संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेविसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेविसावा

वाली- रावणाचे सख्य

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रणी धरोनि रावण । सहस्त्रार्जुनें केलें बंधन ।
तेथें पुलस्ति मुनि येऊन । मागोनि दशानन सोडविला ॥१॥
पुलस्ति गेला स्वर्गासी । मागें रावण विचरे अवनीसीं ।
जे जे राजे जे जे देशीं । त्या त्या स्थाळासी आपण जाये ॥२॥
तयांते जिंती रावण । राक्षस अथवा राजे जाण ।
अथवा देव सिद्ध चारण । अधिक बळ ऐकोन संग्राम करी ॥३॥

रावणाचे किष्किंधेला आगमन :

तदनंतरे लंकानाथ । हिंडत असतां प्रधानांसमवेत ।
तंव पुढें किष्किंधेचा प्रांत । देखोनि त्वरित तेथे आला ॥४॥
तें किष्किंधा नगरी कैसी । दुसरी अमरावती ऐसी ।
पुरंदरात्मज पाळी जियेसी । वर्णना तिसी न करवे ॥५॥
भोंवती नाना परीची वनें । सरोवरें भरलीं शीतळ जीवनें ।
देखोनि मार्गस्थांचीं मनें । थोर विश्रांति पावती ॥६॥
पंपासरोवराचे तीरीं । ब्रह्मयानें वसवली नगरी ।
इंद्रादिकां अटक भारी । तेथें राज्य करी शक्रसुत ॥७॥
देवां वाळी दैत्यां वाळीं । सिद्ध चारण कांपती चळीं ।
इंद्रवरदमाळा जवळी । बळें वाळी अजिंक्य देवां ॥८॥
ऐसा वाळीच्या पुरासी । रावण आला दशशिसी ।
नगरद्वारीं प्रवेशता प्रधानासी । वाळीचिया देखिलें ॥९॥

रावणाचे वालीला आव्हान :

रावण म्हणे गा मंत्रिया तारा । जाणवीं आपुलिये वानरेश्वरा ।
युद्धकारणें दशशिरा । येथें येणें पैं झालें ॥१०॥
जरी सामर्थ्य असेल तुम्हांसी । तरी युद्ध करावें मजसीं ।
नाहीं तरी शरण रावणासी । शीघ्रकाळेसीं पैं यावें ॥११॥

समुद्रस्नानाहून वाली येईपर्यंत धीर धरण्याची रावणाला सूचना :

ऐसें रावणाचें वचन । तार-प्रधानें ऐकोनि जाण ।
प्रत्युत्तर छळणेंकरुन । तयाप्रती बोलतसे ॥१२॥
तारापतिवाळीसीं रण । करूं इच्छितोसी रावण ।
तरी धीअ धरीं एक क्षण । शक्रसुत येईल आतां ॥१३॥
राजा वाळी तो स्नानासी । गेला असे समुद्रासीं ।
संध्या सारोनि तुम्हांपासीं । येईल युद्धासी करावया ॥१४॥
सहजस्थितीं किष्किंधानाथ । नित्य चतुःसमुद्रीं स्नानसंध्या करीत ।
तो ये तंवपर्यंत । स्वस्थचित्तें असावें ॥१५॥

वाळिच्या अचाट सामर्थ्याचे रावणाकडे वर्णन :

ऐकें लंकेशा सावधान । तुवां जरी केले अमृतपान ।
तरी वाळिहस्तें तुझा प्राण । क्षणार्धे जाण जाईल ॥१६॥
जरी तूं झालासी वज्रशरीरी । तरी वाळीपुढें तुझी नुरेचि उरी ।
निमेषामाजि समुद्र चारी । स्नान करोनि जो येतो ॥१७॥
देवां दानवां मागतां रण । तिहीं पाठविला वाळीपासीं जाण ।
तो दुदुभि समरांगण । वानरेसीं करुं पाहे ॥१८॥
ऐसा दुंदुभि समर्थ । वाळिने मारिला निमेषांत ।
पैल पडिलासे कलेवरपर्वत । मंदराचळ दुसरा ॥१९॥
जरी तुज प्रसन्न त्रिपुरारी । तुवां जिंतिले राजे पृथ्वीवरी ।
तरी वाळिदर्शनें तुझी उरी । नुरे निर्धारीं जाणतों मी ॥२०॥
अथवा तांतडी असेल तुझे पाटीं । तरी जाय दक्षिण-समुद्राचे तटीं ।
रायासीं तुज होईल भेटी । संग्रामीं सुखी करील ॥२१॥
दक्षिणसागरीं करोनि स्नान । बैसलासे कपि दुसरा भान ।
तेजें अत्यंत विराजमान । देखोनि मन निवेल तुझें ॥२२॥

वालीशी युद्ध करण्यासाठी रावण समुद्रावर गेला :

वाळी आहे समुद्रतीरीं । ऐसे ऐकोनि सुरारी ।
चालिला जैसा कज्जळगिरी । बहु क्रोधेंकरीं उंचबळत ॥२३॥
दुरोनि देखिला ताराकांत । ध्यानस्थ बैसला जैसा पुण्यपंडित ।
तयासी धरावया निशाचरनाथ । पुष्पकावरोनि उतरला ॥२४॥
बक जैसा गंगातीरीं । हळुच पावलीं मत्स्य धरी ।
सांचोळ नव्हतां तस्कर घरीं । लक्ष्मीवंताचे पैं रिघे ॥२५॥
तैसा रावण हळुच पाउलीं । चालिला पापी धरावया वाळी ।
तंव तो शक्रसुत नेत्रकमळीं । रावणातें अवलोकी ॥२६॥

रावण आपल्या वीस हातांनी वालीला
पकडण्यासाठी जाताच वालीनेच त्याला काखेत पकडले :

विसांही भुजींकरुन । धरु गेला जों रावण ।
तंव वाळीनें हात उचलोन । कांखेतळीं दडपिला ॥२७॥
दहा शिरें लंकानाथा । कांखेखालें झाला दडपिता ।
पुनरपि तो समुद्रीं तत्वतां । स्नानकरणें जाता झाला ॥२८॥
रावण असोनि कांखेतळीं । करितां समुद्रीं आंघोळी ।
नाकी तोंडी क्षारजळीं । कासावीस रुदन करी ॥२९॥
वाळी अवलोकी नावेक । तंव दहा तोंडें काळें मुख ।
दाही मस्तकीं मुकुट देख । भुजा विंशति लोंबती ॥३०॥
शरीर दीर्घ लंबायमान । कांखेतून लोंबती चरण ।
जैसा खगेश्वर पन्नग धरुन । नेतसे तैसा वाळीही ॥३१॥
ऐसा चहूं समुद्रीं संध्यातर्पण । करोनि अमरेशनंदन ।
श्रमरहित वीर जाण । नगरप्रांतालागोन पैं आला ॥३२॥
म्हणे म्यां घालोनि काखेतळीं । केलिया समुद्रीं आंघोळी ।
तरी कोण दशा तया झाली । विचारोनी भलीं पाहों पां ॥३३॥

समुद्रस्नानाने कासावीस झालेल्या रावणाची वालीकडून सुटका :

ऐसें विचारुन ताराकांत । मग दोन्ही उचलिले हात ।
तंव कांखेतून लंकानाथ । सुटोनि पुढें पडियेला ॥३४॥
वाळी म्हणे तूं कोणाचा कोण । दक्षिणसमुद्रीं यावया काय कारण ।
मज धरीत होतासि किंनिमित्त जाण । समूळ कथन सांग आतां ॥३५॥
वाळी हांसोन ते काळीं । विस्मयो पूर्ण हृदयकमळीं ।
तंव राक्षसेंद्र बद्धांजळी । विनविता झाला ते समयीं ॥३६॥
शुक्रसुता तुझ्या बळाची थोरी । उपमा देवों तरी य त्रिभुवामाझारी ।
वीर देखिले परी तुझी सरी । कल्पांतीं ते न पावती ॥३७॥
म्यां आपुलेनि बळें मही । जिंतिलि चतुःसमुद्र पाहीं ।
परी तुझ्या बळा समता नाहीं । माझ्या दृष्टीं पडिली आजवरी ॥३८॥

रावणाची शरणागती व वालीजवळ मैत्रीची इच्छा :

मी आलों युद्धकारणें । त्वां मज धरोनि चतुःसमुद्रीं स्ननें ।
केलीं आतां मज रक्षणें । जीवदान झणें देवोनी ॥३९॥
श्रम न पावतां वाळी । तुवां मज घालोनि कांखेतळीं ।
केल्या समुद्रीं आंघोळी । तू आतुर्बळी त्रिभुवनीं ॥४०॥
आतां वानरेशा अवधारीं । तुवां मजसीं करावी मैत्री ।
आम्हां तुम्हां साक्षी अग्नि धरित्री । आणि साक्षी द्विजदेव ॥४१॥
माझे स्त्रीं पुत्र ऐश्वर्य । आणिकही जे पदार्थ तव सर्व ।
तुज मज वेगळीकभाव । नाहीं गौरव हा मैत्रीचा ॥४२॥
तुमचें आमचें इष्टपण । हें त्रैलोक्यीं होय भूषण ।
मी तुझा मित्र हे देवगण । थोर भयातें पावती ॥४३॥

परस्परांचे सख्य :

मिळोनियां दोघी जणीं । मित्रत्व करूं साक्षी अग्नी ।
मग प्रवेशले किष्किंधा भवनीं । राक्षसेश्वर आणि हरिपुंगव ॥४४॥
अमरेंद्रसुत पौलस्तितनयो । एक होऊनी वीर-बाहो ।
किष्किंधा प्रवेशले सोमसूर्यो । मंडळीं पहा हो गगनाचिये ॥४५॥
कीं सिंह प्रवेशे पर्वतदरीं । कीं व्याघ्र वसे झाळीभीतरीं ।
कीं गुहेसी वसिजे योगीश्वरीं । तयापरी नगरीं स्थिरावले ॥४६॥
एकमासपर्यंत राघवारी । राहिला होता किष्किंधापुरी ।
मग प्रधानांसमवेत सुरारी । त्रैलोक्यीं विचरता झाला पैं ॥४७॥
ऐसे पूर्वी थोर थोर । ते रावणें केले किंकर ।
तया रावणातें कपीश्वर । कांखे असोनि हिंडिन्नला ॥४८॥
ऐसा शक्रसुताचा पराक्रम । देवां दानवां दुर्घट परम ।
तया निर्दाळिता तो तूं श्रीराम । पूर्णब्रह्म अवतार ॥४९॥
पतंग जैसा दीपावरी । बुडोनि मरे स्नेहाभीतरीं ।
तैसे तुवां आपुले वैरी । रणसागरीं मारिले ॥५०॥
एका जनार्दना शरण । श्रीराम कथा भवतारण ।
पुढील कथानुसंधान । तें निरुपण अति गोड ॥५१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणवाळिमित्रत्वं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥ ओंव्या ॥५१॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण