संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छपन्नावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छपन्नावा

ययातीची कथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

वसिष्ठनिमिचें कथन । ऐकोनियां लक्ष्मण ।
पुढें कैसे शापमोचन । झालें जी रघुनंदना ॥१॥
श्रीराम म्हणे गा सौमित्रा । पुढील अपूर्व रसाळ कथा ।
ते सांगेन सावधान श्रोता । दृढ चित्ता देइजे ॥२॥
वसिष्ठनिमींचें आख्यान । अतिहास पुरातन ।
वरुणवीर्य अति दारुण । घटामाजी निक्षेपिलें ॥३॥
दिवसेंदिवस वाढोन । तयाचा झाला मैत्रावरुण ।
तयासि अगस्ति ऐसें अभिधान । कुंभोद्भव म्हणती पंडित ॥४॥
आतां निमिरायाची स्थिती । सावधान ऐकें उर्मिलापती ।
शाप झाला कैसा मागुती । उःशापातें पावला ॥५॥
वसिष्ठाचे शापेंकरुन । निमीनें देह न सांडितां जाण ।
आणिक देहीं प्रवेशोन । नयनीं प्राण ठेविले ॥६॥
वंशाचें करावया हित । काय करी प्रतापवंत ।
यज्ञ करोनि समस्त । सकळ देवां पूजिलें ॥७॥
षोडशोपचारीं पूजा । वस्त्रें नानापरींचीं देवोनि वोजा ।
ब्राह्मण तोषले महाराजा । आशीर्वाद देते झाले ॥८॥
समस्त ब्राह्मण मिळोन । रायासि झाले सुप्रसन्न ।
म्हणती मागसी तें देऊं दान । सत्य जाण राजेंद्रा ॥९॥

देवांचे डोळ्यांचे पाते न हालण्याचे कारण :

ऐसें देवद्विजांचे वचन । ऐकोनि संतोषला राजा जाण ।
म्हणे प्रसन्न झालेति मी नेत्रीं राहीन । तुम्हां समस्तां जनाचें ॥१०॥
देव म्हणती महा बरवें । तुवां नेत्रीं असावें ।
वायुरुप हेवोनि विचरावें । दोहीं डोळ्यांभीतरी ॥११॥
समस्त देवांचे नेत्रांअंतीं । राहिला तो निमिभूपती ।
तेणें पातिया पातीं न हालती । हेचि खूण तयांची ॥१२॥
यज्ञींचे देव स्वर्गाप्रती । सुखस्वानंदें वर देवोनि जाती ।
मागें ऋषीश्वर काय स्थिती । करिते झाले राजदेहातें ॥१३॥
निमिरायाचे देहमथन । करिते झाले ऋषिब्राह्मण ।
यज्ञींच्या अरणी आणोन । आयास थोर मांडिला ॥१४॥
मथितां रायाचें शरीर । झालें मिथिलानामें नगर ।
तदंशे जन्मला जो नृपवर । तयासि जनक बोलिजे ॥१५॥
पूर्वी देही नव्हता । म्हणोनि विदेही तत्वतां ।
ऐसी लक्ष्मणा झाली कथा । मिथिलेशा जनकाची ॥१६॥
ऐसें रघुनाथाचें शब्दरत्न । ऐकोनि सुमित्रानंदन ।
थोर विस्मय पावोन । सुखसंपन्न पैं झाला ॥१७॥
लक्ष्मण म्हणे श्रीरामासी । भार्गवजेत्या कथा सुरासी ।
ऐकोनि आश्चर्य वाटे मानसीं । पुनरपि तयांचें जन्म अद्भुत ॥१८॥
राजा ऋषि दोघे अशांत । परस्परें शापून पावले अंत ।
पुनरपि श्रवण करावें । अति विपरीत पैं झालें ॥१९॥
पुढील कथेचें अनुसंधान । तें मज सांगावें कृपा करुन ।
लक्ष्मणाचें आर्त देखोन । रघुनंदन बोलता झाला ॥२०॥

ययातीची कथा :

पूर्वी नहुषराजा सूर्यवंशी । तयाचा पुत्र ययाति नामेंसीं ।
प्रजापाळणीं संतोष ज्यासी । गोब्राह्मणांसी कृपा करित ॥२१॥
दोघी स्त्रिया त्यालागून । अति प्रसिद्धा रुपें गुणेंकरुन ।
तयांचीं नामें सौमित्रा जाण । सावकाशीं अवधारीं ॥२२॥
शर्मिष्ठा नामें ज्येष्ठ पत्नी । वृषपर्व्याची नंदिनी ।
कनिष्ठ जे देवयानी । दैत्यगुरुची कन्या होय ॥२३॥
ज्येष्ठ शर्मिष्ठेसि झाला पुत्र । पूरु नामें सुंदर गुणवंत ।
देवयानीस एक सुत । यदुनामें पैं झाला ॥२४॥
दोघी असती समत्सर । ययातीस शर्मिष्ठा प्रियकर ।
तिचे दोघे आवडती कुमर । देवयानी नावडे पुत्रेंसीं ॥२५॥
ऐसे यदूनें जाणोन । मातेचा केला अपमान ।
देवयानीप्रति कर जोडून । यदुपुत्र बोलता झाला ॥२६॥
म्हणे माते अवधारीं । पिता तुझा माझा अपमान करी ।
तरी मी वांचेनां संसारीं । जीव देईन आपुला ॥२७॥
मी करीन विषपान । अथवा अग्निकाष्ठें भक्षीन ।
सर्वथा प्राण सांडीन । हें दुःख माझेनि न देखवे ॥२८॥

देवयानीने बापाकडे तक्रार केली :

ऐकोनि पुत्राचें वचन । देवयानी झाली उद्विग्न ।
तैसीच पितृगृहा येऊन । काय करिती पैं झाली ॥२९॥
ते दैत्यगुरुची नंदिनी । प्रवेशली पितृभवनीं ।
संमुख पित्यासी देखोनि । साष्टांग नमन पैं केलें ॥३०॥
अति दीन चिंतातुर । म्लानवदन कृशशरीर ।
ऐसें देखोनियां शुक्र । कन्येप्रति बोलिला ॥३१॥
आजि तुझें मुख कोमाइलें । चिंतेचे भरितें हृदयीं दाटलें ।
शरीर अत्यंत कृश झालें । काय कारणें कन्यके ॥३२॥
कोणें केला अपमान । तें सांगावें मज विस्तारोन ।
ऐकोनि पितयाचें वचन । देवयानी बोलिली ॥३३॥
अहो जी ताता अवधारीं । माझा न करीच अंगीकार ।
सवतीही चालवी मत्सर ।
ऐसें दुःख देवोनि अपार । आम्हां बाहेर घातलें ॥३५॥

शुक्राचार्याने ययातीस वृद्ध होशील असा शाप दिला :

ऐकोनि कन्येचें वचन । भार्गव झाल क्रोधायमान ।
म्हणे माझ्या कन्येचा अपमान । करोनि शर्मिष्ठा भोगित ॥३६॥
तेचि क्षणीं दैत्यगुरु । कोपें कोपला जैसा रुद्रू ।
म्हणे सृष्टीचा संहार करुं । कीं समुद्र शोषूं सातही ॥३७॥
क्रोधें थरथरां कांपत । जेथें होता जामात ।
तेथें शुक्र येवोनि त्वरित । शाप तत्काळ दीधला ॥३८॥
अगा ययाति महावीरा । राज्यमदें उन्मत्त झालसि खरा ।
विषयबुद्धीं भ्रमलासी पुरा । तारुण्येकरोनि मातलासी ॥३९॥
नेणसी तूं आपपर । न करसी स्वहिताचा विचार ।
ऐसा तूं पावसि जरा शीघ्र । आजिंचिये काळीं ॥४०॥
माझ्या कन्येचा करोनि अपमान । ज्येष्ठस्त्रीभोगीं आसक्त मन ।
तुझ्या तारुण्या होईल हान । सत्य जाण ये काळीं ॥४१॥
ऐसें शापोनि जामातासी । शुक्र निघाला स्वभवनासीं ।
आश्वासोनिं दौहित्रासी । तये काळीं लक्ष्मणा ॥४२॥
रावणारीचें ऐसें वचन । ऐकोनि सुमित्रानंदन ।
म्हणे स्वामी भार्गवें शापून । निजधामा गमन केलें ॥४३॥
तदनंतरें श्रीरघुपती । शाप पावोनि ययाती ।
पुढें काय करिता झाला तें मजप्रती । सविस्तरें सांगावें ॥४४॥
श्रीराम म्हणे गा लक्ष्मण । पुढील ऐक पां कथन ।
ययाति जरा पावोन । थोर कष्ट पावला ॥४५॥

यदूला वृद्धत्व स्वीकारण्याची बापाची विनंती; त्याचा नकार :

पाचोरोनि पुत्रा यदूसी । ययाति म्हणे पुत्रा परियेसीं ।
जरेनें मी होतो बहुत क्लेशी । ते जरा तूं अंगीकारीं ॥४६॥
मजसंतोषार्थ हे जरा । तूं अंगीकारीं गा कुमरा ।
धर्मिष्ठ सज्ञान चतुरा । यया कर्या शीघ्र करावें ॥४७॥
जरेकरोनि जर्जरीभूत । परी माझे भोगीं आसक्त चित्त ।
याकारणें तूं गुणवंत । अवश्य जरा अंगीकारीं ॥४८॥
ययातीचें करुणावचन । ऐकोनि यदु कोपायमान ।
काय बोलिला तें सावधान । श्रोतीं सादरें श्रवण कीजे ॥४९॥
राया तुझ्या आवडता पुरू । तया देईं जराभारु ।
तयासि यदर्थी अधिककारु । ज्येष्ठ म्हणोनि राजेंद्रा ॥५०॥
जयावीण न करिसी भोजन । जयावीण न करिसी उदकपान ।
तो जरा अंगीकारील जाण । जयासि राज्याचा अधिकार ॥५१॥
विशेषही आवडता । प्राणाहूनि पढियंता ।
तयासि जरा देईजे ताता । काहीं विचारा करुं नको ॥५२॥
मी कनिष्ठ नावडता पुत्र । मज अधिकार नाहीं येथ ।
ऐकोनि यदूचा वचनार्थ । थोर क्रोध पावला ॥५३॥

पुरूने ययातीच्या विनंतीचा स्वीकार केला :

मग पाचारोनि ज्येष्ठ पुत्र । पूरूनामें गुणवंत ।
तयासि राजा बोलत । सावचित्त करोनी ॥५४॥
अगा पूरो महाबहो वीरा । मजप्रीत्यर्थ अंगीकारीं जरा ।
तिचेनि धाकें सुरवरां । थोर हडबड होतसे ॥५५॥
माझें विषयभोगीं मन आसक्त । वियोग होतां दुःखी होत ।
याकारणें तुवां त्वरित । जरा माझी अंगीकारावी ॥५६॥
ऐकोनि पितयाचें वचन । कर जोडोन पूरु करी विनवण ।
म्हणे स्वामी भाग्य गहन । मजवरी तुष्टलेती ॥५७॥
म्हणे आजि मी धन्य भाग्याचा । अवश्य करीन अंगीकार जरेचा ।
पूरुवचन ऐकोनि पुत्र नहुषाचा । काय करिता पैं झाला ॥५८॥
आपुले शरीराची जरा । पुत्रास दिधली ते अवसरां ।
आपण नूतन झाला सौमित्रा । विषयभोगाकारणें ॥५९॥
नूतन झाला राजा ययाती । नानापरींचे याग विप्रांहातीं ।
करवीतसे तो नृपती । स्वधर्मे पाळी क्षितीतें ॥६०॥
राज्य करी स्वधर्मता । नगरीं नाहीं अधर्मवार्ता ।
ऐशीं सहस्त्र वर्षे क्रमिलीं असतां । पुढें अनुताप उपजला ॥६१॥

पुनः ययातीने पूरुकडे ’जरा’ मागितली :

विषयीं उदास झालें चित्त । मग पाचारोनि पूरु सुत ।
तयासि बोले नृपनाथ । माझी जरा मज देईजे ॥६२॥
अगा ये पुत्रा गुणवंता । माझी जरा मज दीजे आतां ।
ते मी अंगीकारीन हितार्था । आपुलियाकारणें ॥६३॥
विषयीं उदास झालें चित्त । माझी जरा मज दीजे शीघ्रवत ।
पितृवचन ऐकोनी पूरु सुत । जरा जनकास देता झाला ॥६४॥

यदूला शाप :

राज अति संतोषला । पुत्रासि राज्याभिषेक केला ।
कनिष्ठाचा शाप दिधला । देवयानीच्या आत्मजा ॥६५॥
माझें वचन अपमानोन । तूं राक्षसी क्षत्रिय होसी दुर्जन ।
प्रजेचें तुझेनि पाळण । सर्वथा नव्हे पापिष्ठा ॥६६॥
मी तुझा पिता गुरुसमान । तुवां माझा केला अपमान ।
तुझे पोटीं यातुधान । कर्कश दारुण जन्मती ॥६७॥
ऐसा कनिष्ठ पुत्रा शाप देवोन । ज्येष्ठासी राज्यीं स्थापून ।
आपण तपश्चर्येलागीं जाण । वनप्रयाण पैं केलें ॥६८॥
वना जावोनी राजऋषी । सवेंचि त्यजोनि देहासी ।
विमानीं आरुढोनी स्वर्गासी । जाता झाला ययाति ॥६९॥
मागे पुरु धर्मनीतीं । प्रजापाळणीं परम प्रीती ।
प्रतिष्ठान नामे नगराप्रती । राज्य करिता पैं झाला ॥७०॥
वाराणसीचे पूर्वदिशे । प्रतिष्ठान नामें नगर असे ।
तेथील राज्य सुखसंतोषें । करिता झाला ययतिपुत्र ॥७१॥
पुढें कनिष्ठ यदूचें कथन । जो भार्गवात्मजेचा नंदन ।
पितयाचे शापेंकरुन । अति चिंतातुर पैं झाला ॥७२॥
शाप झाला दौहित्रासी । ऐसें ऋषीनें जाणोनी मानसीं ।
शापापासोनि नातवासी । क्षणमात्रें मुक्त केलें ॥७३॥
क्रौंचवनादि नाना वनीं । यदु क्रीडा करी स्व-इच्छेंकरोनी ।
पुढें काय वर्तलें तें वाल्मीकमुनी । कथा अनुपम्य सांगेल ॥७४॥
यालागीं लक्ष्मणा परम । राजानें न सांडावा राजधर्म ।
न करितां नृगा शाप दारुण परम । ऋषिशापें सरड झाला ॥७५॥
एका जनार्दना शरण । ययातीस झालें स्वर्गगमन ।
पूरूसि देवोनि राज्यसन । पुढें श्रवण करावें ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
ययातिकथनं नाम षट् पंचाशत्तमोऽध्यायः ॥५६॥ ओंव्या ॥७६॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छपन्नावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छपन्नावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय छपन्नावा