संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सतरावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सतरावा

वेदवतीचे आख्यान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अगस्ति जो महामुनी । कथा सांगे श्रीरामा लागूनी ।
ते कथा सुरस भवनाशिनी । सावधान श्रवणीं ऐकावी ॥१॥
रावण विचरतां महीतळीं । हिमाद्रीच्या वनस्थळीं ।
समवेत प्रधान बळी । राक्षस न्याहाळी भूमंडळ ॥२॥

लंकेला जाताना रावणाला सुकुमार कन्येचे दर्शन :

प्रधानांसमवेत दशानन । पुष्पकावरी आरूढोन ।
उल्लंघितां वनोपवन । हिमवंतासमीप आला ॥३॥
पुढें देखिलें कन्यारत्न । सुरस सुकुमार कमलनयन ।
मस्तकीं जटा कृष्णाजिन । तापसवेषें शोभली ॥४॥
विधिपूर्वक अनुष्ठान । जैसें करिती ऋषि देवगण ।
तैसी ते सुंदरी पूर्ण । तपें दारूण तपतसे ॥५॥
रावणें देखतां कन्यारत्न । सुशील सुव्रत गूनसंपन्न ।
काममोहित भ्रांत होऊन । हास्यवदनें पुसता झाला ॥६॥
अवो भद्रें अवधारीं । तू एकली या वनांतरीं ।
रूप तरी देवांगना तुज सरी । न पावती पाहतां ॥७॥
कोण कोणाची काय कारण । तुज योग्य तप नव्हे जाण ।
तूं कां करिसी अनुष्ठान । याचें कार्य काहीं नाहीं ॥८॥
कासयाकारणें सुंदरी । तू एकली या वनांतरीं ।
तुझा भ्रतार या विजनामाझारी । आहे कीं नाहीं हे सांगें ॥९॥
तुझें रूपयौवन । जो भोगी तो भाग्याचा गहन ।
त्याच्या पुण्या मर्यादा जाण । केली व वचे राजबळ ॥१०॥

रावणाने विचारल्यावरुन वेदवतीने आपली माहिती त्याला सांगितली :

ऐकोनि रावणाचें वचन । मग ते वेदवती आदरेंकरून ।
रावणाचें अतिथ्य जाण । करोनि कथन सांगतसे ॥११॥
देवगुरू जयातें म्हणती । तयाचा सुत कुशध्वज नृपती ।
बुद्धिवंत दुसरा बृहस्पती । तपे तेजें आगळा ॥१२॥
वेदाभ्यास शास्त्रव्याख्यान । आणि अग्निहोत्र पंचमहायज्ञ ।
देवतार्चन पितृतर्पण । भगवद्भजन सर्वभूतीं ॥१३॥
कुशध्वज वेदाभ्यास करी । तो माझा पिता निर्धारीं ।
मी वाढिलें तयांचे घरी । नाम वेदवती प्रसिद्ध ॥१४॥
माझा देखोनि यौवनभर । पिता वरविचारणीं तत्पर ।
तैं आले यक्षविद्याधर । आणि दैत्य राक्षस ॥१५॥
आले सिद्ध ऋषीश्वर । आले पृथ्वीचें नृपवर ।
आले पाताळीचें विखार । गंधर्व किन्नर येते झाले ॥१६॥
सभा दाटली राजभवनीं । माझा पिता पाहे न्याहाळूनी ।
कोणी वर न बैसे मनीं । विष्णूवांचोनि तयाचे ॥१७॥
समस्तां अभिप्राय कळला । म्हणती कोणा नेदी हे बाळा ।
आतां वधूं या भूपाळा । कन्या तत्काळा घेवोनि जावूं ॥१८॥
ऐसें एकमेक संवादले । संग्रामातें प्रवर्तले ।
युद्ध करितां परस्पर मेले । सांगों काय राजेंद्रा ॥१९॥
श्ंभनामें दैत्यें काय केलें । माझिया पित्या निद्रित देखिलें ।
रात्रीं येवोनि चांडाळें । रायातें भक्षिलें ते काळीं ॥२०॥
पिता निमाला ऐकोन । माझे मातेने केले सहगमन ।
मी उत्कंठा पित्याची जाणून । विष्णूचिंतन करीतसें ॥२१॥
पितयाच्या मनीं होतें । जे कन्या द्यावी विष्णूतें ।
हे जाणोनि मी येथें । अनुष्ठान करीतसें ॥२२॥
इतुके सायास विष्णुप्रीत्यर्थीं । मी करीतसें अतिथी ।
हा देह विष्णुभाग निश्चितीं । त्याचें त्यास समर्पण ॥२३॥
जनकप्रतिज्ञा जाणोन । मी करितें अनुष्ठान ।
कायावाचामनेंकरून । श्रीरमारमण पावावया ॥२४॥
व्रतनेम उपवासीं । वनीं विचरतें मी ऐसी ।
पितयाची उत्कंठा पावावयासी । ये पर्णकुटीसीं राहिलें ॥२५॥
हें माझे कथन । तुजप्रती केले निवेदन ।
अगा पौलस्त्यामजा शीघ्र गमन । येथोनियां तूं करीं ॥२६॥

रावणाने विवाहासाठी तिलाच मागणी घातली :

रावण म्हणे कन्येसी । म्यां जाणितलें तुझिया स्वधर्मसी ।
एकली तूं वनवासीं । रहावयासी योग्य नव्हे ॥२७॥
जयाकारणें करिसी तप । तो विष्णू अति अल्प ।
तया नाहीं नांवरूप । सत्य संकल्प हा माझा ॥२८॥
विष्णु काय बापुडें दीन । तयागांठीं नाहीं धन ।
आणि असे पराशीन । सत्य जाण सुंदरी ॥२९॥
अवो भद्रे अवधारीं । मी जाणतों तुझ्या तपाची थोरी ।
तुजसारिखी आणिक नारी । नाहीं दुसरी कनकप्रभे ॥३०॥
आतां तूं वो झडकरीं । वेगी आरूढें विमानावरी ।
कंदर्प मज पीडितो भारी । तुझे रूप देखोनी ॥३१॥
तुझिया रूपाची पदवी । तेजें लोपला चंद्र माधवी ।
आणिक उपमा तुज द्यावी । वृथा वाणी श्रम होय ॥३२॥
तुझें अंगीं तरूणपण । तुज तप अयोग्य जाण ।
जयांची इंद्रियें विकळ वार्धक्यपण । तिहीं अनुष्ठान करावें ॥३३॥

रावण स्वतःचे सामर्थ्य वर्णितो :

मी लंकेचा आहें राजा । तूं माझी होत भाजा ।
विविध भोग भोगीं माझा । सुखसंतोष पावूं दोघें ॥३४॥
तूं अत्यंत सुकुमार । अंगीं खुपती चंद्रकर ।
तूं मृगनयना सत्वर । विमानावर आरूढें ॥३५॥
आधींच तूं राजबाळ । त्याहीवरी सुकुमार वेल्हाळ ।
तुझिया तपाचा हा काळ । नव्हे प्रबळ यौवन तुझें ॥३६॥
या त्रैलोक्यामाझारी । रूपयौवनकटाक्षकरीं ।
पाहतां नाहीं दूसरी । म्यां आपुले नयनीं देखिलीसे ॥३७॥
तुझिया रुपाचें लावण्य । त्यापुढें विष्णु बापुडें दीन ।
तूं करीं वो माझे वरण । समपाड जाण तुज मज असे ॥३८॥
मी तंव ब्रह्मयाचा नातू । पौलस्तिमुनीचा सुतू ।
आणि लंकेचा नाथू । सेवेसी रतू शिवाचे ॥३९॥
ऐकोनि रावणाचे वचना । वेदवती बोले झणें या वचना ।
बोलता तुज उरी दशानना । नुरे जाण शीघ्रकाळें ॥४०॥

वेदवतीने केलेल्या अपमानामुळे रावणाने संतापून
बलात्काराने तिला पकडून विमानात बसविले :

ऐसें वदली वेदवती । ऐकोनी रावणा क्रोध चित्तीं ।
वेणी धरोनि ते सती । बळें आसुडिता जाहला ॥४१॥
ऐसें करोनि लंकापती । करीं धरिली वेदवती ।
बलात्कारें पुष्पकाप्रती । वाहता झाला ते समयीं ॥४२॥
रावणें हातीं धरितां जाण । वेदवती क्रोधायमान ।
नेत्रींहूनि निघतां हुताशन । काय वचन बोलिली ॥४३॥
शब्दें करूं पाहे दहन । रागें रावणाकडे पाहोन ।
बोलती झाली कोपायमान । सावधान अवधारा ॥४४॥

वेदवतीची शापवाणी :

अरे नष्टा चांडाळा । त्वां बोल लाविला ब्रह्मकुळा ।
मज धरिलें त्वां बरळा । मरण कुळा आणिलें ॥४५॥
मी तप करित होतें । तुवां पापदृष्टीं पाहिले मातें ।
माझेनि शापें वंशातें । नाश होईल रावणा ॥४६॥
ये वनीं मी तप करीत होतें । तुवा विघ्न केलें मातें ।
तरी मी भस्म करितें तपःसामर्थ्ये । परी पुढें जन्म घेईन मी ॥४७॥
आतां मी अग्निभीतरीं । उडी घालितें निर्धारीं ।
आपुलेनि सामर्थेकरीं । राक्षसबोहरी करीन मी ॥४८॥
यालागी रे रावणा । तुझिया वधालागीं जाण ।
अवतरेन मी पुन्हां । राक्षसगणा वधावया ॥४९॥
तुज वधावया झडकरी । मी कां वेंचूं तपाची थोरी ।
पुढें जन्मोनि तुझी बोहरी । जाण निर्धारीं करीन ॥५०॥
मी अयोनिजा कुमारी । त्वां मज पापदृष्टीकरी ।
धरिलें त्याचें फळ पुढारी । जाणवेल लंकेशा ॥५१॥
पुढें धर्मिकाचे घरीं । अवतरेन जाण निर्धारीं ।
तो कोण म्हणसी जाण तरी । मिथिलापुरीचा नृपवर ॥५२॥
जो राज्य करोनि विदेही । जो ज्ञानाचा सागर पाहीं ।
जो प्रतिपाळी ब्राह्मण गाई । तयाच्या गृहीं अवतरेन ॥५३॥

वेदवतीचा अग्निप्रवेश :

ऐसें बोलोनि वेदवती । प्रवेशली जातवेदाप्रती ।
स्वर्गी देवविमान – पंक्ती । पुष्पवर्षाव तिहीं केला ॥५४॥
ते वेदवती कुमारी । विदेही जनकाचे घरी ।
पुढती जन्मली सुंदरी । जानकी नाम जियेचें ॥५५॥

वेदवतीच जनकघरी अवतीर्ण होऊन रामभार्या सीता झाली :

ते तुझी भार्या श्रीरघुपती । श्रीरामा तूं जाण निश्चितीं ।
ते जनकाघरीं वाढली सती । जानकी ऐसे नाम जिचें ॥५६॥
ऐकोनि जानकीचे कथन । श्रीरामें आश्चर्य पावोन ।
म्हणे आपली प्रिया धन्य धन्य । कष्ट दारूण देखिले ॥ ५७॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । तूंचि केवळ विष्णु सर्वोत्तमा ।
पूर्वक्रोधें राक्षसधमां । वैरभावें मारिलें ॥५८॥
पुढें ते वेदवती कुमारी । दुसरा जन्म धरिला निर्धारीं ।
सापडेल शेताभीतरीं । सीता नाम म्हणतील ॥५९॥
कृतयुगीचें कुशध्वज उदरीं । ते वेदवती प्रसिद्ध थोरी ।
पुढें तेचि त्रेतायुगाभीतरीं । शेतामाजि सांपडेल ॥६०॥
इतुकें झाले जनकपुरीं । विदेही जनकाचिये घरीं ।
नाम पावली जानकी सुंदरी । ते तुझी नारी श्रीरामा ॥६१॥
त्रेतायुगीं विदेहघरीं । अजन्में जन्मोनि सुंदरी ।
राक्षसां मारील पूर्ववैरेंकरीं । जाण निर्धारीं श्रीरामा ॥६२॥
हे जानकीची उत्पत्ती । बोलिला वाल्मिक महामती ।
हेचि कथा आणिके ग्रंथीं । विपरीतार्थें पैं असे ॥६३॥
जयानें जैसे देखिलें । तयानें तेंचि निरूपिलें ।
आपण अवधारिजे भावबळें । कल्मपावेगळें वहावया ॥६५॥
एका जनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण ।
एका आणि जनार्दन । नामें भिन्न स्वरूप एक ॥६५॥
जनार्दन तोचि एक । एक तोचि होय व्यापक ।
व्यापकत्वें पाहतां एक । एकाहूनि देख दुसरें नाहीं ॥६६॥
यालागीं एका आणि जनार्दन । मुळींच पाहतां अभिन्न जाण ।
म्हणोनियां नावें अनन्य शरण । संतसज्ञान पैं होती ॥६७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वेदवत्याख्यानं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥ ओंव्या ॥६७॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सतरावा