संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेहतिसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेहतिसावा

रावणाची सुटका व इंद्रबंधन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची प्रतिज्ञा :

राक्षसां देवा संग्राम घोर । हा रामा तुझ्या मायेचा बडिवार ।
राक्षसदेवांच्या शरीं अंबर । भरुनी अंधकार दाटला ॥१॥
कोणा कोणी न दिसे स्पष्ट । तम दाटलें अति उत्कृष्ट ।
वीरें वीर पावले कष्ट । तयांत तिघे सावध ॥२॥
एक राक्षस दुजा राजकुमर । तिजा इंद्र धनुर्वाडा दुर्धर ।
परस्परें करिती रणमार । घाय दुर्धर हाणिती ॥३॥
सारथिया म्हणे रावण । ऐकें गा तूं एक वचन ।
माझे सकळ राक्षसगण । विबुधीं रणीं पाडिले ॥४॥
आजि माझ्या क्रोधेंकरून । करीन त्रैलोक्याचें दहन ।
सारथिया शीघ्र स्यंदन । नेईं सैन्याचे आदिअंतवरी ॥५॥
शीघ्र आजि समरांगणीं । शत्रूंची धडें लोळवीन रणीं ।
माझिया ओरतापाची करणी । असत पावती शत्रुनक्षत्रें ॥६॥
मी उर्ध्व उचलीन हात । तंव आकाशास भय बहुत ।
माझेनु धाकें वायु त्वरित । उकडील तिकडे नव जाय ॥७॥
तरी सारथिया चिंता न करीं । माझा रथ ने तेथवरी ।
जेळॆं उदय होय तमारी । तेथपर्यंत चालवी ॥८॥
ऐकोनि रावणाचे वचन । तो सारथी गुणनिधान ।
मनोवेगातें मागें टाकून । वारूंसीं रथ मध्ये आणिला ॥९॥

रावणाला पकडण्याची इंद्राची देवांना आज्ञा :

ऐसें जाणॊनि त्रिदशपती । रथावरून देवांप्रती ।
म्हणता झाला तो सावधवृत्ती । ऐका माझे मनींचे हो ॥१०॥
आजचि या संग्रामांत । रावण दळें बळॆं झाला उन्मत्त ।
यासि न मारून जीवें जीत । धरून नगराओरत न्यावें ॥११॥
ऐसें बोलोनि अमरचूडामणी । प्रवेशला तो रणांगणीं ।
नाना आयुधें नाना बाणीं । रिपुदळणीं घेतलीं ॥१२॥
रावणाचे दक्षिणभागीं । उभा दीक्षित शतक्रतु यागी ।
उभयतां सेना शतयोजना रणरंगी । शस्त्रयुद्धीं सज्ज असे ॥१३॥

रावण देवांच्या बंधनात :

देवांचे सैन्य अगाध । तयामाजी इंद्र प्रबुद्ध ।
बाण सोडिले तेजोमय विविध । रावणसारथिरथ भंगिला ॥१४॥
एकला रावण रणभूमीसीं । सांपडला हो देवांसी ।
भ्रांत झाला न स्मरे मानसीं । हें देखोनि राक्षसीं हाक दिधली ॥१५॥
हा हा करिती निशाचर । म्हणती मेला गेला दशशिर ।
कीं भस्म केला देवीं समग्र । कीं रणसागरीं बुडविला ॥१६॥
तदनंतर मेघनाद । ऐकोनि राक्षसांचा शब्द ।
पिता धरिला हें वचन सुबद्ध । हृदयवर्मीं आदळले ॥१७॥

इंद्रजिताची गर्जना :

क्रोधें झाला मूर्च्छापन्न । दोनी खात दाढा दशन ।
हात चुरी दोनी चरण । पृथ्वीवरी घांसितसे ॥१८॥
नेत्र झाले क्रोधें आरक्त । चळवळां सर्वांग कांपत ।
म्हणे ब्रह्मांडाच्या उतरंडी येथ । पालथ्या करोनि सांडीन ॥१९॥
म्हणे सोमसूर्य फ़ुंकोन पांडू । कीं नक्षत्रांसहित गगन तोडूं ।
कीं या विरंचीचा खेळ मोदूं । कीं ध्रुव पाडूं आकाशींचा ॥२०॥
कीं या चराचराची बांधूं मोळी । कीं एकवीस स्वर्ग समुद्रजळीं ।
कीं मेरूसहित दुग्गज पायांतळीं । रगडोनि रांगोळी करूं आजी ॥२१॥
कीं मंगळमातेचे उदर चिरूं । कीं सप्तसागरांचा घोंट भरूं ।
कीं कूर्माची पाठी शतकूट करूं । हे अवनी धरिली म्हणॊनि ॥२२॥

इंद्रजिताने माया सोडून रावणाला सोडविले :

