संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचावन्नावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचावन्नावा

निमिराजाला वसिष्ठांचा शाप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मागिलें प्रसंगीं नृगकथन । श्रीरामें लक्ष्मणासि सांगोन ।
पुढें लक्ष्मण कर जोडून । अभिवंदन करिता झाला ॥१॥
स्वामींनीं कथा सांगतां । तृप्ति नव्हे माझिया चित्ता ।
आश्चर्य वाटे धरणिजाकांता । पुनरपि कथा ऐकावी ॥२॥
ऐसें लक्ष्मणाचें देखोनि आर्त । पुनरपि जनकजामात ।
कथा सांगावया उपक्रम करित । त्वरित श्रीराम ॥३॥
पूर्वी राजा इक्ष्वाकुनंदन । तयाचा सुत निमि जाण ।
अति धर्मिष्ठ प्रजापाळण । बरवेवरी करितसे ॥४॥
तयासि झाले बारा पुत्र । तेही पितयासारखे पवित्र ।
तयांमध्ये कनिष्ठ गुणवंत । पित्या आवडत बहुसाळ ॥५॥
निमि राजा धर्मपरायण । अति पराक्रमी पुरुषार्थी जाण ।
अमरपुरीसारिखें पाटन । पुत्राकारणें करुं पाहे ॥६॥
पुत्र वसावयालागून । गौतमाश्रमासमीप नगर जाण ।
केलें अति शोभायमान । विचित्र वनें भोंवतालीं ॥७॥
नाना सरोवरें निर्मळ पाणी । माजी दोहीं तीरीं कमळिणी ।
चक्रवाकें हंसहंसिणी । क्रीडताती जळीं सुखें ॥८॥
नगरा नाम जयंतपुर । सुशोभित मनोहर ।
ते निमीचा राहिला कुमर । इक्ष्वाकुकुळींचा भूपति ॥९॥

अश्वमेधासाठी निमीने वसिष्ठादि ऋषींना पाचारण केले :

पितृसंतोषकारणें । अश्वमेध मांडिला तेणें ।
पितयाप्रती विचारून । ऋषीश्वरां बोलावूं पाठविलें ॥१०॥
तापसांमाजि मुकुटमणी । ज्ञानियांच्या शिरोरत्नीं ।
ऐसा वसिष्ठ आत्मज्ञानी । बोलावूनी आणिला ॥११॥
जयाची छाटी आकाशीं । तपतसे तेजोराशी ।
रविवंशादिराजयांसी । गुरुत्वें पूज्य जो कां होय ॥१२॥
ऐसा वसिष्ठ महामुनी । बोलाविला यागालागोनी ।
आणि थोर थोर ब्राह्मण सेवोनी । यागाकारणें राहिले ॥१३॥
अत्रि आंगिरस भृगु गौतम । आणिक तपोधन परम ।
आले जयांचा पराक्रम । तपोबळें आगळा ॥१४॥

इंद्राच्या यज्ञाची समाप्ती करण्यासाठी म्हणून वसिष्ठ
गेल्यावर गौतमांना आचार्यपद देऊन राजाने यज्ञ सुरू केला :

वसिष्ठ म्हणे निमीसी । मज आवंतिले इंद्रें यागासी ।
त्याचा याग न्यावया समाप्तीसी । मी जातो राजेंद्रा ॥१५॥
ऐसें वसिष्ठ बोलोन । गेला इंद्राच्या यागालागून ।
मागें निमीनें गौतमा पाचारून । पूजाविधान मांडिले ॥१६॥
प्रयोग देवोनि गौतमासी । चालतें केलें यागासी ।
गौतमें बैसोनि हौत्रासी । आरंभ करिता जाहला ॥१७॥
येरीकडे शचीपतियाग संपवून । सवेचि वसिष्ठ तपोधन ।
निमीच्या यागासि होऊन । गौतम होत्रीं देखिला ॥१८॥
गौतमें करितां हौत्रासी । वसिष्ठ क्रोधला मानसीं ।
मग म्हणे निमिरायासि । भला झालासी सूर्यवंशीं ॥१९॥

अपमान झाला म्हणून वसिष्ठांचा राजाला शाप :

आम्हां करोनि अपमान । आम्ही नसतां याग आरंभून ।
गौतमासी हौत्र देऊन । भला याग आरंभिला ॥२०॥
हिमवंताचें पार्श्वभागीं जाण । नूतन नगरासमीप उद्यान ।
पंच सहस्त्र वर्षे यज्ञ । करित असतां तुम्हीं वनीं ॥२१॥
मी सूर्यवंशींचा गुरु । माझा करोनि अनादरु ।
तुम्हीं करितसां अध्वरूं । येथें विघ्न होईल ॥२२॥
ऐसें वसिष्ठें कोपेसीं । शापिलें ते समयीं रायास्ं ।
निमि तूं वायुरुप होसी । कित्येक काळपर्यंत ॥२३॥
ऋषीचा शाप झाला जाणोन । राजा बाहेर येवोन ।
वसिष्ठासि करोनि नमन । बोलता झाला दीनवाणी ॥२४॥
अहो जी स्वामी वसिष्ठमुनी । तुम्ही तापसांमजि मुकुटमणी ।
मी होतों निद्रास्थानीं । वृथा शाप दिधला ॥२५॥
यमाचा जैसा दंड । तैसा तुमचा शाप प्रचंड ।
अन्याय नसतां मजला दृढ । वृथा शाप दिधला ॥२६॥

राजानेही रागाने वसिष्ठांना शाप दिला :

निमिराजा कोपेंकरून । वसिष्ठासि शापिता झाला जाण ।
म्हणे महाऋषि अचेतन । देह धरिसी वसिष्ठा ॥२७॥
परस्परें शाप झाले । ऋषीनें रायासि शापिलें ।
नृपतीनें ऋषीस कठिण बोलें । शाप दिधला तत्काळ ॥२८॥
दोघे झाले शापाभिभूत । परस्परें झाले विचारित ।
तंव वसिष्ठें विचारोनि जेथें विधि तात । आला तेथें सत्वरी ॥२९॥
विधात्यासि करोनि नमन । वसिष्ठ बोल दीनवदन ।
मज निमीनें शापोन । थोर दुःख दिधले ॥३०॥
आतां या शापापासून । सुटें ऐसी कृपा करुन ।
मज द्यावें जीवदान । सत्यलोकनायका चतुरानना ॥३१॥
वसिष्ठाचें ऐकोनि वचन । म्हणता झाला चतुरानन ।
वसिष्ठा तुवां आपण । मित्रावरुणापासीं जावें ॥३२॥
तो मित्रावरुण महाऋषी । तपें अत्यंत तपोराशी ।
तेथें जावें शीघ्रकाळेंसीं । विलंब न करीं मानसपुत्रा ॥३३॥
तयाचे तपेंकरून । तूं अयोनि जन्म धरिसी जाण ।
पुढती पावसी माझें स्थान । सत्य जाण वसिष्ठा ॥३४॥

ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे वसिष्ठ वरुणाच्या शरीरांत प्रविष्ट झाले :

ऐसा वसिष्ठ महाऋषी । धरोनि वायूच्या देहासी ।
आला मित्रावरुणापासीं । वरुणदेहीं प्रवेशला ॥३५॥
शापेंकरोन वसिष्ठमुनी । वरुणहृदयीं प्रवेशूनी ।
तंव येरीकडे उर्वशी समुद्रनंदीनी । वरुणाश्रमीं पैं आली ॥३६॥
वरुणें देखोनि उर्वशीसी । अत्यंत लावण्याची राशी ।
मदनें भ्रांत होवोनि ऋषी । तियेप्रती बोलता झाला ॥३७॥
अवो भद्रे चंद्रानने । मज पीडिलें थोर मदनें ।
तुवां मज आतां देणें । रति ये समयीं ॥३८॥
उर्वशी म्हणे वरुणाशी । मित्रें मज वरिलें परिसा ऋषी ।
तयासि सांडोनि तुम्हांपासीं । समतां नये मज स्वामी ॥३९॥

वसिष्ठरुपी वरुणाने कुंभांत आपले वीर्याचा निक्षेप केला :

मग वरुणें कुंभाप्रती । वीर्य निक्षेपिलें निश्चितीं ।
तूं येविषयीं चिंता चित्तीं । धरूं नको देवांगने ॥४०॥
ऐसें म्हणोनियां ऋषी । विचारिता झाला उर्वशीसी ।
वीर्य निक्षेपोनि घटीं तिसी । आज्ञा दिधली जावया ॥४१॥
तेथें प्रेमेंकरुन । झालें जें अमोघ रेतःस्खलन ।
तें कुंभीं भरुन ठेवून । गेली आपण उर्वशी ॥४२॥
अंगीं झाली भयभीत । शरीर खळचळां कांपत ।
मित्रापासीं येवोनि तेथ । नमस्कार करिती झाली ॥४३॥

उर्वशीला सूर्याचा शाप :

मित्र म्हणे उर्वशीसी । म्यां वरिलें असतां वरुणांपासीं ।
गेलीस केलें व्यभिचारासी । अति निंद्य कर्मातें ॥४४॥
तुवां निंद्य कर्म आचरोन । राहसी मजपासीं येवोन ।
पापिष्ठ तूं मानवीजनन । पावसील शीघ्रकाळें ॥४५॥
मानवी पुरूष तुजसीं रती । करील उर्वशी जाण निश्चितीं ।
बुधाचा पुरुरवा नंदन तयाप्रती । साच संग करशील ॥४६॥
कित्येक काळ काशिराजघरीं । गृहिणी विचरसी सुंदरी ।
ऐसी तूं मृत्युलोकामाझारी । किंचित दिवस राहसील ॥४७॥
एका जनार्दना शरण । वसिष्ठ उर्वशीआख्यान ।
पुढें गोड निरुपण । जनार्दन वदविता ॥४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
निमिनृपवसिष्ठशापोक्ति नाम पंचपंचाशत्तमोऽध्यायः ॥५५॥ ओंव्या ॥४८॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचावन्नावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचावन्नावा