संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा

मंदोदरीची जन्मकथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेची देहस्थिती :

श्रीरामाची निजभक्ती । भजनें दाटुगी सीता गती ।
तृण पाषाण नामें गर्जती । नामें त्रिजगती कोंदली ॥ १ ॥
श्रीरामाची परम भक्ती । स्वयें जाणे सीता सती ।
तिचे भजनाची देहस्थिती । भजती युक्ती अवधारा ॥ २ ॥

काया – वाचा – मनाने भजनभक्ती :

ह्रदयीं आत्मा श्रीरघुपती । पाहतां वेदशास्त्रव्युत्पत्ती ।
ऐसी जे कां निजप्रतीती । भजनभक्ति ते नांव ॥ ३ ॥
तेचि भक्ति धरितां चित्तीं । श्रीराम दिसे सर्वांभूतीं ।
हे दृष्टीची भजनस्थिती । केला वेदांती निश्चय ॥ ४ ॥
याचि स्थितीं वचनोच्चार । हेंचि वाचिक वजन निर्धार ।
श्रीराम अक्षरीं अक्षर । नामोच्चार श्रीराम ॥ ५ ॥
श्रीराम जय राम अक्षरें । क्षराक्षरातीत परें ।
भवनीसी शंकरें । अत्यादरें सांगितलीं ॥ ६ ॥
याचि स्थिती करितां श्रवण । अक्षरार्थ श्रीराम पूर्ण ।
सांगतां झाला श्रीरघुनंदन । हें निजभजन श्रवणाचें ॥ ७ ॥
रसांसी श्रीराम स्वादता । रसने राम रसज्ञता ।
ऐसेनि रसभोग भोगितां । श्रीरघुनाथा निजभजन ॥ ८ ॥
याचिपरी गंधघ्राण । सुगंधासी श्रीराम जीवन ।
तोचि अवघ्राणीं सर्वज्ञ । हें निजभजन घ्राणांचें ॥ ९ ॥
त्वचेचें करितां स्पर्शन । त्वचेची त्वचा रघुनंदन ।
स्पर्शा सबाह्य श्रीराम पूर्ण । हें निजभजन त्वचेचें ॥ १० ॥
श्रीराम मनाचें निजमन । श्रीराम चित्ताचें चैतन्यघन ।
श्रीराम बुद्धीचें समाधान । विवेके सज्ञान श्रीराम ॥ ११ ॥

अनन्यता :

अहसोहंकोहंपरता । श्रीराम वसे स्वभावतां ।
ऐसेऐशिया अनन्यता । भजे श्रीरघुनाथा जानकी ॥ १२ ॥
श्रीरामगतीची ही गती । श्रीराम सीतेची निजशक्ती ।
श्रीराम सबाह्य सर्वां भूती । तयाची स्थिती जानकी ॥ १३ ॥
ऐशिया श्रीरामभजनापुढें । रावणभय तें बापुडें ।
येवों न शके सीतेपुढें । सीताही रडे लटिकेंचि ॥ १४ ॥
राम सीतेची अनन्यता । श्रीरामावेगळी नव्हे सीता ।
सीतेवेगळें श्रीरघुनाथा । नाहीं सर्वथा दूरी जाणें ॥ १५ ॥

याप्रमाणे मारूतीला सीता दिसली, त्याचे कारण :

ऐशापरी भजे सीता । समूळ कळलें हनुमंता ।
भक्तरक्षणें श्रीरघुनाथा । तेंही मज आतां कळों आले ॥ १६ ॥
मंदोदरी मानोनि सीता । हे कां रतली लंकानाथा ।
कोपें करिता दोहींच्या घाता । रामें अनर्था चुकविलें ॥ १७ ॥
मी तंव वानर उन्मत्त । समूळ विचार न करित ।
दोघांचा करित होतों घात । रामे अनर्थ चुकविला ॥ १८ ॥

मंदोदरी हीच सीता असा हनुमंताला भास का झाला :

मंदोदरी हेचि सीता । कैसें मानलें हनुमंता ।
मंदोदरी विष्णुसंभूता । समूळ कथा अवधारा ॥ १९ ॥
रावणाची माता कैकसी । पंचधान्याचें पिष्टांसी ।
पंचवक्त्र भाऊनि त्यासी । करी पूजेसी शिवलिंगा ॥ २० ॥
पंचधान्य तें पंचवदन । ऐसी भावना भावून ।
पूजा करी अनुदिन । सावधान कैकसी ॥ २१ ॥
पंचधान्यांचा पंचवक्त्र । पूजितां अक्षय दशवक्त्र ।
अक्षया होती माझे पुत्र । हें निजसूत्र पूजेचें ॥ २२ ॥

शिवरात्रीला ती ध्यानस्थ बसली असता इंद्राने शिवलिंग समुद्रात टाकले :

शिवरात्रीचें दिवशी । येवोनि समुद्रतीरासी ।
निर्मोनियां शिवलिंगासी । करी कैकसी महापूजा ॥ २३ ॥
षोडशोपचारी पूजा जाहली । त्यावरी बेलाची लाखोली ।
तपानीं शिवनामीं वाहिली । पूजा केली अनुपम्य ॥ २४ ॥
तिपानी बेलाचें पत्र । एक एक शिवनामें स्वतंत्र ।
भावें पूजिला श्रीशंकर । मनोहर ती पूजा ॥ २५ ॥
ऐसें करोनिया पूजन । लावोनियां दोनी नयन ।
कैकसी बैसतां धरोनि ध्यान । आनेंआन तेथें जाहलें ॥ २६ ॥
राक्षसद्वेषी इंद्र येऊन । लिंग समुद्रीं करोनियां मग्न ।
सागर न करीच भग्न । स्थापी सर्वज्ञ हाटकेश्वरीं ॥ २७ ॥
त्या लिंगाची हाटकेश्वरीं । पूजा होतसे अध्यापवरी ।
बिल्वप्रवाह गोमतीसागरीं । देखती शिवरात्रीं सर्वलोक ॥ २८ ॥
कैकसी जंव उघडी नयन । तंव पूजालिंगा पडले खाण ।
पुत्र पौत्र निमे संतान । तें अति विघ्न लिंगहानी ॥ २९ ॥
कैकसी दीर्घ रूदन करी । माझी देवपूजा नेली चोरीं ।
जळों रावणाची राज्यथोरी । काय संसारीं नांदत ॥ ३० ॥

रावणाचे आश्वासन :

ऐकतां मातेचे रूदन । रावण आला स्वयें धांवोन ।
येरी म्हणे लिंगा पडलें खाण । काय वदन दाविसी ॥ ३१ ॥
न करितां विसर्जन । जें लिंगासी होय विघ्न ।
तें संताना निःसंतान । शिववचन शैवगामीं ॥ ३२ ॥
येरू म्हणे माते अवधारी । उतरले साही सूत्रीं ।
रत्‍नलिंग आहे घरी । पूजा करी तूं तयाची ॥ ३३ ॥

कैकसीचे त्याने समाधान :

अनेकपरी लिंगाची थोरी । बोलिली आहे आगमशास्त्रीं ।
कैकसी त्या लिंगातें हातीं न धरी । अनाचारीं केंवी रिघों ॥ ३४ ॥
माझें लिंग न येता हाता । आणिक मी न घें सर्वथा ।
शैवदीक्षेची हे अवस्था । लिंग न येंता प्राणत्याग ॥ ३५ ॥
अद्यापवरी शैवमार्गीं । दुजिया लिंगाची सांडोनि मागी ।
पूजन करिती लिंगालागीं । प्राणत्यागीं निजनेटें ॥ ३६ ॥

आत्मलिंगासाठी रावण कैलासाला जातो :

रावण विनवी मातेसीं । तूं कां व्यर्थ प्राण देसी ।
मी जाईन शिवापासीं । तुझ्या लिंगासी आणीन ॥ ३७ ॥
शिव स्वामी माझे माथां । तूं तंव जाणसी तत्वतां ।
प्रसन्न करोनि विश्वनाथा । लिंग मी आतां आणीन ॥ ३८ ॥
कैकसी सांगे रावणासी । नारदें सांगितलें मजपासीं ।
आत्मलिंग शिवापासीं । तें आणिसी तैं धन्य ॥ ३९ ॥
ऐकोनि मातेचें वचन । सवेग निघाला दशानन ।
शिवापासीं स्वयें येऊन । करी नमन साष्टांगी ॥ ४० ॥

शंकराचे दुर्लक्ष :

जवळी आलिया रावणासी । शंकर न पुसे तूं का आलासी ।
आजि कां झालासी उदासी । रावणासी पुसेना ॥ ४१॥
बाण आणि रावण । हेचि शिवाचें पढियंते पूर्ण ।
त्यांचे वचन अणुप्रमाण । शिव आपण नुल्लंघी ॥ ४२ ॥
त्याचि रावणासी आतां । शिव न पुसे सर्वथा ।
परम चिंता लंकानाथा । यासी मी आतां काय करूं ॥ ४३ ॥
जया भक्तासी निष्काममावो । तया संमुख सदाशिवो ।
तोचि सकाम होतां पहाहो । शिव स्वयें पुसेना ॥ ४४ ॥
रावणें देखिली शिवाची कांता । जे का पार्वती जगन्माता ।
हे मी शिवासी मागेन आतां । सकामता दुसरी ॥ ४५ ॥

शृंगीच्या झणत्कारात शिव तल्लीन :

रावण उभा दोन प्रहर । सदाशिव नव्हेचि सादर ।
कोठें गुंतला श्रीशंकर । पाहे अंतरी रावण ॥ ४६ ॥
शृंगीच्या झणत्कारीं । शिव गुंतला नादांतरी ।
ऐसें जाणोनि निर्धारीं । रावण करी तें ऐका ॥ ४७ ॥

रावणाचे मस्तक समर्पण व गायन :

उतरोनियां निजमाथां । शिर लावोनियां युक्ता ।
रावणें केला वीणा हाता । होय वाजविता अति युक्तीं ॥ ४८ ॥
रावणहस्ताचा पैं स्वर । मधुर मंजुळ आणि अरूवार ।
तेणें सुखावला श्रीशंकर । गौरिहर तुष्टला ॥ ४९ ॥

त्यामुळे प्रसन्न होऊन शंकरांचे वरदान :

रावणासी माग म्हणतां । मागतां नये मोडिला माथां ।
कृपा उपजली विश्वनाथा । वर देता स्वयें झाला ॥ ५० ॥
तुवां मोडोनियां निजशिर । मज सुखी केलें अपार ।
तूं होशील दशशिर । वीर शूर तिहीं लोकीं ॥ ५१ ॥

रावणाला दहा शिरे, वीस भुजा व अमृतकुपीचा लाभ :

शिरा काढोनि हातींच्या सत्वर । तंतु लाविले साचार ।
एकएकाचें दहादहा कर । भुजाभार विंशति पै ॥ ५२ ॥
वर देता वृषभध्वज । रावणा दहा शिरें वीस भुजा ।
अमृतकुपी देवोनि ओजा । बळसमाजी आतुर्बळी ॥ ५३ ॥

शंकर रावणाचे इच्छित देण्यास तयार :

शिव म्हणे लंकानाथा । जें जें आवडे तुझे चित्ता ।
तें तें देईन मी आतां । प्रसन्नता गर्जत ॥ ५४ ॥
सदाशिव स्वयें भोळा । तो नेणे राक्षसाची कळा ।
दुष्ट बुद्धि त्याचे डोळां । मागती कळा ते ऐका ॥ ५५ ॥

पार्वती व आत्मलिंग रावण मागतो :

पार्वती लावण्याची राशी । ते मज द्यावी निजभोगासीं ।
आत्मलिंग निजपूजेसीं । कैकसीसी तें द्यावें ॥ ५६ ॥
रावण मागणें ऐकतां । गेली उदारवरउल्लासता ।
सुत मातेसीं रति मागतां । परम क्षोभता शिवासी ॥ ५७ ॥

शंकरांना आश्चर्य ! शब्द देऊन बसल्यामुळे दोनही वर देतात :

परम क्षोभ शिवाचे चित्ता । यासी वरदान न देतां ।
असत्यता माझिया माथां । नेदी म्हणता म्हणवेना ॥ ५८ ॥
माता सुत जवळी उल्लासतां । सुतें मातेसी रति मागतां ।
प्राणांत क्षोभे माता । शिवाचे चित्ता तैसें जाहालें ॥ ५९ ॥
गुरूपत्‍नी ते शिष्यमाता । तिचा अभिलाष करितां ।
आली रावणा गुरूतल्पगता । कैसेनी आतां वांचेल ॥ ६० ॥
पार्वती देतां रावणाहातीं । हिचेनि तुम्हां सर्वशांती ।
न कळोनि ते वचनोक्ति । लंकापति उल्लासे ॥ ६१ ॥

आत्मलिंगासंबंधाने शंकरांचा इशारा :

शिव म्हणे रावणासी । आत्मलिंग देतां तुजपासीं ।
शुचित्व पाहिजे अहर्निंशीं । ठेविल्या भूमीसीं नये हाता ॥ ६२ ॥
आकर्षोनि चैतन्यज्योती । तेज मुसावोनि आत्मक्तीं ।
तें आत्मलिंग उमापतीं । नित्य पूजिती नेमेंसी ॥ ६३ ॥
तें लिंग देतां रावणाहातीं । लिंग जाईल हातोहातीं ।
तृतीयनेत्रीं क्षोभेल शक्ती । लावील ख्याति रावणा ॥ ६४ ॥

दोन्ही घेऊन रावण जातो :

रावणें घेवोनि पार्वती । आत्मलिंग घेवोनि हातीं ।
उल्लासें सुचित्तवृत्ती । लंकेप्रती निघाला ॥ ६५ ॥
रावणासी देखतां जाण । उमा जाली हीन दीन ।
चिंतातुर अति गहन । दीनवदन तें जाली ॥ ६६ ॥

उमा विष्णूचा धावा करतें :

शिवें दिधलें रावणापासीं । माझी सुटका होय कैसी ।
उमा चिंती श्रीविष्णूसी । पावें वेगेंसीं कृपाळुवा ॥ ६७ ॥
ग्रहें गिळितां गजेंद्रासी । त्या उद्धरिलें अति वेगेंसीं ।
रावणग्रस्तां मज दीनासी । शीघ्र पावावें ॥ ६८ ॥
राम उच्चारिल्यासाठी । कुंटिणी वाहिली वैकुंठीं ।
तैसिया गा कृपादृष्टी । पावे जगजेठी कृपाळुवा ॥ ६९ ॥
महापातकांची राशी । नामें उद्धार अजामिळासी ।
मी तंव तुझी निजदासी । पावें वेगेंसी कृपाळुवा ॥ ७० ॥
शिवासी छळितां भस्मासुरें । तुवां तारिलें कृपाकरें ।
ऐकोनि उमेचि उत्तरें । हरि सत्वरें धांविन्नला ॥ ७१ ॥
शिवाची जे निजकांता । तें तंव माझी सखी माता ।
तिचा अभिलोष करितां । लंकानाथ, गांजीन ॥ ७२ ॥

पार्वतीची सुटका करण्यात गणेश व कुमार यांची सहायता :

पार्वती सोडवितां एकाएक । गणेशस्वामी कार्तिका अटक ।
शिववरदान होतां लटिक । शिव सम्यक कोपेल ॥ ७३ ॥
रावणाच्या पाडोनि दांतां । निमेषें सोडवीन माता ।
शिववरदान मिथ्या होतां । आमचे घात शिव करील ॥ ७४ ॥

विष्णूची न या दोघांची भेट :

सोडवावया पार्वतीसी । धांवण्या येतां श्रीविष्णूसी ।
दोघे भेटले तयासी । वृत्तांत त्यांसी सांगोनि ॥ ७५ ॥
पूर्ण छळावया रावण । विष्णूनें मांडिलें विंदान ।
द्विजगौचें रक्षण । सांगे आपण गणेशा ॥ ७६ ॥

विष्णू धर्मऋषी, कुमार शिष्य व गणेश गोपाल होतात :

आपण जाला धर्मऋषी । शिष्य केलें गुहकांसी ।
उल्लासे येतां रावणापांसीं । सन्मुख त्यासी भेटला ॥ ७७ ॥
ऐसा उल्लास लंकापती । शिवें दिधली पार्वती ।
आत्मलिंग कृपामूर्ती । तेंही मजप्रती ओपिले ॥ ७८ ॥

शिष्य-रावण यांचा संवाद :

शिष्य रावणासी सांगती । आत्मलिंगसत्यप्राप्ती ।
परी हे नव्हे गा पार्वती । शिवें तुजप्रती ठकविले ॥ ७९ ॥
शिव देईल निजकांता । हे तंव न घडे गा सर्वथा ।
ठकिलें ठकिलें लंकानाथा । पाहें तूं आता पार्वती ॥ ८० ॥

उमेची विकृती व रावणाचा उद्वेग :

जंव पाहे न दशानन । तंव उमा न दिसे शोभायमान ।
निंद्द कुत्सित हीन दीन । देखे उद्विग्न मुख तिचें ॥ ८१ ॥
डोळे पिचके वाहे पाणी । वदनीं माशांची गोंगाणी ।
श्लेष्मा बिडिबिडित घ्राणीं । मुखीं पोहाणी घाणत ॥ ८२ ॥
ती देखताचि वक्रा । रावणा आला अति ओकारा ।
विष्णु लाघवी खरा । दशशिरा छळियलें ॥ ८३ ॥
रावण म्हणे ऋषींप्रती । माझेनि भाग्यें भेटलेती ।
आता जावोनि शिवाप्रती । मुख्य पार्वती मागेन ॥ ८४ ॥
शिव राखोनि निजदशा । तुज दिधली अवदसा ।
त्रिसत्य सत्य मानीं गा लंकेशा । भोळा महेश मानूं नको ॥ ८५ ॥
उमा लपवी उमापती । ते खूण सांगेन तुजप्रती ।
आसनाखालें लखलखिती । ते पार्वती तूं मागें ॥ ८६ ॥

रावणाची शंकरांकडे धाव :

ऐकोनि रावण अति आवेशी । धांविन्नला शिवापासीं ।
विष्णू तेथें लघुलाघवेंसी । मंदोदरीसी निर्मिलें ॥ ८७ ॥

विष्णूने केलेली मंदोदरीची उत्पत्ती :

केशराची अति गोमटी । रमेनें दिधली उटी ।
उदरीं आढलतां मळवटी । केली गोरटी मंदोदरी ॥ ८८ ॥
निर्मावया सुंदर पुतळी । कांही नातुडे हातातळीं ।
उदरीं गौर चंदनाची मळी । त्याची निर्मिली मंदोदरी ॥ ८९ ॥
श्रीविष्णूचे उदरोदरीं । सुंगंधचंदनकरीं ।
विष्णुमध्यांगीं जन्मली नारी । मंदोदरी त्या हेतू ॥ ९० ॥
माज समावे मुष्टिमाझारीं । यालागीं म्हणती मंदोदरी ।
विषयतृष्णा नाहीं उदरीं । मंदोदरी तेणें नांवें ॥ ९१ ॥
जे जन्मली विष्णूचें करी । संकल्प विकल्प नाहीं उदरीं ।
यालागीं म्हणती मंदोदरी । शोभा सुंदरी शोभत ॥ ९२ ॥

विष्णू ती पुतळी शिवाच्या आसनाखाली घालतात :

नयन वदन श्रवण घ्राण । रूपरेखा ठाण माण ।
गुणगांभीर्य वदनभान । श्रीसमान करी विष्णु ॥ ९३ ॥
विष्णु लाघवी तत्काळीं । ऐसी निर्मोनी पुतळी ।
घातली शिवासनाचे तळीं । तेजें वेल्हाळीं शोभत ॥ ९४ ॥

रावणाचा क्रोध व अधिक्षेप व शिवाची प्रतिक्रिया :

रावण म्हणे शिवाप्रती । तुवां लपवोनि पार्वती ।
ते अवदासा दिधली माजे हातीं । धन्य अवदसेची प्राप्ती ॥ ९५ ॥
शिव विचारी निजचित्तीं । येणें अभिलाषिली पार्वती ।
ते अवदसेची प्राप्ती । छळिला निश्चिती जगदंबा ॥ ९६ ॥
तीस विष्णु जाहला साह्य । तेणे रावणा आला अपाय ।
तेथें न चलती उपाय । यासी म्यां काय करावें ॥ ९७ ॥
रावण पाठींचा माझा गण । उमाभिलाषी पूर्ण ।
गुरूतल्पगदोष दारूण । अचुक मरण या आलें ॥ ९८ ॥
जेचि उमा तेचि सीता । जिचेनि अभिलाषे तत्वतां ।
मरण आलें लंकानाथा । पेटला घाता श्रीविष्णु ॥ ९९ ॥
रावण पेटला अति आवेशा । म्हातारपणीं लोभ कैसां ।
तुज वाढला गा महेशा । मज अवदसा दिधली ॥ १०० ॥
तथास्तु म्हणानि सदाशिवु । बहु अवदसा भोगील जीवु ।
रावण विषयांध बहु । त्यावरी गर्व वरदानाचा ॥ १०१ ॥
रावण म्हणे शिवाजवळी । उमा लपविली आसनातळीं ।
मज दिसताहे सोज्ज्वळी । किती चंद्रमौळी चाळविसी ॥ १०२ ॥
आसनीं देखोनि सुंदर कांता । अति विस्मयो लंकानाथा ।
उमा सांडोनि जगन्माता । दिधली लंकानाथा मंदोदरी ॥ १०३ ॥
रावण बोलिला कोपेंकरी । म्हातारपणीं स्त्रीलोभ भारीं ।
माझी प्रिया जगदात्मा तारी । अभिलाषें उरी उरों नेदी ॥ १०४ ॥
असो याउपरी लंकापती । रावणें सांडोनि पार्वती ।
मंदोदरी अति प्रीतीं । घेवोनि चित्तीं निघाला ॥ १०५ ॥

रावणाचे प्रयाण व मार्गात लघवीची बाधा :

स्कंधीं घेवोनि मंदोदरी । आत्मलिंग घेवोनि करीं ।
रावण निघतां झडकरीं । नानापरी छळी विष्णु ॥ १०६ ॥
रावण पावून हरिखा । अनुलक्षोनियां लंका ।
जातां लागली लघुशंका । पाऊल देखा नुल्लंघवे ॥ १०७ ॥
लिंग देंऊ कोणाचे हातीं । कैसेनि करूं शंकानिवृत्ती ।
रावण थोर पडलां गुंतीं । पुढती गति खुंटली ॥ १०८ ॥
अभिलाषितां शिवाची नारीं । रावण अशुचि चराचरीं ।
मृत्तिकाजळें शौच करीं । शुचित्व तरी उमजेना ॥ १०९ ॥
मृत्तिकाजळें शुद्ध करिती गुद । तैसें ह्रदय ना करिती शुद्ध ।
शौचाचार तो अबद्ध । कर्ममंद कर्मठ ॥ ११० ॥

गणेशाला लिंग स्वीकारण्याची विनंती, त्याच्या अटी व संमती :

लिंग द्दावे कोणापासी । रावण पाहे चौपासीं ।
तंव देखिलें गणेशासी । द्विजगोंसी संरक्षी ॥ १११ ॥
दर्भ पवित्र यज्ञोपवीत । टिळे द्वादश नामांकित ।
गणेशा देखे लंकानाथ । लिंग द्दावया प्रार्थित ॥ ११२ ॥
जंव मी करीं शंकानिवृत्ती । तंववरी लिंग धरावे हाती ।
गणेश म्हणे गाई जाती । वासरें पिती धेनूंसी ॥ ११३ ॥
गाई पाजलियावरी । द्विज कोपतील भारी ।
तुझें लिंग मी नांगीकारीं । पाय धरी रावण ॥ ११४ ॥
गणेश त्यासीं नेम करी । तुज न येतां झडकरीं ।
लिंग ठेवीन भूमीवरी । निजनिर्धारीं नेम माझा ॥ ११५ ॥
त्रिवार गर्जनेंसी । प्रतिज्ञा नेमूं जाण ऐसी ।
तुज न येतां त्वरेसीं । लिंग भूमीसी ठेवीन ॥ ११६ ॥
ऐसी निगुती करोनि देखा । करूं गेला लघुशंका ।
मुतीं गुंतविले दशमुखा । काहीं आवाकां चालेना ॥ ११७ ॥

रावणाचा मुत्रातिरेक, गणेशाची हाक व लिंग भूमीवर ठेवले :

कष्टी मूत मोकळे होत । तंव तें झाले अत्यद्‌भुत ।
धारावर्तीं प्रवाहत । मूतीं लंकानाथ गुंतला ॥ ११८ ॥
गणेश करी गर्जनेसीं । रावण गुंतला मुतापासी ।
लिंग ठेवोनि भूमीसीं । घेवोनि गाईंसी तो गेला ॥ ११९ ॥

रावणाचा उद्वेग व भूमीवरील शिवलिंग उचलण्याची असमर्थता :

रावण करूनि शौचचारी । वेगें येतां झडकरी ।
लिंग देखोनि भूमीवरी । श्रद्धेकरां घेऊं गेला ॥ १२० ॥
एक हातें दोहीं हातें । उचलितां रावण कुंथे ।
नुचलेचि विंशति हातें । म्हणे लिंगातें महाबळ ॥ १२१ ॥
अहाच दिसे भूमीवरी । परी तें सबळ आहे भारी ।
उचलितां विशंति करीं । तिळभरी उचलेना ॥ १२२ ॥
सर्व शक्ति अति प्रबळ । रावणें वेंचता सर्व बळ ।
लिंग उचलेना अळुमाळ । महाबळ तें लिंग ॥ १२३ ॥
रावणें आपुल्या निजकरीं । आंदोळिला कैलासगिरी ।
महाबळ लिंग हें भारी । तिळभरी नुचलेचि ॥ १२४ ॥
लिंग भूमीवरी ठेवोनि गेला । रावणें गणेशा दिधला टोला ।
अद्दापि असे उभा केला । रावण क्षोभला निभ्रंशें ॥ १२५ ॥

रावणाचा शोक :

आत्मलिंग नये हातासी । उपाय न चले कांही त्यासी ।
रावण स्फुंदे उकसा बुकसी । कैकसीसी काय सांगू ॥ १२६ ॥
लिंग गेले अति मुततां । काहीं न केलिया नये हाता ।
नगरां जातां क्षोभेल माता । भयें उभयतां अपावो ॥ १२७ ॥
नाहीं देव ना पितर । उभयता अपवित्र ।
विष्णूने छळिलें अपार । दशकंधर तळमळी ॥ १२८ ॥
लिंगबंधनी उभय मुद्रा । शिवें लावि शिवदोरा ।
रावणें सांडितां अर्हापर्हा । पंच मुद्रा पंचलिंग ॥ १२९ ॥
मुरडोनिया सारितां वस्त्र । तेथें जाला मुरडेश्वर ।
मुद्रिका टाकितां पवित्र । गुप्तेश्वर तेथें जाला ॥ १३० ॥
रागें टाकितां शिवदोर । तेथें जाला गणकेश्वर ।
कानडे म्हणती धनेश्वर । लोकव्यवहार पैं ऐसा ॥ १३१ ॥
शिवसेज टाकितां साचार । तेथें जाला शेजेश्वर
ऐशियावरी पंचवक्त्र । श्रीशंकर नांदत ॥ १३२ ॥
गोकर्ण हें तंव अनादि क्षेत्र । तेथें महाबळेश्वर ।
यालागी गोकर्णमहाबळेश्वर । लोकव्यवहार प्रसिद्ध ॥ १३३ ॥

गोकर्णमहाबळेश्वर व ब्रह्मा निर्मित महाबळेश्वर भिन्न :

गौतमपर्वत समुद्रतीर । तेथें गोकर्णमहाबळेश्वर ।
वाईचा महाबळविचार । भिन्न परिचार ब्रह्मयागीं ॥ १३४ ॥
ब्रह्मयानें याग करितां प्रबळ । प्रगटला ते ठायीं महाबळ ।
दोहीचें भिन्न भिन्न स्थळ । लोक सकळ जाणती ॥ १३५ ॥
असो तीर्थींची हे वार्ता । संख्या करितां असंख्याता ।
कैसेनि हे कथा । मूळसंमता अवधारा ॥ १३६ ॥

या कथेचा आधार ब्रह्मोत्तर खंड आहे :

मंदोदरीसमान हे सीता । केंवी मानली हनुमंता ।
ब्रह्मोत्तरखंडींची हे कथा । विष्णुसंभूता मंदोदरी ॥ १३७ ॥

मारूतीला वाटलेले सीता मंदोदरीतील साम्य :

मंदोदरी सुंदर कांता । स्वयें विष्णु तिसी निर्मिता ।
तिसीं सीतेसी साम्यता । स्वभवतां पैं आली ॥ १३८ ॥
विष्णु करी अवलोकन । ते तंव होय श्रीसमान ।
मंदोदरी विष्णुनिर्माण । सीतेसमान मानी कपि ॥ १३९ ॥
दोघी अयोनिजा तत्वतां । दोघी जणी पतिव्रता ।
मंदोदरीसमान सीता । हनुमंता मानली ॥ १४० ॥
रावणाचे अति एकांता । मंदोदरीची ऐकोनि कथा ।
अशोकवनीं हनुमंता । भेटेल सीता तें ऐका ॥ १४१ ॥
अशोकवनामाजी मारूती । नमस्कारोनि सीतासती ।
श्रीरामाच्या कथानुवर्तीं । सुखानुभूति दोहींसी ॥ १४२ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमान लाघवी आपण ।
करील वनविदारण । राक्षसकंदन तें ऐका ॥ १४३ ॥
॥ इति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
मंदोदरीजन्मकथनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
॥ ओव्यां १४३ ॥ श्लोक – ॥ एवं संख्या १४३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय सहावा