रुद्रावेशें राजकुमर । युद्धा प्रवर्तला दुर्धर ।
शुक्रें दिधली होती माया घोर । ते घातली लटिकी जाण ॥२३॥
ते मायेचे सांगतां विंदान । अथवा करिताही वर्णन ।
तरी ते मुळींच लटिकी जाण । तिसी सत्यपण असेना ॥२४॥
ऐसिया मायेंते विवुधारी । घेवोनिया मग गर्जना करी ।
प्रेरिता झाला वैरियावरी । तेझें वृत्रारि मोहिला ॥२५॥
मेघनादें सोडोनि सर्व सैन्य । जेथे मरुद्रणसिंह होता मेघवाहन ।
तेथें येवोनि पिता रावण । रिपूपासोन मुक्त केला ॥२६॥
अमरनाथ न गणी रिपुपुत्रासी । जेंवी पंडित पाखांडियासी ।
तंव मेघनादें त्या समयासी । थोर आश्चर्यासी पैं केलें ॥२७॥

इंद्राचा रथ भंग केला :

सुवर्णपुंखी तीक्ष्ण शर । सोडिता झाला दशाननकुमर ।
तेणें इंद्ररथाचे वारू चूर । रथ मोडोनि दूर पाडिला ॥२८॥
इंद्र झाला ते काळीं विरथ । सवेंचि ऐरावतीं आरुढ होत ।
अति मायावी रावणसुत । काय सांगूं रघुराजा ॥२९॥
कृपाळुया अवनिजापती । तुझी अतर्क्य माया अतर्क्य स्थिती ।
तुवां अवताराची घेवोनि बुंथी । नाना खेळें खेळसी ॥३०॥
या ब्रह्मांडातें स्रजिता । तों कुमरू तुझा तत्वतां ।
जेणें हे मही घेतली मायां । तो तुझ्या अंगाखालता दडाला ॥३१॥
योगियांचा मुकुटमणी ज्यातें म्हणती शूळपाणी ।
तो तुझे पायांचे पायवणी । वंदोनि नाम स्मरतसे ॥३२॥
कुंभोभ्दव म्हणे श्रीरघुनाथा । वेदशास्त्रां न कळे तुझी कथा ।
साही दर्शनें विवादतां । तुझिया अंता न पावती ॥३३॥
करोनि मायेचे विंदाना । इंद्र भुलविला रणांगणा ।
शर वर्षे तें न दिसे जाणा । खेदातें मन पावलें ॥३४॥
क्षतं क्षीण देखोनि देवेंद्र । तें समयीं धांवला राजकुमार ।
अवचिता धरोनि अमरेंद्र् । गळां बंधन पैं केलें ॥३५॥
आपणा धरिलें होतें म्हणून । ते संधि रावणें साधून ।
करिता झाला शस्त्रप्रेरण । मरुद्रण लक्षोनी ॥३६॥
राक्षसीं इंद्र रणीं धरिला । भेणें सुरां पळ सुटला ।
कित्येकांचा संहार रावणें केला । उरले ते पुरीं प्रवेशले ॥३७॥
रथावरोनि शक्रजित । पितयासी येथोनि चला म्हणत ।
आम्हांसी झाला जय प्राप्त । कोणे कार्या येथें रहावें ॥३८॥
मेघनाद म्हणे पितयासी । हा ज्वर होता माझे मानसीं ।
तो निरसला शिवकृपेसी । इंद्रराव धरितांचि ॥३९॥
मी देवांचा दर्पहरण । त्रैलोक्य माझेनि कंपायमान ।
इंद्रा धरोनि मनोरथ पूर्ण । आजि माझे पैं झाले ॥४०॥
आजिपासोनि त्रैलोक्य । आम्ही भोगूं आवश्यक ।
आता युद्धाची उत्कंठा देख । आम्हांसी नाहीं राजेंद्रा ॥४१॥
ऐसें पुत्रांचे वचन । ऐकोनियां दशासन ।
पुनरपि म्हणे पुत्रा दृढ बंधन । करीं दक्षिणपुरीस नेतां ॥४२॥
ययासि लंकेसी पैं नेतां । देव येतील सोदवावया तत्वतां ।
हेही न घदे परी रक्षितां । आळस न कीजे मेघनादा ॥४३॥
अमरपुरीस इतकें करून । इंद्रासि गळां बांधोन ।
विदारोनि देवसैन्य । स्वसैन्येंसी निघाले ॥४४॥
वाजंत्रांच्या नाना ध्वनी । गुढिया मखरें उभवोनि ।
पुरीं प्रवेशले स्वभवनीं । राक्षसेंद्र पैं आला ॥४५॥
गृहीं प्रवेशोनि रावण । समस्तां आज्ञा दिधली जाण ।
श्रमलेति युद्ध करितां दारूण । विश्रांति घ्यावी निजमंदिरीं ॥४६॥
ऐसें राक्षसराज बोलिला । समस्तां आज्ञा देवोनि प्रवेशला ।
नगरजना उत्साह झाला । मंगळतुरें वाजती ॥४७॥
एका जनार्दना शरण । रावण प्रवेशला लंकाभवन ।
इंद्रातें करोनि बंधन । संरक्षण करविले ॥४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
रावणइंद्रबंधनलंकाप्रवेशो नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः ॥३३॥ ओव्यां ॥४८॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेहतिसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय तेहतिसावा