संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकूणपन्नासावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकूणपन्नासावा

सीता व वाल्मीकी भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऋषिपुत्रांकडून सीता दृष्टीस पडल्याची वाल्मीकींना वार्ता कळते :

सीता वनीं हिंडतां ऐकली । शोक करितीं ऋषिपुत्रीं देखिली ।
ते समस्त येवोनि वाल्मीकाजवळी । नमस्कार करिते पैं झाले ॥१॥
ते समस्तही मधुरवचनीं । अहो जी ब्रह्मात्मजशिष्या वाल्मीकमुनी ।
अपूर्व एक देखिलें नयनीं । एक स्त्री रुदन करितसे ॥२॥
रुपें तरी मन्मथजननी । सुंदर सुकुमार दीर्घस्वनीं ।
रुदन करितसे वनीं । अभिप्राय मुनि न कळे तिचा ॥३॥

नैव देवी न गंधर्वी नासुरी नच किन्नरी ॥
एवं रुपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥१॥

नव्हे देवांची देवता । नव्हे गंधर्वांची कांता ।
नव्हे असुरांची वनिता । किन्नरयोषिता ते नव्हे ॥४॥
नव्हे जळींची जळदेवता । नव्हे ऋषींची ऋषिकांता ।
ऐसिया रुपाची देखिली योषिता । महीतळामाझारी ॥५॥
तरी स्वामी आपुले नयनीं । पहावी तेथवरी कष्टोनी ।
तिचा अभिप्राय देखतां मुनी । सर्वथा कळेल तुम्हांसी ॥६॥
गंगातीरीं करी रुदन । जैसी अनाथ कोणी नाहीं दीन ।
तियेची काकुळती न देखवे म्हणोन । कृपाळुवा तुम्हां श्रुत केलें ॥७॥
शोका योग्य नव्हे ते सती । परी बहुत दुःखें करी ग्लांती ।
यालागीं स्वामींनी शीघ्रगती । तीतें दृष्टीं पहावें ॥८॥
तिचें करावें पूजन । तरी तुम्हां अयोग्य अगणिक पुण्य ।
त्याहीवरी तुम्ही धर्मपरायण । मानेल तैसें करावें ॥९॥
तुमच्या निकट ना दुरी । रुदन करितसे सुंदरी ।
मज तारिता नाही म्हणोनि शरीरीं । अत्यंत दुःख करितसे ॥१०॥
तुम्हांसि आली शरणागत । हें स्वामींनीं जाणिजे निश्चित ।
ऐसें ऐकोनि तयांसी वदत । धर्मनीति जाणता ऋषि ॥११॥

सीता होती तेथे वाल्मीकी आले, तिचे सांत्वन :

तो जो वाल्मीक महाऋषी । तपस्तेजें तपोराशी ।
जेथें मैथिली होती त्या प्रदेशीं । पूजा घेवोनि पैं आला ॥१२॥
सवें ऋषी शिष्यपरिवारित । घेऊन वाल्मीक धांवत ।
जेथें जानकी होती तेथ । शिष्यांसहित पैं आला ॥१३॥
देखिली सीता तत्क्षणीं । म्हणे होय हे राघवपत्नी ।
कैसी जानकी देखिली नयनीं । तें सावधान अवधारा ॥१४॥
जैसी वणव्यानें आहाळली वल्ली । कीं जीवनेंवीण धान्यें करपलीं ।
कीं जळावेगळी मासोळी । तैसी तळमळी पैं सीता ॥१५॥
ऐसें देखोनि सीतेसी । मधुरवचनीं वाल्मीक महऋषी ।
म्हणे माते तूं श्रीरामाची जाया होसी । अजात्मजाची ज्येष्ठ सून तूं ॥१६॥
मिथिलाभूमीचा जनक राजा । तयाची सत्य तूं आत्मजा ।
या पतिव्रतांहूनि तुझा । धर्म आगळ धरणिजे ॥१७॥
तूं आलीस ज्या कार्यालागूनी । तें मज कळलें जाण मनीं ।
त्रैलोक्यीं वर्ततें तें तपेकरुनी । मज ठाऊकें असे सीते ॥१८॥
तूं निष्पाप पतिव्रते । ऐसें ठाऊकें आहे मातें ।
आतां माझिया पूजेतें । दुःख सांडोनी अंगीकारीं ॥१९॥

वाल्मीकींकडून सीतेला आश्रमांत आश्रय :

जैसी आपुले गृहीं वससी । तैसेचि राहे माझे आश्रमसन्निधीसीं ।
मग पूजोनियां ऋषीं । स्वाश्रमासी सीता नेली ॥२०॥
मग तो वाल्मीक महामुनी । त्यासवें सीता देखोनी ।
ऋषिपत्न्या आणि तपस्विनी । सामो-या येत्या पैं झाल्या ॥२१॥
ऋषि सीतेसहित आला देखोन । मुनिपत्न्यांही करुनि नमन ।
म्हणती स्वामी आलेती सीता घेवोन । थोर सुख आम्हा झालें ॥२२॥
हें सुदर चांफेगोरटी । दुःख करिता श्रमली मोठी ।
सवेंचि वाल्मीक जगजेठी । बोलतसे ऋषिपत्न्यांसी ॥२३॥
हे सीता म्हणाल कोण । वना यावया काय कारण ।
भ्रतारें कां सांडिली अवगुण । काय इचा देखिला ॥२४॥

ऋषिस्त्रियांना सीतेची कथा सांगितली :

तरी सावकाश करोन चित्त । ऐका धरणिजेचा वृत्तांत ।
इचा भ्रतार श्रीरघुनाथ । जेणें रावणांत समूळ केला ॥२५॥
हे राया दशरथाची सून । जनक विदेहाचें कन्यारत्न ।
निष्पाप पतिव्रता जाण । काहीं कार्य लक्षोन वना आली ॥२६॥
तें कोण कार्य म्हणाल चित्तीं । तरी मी सांगतों तुम्हांप्रती ।
पुढील भविष्य जाणोनि सत्यार्थीं । करावया हे आली ॥२७॥
इचेनि माझें वचन सत्य । इचेनि माझे तप सफळित ।
इणें मज करोनि अनुग्रह येथ । वनवासासी पैं आली ॥२८॥
हें मिथ्या वाटे लोकांप्रती । हे आदिमाया चिच्छक्ती ।
इचा महिमा नेणती । ब्रह्मा आदि करोनी ॥२९॥
इसीं तुम्ही स्नेह करुन । आपल्या समीप राहवून ।
क्षणक्षणां इचें समाधान । ब्रह्मत्वें पूर्ण करावें ॥३०॥
गौरवोनि मुनिपत्न्यांसी । मग तो वाल्मीक महाऋषी ।
शिष्यांसहित निजाश्रमासी । अति संतोषीं पैं आला ॥३१॥
पुढील कथानुसंधान । लक्ष्मण करितां अयोध्यागमन ।
कथा रम्य रामायण । समूळ तोडी भवबंधन । करितां श्रवण एकचित्तें ॥३३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सीतावाल्मीकदर्शनं नाम नवचत्वारिंशोऽध्यायः ॥४९॥
ओंव्या ॥३३॥ श्लोक ॥१॥ एवं ॥३४॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकूणपन्नासावा