भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पासष्टावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पासष्टावा

अश्वमेध यज्ञ व लवकुशांचे गायन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम म्हणे लक्ष्मणभरतांसी । कर्दमपुत्रकथा ऐसी ।
पुढें वर्तले तें सावकाशीं । अवधानेंसी अवधारा ॥१॥
ऐलाबुधांपासून । पुरुरवा पुत्र झाला जनन ।
तदनंतर बुध सज्ञान । काय करिता पैं झाला ॥२॥
पाचोरोनि सर्व मुनी । च्यवन भृगु तपोधनी ।
पुलस्त्यादि श्रेष्ठ ब्राह्मणीं । ॐकार वषट्कार पैं आले ॥३॥
सोमसुत म्हणे ऋषींसी । परिसा कर्दमऋषीच्या पुत्रकथेसी ।
ऐलनामें स्वधर्मेसीं । राज्य करित पराक्रमें ॥४॥
तो आला या वना पारधीसी । सैन्येसहित महादेवें शाप त्यासी ।
दिधला असतां त्याच्या हितासी । तुम्ही समस्तीं विचारा ॥५॥
ऐकोनि सोमसुताचें वचन । ऋषीश्वरां संतोष अति गहन ।
समस्त एकवट मिळोन । बोलावया उपक्रम करिते झाले ॥६॥
ऋषी म्हणती बुधासी । पार्थिवाचे उःशापासीं ।
करावें अश्वमेध यज्ञासी । तृप्त सुरवरांसी करुनी ॥७॥
हेचि एक कर्तव्यता । अवश्य करावें चंद्रसुता ।
या पुण्यासी नाहीं समता । विचारितां त्रैलोक्यीं ॥८॥
ऐसें ऋषीश्वरांचें मधुर भाषण । ऐकोनि समस्तीं संतोषोन ।
महादेवाप्रीत्यर्थ यज्ञ । करिते झाले ते काळीं ॥९॥
संवर्तकादि मुनिश्रेष्ठ । अति सज्ञान कर्मनिष्ठ ।
तयांतें पाचरोनि स्पष्ट । यज्ञ वरिष्ठ आरंभिला ॥१०॥
यज्ञसमाप्तीचें अंतीं । येवोनियां गिरिजापती ।
म्हणता झाला सोमसुताप्रती । धन्य धन्य हिमकरात्मजा ॥११॥
धन्य येथींल ब्राह्मण । धन्य बुधाश्रमासमीप यज्ञस्थान ।
धन्य तुमचा भावार्थ देखोन । प्रीतिप्रसन्न मी झालों ॥१२॥
प्रसन्न झालीं पार्वतीपरमेश्वर । सोमसुत मागता झाला वर ।
कर्दमप्रजापतीचा ऐल कुमर । शापावेगळा करावा ॥१३॥
ऐल हा कर्दमसुत । शापापासोनि करावा मुक्त ।
महादेव म्हणे सत्य सत्य । शापनिर्मुक्त नृप केला ॥१४॥
शापावेगळा झाला पृथ्वीपती । आपुलिया निजस्थानी जाती ।
समस्त ऋषी आणि पार्वतीपती । मागें बुधें काय केलें ॥१५॥
प्रतिष्ठान नामें नगर । कर्दमसुतासी वस्तीसी थोर ।
वसवोनियां राजेश्वर । राज्यीं ऐल स्थापिला ॥१६॥
ऐसें कर्दमसुताचें आख्यान । श्रीरामें बंधूंसी सांगोन ।
लक्ष्मणाप्रति पुनरपि वचन । बोलता झाला रावणारी ॥१७॥

अश्वमेधाच्या पूर्वतयारीला प्रारंभ :

