संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय साठावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय साठावा

लवणासुराचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

शत्रुघ्न-लवणासुराचे द्वंद्वयुद्ध :

दाशरथि युद्धा प्रवर्तला । हें देखोनि लवण क्रोधें उंचबळला ।
दंतदाढा रगडूं लागला । हात चुरी कटकटा करुनी ॥१॥
लवणासुर म्हणे शत्रुघ्नासी । आतां मजपसोनि कोठे जासी ।
कोणे मायेचे पोटीं रिघसी । केउता पळसी मंदबुद्धि ॥२॥
द्विजारीचें ऐकोनि वचन । मग तो दाशरथ वीर दारुण ।
काय करिता झाला आपण । शत्रुघ्न लक्षोनि ते काळीं ॥३॥
माझ्या भुजांचा पराक्रम गहन । आणि वज्रासारिखा बाण ।
घायें तुझा घेईन प्राण । तंव राक्षसें ताळ घेतला ॥४॥
तो टाकिला शत्रुघ्नावरी । ताळ येतां देखोनि अंबरीं ।
दाशरथी वीर धनुर्धारी । बाणें शतखंड वृक्ष केला ॥५॥
सवेंचि दुसरा पादप घेतला । शत्रुघ्नावरी टाकिता झाला ।
अकस्मात येवोनि उरीं बैसला । वीर पडला मूर्छित ॥६॥
बाणें खंडन जंव करी । तंव वृक्ष आदळला उरीं ।
शत्रुघ्न पडोनि धरणीवरी । नावेक मूर्छेनें दाटला ॥७॥
शत्रुघ्न पडतांचि मूर्छित । देव झाले हाहाभूत ।
ऋषीश्वर चळचळ कांपत । म्हणती कोण पुरुषार्थ राक्षसाचा ॥८॥
शत्रुघ्नासारिखा वीर रणीं । मूर्छित पाडिला रणमेदिनीं ।
राक्षस विजयी होवोनी । गर्जोनी उभा ठाकला ॥९॥
राक्षस म्हणे शस्त्रायुधाचें । प्रयोजन नाहीं येथे साचें ।
मनुष्यमात्र आहार आमुचें । तयावरी शस्त्रें कशाला ॥१०॥
शत्रुघ्न मूर्छित देखोन । राक्षस प्रवेशे स्वभवन ।
ऐसें निमेष एक क्रमिलें जाण । वीर रामानुज ऊठिला ॥११॥
तदनंतरें दिव्य अमोघ शर । करी घेवोनि उत्तम शत्रुघ्न वीर ।
शराचे तेजे अंबर । दैदीप्यमान होऊन ठेलें ॥१२॥
वज्रासारिखें मुख जाण । वज्राहूनि वेग गहन ।
मेरुमांदासारिखा कठिण । समरीं वैरी निर्दाळीतसे ॥१३॥
शराअंगीं अहिप्रियलेपन । शशीऐसें शोभे वदन ।
वरी रावणारीचें झळकत नाम । तेणें व्योम लखलखित ॥१४॥
काळदंडासमान शर । तेणें शशिसूर्य भयातुर ।
गगनीं नक्षत्रें ग्रह क्रूर । धाके थरथर कांपती ॥१५॥
बाणची ध्वनि अति गाढी । धरणी गेली तिरढोविरढी ।
कूर्माची पाठी तडाडी । वृक्षपानझडी तेणें झाली ॥१६॥
देखोनियां सर्व जीवजंत । धाकें हाहाकार करित ।
सिद्ध चारण महानुभव संत । अप्सरा कांपत चळचळीं ॥१७॥
ऐसें सकळहीं देव मिळोन । तिहीं प्रार्थिला चतुरानने ।
बोलते झाले भय दारुण । युगांतासारिखे ओढवलें ॥१८॥
आजि होईल प्रळयकाळ । ऐसें ओढवलें जगड् व्याळ ।
पूर्वी ऐसें भय सबळ । देखिले नाहीं पितामहा ॥१९॥
ऐकोनि तयांचें वचन । बोलता झाला चतुरानन ।
ऐका समस्तही मिळोन । सावधान मानसीं ॥२०॥
लवणासुरवधाकारणें । ठाण मांडोनि शत्रुघ्नें ।
गुणीं शर चढविला तेणें । सकळांचीं मनें भ्रांत झालीं ॥२१॥
लवणासुरवधी तुम्हांसि सुख । देईल दाशरथी वीर देख ।
यालागीं मिळोन सकळिक । सावधवृत्तीं रहावें ॥२२॥
सकळां देवांसहित । ब्रह्मदेव आला तेथ ।
जेथे दाशरथीं वीर चढवोनि सीत । ठाण माहेश्वरी मांडिलें ॥२३॥

लवणासुराचा वध व देवादिकांना आनंद :

आकर्ण ओढोनि कानाडी । बाण सोडिला कडाडीं ।
जावोनि लवणासुराचे हृदयपरवडी । भेदोनी रसातळ प्रवेशला ॥२४॥
सवेंचि येवोनियां बाण । शत्रुघ्नभातां प्रवेशला जाण ।
येरीकडे हृदय विदारुन । दैत्य भूमीं पडियेला ॥२५॥
दैत्य पडतांचि भूमीवरी । स्वर्गींहूनियां सुरवरीं ।
पुष्पवृष्टि करोनि ते अवसरीं । गंधर्वी नृत्य आरंभिलें ॥२६॥
अप्सरा नाचती उल्हासे थोर । ऋषींचें फिटलें भयशारें ।
त्रैलोक्यीं आनंदगजरें । जयजयकार पैं केला ॥२७॥
येरीकडे लवणाचा शूळ । प्रवेशता झाला गगनमंडळ ।
क्रमोनि लोकालोक प्रबळ । कैलासासी पैं गेला ॥२८॥
सकळ सुरवरांदेखत । शूळ प्रवेशला जेथें पार्वतीकांत ।
श्रीरामानुज विजयान्वित । उल्हास अद्भुत सैन्या झाला ॥२९॥
हर्षे वांटिती साखर । आनंदे नाचती ऋषीश्वर ।
एक पाडतां लवणासुर । त्रैलोक्यीं जयजयकार पैं झाला ॥३०॥
लवणासुर रणीं पडिला । वीरीं देवीं कैसा देखिला ।
पर्वतकडा लोटला । कीं उन्मळिला तरुवर ॥३१॥
माथां केश बाबरझोटी । भयानक रुप रुधिर वाहे सृष्टीं ।
देखोनि देवांच्या झांकल्या दृष्टी । भ्यासुर मोठी तनु त्याची ॥३२॥

देवंकडून शत्रुघ्नाची प्रशंसा व त्याला वरदान :

सकळ मिळोनि सुरवर । बोलते झाले शत्रुघ्नासमोर ।
म्हणती आश्चर्य देखिलें थोर । आजिचें पैं समरांगणीं ॥३३॥
भाग्येकरोनि लवणासुर । तुवां निवटिला दुर्धर ।
आजि आमचें पुण्य थोर । राक्षस घोर मारिला ॥३४॥
इंद्रासहित सुरगण । आम्ही सकळही सुप्रसन्न ।
तुज देतों वरदान । महाबाहो राघवानुजा ॥३५॥
विजयीं होई सर्वां ठायी । शत्रुदमनीं शक्ति घोर पाहीं ।
देवांचे वचन ऐकोनि ते समयीं । दाशरथी बोलता झाला ॥३६॥
हेचि मधुपुरी नगरी । अति रमणीय यमुनातीरीं ।
दैत्यें उद्वस करोनि बहुत काळवरी । मनुष्यें भक्षोनि राहिला ॥३७॥
आतां वसे हें नगर । ऐसी कृपा करोनि सत्वर ।
मजही रहावया तुम्ही वर । दिधला पाहिजे स्वामी हो ॥३८॥
राघवानुजाचें ऐकोनि वचन । ऋषी संतोषलें जाण ।
बरवें म्हणोनि वरदान । देते झाले ते समयीं ॥३९॥
जे जे हृदयींची उत्कंठा । ते ते पावसी नरश्रेष्ठा ।
तुवां राक्षसां दिधला देशवटा । उपकार मोठा तुवां केला ॥४०॥
सर्व सेनेसहवर्तमान । तूं प्रवेशें राजभवन ।
देवां द्विजांचे करीं पाळण । सुखसंपन्न होऊनी ॥४१॥

नगरांत प्रवेश व तेथे अकरा वर्षे वास्तव्य :

ऐसें वदोनि शत्रुघ्नासी । देव निघाले स्वर्गासी ।
मागें लवणारीनें सर्व सैन्यासीं । प्रवेश केला नगरीं त्या ॥४२॥
नगरीं प्रवेशला शत्रुघ्न । वधिला लवणासुर दारुण ।
हें ऐकोनि देशांतरींचें जन । गेले होते ते आले ॥४३॥
लोकांसि देवोनियां अभय । मग तो दशरथतनय ।
गृहमंदिरें उभवोनि सुवर्णमय । ब्राह्मणांसि देता झाला ॥४४॥
लवणासुराचें जें वसतिस्थान । तें शत्रुघ्नें केलें नूतन ।
हाट हटवाटिया बिदी जाण । वाणी व्यवहारी सधन राहिले ॥४५॥
चहूं वर्णाचे लोक । चौं वेदांचे वेदपाठक ।
चहूं आश्रमांचे जन अनेक । वस्तिसुख पावते झाले ॥४६॥
नगराभोवतीं उद्यानें । नानापरींचीं पुष्पें वनें ।
आर्मवनें मधुवनें । नारिकेळीवनें असंख्य ॥४७॥
रंभा आणि द्राक्षामंडप । जांबळी खर्जुरी चंपक ।
फणस आंवळी कपित्थक । वट अशोक अगणित ॥४८॥
ऐसिये रम्य नगरीं । स्वधर्मे राघवानुज राज्य करी ।
द्वादश वर्षे लागता अंतरीं । रघुनाथभेटी इच्छिता झाला ॥४९॥
अयोध्या सोडोनि आपणास । क्रमिलीं येथें वर्षे एकादश ।
वारावें प्रवर्तलें अग्रजभेटीस । जाऊं आतां येथोनी ॥५०॥

शत्रुघ्न रामभेटीसाठी निघाला :

ऐसा करोनि निश्चय । काय करी कैकेयीतनय ।
कित्येक सेना घेवोनि जो कौसल्यातनय । तयाचे भेटी निघाला ॥५१॥
उर्वरीत जें सैन्य । तें मधुपुरीस ठेवोनि रक्षण ।
आपण निघाला भेटीलागून । श्रीरामाचे ते काळीं ॥५२॥
तदनंतरें तो लवणारी । चालिला जेथ श्रीराम पाळित पुरी ।
बारा वर्षे प्रवर्तल्या अंतरीं । थोर उत्साहें निघाला ॥५३॥
सवें घेवोनि अल्प सैन्य । अल्प अश्व अल्प सेवकजन ।
अल्प सवें घेवोनि वारण । किंचित रथ घेतले ॥५४॥
अल्प सैन्येंसहित । दाशरथी मार्ग क्रमित ।
तंव वाल्मीकाश्रम अकस्मात । देखिला मार्गीं ते समयीं ॥५५॥
ऋषिआश्रम देखोन । संतोषला दशरथनंदन ।
प्रवेशला वाल्मीकभवन । तयचिया दर्शना ॥५६॥
वाल्मीका करोनि नमस्कार । तद्दिनीं तेथें होवोनि स्थिर ।
मुनीची पूजा घेवोनि नृपवर । स्वस्थासनीं बैसला ॥५७॥

वाल्मीकींनी शत्रुघ्नाची प्रशंसा केली :

तया समयीं वाल्मीकमुनी । कथा सांगता झाला दाशरथालागूनी ।
शत सहस्त्र अगणित वाणी । श्रीरामाची चरित्रें ॥५८॥
वाल्मीक म्हणे दाशरथीसी । त्वां वधिलें लवणासुरासी ।
हें ऐकोनि संतोष मानसीं । बहुसाल मज झाला ॥५९॥
मधुवनीं तो लवणासुर । वसतां भक्षिलें प्राणी अपार ।
विशेषें भक्षिले ऋषीश्वर । तो त्वां सहज निर्दाळिला ॥६०॥
जगत्रयाचें भय नाशिलें । लवणासुरा वधोनि सुखी केलें ।
युद्ध करितां म्यां देखिलें । इंद्रापासीं बैसोनी ॥६१॥
संतुष्टलों तुझिया गुणां । म्हनोनि मूर्घ्नि अवघ्राणोनि जाणा ।
इतुके बोलोनि फळें नाना । विचित्रें आणिलीं ते काळीं ॥६२॥
नानापरींची शत्रुघ्नासी । फळे अर्पोनिया ऋषी ।
मग आरंभिलें गायनासी । ते समयीं गायकीं ॥६३॥
वीणा मृदंग टाळ मोहरी । वाद्यें वाजताती नानापरी ।
श्रीरामचरित्रें ते अवसरीं । गाते झाले गंधर्व ॥६४॥
अयोध्येहूनि केलें प्रयाण । श्रीरामें वनवास सेविला जाण ।
तेथोनि वधून रावण । जानकी घेवोन अयोध्ये आला ॥६५॥
ऐसें श्रीरामाचें चरित्र । ऐकोनि शत्रुघ्न मूर्च्छागत ।
क्षणैक होवोनि सावचित्त । पुनरपि ऐकत पैं ठेला ॥६६॥
श्रीरामाचें चरित्र पावन । कोटि ब्रह्महत्या करी दहन ।
ऐसें ऐकतेक्षणीं प्रेम । शत्रुघ्नासी दाटलें ॥६७॥
सवें सैनिक वीर होतें । तयांसी प्रेम दाटलें तेथें ।
प्रेमें अवघे झाले नाचते । श्रीरामचरित्रा ऐकोनी ॥६८॥
रावणाचें चरित्र ऐकोन । प्रेमें वीर झाले मग्न ।
इतुकें वर्तल्यवरी कथानुसंधान । सावधान अवधारिजे ॥६९॥

तेथून शत्रुघ्न सर्व सेनेसह अयोध्येला निघाला :

क्रमोनियां ते शर्वरी । सेना सज्जोनि ते अवसरीं ।
नमस्कार करोनि लवणारी । मुनीस पुसोनी निघाला ॥७०॥
श्रीरामदर्शानची उत्कंठा । मार्गीं चालतां दडदडाटा ।
इंद्रियनाथहून वेग मोठा । अयोध्येचें शेवटा येते झाले ॥७१॥
तें अयोध्या देखिली कैसी । अमरपुरीहूनि विशेषी ।
कैलास जीचे उपमेसीं । तुळणेसी पैं नये ॥७२॥
सुवर्णकळसांचिया हारी । रत्नदीप घरोघरीं ।
उत्तममध्यमीं हाटक घरी । सुखसंभारीं असिजे हो ॥७३॥
कोणा नाहीं दुःख दैन्य । घरोघरीं श्रीरामकीर्तन ।
श्रीरामकथा श्रीरामगायन । स्वानंदीं मग्न जन वसती ॥७४॥
सूर्यवंशी नृपकेसरी । जयाचे स्मरणें संसार दुरी ।
सकळ जन सहपरिवारीं । रावणारी वसे जेथें ॥७५॥
ऐसिये अयोध्येभीतरीं । प्रवेशला तो लवणारी ।
सदना उजू येवोनि ते अवसरीं । श्रीरामाची देखिले ॥७६॥

श्रीरामांना वंदन व निवेदन :

करोनियां साष्टांग नमन । चरणांवरी माथां ठेवोन ।
अग्रजें दिधलें आलिंगन । समाधान येरयेरां ॥७७॥
लवणारी म्हणे रावणारीस । तुमचें आज्ञेनें मधुपुरीस ।
प्रवेश न करितां पुरद्वारीं राक्षस । पारधीहूनि आला ॥७८॥
तुमचे कृपेंकरुन । नगरद्वारीं देखिला लवण ।
युद्धीं त्यासी मोक्ष देवोन । पुरीस प्रवेशन पैं केलें ॥७९॥
दैत्यभयेंकरोनि पुरी । उद्वस होती मधुनगरी ।
ते वसवोनि द्वादश वर्षांवरी । आम्हांवीण तेथें राहिलों ॥८०॥
तुजवीण रघुनाथा । नावडे मज राज्यपदार्था ।
तुजवीण भोग भोगितां । ते अधःपाताचें मूळ ॥८१॥
जैसें जननीवेगळे बाळक । तैसें येथें मी होतों रंक ।
चंद्रावेगळें चकोर देख । पडे उपवास न देखतां ॥८२॥
जैसे रविउपासक जन । न होतां सूर्याचें दर्शन ।
तयांसि पडे लंघन जाण । तैसें तुजवीण श्रीरामा ॥८३॥
तुझियें आज्ञेकरुन । केलें प्रजेचें पाळण ।
रात्रंदिवस तुझें ध्यान । करितो जाण श्रीरामा ॥८४॥
नित्य अनुदिनीं सावकाश । पाहें अयोध्येसी वास ।
युगासमान एक दिवस । ऐसीं वर्षे द्वादश कंठिली ॥८५॥
माझा तूं आत्मा माझा तूं प्राण । माझी मातापिता रघुनंदन ।
माझे गणगोत जानकीरमण । तेथें संशय जाण असेना ॥८६॥

रामांच्या आज्ञेने शत्रुघ्नाचे परत मधुपुरीला गमन :

ऐसें शत्रुघ्नाचें ऐकोनि वचन । मग काय बोलिला धरणिजारमण ।
माझे आज्ञेनें दुष्टदाळण । करोनि यश पावलासी ॥८७॥
विप्रजनां सुख दिधलें । सकळ सुरवरां संतुष्ट केलें ।
पुनरपि माझें दर्शन घेतलें । यश जोडिलें त्रैलोक्यीं ॥८८॥
माझें दर्शन झाल्याउपरी । अयोध्ये राहीं सप्त रात्रीं ।
पुनरपि तूं मधुनगरीं । जावोनि राज्य करावें ॥८९॥
पद्माक्षीरमणाचें ऐकोनि वचन । मग शत्रुघ्नें सप्त रात्री क्रमून ।
श्रीराममाता अभिवंदून । वसिष्ठा नमन पैं केलें ॥९०॥
वंदोनि भरतलक्ष्मण । शत्रुघ्नें रथीं आरुढोन ।
मधुपुरीस केलें गमन । श्रीरामाज्ञा वंदोनि ॥९१॥
भरत लक्ष्मण बोळवीत गेले । ते पुनरपि मुरडोनि अयोध्ये आले ।
तदनंतर काय वर्तलें । तें अवधारिजे श्रोते हो ॥९२॥
एका विनवी श्रोते जनार्दना । तुमचे दासाचा दास पोसणा ।
सलगी करितसे चरणां । लागोनियां तुमचिये ॥९३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरघुनाथशत्रुघ्नदर्शनलवणासुरवधो नाम षष्ठितमोऽध्यायः ॥६०॥ ओंव्या ॥९३॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय साठावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय साठावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय साठावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय साठावा