संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पहिला

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पहिला

हनुमंताला स्त्रीराज्याला पाठविणे

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सद्‌गुरूमहिमा :

ॐ नमो सद् गुरो जनार्दना । जनीं वनीं समान परिपूर्णा ।
सच्चिदानंदा चिद्धना । सेव्य सज्जनां सुरवर्या ॥१॥
तूतें गुरूत्वें वंदूं जाता । तंव जनीं वनीं देखें तद्रूपता ।
कार्यकारणकर्तृत्वता । तेही तत्वतां न देखें ॥२॥
ऐसें निजस्वरूप अगाध । शंकले उपनिषदादि वेद ।
शेष श्रमला करिता वाद । शास्त्रानुवाद खुंटला ॥३॥
परादि वाचा चारी । शिणोनि थोकल्या दुरी ।
तेथें मंदमति नरीं । कवणे परी वर्णावें ॥ ४॥
तुझ्या स्वरूपा नाहीं अंत । अनंत म्हणतां मति भीत ।
द्वैतस्थानीं मुख्य अद्वैत । बोल बोलत सज्ञान ॥ ५॥
जैसें धर्म करितां जनीं । प्रतिष्ठेच्या पारडां बैसोनी ।
परलोक पावावा म्हणोनि । यागालागूनी प्रवर्तती ॥६॥
मुख बांधोनी मारितां पशु । अवदानीं संतृप्त हुताशु ।
त्यातेंही ठकवून मरेशु । नेत यागांशु निजबळें ॥७॥
यालागीं जी परात्परा । गुणातीता निर्विकारा ।
तुझ्या स्वरूपाच्या आकारा । न देखों विचारा शास्त्रमतें ॥८॥
तरुपासाव तरुची उपमा । काय कारण सांग आम्हां ।
हें वचन ऐकोनि म्हणे क्षमा । सज्जन हो तुम्हीं करावी ॥९॥

संतसज्जनांचे महत्त्व :

तुम्ही सुखार्णवाचे पार । ब्रह्मया राष्ट्रा आधार ।
ब्रह्मा ब्रह्म हे तुम्ही सधर । ब्रह्म हा उदार पैं तुमचा ॥१०॥
अमृतपान करिता सुरवर । तृप्त होवोनि देती ढेंकर ।
तेंवी देतसें सुखोद्गार । स्वरूप अपार तुमचें ॥११॥
तुमचेनि कृपावलोकनें । सुखस्वानंदीं बैसे ठाणें ।
परब्रह्मींचें भरिजे केणें । अक्षर नाणें स्वरूप जें ॥१२॥
स्वरूपासी तरूची उपमा घडे । ऐसें वदावया सामर्थ्य थोकडें ।
परी तुमचे कृपाउजियेडें । शब्द बोबडे बोलतसें ॥१३॥
तरूच्या ठायीं मूळ शाखा त्वचा जळ । तो विस्तार मायेचा सकळ ।
उखरीं भासे मृगजळ । तें सकळ सूर्यरश्मीचें ॥१४॥
जैसें वटबीज अणुप्रमाण । वृक्ष विस्तरला व्यापून गगन ।
तैसें ब्रह्म सूक्ष्म सान । ब्रह्म सनातन पैं असे ॥१५॥
धिटिव करितां तुम्हांप्रती । मी तरी केवळ मंगमती ।
जनका बाळभाषणीं प्रीती । म्हणोनि विनंती करीतसें ॥१६॥

श्रीगणेशवंदन , शारदा , सद् गुरू यांना वंदन :

शिवगणांमध्ये अग्रगण्य । जया नांव गजवदन ।
सद् गुरू विनायक नाहीं भिन्न । तथापि नमन तयासी ॥१७॥
मूषकवाहन एकदशन । शैलजामानसचंदन ।
उदर उरगें कवळून । विघ्ना निर्विघ्न करीतसे ॥१८॥
आतां वंदूं शारदा जननी । जीतें बोलती हंसवाहिनी ।
वीणापुस्तकधारिणी । सज्जनांलागूनी कृपाळू ॥१९॥
जिचिये कृपादृष्टीं होये । मूकही वाचेतें लाहे ।
पांगूळ पर्वत लंघिताहे । यदर्थी संदेश असेचिना ॥२०॥
आतां वंदिजे सद् गुरू । जो कां मेघापेक्षां उदरू ।
ज्याचेनि स्मरणे संसारू । स्वप्नीं साचारू दिसेना ॥२१॥
तयातें वर्णावया वाणी । वेदें मूग आरोगनी ।
शास्त्रें नेति नेति म्हणोनि । म्लानवदनीं परतलीं ॥२२॥

श्रीरामचरित्र ऐका :

आतां परिसा रामाचें चरित । वाल्मीक वदला अनागत ।
तेंचि देशभाषा प्राकृत । श्रोतीं चित्त पैं दीजे ॥२३॥
रजनीचर समस्त । प्रबळ झालें जी बहुत ।
त्यांच्या वधालागीं तेथ । विबुध विनवित विष्णूसी ॥२४॥
ऐक गा ये लक्ष्मीकांता । राक्षस करिती उत्पाता ।
त्यांचिया वधाची चिंता । युक्ति आतां विचारिजे ॥२५॥
मग बोले रमारमण । मी रविकुळीं अवतरेन ।
तुम्हीं व्हावें वानरगण । राक्षसदळण करावया ॥२६॥
ऐसा करोनिया विचार । तंव आठवलें पूर्व उत्तर ।
होईन कौसल्यकुमार । ऐसा निर्धार पैं केला ॥२७॥
मग उपजूनि सूर्यवंशी । ख्याति केली अतिशयेंसीं ।
तें सांगेन संकळितेंसीं । सावकाशीं अवधारा ॥२८॥
गुरूयाग सिद्धी नेला । ताटका सुबाहु मारिला ।
मारीच बाणपिच्छें उडविला । ब्रह्मतनयेचा केला उद्धार ॥२९॥
शिवचाप भंगिलें । जनकाचे मन निःसंदेह केलें ।
जानकीतें पर्णिलें । मानविलें भर्गवातें ॥३०॥
पुढें वनवास सेविला । त्रिशिरा खर दूषण मारिला ।
शूर्पणखे अपमान केला । मावेचा वधिला मृग तेथें ॥३१॥
जगज्जननी जनकनंदिनी । ते चोरिली राक्षसें येवोनी ।
तिचे शुद्धीलागीं बंधु दोनी । वनोपवना लंघिते झाले ॥३२॥
पुढें वायुपुत्र भेटला । तेणें सुग्रीव मित्र केला ।
मग बाणें एकें वाळी वधिला । राज्यीं स्थापिला सुग्रीव ॥३३॥
मग सीताशुद्धीलागीं वानर । पाठविला वायुकुमर ।
तेणें लंका जाळून सत्वर । राक्षसमार पैं केला ॥३४॥
अरिबंधु शरण आला । तयाचा अंगीकार केला ।
शिळीं सेतु बांधिला । मग पावला सुवेळागिरि ॥३५॥
शिष्टाई पाठविला वानर । लंकेश न मानीच उत्तर ।
मग कोपारूढ रघुवीर । काय विचार करिता झाला ॥३६॥
समस्त प्रधान मारले । इंद्रजितादि सुत संहारिले ।
कुंभकर्णासी नवटिलें । रावणा वधिलें कुळासहित ॥३७॥
राज्य दधिलें अरिबंधुसी । आपण निघाले अयोध्येसी ।
जानकीलक्ष्मणवानरेंसीं । पितृपुरीसी पावले ॥३८॥
भेटले बंधु भरतासी । सुखी केलें समस्तासीं ।
अयोध्याजन मानसीं । थोर उल्लास पावले॥३९॥
समस्तांचे मनीं होतें । वसिष्ठाचेनि अनुमतें ।
राज्य अंगिकारिलें रघुनाथें । धर्मस्थापनेतें करावया ॥४०॥
मग वानरं समस्तां आज्ञा झाली । बिभीषण सुग्रीवा बहुडावणी दिधली ।
मग हनुमंताप्रति मंजुळीं । बोले मैथिलीकांत तो ॥४१॥

श्रीरामकृत हनुमंत-प्रशंसा :

वायुपुत्रा तुझा उपकारू । मज श्रीरामा झाला थोरू ।
तो न फिटे साचरू । नानावतारू धरितांही ॥४२॥
तुझा आठवितां महिमा । मज श्रम होतसे श्रीरामा ।
तेथें इतरांची कायसी सीमा । अगा उत्तमा वायुपुत्रा ॥४३॥
वायुपुत्रा तुझी थोरी । उपमे वीर नाहीं धरित्री ।
विरंचिअंडामझारीं । तुळ्णे सरी न पवे ॥४४॥
ऐसा तूं गा अगाध । तुज मज नाहीं भेद ।
याही बोलाचा विषाद । वाटे सुबुद्ध माझे मनी ॥४५॥
तूं साक्षात् रुद्राचा अवतार । ब्रह्मादिकां न कळे पार ।
परी कांही तुज कार्यप्रकार । असे साचर सांगणें ॥४६॥
तंव हनुमंत म्हणे श्रीरामा । तुज सांगणे उरलें आह्मां ।
परी एक अपेक्षा पुरूषोत्तमा । असे ते महिमा सांगेन ॥४७॥

हनुमंताची इच्छा :

रघुनाथकथा श्रवणीं । रघुनाथनाम वदनीं ।
रघुनाथमूर्ति ध्यानीं । चित्त रघुनंदनीं असावें ॥४८॥
रघुनंदनीं असावें मन । रघुनंदनीं इंद्रियप्राण ।
रघुनाथ आत्मा होऊन । परीपूर्ण जाण असावें ॥४९॥
जेथें होईल श्रीरामकीर्तन । तेथें व्हावें माझें आगमन ।
हेंचि मागणें जाण । कृपा करून मज द्यावें ॥५०॥
ऐसा अंजनीगर्भरत्नें । राम प्रार्थिला मंजुळ – वचनें ।
पुढती म्हणे हिंचि देणें । कृपा करणें कृपाळुवा ॥५१॥
मग हांसोनि बोलिजे सीतारमणें । हें काय घेतलें तुझेनि मनें ।
आतां निजस्थाना जाणें । केलें पावणें अवश्य ॥५२॥

रामाज्ञेप्रमाणे मारूती आपल्या मूळ स्थानास
निघताच श्रीरामांनी त्याला निराळेच काम सांगितले :

मग हनुमंते अवसरीं । प्रदक्षिणा करोनि जोडल्या करीं ।
मस्तक ठेवूनि चरणांवरी । अति सत्वरीं निघाला ॥५३॥
परतोनि पाहे कपिवीर । तंव श्रीराम बोले उत्तर ।
एक आठवलें कार्य थोर । तें सादर अवधारीं ॥५४॥

रावणाची पूर्वकथा :

पूर्वी तया दशाननें । तप केले राज्याकारणें ।
मग शंकर प्रसन्नपणें । बोले वचन तयाप्रति ॥५५॥
माग माग रे ये समयीं । जे इच्छा असेल ते देईन पाहीं ।
ऐसे ऐकोनि ते समयीं । बोले लवलाहीं रावण ॥५६॥
प्रसन्न झालसी विश्वनाथा । तरी अक्षयी राज्य द्यावें तत्वतां ।
पुत्र बंधु सुहृद पूर्णता । इतुकें आतां मज देईं ॥५७॥
मरण न यावें विबुधांहातीं । आज्ञा वंदावी समस्तीं ।
सुवर्णाचें नगर वस्ती । द्यावें कृपामूर्ति कृपाळुवा ॥५८॥
ऐसें ऐकोनि राक्षसवचन । संतोषला उमारमण ।
हें तुज दिधलें संपूर्ण । परी मरण चुकेना ॥५९॥
शिरःकमळीं पूजिला चंद्रमौळी । म्हणोनि पावला दहा सिसाळीं ।
आश्चर्य नरीं भूमंडळीं । दुसरा बळी असेना ॥६०॥
सुरासि पुसे जगन्नाथा । माझा कोण प्राणहंता ।
तो सांगावा जी आतां । संदेह तत्वतां न धरावा ॥६१॥

रावण प्रारब्धमहिमा वर्णितो :

शरीरे असे प्रारब्धाधीन । सुखदुःख भोगी प्रारब्धेंकरून ।
ब्रह्मादिकां न सुटे जाण । प्रारब्ध बळवंत ॥६२॥
प्रारब्धें इंद्र भगांकित । प्रारब्धें अहल्ये जडत्व प्राप्त ।
प्रारब्धें शुक नग्नभूत । पृथ्वी हिंडत स्व इच्छा ॥६३॥
प्रारब्धें हरिश्चंद्रे सूर्यवंशी । दान दिधलें विश्वामित्रासी ।
तारामतीसहित आपणासी । तेणें डोंबासी विकिलें ॥६४॥
प्रारब्धें दमयंती नळा । तेणें भोगिली अवकळा ।
प्रारब्धें बळी भूपाळा । नेलें पाताळा वामनें ॥६५ ॥
प्रारब्धें श्रीवामनासी । खुजटपण परियेसीं ।
प्रारब्धें नीचत्व त्यासी । याची भूमीसी तीन पाउलें ॥६६॥
प्रारब्धाचा थोर आघात । सृष्टीकर्त्या न सोडीत ।
सरस्वतीसी देखोनि भ्रांत । प्राकृत तेथ कवणीकडे ॥६७॥
यालागीं शैलजानाथा । प्रारब्ध वळवंत समस्तां ।
त्या प्रारब्धाची महिमा वर्णितां । शेषाही सर्वथा न वर्णवे ॥६८॥
न कळे विष्णूचे अवतार । न कळे समुद्राचा पार ।
न कळे आकाशाचा विस्तार । न कळे ईश्वर महिमा ॥६९॥
न कळे शंभूचें तप । न कळे विष्णूचा प्रताप ।
न कळती योगीश्वर अमूप । कोण कोठें विचरती ॥७०॥
न कळे ध्रुवाची थोरी । न कळे पंडीताची चातुरी ।
न कळे हा काम वैरी । कोण अवसरीं उकील ॥७१॥
न कळे अहीचें थोरपण । न कळे मीनाचें चळण ।
न कळे विहंगम उड्डाण । स्थूल सान नेणवे ॥७२॥
न कळे स्त्रियेचें चित्त । न कळे कर्म बळवंत ।
न कळे ब्रह्मरेखालिखित । होत जात ललाटीचें ॥७३॥
न कळे श्रीरामाचा महिमा । न कळे हे हनुमंतप्रतापसीमा ।
न कळे नारद कोण्या कर्मा । घेवोनि वीणा हिंडतसे ॥७४॥
न कळे श्रीगुरू आनंदसागर । न कळे मेघ कृपण कीं उदार ।
न कळे शेषें भूमिभार । काय निमित्त घेतला ॥७५॥

शंकरांना रावण आपले मरण विचारतो :

यालागीं दयासागरा । मरण सांगा जी उदारा ।
तरीच मानेल वर निर्धारा । करुणाकरा कृपानिधे ॥७६॥
मग हांसोनियां बोले शूळपाणी । रावणा ऐक सत्यवचनीं ।
मरण पुससी मजलागूनी । तरी ऐक श्रवणीं लंकेशा ॥७७॥
वारणसीच्या उत्तरपारीं । अयोध्या नामें महानगरी ।
येथें अजाचिये उदरीं । होईल क्षत्री दशरथ ॥७८॥
त्यासी तिघी जाया प्रसिद्धा । ज्येष्ठ कौसल्या सद्विद्या ।
दुसरी सुमित्रा साधुवंद्या । कैकेयी अविद्या तिसरी ॥७९॥

दशरथकुलोत्पन्न श्रीरामांच्या हातून तुझे मरण आहे असे शंकर सांगतात :

ते कौसल्या उदरी श्रीराम । अवतरले पूर्णब्रह्म ।
सुमित्रे उदरीं शेष परम । पुरूषोत्तम जन्मले ॥८०॥
कैकेयी उदरीं भरत शत्रुघ्न । दोघे पुत्र सुलक्षण ।
चवघे कीर्तिवंत गहन । पुण्यवचन त्यांची कथा ॥८१॥
त्या रामहस्ते तुझा घात । होईल जाण निश्चित ।
हें ऐकोनि तटस्थ । चिंताक्रांत रावण ॥८२॥
ऐसा तो राक्षस संहारिला । सहपरिवारें निर्दळिला ।
सिद्धी झाली देवकार्याला । आनंदें भरिला सागर ॥८३॥

त्या स्त्रीराज्यात त्यांच्या संरक्षणासाठी जाण्याची मारूतीला रामांची आज्ञा :

तरी तुम्हीं आतां ऐकिजे । स्त्रीराज्यांत आपण जाईजे ।
तयाचें संगोपन कीजे । सावचित्ते बरवियापरी ॥८४॥
तेथें संचार न होऊं द्यावा पुरूषाचा । राज्यधर्म रक्षावा तयांचा ।
षण्मासांच्या अति भुभुःकाराच्या । गजरें पुरूषाचा गर्भपात ॥८५॥
ऐसें तेथें रक्षण असावें । कार्य पडलिया येथें यावें ।
येणें उत्तरें राघवें । हनुमान गौरवें आज्ञापिला ॥८६॥
यालागीं गा वायुसुता । कार्य असावें सादरता ।
षण्मासांअंतीं तत्वतां । भुभुःकारता तेथें द्यावी ॥८७॥
तया भुभुःकारेंकरून । सिद्धकार्य होईल जाण ।
ऐसा श्रीरामें वर देऊन । हनुमानालागून बहुडाविलें ॥८८॥

हनुमंतांचे गमन :

ऐसी आज्ञा केली सीतारमणें । ते शिरीं वंदिली वायुनंदनें ।
पुढे कथा वर्तली ते वचनें । सावधानें परिसावी ॥८९॥
अनागतभाष्य रामायण । वदला वाल्मीक आपण ।
संख्या शतकोटिप्रमाण । तें कथानुसंधान अवधारा ॥९०॥
वाल्मीक थोर उपकारी झाला । आपण तरोनि जन तारिला ।
रामनामाचा सुकाळ केला । जन लाविला मोक्षपंथें ॥९१॥
आपण तरोनि इतर तारी । तोचि धन्य संसारीं ।
तया वंदिजे सुरवरीं । स्वयें श्रीहरि संनिध ॥९२॥
एका जनार्दनाचे रंकाचें रंक । त्या बाळकाचे वाचे अच्यत देख ।
म्हणोनि गुरूमहिमा अधिक । तेणें निर्दोख पैं वाणी ॥९३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटुकायां
हनुमंतस्त्रीराज्यप्रेरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥ ओंव्या ॥९३॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पहिला भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पहिला भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पहिला भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पहिला