वसिष्ठ वामदेव जाबाली । कश्यपादिकरानि ऋषिमंडळी ।
पाचारीं बा शीघ्रकाळीं । आणि नृपवर पृथ्वीचे ॥१८॥
धोडा आणावा सुंदरवदन । सर्वांग शुभ्र श्यामकर्ण ।
सुलक्षणीं विराजमान । देखतां मन निवे जनांचें ॥१९ ॥
ऐसें राघवें बोलिल्यावरी । शीघ्र लक्ष्मणें ते अवसरीं ।
दूत पाठवोनि त्वरेंकरीं । समस्त ऋषी पाचारिले ॥२०॥
आले कोण कोण ऋषीश्वर । तयांची नामें सविस्तर ।
श्रोते होवोनि सादर । सावधान परिसावीं ॥२१॥
ज्याची आज्ञा परम लाठी । रविमंडळीं तपे छाटी ।
धाकें कृतात न उघडी दृष्टी । तो वसिष्ठ जगजेठी स्वयें आला ॥२२॥
तदनंतरें वामदेव । आला जयाचा सर्वभूतीं भगवद्भाव ।
आत्मत्वें सृष्टी न्याहाळी सर्व । चराचरीं देखे हरिरुप ॥२३॥
जाबाली महातपोधन । वेदशास्त्रीं महानिपुण ।
तोही श्रीरामदर्शनालागून । शिष्यांसहित पैं आला ॥२४॥
कश्यपें नवी सृष्टि केली । अत्रीनें दुष्काळीं प्राणिरक्षा केली ।
अगस्तीची ख्याति आगळी । अनागत भाष्य वदला जो ॥२५॥
विश्वमित्रासि गायत्री प्रसन्न । तपोबळें सृष्टि करी निर्माण ।
नारदही तेथें आला जाण । ब्रह्मवीणा घेवोनि खांदी ॥२६॥
आणिक अगणित ऋषीश्वर । आले ॐकार वषट्कार ।
आणि पृथ्वीचे राजे थोर । श्रीरामदर्शना पैं आले ॥२७॥
तदनंतरें हरिवाहिनी । शीघ्र आली आज्ञेकरोनी ।
तयांची नामें परिसावीं कानीं । ऐसें श्रोतजनां वाटतसें ॥२८॥
सुग्रीव अंगद नळ नीळ । पनस केसरी तरस तरळ ।
हेमकूट गज गवाक्ष प्रबळ । अरिदाळणीं समर्थ जे ॥२९॥
आला हनुमंत वायुसुत । बिभीषण राक्षसपंडित ।
सनातन जाबंवंत । निजदळेंसीं तो आला ॥३०॥
आले भट्ट पौराणिक । शास्त्रज्ञ पंडित ज्योतिषी गणक ।
आले नटनाटक । मंत्रधारक ॐकार ॥३२॥
आले भाट नागरीं । आले देशमुख चौधरी ।
ब्राह्मण राष्ट्राभीतरीं । तेही आले अश्वमेधा ॥३३॥
श्रीरामें समस्तां देखोनि मान । केलें अर्घ्यपाद्यादिपूजाविधान ।
वस्त्रें भूषणें नाना देऊन । निजासनीं बैसविलें ॥३४॥

श्यामकर्ण घोड्याचे वर्णन :

तदनंतर श्यामकर्ण वारु । पृथ्वीवरी नव्हे स्थिरुं ।
मनोवेगाचा लंघोनि पारु । सगुण सुंदर आणिला ॥३५॥
या अश्वाचें करितां वर्णन । चतुरानना पडे मौन ।
तेह्तें मी बापुडें अपुरतें दीन । केंवी मज वर्णन करवेल ॥३६॥
करोनियां दीक्षास्नान । वारुसी पूजी रघुनंदन ।
तया वारुवापुढें पवन । लज्जायमान शंकित ॥३७॥
रत्नमेखळा वारूचें कंठीं । कस्तूरी चंदन ललाटीं ।
केशराची शोभे उटी । देखतां दृष्टी मन निवे ॥३८॥
कंठी नवरत्नांचें भूषण । पीतांबर पांघरुण ।
चरणीं नुपुरें करिती गर्जन । देखतां मन पैं निवे ॥३९॥
क्षराक्षरातीत अक्षरीं । पत्रिका लाहिली साजिरी ।
जो क्षत्रिय होईल तेणें निर्धारीं । वारु धरोनि युद्ध कीजे ॥४०॥
दिसे वारु वोतींव । मान कळायुक्त कांतींव ।
रोम मृदु अति अपूर्व । देहीं बिंबें उमटती ॥४१॥
ऐसा श्यामकर्ण वारु । तेजें जैसा हिमकरू ।
अलांछन अति सुंदरु । पाय स्थिरु नव्हे ज्याचा ॥।४२॥
इंद्रनीळाहुनि आगळें । दिसती अंबकाचीं बुबुळें ।
माणिक रंगावरी सोज्ज्वळें । ऐसीं रत्नें जडियेलीं ॥४३॥
ऐसे तयाचे नयन । सप्तविंशति भोवरें पूर्ण ।
अश्वाचा वर्ण कोण । सावधान अवधारा ॥४४॥
सर्वांगवर्ण माणिकाचा । अंजनवर्ण श्रवणाचा ।
इंदुश्वेत ललाटींचा । तेजें दशदिशा उजळल्या ॥४५॥
आननीं श्रीजांबूनदाची । परिवेष्टित प्रभावळी हि-यांची ।
आंदुवांवरी नवरत्नांची । चरणीं घाग-या वाजती ॥४६॥
चरणीं पंधरयाची नुपुरें । डोलता वाजत अति गजरें ।
हय आपुले नटकारें । आकाशपुत्र स्थिर करी ॥४७॥
आपुली भषा वदे वारु । हिंसे तेणें नाद थोरु ।
गर्जूं लागती सातही समुद्रू । ऐसा अश्व रावणारीचा ॥४८॥
पालाणिला अपूर्व भारी । रत्नें जडलीं हारोहरीं ।
गळां नवरत्नांची सरी । मुकुटीं बांधिली पत्रिका ॥४९॥

रामाज्ञेची पत्रिका :

पत्रिके ऐसें लिहिलें ऐका । जो धनुर्धर असेल निका ।
तेणें वाचोनियां पत्रिका । मग वारु धरावा ॥५०॥
अश्व धरावा बळियाढें । संग्राम करोनि सोडूं पुढें ।
ऐसा वारु देखोनि तपोधन । गाढे बहुत पावले ॥५१॥
सवें धनाचिया मांदुसा । तिळजवांचे पर्वत सहस्त्रशा ।
घृताच्या कावडी अगणित सहसा । वस्त्रें अनुपम्य आणिलीं ॥५२॥
कोट्यानुकोटि गोधनें । तेल उडीद परिमळद्रव्यें गहनें ।
पूगीफळें दिव्यें पानें । आणिक सामग्री नेणों किती ॥५३॥
सामग्री देखोनि श्रीरघुवीर । भरतलक्ष्मणां आनंद थोर ।
यज्ञ करावया स्थळविचार । करिते झाले ते काळीं ॥५४॥
सुवर्णाची करोनि जानकी । दीक्षेकारणें केली निकी ।
तें देखोनि आठवली पद्माक्षी । श्रीरामासी ते काळीं ॥५५॥
मोहें कळवळलें मन । सद्गदित झाला रघुनंदन ।
तंव ऋषीश्वरां जाणवली खूण । आशीर्वाद देते झाले ॥५६॥
जानकी आणि पुत्रांसहित । अयोध्येसि राज्य कराल सत्य ।
हें ऐकोन ऋषिभाषित । संतोषयुक्त श्रीराम ॥५७॥

नैमिषारण्यात यज्ञाचे स्थळ निश्चित :

यज्ञभूमि पहावया रघुनंदन । निघाला सवें तपोधन ।
आणि सेनासहित बंधुजन । नटनाटक निघाले ॥५८॥
भाट नगरीं नृत्यकारी । वीणा वेणु वाद्यें नानापरी ।
प्रवेशले नैमिषारण्यक्षेत्रीं । गोमतीतीरीं स्थळ नेमिलें ॥५९॥
सांगातें तिघी जणी माता । अंतःपुरस्त्रिया समस्ता ।
आणि नगरयोषिता । नैमिषारण्या आणिल्या ॥६०॥
श्रीराम म्हणे भरतासी । याचकाचे इच्छेनिसीं ।
जें जें पाहिजे जयासी । या समयासी ते दीजे ॥६१॥
याचकाची इच्छा पूर्ण । तितुकें आपण द्यावें धन ।
मग काय करता झाला रघुनंदन । ते सावधान परियेसा ॥६२॥
तंव राष्ट्रींचे भूपाळ । घेवोनि आपुलालें दळ ।
नैमिषारण्या आले सकळ । अश्वमेध पहावया ॥६३॥
श्रीरामे पूजोनि ब्राह्मणभूपाळ । वस्त्रें भूषणें देवोनि सकळ ।
सुखी केलें त्रैलोक्य प्रबळ । स्वानंदें ऋषी बोलते झाले ॥६४॥
ऋषी म्हणती पूर्वी यज्ञ । ऐसा कोणीं न केला जाण ।
देवोनियां बहुत धन । बंदिजन सुखी केले ॥६५॥
लक्ष्मणाचें सांभाळीं करुनि वारु । भरताचे स्वाधीन राजोपचारु ।
आणि दातव्य धन वस्त्रें अलंकारु । यांचें आधिपत्य पैं केलें ॥६६॥
शत्रुघ्नासी सांगितलें कार्य थोर । राजे ऋषी ब्राह्मण यांचा आदर ।
गंधाक्षता तांबूल इतर उपचार । अन्नपान पैं दीजे ॥६७॥
ऐसा नैमिषारण्यीं सोहळा । करी श्रीराम घनसांवळी ।
सुखें असतां त्रैलोक्या सकळा । पुढें काय वर्तलें ॥६८॥
नैमिषारण्यींच्या क्षेत्रीं । श्रीराम ऋषीसहित आनंदस्थितीं ।
यज्ञ करितो ऐसें वाल्मीकाप्रती । जाणवलें ते काळीं ॥६९॥
सवें घेवोनि दोघे कुमार । सुलक्षणीं सुंदर रुपधर ।
येता झाला वाल्मीक ऋषीश्वर । फळसंभार घेवोनि ॥७०॥
येतां दुरोनि देखिला यज्ञ । अद्भुत जयाचें पुण्य गहन ।
करितां ब्रह्महत्या होय दहन । दर्शनें जन उद्धरती ॥७१॥

वाल्मीकींनी लव-कुशांना यज्ञस्थळी
जाऊन रामायणाचे गायन करण्यास सांगितले :

तया नैमिषारण्याचे एकांतस्थलीं । वाल्मीक राहिला गुप्त जवळी ।
तया बाळकांप्रति ते काळीं । संवाद करिता पैं झाला ॥७२॥
तुम्ही दोघे मिळोन । जावें जेथें होतो यज्ञ ।
तेथें ऋषींप्रति शतकोटि गहन । रामायण वाचवें ॥७३॥
गावें ऋषींचे आश्रमस्थळीं । गावें जेथें तेथें भूपांजवळी ।
गावें जेथें ब्राह्मणमंडळी । ऋत्विजांसमीप पैं गावें ॥७४॥
गावें श्रीरामाचें भवनीं । गावें राया भरताचे सदनीं ॥
गावें जेथें बहुत मिळणी । योषितांची असेल ॥७५॥
सवें फळेंमूळें घेऊन । भक्षण करोनि करा गायन ।
कोणाचें द्रव्य न घ्यावें आपण । वनवासीं प्रयोजन नाहीं त्यासीं ॥७६॥
द्रव्यलोभ न करुन । निर्लोभ दोघे करा कीर्तन ।
श्रीराम पुसेल तुम्ही कोण । सांगा शिष्य वाल्मीकाचे ॥७७॥
स्वरयुक्त करा कीर्तन । मूर्च्छना मंजुळ कंपित गायन ।
आलाप भार्यांसहवर्तमान । तालनृत्यसहित पैं ॥७८॥
इतुकें करावें प्रातःकाळीं । येरीं आज्ञा वंदोनि निढळीं ।
वाल्मीक म्हणे तयांजवळी । श्रीराम जनक जगाचा ॥७९॥
उत्पत्ति स्थिती प्रळण जाण । हें जग श्रीरामा पासून ।
लय पावतां श्रीरामीं मग्न । सत्य स्वयें मी जाणें ॥८०॥
ऐकोनि वाल्मीकीचें वचन । संतोषले दोघे जण ।
हर्षयुक्त झाले मन । आज्ञा वंदोनि गुरुची ॥८१॥
नैमिषारण्या समीपतेसीं । वाल्मीकासहित क्रमिली निशी ।
प्रभाते उठोन स्नानसंध्येसी । दोघे वीर करिते झाले ॥८२॥
करोनियां संध्यास्नाना । वाल्मीकां करोनि प्रदक्षिणा ।
दोघे कैसे शोभले जाणा । चंद्रसूर्यांसारिखे ॥८३॥

त्या दोघांचे वर्णन :

चंद्रगिरी द्रोणागिरी । जैसे शोभती दुग्धार्णवतीरीं ।
तैसी शोभा दोघां कुमरीं । धगधगीत हुताश जैसे ॥८४॥
आधींच सूर्यवंशी वीर । दोघे प्रतापाचे सागर ।
दोघे दिनकरवंशींचें कुमर । वीरशृंगार करिते झाले ॥८५॥
आंग्या ल्याले दोघे अंगीं । विजारा शोभती दोघांलागीं ।
कुसुंबी पागोटीं ते प्रसंगीं । डोई बांधिली कुसरीनें ॥८६॥
हेमकटिबंध तयावरी । बाहुभूषणें उरी शिरीं ।
रत्नजडित कंकणें करीं । तेज अंबरीं फांकत ॥८७॥
रत्नजडित चरणीं पादुका । तयांवरी नृपुरें शोभती देखा ।
कटिभागीं क्षुद्रघंटिका । कांसे पीतांबर कसिलासे ॥८८॥
ललाटीं कस्तूरीचा टिळा । तयावरी अक्षता अति सोज्ज्वळा ।
नवरत्नजडित गळां माळा । वोप गंडस्थळां फांकत ॥८९॥
श्रवणीं रत्नजडित कुंडलें सुरेख । तयावरी नागोत्तर ल्याले देख ।
करांगुळीं मुद्रिका लखलख । तेणें दशदिशा शोभती ॥९०॥
खांदी वाहोनि रुद्रवीणा । गुरुसी करोनि प्रदक्षिणा ।
निघाले पहावया लीलारचना । श्रीरामाच्या यज्ञाची ॥९१॥
येवोनि श्रीरामाच्या भवनासी । सभा देखिली सहित ऋषी ।
पुराणिक वैदिक ज्योतिषी । नटनाटकी बैसलें ॥९२॥
बैसले पृथ्वीचे भूपाळ । बैसले पंडित शास्त्रज्ञ प्रबळ ।
बैसले विद्वांस ज्ञानकुशळ । आध्यात्मिक चर्चा करिताती ॥९३॥
बैसले देशीचें नागरिक जन । बैसले अग्निहोत्री ब्राह्मण ।
बैसले हरिदासकीर्तन । श्रीरामगुण वर्णित ॥९४॥

रामायण गायनास प्रारंभ :

ऐसी सभा प्रसन्न वदन । करितसे संध्यातर्पण ।
समीप उभे भरत लक्ष्मण । शत्रुघ्न देखोन गायन मांडिलें कुमारीं ॥९५॥
सप्तस्वर मूर्च्छनायुक्त । आलाप भार्यांसहित कंपित ।
तार मंद्र घोर आहत प्रत्याहत । हीं लक्षणे प्रसंगीं बोलिलीं ॥९६॥
ऐसें लक्षणीं युक्त रुद्रवीणा । करिती सुस्वरगायना ।
ध्रुवपाठाची प्रबंधरचना । सप्ततालीं गाती दोघें ॥९७॥
हा भाव कटाक्षप्रदेशीं । नृत्य करिती देखोनि श्रीरमासी ।
अनागत भाष्य वदला ऋषी । त्या रामायणासी पैं गाती ॥ ९८॥
अनागत भाष्य रामायण । श्रीरामाचें जन्मकथन ।
आणि रावणाची उत्पत्ति निधन । जानकीवनप्रयाण गाइलें ॥९९॥
वनीं दोघे पुत्र झाले । तेहीं तेथे संपूर्ण गाइलें ।
ऐकोनि सभालोक आनंदले । श्रीरामचरित्र ऐकतां ॥१००॥

श्रीराम व सर्वजण त्या गायनाने प्रसन्न झाले :

श्रीरामें नित्यनेम सारुन । ऋषिसभा प्रसन्नवदन ।
कुमारांचें ऐकोनि गायन । उल्हासे मन रामाचें ॥१॥
तंव खांदी घेवोनि ब्रह्मवीणा । नारद आला रामदर्शना ।
रामें देखोनि ब्रह्मनंदना । पूजविधानें पूजिलें ॥२॥
आश्चर्य झालें समस्तांसी । आश्चर्य करिती महाऋषी ।
आश्चर्य देशिकां नगरवासियांसी । श्रीरामासी आश्चर्य ॥३॥
मधुर गायन कुमारांचे । ऐकोनि मन तोषलें श्रीरामाचें ।
म्हणे हे अपवयाचें । धन्य यांचे जननीजनक ॥४॥
श्रीराम म्हणे भरतासी । सुवर्ण बहुसाल द्यावें यांसी ।
मग भरतें तत्काळ दूतांसी । भांडारगृह पाठविलें ॥५॥
आणिलें बहुसाल धन । कुमारांसी जवळ पाचारुन ।
म्हणे हें अल्प सुवर्ण । अंगीकार पूर्ण करावा ॥६॥

सुवर्ण घेण्यास कुमारांचा नकार :

तंव ते म्हणती दोघे जण । नाहीं सुवर्णीं प्रयोजन ।
आम्ही वनवासी तापस पूर्ण । वनफळें भक्षून वसतसों ॥७॥
न घेऊं सुवर्ण श्रीरघुनाथा । आम्हां वनवासियां न सुवर्णकथा ।
धन होय हें मूळ अनर्था । त्या पंथा आम्ही न वचों ॥८॥
देहगेहदारासक्ती । यासीं होय पुनरावृत्ती ।
ऐसे अनर्थ द्रव्याप्रती । सत्य श्रीरघुपति सर्वज्ञा ॥९॥
ऐसें वैराग्ययुक्त बोलणें । कुमारांचें ऐकोनि रघुनंदनें ।
आनंदलीं पुरजनांचीं मनें । बाळकवचनें सुखावलीं ॥११०॥
श्रीराम म्हणे यांचें गायन । ऐकोनि सुख झालें गहन ।
परी हे कोणाचे कोण । समूळ कथन पुसों इच्छी ॥११॥

कुमारांना प्रश्न :

तयांतें म्हणे श्रीरघुपती । तुम्ही कोणाचें कोठील तुमची वस्ती ।
काव्यकर्ता कोणें देशाप्रती । वसे तें निगुती सांगा आम्हां ॥१२॥
कुमार म्हणती अहो भूपाळा । वाल्मीकमुनीनें हे काव्यकळा ।
केली कोटिशत स्वगमाळा । अनागत भाष्य रामायण ॥१३॥
हें केलें परोपकारार्थ । श्रवणमात्रें जग होय पुनीत ।
कामिकाचें पुरे आर्त । श्रीरामचरित ऐकोनि ॥१४॥
ऐसें बोलोनियां बाळक । आज्ञा घेवोनि जेथें वाल्मीक ।
तेथें आले क्षणामाजी देख । ऋषिसंमुख उभे ठेले ॥१५॥
सांगितला सर्व वृत्तांत । वर्तला जो चरितार्थ ।
ते ऐकोनि ऋषि विस्मित । उहास बहुत पैं झाला ॥१६॥
एका जनार्दना शरण । पुढें गोड निरुपण ।
होईल श्रीरामाचें आगमन । ऋषिदर्शन घ्यावया ॥११७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
अश्वमेधप्रकरणं नाम पंचषष्टितमोऽध्यायः ॥६५॥ ओंव्या ॥११७॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पासष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पासष्टावा भावार्थरामायण  उत्तरकांड अध्याय पासष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पासष्टावा  भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पासष्टावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *