संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकावन्नावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकावन्नावा

लक्ष्मण-सुमंत-संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

तदनंतर सारथि सुमंत । सौमित्राप्रति ऋषिभाषित ।
सांगता झाला आनंदित । जें ऐकिलें पूर्वी होतें ॥१॥

दुर्वासांचे दशरथाकडे आगमन :

पूर्वी दुर्वास महाऋषी । अत्रिपुत्र अनसूयेच्या कुसीं ।
जन्म पावला तपःसामर्थ्येसीं । तो दशरथभेटीसी अयोध्ये आला ॥२॥
राजा वसिष्ठ सामोरे गेले । अति सन्मानें दुर्वासा आणिलें ।
अर्घ्यपाद्यादिकीं पूजन केलें । भोजन झालें तयावरी ॥३॥
वसिष्ठाचा आश्रम पुनीत । तेथें ऋषी वसावयार्थ ।
ठाव दिधला हर्षयुक्त । मुनींसमीप राहविला ॥४॥
जो दुर्वास महामुनी । तापसांमाजि शिरोमणी ।
जयाच्या शापें शाड्.र्गपाणी । निजस्त्रियेसीं दुरावला ॥५॥
ऐसा तो दुर्वास ऋषी । वसिष्ठाश्रमीं एक वर्षीं ।
राहिला असतां दशरथ सूर्यवंशी । वसिष्ठगृहासि पैं आला ॥६॥
श्रीगुरूसी नमस्कार केला । सवेचि दुर्वास वंदिला ।
दशरथ म्हणे दयाळा । कथा एकी सांगिजे ॥७॥

राजाच्या प्रश्नावरुन दुर्वासांनी श्रीराम-सीता विरहाचे कारण सांगितले :

माझीं जीं पुत्रसंतानें । तयांची सांगावीं लक्षणें ।
तयांचे आयुष्य तेजें गहनें । ते वर्तमान सांगावें ॥८॥
मध्यान्हीं गेला आदित्य । ते समयीं कोणी नाहीं तेथ ।
वसिष्ठ दुर्वास दशरथ । चवथा तेथ मी सारथि ॥९॥
अत्रिपुत्र महाऋषी । ऐकोनी दशरथवचनासी ।
होवोनियां अतिसंतोषी । कथा एक सांगतसे ॥ १०॥
दुर्वास म्हणे भूपाळा । प्रौढा प्रबुद्धा धर्मशीळा ।
ऐक इतिहास तुज प्रांजळा । ये काळीं मी सांगेन ॥११॥
पूर्वी देवां दैत्यां युद्धकाळीं । असुरांसीं युद्ध करितां वनमाळी ।
दैत्य पळाले भृगुआश्रमाजवळी । पुलोमेनें पाठीं घातले ॥१२॥
पुलोमेनें दैत्य पाठीसी घातले । हे श्रीविष्णूसी कळलें ।
करी चक्र घेवोनि मारिलें । पुलोमेसी ते काळीं ॥१३॥
शिर तुटोनि पडिलें भूमीसी । सवेंचि आश्रमा आला ऋषी ।
म्हणे कोणें माझिया स्त्रियासी । आश्रमासीं मारिलें ॥१४॥

भृगूचा विष्णूंना शाप :

ऐसें अकृत्य गेला करुन । तो मनुष्यलोकीं जन्मेल जाण ।
ऐसा शाप ऋषि देवोन । मग ध्यानस्त पैं झाला ॥१५॥
ध्यानीं आव्हानूनी मूर्ती । तिणें सांगितलें तुझी सती ।
विष्णूनें मारिली निश्चितीं । चक्रेकरोनि ऋषिवर्या ॥१६॥
हरीनें स्त्रियेसी मारिलें । ऐसें ऋषीलागोनि कळलें ।
पुनरपि शाप तया काळें । मागुता दुसरा पैं दिधला ॥१७॥
माझे स्त्रियेतें मज विघडलें । तोही ऐसेंच पावेल कोणे काळें ।
ऐसें ऋषीच्या मुखे निघालें । वचन ते काळीं ॥१८॥
सवेंचि ऋषि धर्मपरायण । म्हणे मी शाप वदलों तप वेंचून ।
तरी आतां करुं विष्णूपूजन । जेणें भगवान संतोषे ॥१९॥
षोडशोपचारीं करोनि पूजा । ऋषि म्हणे जी गरुडध्वजा ।
थोर अन्याय झाला माझा । जें तुज म्यां शापिलें ॥२०॥
हरि म्हणे भविष्य प्रमाण । तें ऋषिवर्या न चुके जाण ।
यालागीं खेदें खिन्न आपण । न व्हावें जी कोणेविशीं ॥२१॥

दुर्वासांनी श्रीरामाचे भविष्य सांगितले :

दुर्वास म्हणे राया दशरथा । ऐसी हे असे पूर्वकथा ।
तो विष्णु तुझा पुत्र होवोनि तत्वतां । श्रीरामरुपें अवतरला ॥२२॥
तो श्रीलक्ष्मीनारयण । घेतलें श्रीरामाचें नामाभिधान ।
पाठीचा शेष तो लक्ष्मण । भरत शत्रुघ्न तदंश ॥२३॥
गहा सहस्त्र वर्षेवरी । राज्य करील अयोध्यानगरीं ।
तयाची भार्या रावण वैरी । दंडकारण्य़ी हरील ॥२४॥
पुनरपि वना जाईल । दोघा पुत्रां जन्मवील ।
अयोध्येचें राज्य करील । सत्य जाण राजेंद्रा ॥२५॥
ऐसें तुझ्या पुत्राचें कथन । दशरथा होईल सत्य जाण ।
कोणा न सांगावें हें वचन । हृदयीं गुप्त राखावें ॥२६॥
ऐसी सौमित्रा पूर्वकथा । ऋषिमुखीं ऐकिली तत्वतां ।
ते निरुपली तुज आतां । शोकशमनाकारणें ॥२७॥
ऐसें हे पूर्वकथन । सारथियामुखें ऐकोन ।
शोक सोडोनि लक्ष्मण । मार्ग क्रमिता पैं झाला ॥२८॥
तंव सूर्य गेला अस्तमानीं । प्राप्त झालीसे रजनी ।
केशिन्या नामें नगरीसि येऊनी । वस्तीसी तेथें राहिले ॥२९॥
केशिन्येसि क्रमोनि रजनी । प्रभात होतांच दोघे जणीं ।
रथारुढ होवोनी । अयोध्याभवनीं प्रवेशले ॥३०॥
एका विनवी जनार्दना । पुढील गोड निरुपणा ।
संवाद होईल श्रीराम लक्ष्मणां । तो सावध श्रोतीं ऐकिजे ॥३१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणसारथिसंवादो नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥ ओंव्या ॥३१॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकावन्नावा