संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकतिसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकतिसावा

सुमाळीचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचे अमरावतीला आगमन :

निशी क्रमितां कैलासीं । रंभासंयोगें शाप रावणासी ।
देवोनि नलकुबरें त्यासी । पुढें कथा कैसी वर्तली ॥१॥
राक्षसें सांडोनि कैलास । ससैन्य सपुत्रबंधु स्वर्गास ।
चालिला मार्गी अमरपुरास । ठाकोनि आला ते वेळीं ॥२॥
येवोनि अमरपुरा बाहेरी । राक्षस गर्जना करिती थोरी ।
घोष ऐकोनि वृत्रारी । कंपायमान पैं झाला ॥३॥

इंद्राने चतुरंग सैन्य सिद्ध केले :

आला ऐकोनि रावण । इंद्र झाला चलितासन ।
बोले देवांप्रति आपण । सिद्ध सैन्य करा वेगीं ॥४॥
आदित्य बारा वसु आठ । अकरा रुद्र व्हावे एकवट ।
सिद्ध विश्वदेव मरुग्दण सगट । करा उद्धट युद्धातें ॥५॥
सन्नद्ध करा सैन्यसंपत्ती । आजि युद्धीं जिंतों पौलस्ती ।
इंद्रवचन मानोनि समस्तीं । युद्धलागीं सिद्ध झाले ॥६॥
वरदबळें न जिंके रावण । जो कां प्रतापें महेंद्रसमान ।
जेणें पृथ्वीतळ अवघें जिंकोन । स्वर्ग घ्यावयालागून पैं आला ॥७॥

इंद्राची विष्णूंना प्रार्थना :

ऐसें इंद्रे मनीं विचारुन । आपणासी न पुरवे रणांगण ।
धांवत विष्णूपासीं आला जाण । सकळ वर्तमान सांगितलें ॥८॥
इंद्र म्हणे विष्णूसी । काय करुं अमरपुरीसी ।
वेढोनि सकळ राक्षसीं । युद्ध रावण पैं आला ॥९॥
सैन्य शस्त्रें वरदेंकरुन । अति बळिष्ठ दाशानन ।
तो न जिंतवे आम्हां दुःख दारुण । ओढावलें जी स्वामिया ॥१०॥
तूं आपुलें वचन सत्य करीं । पूर्वी मारिले नाना वैरी ।
नमुचि वृत्र बळी नरकेसरी । तुंवा मारिला हरिण्यकशिपु ॥११॥
हे समस्तही तुवां वधिले । तैसे पाहिजे रावणा केलें ।
हा अन्यत्र न मरे तुजवेगळे । मरण नाहीं रावणा ॥१२॥
तुजवेगळा नारायणा । मृत्यु नाहीं या रावणा ।
तरी सत्य करा आपुलिया वचना । मी तरी दीन पैं तुझे ॥१३॥

इंद्राला विष्णूचे आश्वासन :

ऐकोनि इंद्राचें वचन । विष्णू झाला सुखसंपन्न ।
म्हणे सुरपति सावधान । वचन प्रमाण मानीं माझें ॥१४॥
वरदबळें दशशिरें । जिंतिलीं देवदैत्यांचीं पुरें ।
यासि निघतां रणीं म्यां त्वरें । मारिलें पाहिजे या काळीं ॥१५॥
हा बळियाढा लंकानाथा । शिववरदें झाला उन्मत्त ।
यासि मारीन न लागतां क्षणांत । समयोचित पैं नव्हे ॥१६॥
जरी करीन मी याचें हनन । तरी हा काळ नव्हे जाण ।
ब्रह्मवचना लागे दूषण । संत सज्जन अनुचित म्हणती ॥१७॥
यथाकाळीं पौलस्त्यासी । मारीन इंद्रा सहसंपत्तीसीं ।
संतोषवीन सुरवरांसीं । भार पृथ्वीचा फेडीन ॥१८॥
सबंधु सपुत्र दशानन । मारीन पुढें यथाकाळीं जाण ।
इतुकें विष्णू बोले तंव राक्षसगण । युद्धालागून प्रवर्तले ॥१९॥

देव-राक्षसांचे युद्ध :

चहूंकडे धांवती राक्षस । आनेआन करिती बहुवस ।
तंव अमरराजसैन्य कर्कश । हाणिती शस्त्रें परस्परें ॥२०॥
देव आणि राक्षसगण । मिसळलें संग्रामा दारुण ।
करिते झाले तेणें गगन । बाणेकरोन भरियेलें ॥२१॥
राक्षासांमाजी बळियाढे वीर । देवांमध्ये परम शूर ।
करिते झाले घोरांदर । नाना शस्त्रें प्रेरुनी ॥२२॥
रावणाचे आज्ञेवरुन । राक्षस धांवले कोण कोण ।
ऐका तयांची नामाभिधानें । संकळित मार्गे सांगतसें ॥२३॥
मारीच प्रहस्त महोदर । महापार्श्व अकंपन निकुंभ वीर ।
शुक सारण त्रिशरा खर । सुहृद धूमकेत नांवाचे ॥२४॥
महादंष्ट्र महामुख । जंबुमाळी विरुपाक्ष देख ।
शतघ्न यज्ञकोप दुर्मुख । दूषण करवीर सूर्यशत्रु ॥२५॥
महाकाय अतिकाय देवांतक । सुमाळी आणि नरांतक ।
सकळ राक्षस होवोनी एक । नाना शस्त्रें देख प्रेरिती ॥२६॥
देव दैत्य एकवटले । परस्परें युद्धा प्रवर्तले ।
शस्त्रास्त्रें वर्षते झाले । ऐकमेकां लक्षोनी ॥२७॥

सुमाळीने केलेला देवसैन्याचा संहार
पाहून अष्टवसूंनी त्याच्याशी युद्ध आरंभिले :

तयाउपरी सुमाळी राक्षस । क्रोधा चढला बहुवस ।
संग्राम करितां देवां त्रास । अत्यंत तेणें दिधला ॥२८॥
अमरसैन्य भंगा गेलें । त्रासोनिया पळतें झालें ।
तें अष्टवसूंनीं देखिलें । आश्वासिलें वीरांसी ॥२९॥
पळूं नका रहा स्थिर । रणभूमीस धरा धीर ।
मज कोपलिया कोण वीर । समरांगणीं राहेल ॥३०॥
ऐसें सवित्रवसु बोलिला । पळतयां वीरां नाभिकार दिधला ।
समरांगणीं उभा ठेला । नाना शस्त्रें प्रेरित ॥३१॥
शस्त्रांवरी शस्त्रें वर्षत । बाणांवरी बाण सोडित ।
वैरसैन्य त्रासोनि तेथ । पळतें झालें चहूंकडे ॥३२॥
क्षुद्रां मृगां पंचानन । विभांडी आपुले पराक्रमें करुन ।
तैसें सवित्रवसूनें राक्षससैन्य । समरांगणीं मारिलें ॥३३॥
राक्षससैन्य पावलें त्रास । देखोनि सुमाळी राक्षस ।
पुढे झाला रुद्रावेश । दंत दाढा रगडीत ॥३४॥

सवित्रवसु व सुमाळी यांचे द्वंद्वयुद्ध :

सुमाळी सवित्रवसु रणांगणीं । बाण सोडिती ऐकमेकां लक्षोनी ।
एक्मेकांचे वर्म भेदोनी । हाणिताती परस्परें ॥३५॥
तदनंतर दोघे जण । संग्राम करिती दारुण ।
दोघे वीर बळसंपन्न । पराक्रम गहन दोघांचा ॥३६॥
वसुवीर बळियाढा । चढवोनियां धनुष्य मेढा ।
बाणशतक लाविलें तेणें धडाडा । सारथि रथ भंगिला ॥३७॥
न लागता अर्ध क्षण । सारथि रथ झाला चूर्ण ।
कित्येक राक्षस गतप्राण । शरजाळें पैं झाले ॥३८॥
ऐसी वसूनें करोनि ख्याती । मग सुमाळी वधावयाचे अर्थी ।
गदा घेतली रविनिशा पती । काळिमा पावती कोळसे जैसे ॥३९॥
करीं धरोनि गदा जाण । कठिण काळ दंडासमान ।
लागतां भूगोळ झाला भग्न । तेज दारुण पैं जिचें ॥४०॥

सुमाळीचा वध :

ते गदा तुळोनि निजकरीं । टाकिली सुमाळिमस्तकावरी ।
शिर तुटोनियां अंबरीं । उसळलें ते काळीं ॥४१॥
चंद्रसूर्य चिंतातुर मनीं । म्हणती नाहीं आजि पर्वणी ।
राहु येतो आम्हांलागूनी । भक्षावया अकाळीं ॥४२॥
शिर पडोनि धरणीवरी । गदा बैसोनि रक्तप्राशन करी ।
शोभती झाली जैसी अंबरीं । विद्युल्लता प्रभेकरीं ॥४३॥
सुमाळीचा वध झाला । सुरसमुदाय जय पावला ।
राक्षसांसी पळ सुटला । धीर न धरवे ते काळीं ॥४४॥
जैसें कां तडागींचें जळ । फुटल्या धावें अति चंचळ ।
तैसें त्या राक्षसांचे दळ । भयेंकरोनि पळालें ॥४५॥
सुमाळी रणीं पडिला । अस्थिमांसाचा ठाव पुसिला ।
कीं भूतगणीं भक्षिला । हें न कळे ते वेळीं ॥४६॥
ऐकतां हरिनामाचा ध्वनी । पातकें पळतीं दिशा लंघूनी ।
तैसे ते राक्षस समरांगणीं । धीर न धरितां पळाले ॥४७॥
एका जनार्दना शरण । पुढें मेघनादा शक्रा युद्ध दारूण ।
होईल तें सज्जनीं सावधान । श्रवण केलें पाहिजे ॥४८॥
सुरस कथा रामायणी । वदली वाल्मीकाचि वाणी ।
अक्षरें महादोषां खंडणी । पवित्र अवनीं पैं करी ॥४९॥
स्वस्ति श्रीभावार्थ रामायणॆ उत्तराकांडे एकाकारटीकायां
सुमालिवधो नाम एकत्रिशो॓ऽध्यायः ॥३१॥ ओव्यां ॥४९॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकतिसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकतिसावा