संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचेचाळिसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचेचाळिसावा

श्रीराम व बंधूंचा विचारविनिमय

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

समीप करोनि तिघे बंधु । तयांप्रति बोले कृपासिंधु ।
मुख कोमाइलें नयनीं बिंदु । अंबकाचे पडताती ॥१॥
अंग चळचळां कांपत । आकुळ व्याकुळ होय चित्त ।
बोलता तोंड कोरडें पडत । अवस्था आकळित राघवा ॥२॥
अंतरीं राम चैतन्यघन । बाह्य चिंतातुर दीन ।
अंतरीं राम सुखसंपन्न । बाह्य उद्वेगें मन व्यापिलें दिसे ॥३॥
अंतरीं राम नैराश्य । बाह्य दाखवी आशापाश ।
अंतरीं श्रीराम सर्वज्ञ परेश । बाह्य विचार पुसतसे ॥४॥
अंतरीं श्रीराम सुखसागरु । बाह्य दिसे व्यवहारी अति चतुरु ।
अंतरीं श्रीराम सद्गुरू । बाह्य नरावतारू भासत ॥५॥
ऐसा श्रीराम लीलाविग्रही । नानावतार धरी पैं देहीं ।
देहबुद्धि तया नाहीं । व्यापकपणें करोनियां ॥६॥
कनकमृगारी सर्वांप्रती । बोलतसे ऐका निश्चितीं ।
तुमचें कल्याण हो आणि श्रीमंती । यश कीर्तीं वृद्धी पावो ॥७॥
ऐका होवोनि सावधान । नगरीं वृत्तांत वर्तला अति गहन ।
पुरीं पाटणीं वसती जन । त्यांचें वर्तमान अवधारा ॥८॥

श्रीरामांची सीतेच्या निंदेमुळे चिंता :

माझे सीतेची निंदा करिती । नाना अपवाद इसी ठेविती ।
घरोघरीं हेंचि वदती । लोक बोलती जानकीसी ॥९॥
अधर्म माझे वदती जन । तेणें चिंतातुर मी गहन ।
याकारणें तुम्हांसि पाचारुन । काय म्यां आपण करावें ॥१० ॥
आम्हीं इक्श्वाकुकुळींचे भूपती । आमुचे पूर्वजीं केली कीर्ती ।
जितीं प्रार्थून उमापती । मागितली भागीरथी स्नानार्थ ॥११॥
मिथिलाभवनीं विदेहजनक । शास्त्रीं पुराणीं प्रसिद्ध एक ।
धर्मपरायण पुण्यश्लोक । ज्ञान सुभट जयाचें ॥१२॥
तयाची जानकी कुमारी । इचें कुळ प्रसिद्ध चराचरीं ।
उभय कुळें वंद्य सुरासुरीं । प्रसिद्ध प्रौढी तैसीच ॥१३॥
जाणतसां दंडकारण्यीं । वसती केली आम्हीं तिघां जणीं ।
तेथें रावण दुरात्मा येवोनी । जानकीसी हरिलें तेणें ॥१४॥
म्यां रावणासी मारुन । जानकी सोडविली हें सत्य जाण ।
तेव्हांच म्यां केलें अव्हेरण । लोकलाजेसी भिवोनी ॥१५॥
जानकी मज संमुख येवोनी । इसी मी विमुख होवोनी ।
ते काळीं सर्वही सुरगणीं । थोर आश्चर्य पाविजेलें ॥१६॥
मग जानकी सुंदरी । दिव्य देती झाली ते अवसरीं ।
देवां देखतां वैश्वानरीं । प्रवेशली ते काळीं ॥१७॥
सीतेनें दिव्य दिधलें । इंद्रें माझें प्रार्थन केलें ।
तेव्हां लक्ष्मणें विनविलें । जानकीतें अंगीकारा ॥१८॥
मान देवोनि समस्तांच्या वचना । म्यां अंगिकारिली हे शुभानना ।
माझिया हृदयींची भावना । निष्पाप देखोनि अंगीकारिली ॥१९॥
आकाशपथीं पंच भूतें । तीहीं म्हणती निष्पाप जानकीतें ।
अंगीकारावें समर्थे । कृपा करोनि श्रीरामा ॥२०॥
शशिसूर्यमहेंद्रीं मजप्रती । करीं ओपिली जानकी सती ।
यासि साक्ष प्रत्यक्ष सौमित्री । त्या काळीं जवळी होता ॥२१॥
ऐसा शुद्ध समाचार । लंकाद्वीपीं देखतां सुरवर ।
वर्तला हा सत्य साचार । तुम्हीं सकळीं जाणिजे ॥२२॥
मग हे जानकी सुंदरी । सहित प्रवेशलों पितृपुरीं ।
ऐसें असतां जन घरोघरीं । नानापरींचें बोलती ॥२३॥
यालागीं आतां क्षणक्षण । होतो माझा विकळ प्राण ।
नगरलोकांसि भिवोन । प्राणत्याग करावा ॥२४॥

अपकीर्तीहून मरण बरे ! किर्तीसठी सर्व काही :

अपकीर्तींचे जें जिणे । लोकांमध्ये लाजिरवाणें ।
याहीपरीस भलें जीव देणें । परी जिणें नये कामा ॥२५।
अपकीर्ती निंदिजे जनीं । कीर्ती वंदिजे वेदीं पुराणीं ।
कीर्ती आपुली ऐकोनी । सर्वांसि उत्साह होतसे ॥२६॥
कीर्तीकारणें जे जन । करिताति व्रतें तपें दान ।
कीर्तीकारणें यज्ञाचरण । स्वयें जाण आचरिती ॥२७॥
कीर्तीं तुळापुरुषदान । कीर्तींकारणें यजनयाजन ।
कीर्तीकारणें अन्नदान । घरोघरीं जन करिताती ॥२८॥
कीर्तीकारणें शास्त्रपठन । कीर्तीकारणें तर्कव्याख्यान ।
कीर्तीकारणें करिती छळण । वादीं ब्राह्मण एकमेकां ॥२९॥
कीर्तीकरणें विजनीं पाणी । पाजिताती पोही घालोनी ।
कीर्तीकारणें पंचाग्निसाधनीं । धूम्रपानीं प्रवर्तती ॥३०॥
ऐसें जाणा कीर्तीचें सुख । अपकीर्तींचें परम दुःख ।
तरी आतां तूं सौमित्रा आइक । एक विचार सांगतों ॥३१॥

सीतेला वनांत वाल्मीकीच्या आश्रमी पोचविण्याची आज्ञा :

हा मध्यारात्रीचा भर । निशाअंतीं उगवे दिनकर ।
सुमंतें अधिष्ठिला जो रहंवर । त्यावरी जानकी बैसवीं ॥३२॥
गंगेचे परपारीं आपण । वाल्मीकाश्रम परम पावन ।
गंगातमसांचा संगम । तेथें वन गहन पैं आहे ॥३३॥
तया वनीं वृक्ष दीर्घ । वसताती जंबुक व्याघ्र ।
आणि क्रूर जीव अनेग । वन आश्रयोनि राहिले ॥३४॥
शीघ्र करावें या कार्यासी । विलंब झणीं येथें करिसी ।
अथवा मनींही विचारिसी । तरी अनर्थ होईल ॥३५॥
तेथें नेवोनि हे सुंसरी । सोडावी त्या विघ्नांभीतरीं ।
हे माझी आज्ञा अवश्य करीं । मज सुख व्हावया ॥३६॥
हें जानकीस कळों न द्यावें । आणि कोणा न सांगावें ।
शीघ्र विलंबा न करावें । झडकरी जावें निजगृहा ॥३७॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिसी । लक्ष्मण निघाला स्वभुवनासी ।
मार्गीं चिंतातुर अति क्लेशी । सुख मानसीं पैं नाहीं ॥३८॥
येरीकडे बंधूंसह रघुनंदन । बाष्प कंठी करी रुदन ।
नयनीं अश्रूंचे पूर जाण । मुख कोमेजून पैं गेलें ॥३९॥
अनुजांसहवर्तमान । प्रवेशला निजभवन ।
पुढील सीतावनाभिगमन । सावधान अवधारा ॥४०॥
एका जनार्दना शरण । रामें गोड रामायण ।
श्रीराम तारक ब्रह्म पूर्ण । सच्चिदानंदघन श्रीराम ॥४१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसहबंधुविचारोनाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥ ओंव्या ॥४१॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचेचाळिसावा