भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय दहावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय दहावा

रावणाला ब्रह्मदेवाचे वरदान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांचा प्रश्न :

तदनंतरें अयोध्यापती । ऐकोनि रावणकुंभकर्ण उत्पत्ती ।
अत्यंत सुखावोनि चित्तीं । मुनीप्रती पुसता झाला ॥१॥
ऐकें स्वामी अगस्तिमुनी । तुवां समुद्र प्राशिला आचमनीं ।
दंडकारण्य वसे तुझेनी । विंध्याद्रि धरणी निजविला ॥२॥
वातापी इल्वल महाराक्षस । मारोनि ऋषी केलें ससंतोष ।
ऐसे तुझे उपकार बहुवस । तूं महापुरूष ईश्वरु ॥३॥
कृपा करोनि मज दीनावरी । कथा सांगावी पुढारीं ।
गोकर्णाश्रमीं रावण घटश्रोत्री । काय करिते पैं झाले ॥४॥
कोण तप तयांचे फळलें । काय नेम करिते झाले ।
कोण व्रत आचरले । कैसेनि पावले ऐश्वर्या ॥५॥
आधींच कथा रामायण । त्यावरी तुमच्या मुखें निरुपण ।
आजि शवणाचें भाग्य गहन । धणीवरी पान करीन मी ॥६॥
विबुधजितजनकारीचें वचन । ऐकोनि अगस्ती संतोषोन ।
वाक्पुष्पमाळा गुंफोन । रामार्पण करिता झाला ॥७॥

रामप्राप्तीसाठी साधना करणार्‍यांचे प्रकार :

श्रीराघवा तूं अवधारीं । जयालागीं गिरिकंदरीं |
वसते झाले जटाशिरी । फळाहारी होवोनियां ॥८॥
एक झाले बोडके । ढुंगी लावोनि फडकें ।
तीर्थें हिंडती अनेकें । भिक्षान्नें खावोनियां ॥९॥
एक मुखीं लाविनि कोळसा । वेष घेती अनारिसा ।
एक नग्न पिशाचदशा । हिंडती पुरीं पाटणीं ॥१०॥
एकीं आश्रम त्यागोन । सेविलेंसे महावन ।
एक पंचाग्नि धूम्रपान । जळशयन एक करिती ॥११॥
एक कान फाडोनि मुद्रा ल्याले । आलेख म्हणोनि हिंडो लागले ।
लक्ष नेणती चुकले । भिके लाविले प्रारब्धें ॥१२॥
एक मस्तक लुंचिती । चालतां क्षिती झाडिती ।
झाडावरी बैसोनि देहकर्म करिती । देहातें देव म्हणोनी ॥१३॥
ऐसीं अनेक मतांतरें । धुंडाळिते झाले नर ।
परंतु न कळेचि तुझा पार । न पावती ते कदाकाळें ॥१४॥
तरी अवधारीं राजेंद्रा । इंद्राच्या आदिइंद्रा ।
क्षयो आहे इंद्राचंद्रा । तूं नरेंद्रा अक्षयी ॥१५॥
तो तूं धरणिजेचा पती । अवतरलासि नानाव्यक्ती ।
ऐसा तूं आम्हां मुढाप्रतीं । नाना कथा पुसतोसि ॥१६॥
तिघे बंधु गोकर्णाप्रती । येवोनि काय करिते झाले स्थिती ।
ते कथा अवधारिजे श्रोतीं । सावधान चित्तीं होवोनी ॥१७॥

कुंभकर्णाची घोर तपश्चर्या :

कुंभकर्ण नित्य नेमस्त । अल्पआहार एकाग्रचित्त ।
इंद्रियां दमूनि वैराग्ययुक्त । परियेसा तप करीतसे ॥१८॥
उष्णकाळीं पंचाग्नि जाण । वर्षाकाळीं मस्तकीं घे पर्जन्य ।
शीतकाळीं जळआश्रय । तप दारुण करीतसे ॥१९॥
बाणांवरी घालोनि आसन । तप करीतसे दारुण ।
ऐसीं दहा सहस्त्र वर्षे क्रमण । केलीं जाण श्रीरामा ॥२०॥

बिभीषणाची उत्कट तपस्या :

स्वधर्मकर्मीं रत । सर्व भूतीं दया शुचिष्मंत ।
ऐसा बिभीषण पुण्य पवित्र । धर्मपरायण परोपकारी ॥२१॥
परोपकाराएवढें तप । नाहीं श्रीरामा निश्चित ।
जे परावियातें पीडा करित । पाप अद्भुत अंत नाहीं ॥२२॥
ऐसा बिभीषण पुण्यमूर्ती । पाच सहस्त्र वर्षे तपःस्थिती ।
एका पायावरी निगुतीं । श्रीरघुपति क्रमियेलें ॥२३॥
तप देखोनि दारुण । स्वर्गी देवा भयाचें भान ।
तेथें अप्सरा येवोन । नृत्य करित्या पैं झाल्या ॥२४॥
बिभीषणाची तपःस्थिती । देखोनि देव पुष्पें वर्षती ।
तदनंतरें सूर्य उपस्थिती । करी सुमति राक्षस ॥२५॥
उर्ध्वशिर ऊर्ध्वकर । नयन ऊर्ध्व अवलोकी भास्कर ।
मुखें सूर्यसुक्त जपे वीर । ऐसीं पांच सहस्त्र वर्षे क्रमलीं ॥२६॥
एवं दहा सहस्त्रवरी । बिभीषणतपाची अगाध थोरी ।
तदनंतरें श्रीरामा तुझा वैरी । त्याच्या थोरी तूं ऐकें ॥२७॥

रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रगटला :

दहा सहस्त्र वर्षेंपर्यंत । निराहारी तप करित ।
एक सहस्त्र वर्षें होतां तेथ । अग्नींत होमित शिर एक ॥२८॥
ऐसीं नव सहस्त्र वर्षे क्रमिलीं । नव शिरें अग्नींत हविलिं ।
एक शिर उरलें मौळीं । दहावें सहस्त्र पवर्तलें ॥२९॥
तेंही शिर छेदीन । वैश्वानर तृप्त करीन ।
ऐसें वैवंची रावण । तंव चतुरानन तेथें आला ॥३०॥
इंद्रादि देवांसहित । पितामह आला तेथ ।
म्हणे रावणा तुझें तप अद् भुत । मज संतोष पैं झाला ॥३१॥
तुझिया तपाची थोरी । न वर्णवे वाचेकरीं ।
तुज प्रसन्न झालों झडकरी । माग इच्छा तें देईन ॥३२॥
पितामहाचें ऐकोनि वचन । दोह्नी कर जोडोनि रावण ।
करिता झाला साष्टांग नमन । मधुर वचन बोलिला ॥३३॥

भगवन्प्राणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्भयम् ।
नास्ति मृत्युसमः शत्रुरमरत्वमहं वृणे ॥१॥
सुपर्णयक्षनागानां दैत्यदानवरक्षाम् ।
अवधोऽहं प्रजाध्यक्षो देवतानां च शाश्वतम् ॥२॥
तृणभूता हि ते मन्ये प्राणिनो मानुषादयः ॥३॥

रावणाची अमरत्वाची मागणी :

रावण म्हणे गा प्रजापती । तुम्हांप्रति करितों विनंती ।
मरणभयाहूनि निश्चितीं । प्राणिया भय असेना ॥३४॥
मृत्युसारिखा दुसरा वैरी । आन नाहीं ये संसारीं ।
मृत्यु प्राणियां संहारी । मृत्युनें केलें देवाचें न चले ॥३५॥
बाल्य तारुण्य वयसा । मृत्यु करी आयुष्य-हासा ।
जनातें बांधी मरणफांसा । मृत्युचा सहसा न कळे महिमा ॥३६॥
जरी प्रसन्न झलेति देवा । अमरत्व मज वर द्यावा ।
सुपर्ण नाग दैत्य दानवा । यांचेनि मृत्यु मज न हो ॥३७॥
निशाचरांचेनि हातें । मज मरण न यावें निश्चितें ।
आणिकें देवदैवतें । तींही मातें न मारोत जी ॥३८॥
देवांचेनि हातेंकरीं । माझा मृत्यु न व्हाव अवधारीं ।
मनुष्य म्हज तृणासरी । गणना न करीं तयांची ॥३९॥
मानवें तृणासमान । तीं माझे दृष्टीसी मधकें दीन ।
तयांचें भय नाहीं जाण । अमर आपण मज कीजे ॥४०॥
मनुष्यादिकरोनि भूतें । नाणीं मी दृष्टीस त्यातें ।
त्या मनुष्यांची चिंता नाहीं मातें । जाण निश्चितें प्रजापति ॥४१॥
जरी प्रसन्न झालासी मजवरी । अमर होई ऐसी कृपा करीं ।
ब्रह्मा म्हणे होईल निर्धारीं । चिंतिलें पावशील रावणा ॥४२॥

ब्रह्मदेवाने रावणाला अमरत्व देऊन त्याची सर्व शिरे त्याला दिली :

इतुकियांचें हातें तत्वतां । मरण तुज नव्हें लंकानाथा ।
सत्य मानीं मम वाक्यार्था । अमर तत्वतां तुज केलें ॥४३॥
अगस्ति म्हणे श्रीरघुनाथ । प्रजापतीनें विंदाण करुनि तत्वतां ।
वर दिधला लंकानाथा । भविष्यता जाणोनि ॥४४॥
पुनरपि बोले प्रजापती । ऐक ये गा लंकापती ।
तुवां शिरें हविलिं अग्नीप्रती । ती मागुतीं तुज दिधलीं ॥४५॥
पूर्विल्यापरी राक्षसास । सुंदरता बाणली बहुवस ।
तदनंतर बिभीषणास । बोलता झाला चतुरानन ॥४६॥
बिभीषणा तूं धन्य सुमती । बिभीषणा तुझी अगाध कीर्ती ।
बिभीषणा तुझी शुद्ध तपःस्थिती । अत्यंत चित्तीं सुखावलों ॥४७॥
बिभीषण तुझें निष्काम तप । बिभीषणा तुझा धन्य जप ।
बिभीषणा तूं निर्विकल्प । सुख अमूप मज झालें ॥४८॥

बिभीषणाला वरप्रदानाची इच्छा :

जो वर मागसी ये समयीं । तो मी देईन जाण निश्चयीं ।
बिभीषणें मस्तक ठेविला पायीं । काय तें समयीं बोलत ॥४९॥
सकळ गुणीं संपन्न । ऐसा बिभीषण धर्मज्ञ ।
मृदु मंजुळ वाचेकरुन । चतुरानन प्रार्थिला ॥५०॥
प्रजाध्यक्ष प्रजापती । सकळ देव तुज आश्रयिती ।
परी एक माझी विनंती । सावित्रीपति ऐकिजे ॥५१॥
आजि आपण धन्य धन्य । आजि फळलें सकळ पुण्य ।
जो त्रैलोक्यगुरू चतुरानन । स्वयें आपण वर देतो ॥५२॥
संतोषोनि प्रजापती । जरी वर देतोसि मजप्रती ।
तरी मागणें सुनिश्चितीं । समाधानवृत्ती अवधारीं ॥५३॥

बिभीषणाचे मागणे :

मज राज्याची चाड नाहीं । ऐश्वर्य मज न लगे पाहीं ।
मज साधुसमागम देईं । आणिक नाहीं मज इच्छा ॥५४॥
अखंड माझी चित्तवृत्ती । लागो संतांचे संगतीं ।
आणीक मजला भगवद्भक्ती । कृपामूर्ति देईजे ॥५५॥
जेणें होय परमपद प्राप्त । ऐसें ज्ञान दीजे निश्चित ।
यावेगळे नश्वर पदार्थ । स्वामी मज नलगती ॥५६॥
बिभीषणाचें ऐकोनि बोलणें । विरंचि आनंदाला मनें ।
म्हणे वस्ता धन्य मागणें । अवश्य जाण तुज दिधलें ॥५७॥
बिभीषण म्हणे स्वामिनाथा । ज्या ज्या आश्रमीं मज वर्ततां ।
तेथें तेथें बुद्धि सर्वथा । धर्मपंथा पैं लागो ॥५८॥
गुरूवेगळी ब्रह्मप्राप्ती । होय ऐसी कृपा करीं निश्चितीं ।
माझा गुरू तूचिं प्रजापती । मी मंदमति अज्ञान ॥५९॥
परम उदारा चतुरानना । माझी बुद्धी सद्वासना ।
लागो श्रीहरीच्या भजना । आणिक मना नावडे ॥६०॥
पुनरपि तो प्रजापती । ऐकोनि बिभीषणवचनोक्ती ।
आनंदें वोसंडला चित्तीं । काय मागुतीं बोलत ॥।६१॥

त्याला वरदान :

अगा ये वत्सा अवधारीं । जें चीतिसील मनामाझारीं ।
ते तें पावसील मद्वरदेंकरीं । जाण निर्धारीं मद्वाक्यें ॥६२॥
अमरत्व तूं पावसी । वैरियांतें त्रास देसी ।
स्वधर्मकर्मी रत होसी । प्रतिपाळिसी आश्रमधर्म ॥६३॥
तदनंतरें चतुरानन । मिळोनि समस्त देवगण ।
जेथें होता कुंभकर्ण । तेथें आले समस्तही ॥६४॥

कुंभकर्णाला वर देऊ नये म्हणून देवांची ब्रह्मदेवाला प्रार्थना :

प्रजापती कुंभकर्णालागून । वर देतोसे जाणोन ।
सकळ सुरवर कर जोडोन । प्रार्थूं लागले ब्रह्मयासी ॥६५॥
अगा चतुर्वक्त्रा अष्टनेत्रा । विचारिजे पात्रापात्रा ।
तूं तरि सकळांचा अधिष्ठात्रा । भूत भविष्या जाणसी ॥६६॥
हा राक्षस दुष्ट दुर्मती । वर न द्यावा ययाप्रती ।
येणें भक्षिले प्राणी नेणों किती । ऋषींसहित असंख्य ॥६७॥
येणें तपोधन भक्षिले । येणें देवांस त्रास दिधले ।
याचेनि देश उद्वस झाले । मार्ग खुंटले मार्गस्थांचे ॥६८॥
हा अधर्मी महापातकी । यातें वर न द्यावा हे बुद्धि निकी ।
प्रलोभावा माव करुनि निकी । जेणें विघ्न टळे त्रैलोक्याचें ॥६९॥
ऐकोनि देवांची विनवण । चिंतातुर चतुरानन ।
काहीं बुद्धि न चले जाण । तंव सरस्वती आपण तेथें आली ॥७०॥

सरस्वती कुंभकर्णाच्या जिव्हेवर विराजिली :

तंव जोडोनि कर ब्रह्मतनया । बोले स्वामी अहो विधातया ।
तुम्हीं कोण चिंता कवण कार्या । ते मजप्रती सांगितसे ॥७१॥
तुमची मी आज्ञाधारी । जें सांगाल तें वंदीन शिरीं ।
तंव बोले विधाता ते अवसरीं । अवो सारजे परियेसीं ॥७२॥
कुंभकर्णाचे जिव्हेवरी । तुवां बैसावें कुमारी ।
देवांचे मनोरथ पूर्ण करीं । जिव्हा धरीं तयाची ॥७३॥
विरंचीचें शब्दरत्न । शिरीं धरोनि सरस्वती आपण ।
राक्षसजिव्हाग्रीं प्रवेशोन । पुढील कथन अवधारा ॥७४॥
ब्रह्मा म्हणे पुलस्त्यकुमारा । महाबाहो महाशूरा ।
वर देतो माग चतुरा । कां शरीरा पीडितोसी ॥७५॥

कुंभकर्णाने निद्रेची मागणी केली :

ब्रह्मयाचें ऐकोनि वचन । संतोषला कुंभकर्ण ।
अनेक वर्षें निद्रा दारुण । कृपा करोन मज दीजे ॥७६॥
भविष्यस्थितीं वचनें येणें । चतुरानन बोलिला हासोनि मनें ।
सुरवर आनंदले तेणें । तपोधन संतोषले ॥७७॥
राक्षसमुखांतून सरस्वती । आली आपुल्या आश्रमाप्रती ।
पुढें देवांसह प्रजापती । गगनोदरीं प्रवेशले ॥७८॥

निद्रा मागितली याबद्दल कुंभकर्णाला पश्चाताप :

तदनंतरें कुंभकर्ण । मनामाजी करी विचारण ।
प्रसन्न झाला चतुरानन । काय म्यां आपण मागीतलें ॥७९॥
दीर्घ निद्रा मागितली । ते समयीं भुली पडली ।
किंवा देवीं मोहिनी प्रेरिली । काय झाली गति न कळे ॥८०॥
तथा तप मज झालें । माझे कष्ट वायां गेले ।
माझें पूर्वकर्म फळासी आलें । तेणें झालें विपरीत हें ॥८१॥
माझिये बुद्धीस भ्रंश झाला । मज विधाता ठकोनि गेला ।
बोल आपुल्या कपाळाला । थोर तळमळा पैं देत ॥८२॥
एवं बंधु तिघे जण । वरद पावोनि संपूर्ण ।
तीन्ही ताग्नीसमान । श्लेष्मांतकवना जाते झाले ॥८३॥
श्लेष्मांतकवना कैसें । जेथे भोकरीं बहुवसें ।
फळी फुलीं क्रीडती वायसें । तया प्रदेशी राहतें झाले ॥८४॥
एका जनर्दना रण । तया वनीं रावण कुंभकर्ण ।
बिभीषणासमवेत जाण । सुखसंपन्न क्रीडाते झाले ॥८५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणादिवरप्रदानं नाम दशमोऽध्यायः ॥१०॥
ओंव्या ॥८५॥ श्लोक ॥३॥ एवं ॥८८॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय दहावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *