३॥
एकी वीणा वाजविती । एकी मोहरींत आलाप करिती ।
एकी नाना वाद्यीं व्युत्पत्ती । दाविती त्या धनदालयीं ॥१४॥
मंद सुशीतळ पवन । मधुमाधव ऋतु जाण ।
वसंत शरद आदिकरुन । तये पर्वतीं वसती सदा ॥१५॥
नानापरींच्या पुष्पयाती । तयांचे सुगंध वायु येती ।
तेणें लंकेश सुखावोनि चित्तीं । मदनाकार वृत्ती पैं झाली ॥१६॥
गायन अत्यंत सुस्वर । आणि पुष्पांचा सुवास मधुर ।
मंद करुन आकाशसंचार । स्पर्श करीत प्राणियां ॥१७॥
तेचि समयीं अब्धिनंदनें । गगनीं पसरिलीं किरणें ।
दिशा धवळिल्या निर्मळ चांदणें । कामिकांचीं मनें मोहती ॥१८॥

कामपीडित रावणाला रंभा दिसली :

ऐसियापरी तो पौलस्ति । कामासि झाला वशवर्ती ।
भ्रांत होवोनि दिशांगनांप्रती । पुनः पुनः अवलोकी ॥१९॥
इतुकें वर्तलेंसे तेथ । तंव दिव्याभरणभूषित ।
कटिमेखळा विद्युत्प्राय झळकत । स्तन शोभत पैं दोन्ही ॥२०॥
सर्व अप्सरांमाजि जाण । श्रेष्ठ रंभा चंद्रवदन ।
अंगीं उटी दिव्यचंदन । कुसुमें शोभती वेणीसीं ॥२१॥
अत्यंत शोभती दोनी जघन । पोरटिया जैसे मीन ।
कटिभाग सिंहीं देखोन । लाजोनि वन सेविलें ॥२२॥
नीळवस्त्रपरिधान । करीं शोभती जडित कंकण ।
मस्तकीं मुक्ताफळांची जाळी तेण । तारांगण लोपले ॥२३॥
चरण अत्यंत सुकुमार । हंसती चाले सुंदर ।
सैन्य डावलोनि ते मनोहर । स्वधामाप्रति जातसे ॥२४॥

रावणाने तिला पकडले, तिच्याजवळ आत्मप्रौढी व भोगयाचना :

रावणें देखिलें तियेसी । धांवोनि धरिली करें त्वरेंसीं ।
म्हणे तूं कोण कोठें जासी । झाली निशी यामांत ॥२५॥
तुझें रुप अति सुंदर । कोठे जातेसि वो सत्वर ।
कोण तुझा भ्रतार । मूर्ख तुज विसंबला ॥२६॥
आतां तू मजसीं अनुसर । भोग भोगीं नाना उपचार ।
मी जाण वो लंकेश्वर । देवां दुर्धर धाक माझा ॥२७॥
तुझी सुंदर अत्यंत तन । कोण भोगिता भाग्यगहन ।
तूं मज अनुसरतां मी त्याहून । सुख देईन तुज प्रिये ॥२८॥
स्वार्गीचे करीं अमृतपान । लेइ वो उत्तम आभरण ।
मज अनुसरतां कीर्ति गहन । लोकीं पावन होसील ॥२९॥
मी बळियाढा लंकानाथ । सुरासुर माझे आज्ञांकित ।
तो मी तुजपुढें याचक म्हणवित । वचन त्वरित मानीं माझें ॥३०॥
पुरुषांमाजि पंचानन । सृष्टीचा विधाता मी जाण ।
मी ब्रह्मकुळींचा ब्राह्मण । रावण अभिधान जाण माझें ॥३१॥

रंभेची रावणाला नकाराची प्रांजळ विनंती,
रावणाकडून तिच्यावर बलात्कार :

ऐकोनि दशाननाची मात । रंभा बोले लज्जान्वित ।
म्हणे तूं आम्हां पूर्वज गुरू येथ । निंद्य वचन बोलूं नये ॥३२॥
अन्य्त्र करितां मज बंधन । तूं सोडवावया योग्य दशानन ।
मी तुझी सून राया जाण । धर्मता वचन बोलतसें ॥३३॥
राया तूं पूज्य आम्हांसी । तूं श्वशुर पितयासम होसी ।
आज्ञा देई स्वभवनासी । जावयासी लंकेशा ॥३४॥
रावण म्हणे काय तूं मत्पुत्रभार्या । ते म्हणोनि सत्यचि जाण राया ।
तुझे अग्रजात्मजाची जाया । राक्षसराया सत्य मानीं ॥३५॥
राया करितें विनवण । मज सोडावें त्वरेंकरुन ।
याकारणें साष्टांग नमन । चरणवंदन करितें तुझें ॥३६॥
नळकुबेरासीं संकेत । केला असे राया जाण निश्चित ।
वाट पाहत असेल तिष्ठत । वेगीं मुक्त करीं मातें ॥३७॥
एखादा बलात्कार करिता मजवरी । तेथें तूं सोडविसी सुरारी ।
स्वधर्में भोगावी आपली नारी । दुःख भारी परस्त्रियेचें ॥३८॥
ऐसें रंभेंचें विनीत वचन । उपेक्षोनि तो दशानन ।
जैसें पंडिताचें शब्दरत्न । सांडी हेळसून मूर्ख जो ॥३९॥
जैसें पापिया नावडे सत्य । रोगिया नावडे पथ्य ।
तस्करा नावडे ताराकांत । मूर्खा पंडित नावडे ॥४०॥
वेदबाह्य जो त्या नावडे वेद । अज्ञानिया नावडे ज्ञानबोध ।
दुर्जना नावडे मित्रसंवाद । कृपणा आत्मवाद नावडे ॥४१॥
मूर्खासि नावडे ज्ञान । अभक्ता नावडे हरिकीर्तन ।
आळशिया नावडे स्वधर्माचरण । पाखांडिया दानधर्म नावडे ॥४२॥
ऐशिया हो लंकानाथा । नावडे स्वहिताची कथा ।
रंभेसि करुन बलात्कारता । झाला पीडिता भ्रमोनी ॥४३॥
रंभेसि पाडोनि शैलातळीं । बळेंचि भोगिली ते काळीं ।
भ्रष्ट आरभणें कांचोळी । माथेची जाळी तूटली ॥४४॥

भ्रष्ट झालेली रंभा पतीच्या घरी आली :

रंभा विनवी कर जोडून । सोडीं लंकेशा मी जाईन ।
मग ती रावणें मुक्त करुन । निजभवना चालिली ॥४५॥
मार्गीं जातां ते सुंदरी । माथेचे केश सांवरी ।
डोईचा पालव निजकरीं । सरसा सुंदरीयें पैं केला ॥४६॥
ऐसी लज्जित भीत अंगना । निघाली पतिभवना ।
मार्गी करित विवंचना । काय कैसें होईल ॥४७॥
ऐसें चिंतीत आपण । पावली पतीचें भवन ।
दोनी चरणां करोनि नमन । लज्जायमान होवोनि ठेली ॥४८॥

नलकुबेराला रंभेकडून वृत्तनिवेदन :

नलकुबेर म्हणे तियेसी । काय वर्तले भद्रे सांग मजपासीं ।
येरी म्हणे स्वामी येतां निजभवनासी । रावणें मजसीं देखिलें ॥४९॥
सैन्यासहित दशानन । पर्वतापाठारीं उतरला जाण ।
तेणें मजला बलात्कार करुन । रात्रीं मैथुन संपादिलें ॥५०॥
अगाध बळें लंकापती । मी सुकुमार योषिताजाती ।
म्यां विनविला नाना उपपत्ती । अति काकुळती पैं आलें ॥५१॥
गुरु श्वशुरा पितयासमान । ऐसीं वचनें हेळसून ।
मजसीं रमला दशानन । पापात्मा पूर्ण जाणिजे ॥५२॥

संतप्त नलकुबेराचा रावणाला शाप :

रंभेचे ऐकोनि वचन । चित्ते संतप्त नलकुबेर जाण ।
अत्यंत झाला क्रोधायमान । लाक्षारंगासमान नेत्र केले ॥५३॥
क्षण एक धरोनि ध्यानस्थिती । ध्यानीं आणिला गिरिजापती ।
सवेंचि तोय घेवोनियां हातीं । मंत्रिता झाला ते काळीं ॥५४॥
करीं घेवोनि उदकातें । शापिता झाला रावणातें ।
म्हणें रंभेवेगळे जे स्त्रियेतें । धरितां निश्चये मरसील ॥५५॥
रंभेवेगळी जे नारी । धरितां मृत्यु पावे सुरारी ।
ऐसा शाप देखोनि ते अवसरीं । उदक करींचें सांडिलें ॥५६॥

देवादिकांना आनंद :

नलकूबेरें देतां शाप । देवांसि सुख झालें अमूप ।
आकाशींहूनि वर्षती पुष्प । दुंदुभिवाद्यें वाजती ॥५७॥
ग्रह आदिकरोनि सुरगण । करिते झाले आनंदें गर्जन ।
म्हणती झाले आमुचें कारण । म्हणोनि टाळिया पिटिती ॥५८॥
एका जनार्दना शरण । श्रीरामकथा पुण्यवान ।
धन्य ऐकती तयांते श्रवण । धन्य वदन वदतियांचें ॥५९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणरंभासंगमनलकूबेरशापो नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥ ओंव्या ॥५९॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तिसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तिसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *