भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चौथा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चौथा

सुकेशाची जन्मकथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीविष्णूंनी रावणाचा वध का केला असा रामांचा अगस्तिमुनींना प्रश्न :

ऐकोनि अगस्तीचें वचन । कर जोडोनि रघुनंदन ।
विनीतवृत्तीं करोनि नमन । काय आपण बोलत ॥१॥
अगा ये अगस्ति महामुनी । पूर्वी लंकादुर्गभवनीं ।
राक्षस वसती हें तुमच्या वचनीं । आजि म्यां श्रवणीं ऐकिलें ॥२॥
ब्रह्मादिकांचा नियंता । चराचर वर्ते ज्याचिये सत्ता ।
यज्ञरूप जो अयोनिजेचा भर्ता । डोलवी माथा ऋषिवाक्यें ॥३॥
कुंभोद्भवाच्या वचनासी । ऐकोनि विस्मय श्रीरामासी ।
म्हणे स्वामी मांसभक्षक कपटवेषी । राक्षस लंकेसीं वर्तती ॥४॥
पुलस्तिवंशीं राक्षस झाले । हें तुमचेनि मुखें ऐकिलें ।
रावणकुंभकर्ण जन्मले । प्रहस्तादि विकटादिक ॥५॥
आणि रावणाचे सुत । होते पराक्रमवंत ।
याहूनि ते राक्षस बळवंत । किंवा अशत्क सांगावें ॥६॥
अगा स्वामी महामुनी । तुम्हीं समुद्र प्राशिला आचमनीं ।
तयांचें नाम तयांची करणी । मजलागूनी सांगावी ॥७॥
तयां पूर्वज कोण । वर देता काय देखोन ।
तया विष्णूच वधी काय कारण । तें समूल निरूपण मज सांगा ॥८॥
हे कथा ऐकावयासी । उल्लास उपजतो मानसीं ।
कृपा करोनि तुम्ही ऋषी । मजपासीं सांगावें ॥९॥

मुनी त्या प्रश्नाने चकित, त्यांच्याकडून रामस्तुती :

ऐकोनि श्रीरामवचन । अगस्ति झाला विस्मयापन्न ।
म्हणे वेदांसी न कळे महिमा जाण । तो तूं ब्रह्म पूर्ण श्रीरामा ॥१०॥
तूं चिदाकाशीं चिद्धन । तूं योगियांमानसींचें चिद्रत्न ।
तूं सुखसागरींचें सुधापान । तूं निजजीवन संतांचें ॥११॥
श्रीरामा तूं आदीचा आदी । तूं मोक्षाची मोक्षसिद्धी ।
तूं निधीचा परमनिधी । तूं समाधि श्रीरामा ॥१२॥
तूं तपाचे परम तप । तूं भक्तांचा परम दीप ।
तूं सदाशिवहृदयींचा जप । तूं सुखस्वरूप सर्वांसी ॥१३॥
ध्येय ध्याता आणि ध्यान । तयांहून अससी भिन्न ।
सच्चिदानंद हें अरूतें जाण । तूं परेहून परात्पर ॥१४॥
निर्गुण होत्साता अवतार धरिसी । तूं अकर्मा होईनी कर्मे करिसी ।
अभक्ता भोग भोगिसी । तुझें निजमायेसी हें न कळें ॥१५॥
ऐसें असोनि रघुनाथा । आमुचें मुखींहून इच्छिसी कथा ।
तुझा महिमा न कळे तत्वतां । परी वचन सर्वथा नुल्लंघीं तुझें ॥१६॥

सृष्टीरक्षणार्थ ब्रह्मदेवाकडून भूतांची निर्मिती :

पूर्वी विष्णूचे नाभिकमळीं । ब्रह्मा उपजला कमळदळीं ।
तेणें सॄष्टीसर्जनाचे काळीं । भूतें निर्मिली अनेक ॥१७॥
तयां म्हणे चतुरानन । तुम्ही सृष्टीचें करा रक्षण ।
एक म्हणती करुं रक्षण । ते रक्षोगण पैं केले ॥१८॥

प्रजापतिस्तु तानाह सत्वांस्तु प्रहसन्निव ।
बभाष वाचा यत्नेन रक्षध्वमिति मानवाः ॥१॥

रक्षण करणारे ते राक्षस व पालन करणारे ते यक्ष या नावाने प्रसिद्ध झाले :

प्रजापति म्हणे भूतांसी । तुम्हीं रक्षावे सृष्टीसी ।
येर म्हणती आज्ञा शिरसीं । रक्षूं सृष्टीसी स्वामिनाथा ॥१९॥
जे बोलिले करुं रक्षण । तयांचेनि मुखें तयांसी जाण ।
नाम ठेविलें रक्षोगण । भूतांचे रक्षण करिते झाले ॥२०॥

रक्षाम इति यैरुक्त राक्षसास्ते भवंति वै ।
यक्षाम इति यैरुक्त ते यक्षाः संभवंति वै ॥२॥

सृष्टि रक्षूं म्हणोनि बोलिले । तेणें नांवे ते राक्षस झाले ।
तयांचे बोलणें तयां फळलें । करुं लागले निजकर्मा ॥२१॥
यक्षाम गेले बोलून । ते झाले यक्षगण ।
चतुराननवचन प्रमाण । यक्ष अभिधान तयां झाले ॥२२॥

सुकेशाची जन्मकथा :

तेथें हेति प्रहेति राक्षस । दोघे बंधु अति कर्कश ।
तयांचे कुळूं मधुकैटभांस । जन्मप्रकाश पैं झाला ॥२३॥
प्रहेति अति धर्मिक तेथ । महावैराग्य उदासभूत ।
दार गृह नांगीकारित । परमेश्वररत पैं झाला ॥२४॥
दुसरा हेति दारागृहार्थी । अत्यंत आसक्ति तयाचे चित्तीं ।
प्रश्न करी ये काकुळती । ऋषिमुनीं प्रती मागे कन्या ॥२५॥
मग काळाची भगिनी राक्षसी । भया नामें अतिकर्कशीं ।
तिणे आपुली कन्या हेतीसी । विधिपूर्वक दीधली ॥२६॥
हेति राक्षस स्त्रीसमवेत । कामी होऊन आसक्त ।
गृहाश्रमीं असे वर्तत । तंव एक सुत तया झाला ॥२७॥
विद्युत्केश नामें प्रख्यात । अत्यंत तेजस्वी बळवंत ।
अग्नीसारखा उग्र भासत । दिवसेंदिवस तेथें वाढिन्नला ॥२८॥
दिसे अत्यंत तरुण । रूपरेखागुणलक्षण ।
ठाणमाणगुणलक्षण । शोभा संपूर्ण शोभत ॥२९॥
मग हेति देखोनि पुत्रासी । झाला अत्यंत संतोषी ।
करावया पुत्रविवाहासी । कन्याविचारणेसी लागला ॥३०॥
तंव संध्या नामें राक्षसी । जाऊन तिचिया गृहासी ।
कन्या मागे निजपुत्रासी । अवश्यतेसीं दीधली ॥३१॥
संधेची कन्या अति सुंदर । संध्यारागासारिखें शरीर ।
तियेसी विद्युत्केश वर । लग्न सत्वर लाविलें ॥३२॥
मग तीं दोघें जणें । क्रीडा करिती वनोपवने ।
जैसें शचीसहित सहस्रनयनें । नाना स्थानीं विचरिजे ॥३३॥
ऐसे बहुत दिवस लोटले । तंव पुढें काय वर्तलें ।
एके दिवशीं क्रीडेसी गेले । मंदरागिरिपर्वतीं ॥३४॥
तेथें ऋतुस्नान झाली । भर्तारा व्यवस्था कळों आली ।
क्रमिलें दिनत्रय तें काळीं । ऋतु दिधला चवथे दिवसीं ॥३५॥
उदरीं प्रवेशतां रेत । गोठोनियां शुक्रशोणित ।
गर्भ संभवला त्वरित । प्रसवली सुत तत्काळ ॥३६॥
पर्जन्य वर्षे जळधारीं । तोय प्रसवे सागरीं ।
पुनरपि मेघमुखेंकरीं । पृथ्वीवरी वर्षत ॥३७॥
तैसें तियेसी झालें । विद्युत्केशवीर्यातें धरिलें ।
पुनरपि तें त्यागिलें । मंदरागिरीं श्रीरामा ॥३८॥
तें बाळक शैलशिखरीं । अंगुष्ठ घालोनि मुखामाझारीं ।
चोखी चुरचुरां रुदन करी । जेविं अंबरीं घन गर्जे ॥३९॥
तंव भवानीसहित त्रिपुरारी । आरूढोन गोवाहनांवरी ।
क्रीडा करितां वनांतरीं । बाळकावरी दृष्टि पडली ॥४०॥
उमा विनवी महेशासी । बाळक अपूर्व तेजोराशी ।
कोणें त्यागिलें अवगुणेंसीं । कीं पुत्र मूळेसीं लागला ॥४१॥
किंवा जननीस झाले भारी । म्हणोनि त्यागिले वनांतरीं ।
याच्या त्यागाची नवलपरी । मज त्रिपुरारी वाटते ॥४२॥
उचलोनि उत्संगावरी घेतलें । उमेनें तया चुंबन केलें ।
स्तन पाजून करें कुरवाळिलें । कृपेनें पाहिलें निजदृष्टीं ॥४३॥
अमर करोनियां त्यासी । महादेवें दिधले वरासी ।
वाढता झाला अति वेगेंसीं । दिवसेंदिवसीं पैं अधिक ॥४४॥
मग तो त्र्यंबक त्रिपुरारी । वसविता झाला गगनोदरीं ।
गंधर्वनामें भ्रमत नगरी । राक्षसात्मजाकारणें ॥४५॥

पार्वतीचा सुकेशाला वर :

उमा म्हणे राक्षसात्मजा । जैसा तूं वाढलासी वोजा ।
तैशाचि होती तुझ्या प्रजा । ऐसा शैलजा वर दिधला ॥४६॥
विद्युत्केशापासून उत्पन्न । म्हणोनि सुकेश नामधारण ।
शिवसेवें नित्य सावधान । राक्षस जाण पैं असे ॥४७॥
हिंडे त्रैलोक्याभीतरीं । क्रीडा करी वनांतरीं ।
मागुता येत जेथें त्रिपुरारी । दर्शनगजरीं राक्षस ॥४८॥
जैसा अमरेश शचीसहित । वनोपवनीं क्रीडा करीत ।
तैसा तो राक्षस हिंडत । मागुता येत येथें पिनाकपाणि ॥४९॥
श्रीरामायणीं ऋषिनिर्मित । उत्तरकांडकथामृत ।
सज्जनीं सेवावें सावचित्त । श्रवणद्वारेंकरोनी ॥५०॥
श्रीरामकथा द्रुम केवळ । त्यावरी आरूढ वाल्मीक कविकोकिळ ।
टाहो करितसे रसाळ । श्रीराम येणें शब्दकल्लोळें ॥५१॥
एका जनर्दन शरण । पुढें गोड आहे निरूपण ।
श्रीरामकथा परम पवन । श्रोतीं अवधान पैं दिजे ॥५२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सुकेशजनमकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
ओंव्या ॥५२॥ श्लोक ॥२॥ एवं ॥५४॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चौथा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चौथा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *