संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शेहेचाळिसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शेहेचाळिसावा

सीतेचे वनांत गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

तदनंतर सुमित्रात्मज । रजनी क्रमोनी गभस्ती तेजःपुंज ।
उदयो होतां जे वदला अग्रज । तया कार्या करितसे ॥१॥
सुमंताप्रति बोले वचन । मुख कोमाईलें दिसे विवर्ण ।
सारथियासहित रथ उत्तम जाण । येथें शीघ्र आणावा ॥२॥
श्रीरामाची आज्ञा ऐसी । रथीं वाहोन जानकीसी ।
सीतेचेही आवडी मानसीं । ऋषिआश्रम पहावे ॥३॥
मी नेतो वैदेहीतें । पहावया ऋषिआश्रम पुण्यतीर्थे ।
तरी सुमंता शीघ्र रथातें । आणावें आज्ञेकरोनी ॥४॥

लक्ष्मणाच्या आज्ञेप्रमाणे सुमंताने रथ आणलाः

ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । तत्काळ सुमंतें उठोन ।
रथ आणिला रत्नखचित सुवर्णवर्ण । देदीप्यमान तेजस्वी ॥५॥
सुमंत म्हणे सुमित्रात्मजा । रथ आणिला कुलजा ।
आतां करावें योजिलें काजा । महाराजा शक्रारिहंत्या ॥६॥
ऐसें सुमंतमुखींचें वचन । ऐकोनि सुमित्रानंदन ।
प्रवेशला जेथें जनकाचें कन्यारत्न । परम पावन पतिव्रता ॥७॥

सीतेने त्या रथांतून वनश्री पाहाण्यासाठी यावे अशी लक्ष्मणाची तिला विनंती :

मग तो पुरूष-पंचानन । जानकीप्रति अग्रजाचें वचन ।
बोलता झाला माते तुजलागोन । श्रीरामें रथ पाठविला ॥८॥
रथीं आरुढोनियां भद्रे । तुम्हीं वन पहावया श्रीरामचंद्रें ।
पाठविलें वो गुणसमुद्रे ।गंगेचिये पैलतीरा ॥९॥
मजबरोबरी वो शुभानने । रथीं बैसोनियां वनें उपवनें ।
पाहें ऋषिआश्रम सिध्दस्थानें । तपोधन जेथें वसती ॥१०॥
शीघ्र चालं वो झडकरी । श्रीरामाज्ञा वंदोनि शिरीं ।
तुझे मनोरथ वनांभीतरीं । पाहतां पूर्ण करीन पैं ॥११॥
तुवां श्रीरघुनाथा मागितलें । तें तुज श्रीरामें दिधलें ।
आतां चालिजे शीघ्र काळें । वनवासासी जनकात्मजे ॥१२॥
ऐसें सौमित्र बोलल्यावरी । जानकी संतोषोनि ते अवसरीं ।
वना जावयाचा उल्हास भारी । हृद्यमंदिरीं उंचबळला ॥१३॥

सीतेने निघण्याची तयारी केली, परंतु अपशकुनामुळे ती सचिंत :

वनवासी ऋषीकारणें । सवें घेतलीं दिव्य वस्त्रें भूषणें ।
नानापरींचीं रत्नें धनें । फळें मिष्टांन्ने घेतलीं ॥१४॥
विजनीं मुनिपत्न्या सती । तयां द्यावया भूषणे सीता सती ।
घेती झाली होती आइतीं । नानाविध वस्त्रेंही ॥१५॥
वैदेही म्हणे सुमित्रासुता । मोटा बांधोनि घालिजे रथा ।
वनीं वसती ऋषींच्या कांता । त्यांसी द्यावयाकारणें ॥१६॥
पुनरपि बोले मैथिली । लक्ष्मणा मी तुजजवळीं ।
विनंती करितें ये काळीं । सावध होवोनि अवधारिजे ॥१७॥
मी पाहीन ऋषिआश्रमातें । अशुभचिन्ह मज कां होतें ।
वामनेत्राचे लवतें पातें । सर्वांगीं कंप होतसे ॥१८॥
शरीरीं अवस्था वाटत । हृद्यीं चिंता वर्तती बहुत ।
धारणा माझी चंचळ होत । वनवासासी जावया ॥१९॥
लक्ष्मणा आजि हें पृथ्वी । उद्वस वाटते माझे जीवीं ।
दिशा दाटल्या बहुत धुई । कळाहीन सूर्य दिसतसे ॥२०॥
माझा भ्रतार माझे दीर । सासू सुहृद आणि सहोदर ।
श्रीरामभक्त श्रीरामकींकर । पुरवासी जन सुखी असो ॥२१॥
ऎसें जानकी वदोन । स्तुति करी देवता प्रार्थून ।
अहो अबिंके हा रघुनंदन । सुहृदेंसी कल्याण असो ॥२२॥
ऎंसें जानकी वदल्यावरी । लक्ष्मण विनीत जोडील्या करीं ।
म्हणे माते तुझ्या उत्तरीं । सर्वांसी क्षेम होईल ॥२३॥
धरणिजे तुझे आशीर्वादें । माझे मनोदेवतेसी निघाली दोंदें ।
तुवां चिंतिलीं कल्याणशब्दें । तरी सर्वांसी कल्याण पैं असे ॥२४॥

लक्ष्मण सीतेसह गोमतीतीरावर आला :

तदनंतर आरूढोनि रथीं । प्रयाण करी वनाप्रती ।
नगर साडोंनि प्रथम वस्ती । गोमतीतीरी पैं केली ॥२५॥
गोमतीचें तीर् पावन ।तिचे उत्तरे नैमिषारण्य ।
जेथे सदशिव आपण । पार्वतीसहित पैं असे ॥२६॥
तया क्षेत्रीं अद्यापि जाण । वाळूच्या लिंगाचे दर्शन ।
करिती जन पुण्यपावन । अभक्तां सहसा लिंगदर्शन नाहीं ॥२७॥
ऎसिये गोमतीप्रती ।प्रथमदिवशीं केली वस्ती ।
उद्य होतांचि गभस्ती । सारथ्यासि म्हणे लक्ष्मण ॥२८॥
शीघ्र संजोगी रे रथ । आजि भागीरथींतीरीं सुस्नात ।
स्नान तर्पण करूं तेथ । माध्यान्हिक कर्मातें ॥२९॥
आजि भागीरथीचें पाणी । मस्तकीं धरूं सुस्नात होवोनी ।
जैसे ईश्वरें मौळीचिये स्थानी । विश्णुपादोदक धरियलें ॥३०॥
शक्रारिअरिचें ऎकोनि वचन । सारथियानें शीघ्रचि जाण ।
रथ संजोगिला मनाहून । वेग बहुत वारूंचा ॥३१॥

गंगाकिनारी आगमन :

आरूद्ढोनि रथावरी । सीतेसहीत रावणात्मजारी ।
पावले पंचदश घटिकांभीतरीं । भागीरथीच्या तीरांते ॥३२॥
तेथें करोनि संध्यास्नान । पित्रुतर्पण ब्राम्हणपूजन ।
माध्यानिक क्रिया सारून । उद्वेगी मन सुमित्रांचे ॥३३॥

लक्ष्मणाचे दुःख पाहून जानकी त्याला धीर देते :

आठविली अग्रजाची मात । जे सीता त्यागीं वनांआंत ।
तो काळ समीप जाणोनि सौमित्र । स्फुंदस्फुंदोनि रडतसे ॥३४॥
लक्ष्मणाचें देखोनि रूदन । धर्मज्ञ जानकी बोले वचन ।
तुम्ही रडतां काय कारण । जान्हवीतीर पोहोनियां ॥३५॥
जान्हवीतीर पुण्यपावन । ईंचे दर्शन कल्मषदहन ।
इचा महिमा चतुरानन । वर्णूं न शके स्ववाचा ॥३६॥
हा माझा हर्षकाळ । ईस देखोनि सुखकल्लोळ ।
तुम्ही रुदन करावया काय मूळ । तें मजप्रति सांगिजे ॥३७॥
श्रीरामासमीप पार्श्वभागीं । वस्ती लक्ष्मणा तुम्हालागीं ।
या वियोगदुःखें तुम्ही फुंदां आंगीं । शोकसागरी पडतां हो ॥३८॥
मजसारिखी प्रीति तुजवरी । अधिक लक्ष्मणा श्रीराम करी ।
शोक सांडोनि ये अवसरीं । मज परपारीं उतरावे ॥३९॥
परपारीं आम्ही उतरोन । तेथे वसती मुनिगण ।
तयांचें करूं दर्शन पूजन । अलंकारभूषणें देवोनी ॥४०॥
तेथें एक रात्र करू वस्ती । प्रभाते अयोध्यापुरीप्रती ।
गमन कीजे श्रीरघुपती । जेथे राज्य करीतसे ॥४१॥
शीघ्र लक्ष्मणा ये समयीं बरवी । विस्तार्ण सुंदर नाव आणवीं ।
पैलतीरीं उतरोन गोसावी । महानुभावांसी भेटणें ॥४२॥
हें ऋषिरामायण । उत्तरकांड कल्मषदहन ।
एका जनार्दनीं विनंती पूर्ण । संत सज्जन परिसा तुम्ही ॥४३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
सीतालक्ष्मणवनाभिगमनंनाम षट्चत्वारिंशोध्यायः ॥४६॥ ओव्या ॥४३॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शेहेचाळिसावा