संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छत्तिसावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छत्तिसावा

हनुमंताला वरदान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्राणनिरोधामुळे सर्वांना पीडा :

समस्तदेवऋषिपंक्ती । प्राणरोधें तळमळती ।
येवोनि प्रार्थिला प्रजापती । देव विनंती करिते झाले ॥१॥
प्राणनिरोधाचे कष्ट । ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ ।
तंव ब्रह्मयाचें फ़ुगलें पोट । अति संकट देवांसी ॥२॥
गगनीं लागलें पोट । बोल बोलतां होती कश्त्ःअ ।
मळमूत्रा तेथें कैंची वाट । अति संकट देवांसी ॥३॥
ब्रह्मा स्वयें सांगे समस्तां । इंद्रे हाणोनि वज्राघाता ।
मुर्च्छित पाडिलें हनुमंता वायु पुत्रार्था क्षौभला ॥४॥
राहूचे कैवारें अमरनाथें । वज्र हाणिलें वायुसुतातें ।
पुत्र पडताचि चाळिता वायु । तो तंव जगाचा जगदायु ।
पुत्रलोभें क्षोभोन बहु । भूतां आकांत मांडिला ॥६॥

प्राणवायूचे महत्त्व :

प्राणपानीं नित्य सुख । प्राणें प्राण्या नित्य हरिख ।
प्राण जातां निःशेष । परम दुःख प्राणियां ॥७॥
प्राण गेलिया निघोनी । काष्ठप्राय प्राणी जनीं ।
दृष्टी पाहतांचि सचैलस्नानीं । विटाळ मानी जग त्याचा ॥८॥
यालागीं प्राणॆं पवित्रता । प्राणें प्रीति प्रीतिवंता ।
प्राण गेलिया तत्वतां । प्रिया प्रियकांता स्पर्शेना ॥९॥
पत्नी प्रिया परम आप्त नित्य । एकांतीं भोगी जीवित ।
प्राण गेलिया मानी प्रेत । पतीस भूत म्हणे पत्नी ॥१०॥
प्राण प्रिय समस्तां तो क्षोभोनि जाईल आतां ।
यालागीं वाचवावें हनुमंता । वैकुंठनाथा सांगोनी ॥११॥
प्राणें पीडला शूळपाणी । वायूची करावया बुझावणी ।
तोही आला तत्क्षणीं । वांचवावया हनुमंता ॥१२॥

वायूजवण ब्रह्मा, विष्णू व महेश प्रार्थना करण्याठी आले :

शिव शक्र चतुरानन । तिहीं प्रार्थिला जनार्दन ।
हनुमंता द्यावया जीवदान । अवघे जण निघाले ॥१३॥
ब्रह्मा करि कर तिघे जण । सर्वे इंद्रादि देवगण ।
ऋषिश्रेष्ठ प्रजा पूर्ण । अवघे जन तेथें आले ॥१४॥
तंव तेथें घेवोनि हनुमंत । वायु बैसलासे रडत ।
प्राणरोधें क्रोधयुक्त । आले समस्त त्या ठायां ॥१५॥
देखोनि ब्रह्मा हरि हर । वायु उठोनियां सत्वर ।
कडिये घेवोनि कुमर । केला नमस्कार सभ्दावें ॥१६॥
एकापुत्रघाताकारणें । अवघें जगचि निर्दळणें ।
ऐसें न करावें आपणें । क्षमा करणें प्राणनाथा ॥१७॥
वायु बोले क्षोभकर्ता । माझा हनुमंत हा न उठतां ।
करून इंद्रियांच्या घाता । जाण तत्वतां प्रजापतें ॥१८॥

देवांचे मारुतीला वरदान :

ऐकोनि वायूचें वचन । हास्य करी श्रीजनार्दन ।
हनुमंताच्या भाग्यें पूर्ण । जन्ममरण या नाहीं ॥१९॥
श्रीरामभागाच्या द्विगुणित । भाग्य पावला हनुमंत ।
त्यासी स्वप्नीं नाहीं मृत्य । चिरंजीव मारुति ॥२०॥
वरद वदला जनार्दन । तें ऐकोनि त्रिनयन ।
वरद वदे संतोषोन । सावधान अवधारा ॥२१॥
माझिया तृतीयनेत्रींचा वन्ही । जाळॊं न शके तयालागूनी ।
त्रिशूळ न शके जाय भेदोनी । वरदवाणी शिवाची ॥२२॥
विष्णु वरद वदे तत्पर । गदा बाण दुर्धर चक्र ।
तेणें न भंगे याचें शरीर । अजरामर मारुति ॥२३॥
ब्रह्मा वदे निजवरदासी । ब्रह्मदंड ब्रह्मशापासीं ।
बांधू न शके मारुतीसी । सकळ द्वंद्वासीं निर्मुक्त ॥२४॥
इंद्र वदे निजवरदासी । माझें वज्र लागलें हनुमंतासी ।
तेणें वज्रांग नांव ययासी । होईल सर्वांसीं विख्यात ॥२५॥
माझें वज्र न बाधी पाहीं । हा होईल वज्रदेही ।
सुरासुरां नागवे पाहीं । ख्याति तिहीं लिकीं याची ॥२६॥
हृषीकेशीकमळमाळा । सुकों नेणे कदा काळा ।
इंद्रें उल्लासें तया वेळां । घातली गळां हनुमंताचें ॥२७॥
निजवरद वदे सविता । मजहूनि शताधिकता ।
तेजोवृद्धि होईल वायुसुता । राक्षसघाता करावया ॥२८॥
हा वांछील सज्ञानता । तरी सकळ वेदशास्त्रार्थां ।
मी देईन अति योग्यता । होईल व्यख्याता परमार्थीं ॥२९॥
वरुण वदे वरदान । वरुणजळें निमग्न ।
होतां हनुमंता न ये मरण| शापबंधन कदा न बाधी ॥३०॥
यम वरद वदे वितंड । सुख पावसी तूं प्रचंड ।
तुज बाधी ना यमकाळदंडा । आरोग्य अखंड अजरत्वें ॥३१॥
धनेश वदे निजवरदासी । युद्ध करितां वर्षानुवर्षीं ।
कदाकाळीं श्रम न पावसी । शस्त्रबाधेसीं बाधवेना ॥३२॥
विश्वकर्मा वदे वरदान । म्यां शस्त्रें केलीं निर्माण ।
तिहीं हनुमंतासी युद्धी जाण । शस्त्रबंधन न बाधी ॥३३॥
माझें शिल्पशास्त्रज्ञान । तेंतू पावसी संपूर्ण ।
ऐसें बोलेनि आपण । दे आलिंगन हनुमंता ॥३४॥
ब्रह्मा जगद्गुरु सर्वांसी । संतोषोनियां वेगेंसीं ।
म्हणे हनुमंत भाग्याची राशी । सकळ देव त्यासीं तुष्टले ॥३५॥
धीर वीर महाशूर । पराक्रमी हा वज्रशरीर ।
बांधू न शके शस्त्रसंभार । वायो तुझा पुत्र सभाग्य ॥३६॥
थोर भाग्य हनुमंता | भेटोनि सुखी करील सीता ।
गांजोनियां लंकानाथा । सुखी रघुनाथा करील ॥३७॥
परम भाग्य हनुमंता । भेटोनि सुखी करील सीता ।
शुद्धि आणोनियां तत्वतां । श्र्रघुनाथाही सुखी करील ॥३८॥
तुझा पुत्र हा आतुर्बळी । घेईल इंद्रजीतासीं फ़ळी ।
करोनि राक्षसां रवंदळी । लंकाहोळी करील ॥३९॥
श्रीरामाच्या कटकांत । आदट दाटुगा हनुमंत ।
सेवाबळें परम आप्त । श्रीरघुनाथ मानील या ॥४०॥
भविष्य़ हनुमंताची ख्याती । स्वयें सांगतां प्रजापती ।
उल्लस वायूचे चित्ती । पुत्रकीर्ती ऐकोनि ॥४१॥

वर मिळाल्यावर वायूने प्राणवायू मुक्त केला :

वरद लाहोनि हनुमंता । वायु अति उलासता ।
मुक्त केली प्राणरोधता । सुख समस्तां तेणॆं झालें ॥४२॥
सुखी झाले सुरवर । सुखी झाले ऋषीश्वर ।
सुखी झाले चराचर । जयजयकार तिहीं लोकीं ॥४३॥
वरद होवोनि हनुमंतासी । सुरनर गेले निजधामासी ।
वायूनें आणॊनि हनुमंतासी । अंजनीपासीं दिधलें ॥४४॥
हनुमंताची बाळ्कीर्ती । विस्तारली त्रिजगतीं ।
फ़ळार्थ आकळिला गभस्ती । लावली ख्याती सुरवरां ॥४५॥
मारुतीचें सामर्थ्य सिध्य । तेंचि देवीं दिधलें वरद ।
हनुमंतकीर्ति अति अगाध । जेणॆं आल्हाद श्रीरामा ॥४६॥
जें सामर्थ्य श्रीरामासी । तेंचि सामर्थ्य हनुमंतासी ।
एकात्मता अहर्निशीं । लोकक्रियेंसी देवभक्त ॥४७॥
लोकक्रियासंग्रहार्थ । श्रीराम देव हनुमान भक्त ।
तोचि श्रीरामायणी ग्रंथ । भक्तसामर्थ्य हनुमंत ॥४८॥
डोंगरीं दावाग्नीची ख्याती । घरीं दीपाची दीप्ती ।
दोहीं एकचि दाहकशक्ती । तेंवी देवभक्तीं सामर्थ्य ॥४९॥

हनुमंताकडून ऋषींना उपद्रव :

हनुमान असतां मातेप्रती । अंगीं अद्बुत सामर्थ्यशक्ती ।
करित बळानें उद्धती । ऋषीं हितोक्तीं शापिला ॥५०॥
गंगातीरीं ऋषींची वस्ती । अवघे आश्रम उचलोनि हातीं ।
हनुमान ठेवी दूर पर्वतीं । जळ न पावती स्नानपाना ॥५१॥
ऋषी आपुले तपःसामर्थीं । पुढती गंगातीरा येती ।
हनुमान उचलोनि मागुती । घाली पर्वतीं अति दूर ॥५२॥
पुण्यपर्वतीं ऋषी वसत । सगळे उचलोनि पर्वत ।
हनुमान घाली उखराआंत । ऋषी तळमळीत जळफ़ळा ॥५३॥
बाळभावाच्या परवडीं । ऋषींची यज्ञपात्रें फ़ोडी ।
कुशासनें अजिनें फ़ाडी । जानवी तोडी बटूंचीं ॥५४॥
बटु ब्र्हमाचारी कवळूनि पुसीं । हनुमान उडे स्वयें आकाशीं ।
लेकरें करिती कोल्हाळासी । ऋषिपत्न्यांसीं तळमळ ॥५५॥
मारोनियां गजकरवडें । ऋषींचे आश्रमीं सांडी मढें ।
काढितां शिष्य समुद्राकडे । उपाव पुढें चालेना ॥५६॥

ऋषींचे ब्रह्मदेवाजवळ गा‍र्‍हाणे व हनुमंताला सौम्य शाप :

ब्रह्मवरदाची वरदोक्तीं । शाप न चले हनुमंती ।
अवघे ऐसे ब्रह्मयाप्रती । बुद्धी पुसती विधातिया ॥५७॥
ब्रह्मा सांगे ऋषींप्रती । शाप द्यावा अतिहितोक्तीं ।
मारुती भेटे जंव रघुपती । तंव तुझी शक्ती लीन राहो ॥५८॥
जेंवी आलिया तारुण्यता । यौवने मुसमसी वनिता ।
तेंवी भेटल्या रघुनाथा । निजसामर्थ्यता पावसी ॥५९॥
ऐसें ऋषींश्वर शापिती । झाली हनुमंता लीन शक्ती ।
मग राहिला साधुवृत्तीं । ऋषींप्रती अति नम्र ॥६०॥
द्रव्यमद रारुण्यमद । अंगीं बळाचा बळमद ।
तेणॆं पुरुष होय स्तब्ध । करी विरुद्ध अवमानें ॥६१॥
व्यापार झालिया व्यापारी । नाना आनेआन करी ।
तोचि झालिया अनधिकारी । मग विचारी पुण्यपाप ॥६२॥
कैसी संध्या कैसे स्नान । केंवी उपजे निजज्ञान ।
अधिकार झालिया क्षीण । विवेक पूर्ण प्राण्यासी ॥६३॥

हनुमंताचे परिवर्तन :

तैसें झालें हनुमंता । निजबलाढ्य़ता लीन होतां ।
म्यां पावावें परमार्था । साधुसंतां भजावें ॥६४॥
पूर्वी सूर्याचें वरदान । जेव्हां हनुमान वाछील ज्ञान ।
तेव्हांचि होवोनि सुप्रसन्न । ज्ञानसंपन्न मी करीन ॥६५॥
ज्ञान मारुती वांच्छितां । अंतरीं उगवोनि चित्सविता ।
ज्ञान विज्ञान लीनता । देहीं विदेहता श्रीरामभक्तीं ॥६६॥
ज्ञान विज्ञान संतृप्ती । देहीं असोनि विदेहस्थिती ।
श्रीरामाच्या अनन्यभक्तीं । झाला मारुति जगद्वंद्व ॥६७॥
वालिसुग्रीवकलहाआंत । शापें हनुमंताचा आप्त ।
परी शापें शक्ती होती गुप्त । यालागीं वाळीचा न करीच घात ।
जाण निश्चित श्रीरामा ॥६९॥
ऐसी हनुमंताची ख्याती । ऐकोनि सुखावला श्रीरघुपती ।
प्रीतीने आलिंगला मारुती । हा प्राणसखा निश्चितीं पैं माझा ॥७०॥
मुनीसी म्हणे श्रीराम । धन्य धन्य याचा पराक्रम ।
धन्य धन्य याच जन्म । माझ्या अवतारा नाम याचेनि ॥७१॥

श्रीरामांचा यज्ञ करण्याच मानस :

तदनंतर श्रीरघुपती । समस्तां ऋषींसहित अगस्ती ।
तयाप्रती करी विनंती । ऐका वचानोक्ती पैं माझी ॥७२॥
म्यां वधिले राक्षस थोर । तेणॆं पातक झालें अपार ।
तया प्रायश्चिता अध्वर । अयोध्याभवनीं करूं पाहतों ॥७३॥
माझिया यज्ञाचे सिद्ध्यर्थी । तुम्ही साह्य व्हावें ऋषी समस्तीं ।
याकारणें करितों विनंती । कृपामूर्तिं मुनिराजा ॥७४॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । ऋषि म्हणती धन्य धन्य ।
मग श्रीरामाची आज्ञा घेऊन । निजाश्रमा ऋषी गेले ॥७५॥
तदनंतर श्रीरघुपती । सभा विसर्जून मंदिराप्रती ।
प्रवेशला जैसा गभस्ती । जंबुद्वीपा आड जाये ॥७६॥
सवेंचि प्रवर्तिला प्रवर्तली शर्वरी । श्रीरघुनाथ गेला भवना माझारीं ।
गोधनें दोहती घरोघरीं । नगरानगरी आनंदें ॥७७॥
एका जनार्दना शरण । पुढें गोड निरूपण ।
श्रीराम भक्तजनभंजन । नाना लीला खेळतसे ॥७८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
हनुमंतवरदो नाम षत्त्रिंशोऽध्यायः ॥३६॥ ओव्यां ॥७८॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छत्तिसावा