भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठरावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठरावा

रावणाचे राजा मरूत्ताच्या यज्ञाला जाणे

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मरूत्त राजाच्या यज्ञाला रावणाचे आगमन :

वेदवतीचें अग्निप्रवेशन । तें देखोनि दशानन ।
पुष्पकीं आरूढोन पर्यटन । करिता झाला मेदनीतें ॥१॥
तदनंतरें मरूत्त भूपती । यज्ञ करीत होता उशीरपर्वतीं ।
मिळाले ऋषि देवपंक्तीं । मंत्राहुती घालीत होते ॥२॥
देवगुरूचा बंधु जाण । संवर्तनामें तो ब्राह्मण ।
जयाचें ज्ञान बृहस्पतिसमान । आचार्य पूर्ण यज्ञींचा ॥३॥
समस्त द्विजांसहित । होम करी राजा मरूत्त ।
तंव रावण देखिला येत । वरदोन्मत्त होवोनी ॥४॥
वरदानाचेंनि बळें । त्रैलोक्य जिंतीत चालिला सकळें ।
तें देखोनि द्विजदेवकुळें । अत्यंत भय पावलीं ॥५॥

रावणभयाने देवांनी निराळ्या योनींत प्रवेश केला :

तदनंतरे श्रीरघुपती । देव आणिक योनी प्रवेशती ।
ते कोण कोण जन्म धरिती । ते श्लोकार्थी सांगेन ॥६॥

इंद्रो मयुरः संवृत्तो धर्मराजस्तु वायसः ।
कृकलासो धनाध्यक्षो हंसो वै वरूणोऽभवत् ॥१॥

शचीपति झाला मयूर । धर्मराज वायसशरीर ।
कृकलास होवोनि कुबेर । हंसरूप वरूण झाला ॥७॥
राक्षसभयेंकरून । देवईं वेष पालटोन ।
भयेकरीं राहिलें लपोन । तंव रावण काय करी ॥८॥

रावणाचे मरुत्ताला युद्धाचे आव्हान :

रावण म्हणे रायासी । तूं युद्ध करी आम्हांसी ।
नाहीं तरी हारविलें ऐसे वचनासी । उच्चारोनि बोलिजे ॥९॥
देखोनि रावणाची स्थिती । मग तो मरूत्त भूपती ।
कोण म्हणोनि रावणाप्रती । अट्टहासें पुसता झाला ॥१०॥
अट्टहासें गंभीर वचन । ऐकोनि संतोषला रावण ।
म्हणे तुवां केले गिरागर्जन । तेणें संतुष्ट मन झालें ॥११॥
तूं कोणाचा कोठील कोण । येथें यावया काय कारण ।
आम्हांसी वांछितोसि रण । तेणें संतुष्ट मन झालें ॥१२॥
राया मी झालों सुप्रसन्न । मज कोण म्हणसी तरी ऐक सावधान ।
माझा ज्येष्ठ बंधु वैश्रवण । नाम रावण प्रसिद्ध माझें ॥१३॥
माझेनि धाकें जाण । सुरासुर कंपायमान ।
देव दांतीं धरिती तृण । मानी कोण मजपुढें ॥१४॥
आपुलेनि सामर्थ्येकरून । म्यां रणीं जिंतला वैश्रवण ।
घेवोनि पुष्पक हिरोन । विराजमान विचरतसें ॥१५॥

रावणाची गर्वोक्ती ऐकून मरूत्ताने त्याचा धिक्कार केला :

ऐकोनि रावणाचें वचन । मग तो मरूत्त इक्ष्वाकुनंदन ।
रावणाप्रति काय वचन । निर्भत्सून बोलतसे ॥१६॥
धन्य धन्य तूं दशानना । तुजसारिखा योद्धा या त्रिभुवना ।
माजि पाहां बंधूतें रणा । आणिला ऐसा न देखिला ॥१७॥
या त्रिभुवनामाझारीं । ज्येष्ठ बंधु पितयासरी ।
त्यातें जिंतोनि संपत्ति हरी । ऐसा नाहीं देखिला ॥१८॥
बंधु बंधूनें जिंतिले । ऐसें नाहीं पुराणीं ऐकिलें ।
तें तुवां साच केलें । रणीं पाडिलें अग्रजातें ॥१९॥
इतुक्या करोनि अधर्मा । पुढती श्लाघतोसि अधर्मा ।
तुजपरता पापात्मा । आणिक आम्हां दिसेना ॥२०॥
पूर्वी योद्धे अनेक । झाले ते ऐकिले सकळिक ।
बंधूस जिंतिलें हें तुझेनि मुखें । आजि आपण ऐकिलें ॥२१॥
इतुकें वदोनि भूपती । चाप घेतलें अति निगुतीं ।
बाण लाविलासे सिती । संग्रामाप्रती निघाला ॥२२॥

मरूत्ताची रावणाशी युद्ध करण्याची तयारी पाहून संवर्ताकडून प्रतिबंध :

मरूत्त जातां संग्रामासीं । संवर्त बोले मरूत्तासी ।
म्हणे राया रणभूमीसीं । अधिकार नाहीं जावया ॥२३॥
धर्मकार्य अवलंबून । त्यासि सांडोनि करिसी रण ।
तरी सर्वथा नसे जयो जाण । सत्य वचन हें माझें ॥२४॥
घरीं माहेश्वरयज्ञ । अवलंबिल्या करावा पूर्ण ।
पूर्णाहुति न होतां निंद्य रण । ऐसें जाणोन नवजावें ॥२५॥
यज्~झीं न होतां पूर्णाहुती । सांडोनि गृहस्थ विमुख होती ।
तयांच्या वंशा होय शांती । जाण नृपती मरूत्ता ॥२६॥

दीक्षितस्य कुतो युद्धं क्रूरत्व दिक्षिते कुतः ।
संशयश्च रणे नित्यं राक्षसश्चैव दुर्जयः ॥२॥

गुरूपदेशामुळे युद्धापासून मरूत्त परावृत्त
झालेला पाहून राक्षसांकडून यज्ञीय ब्राह्मणांचा संहार :

दीक्षितासी युद्ध कोणिकडे । दीक्षितासी क्रूरत्व कोठें घडे ।
दिक्षितें मन होमाकडे । निजनिवाडें लावावें ॥२७॥
दिक्षितें उठोनि प्रातःकाळीं । स्नानसंध्या सारोनि कुंडाजवळी ।
बैसावें मग मंत्रोमेळीं । अग्नि तृप्त करावा ॥२८॥
ऐकोनि गुरूचे वचन । राजा सांडी धनुष्यबाण ।
अग्नीपासीं येवोनि आपण । सावधान बैसला ॥२९॥
तें देखोनि लंकानाथ । जिंतिलें म्हणोनि आनंदत ।
शुकसारणादि प्रधान समस्त । अवघे म्हणत जयो स्वामी ॥३०॥
जिंतिलें म्हणोनि गर्जन । करिते झाले राक्षसगण ।
आपुले ठायीं श्लाघोन । उल्लास जाण पावले ॥३१॥
यज्ञीं होते पोते उद्राते । आचार्य ब्रह्मा भक्षिलें त्यातें ।
रक्त पिवोनि खाती मांसातें । निशाचर तृप्तीतें पावलें ॥३३॥

रावण निघून गेलेला पाहून देवांनी आपले मूळचे रूप धारण केले :

रजिपातें जिंतोन । जयो पावला दशानन ।
मग पुष्पकीं आरूढोन । अवनिपर्यटन करिता झाला ॥३४॥
रावण गेला देखोन । इंद्रादिक देवगण ।
निजरूप धरिते झाले जाण । सावधान अवधारा ॥३५॥
अमरेंद्र निजरूप धरोन । मयूराप्रति बोले वचन ।
म्हणे मी झालों सुप्रसन्न । वरदान तुज देतों ॥३६॥

इंद्राकडून मोराला वरदान :

हे माझे सहस्त्र नेत्र । ते तुझे पांखीं भासती निश्चित ।
ते तुज दिधले स्वतंत्र । अगा भुजागारे विहंगमा ॥३७॥
माझे नेत्र सहस्त्रवरी । तुढे बर्ह होती निर्धारीं ।
आणि मी वर्षेन जळधारीं । तुज आनंद भारी होईल ॥३८॥
पूर्वी मयूराचे पांख नीळवर्ण । त्यावरी इंद्राचें वरदान ।
नीळवर्णी विचित्र पूर्ण । रंग जाण भासला ॥३९॥
तदनंतरें श्रीरघुपति । वरूण वदे हंसाप्रति ।
अगा ये पक्षिराजा धर्ममूर्तिं । प्रसन्न झालों मी येथें ॥४०॥

वरूणाचे हंसाला वरदान :

वरूण म्हणे हंसासि जाण । तुझें गंगातीरी क्रीडण ।
तुझें शरीर ओयासमान । संगीं प्रभा पूर्ण भासेल ॥४१॥
ऐक माझी प्रसन्नता । पत्ररथ हंसनाथा ।
तुझा वर्ण मनोहर सौ म्यता । शशीसारिखा निर्मळ ॥४२॥
जैसा व्योमीं समीरण । विचरतसे स्वेच्छेंकरून ।
तैसें तुझे उड्डानें गगन । शोभा गहन पावेल ॥४३॥
माझिया देहासमान । प्रभा होईल तोयचरा पूर्ण ।
जें जें ईप्सितें तुझें मन । ते मनोरथ जाण पावसी ॥४४॥
उदका तुज अति प्रीती । होईल विहंगमा निश्चितीं ।
प्रीतीचें लक्षण ज्ञाते जाणती । प्रीतीनें प्रीती वाढतसे ॥४५॥
हंसा पूर्वी श्रीरघुनाथा । ऐक श्रावणारिसुता ।
वैश्रवण कृकलास वर देतां । प्रत्युत्तरीं पैं वदला ॥४७॥

कुबेराचे कृकलासाला वरदान :

कुबेर म्हणे कृकलासाप्रती । प्रसन्न झालों जाण निश्चितीं ।
तुझें शरीर सुवर्णकांती । मी संतोषोन तुज देतों ॥४८॥
आणिक कृकलासा ऐक । तुझे मस्तकीं शिखा देख ।
होईल जाण निःशेख । किंचित श्यामता शरीरीं ॥४९॥
तदनंतरें धरणिजापती । यमराज हर्षानंदें चित्तीं ।
कागाप्रति वदे वरदोक्ती । सुनिश्चितीं अवधारा ॥५०॥

यमाकडून कावळ्याला वरदान :

यम म्हणे कागासी । तुज मी प्रसन्न निश्चियेंसी ।
प्रीतीनें ऐक माझिया वचनासी । सावधान होवोनी ॥५१॥
दशाहाचा पिंड जाण । जे नर देती तुजलागोन ।
तयांसि होय स्वर्गगमन । अन्यथा जाण पैं नव्हे ॥५२॥
जे नर मरण पावती । त्यांचें दहा दिवसांचे अंतीं ।
बळिप्रदान तुज देती । ते पावती स्वर्गासी ॥ ५३ ॥
आणिक तुज वरदान । देतो मी धर्मराज आपण ।
तुज होईल अमरपण । अमरत्वाचें लक्षण अवधारीं ॥५४॥
शरीरीं पीडा उपजोन । अनेक मरती प्राणिजन ।
तैसे तुज नाहीं जाण । देहआरोग्य सदा तुझें ॥५५॥
परहस्तें तुज मरण । होईल हें सत्य जाण ।
स्व-इच्छेनें तुज मरण । नाहीं जाण पक्षिराजा ॥५६॥

एवं दत्वा वरांस्तेभ्यस्तस्मिन्यज्ञाश्रमे सुराः ।
निवृत्ते यज्ञसमये पुनः स्वविषयं गतः ॥३॥

यज्ञसमाप्तीनंतर देव आपापल्या लोकाला गेले :

ऐसा वर देवोनि तयांतें । यज्ञाश्रमीं सुर जे होते ।
यज्ञसमाप्ति करोनि स्वकार्यातें । जाते झाले देवगण ॥५७॥
ते म्हणाल कोण कोण । तयांची नावें मी सांगेन ।
इंद्र यम कुबेर वरुण । हे मुख्य जाण चवघेही ॥५८॥
रावणाच्या भयेंकरीं । रूपे पालटलीं होतीं सुरीं ।
ते निजरुप धरोनि निर्धारीं । आपुलालिया लोका पैं गेले ॥५९॥
एका जनार्दना शरण । मी नेणें मूळींचें निरुपण ।
नेणे श्लोकपद अन्वय जाण । शास्त्रव्याख्यान मी नेणें ॥६०॥
मी नेणें कळाकुसरी । मी नेणें साहित्याची भरोभरी ।
नेणें सुगंधचातुरी । एका जनार्दनावाचूनी ॥६१॥
नेणें श्लोकिंचा श्लोकार्थ । नेणें नवरस कासिया म्हणत ।
नेणें प्रबंधरचना येथ । एका जनार्दनावांचूनी ॥६२॥
मी संतांचे लळिवाड । संत माझें पुरविती कोड ।
संतांवांचूनि भव अवघड । कोणाचेनि निवारे ॥६३॥
एका जनार्दना शरण । पुढें गोड निरुपण ।
पृथ्वीजयो पावेल दशानन । श्रोतीं सावधान ऐकिजे ॥६४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
मरुत्तयज्ञगमनं नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥
ओंव्या ॥६४॥ श्लोक ॥३॥ एवं ॥६७॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *