भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सोळावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सोळावा

शंकराचे रावणाला वरदान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मागिले प्रसंगीं वैश्रवण । रणभूमीस झाला भग्न ।
मागें रावणें पुष्पक हिरोन । वरी आरूढोन निघाला ॥१॥
सवें प्रधान थोर थोर । मारीच प्रहस्त महावीर ।
विमानीं आरूढोन वनें घोर । लंघिते झाले ते काळीं ॥२॥
षडाननाचें जन्मस्थान । ते देखिलें शरवण वन ।
तेथें शर होती उत्पन्न । यालागीं शरवण बोलिजे ॥३॥
तदनंतरे पौलिस्तिकुमर । देता झाला वन सुंदर ।
वृक्ष वल्ली अपार । अति मनोहर देखिलें ॥४॥
तेजें अत्यंत साजिरें । सुवर्णमयचि साकारें ।
उपमा देतां भास्करें । किरणाजाळ सोडिलें ॥५॥
तया वनप्रदेशीं कैलासगिरी । असे जैसा मेरू धरित्रीं ।
त्याच भागीं शोभा साजिरी । पुष्पक तेथें येतें झालें ॥६॥

कैलासपर्वतावर येताच पुष्पक विमान एकाएकी थांबले :

पुष्पकें दिखिला कैलास । पुढें न चाले राहिले सावकाश ।
गति खुंटली देखोनि राक्षस । थोर आश्चर्य पावला ॥७॥
अत्यंत प्रतापी रावण । चिंताक्रांत म्लानवदन ।
प्रधानाप्रति काय वचन । बोलता झाला ते समयीं ॥८॥
हें पुष्पक विमान । न चाले गति खुंटोन ।
येथें राहिलें कोण कारण । निर्धार पूर्ण लक्षेना ॥९॥
पर्वतासारिखें पुष्पकविमान । पर्वतमाथां राहिलें जाण ।
कोण कर्म वैभव कोण । काय कारण राहिलें ॥१०॥

रावणाची चिंता ओळखून त्याचे कारण मारीचाने सांगितले :

दशग्रीव ऐसें बोलिल्यावरी । ऐकोनि मारीच सारांश उत्तरीं ।
बोलता झाला शब्दचातुरीं । म्हणे अवधारा लंकेशा ॥११॥
हें जें पुष्पक विमान । निष्कारण कां पतन ।
पर्वतमाथां वळंघोन । कोणें कर्में राहिलें म्हणसी ॥१२॥
निश्चितेसीं राजचूडामणी । पुष्पक कुबेराचें म्हणोनी ।
पुढें न चालें मार्ग खुंटोनी । राहिलें हें पर्वतमाथां ॥१३॥
कुबेराचें विमान । तेथें आरूढे वैश्रवण ।
तयावीण न चाले जाण । रहावया मूळ हेंचि यासी ॥१४॥

इति वाक्यांतरे तस्य करालः कृष्णपिंगलः ।
वामनो विकटो मुंडी दंडी हस्वभुजो बली ॥१॥
ततः पार्शमुपागम्य भवस्यानुचरोऽब्रवीत ।
नंदीश्वरो वचश्चैनं राक्षसेंद्रशंकितः ॥२॥

आकाशातून आलेल्या प्रचंड गर्जनेने रावणादि सर्व राक्षस भयभीत :

इतुकें मारीच बोलिल्या – वरी । तंव गगनमार्गी एक्सरी ।
हाक फुटली तेणेंकरीं । रावण थोर गजबजिला ॥१५॥
ऊर्ध्व अव्लोकिती राक्षसगण । तंव अकराळ विकराळ वदन ।
प्रभा कृष्ण पिंगळ पूर्ण । स्वरूप भयानक देखिलें ॥१६॥
खुजट शरीर विकट वदन । मस्तकीं बोलता हातीं दंड जाण ।
भुजा लहान पराक्रम गहन । येवोनि गर्जन तेणें केलें ॥१७॥
तदनंतरें ईश्वरसेवक । पार्श्वभागीं आला एक ।
नंदिकेश्वरनामें देख । बोलता झाला ते वेळीं ॥१८॥
नंदिकेश्वराचें वचन ऐकोन । दशग्रीव शंकित होवोन ।
पुढें काय बोलिला ईश्वरगण । श्रोतीं सावधान अवधारिजे ॥१९॥

निवर्तस्य दश्ग्रीव शैले क्रीडति शंकरः ।
सुपर्णनागयक्षाणां देवगंधर्वरक्षसाम् ॥३॥
सर्वेषामेव भूतानामगस्यः पर्वतः कृतः ॥४॥

नंदीने रावणाला तेथून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले :

वदता झाला नंदिकेश्वर । रावणा येथोनि परता सर ।
पर्वतीं क्रीडती श्रीशंकर । सवें भवानीं पैं असे ॥२०॥
उमेसहित चंद्रमौळी । आनंदे क्रीडती ये शैलीं ।
तू येथोनि शीघ्रकाळीं । जय आणिके स्थळाप्रति ॥२१॥
गरूडयक्षसर्पांसी । देवगंधर्वराक्षसांसी ।
आणिक भूतें भूमंडळवासी । त्यांसहि पर्वत हा वर्जिला ॥२२॥
नंदिकेश्वराचें वचन । ऐकोनि दशग्रीव कोपायमान ।
क्रोधें मस्तक डोलवोन । कानींचीं कुंडलें झळकती ॥२३॥
क्रोधें थरथरां कांपत । नेऋ करोनि आरक्त ।
पुष्पकावरोनि बोलत । कोण शंकर कैंचा रे ॥२४॥

रावणाच उन्मत्तपणा :

कैंचा शंकर कोण उमा । शैलीं कां क्रीडतसे अधमा ।
तयाचें भय दाविसी आम्हां । इये पर्वतापाठारीं ॥२५॥
दुरक्ती रावणाचें वचन । तेणें नंदिकेश्वरें ऐकोन ।
दिव्यशुळ करीं घेवोन । क्रोधें नयन वटारी ॥२६॥
ऐशियातें रजनीचर । देखोनि म्हणती हें वानर ।
आम्हांसि भेडसावितें थोर । म्हणोनि हेळणा मांडिली ॥२७॥
पहा हो कैसें आश्चर्य वाटे । आम्हासिं भेडसावितें मर्कट ।
याचें मुखावलोकन पहाटे । करितां प्राणी कष्टी होय ॥२८॥

नंदीची भविष्यवाणी :

ऐकोनि दशग्रीवाचें वचन । क्रोधे नंदिकेश्वर आपण ।
बोलता झाला सावधान । श्रवण कीजे सादरें ॥२९॥
तूं माझी हेळणा करिसी । नेणसी माझ्या प्रतापासी ।
मारितां तुज या समयासी । मद्भक्तींसीं उचित पैं नाही ॥३०॥
तुझ्या वधालागीं दशानना । मजसारिखे मुख्य जाणा ।
बळें पालथें करिती त्रिभुवना । यद्वीर्या सरी नसे कोठें ॥३१॥
बळरूप पराक्रम जाण । वानर होती अति दारूण ।
ते तुझिया कुळाचें नाशन । निमेषें पूर्ण करितील ॥३२॥
नख दंष्ट्रा हातियेर । संग्रामीं मदन्मत्त थोर ।
एकैक वानर पर्वताकार । अगणित वीर उपजती ॥३३॥
ते वानर बळेंकरीं । तुझिया कुळाची बोहरी ।
करितील क्षणामाझारीं । राक्षसां उरी नुरेल ॥३४॥
मज मारिता तुम्हांसी । अशक्य नाहीं निश्चयेंसीं ।
परी ये समयीं मी न मारीं तुम्हांसीं । कार्यकारण पुढें असे ॥३५॥
स्वर्गी देवविमानपंक्ती । नंदिकेश्वराच्या वचना मानवती ।
पुष्पवर्षाव सुरवर करिती । नाना शब्दें स्तवोनियां ॥३६॥
नंदी म्हणे दशानन । तुझें पूर्व कर्म जाण ।
मारिलें असतां मी आपण । बोल लागेल भविष्या ॥३७॥
नंदीचें वचन ऐकोन । कोपें खवळला रावण ।
मग केलें गडगर्जन । नादें पर्वत दुमदुमिला ॥३८॥

रावणाच कैलास उपटण्याचा निश्चय :

मज जातां आकाशपंथें । खुंटविलें माझ्या विमानतें ।
तरी मी या पर्वतातें । मूळासहित उपडीन ॥३९॥
पर्वत उपडोनि सागरीं । निमग्न करीन निर्धारीं ।
काय कारण त्रिपुरारी । नृपासरिखा क्रीडतसे ॥४०॥
राक्षसांसी हें भयानक स्थान । तें मी निर्भय करीन जाण ।
ऐसें बोलोनियां आपण । काय करिता जाहला ॥४१॥
रावणभुजबळाची थोरी । विसां भुजीं कैलासगिरी ।
वेढिला तेणें अंदोळेंकरीं । एकवीस स्वर्गें डळमळलीं ॥४२॥

रावणाच्या अद्‌भूत पराक्रमाने कैलास डळमळू लागाला :

भुजाबळेंकरोनि दशानन । कैलास कालविला परक्रमें जाण ।
देव झालें कंपायमान । कोण विघ्न ओढावलें ॥४३॥
ऋषीश्वरां सुटला पळ । म्हण्ती ओढावला प्रळयकाळ ।
पालथा होऊं पाहे ब्रह्मांडगोळ । भंगा भूगोळ जाऊं पाहे ॥४४॥
उमा झोंबे नीळकंठा । रमा थापटी वैकुंठा ।
कोणें मांडिलें संकटा । सुरश्रेष्ठा चिंतामणे ॥ ४५॥
तदनंतरें श्रीरघुपती । काय करिता झाला कैलासपती ।
अंगुष्ठ चेपूनि पर्वतीं । सुरव्यथा निवारण करी ॥४६॥

शंकराने अंगठ्याचे कैलास चेपून रावणाला पर्वतातळी दडपला :

लीलेकरोनि महेश । अंगुष्ठें चेपितां पर्वतास ।
रावण झाला कासावीस । मेटें वळलीं तयांसी ॥४७॥
रावण भुजा परत्या करी । तंव त्या जडल्या बळें भारी ।
सुटका नव्हें कवणेपरी । दांत चावी राक्षस ॥४८॥
भुजा नसुटती तेथ । सर्व शक्ती जाहली व्यर्थ ।
दशानन अति आक्रंदत । ओरडत अति दुःखें ॥४९॥
हांक फोडितां लंकापती । त्रैलोक्य भयभीत चित्तीं ।
हांक ऐकोनि प्रधान भीती । मांडला म्हणती प्रळय आजी ॥५०॥
हांक ऐकोनि दुर्शर । आसन सांडोनि देवेंद्र ।
म्हणे फुगला समुद्र । मर्यादा सांडूं पाहतसे ॥५१॥
पर्वताचें हृदय तडाडिलें । वायुमंडळ स्तब्ध झालें ।
कळिकाप कांपे चळचळें । नभीं अभ्रें दाटलीं ॥५२॥
मंगळाची जननी थरारली । नभींची नक्षत्रे च्यवली ।
दिग्गजांचीं दोंदें तडाडिलीं । कापों लागले शशिसूर्य ॥५३॥
यक्ष आणि विद्याधर । सिद्ध चारण किन्नर ।
बोलते झाले प्रळय थोर । चंद्रशेखर निवारिता ॥५४॥
समस्त करिताती स्तवन । गिरिजापति तुज अनन्यशरण ।
आम्हांसि रक्षिता तूंचि जाण । कायावाचामनेंसीं ॥५५॥
कृपाळुवा उमाकांता । त्रिपुरांतका विश्वनाथा ।
तुजवांचोनि आम्हां तारिता । नाहीं दुजा भूमंडळीं ॥५६॥
प्रधान म्हणती दशानना । तूं जाय शिवासि शरणा ।
तो हे निवारील विघ्ना । अनमाना नको करूं ॥५७॥

रावणाची शिवस्तुतू व शरणागती :

येरीकडे दशानन । करिता झाला शिवस्तवन ।
नाना स्तोत्रें मंत्रे जाण । शिव प्रसन्न तेणें केला ॥५८॥
प्रेमसिधुं गिरिजापती । कैलासींचा भोळा चक्रवर्तीं ।
ऐकोनि रावणाची स्तुती । तत्काळ उडी घातली ॥५९॥
मस्तकीं जटाजूट साजिरा । तया तळीं नेत्र तिसरा ।
जेणें जाळिलें रतिवरा । जो योगीश्वरा निजवंद्य ॥६०॥
मुकुटीं मंदाकिनी पापनाशिनी । जे जन्मली विष्णूच्या चरणीं ।
जिचें नाम घेतां वदनीं । पापें दिशा लंघिती ॥६१॥
भाळीं विभूतिलेपन । तयावरी चंद्र विराजमान ।
शोभे हातीं नरकपाळ घेऊन । रुंडमाळा कंठी रुळे ॥६२॥
अंगीं भस्म चर्चिलें । वरी रुद्रक्ष मिरवले ।
व्याघ्रांबर परिधान केलें । तत्काळ आला समीप ॥६३॥
रावणें देखोनि उमापती । प्रणिपात करी नम्रवृत्ती ।
म्हणे स्वामी कृपामूर्ती । त्राहि महादेवा ॥६४॥
सहस्र वर्षेपर्यंत । रडत होता दशानन तेथे ।
महादेव होवोनि विस्मित । थोर आश्चर्य मानिलें ॥६५॥

रावणाच्या स्तुतीने शंकर प्रसन्न :

महादेव म्हणे तुझे स्तवन । ऐकोनि झालो सुप्रसन्न ।
या पर्वतापासोनि मुक्त जाण । भुजा तुझ्या होतील ॥६६॥
तुवां केली दीर्घ रव दारूण । त्रैलोक्य झालें कंपायमान ।
तस्मात् तुझें नाव रावण । देवयक्षगण म्हणतील ॥६७॥
शीघ्र येथोनि लंकापती । जाईं आपुल्या स्वस्थळाप्रती ।
जें वांच्छा असेल चित्तीं । ते पावसी शीघ्रकाळें ॥६८॥
ऐसें महेश बोलिल्यानंतरें । रावण म्हणे जी दातारें ।
कृपा केली तरी माझीं वचनोत्तरें । सावकाश ऐकावीं ॥६९॥

रावणाची मागणी :

प्रसन्न झालासि महादेवा । तरी मज बरवा वर द्यावा ।
पूर्वी म्या तपोबळें ब्रह्मदेवा । अवध्यता मागितली ॥७०॥
चतुराननें वरदान । मज दिधलें जें यक्षगण ।
विद्याधर देव राक्षस दारूण । यांचेनि तुज मृत्य नाहीं ॥७१॥
दीर्घ आयुष्य मज झालें । तें भोगितां चित्त उबगलें ।
आतां काहीं असेल जें उरलें । लाविलें मीं तुझ्या ध्यानीं ॥७२॥

शंकराने रावणाला खड्ग देऊन विष्णुहस्ते मरण येईल असे सांगितले :

ऐसे रावणाचें वचन । ऐकोनियां शैलजारमण ।
चंद्रहास्य खड्.ग दारूण । रावणालागीं दिधलें ॥७३॥
आयुष्याचे अंतीं जाण । तुज विष्णुहस्तें मरण ।
अंतकाळीं माझ्या समीपतेस । तू येशील लंकापति ॥७४॥
याउपरी त्रिपुरांतकें जाण । दशानना नाम रावण ।
ठेवोनि चंद्रहास्य खड्ग देवोन । आपण कैलासाप्रति गेला ॥७५॥
रावण आरुढोनी विमानावरी । चंद्राहास्य खड्‍ग घेवोनि करीं ।
विचरता झाला सवें मंत्री । प्रहस्तादिक मारीच ॥७६॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । मग तो रावण पापकर्मा ।
प्रवर्तला थोर अधर्मा । क्षत्रियांतें जिंकिता जाहला ॥७७॥
क्षत्रिय राजे थोर थोर । तयां बाधा करी दशशिर ।
कोणी भयकरोनि देशांतर । करिते झाले रावणधाकें ॥ ७८॥
कोणी म्हणती रावण । आम्ही तुम्हां सेवकांसमान ।
ऐसी सॄष्टि जिंकीत रावण । पुढें पुढें चालिला ॥७९॥
एका जनार्दना शरण । पुढें वेदवती आख्यान ।
रसाळ आणि रम्य जाण । सावधान अवधारा ॥८०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणशिववरदो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥ ओंव्या ॥८०॥ श्लोक ॥४॥ एवं ॥८४॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सोळावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *