भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठ्ठाविसावा
शूर्पणखेचे दंडकारण्यात गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
दाशरथि वीरचूडमणी । कथा पुसे कुंभोद्भवालागूनी ।
म्हणे वरुणपुत्रातें जिंतोनी । रावणें पुढें काय केलें ॥१॥
अगस्ति म्हणे वीरशार्दूळा । जमकमाता अयोध्याभूपाळा ।
पूर्णब्रह्म अवतारखेळा । खेळतोसी नटनाट्यें ॥२॥
निर्विकल्प ब्रह्म तूं सनातन । विरंचि हा तुझा नंदन ।
जयानें सृष्टि केली निर्माण । ब्रह्मसृष्टि जाण म्हणिजे ते ॥३॥
तुझी आज्ञा वंदी कळिकाळ । तुझी माया हे लोकां सबळ ।
तो तूं आम्हाप्रति कुशळ । कथा ऐकों इच्छिसी ॥४॥
तरी ऐकें गा श्रीरामचंद्रा । निर्गुणा जी गुणसमुद्रा ।
तुझिये आज्ञेनें नरेंद्रा । वाचा चारी वदती शब्द ॥५॥
रावणाकडून वरुणस्त्रियांचें अपहरण :
पुढें त्या पौलस्तिनंदनें । वरुणलोक जिंतोनि तेणें ।
महावीर मारोनि सेने । त्यांच्या स्त्रिया देखिल्या ॥६॥
सुंदरा आणि अति सुकुमारा । राजकन्या गंधर्वकन्या अपारा ।
आणि ऋषिकन्या थोरथोरा । हरिता झाला लंकेश ॥७॥
पन्नग यक्ष सुगरण । दैत्य आणि सिद्ध चारण ।
त्या समस्तांतें मारुन । स्त्रिया जाण हरिता झाला ॥८॥
स्त्रिया वाहोनि विमानीं । रावण परतला घेवोनि ।
मार्ग क्रमितां योषिता जनीं । खेद करिती आक्रंदें ॥९॥
त्या स्त्रियांचा विलाप :
म्हणती पूर्वी काय पाप केलें । राक्षसें आमुच्या भ्रतारां मारिलें ।
गणगोता निःसंतान केलें । पुढें आमुतें भक्षील हा ॥१०॥
अदृष्ट आमुचें बळवंत । म्हणोनि रावणा झालों प्राप्त ।
विमानीं भरोनि स्त्रिया समस्त । असे नेत लंकेसीं ॥११॥
नदिया समुद्रीं जेंवी भरती । तेणें पूर्ण अपांपती ।
तैशा विमानीं स्त्रिया नेणों किती । लंकेप्रती चालविल्या ॥१२॥
मार्गी स्त्रिया शोक करिती । एक रडती आक्रंदती ।
एक कानकेश तोडिती । एक चरफडती अति दुःखें ॥१३॥
अधोमुखें एकी करिती । एकी भूमीवरी उदकें लिहिती ।
जे रावणकुळा हो समाप्ती । ऐसें म्हणती पैं एकी ॥१४॥
या स्त्रियांचें वर्णितां रुप । देखोनि लाजे कंदर्प ।
अष्टनायिकाही त्यांपुढें अल्प । लाजें समीप येवों न शकती ॥१५॥
एकीचे केश लंबायमान । एकी चंद्रवदना संपूर्ण ।
एकींचे मृगांसारिखे नयन । एकी तरुण षोडशवर्षा ॥१६॥
बाला प्रौढा मुग्धा नारी । शोक करिती नानापरी ।
म्हणती अगा ये त्रिपुरारी । कोण कर्म आमुचें ॥१७॥
तया शोकेंकरोनि जाण । काळवंडलें ते विमान ।
जेंवी अग्निहोत्राच्या धुरें जाण । गृह काळिमा पावत ॥१८॥
श्वासोच्छ्वास टाकिती । एकी पूर्वस्थिती आठविती ।
आम्हांवीण आमुचे पती । कोण गती पावतील ॥१९॥
आमुचे पुत्र आम्हांवीण । सांडीतील आपुला प्राण ।
सासू सासरे दीर भावे जाण । कोण गती करितील ॥२०॥
आम्ही पतिव्रता पतीवीण । येथें सांडूं पाहों प्राण ।
परी हा राक्षस दुर्जन । न लागतां क्षण मारील ॥२१॥
रावणातें मृत्यु होतां । आम्हीं जावें अधःपाता ।
अथवा स्वबुद्धी प्राण त्यागितां । नरकपाता पाविजे ॥२२॥
पूर्वजन्मीं कोण आचरण । केलें असेल दारुण ।
तेणें पापें रावणें धरुन । लंकाभिगमन करवितो ॥२३॥
प्रारब्ध बळवंत सृष्टीं । तें भोगवितें दुःखकोटीं ।
विधात्या दुष्टें लिहिलें ललाटीं । कर्म आपुलें देखोनी ॥२४॥
अदुष्ट आमुचें बळवंत । तेणें बंधन झालें प्राप्त ।
आम्हां सोडविता नाहीं येथ । एका अच्युतावांचोनी ॥२५॥
रावणाला शाप :
आमचें रावणें केलें ग्रहण । दुष्ट दुरात्मा निंद्य जाण ।
पुढें स्त्रियांचें करितां ग्रहण । अवश्य मरण पावेल ॥२६॥
ऐसा शाप वदती कन्यका । पुढें परदार धरितां दशमुखा ।
मरण पावेल सकुळी देखा । आमचेनि दुःखकरोनी ॥२७॥
तदनंतर लंकापती । प्रवेशला लंकेप्रती ।
समस्त राक्षस पूजिती । राजा म्हणोनि लंकेचा ॥२८॥
रावणासमोर शूर्पणखेने पतिनिधनाचा विलाप केला :
इतुकियावरी काय वर्तलें । शूर्पणखेनें काय केलें ।
येवोनि रायापुढें घडविलें । दुःखार्णवाचें भांडार ॥२९॥
रावणाच्या पायांवरी पडे । अति आक्रंदोनि दीर्घ रडे ।
अंग टाकी चहूंकडे । ललाट करें पीटित ॥३०॥
मग रावण म्हणे तियेसी । काय झालें सांग आम्हांसी ।
कवणें तूं गांजिलिसी । शोक करिसी कासया ॥३१॥
वक्रदृष्टीनें तूतें । कोणीं पाहिलें सांग मातें ।
कीं कोणें दाविलें हातातें । त्याच्या प्राणातें घेईन ॥३२॥
बंधूचें ऐकोनि वचन । शूर्पणखा बोले आपण ।
म्हणे राया माझ्या प्राणपतीचें हनन । तुवां संग्रामीं केलें पैं ॥३३॥
अगा ये बंधो अवधारीं । तुझेनि वैधव्य माझे शिरीं ।
ऐसी तुझ्या बळाची थोरी । सचराचरीं वानिजे ॥३४॥
शालक रणीं मारुन । भगिनीस वैधव्य भूषण ।
तुझी कीर्ती जगीं पावन । बंदिजन वाखाणिती ॥३५॥
तूं निलाजिरा लंकानाथा । शालकावधाची तुज हत्या ।
येरु म्हणे तुझा भर्ता । कोणे काळीं वधिला म्यां ॥३६॥
येरी म्हणे काळिकेय दैत्य । मारिला तैंच माझा कांत ।
तूंचि वैरी तयासि अन्यत्र । नाहीं वधाकरणें ॥३७॥
तुंवा वैर करुन । काळिकेय मारिले दैत्यगण ।
तयांत माझें पतिनिधान । तुंवा तस्करें हरिलें रे ॥३८॥
रावण म्हणे भगिनीप्रती । म्यां युद्ध केलें अगाधख्याती ।
रणमद चढला तेणें भ्रांतीं । आपपर नेणेंच ॥३९॥
भद्रे मजकारित्म रण । नाठवेचि मीतूंपण ।
यालागीं तूं आपण । दुःख दारुण न करावें ॥४०॥
शूर्पणखेला खर-दूषणांसह दंडकारण्य दिले :
अवो वत्से भय सांडीं । दुःखा करीं देशोधडीं ।
भोगीं निजसुख आवडीं । बंधुचेनि प्रसादें ॥४१॥
मी तुज देतों मान दान । आणिक करावया संरक्षण ।
तुझे पाठीसी ठेवितों खरदूषण । बंधूचेनि प्रसादें ॥४२॥
दंडकारण्य जनस्थानीं । ब्रह्मगिरी समीप तेथोनी ।
गोदा अरुणा वरुणा त्रिवेणी । ओघ पूर्ण ते ठायीं ॥४३॥
पद्मपुरनाम नगर । दूषणेंसीं तुम्हीं वसावें सत्वर ।
शाप वदला भृगुमुनिवर । जे दंडकीं राक्षस असतील ॥४४॥
मान देवोनि मुनीच्या वचना । तुम्हीं तेथें करावें गमना ।
चवदा सहस्त्र राक्षससैन्या । घेवोनि तुम्हीं पैं जावें ॥४५॥
तेथें होईल तुमची कीर्ती । खरदूषणांही शीघ्रगतीं ।
जावें वेगीं पद्मपुराप्रती । ऐसे नृपती बोलिला ॥४६॥
ऐकोनि रावणाचें वचन । शूर्पणखा बंधुसहित ससैन्य ।
वेगीं विमानीं आरुढोन । दंडकारण्य पावली ॥४७॥
खरदूषणां पद्मपुरींचें । राज्य दिधलें रावणें साचें ।
शूर्पणखेसी प्रधानत्व तेथींचें । लंकानायके पैं केलें ॥४८॥
शूर्पणखेचे प्रीतीकरुन । रावण वसवी दंडकारण्य ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
शूर्पणखाखरदूषणदंडकारण्यप्रवेशो नाम अष्टाविंशतितमोऽध्यायः ॥२८॥ ओंव्या ॥४९॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठ्ठाविसावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अठ्ठाविसावा