भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा

रावण सैन्याचा संहार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अपमानामुळे उद्विग्न झालेल्या इंद्रजिताचे पलायन व बिळात प्रवेश

इंद्रजित पावोनि अपमान । अतिशयें जाला उद्विग्न ।
हनुमंताचें बळलक्षण । सर्वथा संपूर्ण लक्षेना ॥ १ ॥
हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची संग्रामशक्ती ।
हनुमंताची सवेग गती । अतर्क्यस्थिती लक्षेना ॥ २ ॥
अतर्क्य हनुमंताची गती । ते लक्षेना नाना युक्तीं ।
इंद्रजिताची खुंटली मती । रणीं मारूती नाटोपे ॥ ३ ॥
रणीं नाटोपे मारूती । आपुलें पूर्वशौर्य कीर्तीं ।
वानरें नेली निंदेप्रतीं । सलज्ज चित्तीं इंद्रजित ॥ ४ ॥
इंद्रातें रणीं जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।
वानरांसीं करितां रण । तृणसमान मज केलें ॥ ५ ॥
मी एक गाढा वीर सृष्टीं । ऐसा फुगारा होता पोटीं ।
रणीं वानरें पुरवोनि पाठी । तृणासाठीं मज केलें ॥ ६ ॥
जळों माझी धैर्यशक्ती । माझी जळो वीरवृत्ती ।
रणीं नाटोपे मारूती । कीर्ति अपकीर्ति मज माझी ॥ ७ ॥
भंगिला रथ आणि सारथि । भस्म केली शस्त्रसंपत्ती ।
रणीं न जिंकवे मारूती । क्षीणशक्ति इंद्रजित ॥ ८ ॥
न चले शस्त्रास्त्रयुक्ती । न चले मल्लविद्याव्युत्पत्ती ।
कपट न चले वानराप्रती । चिंतावर्तीं इंद्रजित ॥ ९ ॥
कोणी एखादी युक्ती । न चले ह्या वानराप्रती ।
जळो माझी यश:कीर्ती । चिंतावर्ती इंद्रजित ॥ १० ॥
माझ्या वरदाची वरोक्ती । मारूं न शके मज मारूती ।
धरोनि नेलिया रामाप्रती । विटंबिती वानरें ॥ ११ ॥
रावणें आणिलें सीतेसी । बांधून नेईल मज रामापासीं ।
तेथें करितां अपमानासीं । वानरांसी कोण वारी ॥ १२ ॥
रावणें होऊनि भिकारी । चोरोनि आणिली सीता सुंदरी ।
वानरें करोनि जुंझारी । मज निर्धारीं नेईल ॥ १३ ॥
अंगदाच्या पाळण्यासीं । खेळणें बांधिलें दशमुखासी ।
पौलस्तीनें मागतां त्यासी । अपमानेंसीं सोडिला ॥ १४ ॥
मुंडोनि दाढ्या मिशांसी । मसी लावोनियां मुखांसीं ।
पांच पाट काढोनि शिरासीं । ऐसा लंकेसीं धाडिला ॥ १५ ॥
मज धरोनि नेलिया मारूती । माझी होईल तैसीच गती ।
कांही नचले उपपत्ती । चिंतावर्ती इंद्रजित ॥ १६ ॥
पुच्छी बांधोनि हनुमंता । येथोनि मज धरोनि नेतां ।
धांवण्या कोणी नये सर्वथा । परम चिंता इंद्रजितां ॥ १७ ॥
सुबद्ध धाक घेतला पोटीं । रणीं वानरा देवोनि पाठी ।
इंद्रजित पळे उठाउठीं । पुच्छासाठीं धाकोनी ॥ १८ ॥
पळता न पळवे पुढें । पडिलें पुच्छाचें बिरडें ।
तेथल्या विवरामाजी दडे । बहु माकडें गांजिलें ॥ १९ ॥
दुस्तर धाक घेतला मनीं । गुप्त विवर अशोकवनीं ।
इंद्रजित गेला पळोनी । सुलीन होवोनि दडाला ॥ २० ॥

मारूतीचा विवेक व पुच्छाशी विचारविनिमय :

हनुमंत वीर जगजेठी । न लागेचि पळत्यापाठीं ।
समूळ विचारोनि पोटीं । विवेकदृष्टीं राहिला ॥ २१ ॥
इंद्रजिताचें निजमरण । सर्वथा नाहीं मजअधीन ।
तरी कां वृथां करूं निर्वाण । आंगवण कां नासूं ॥ २२ ॥
इंद्रजितासी मज मारितां । क्षण न लगे पैं आतां ।
ब्रह्मवरदाची वार्ता । मिथ्या सर्वथा मी न करीं ॥ २३ ॥
ऐसऐसिया विवेकदृष्टीं । हनुमान न लागे इंद्रजितापाठीं ।
सैन्य अवलोकिले दृष्टीं । धांवे कडकडाटीं वधावया ॥ २४ ॥
पुच्छ म्हणे स्वामीनाथा । कवळोनि राखिलें समस्तां ।
तूं भागलासि युद्ध करितां । मज वधार्था दे आज्ञा ॥ २५ ॥
हनुमंत म्हणे तुझेनि बळें । म्यां महावीरां मांडिलें छळें ।
आतां विभांडोनियां दळें । रणकल्लोळें विचरोनि ॥ २६ ॥
मी जातें तूं घालीं वैरण । ऐसेनि भरडू राक्षसधान्य ।
डोळ उरती जे सघन । रणकंदन करूं त्यांसी ॥ २७ ॥
मारावया सैन्यसंभार । करोनि पुच्छासीं विचार ।
मग दिधला भुभु:कार । निशाचर खळवळले ॥ २८ ॥

मारूतीने व शेपटीने केलेला सैन्याचा संहार :

हनुमान देखोनि महाबळी । असुरीं मांडिली तंव फळी ।
शस्त्रें सुटलीं समकाळीं । नभू भूतळीं न समाती ॥ २९ ॥
अतिरथी महारथी । अखपती गजपती ।
शस्त्रें हाणिती पदाती । रणीं मारूती लक्षोनि ॥ ३० ॥
शस्त्रघाताच्या समेळीं । हनुमान नाचत गोंधळीं ।
पुच्छें शस्त्रांची करोनि होळी । रणसमेळीं विचरत ॥ ३१ ॥
हनुमान रणीं निघटघट । वीर हाणिती सुभट ।
हाणीतां शस्त्रें होती पीठ । हाहा कटकटा राक्षसां ॥ ३२ ॥
करावया सैन्यसमाप्ती । रणीं खवळला मारूती ।
सर्व मारका निजशक्ती । रणीं व्युत्पत्ति अवधारा ॥ ३३ ॥
अश्वीं अश्वातें मारित । गजीं गजातें संहारित ।
रथीं रथ उपडित । मारुनी मत्त सारथी ॥ ३४ ॥
पायींचें पायीं रगडित । वीरें वीर पैं झोडित ।
ध्वज छत्रेंसीं मोडित । रणीं मारित अति मारें ॥ ३५ ॥
पुच्छीं कवळोनि गजकोटी । हनुमान उसळोनि आपटी ।
गजीं गज ते उपटी । पडिलीं सृष्टीं गजदळें ॥ ३६ ॥
विदारितां कुंभस्थळें । निघती गजांची मुक्ताफळें ।
रणीं पाडिलीं गजढिसाळें । पुच्छबळें उपडोनी ॥ ३७ ॥
शायसीं प्रयुतें मत्त हस्ती । पुच्छें केली रणसमाप्ती ।
हस्तींच्या पिष्टकारोनि अस्थी । लाविली ख्याती कपिपुच्छें ॥ ३८ ॥
पुच्छ रिघोनि सैन्यतळीं । महावीरां बांधोनि मोळी ।
आपटितां त्यांसी भूतळीं । जाहली रांगोळी सैन्याची ॥ ३९ ॥
खर उष्ट्र अश्वतर । पुच्छीं बांधोनि अपार ।
तळीं उभे अश्वसंभार । घाये चकचूर करी त्यांचा ॥ ४० ॥
पुच्छें करितां महामार । रणीं उठला हाहाकार ।
येरीकडे हनुमान वीर । करी वीरमार तो ऐका ॥ ४१ ॥
एक मारी महामार । असंख्य रगडिले पायांतळीं ।
अमित मारिले मुष्टिसमेळीं । नखें चिरफळी एकैकां ॥ ४२ ॥
एक मारिले जानुचक्री । वीरीं केली बहुमारी ।
एक मारिले अर्धचंद्री । गिरिवरीं मारिले ॥ ४३ ॥
आंवळोनियां उरावरी । वीर मारिले शतसहस्त्री ।
तळवे हाणोन उपराउपरीं । लक्षांतरीं मारित ॥ ४४ ॥
भुभुःकार देतां अति तवकें । एकें निमालीं उपधाकें ।
एकें पडिलीं अधोमुखें । मेलीं अनेकें अंगवातें ॥ ४५ ॥
देतां भुभुःकार प्रबळ । रणीं उठला हलकल्लोळ ।
भेणें करोनि मूत्रमळ । प्राण तत्काळ सांडिले ॥ ४६ ॥
हनुमंताचे गिरागजरीं । वाजंत्री निमालें नादेंकरीं ।
जो तो रणीं शंख करी । आपांपरी राक्षसां ॥ ४७ ॥
सभोंवता पुच्छाचा आवर्त । मध्यें मारीत हनुमंत ।
जाला सैन्यासी अंत । आला प्राणांत राक्षसां ॥ ४८ ॥
पुच्छें पुरविली पाठी । होऊं नेदी कुटुंबभेटी ।
लंका पाहूं नेदी दृष्टी । जीवासाठी राक्षसां ॥ ४९ ॥
रणीं मारितां हनुमंत । पुच्छ पळों नेदी नगरांत ।
जो तो येवोनि युद्धाआंत । पडे मूर्च्छित अति धाकें ॥ ५० ॥
एक घायें झालीं वेडी । एकें पडली उपडीं ।
एकें नागवीं उघडीं । मेली मढीं होवोनि ठेलीं ॥ ५१ ॥
झाडिला इंद्रजिताचा पादाडा । केला सैन्याचा नितोडा ।
रामनामें हनुमान गाढा । केला झगडा निजटे ॥ ५२ ॥
रथ भंगिले कोट्यनुकोटी । मारिल्या अश्वगजांच्या थाटी ।
छत्रें भंगोनि लोळती सृष्टी । ध्वजा कोट्यनुकोटी विखरलिया ॥ ५३ ॥
अशुद्ध वाहतें गडाडी । तेचि रणनदी गाढी ।
जाहल्या प्रेतांच्या दरडी । गजकरवडी तेचि ग्राह ॥ ५४ ॥
तीर तरती सपिच्छ । तेचि रणनदीचे मत्स्य ।
वोडणें वाहती ते कच्छ । सर्प सपुच्छ रणभालें ॥ ५५ ॥
मेद मांस अति दुर्गम । तोचि दोहीं तीरींचा कर्दम ।
वीर मिसळले विक्रम । सुसरी परम दों भागीं ॥ ५६ ॥
मोक्षसुखाची सुरवाडी । रणनदी वाहे पुराडी ।
सर्वस्वत्यागें घालिती उडी । त्या त्यां जोडीतें तो जाय ॥ ५७ ॥
ध्वजेंसीं वाहे रहंवरू । तेंचि शिडेंसहित तारूं ।
तेथें तारक श्रीरामचंद्रु । पापपरू पावती ॥ ५८ ॥
रिघोनियां रणसमुद्रीं । जो बैसें या तारवावरी ।
त्यासी श्रीराम सूत्रधारी । परपारीं पावती ॥ ५९ ॥
या तारूवातें दृढ जो धरी । त्यासी श्रीराम स्वयें तारी ।
या तारवाची कीर्ति जो करी । राम परपारीं पाववी ॥ ६० ॥
उदो म्हणुनि भद्रकाळी । घेवोनि आली भूतावळी ।
खाती मांसाच्या वडवाळी । रूधिरांजुळी प्राशित ॥ ६१ ॥
या रणाचिया युद्धख्याती । जो आवडीं नित्य गातीं ।
श्रीराम सुखावोनि चित्तीं । त्यांसी तारी स्वानंदें ॥ ६२ ॥
आनंदें नाचे क्षेत्रपाळ । शिरें चौडकें वाहे वेताळ ।
भूतें मिळोनियां सकळ । रणगोंधळ नाचती ॥ ६३ ॥
बहुतां दिवसांचें धरणें । दिधलें हनुमंतें पारणें ।
अवघे घालिती लोटांगणें । विजयी होणें रणरंगीं ॥ ६४ ॥
काळिजें घेवोनि हातीं । रणीं यक्षिणी वाणें देती ।
शंखिणी डंखिणी वाणें घेती । मग भक्षिती स्वानंदें ॥ ६५ ॥
पिकें पिकली रणनगरी । राक्षसदातांच्या राशी थोरी ।
भूतें मोजती कुडवेवरी । पाहे क्रीडेंसीं हनुमंत ॥ ६६ ॥
देव ब्राह्मण दिधलें भैरवांसी । बलुतें दिधलें वेताळासी ।
खळें दान तें भूतांसी । महाकाळीसी राजभाग ॥ ६७ ॥
खळें मातेरें मारकोसी । मेसको तिचे घरची दासी ।
वेसपेंडी सटवीसी । पाळीच्या भार्यासी काळिका ॥ ६८ ॥
अग्रपिकाची व्युत्पत्ती । विभागिली स्वयें मारूतीं ।
पश्चिम धान्याची महाख्याती । रघुपति विभागील ॥ ६९ ॥
करोनि सैन्याचा नितोडा । काधोनि पुच्छाचा पै वेढा ।
देवळाचा पहिला हुडा । हनुमान गाढा बैसला ॥ ७० ॥
गेला देखोन हनुमंत । सबळ वीर समस्त ।
आणिक घायाळ कुंथत । स्वनगरांत निघाले ॥ ७१ ॥
एक कण्हत एक कुंथत । एक हुंबत एक हुंबरत ।
एक पाणी पैं मागत । एक खुणा हात दावोनी ॥ ७२ ॥
एक रडत एक पडत । एक अतिशयें चडफडित ।
एक अति दुःखे तडफडित । एक खुरंडत कटिभंगें ॥ ७३ ॥
एकाचें फुटलेम कपाळ । एक ते अशुद्धबंबाळ ।
एकाची ओढे अंतरमाळ । एक तळमळ अति घातें ॥ ७४ ॥
एकाच्या मस्तका झाला भंग । एकाचें पर्वतीं चेंदलें अंग ।
एकाचे चरण पडिले व्यंग । एका क्षयरोग शाळताळीं ॥ ७५ ॥
पाडोनि राक्षसांचे दांत । मुष्टिघातें घातलें घशांत ।
नखें नाकें छेदिलीं बहुत । वीर कुंथत अति लाजें ॥ ७६ ॥
रण शोधावया देख । अशोकवनीं न येती लोक ।
पुच्छें लाविलासे धाक । एकाएकीं धांवती ॥ ७७ ॥

लंकेतील नागरिकांचा आक्रोश :

समस्त सैन्या केली बोहरी । कळकाळिती नरनारी ।
बोंब सुटली घरोघरीं । लंकानगरीं आकांत ॥ ७८ ॥
काळतोंडी रावणाची थोरी । चोरोनि आणिली सीता सुंदरी ।
केली राक्षसांची बोहरी । महामारी वानरें ॥ ७९ ॥
दशमुख तो काळमुखा । सीता चोरोनि आणिली देखा ।
मारविलें सकळ कटका । दुःखें लंकालंवाडिली ॥ ८० ॥
मुळींच राजा झाला भिकारी । त्यावरी निंद्य कर्म चोरी ।
तेही हरण परनारी । आली महामारी राक्षसां ॥ ८१ ॥

इंद्रजित ठार झाल्याचा प्रवाद :

रणीं रावण मरता । तैं लंकालोक स्वस्थ होता ।
करविलें इंद्रजिताचे घाता । रणीं हनुमंतावरी धाडूनी ॥ ८२ ॥
करितां अखयाचा कैवार । रणीं मारविला ज्येष्ठकुमर ।
शंख करिती निशाचर । दशवक्त्र हडबडिला ॥ ८३ ॥
इंद्रजित मेला किंवा जीत । हे कोणी न सांगती मात ।
तेणें हडबडिला लंकानाथ । केला घात वानरें ॥ ८४ ॥

रावणाचा विलाप :

शोधूं जावें जंव रणासीं । भूतीं भक्षिलें प्रेतासी ।
तेथें ओळखी कायसी । रावणासी अति दुःख ॥ ८५ ॥
रणीं निमाला ज्येष्ठ सुत । रावण मुखीं धुळी घालित ।
दाही मुखीं शंख करित । आक्रंदत अति दुःखें ॥ ८६ ॥
दुःखे गडबडां लोळे । केश सुटले मोकळे ।
अश्रुधारा स्त्रवती डोळे । पिटी कपाळे अति दुःखें ॥ ८७ ॥
इंद्रजिताच्या केलें घाता । काय करावें म्यां आतां ।
रणीं न धरवे हनुमंता । परम चिंता रावणा ॥ ८८ ॥
ब्रह्मयाने सांगितलें मजपासीं । गळा बांधोनि वानरासी ।
इंद्रजित आणील तुजपासीं । असत्य त्यासी कां जालें ॥ ८९ ॥
ब्रह्मयाचे ब्रह्मवाणीसीं । नाहीं विटाळ असत्यासी ।
भय नाहीं इंद्रजितासी । निश्चयेंसी मी जाणें ॥ ९० ॥

ब्रह्मदेवास पाचारण केल्यावरून ब्रह्मदेव स्वतः च अशोकवनात जातात :

पाचारोनि चतुरानन । त्यासी पुसे दशानन ।
इंद्रजित आणील कपि बांधोन । तें सत्य वचन करावें ॥ ९१ ॥
इंद्रजिताची स्थिती गती । राक्षस आणूं न शकती ।
वनीं बैसला मारूती । राक्षसघाती महावीर ॥ ९२ ॥
मीच जावोनि अशोकवना । इंद्रजिताची विवंचना ।
समूळ आणोनियां मना । दशानना सांगेन ॥ ९३ ॥
ऐसें सांगोनि लंकापती । वना आला प्रजापती ।
हनुमंतें ब्रह्मयाप्रती । घातलें क्षितीं लोटांगण ॥ ९४ ॥

ब्रह्मदेव हनुमंत संवाद :

ब्रह्मा हनुमंता सांगत । आला राक्षसांसी अंत ।
अवश्य तुवां करावा घात । लंकानाथ न मारूनी ॥ ९५ ॥
कुंभकर्ण आणि लंकानाथ । यांसी वधील श्रीरघुनाथ ।
लक्ष्मण वधील इंद्रजित । येरांचा अंत वानरीं ॥ ९६ ॥
हनुमान सांगे ब्रह्मयासी । माझी आवडी आहे ऐसी ।
भेटी घेवोनि रावणेंसी । करूं लंकेसीं वाताहात ॥ ९७ ॥
ब्रम्हा सांगे हनुमंतासीं । इंद्रजित तुझेनि भयेंसीं ।
लपाला विवरप्रदेशीं । मी त्यजापासीं जातसें ॥ ९८ ॥
तुज न लागे पाशबंधन । हें मज आहे निजज्ञान ।
माझें ऐकावें वचन । ब्रह्मबंधन मानावें ॥ ९९ ॥
इंद्रजित घालील ब्रह्मपाशासीं । तुंवां बद्ध मानोनि आपणासी ।
स्वयें जावें गा लंकेसीं । रावणासी भेटावया ॥ १०० ॥
रावणाची घ्वावी भेटी । आवडी आहे तुझे पोटीं ।
ब्रह्मपाश मानोनि कंठीं । यावें त्रिकूटीं लंकेसीं ॥ १०१ ॥
इंद्रजिताचेनि हस्तपातें । हनुमान मानीं पाशबंधातें ।
ब्रह्मदेवा तुझेनि हातें । ब्रह्मबंधातें मानीन ॥ १०२ ॥
ब्रह्मा म्हणे ऐसेंचि घडे । माझेनि हातें वाडेंकोडें ।
हनुमंता पाशबंधनीं पडें । रावणापुढें न्यावया ॥ १०३ ॥
इंद्रजितें वानरा देवोनि पाठी । विवरीं पळता अति संकटीं ।
अनुतापला कपाळ पिटी । उडाली पुष्टी वाढिवेची ॥ १०४ ॥
इंद्रजित अति लज्जायमान । विवरामाजी बैसोन ।
वानरा ब्रह्मपाशीं बंधन । करी तें विंदान अवधारा ॥ १०५ ॥
एकाजर्दना शरण । वानरा ब्रह्मपाशबंधन ।
बंधनीं मारूती निर्बंधन । कथाविंदान अवधारा ॥ १०६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमत्कृतरावणसैन्यवधो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
॥ ओव्यां १०६ ॥ श्लोक ६ ॥ एवं संख्या ११२ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सोळावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *