संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा

श्रीरामांचे शरयू नदीवर आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

विसृज्य लक्ष्मणं रामस्तीव्रशोकसमन्वितः ।
वसिष्ठं मंत्रिणं चैव नैगमांश्चेदमब्रवीत् ॥१॥
अद्य राज्येऽभिषेक्ष्यामि भरतं भ्रातृवत्सलम् ।
अयोध्यायाः पतिं वीरं ततो यास्याम्यहं वनम् ॥२॥

लक्ष्मणाविषयी रामांचा शोकावेग :

लक्ष्मणें सांडोनि इहलोक । पाताळ सेविता झाला देख ।
तें देखोनि रघुनायक । शोकार्णवीं बुडाला ॥१॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणा । मज सांडोनि गेलासी गुणनिधाना ।
काय अपराध देखोनी मना । माजी निष्ठुर झालासी ॥२॥
लक्ष्मणा काय मी चुकलों । कोण अपराध आचरलों ।
किंवा निष्ठुर बोलिलों । म्हणोनि रुसलासी सौ‍मित्रा ॥३॥
मजबरोबरी वनांतरीं । हिंडतां श्रमलासी बा भारी ।
द्वादश वर्षे निराहारी । अन्न उदक त्यजियेलें ॥४॥
म्हणोनि कोपलासी वेल्हाळा । सुमित्रेच्या लघु बाळा ।
आतां मुख दाखवीं एक वेळा । मज दुःखिता देखोनी ॥५॥
जैं शक्ति घातली रावणें । तैं दुखाविलासी निजप्राणें ।
तो राग धरोनियां मनें । मज त्यागूनी गेलासी ॥६॥
आतां काय करूं बंधुराया । माझ्या जीवींच्या विसाव्या ।
मज एकलें सांडोनियां । केउता गेलासी वनवासा ॥७॥
जानकीनें पंचवटिकेसीं । छळिलें म्हणोनि कोपलासी ।
यालागीं निष्ठुर झालासी । मजवरी बंधुराया ॥८॥
तुवां इंद्रजित मारिला । त्रैलोक्यासी आनंद झाला ।
तो तूं रागें सांडोनि मजला । देह त्यागून गेलासी ॥९॥
ऐसी श्रीरामाची करुणवाणी । तेणें दुःखें फुटे अवनी ।
पक्षी चारा न घेती नयनीं । अश्रूंचे पूर लोटलें ॥१०॥
स्तब्ध अयोध्येचे जन । स्तब्ध सेना सैनिक प्रधान ।
कोणा कांही न स्मरे जाण । लक्ष्मणवियोगास्तव ॥११॥

भरताला राज्याभिषेक करून आपण देहत्याग
करावा असा रामांचा निश्चय, भरताचा विलाप :

श्रीराम म्हणे गुरूसी । आणि मंत्रिया समस्तांसी ।
आजी अभिषेक भरतासी । अयोध्येचा पैं कीजे ॥१२॥
भरता राज्यीं बैसवीन । मीही करीन येथून गमन ।
जेणें मार्गें लक्ष्मण । गेला असेल ते ठायीं ॥१३॥
लक्ष्मणावांचोनी माझे प्राण । सर्वथा न राहती निश्चयें जाण ।
ऐसें ऐकोनी सभाजन । भरतेंसीं मूर्च्छागत झाले ॥१४॥
मूर्च्छित झाले सभालोक । मूर्च्छित भरत झाला देख ।
त्याउपरी सावधान नावेक । होवोनी ठेला ते समयीं ॥१५॥
भरत म्हणे श्रीरामा । राज्यीं चाड नाहीं आम्हां ।
तुजमागें संसारधर्मा । पडे तो जाण आत्मघाती ॥१६॥
तुजवीण विषयभोग । तोचि प्राणियासी क्षयरोग ।
जे तुजसीं विमुख करिती भोग । तोचि रोग तयांसी ॥१७॥
तुज त्यागोनि राज्य करणें । हेंचि मूळ नरका जाणें ।
वेगळें मागें राहणें । उबगवाणें संसारीं ॥१८॥
तुझिये चरणाचे प्राप्ती कारणें । योगीं योग साधिती ।
त्या तुज त्यागून श्रीरघुपती । कोण अभागी राहील ॥१९॥
लक्ष्मणामागें तूं जासी । आम्ही त्यागूं निजप्राणांसी ।
नाहीं तरी आपुले कांसेसी । लावोनियां सवें न्यावें ॥२०॥
तूं लक्ष्मणवियोगें झालासी दीन । उभयतांचें वियोगें प्राण ।
न राहती श्रीरामा सत्य जाण । न सोडूं जाण तुजलागीं ॥२१॥
जिकडे तूं करसी गमन । तिकडे आम्ही येऊं जाण ।
आम्हां राज्याची चाड कोण । तुजवेगळें सर्व नैश्वर्य ॥२२॥
ऐसा भरताचा निश्चय । जाणिता झाला जानकीप्रिय ।
आणि नगरजनांचें हृदय । कळों सरलें राजेंद्रा ॥२३॥
भरत म्हणे श्रीरामा जाण । तूं जरी स्वर्गा करिसी गमन ।
तरी आम्ही तेथें करुं प्रयाण । निश्चय पूर्ण जाणावा ॥२४॥
हे लहु कुश दोघे कुमर । अभिषिंचोनि करावे राज्यधर ।
कोलनामें वसवोनि नगर । तेथें कुश स्थापावा ॥२५॥
उत्तरे स्थापावा लहु कुमर । जो युद्धीं परम शूर ।
अरिरायावरी तोडर । जेणें बांधिला बिरुदेशीं ॥२६॥

शत्रुघ्नाला भेटीस पाचारण :

ऐसें भरत बोलिल्यावरी । दूत पाचारिला रामे ते अवसरीं ।
म्हणे तूं जाय मधुपुरीं । शत्रुघ्नासी भेटावें ॥२७॥
आमुचें महाप्रस्थान । करितों स्वर्गाप्रती गमन ।
तरी ऐसें समस्त निवेदोन । आणीं शत्रुघ्न भेटीसी ॥२८॥
ऐसें श्रीरामें निवेदिल्यावरी । दूत आज्ञा वंदोनि शरीं ।
नमस्कारोनि दूषणारी । शीघ्रवत निघाला ॥२९॥
मनीं धरोनि श्रीरामवचन । दूत मधुपुरा करितां गमन ।
मागें काय वर्तले तें सावधान । श्रवण कीजे श्रोते हो ॥३०॥
श्रीरामाचें गमनकार्य । हें ऐकोनि जनसमुदाय ।
मूर्च्छित झाले राजे आणि ऋषिवर्य । थोर दुःख पावले ॥३१॥

नागरिकांची रामांसह सहगमनाची तयारी;
लव व कुश यांना राज्याभिषेक :

प्रधान म्हणती श्रीरघुनाथा । ऐसें नगरींच्या जनांची कथा ।
म्हणती श्रीरामा स्वर्गा जातां । आमुचें राहून कोण कार्य ॥३२॥
श्रीरामामागें अयोध्यापुरी । माजी वसेल तो दुराचारी ।
ऐसा निश्चय रावणारी । थोरथोरीं केला असे ॥३३॥
तुवां येथें प्रतिपाळिले । प्रतापेंकरोनि रक्षिलें ।
कृपादृष्टीनें अवलोकिले । अयोध्यावासी जन सर्व ॥३४॥
ते अयोध्येसी रामेंवीण । सर्वथा आम्ही न राहूं जाण ।
ऐसे समस्त नगरीचें जन । निश्चय करोन राहिले ॥३५॥
ऐसी श्रीरामें प्रधानमुखींची गोष्टी । ऐकोनियां सुखसंतुष्टीं ।
निश्चय जाणोनियां पोटीं । भरतासी बोलता झाला ॥३६॥
श्रीराम म्हणे राया भरता । धर्मवंता उदारचित्ता ।
कुश लहु अभिषिंचोनि शीघ्रता । विलंब सर्वथा करूं नको ॥३७॥
यज्ञशेष करितां भोजन । कैकेयी मातेसी झालें विघ्न ।
तैसा समय ओढावला जाण । व्यवधान न साहे ॥३८॥
ऐसें श्रीराममुखींचे वचन । भरतें माथां वंदोनि जाण ।
तत्काळ पुत्रां अभिषिंचून । राज्य देता पैं झाला ॥ ३९॥
कुश उत्तरे कोशलेप्रती । जे कां विंध्यशैलाचिये प्रांतीं ।
कुशवती नामें त्रिजगतीं । विख्यात असे प्रसिद्ध ॥४०॥
लहुवाकारणें रम्य जाण । श्रीवतीनामें प्रसिद्ध पूर्ण ।
तेथें स्थापिला देवोनि सैन्य । अगणित धन दीधले ॥४१॥
ऐसे दोघे कुमर । श्रीरामें केले राज्यधर ।
सैनिकसेनापरिवार । प्रधान चतुर सवें देउनी ॥४२॥
येरीकडे तो निघाला दूत । मार्गी क्रमोनी त्रिरात्र ।
पुढें प्रवेशला शत्रुघ्न जेथ । राज्य करीत मधुपुरीचें ॥४३॥
दूत मधुपुरीं प्रवेशला । शत्रुघ्नरायासी भेटला ।
वृत्तांत अवघा जाणविला । श्रीरामाचा परियेसा ॥४४॥

दूताकडून वृत्त कळताच शत्रुघ्नाने
राज्य मुलांन देऊन तो अयोध्येला आला :

ऐकोनि शत्रुघ्न ते समयीं । परम दुःखित झाला पाहीं ।
म्हणे विधातिया तुवां काहीं । निर्माण केलें चरित्र हें ॥४५॥
म्हणे कुळक्षयो आरंभिला । सूर्यवंशा अंत झाला ।
रामावतार संपला । मज ऐसें वाटतें ॥४६॥
कीं अवधि पुरली अयोध्येची । कीं ध्यान सिद्धी संपली शिवाची ।
कीं कुळवल्ली रविवंशाची । निदानफळा पैं आली ॥४७॥
कीं जनांचें अभाग्य जाणोन । श्रीराम करिता झाला गमन ।
कीं स्वर्गींच्या देवां उत्कंठा दारुण । श्रीरामदर्शनालागूनी ॥४८॥
कीं लक्ष्मणजानकीवियोगें । श्रीराम श्रमला दुःखमार्गे ।
म्हणोनि स्वर्गा जाणें प्रसंगें । ओढावलें श्रीरामा ॥४९॥
कीं अभक्ति बंधूंची देखिली । म्हणोनि श्रीरामें अयोध्या त्यागिली ।
कीं अयोध्येचें जनीं अभिशापिली । जानकी ते निदानें ॥५०॥
ऐसें जाणोनि श्रीरघुनाथ । स्वर्गाप्रति असे जात ।
तरी आपुला निश्चयहेत । श्रीराममदर्शना पैं जावें ॥५१॥
ऐसें शत्रुघ्नें भावोनि मानसीं । वांटा केला निजराज्यासी ।
दों ठायीं दों पुत्रांसीं । राज्य देता पैं झाला ॥५२॥
सुबहुनामें ज्येष्ठ सुत । तया मधुपुरींचे राज्य देत ।
वैदेशीं कनिष्ठ सुत । शत्रुहंती स्थापिला ॥५३॥
शत्रुहंती आणि सुबाहु । दों ठायीं स्थापिले दोघे भाऊ ।
धनधान्य परिवार देवोनि बहु । प्रजापाळणीं ठेविलें ॥५४॥
आपण आरुढोनि दिव्यरथीं । रथ प्रेरिला शीघ्रगतीं ।
येवोनियां तीन रातीं । अयोध्येप्रती प्रवेशला ॥५५॥
आला श्रीरामभवना उजु । पुढें देखिला रघुराज ।
अतिदिव्य तेजःपुंजु । पीतांबरधारी बैसला ॥५६॥
घालोनियां पद्मासन । परिवेष्टित मुनिगण ।
ऐसा देखोनि रघुनंदन । साष्टांग नमन पैं केलें ॥५७॥
कर जोडोनि शत्रुघ्न । करिता झाला निजराज्यकथन ।
म्हणे स्वामी दोघे नंदन । राज्य देवोन स्थापिले ॥५८॥
तुमचा महाप्रयाणसमय । ऐकोनि वाटलें आश्चर्य ।
माझा ऐसा असे निश्चय । तुम्हां बरोबरी सेवेसि यावें ॥५९॥
सदासर्वदा निशिदिन । न विसंबावे तुझें चरण ।
अखंड वाचे नामस्मरण । करीत कीर्तन असावें ॥६०॥

प्रयाणसमयी सर्व रामभक्तांचे आगमन :

ऐसें बोलतां लवणारी । तंव वानर ऋक्ष ते अवसरीं ।
येते झालें त्रिशिरारि । प्रयाणकाल देखोनि ॥६१॥
आले लंकावासी निशावर । आले देशोदेशींचें वानर ।
देव गंधर्व विद्याधर । सुर किन्नर पैं आले ॥६२॥
श्रीरामाचें महाप्रयाण । अणोनियां राष्ट्रीचे जन ।
येते झाले परिवारून । कुटुंबेसीं ते काळीं ॥६३॥
वानर म्हणती श्रीरघुराजा । प्रयाणसमयो हा तुझा ।
होतो म्हणोनि वानरफौजा । निजदर्शना पैं आल्या ॥६४॥
तुमचें स्वर्गांप्रति गमन । ऐसें वानरीं ऐकोन ।
आणि राक्षसेंसीं बिभीषण । भेटी घ्यावया आलासे ॥६५॥
ऐकोनि वानरांची वाणी । बोलता झाला कोदंडपाणी ।
म्हणे बिभीषणा तुजलागोनी । एक कारण सांगतों ॥६६॥

बिभीषण व मारुतीला चिरंजीवित्वाचा वर, इतरांची पात्रतेनुसार संभावना :

प्रजापाळण करावें । श्रीरामस्मरण असों द्यावें ।
चिरंजीव होवोनि रहावें । चंद्रसूर्यपर्यंत ॥६७॥
रविशशी जंववरी गगनीं । विचरती मेरूप्रदक्षिणेलागूनी ।
तंवपर्यंत राजधानी । लंके राज्य करावें ॥६८॥
बिभीषणासी देवोनि वर । मस्तकीं ठेविला अभयकर ।
मग पाचारिला कुमर । अंजनीचा परियेसा ॥६९॥
श्रीराम म्हणे गा हनुमंता । तू आमुचा प्राणदाता ।
उपकार तुझे आठवितां । न गणवती असंख्य ॥७०॥
तुवां रहावें या लोकीं जाण । जंवपर्यंत जीव धरिती प्राण ।
तंव करी कथाश्रवण । रामायण अनुपम्य ॥७१॥
तूं वज्रदेही चिरंजीवी । राहें स्वरुपीं अनुभवनी ।
काळक्रमणा ऐसी करावी । मम आज्ञेकरोनी ॥७२॥
ऐसा मारुतीस देवोनि वर । मग पाचारिला मैंद वापर ।
तया अमृत पाजोनि अपार । अमर केला रघुराजें ॥७३॥
अमर होवोनि मैंदें रहावें । स्वेच्छा पृथ्वी विचरावें ।
मझ्या पुत्रां प्रतिपाळावें । कृपा करोनि वानरा ॥७४॥
जांबवंतासी म्हणे श्रीरघुपती । तुमची पुढें पुरवीन आर्ती ।
मग पाचारिला कपिपती । वानरांचा निजस्वामी ॥७५॥
सुग्रीवासी म्हणे रघुराज । तुझा अंगद जो कां आत्मज ।
तयासहित करीं राज्य । किष्किंधेचें निजबळें ॥७६॥
उर्वरित वानर बोलाविले । आज्ञा देवोनि पाठविलें ।
मग वसिष्ठासी विनविलें । अग्निहोत्र सिद्ध कीजे ॥७७॥

महाप्रयाणाची सिद्धता :

वसिष्ठें करोनि अग्निहोत्र सिद्ध । प्रज्वळिला जातवेद ।
यज्ञपात्रांसहित शुद्ध । पुढें केला श्रीरामाज्ञेनें ॥७८॥
श्रीरामें करोनि संध्यास्नान । ब्रह्मचर्यव्रत अवलंबून ।
हातीं कुश विभूति लावोन । दिव्य वस्त्रें नेसला ॥७९॥
यज्ञोपवीत कंठीं उत्तरीं । बैसोनियां उत्तमासनावरी ।
नाहीं मोह माया शरीरीं । पुत्रपौत्रराज्याची ॥८०॥
नाहीं ममता राज्याचा मान । नाहीं कर्मठता अभिमान ।
जैसा शरत्काळींचा चंद्र जाण । निजतेजें शोभतसे ॥८१॥
ऐसा निष्कर्म तो रघुपती । आसन घालोनि स्वर्गगमनार्थीं ।
दक्षिणांगीं बैसवोनि शक्ती । कनकमय योषिता ॥८२॥
जवळी ठेवोनि शत्रसंभार । धनुष्यें रत्नजडित अपार ।
पुढें करोनि ॐकार वषट्‍कार । आणि थोर थोर ऋषिमंडळी ॥८३॥

रामांसह प्रयाण करण्यासाठी सर्वांचे आगमन :

द्वारी उभे द्विजवर । सवें स्त्रियां कन्या कुमर ।
वृद्ध तापसी दिगंबर । गमनालागीं उद्यत ॥८४॥
पंडित जोशी वेव्हारे । वेदपाठक अग्निहोत्री सपरिवारें ।
चाटे सोवनी शिंपी रंगारे । सोनार सुतार रजक पैं ॥८५॥
नापित कुलाल साळी । भुसारी वाणी तांबोळी ।
मणियार रथकार तेली । आणि गवळी निघाले ॥८६॥
माहार डोहर चर्मक । कोळी भिल्ल नाळिक ।
इतर जातींचेहीं लोक । श्रीरामसंगें निघाले ॥८७॥
कांसार लोहार धनुर्धर । योगी तापसी मुनीश्वर ।
सपत्नीक अपत्नीक विधुर । लहान थोर निघाले ॥८८॥
कोणा नाहीं मागिला मोहो । कोणी कोणाचा न धरी स्नेहो ।
कोणा कोणी न पुसती पहा हो । श्रीरामासंगें निघाले ॥८९॥
कोणा नाही कुटुंबाची चिंता । कोणा नाहीं दरिद्रता ।
कोणा नाहीं कामकामता । श्रीरामाचे गमनीं हो ॥९०॥
हृष्ट पुष्ट नगरींचें जन । कोणा नाहीं दुःख दैन्य ।
ऐसें देखोनि भरत शत्रुघ्न । श्रीरामाचे मात जाणविली ॥९१॥
भरत म्हणे श्रीरामचंद्रा । योगिमनसमोहन गुणसमुद्रा ।
पुत्रस्त्रियांसहित नरेंद्रा । अयोध्याजन द्वारीं आले ॥९२॥
तुम्हांसवें करावें गमन । म्हणोनि उभे द्वारीं जन ।
आनंदें निर्भर होवोन । तुमचा संग इच्छिती ॥९३॥
स्वर्गगमाकारणें । लोक बैसले धरोनि धरणें ।
तरी कृपा करोनि राजीवनयनें । या समस्तांसि पैं न्यावें ॥९४॥
हे चराचर जीव अवघे । कृपाळुवें सवें न्यावें ।
ऐसें ऐकोनि श्रीराघवें । नगरासहित निघता झाला ॥९५॥
अयोध्या सांडोनि अर्ध योजन । शरयूतीरीं केलें प्रस्थान ।
एका विजयी जनार्दन । सावधान अवधारा ॥९६॥
पुढिले प्रसंगीं चतुरानन । श्रीरामास सामोरा येईल जाण ।
परिवारेंसीं रघुनंदन । न्यावयालागीं स्वर्गातें ॥९७॥
पुढील पुण्यपावन कथा । अलभ्य लाभ होईल श्रोतां ।
श्रीरामांचे प्रयाण ऐकतां । कलिकल्मष नासती ॥९८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामशरयूतीरप्रस्थानं नाम षट्‍सप्ततितमोऽध्यायः ॥७६॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा