भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचविसावा
यमाच्या सैन्याचा विध्वंस
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
नारदांचे यमलोकी आगमन :
ऐसें विचारोनि ब्रह्मकुमर । प्रेतपुरीस आला सत्वर ।
जेथे प्रेतराज सहपरिवार । परिवेष्टित बैसलासे ॥१॥
नारदें यम देखिला । जैसा हुताशन प्रज्वळिला ।
आपण मध्यें मिरवला । खमंडळीं कश्यपसुत ॥२॥
प्राणियांचें जैसें कर्म देखे । तयां दंड करी कर्मासारिखे ।
ऐसें करितां आकस्मात देखे । पातला विरंचिसुत नारद ॥३॥
आला देखोनि नारदमुनी । यमराव हरिखेला मनीं ।
षोडशोपचारीं पूजनी । मधुरवाणी बोलिला ॥४॥
अहो जी मुनिचक्रचूडामणी । क्षेम असे तुम्हांलागोनी ।
स्वधर्म रक्षितसा अनुदिनीं । किंप्रयोजनीं आगमन ॥५॥
सकळ सुर आणि सुरपती । देव गंधर्व ऋषिपंक्ती ।
आणि असुरही सेविती । तो तूं आलासि कोणें अर्थी ॥६॥
कोणा कार्याचे विधी । तू आलासे कोणे बुद्धीं ।
तें मज सांगावें कृपानिधी । ऐसें प्रेतराजें प्रार्थिलें ॥७॥
रावण जिंकण्यासाठी येत असल्याचे नारदाने सांगितले :
ऐकोनि धर्मरायाचे वचन । बोलता झाला नारद आपण ।
माझिया आगमनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥८॥
वर्तलें तें आईक राया । ब्रह्मवरदें उन्मत्त होवोनियां ।
रावण ऐसें नाम जया । सा चारी शिरें मस्तकीं ॥९॥
तो राक्षस पुष्पकीं आरुढोन । मंत्रियांसहवर्तमान ।
तुज जिंतावया आपण । येतो म्हणोन मी सांगों आलों ॥१०॥
तुझें दंडाची दुर्धर शक्ती । स्वप्नीं प्राणी भय वाहती ।
तया तुज आजि कोण गती । होईल तें न कळे ॥११॥
ऐसें बोलतां नारदमुनी । तंव अकस्मात सूर्यासारिखें गगनीं ।
देखिलें येतां तेज नयनीं । आणि दशदिशा उजळल्या ॥१२॥
दिगंतबाहेर ते समयीं । तिमिर गेलें नव्हतेंच पाहीं ।
बोलता देखा समीप लवलाहीं । येतें झालें विमान ॥१३॥
तया पुष्पकविमानावरी । बैसलासे सुधापानियांचा अरी ।
पीडित प्राणी होते ते क्षणामाझारी । भुजबळें सोडविलें ॥१४॥
रावणाने पापी लोकांना मुक्त केले :
पापी पुरुष सोडविले कैसे । रौद्ररुप भयानक घोर ऐसें ।
बांधिलें होते ते यमफासें । देहीं कृशत्व पावले ॥१५॥
एक देती दीर्घ हाक । एक आरडती पावोनि दुःख ।
एकां कृमिकीटकादिक । मांस तोडोनि भक्षिती ॥१६॥
एकांतें श्वान तडतडां तोडी । एकांतें करिती ओढाओढी ।
एकांतें म्हणती पाडीं पाडीं । कडोविकडी गांजती यमदूत ॥१६॥
पुढे वैतरणी शोणितोदकें । दोन्हीं तीरी पाहें पूर देखें ।
तियेंत प्राणी कित्येकें । बुचकळ्या देती निजकर्में ॥१८॥
सप्तवाळुकेंत कित्येक प्राणी । उभे राहिले निजकर्म भोगोनी ।
कित्येक अधर्मी असिपन्नवनीं । वृक्षपर्णीं शयन करिती ॥१९॥
शस्त्रधारा अति तीक्ष्ण । तैसींच आहेच पर्णे जाण ।
तेथें करविती पापियां शयन । सर्वांग छिन्नभिन्न होतसे ॥२०॥
रौरव आणि क्षारनदीप्रती । प्राणियांतें लोटोनि देती ।
खालते जाती वरती येती । येती काकुळती हा कर्मा ॥२१॥
एक क्षुधित होऊन । करितां निजकर्मभक्षण ।
एक संसारतृषेनें पीडोन । विवर्णमुख पैं झाले ॥२२॥
वाल्मिकिरामायणाप्रती । पातकी बोलिले बहु असती ।
तितुके सांगतां कथा विस्ताराप्रती । जाईल निश्चितीं जाणिजे ॥२३॥
न सांगता दोष दारुण । वाल्मीकिग्रंथासि विरुद्धपण ।
येईल म्हणोनि संकलित जाण । निरुपण पैं केलें ॥२४॥
यालागीं मी संतांप्रती । येतसें काकुळती ।
तयावरी नेणें शास्त्रव्युत्पत्ती । क्षमा श्रोतीं मज कीजे ॥२५॥
अबुद्ध सुबुद्ध दाशरथिकथन । करितां सुटे संसारबंधन ।
ते नर होती पुण्यवान । ऐसें भगवान बोलिलासे ॥२६॥
मुक्त झालेल्यांना आनंद :
ऐसें पापी आणि गुरुद्रोही । विश्वासघातकी हिंसक पाहीं ।
ते रावणें सोडविले लवलाहीं । पळतें झाले दशदिशां ॥२७॥
कित्येक गायन करित । कित्येक आनंदें नाचत ।
कित्येक स्वधर्मीं रत । तयांतेही देखत रावण ॥२८॥
कित्येक गुरुभजनीं तत्पर । कित्येक शास्त्रीं चतुर ।
कित्येक दानधर्मीं शूर । याचकां देहो पैं देती ॥२९॥
कित्येक गोदानी पुरुष । ते भोगिती स्वानंदगोरस ।
कित्येकां अन्नदानीं हर्श । ते निजानंद रेश सेविती ॥३०॥
स्वानंदें भक्ती करोन । जिहीं पूजिला शैलजारमण ।
ते नर पुण्यपावन । भोग भोगून अभोक्ते ॥३१॥
ऐशिया धार्मिकांतें देखोन । संतोषला दशानन ।
म्हणे धन्य धन्य सारेजण । जे नगरीस राहिले ॥३२॥
यमदूतांनी रावणसैन्याची दाणादाण केली :
पापियांतें करोनि मुक्त । पुढें चालिला लंकानाथ ।
हें देखोनि यमराजदूत । क्रोधें रावणावरी त्वरित धांवले ॥३३॥
परिघ पट्टिश मुसळ । शक्ती तोमर आणि शूळ ।
पुष्पक वेढोनियां सकळ । घोरांदर मांडिलें ॥३४॥
आसनें तोरणें पताका । पुष्पकीं होत्या वेदिका ।
विमाना ताडातोडी केली देखा । निमेषा एका न लावितां ॥३५॥
जैसें ब्रह्मगिरीसीं भ्रमर । शिखरीं प्रवेशतां करिती जर्जर ।
प्रेतराजसैनिकीं दशशिर । तद्वत वेढोनि सत्वर घेतला ॥३६॥
रावणा केला अपमान । प्रेतराजसैनिकीं जाण ।
आणि रावणाचे प्रधान । तेहीं रणीं शक्तीहीन झाले ॥३७॥
कित्येक झाले घायळ । कित्येकांचें फुटलें कपाळ ।
कित्येकांसी सुटला पळ । कित्येकीं रणमंडळ सांडिलें ॥३८॥
कित्येक जर्जरीभूत झाले । कित्येक मुर्छित पडियेले ।
कित्येक रणीं निवटिले । महादारुण दादुले योद्धे ॥३९॥
जैसे पळस वसंतीं । फुलले शोभा वना देती ।
तैसे राक्षस रणपंथीं । अशुद्धेंकरीं अति डवरलें ॥४०॥
यमसैन्यें केली ख्याती । रावणाचें कवच भेदोनि क्षितीं ।
रावण केलासे विरथी । भूमीवरी निगुतीं आणिला ॥४१॥
रावणाने सैन्याला आवाहन करुन पाशुपतास्त्र सोडले :
मग रावणें काय केलें । माहेश्वरी ठाण मांडिलें ।
कार्मुकीं बाण चढविले । सवें ओढिलें कर्णांत ॥४२॥
अरिसैनिकांते म्हणे रहा सहा रणीं । पळों नका सोडून धरणी ।
ऐसें बोलोनि रावणें तत्क्षणीं । कार्मुकीं बाण झणीं लाविला ॥४३॥
तो बाण पाशुपतमंत्र जपोन । जोडिला क्रोधेंकरोन ।
करोनि अग्निआवाहन । सज्जुनि त्वरें सोडिला ॥४४॥
तो अग्निमयचि बाण । निघाला गर्जत गगन ।
तेणें दशदिशांचे श्रवण । बधिर झाले जाण ते समयीं ॥४५॥
त्रैलोक्यांत घबराट :
त्या पाशुपताचें गर्जन मोठें । चालिलें थोर नेटेंपाटें ।
तेणें कळिकाळा शारें खटखटे । दंत दाढा वाजवित ॥४६॥
खमंडळींहून नक्षत्रे च्यवतीं । चंद्रसूर्य भयभीत चित्तीं ।
दिग्गज थरथरां कांपती । अवनी पालथी होऊं पाहे ॥४७॥
अब्धि मर्यादा सांडूं पाहती । कूर्म दचकलासे चित्तीं ।
सदाशिवासि झोंबें पार्वती । कंठी मिठी घातली ॥४८॥
सावित्री म्हणे ब्रह्मयातें । ब्रह्मांड होऊं पाहे पालथें ।
तंव लक्ष्मीनें आपुले कांतातें । थापटोनि विष्णूतें उठविलें ॥४९॥
रमा म्हणे जी जगन्नाथा । भय वाटे माझिया चित्ता ।
तूं प्राणियां अभय देता । भवव्यथा निवारिसी ॥५०॥
तुझे कृपेचेनि पडिपाडें । हें त्रैलोक्य नांदें सुरवाडें ।
तुझिया जी दृष्टी पुढें । हें जग राहे नासे जी ॥५१॥
तूं ब्रह्मा स्रजिता विधाता । तूं प्रतिपाळीसी जी तत्वतां ।
तूंचि शिव संहार करिता । तुज नेणती तत्वतां मतिमंद ॥५२॥
तूं प्रतिपाळिसी जी ध्वनी । पडिली माझिये श्रवणीं ।
ईपासोनि कृपा करोनी । निजजनातें रक्षावें ॥५३॥
ऐकोनि लक्ष्मीचीं वनचें । अभय दिधलें जनार्दनें ।
पुढें त्या पुलस्तिकुळभूषणें । काय केलें अवधारा ॥५४॥
पाशुपतास्त्र अरिसैन्यावरी । पाडिलें हुताशन भस्म करी ।
जैसा वणवा लागे डोंगरीं । वन जाळीं असंख्य ॥५५॥
वैवस्वतसैन्य रणीं । भस्म होवोनि पडिलें धरणीं ।
ऐसें राक्षसीं देखोनि । रावणेंसीं गर्जती सर्व ॥५६॥
एका जनार्दना शरण । विजयी झाला रावण ।
पुढील रसाळ निरुपण । श्रोतं सावधान ऐकावें ॥५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणयमसैन्यविध्वंसो नाम पंचविंशतितमोऽध्यायः ॥२५॥ ओंव्या ॥५७॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचविसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचविसावा