संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा

लक्ष्मण-हनुमंताला पकडून नेले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

उरलेल्या सैन्याने रामांना वृत्तांत सांगितला :

गतप्रसंगीं अनुसंधान । ऐसें असे निरुपण ।
भरत शत्रुघ्नासी बांधोन । कुशें जाण युद्ध केलें ॥१॥
उरल्या सैन्या करोनि मार । विजयी दोघे राजकुमर ।
भरतशत्रुघ्न बांधोनि वीर । अश्वापासीं राखिलें ॥२॥
येरीकडे रणीं पडिले । ते सावध होवोनि बैसले ।
मागें पुढें पाहात ठेले । तंव कोणी नाहीं युद्ध करित ॥३॥
ऐसें देखोनि घायाळ वीरीं । कण्हत कुंथत साकेतपुरीं ।
प्रवेशतां मार्गीं एके पुरीं । करिती गजरीं महाशब्द ॥४॥
एकांचें फुटलें शिर । एकांचे उखळले कर ।
एक सर्वांगें जर्जर । एक अशुद्धें डवरिले ॥५॥
एक रडत पडत । एक कटिभंगें येती लोळत ।
एकांची लोंबतीं अंतें । घायीं शस्त्र अडकले ॥‍६॥
एकांचें धाकें फुटलें पोट । एकांचा घरघरा वाजे कंठ ।
एकांचे कान नाक सपाट । एक चटपटें दुःख करिती ॥७॥
एक हृदयीं भेदले । एकांचे कंठ भंगले ।
एक भयें वोसणलें । म्हणती मारूं नको कुशा वीरा ॥८॥
ऐसियापरी घायाळ वीरीं । प्रवेशिजे ती अयोध्यापुरी ।
तंव भद्रासनीं दूषणारी । तयासमोर पैं आले ॥९॥
सिंहासनीं जनक जामात । बैसला जैसा काय अब्धिसुत ।
सभोंवतें तारागणें तैसे प्रधान समस्त । अनुज सौमित्र बैसला ॥१०॥
राजवर्ग सभानायक । भोवतीं राजे मांडलिक ।
वसिष्ठविश्वामित्रादि ऋषी सम्यक । सेना सैनिक शोभत ॥११॥
तंव घायाळ पुढें देखिलें । तयांसि लक्ष्मणें पुसों आदरिलें ।
कोण कोठें युद्धें झालें । कोणें गांजिलें तुम्हांसी ॥१२॥
तंव घायाळ म्हणती शुक्रारिअरी । दोघे कुमर वनांतरीं ।
द्वदशवर्षाचिये वीरीं । सेना सैनिक मारिले ॥१३॥
तिहीं दोघीं पराक्रम । करोनि साधिला संग्राम ।
तयांमधील कनिष्ठ परम । तेणें युद्ध पूर्वी केलें ॥१४॥
शत्रुघ्नें तयासि जिंतिलें । धरोनि रथीं बांधिलें ।
तयाचें सोडवणें ज्येष्ठें पुत्र केलें । तें राजेंद्रा अभिनव ॥१५॥
वाल्मीकाचिया आश्रमीं । दोघे कुमर पराक्रमी ।
गौर श्याम एका सादृश्य श्रीरामीं । जानकीसारिखा एक असे ॥१६॥
दोघे दोघांसारिखे । करीं शर आणि चाप काखे ।
धनुर्विद्येंचें अति नेटके । युद्ध न ठाके तयांसीं ॥१७॥
एकें तुमचा वारु धरिला । सैन्यें शत्रुघ्नेंसीं झगटला ।
पराक्रम थोर केला । तो धरोनि आणिला भरतानुजें ॥१८॥
तयाचे सोडविण्याकारणें । ज्येष्ठा झालें युद्धा येणें ।
युद्धीं वीरां केलें ठेंगणें । आकाश बाणीं व्यापिलें ॥१९॥
तेणें घालोनि मोहनशास्त्र । धरोनि नेले दोघे राजकुमर ।
आम्हां वाटतें ते वीर । अयोध्येचें राज्य घेतील ॥२०॥
भरत शत्रुघ्न पाडऊ झाले । दोघे रथासीं बांधिले ।
आम्हांसी मारोनि निघाले । वाल्मीकाच्या आश्रमा ॥२१॥
करोनियां श्रीरामस्मरण । तेणें आमुचें वांचले प्राण ।
सांगतां लज्जा दारुण । वाटतसे हो राजेंद्रा ॥२२॥
सैनिकांचे ऐकोनि वचन । हांसोनि बोले रघुनंदन ।
आश्चर्य करी उर्मिलारमण । म्हणती नवल वर्तलें ॥२३॥
विनोदें बोले रघुनंदन । ते धाकुटें वय सामान्य ।
तिहीं कैसें मारिलें सैन्य । मुख्य नायक धरिले कैसे ॥२४॥
तंव श्रीगुरु म्हणे रावणारी । युद्धीं सामान्य न म्हणावे अरी ।
त्यांचा पुरुषार्थ नृपकेसरी । आम्हां विदित पैं आहे ॥२५॥
कोणी एका क्षत्रियाचे कुमर । विद्या शिकवी वाल्मीक ऋषीश्वर ।
ते महा बळियाढे वीर । अपूर्व कांही न मानावें ॥२६॥
यावरी बोले उर्मिलारमण । मज आज्ञा दीजे कृपा करुन ।
जीत दोघे आणीन धरुन । निजबम्धु सोडवून श्रीरामा ॥२७॥

त्या कुमारांना पकडून आणण्याचा विडा उचलून लक्ष्मण युद्धाला निघाला :

श्रीरामें पैजेचा देवोनि विडा । मग तो लक्ष्मण धनुर्वाडा ।
निजपुरुषार्थाचा पवाडा । अग्रजासमोर बोलतसे ॥२८॥
दोघे बंधु सोडवीन । ते दोघे बंधु जीत धरीन ।
तरीच तुमचा सेवक जाण । विजयी होईन तिहीं लोकीं ॥२९॥
म्हणे रथ पालाणा रे पालाणा । सन्नद्ध करा चतुरंग सेना ।
घाव घातला निशाणां । केली गर्जना महावीरीं ॥३०॥
वीर चढले अश्वांवरी । एक बैसले रथावरी ।
एक आरुढले कुंजरी । एक पायीं निघाले ॥३१॥
सवें जुत्पाती निघाले । नळ नीळ जाबवंत पातले ।
गंधमादन अंगद आले । वायुसुत येता झाला ॥३२॥
संवत्सरलक्ष नृपवर । पुराणसंख्यापद्म वानर ।
सप्त दशकांवरी दोन कोटि वीर । गोळांगूळें चालली ॥३३॥
साकेतपुराबाहेरी । निघाले आपुलाले भारीं ।
पल्लव छत्रें शृंगारीं । मयूरपत्रें झळकती ॥३४॥
रामानुज वीररावो । रिपुदळणीं महाबाहो ।
फुटों पाहे ब्रह्मकटाहो । सेना अगणित चालली ॥३५॥
लागली वाजंत्रांचीं एक घाई । कांनीं पडलें नायकवें कांहीं ।
मुक्तामाळा वारुवां पाहीं । टके पताका नीळवर्ण ॥३६॥
निशाणावरी श्रीरामनाम । ढाला पताका नामांकित परम ।
देखतां रिपूचा पराक्रम । ठेंगणा होय संग्रामीं ॥३७॥

लक्ष्मणसैन्याला अपशकुन, त्यामुळे साशंक :

ऐसे मार्गी चालले । तंव अपशकुन झाले ।
कागपक्षी डावेच गले । आपुलिये भारेंसीं ॥३८॥
सवेंचि पुढें निर्नासिक । केस सुटले उघडा मस्तक ।
समोर द्विज आला एक । तेणे वीर थरारिले ॥३९॥
म्हणती झाला अपशकुन । मागें फिरतां हांसती जन ।
पुढें होतां जीवदान । न उरती निश्चयेसीं ॥४०॥
एक म्हणती सरा मागें । एक म्हणती रहा उगे ।
धैर्य धरोनि लक्ष्मण वेगें । पुढें सेना चालविली ॥४१॥
ऐसे चालिले महावीर । मनीं धाक परम थोर ।
म्हणती काय करील श्रीशंकर । तें न चुके कल्पांतीं ॥४२॥
ऐसें न मानितां चालिले । ऋषिआश्रमासि पातले ।
भार रचोनि राहिले । म्हणती कुमर पैं दोघे ॥४३॥
उभयतां वीरांच्या युद्धाकरणें । स्वर्गीं देवां उत्साह मनें ।
पहावया दाटलीं विमानें । विबुध वरोनि पाहती ॥४४॥
नारद खांदीं घेवोनि वीणा । पाहूं आला युद्धरचना ।
उल्हासें करतसे गर्जना । श्रीराम नारायण म्हणोनी ॥४५॥
हांसे नाचे नारद । पाहोनि सूर्यवंशींच्या वीरांचे युद्ध ।
शेंदी तडतडी राम गोविंद । मुखें नाम उच्चारी ॥४६॥

लवकुशांचे सीतेला अभयवचन :

येरीकडे लहु कुश वीरें । सेना देखिली उल्हासें थोरें ।
म्हणती कृपा केली शाड्.र्गधरें । मातेसि आज्ञा पुसताती ॥४७।
कर जोडोनि दोघे वीर । उभे राहिले जानकीसमोर ।
म्हणती माते आज्ञा सत्वर । अनुग्रह करोनि पैं द्यावी ॥४८॥
जनकजा पाहे दुरोन । तंव देखे सुमित्रानंदन ।
म्हणे आलें रावणारिसैन्य । आतां काय करुं माये ॥४९॥
जानकी म्हणे आज दिवसवरी । पडलें दुःखाच्या सागरीं ।
दोघीं बाळकें वनींचीं सोयरीं । यांसि संकट मांडलें ॥५०॥
आतां काय करावें । किंवा धरणीमध्ये जावें ।
किंवा कुमर पळवावे । आणखिया वनांतरा ॥५१॥
तंव कुमर म्हणती अवो माये । चिंता करुं नको जननीये ।
सेना अवघी मारीन पाहें । सैनिक राजे जीत धरीन ॥५२॥
रणीं नाचवीन रणधेंडा । ओंवाळणीं वीरांच्या मुंडा ।
तृप्त करोनि चामुंडा । रुधिरें सडा घालीन ॥५३॥
तृप्त करोनि भूतगण । मारीन राघवाचे सैन्य ।
तीच तुझे कुशींचा जाण । तरीच शिष्य वाल्मीकीचा ॥५४॥
त्रिसत्य सत्य मम भाषण । हा माझा गुरुसीं अभिमान ।
हें मन पूर्वजां निजभूषण । नाहीं तरी पाषाण जन्मलों दोघे ॥५५॥
ऐसें ऐकोनि पुत्राचें वचन । जानकीचें निवालें मन ।
हर्षे दिधलें चुंबन । ध धान्य ओंवाळोनि सांडी ॥५६॥
दशरथस्नुषा बोले वचन । अवघे आणावे धरुन ।
कोणाचा न घ्यावा जीव प्राण । बंधन करुन राखावे ॥५७॥

मातेला वंदन, लवाकडून अंगदास बंधन :

करोनि मातेसि नमन । दोघीं केल्या प्रदक्षिण ।
नमस्कारोनि गुरुचरण । धनुष्यबाण घेतले ॥५८॥
दोघे जैसे दोनी पर्वत । चालिले पुढें सैन्य लक्षित ।
माथा तुकावोनि धनुष्यीं सीत । चढविते झाले ते समयीं ॥५९॥
ऐसे चालिले रणमेदिनीं । पुढें अंगद देखिला नयनीं ।
तया कुशें हाटकोनि । युद्धालागीं पाचारिलें ॥६०॥
अरे मर्कटसुता महावीरा । धावूं नको सैरावैरा ।
राघवारीचे मंडपाचे बारा । खांब आणिले तैसे नव्हे ॥६१॥
लहुवा राहें साहें म्हणत । तंव अंगदें टाकिला पर्वत ।
येरु शरधारें तोडित । मग म्हणत तारातनयातें ॥६२॥
तें येथें न चले आम्हांसीं । आतां साहें माझ्या बाणासी ।
म्हणोनि विंधिलें अंगदासी । रणीं मूर्च्छेसीं पाडिला ॥६३॥
मग सावध करोनि वालिसुत । लहुवा तयासि बांधित ।
जेथें होते शत्रुघ्न भरत । तेथें नेवोनि घातला ॥६४॥
अंगदा ऐसी दशा देखोन । मग बोलिला भास्करनंदन ।
यासीं युद्ध करितां दारुण । अनर्थ दिसे वानर हो ॥६५॥
इहीं वालिसुत नेला धरोन । आमुचा झाला मुळींच अपमान ।
आतां काय काज वांचोन । स्वर्गीं देव हांसती ॥६६॥
म्हणोनि कपिपति चालिला । म्हणे राहें साहें बाळा ।
तुझे माथेचा जार नाहीं वाळला । काय युद्ध करसील ॥६७॥
सुग्रीव म्हणे तुमची जननी । विसंबली कैसी तुम्हांलागूनी ।
मातेचे लाडके दोनी । कैसे युद्धा आलेति ॥६८॥

कुशाकडून सुग्रीवाची अवहेलना व अस्त्रप्रहाराने रामसैन्याची दाणादाण :

ऐकोनि कुशा आलें हांसें । म्हणे तूं पालेखाइरें पिसें ।
उडावें वृक्षावरी जैसें तैसें । फळें खावयालागूनी ॥६९॥
तुम्हांसी संग्रामा करुं काय । म्हणती वानर मारिलें पाहें ।
तेणें माझी कीर्ती न होय । न वाखाणिजे वीरमुखीं ॥७०॥
ऐसें बोलोनि कुशें जाण । पुन्हां बोलता झाला वचन ।
म्हणे तूं नपुंसक दारुण । श्रीरामा शरण गेलासी ॥७१॥
ज्येष्ठ बंधूनें हरिली कांता । तियेचे दुःखें वनी वसतां ।
भाग्यें भेटलासि रघुनाथा । दोघे सारिखे मिळालेति ॥७२॥
कपटें करोनि वालिवध । तुजही दिधलें राज्यपद ।
तो तूं करुं आलासि युद्ध । हें मज अपूर्व वाटतसे ॥७३॥
आतां करी मजसीं रण । म्हनोनि कुशें श्रीगुरु स्मरोन ।
सीतीं बाण चढवोन । बीजाक्षरें जपता झाला ॥७४॥
जपोनियां बीजाक्षर । शक्ति टाकिली महाघोर ।
तेणें कडकडाटें अंबर । पडों पाहे अवनीवरी ॥७५॥
महा धुंधाट सुटला । वानरां प्रळय आरंभिला ।
म्हणती रघुनाथ कोपला । संहार झाला सकळांचा ॥७६॥
शर लागती झणाझणां । कपि सोडूं पाहती प्राणां ।
म्हणती रक्षीं रक्षीं सुमित्रानंदना । म्हणोनि पाठीं रीघती ॥७७॥
नभीं भोंवतीं पिसारे । आवर्ती पडलीं वनचरें ।
निघती आतें तयाचे भारें । हाहाकार प्रवर्तला ॥७८॥
सुधापानीं भयातुर गगनीं । विमानें पडती खचोनी ।
देव पळाले तेथूनी । बाण लागती म्हणोनियां ॥७९॥
एक शाखामृग म्हणती । कोपिन्नला श्रीरघुपती ।
सादृश्य पुढां देखती । जाणों दुसरा श्रीराम ॥८०॥
एक श्याम राजीवलोचन । दुसरा शोभें गौरवर्ण ।
म्हणती हाचि रघुनंदन । तटस्थ होवोनि पडियेले ॥८१॥
पडिले अष्टादृश जुत्पती । मूर्च्छिर पडिले नाहीं शक्ती ।
मग लहुवें बांधिलें निगुतीं । तयांची नामें अवधारा ॥८२॥
नळ नीळ जांबवंत । सुग्रीव सुषेण दधिमुख वीर्यवंत ।
द्विविद कुमुद तारासुत । गंधमादन दहावा ॥८३॥
तार तरश हेमकूट । पनस केसरी सुभट ।
गज गवाक्ष धीट । अठरा जुत्पती ऐसे हे ॥८४॥
जेथें होते रामनुज । तेथें नेला कपिसमाज ।
बांधोनि पुन्हां वीरराज । सावध असे रणभूमीं ॥८५॥

लक्ष्मण सचिंत :

येरीकडे शक्रारिहंता । म्हणे काय करावें वायुसुता ।
अपकीर्ति बैसली माथां । उपाय पुढां न दिसेचि ॥८६॥
आमचे महाकपि वीर । संग्रामीं जिहीं जिंकिले निशाचर ।
तयांतें बांधोनि हे कुमर । नेती द्वादश वर्षांचें बलाढ्य ॥८७॥
काय हे स्रष्ट्यानें रचिले । किंवा अवनीपासाव झाले ।
कीं अकरा रुद्र एकवटले । द्वैतरुप धरोनी ॥८८॥
किंवा दोन रुपें हे कळिकाळ । कीं दोघेही श्रीराम प्रबळ गर्वहरण निर्मिले ॥८९॥
कीं ग्रहांत केतु राही । किंवा विष्णु महादेवो ।
किंवा शशिसूर्य पहा हो । रिपुरुप अवतरले ॥९०॥
किंवा रावणारीच्या हत्या । एकीभूत होवोनि समस्ता ।
द्वैतरुपें अंजनीसुता । आम्हांवरी चालिल्या ॥९१॥
कीं जानकीहृदयींचा कोपाग्नी । प्रकटला धरोनि रुपें दोनी ।
पुढरला शोषावयालागूनी । तैसे दोघे दिसताती ॥९२॥
किंवा अवनिजा म्यां सांडिली वनीं । ते होती गा तैं मासत्रयगुर्विणी ।
तिचे हे आत्मज दोनी । असित गौर दिसती ॥९३॥
लहु रावणारीसारिखा । कुशा धरणिजे सादृश्य देखा ।
हनुमंता तुज असे ठाऊका । हा वृत्तांत गुप्त करीं ॥९४॥
जरी हे धाटुके म्हणावे कुमर । तरी शक्ति सुरेशाहूनि थोर ।
धरोनि आमुचें वीरें वीर । लाज थोर लाविली इहीं ॥९५॥
पुढे काय युद्ध करावें । युद्ध करितां घेतील जीवें ।
फिरोनि जातां हांसिजेल राघवें । नपुंसक म्हणोनी ॥९६॥
इतुकें ऐकोनि वायुसुत । सौमित्राप्रति झाला बोलत ।
जैसा श्रीराम तैसे तुम्ही आम्हां येथ । माझा पुरुषार्थ पहावा ॥९७॥

मारुतीची वल्गना; कुशाकडून पराभव :

रुद्रावेशें रुद्र जाणा । पुच्छ वाहोनियां गगना ।
आरक्त करोनियां नयना । केली गर्जना विटंक ॥९८॥
हनुमान म्हणे अरे वीरा । मागें सरुं नको धरीं धीरा ।
तुज म्हणों ती एकसरा । सावध पैं व्हावें ॥९९॥
कुश बोले ते समयीं । अरे मर्कटा मुख आपुलें दर्पणीं पाहीं ।
काळें झालें ये समयीं । काय दाविसी पामरा ॥१००॥
लंका जाळिली तये वेळें । मुख तुझें झालें काळें ।
सिंतरोनि राक्षसें निर्बळें । रणरंगी मारिलीं ॥१॥
कुश म्हणे अंजनीसुता । ऐक तुझ्या स्वामीची कथा ।
जेणें घरचीं दवडिलीं कांता । तयाची कथा कायसी ॥२॥
नांदती स्त्री दवडिली । तयाची विरश्री काय चांगली ।
आतां तुम्हां भुली पडली । युद्ध करुं आलेती ॥३॥
ऐसें वर्तलें तुमचे घरीं । ज्याची शक्ति झाली रानभरी ।
तो पुरुष यशवंत या संसारीं । कोणे समयीं होईल ॥४॥
उणें स्वामीचें ऐकोन । खवळाला अंजनीनंदन ।
जया शैलावरी बहु वन । घेवोनि गगनीं उडाला ॥५॥
सवेंचि आणिक पर्वत चारी । घेता झाला अशोकवनारी ।
एक उरीं एक शिरीं । कीं दोनी दो कांखे ॥६॥
पंच पर्वतेसीं वायुसुत । येतां जयाचा पिता रघुनाथ ।
मग तेणें वीरें वज्रास्त्र । जपोनि गुणीं लाविलें ॥७॥
पुरती कानाडी ओढून । अभिमंत्रोनि सोडिला बाण ।
वरिचेवरी शैलखंडण । हृदयीं बाण भेदला ॥८॥
पंचकद्वय अयुतें दुरी । हनुमान पिटिला ते अवसरीं ।
सप्तसमुद्रांच्या पारीं । अवनीवरी आफळला ॥९॥
देहाची वळली मुरकुंडी । मान झालीसे वांकडी ।
अशुद्ध वाहों सरलें तोंडीं । गतप्राण ऐसें झालें ॥११०॥
मग सावध होवोनि हनुमंत । तटस्थ राहिला निवांत ।
तंव वायु आल्से धांवत । बुझावीत निजपुत्रा ॥११॥

वायुकडून मारुतीला कुमारांची माहिती :

वायु म्हणे गा हनुमंता । तूं नेणसी त्याच्या वृत्तांता ।
ते राघवाचे पुत्र तत्वतां । पितयासारखे पुरुषार्थी ॥१२॥
लहु कुश दोघे कुमर । बळाचे दोघे गिरिवर ।
तयांत कनिष्ठें हे थोर । युद्धीं प्रौढी दाखविली ॥१३॥
हें वचन प्रकट न करावें । हृदयीं गुप्त असों द्यावें ।
पुढील कर्तव्य लक्षावें । वेगीं जावें रामकार्या ॥१४॥
ऐकोनि पित्याचें वचन । हनुमान खालती घाली मान ।
हृदयीं स्मरे श्रीरामचरण । माझें स्मरण असो द्यावें ॥१५॥
ऐसा तो श्रीहनुमंत । हृदसीं स्मरोनि श्रीरघुनाथ ।
हळु हळु निजकटकांत । येता झाला लाजेनें ॥१६॥
वज्रदेही बळियाढा । एवढे भोगिलें दुर्वाडा ।
तेथें कायसें इतरांच्या पाडा । वानरां मूढां कोण पुसे ॥१७॥
ऐसियापरी श्रीराम स्मरण । देखे हनुमान आपुलें सैन्य ।
लाजा प्राण जाय तंव लक्ष्मणें । दुरोनि येतां देखिला ॥१८॥

लक्ष्मणाचा आवेश व कुशाकडून त्याचा उपहास :

सौमित्र म्हणे गा कपिवीरा । थोर कष्टलासी परम शूरा ।
आतां स्थिर राहें मी या कुमरां । सीक लावीन रणमारें ॥१९॥
मग चालिला रामानुज । जयाचा रथ दिव्य तेजःपुंज ।
वारुवा सांट देवोनि विज । निजभारेंसीं लोटला ॥१२०॥
धनुष्यीं चढवोनियां गुण । बोलता झाला लक्ष्मण ।
अरे वीर हो श्रीरामा शरण । येतां प्राण राखीन तुमचें ॥२१॥
ऐसें न माने तुमच्या चित्ता । तरी प्राण घेईन आतां ।
पळूं नका धीर धरा पुरता । सोडा संग्रामाचा साटोप ॥२२॥
तुम्हीं वारु आमुचा धरिला । हाचि अन्याय मोठा केला ।
दुसरा अपराध वीरें वीर धरिला । शत्रुघ्नभरतादिकरोनि ॥२३॥
तयांचा सूड मी घेईन । तुम्हां दोघां धरुन नेईन ।
वारु आपुला सोडवीन । निजवीरांसमवेत ॥२४॥
ऐसें शक्रारीचें वचन । ऐकोनि कुश बोलिला आपण ।
तुमचा ठाउका अभिमान । पूर्वीच आम्हीं आयकिला ॥२५॥
तुमची कीर्ति तुम्हांप्रती । सांगतो ऐका एकाग्रचित्तीं ।
जैं रावणें घातली शक्तीं । तैं भूमिशयन तुम्हीं केलें ॥२६॥
तेथें निवडला पुरुषार्थ । दैवें होता हनुमंत ।
घेवोनि आला वल्लीचा पर्वत । उपचारार्थ योजिला ॥२७॥
तूं पूर्वीच रावणभगिनी । शूर्पणखा नामें जनस्थानीं ।
तियेचे नासिकाकानीं । पुरुषार्थ थोर मिरविला ॥२८॥
विटंबोनियां तियेतें । थोर मिरविलें पुरुषार्थातें ।
कहाणी सांगता मातें । तें अनुभवा येईल ॥२९॥
स्त्रियेतें जें विटंबती । तयांची थोर उपतिष्ठे कीर्ति ।
तेचि तुम्ही येथे मुख्य पुरुषार्थी । युद्धालागीं आले असां ॥१३०॥
ब्रह्मचर्य धरोनि व्रत । वधिला रणीं इंद्रजित ।
तें काहीं न चले येथ । आतां आपणा सांभळीं ॥३१॥
या लतामृगांचे बळें । बंधु सोडवूं आलेति सबळें ।
भरत शत्रुघ्न वानरपाळें । पहा दशा भोगिताती ॥३२॥
आतां तुम्हां तेचि गती । विमुख झाला श्रीरघुपती ।
अवघी तुमची गेली शक्ती । हें निश्चितीं जाणा पां ॥३३॥

लक्ष्मण-कुशाचे द्वंद्वयुद्ध :

ऐसीं कुशाची ऐकोनि वचनें । रथ प्रेरिला लक्ष्मणें ।
दृढ कार्मुक सत्राणें । कर्णापर्यंत ओढिलें ॥३४॥
सौमित्रकरींचा बाण । सुटका करित गर्जन ।
तयाचे पोटीं लक्षकोटी बाण । बाणां बाण प्रसवले ॥३५॥
जैशीं मुखांतुनि अक्षरें । निघती नानावर्णउच्चारें ।
तैसें सौमित्राचेनि शरें । शरांते शर प्रसवत ॥३६॥
जैशा पर्जन्याचा धारा । अच्छादिती गिरिवरा ।
तैशा सौमित्राच्या शरधारा । गगन बाणीं व्यापिलें ॥३७॥
संधान सौमित्राचें अद्भूत । देखोनि काय करी जानकीसुत ।
नवमुख बाण घेवोनि त्वरित । परदळावरी मोकलिला ॥३८॥
शरें शरां खंडणा झाली । जैशी पंडितें मूर्खपृच्छा खंडिली ।
हें देखोनि म्हणे ज्याची माउली । सुमित्रादेवी ॥३९॥
लक्ष्मण म्हणे अरे वीरा । धन्य धन्य तुझा गुरु पुरा ।
कोणे जननीचे उदरा । येवोनि वंशीं कीर्ति केली ॥१४०॥
धन्य तुझे जननीजनक । व्ंशीं जन्मलासी कुळटिळक ।
संधान करितं अचुक । हें अपूर्व देखिलें ॥४१॥
माझें जे शरसंधान । वरिच्यावरी केलें खंडन ।
कायसें आतां रणकंदन । आश्चर्य लक्ष्मण करिता झाला ॥४२॥
पुनरपि सुमित्रेचा बाळ । सोडिता झाला शरकल्लोळ ।
वरिचेवरी छेदि कुश कुशल । परम कोपा चढलासे ॥४३॥
कुश पेटला महामारीं । बोहरी करी वरिच्यावरी ।
गजा मारीं गजें करीं । अश्वें अश्व ठोकित ॥४४॥
एक सौमित्रासी भिडत । एक सैन्यासी मार देत ।
दोघीं केला प्रळयअंत । देव कौतुक पाहती ॥४५॥
कुशवीरें तये वेळे । भैरवास्त्र मोकलिलें ।
अष्ट भैरव पातले । तें अपूर्व परियेसा ॥४६॥
अष्टभुज करीं डौर । अवनीं लागती जटाभार ।
हातीं त्रिशूळ करी तोमर । अश्व कुंजर पळताती ॥४७॥
अद्भूत देखोनि संधाना । त्रिशूळा लागती लक्ष्मणा ।
न निवारे देखोनि वायुनंदना । स्फुरणा आलें ते समयीं ॥४८॥
आवेंशें करित गर्जना । धाकें भैरव घेवोनि प्राणा ।
पळाले लंघोनि दिशा नाना । दिग्गजांआड लपाले ॥४९॥
ऐसें देखोनि कुशवीरें । मोहनास्त्र जपोनि बीजाक्षरें ।
प्रेरिलें तेणें प्रतापकरें । पडे अंधारे लक्ष्मणासी ॥१५०॥
धूमीं दाटली समस्त वीरां । हातींचीं गळालीं शत्रें झरारां ।
चाकाटलें पाहती अंबरा । एक नेत्र झांकिती ॥५१॥
एकीं दीर्घ शयन केलें । एक विस्मयातें पावले ।
संग्राम करुं विसरले । मौन पडलें समस्तां ॥५२॥

हनुमंताला अटक :

ऐसें वर्तलें रणमंडळीं । मग दोघे बंधु तये वेळीं ।
काय करिते झाले ते काळीं । सुरवरीं पाहूं आदरिलें ॥५३॥
पुच्छीं धरोनि हनुमंत । कुश फरफरां ओढोनि नेत ।
लहूनें धरोनि सुमित्रासुत । विनोदें वनांत आणिला ॥५४॥
तयांसी बंधन पैं केलें । हनुमंतासी पुच्छीं बांधिलें ।
मग दोघे निघते झाले । गुरुदर्शनालागोनी ॥५५॥
सद्गुरुंसीं करोनि नमन । सांगितला वृत्तांत संपूर्ण ।
ऐकोनि हांसे मुनिगण । समस्त ऋषिजन सुखावले ॥५६॥
सीतेसि करोनि नमस्कार । आनंदें दोघे झाले निर्भर ।
टाळिया पिटिती द्विजवर । म्हणती अपूर्व वर्तलें ॥५७॥
पुढें पित्या पुत्रासीं । युद्ध होईल परमावेशीं ।
ऐक्य होवोनि समरसीं । चवघे जण मिळतील ॥५८॥
एका जनार्दना शरण । पुढील रसाळ निरुपण ।
श्रोते होवोनि सावधान । परिसा रामायण अति गोड ॥५९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणहनुमंतजुत्पतीबंधनं नाम अष्टषष्टितमोऽध्यायः ॥६८॥ ओंव्या ॥१५९ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा