संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा

बिभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम व वानरसैन्य समुद्रतीरावर आले

श्रीराम जगदानंदकंद । श्रीराम सच्चिदानंद ।
श्रीरघुपति नित्यशुद्ध । नाहीं भवबंध स्मरणें तुझ्या ॥ १ ॥
वानरसेनासंभार । पावोनियां समुद्रतीर ।
कटक उतरलें समग्र । श्रीरामचंद्रासमवेत ॥ २ ॥

रावणमाता कैकसीची चिंता :

येरीकडेलंकेआंत । नगर जाळोनि गेला हनुमंत ।
तेणें कैकसीस आकांत । राक्षसां अंत दृढ आला ॥ ३ ॥
कैकसी रावणाची जननी । लंकागडदाहो देखोनि ।
परम दुःखित होय मनीं । स्त्रवतीं नयनीं अश्रुधारा ॥ ४ ॥

कैकसी बिभीषणाकडे जाऊन रावणाची
अपकृत्ये व त्याचे घोर परिणाम त्याला सांगते

येवोनियां बिभीषणापासीं । निजदुःख सांगें त्यासी ।
मरण आलें रावणासी । राक्षसांसी कुळक्षयो ॥ ५ ॥
यासीं मूळ तुझा ज्येष्ठ बंधु । चोरोनि आणिली श्रीरामवधू ।
श्रीराम रावणा करील वधू । सकुळ छेदू राक्षसां ॥ ६ ॥
सीता श्रीरामप्रियकर । शुद्धी धाडिला वानर ।
तेणें जाळोनियां नगर । निशाचर निर्दळिले ॥ ७ ॥
इंद्रजित आम्हांमाजी उद्‌भट । कपिनें त्याचें काढिले चारट ।
रणीं खवळोनिं मर्कट । दशकंठ गांजिला ॥ ८ ॥
सविष उत्तम पक्वान्न । सेविल्या अवश्य आणी मरण ।
तैसें सीताभिलाषण । कुळनिर्दळण राक्षसां ॥ ९ ॥
संताना होय निःसंतान । ऐसे अलोट आलें विघ्न ।
बिभीषणासी आलिंगून । करी रूदन कैकसी ॥ १० ॥
ऐकें श्रीरामाची गोष्टी । जो जो वीर पडला दृष्टी ।
तो तो निर्दळी शरवृष्टीं । वीर जगजेठी श्रीराम ॥ ११ ॥
ताटका मारिली उठाउठीं । सुबाहु मारिला यज्ञवाटीं ।
विराध मारिला रणदिग्पटीं । पडिल्या दृष्टी न सोडी ॥ १२ ॥
श्रीराम पदाति एकला जाण । मारिला त्रिशिरा खरदूषण ।
चौदा सहस्त्र रक्षोगण । रणकंदन केले रामें ॥ १३ ॥
कबंध निर्दळिला बळी । बाणीं निर्दळिला बाळी ।
सुग्रीवा मिनला त्याजवळी । वानरदळासमवेत ॥ १४ ॥
त्यामाजील हनुमंत एक । लंका जाळोनि निःशंक ।
गांजोनियां दशमुख । लाविला धाक राक्षसां ॥ १५ ॥
येथे आलियां रघुनाथ । कोण साहेल शरसंपात ।
होय राक्षसांसी कुळघात । लंकानाथ अविवेकी ॥ १६ ॥

कैकसी बिभीषणाला रावणास उपदेश करण्यासाठी पाठविते

अति गर्वीं दशानन । माझी नायके शिकवण ।
तुझें मानितो वचन । हित संपूर्ण उपदेशीं ॥ १७ ॥
श्रीरामा अर्पोनि सीता । सख्य करावें श्रीरघुनाथा ।
तेणें कल्याण लंकानाथा । आणि समस्तां राक्षसां ॥ १८ ॥
ऐसीं देता शिकवण । रावण करील अपमान ।
तोही साहोनि आपण । हित संपूर्ण उपदेशीं ॥ १९ ॥
बिभीषणा तुज परम शांती । सर्वथा क्रोध न ये चित्तीं ।
करोनि अपमाननिवृत्ती । लंकापती उपदेशीं ॥ २० ॥
ऐसें बोलोनियां वचन । उकसाबुकसीं करीरूदन ।
माझें वाचवीं संतान । अनन्यशरण यालागीं ॥ २१ ॥

बिभीषणाची तयारी व रावणाने घात
केल्यास तत्काळ श्रीरामांकडे जाण्याची तयारी

ऐकोनि मातेचें वचन । बिभीषणे वाहिले प्राण ।
प्राणांत साहोनि अपमान । हित सांगेन लंकेशा ॥ २२ ॥
रावणा हित शिकवितां । सीतासन्निपात लंकानाथा ।
करूं धावेल माझे घाता । शरण रघुनाथा मी होईन ॥ २३ ॥

माता कैकसीची अनुज्ञा व वंशरक्षणाबद्दल आशीर्वाद

तूं श्रीरामा निघालिया शरण । तुझेनि माझा कुसवा धन्य ।
तुझेनि रावणा कृतकल्याण । वंशवर्धन तुझेनि ॥ २४ ॥
श्रीरामासी निघाल्या शरण । त्याचेनि कुळ पवित्र पूर्ण ।
त्याचेनि धरा सुखसंपन्न । तीर्थ पावन त्याचेनि ॥ २५ ॥
शरण रिघाल्या श्रीरघुनाथा । कृथार्थ होय त्याची माता ।
त्याचेनि पूर्वजां होय सुखरूपता । उद्धरी समस्तां समागमें ॥ २६ ॥
त्याचेनि सुखरूप संसार । त्याचेनि सुखी सुरवर ।
त्याचेनि सुखी चराचर । जे श्रीरामचंद्र सेविती ॥ २७ ॥
श्रीरामासी रिघाल्या शरण । स्वप्नप्राय जन्ममरण ।
कळिकाळ घाली लोटांगण । श्रीरामचरण सेविल्या ॥ २८ ॥
श्रीराम रावणाचा वैरी । कैकसी त्याचा द्वेष न करीं ।
ऐकोनि मातृवचन थोरी । आल्हाद भारी बिभीषणा ॥ २९ ॥

त्याप्रमाणे बिभीषण रावणाकडे जातो :

निर्मत्सर मातृवचन । तेणें बिभीषणा हरिख पूर्णं ।
मस्तकीं वंदोनि तिचे चरण । लोटांगण घातलें ॥ ३० ॥
मातृवचन महाबळी । वोडवोनि कृतांजुळीं ।
हरिखें निघाला रावणाजवळी । जनकबाळी सोडवावया ॥ ३१ ॥
जातां देखोनि बिभीषण । माता करी निंबोळण ।
तुझी कीर्ती होईल पावन । सुखसंपन्न तूं होसी ॥ ३२ ॥
माताआशीर्वचनगोष्टी । तेणें बांधिलीं शकुनगांठी ।
मग निघाला उठाउठीं । घ्यावया भेटी लंकेशा ॥ ३३ ॥

सभेत रावण त्याचे स्वागत करून त्याला अर्धासनावर बसवितो

इंद्रजित अतिकाय पुत्र दोन्ही । सभा शोभत प्रधानीं ।
रावण बैसला सिंहासनीं । येतां देखोनि बिभीषण ॥ ३४ ॥
उठिले समस्तही राजकुमर । उठिले प्रधान चतुर ।
बिभीषण होवोनि एकाग्र । केला नमस्कार रावणा ॥ ३५ ॥
रावणें देवोनि सन्मान । अति प्रीतीं बिभीषण ।
देवोनियां हेमासन । आपणासमान बैसविला ॥ ३६ ॥

बिभीषणाचे रावणाशी भाषण, लंकेची स्थिती

रावणा सांगे बिभीषण । समस्त मिळाले प्रधान ।
राक्षसां आलें दुर्धर विघ्न । केले कंदन हनुमंतें ॥ ३७ ॥
ब्रह्मयाच्या ब्रह्मासनीं । दंश मशक वृश्चिकश्रेणीं ।
समस्त व्याकुळ लंकाभुवनीं । स्वस्थ कोणी असेना ॥ ३८ ॥
हनुमंतें ख्याती केली भारी । हाहाभूत लंकानगरी ।
सर्प उठिले अग्निहोत्रीं । हविर्द्रव्यामाझारीं पिपीलिका ॥ ३९ ॥
जाणोनि भविष्याची गती । हित सांगें रावणाप्रती ।
जैंहूनी आणिली सीता सती । विघ्नांची ख्याती तैंहूनी ॥ ४० ॥
मी कनिष्ठ तूं तंव ज्येष्ठ । बुद्धि सांगों नये स्पष्ट ।
विघ्न आलें अति अनिष्ट । विचार श्रेष्ठ विचारीं ॥ ४१ ॥
एकलें श्रीरामाचें वानर । मारिले असंख्य निशाचर ।
विध्वंसिलें लंकापुर । तुम्ही समग्र असतांही ॥ ४२ ॥
तुमचे माथां देवोनि पावो । मारिला अखया महाबाहो ।
इंद्रजिताच्या जीवा संदेहो । केला दाहो लंकेचा ॥ ४३ ॥
तुही असतां समग्र । कोणा न धरवेचि वानर ।
कैसेनि जिंकवेल श्रीरामचंद्र । पुढें विचार तो कैसा ॥ ४४ ॥
वैर करितां श्रीरघुपती । राक्षसकुळा आली अशांती ।
उपावो सांगेन तदर्थी । स्वार्थापरमार्थीं उपयोगीं ॥ ४५ ॥

सीता चोरून आणल्याची लंकेवर प्रतिक्रिया व पुढील कार्याविषयी सूचना

तुवां चोरोनि आणिली सीता । तया अपराधा प्रायश्चित्ता ।
मी सांगेन लंकानाथा । तें तुवां तत्वतां करावें ॥ ४६ ॥
येणें तुज भुक्तिमुक्ति । येणें तुज यश कीर्तिं ।
येणें तुझिया कुळा विश्रांती । जाण निश्चितीं लंकानाथा ॥ ४७ ॥
सकळ पापांचे प्रायश्चित्त । नाम स्मरावें रघुनाथ ।
तो तुवां सेविल्या सीताकांत । सुखस्वार्थ पावसी ॥ ४८ ॥
आंगीं आदळल्याही विघ्न । उपाय न सांगती प्रधान ।
विचारीं प्रवेशेना त्यांचें मन । धरोन मौन राहिले ॥ ४९ ॥
देखोनि कपीचा युद्धप्रभाव । पळाली त्यांच्या बळाची हांव ।
निमाला वाटिवेचा गर्व । परम संदेह प्रधाना ॥ ५० ॥
श्रुत दृष्ट अनुमानचिन्ह । तुज म्यां सांगीतलें येवोन ।
न सांगतां न राहवे जाण । सखेपण आम्हां तुम्हां ॥ ५१ ॥
यावरी पुढील कार्यार्थ । राये पाहोनि हिताहित ।
दृढ करावा इत्यर्थ । स्वार्थ परमार्थ जेणे साधे ॥ ५२ ॥

रावणाचा प्रधानांवर राग व प्रधानांची भाषणे

ऐकोनि बिभीषणाचें वचन । संतोषला दशानन ।
प्रधानावरी कोपायमान । अति उद्विग्न स्वयें जाला ॥ ५३ ॥
कंदन करोनि राक्षसांतें । लंका विध्वंसिली हनुमंतें ।
तें देखोनि लंकानाथें । हनुमंतातें मानवला ॥ ५४ ॥
एकला एक वानर । रणरंगी वीर धीर ।
स्वामिकाजी महाशूर । दाटुगा वीर मारूती ॥ ५५ ॥
प्रधान सेनानी रक्षागण । त्यांवरी रावण कोपायमान ।
आरक्त करोनियां नयन । कठिण वचन बोलत ॥ ५६ ॥
कळिकाला माझी दुर्धर नगरीं । ते शोधोनियां लंकापुरी ।
सीता शुद्धि घेवोनि खरी । करोनि बोहरी कपि गेला ॥ ५७ ॥
अखयादि सेना सैन्यगण । तुम्हांदेखता केलें कंदन ।
जळों तुमचें काळें वदन । वाटीववल्गना वृथाजल्प ॥ ५८ ॥
जळो तुमची वाटीवथोरी । जावोनि करा आडविहिरी ।
नातरी पोटीं घाली सुरीं । वानरें नगरी नागविली ॥ ५९ ॥
एकलें एक वानर । तुम्हां न राहवे त्यासमोर ।
पुढें आलिया श्रीरामचंद्र । युद्धीं समग्र पळाल ॥ ६० ॥
कोपला देखोनि रावण । अवघेही प्रधानगण ।
बोलों लागले आंगवण । सोळा जण साटोपें ॥ ६१ ॥
सप्तघ्न आणि यज्ञगोपास्य । यज्ञकेतु आणि दुर्धर्ष ।
रश्मिकेतु आणि प्रघस । विरूपाक्ष महाबाहु ॥ ६२ ॥
वज्रदंष्ट्र आणि धूम्राक्ष । वज्रानाभि आणि विद्युन्मुख ।
विद्युज्जिव्ह आणि त्रिशिख । मेघवर्ण महामारी ॥ ६३ ॥
कुंभ निकुंभ दोहींच्या बळा । नाहीं करावयां कांटाळा ।
ऐसे प्रधान सोळा । उठिला पाळा सन्नद्ध ॥ ६४ ॥
रथ वाजि पदाति कुंजर । शस्त्रास्त्रीं सन्नद्ध वीर ।
येवोनि रावणासमोर । स्वबडिवार बोलती ॥ ६५ ॥

राम व वानरसैन्याचा संहार करण्याची प्रतिज्ञा

जैशा पतंगांच्या हारी । उडी घालिती वणव्यावरी ।
तेंवी राक्षस शस्त्रस्त्रीं । श्रीरामावरी निघाले ॥ ६६ ॥
रावणा ऐकें सावधान । न लागतांचि अर्धक्षण ।
आम्हीं मारूं रघुनंदन । सुग्रीवलक्ष्मणसमवेत ॥ ६७ ॥
आरि जुत्पती थोर थोर । अंगदादि वानर वीर ।
रणीं मारोनि समग्र । धरणीं रूधिरप्रवाह ॥ ६८ ॥
जेणें येवोनि लंकेआंत । केला पुरदाहो राक्षसां अंत ।
तो मारूं आम्ही हनुमंत । निमेषार्धांत उपडोनी ॥ ६९ ॥
पुढें भरला आहे उदधी । नसतां तरणोपायविधी ।
अवघे धांवत दुर्बुद्धी । मरणोन्मादीं उन्मत्त ॥ ७० ॥
यापरी ते वीर समस्त । युद्धा धांवती मरणोन्मत्त ।
त्यांसी बिभीषण निवारित । युक्तायुक्तविचारें ॥ ७१ ॥

ती दर्पोक्ती ऐकून बिभीषणाचा संताप व त्यांची निर्भर्त्सना

बिभीषण म्हणे तुम्ही वीर । युद्धीं कुशळ अति दुर्धर ।
न करितां बळाबळविचार । युद्धा समग्र केंवी जातां ॥ ७२ ॥
श्रीरामाचें एक वानर । मारले कुमर निशाचर ।
जेव्हां जाळिलें लंकापुर । तेव्हां त्यासमोर कां नव्हां ॥ ७३ ॥
आला देखोनि हनुमंत । तुम्ही रांड महामिणी ऐसे लपत ।
आतां मिरवितां महापुरूषार्थ । लंकानाथप्रलोभा ॥ ७४ ॥
अशोकवनीं होतां रण । तुम्ही पळालां अवघे जण ।
अखया धाडितांचि जाण । घेतला प्राण हनुमंतें ॥ ७५ ॥
अखयाचिये कैवारा । धाडितां न देखतां निशाचरा ।
मग धाडिलें ज्येष्ठ कुमरा । महावीरा इंद्रजिता ॥ ७६ ॥
विश्वासतां तुमच्या बळां । अखया कुमर जीवें गेला ।
इंद्रजित रणीं गांजिला । लंकेचा केला पुरदाहो ॥ ७७ ॥
धिग्धिग् तुमचा पुरूषार्थ । धिग्धिग् तुमचें जीवित्व ।
वृथा चाळवा लंकानाथ । रावण निश्चित महाभोळा ॥ ७८ ॥
रावण भोळें बापुडें । तुम्हांसी विश्वासलें वेडें ।
तुमच्या पोटीं आहे कुडे । हे धडफुडें लक्षेना ॥ ७९ ॥

दोषादिग्दर्शनामुळे प्रधान लज्जित :

ऐकोनि बिभीषणाचें वचन । समस्त जाले लज्जायमान ।
तंव उठिलें पंच प्रधान । आपुली आंगवण वानित ॥ ८० ॥
प्रहस्त महोदर पार्श्वद देख । यज्ञहनु आणि दुर्मुख ।
यापांचांचे पंच श्लोक । अलौकिक आंगवण ॥ ८१ ॥
रावणाचिये निजदळीं । प्रहस्त वीर महाबळी ।
तो आपली प्रतापनव्हाळी । रावणाजवळी सांगत ॥ ८२ ॥

प्रधानांची आत्मप्रौढी, प्रहस्ताची आढ्यता

युद्धामाजी ज्याचे हात । अरिनिर्दळणीं अति समर्थ ।
यालागीं नांवें प्रहस्त । अति आप्त लंकेशा ॥ ८३ ॥
खड्ग चाप शूळ फरश । गदापाणी वीर राक्षस ।
मारावया वानरास । आम्ही बहुत रणयोद्धें ॥ ८४ ॥
बहुकाळाची तृषित भूमी । वानररूधिरें तृप्त करून आम्ही ।
रणीं मारूं वानरस्वामी । विजयो आम्ही पावोनी ॥ ८५ ॥
लक्ष्मणासहित रामस्वामी । ठायी पाडोनि रणभूमी ।
आम्हांसीं विचारिता संग्रामीं । पराक्रमी कोण आहे ॥ ८६ ॥
रामलक्ष्मणां करोनि घात । सुग्रीव अंगदा करोनि अंत ।
वानर मारीन मी समस्त । तरी प्रहस्त वीर तुझा ॥ ८७ ॥
ताळफळें गण्ती वनीं । तैशा पाडीन वानरश्रेणीं ।
रामलक्ष्मणां पाडोनि रणीं । अर्ध क्षणीं येईन ॥ ८८ ॥

महोदराची गर्जना :

ऐसें बोलतां प्रहस्त । महोदर उठिला गर्जत ।
नरवानरां करीन घात । निजपुरूषार्थप्रतापें ॥ ८९ ॥
बळवंत बुद्धिवंत । रावणाचा परम आप्त ।
महोदर निजपुरूषार्थ । असे सांगत साटोपें ॥ ९० ॥
जयाचें कां उदर । दुष्ट दुराश दुर्भर ।
यालागीं नाम मनोहर । जेंवी विखार महा उरग ॥ ९१ ॥
ऐक राया सावधान । मी शस्त्रास्त्रीं प्रवीण जाण ।
रणीं पाडीन रामलक्ष्मण । विगतप्राण रणरंगी ॥ ९२ ॥
अंगद सुग्रीव जांबवंत । या जुत्पतींचा करीन घात ।
वानरसेना समस्त । क्षितीं विख्यात पाडीन ॥ ९३ ॥
वानरांचे पैं रूधिर । तृषार्त प्राशिती निशाचर ।
ऐसें बोलोनि महोदर । उठे सत्वर युद्धार्थें ॥ ९४ ॥

महापार्श्वाची स्वबलप्रौढी :

महोदरा निघतांचि देख । महापार्श्वे दिधली हाक ।
माझा पुरूषार्थ अलोकिक । स्वयें दशमुखा अवधारीं ॥ ९५ ॥
सकळ पार्षदमुख्यता यासी । म्हणोनि महापार्श्व म्हणती त्यासी ।
रावणा एकांतवासीं । विचारासीं अति आप्त ॥ ९६ ॥
तो महापार्श्व आपण । संमुख लक्षोनि रावण ।
बोले आपुली आंगवण । युद्ध दारूण संग्रामीं ॥ ९७ ॥
बृहस्पतिसमान बुद्धी । दारूण निर्वाणयुद्धीं ।
वीर धीर त्रिशुद्धी । दुष्टबुद्धी महापार्श्व ॥ ९८ ॥
माझा प्रथम शस्त्रघायीं । श्रीरामलक्ष्मणा पाडीन ठायीं ।
सुग्रीवादि वानर पाहीं । बहुत घायीं लोळवीन ॥ ९९ ॥
माझें बाहु तेचि वागुरा । तेंचि दृढबंधन वानरां ।
बळे रगडितां कपींद्रा । रूधिरधारा सूटती ॥ १०० ॥
जैसा महामेरू पर्वत । वर्षाकाळीं असे द्रावत ।
तैसें वानरांचे रक्त । प्रवाहत देखाल ॥ १०१ ॥
जैशा पंचाननाच्या चपेटा । लागतां पडती गजघटा ।
तेंवी वानरें घायवटा । पडले स्पष्ट देखाल ॥ १०२ ॥
माझिया शस्त्रघातेंकरीं । वानर पडिलें पृथ्वीवरी ।
राक्षस रूधिरें स्नानेंकरीं । मांसआहारीं अति तृप्त ॥ १०३ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । सुग्रीव आणि वानरगण ।
म्यां मारिले गा संपूर्ण । ऐसें तूं जाण लंकेशा ॥ १०४ ॥
निकटवर्ती मी असतां । रावणा तुज कायसी चिंता ।
सुखें भोगावी हो सीता । विमानस्था महावनीं ॥ १०५ ॥

दुर्मुखाची उक्ती :

ऐसें बोलतांचि देख । तंव रागें उठिला दुर्मुख ।
हनुम्यानें गांजिला दशमुख । तें महादुःख साहवेना ॥ १०६ ॥
तो हनुमंत अति दुर्धर । मारीन तरी मी दुर्मुख वीर ।
गर्जोनि बोले निशाचर । संप्रधार बळाचा ॥ १०७ ॥
वानराची चपळवृत्ती । मज येतांचि पळे मारूती ।
तरी मी त्याची करीन शांती । ऐकें निश्चितीं निर्धार ॥ १०८ ॥
अतळ वितळ सुतळ । भेणें लंघिती सप्त पाताळ ।
तेथेंही धरीन गोळांगुळ । तो मी तत्काळ मारीन ॥ १०९ ॥
मजभेणें पळतां सागरीं । उडी घालोनि पुच्छीं धरीं ।
मग काढीन बाहेरी । भूमीवरी आपटीन ॥ ११० ॥
आधीं मारीन हनुमंत । मग मारीन श्रीरघुनाथ ।
लक्ष्मणाचाकरीन घात । करीन अंत सुग्रीवा ॥ १११ ॥
वानरांची मादी आली । ते रगडीन घायातळीं ।
एकला एक आर्तुबळी । तुजजवळी येईन ॥ ११२ ॥
दुजयाचा पाहे सांगात । जळो त्याचा पुरूषार्थ ।
रामलक्ष्मणवानरांत । रणकंदनार्थ माझेनि ॥ ११३ ॥

वज्रहनाची आरोळी :

दुर्मुखबडीवार ऐकोन । रागें उठिला वज्रहन ।
संमुख करोनि दशानन । स्वयें गर्जोन बोलत ॥ ११४ ॥
पदाति रथ वाजी कुंजर । सुखें राहोत निशाचर ।
संहारावया नर वानर । माझें चक्र उदंड ॥ ११५ ॥
प्रहस्त महोदर हरिखें । महापार्षदादि दुर्मुखें ।
रावणापासीं राहावें सुखें । वानरकटकें मी जाणें ॥ ११६ ॥
न लगे शस्त्रारण । आम्हांसी न लगे रणांगण ।
नरवानरांसी मरण । माझेनि जाण जिव्हाग्रें ॥ ११७ ॥
लक्ष्मणासीं समवेत । प्रथम गिळीन मी रघुनाथ ।
अंगद सुग्रीवा जांबवंत । हनुमंत महावीर ॥ ११८ ॥
नळ नीळ तरसा तरळ । सुषेण मैंदादि सकळ ।
माझेनि दर्शनें वानरदळ । प्रळयकाळ पावेल ॥ ११९ ॥
पर्वताकृति निशाचर । जिव्हेनें चाटितसें वक्त्र ।
दांत खातसें करकर । नरवानर भक्षावया ॥ १२० ॥
जिव्हा काळी संकटक । दशन विक्राळ विटंक ।
येवोनि रावणासंमुख । देवोनि हाख गर्जत ॥ १२१ ॥
जा रे सांगा लंकानाथा । म्यां मारिले श्रीरघुनाथा ।
वधिलें वानरांसमस्तां । सुखें तुवां सीता भोगावी ॥ १२२ ॥
आजिपासोनि लंकापुरा । भय नाहीं निशाचरा ।
स्वभोगीं भोगाव्या निजदारा । सुमनसेजेसीं संयुक्त ॥ १२३ ॥
ऐसे राक्षस बहुवस । मिळोनि अति कर्कश ।
बोलाचें मिरविताति यश । आलें अपेश चुकेना ॥ १२४ ॥

सर्वांची दर्पोक्ती ऐकून बिभीषणाचे उत्तर :

देखोनि राक्षसांची उद्धतोक्ती । बिभीषण तो महामती ।
तेणें निवारिलें पुढती । युक्तायुक्तिविभागें ॥ १२५ ॥
हात जोडोनि समस्तांप्रती । मृदु मधुर मंजुळवृत्ती ।
बिभीषण बोले पुढती । स्वधर्मनीती धर्मार्थ ॥ १२६ ॥
तुम्ही प्रधान बुद्धिवंत । धर्माधर्मविचार येथ ।
रामरावणांचा वैरार्थ । अधर्म येथ मुख्यत्वें ॥ १२७ ॥
श्रीरामाची दारा हरण । किमर्थ करी पैं रावण ।
हेंचि वैराचें कारण । प्राणहरण परदारा ॥ १२८ ॥
सीता परम सती सृष्टीं । तिचिया अभिलाषदृष्टीं ।
रावणाची बुद्धि खोटी । महापापीं सृष्टीं हा एक ॥ १२९ ॥

योग्य उपाय न सांगण्याबद्दल त्यास दोष :

त्यासी न सांगतां बुद्धि । तुम्ही साह्य होतां युद्दीं ।
यालागीं तुम्ही मंदबुद्धी । महामूढधी प्रधान हो ॥ १३० ॥
विष खातियाचें पंगतीं । जो बैसें तो मरणार्थी ।
धरितां पाप्याची संगती । अधोगती पावाल ॥ १३१ ॥
विचारोनि बळाबळ । मग करावें युद्ध प्रबळ ।
तदर्थीं तुम्ही अवघें मूर्ख सकळ । अवघे निर्बळ युद्धार्थीं ॥ १३२ ॥
सुबुद्धि सांगतां वाटे दुःख । साच बोलतां वाटे विख ।
आदिकरोनिया दशमुख । तुम्ही अवघे मूर्ख अविवेकी ॥ १३३ ॥
त्या अविवेकाचें लक्षण । तुम्हांस सांगेन संपूर्ण ।
पाहोनि पराची आंगवण । फावल्या आपण युद्ध कीजे ॥ १३४ ॥
रावण बापुडें भोळे येथ । प्रधान मिथ्यावादी समस्त ।
जैसें झकवा तैसें झकत । हिताहित जाणेना ॥ १३५ ॥
कुष्ठियासीं कुष्ठ सांगतां । कोप येतसे तत्वतां ।
कां रांडवेसीं रांड म्हणतां । अति क्षोभतां संतापें ॥ १३६ ॥
तेंवी मज सत्य बोलतां । कोप येतसे तत्वतां ।
तरी रावणाच्या हितार्था । यथार्थता बोलेना ॥ १३७ ॥

प्रहस्ताचा अधिक्षेप :

प्रहस्त म्हणवितो बळी । पुत्र निमाला जंबुमाळी ।
हनुमान मारीच ते काळीं । रणकल्लोळीं उपटोनी ॥ १३८ ॥
पुत्रशोकें दुःखाभिभूत । रावणापासीं आला रडत ।
श्रीरामसौमित्र हनुमंत । मारीन म्हणत तें मिथ्या ॥ १३९ ॥
मिथ्या त्यांचे बळबंड । बोल बोलतो वितंड ।
प्रहस्ताचें काळे तोंड । परम लंड प्रधान ॥ १४० ॥

महोदराची निर्भर्त्सना :

मिथ्यावादी महोदर । जैं मारिला अखया कुमर ।
तेव्हां होवोनि कपीसमोर । रणीं वानर न मारीच ॥ १४१ ॥
अखया मारिला देखोन । महोदर पलायमान ।
आतां मिरवितो आगंवण । रामलक्ष्मण मारावया ॥ १४२ ॥
सूर्य जिणावयासाठीं । खद्योत निजतेजें हुटहुटी ।
तैसी महोदराची चावटी । मिथ्या गोष्टी महामूर्ख ॥ १४३ ॥
इंद्रजित गांजिला सुबद्ध । तेव्हां धावोनि महापार्षद ।
हनुमंतासीं न करी युद्ध । पळाला प्रसिद्ध पडलंके ॥ १४४ ॥
तो हा मिरवितो आंगवण । मी मारीन रामलक्ष्मण ।
अंगद सुग्रीव वानरगण । हे चाळवण लंकेशा ॥ १४५ ॥

महापार्श्वादि इतरांचीही तशीच संभावना :

यापरी महापार्श्व । वृथा जल्पतां मिथ्यावाद ।
प्रधानांमाजी महामंद । अति निंद्य नपुंसक ॥ १४६ ॥
दुर्मुखाचें काळें मुख । जेव्हां गांजिला दशमुख ।
तेव्हां वानरासंमुख । युद्धोन्मुख न मारीच ॥ १४७ ॥
आतां बोलत बळनवाळी । जेणें केली लंकाहोळी ।
तो मी मारीन जळीं स्थळीं । सप्तपाताळीं शोधोनी ॥ १४८ ॥
लंका जाळिली तुम्हांदेखतां । तेव्हां न माराचि हनुमंता ।
आतां मारीन म्हणता । लाज सर्वथा असेना ॥ १४९ ॥
असत्यवादी सदा देख । यालागीं नांव दुर्मुख ।
त्यांचें बोलणें एक एक । अवघे लटिक लंकेशा ॥ १५० ॥
वज्रहनु बोलता बोली । रामलक्ष्मणवानरांसी गिळीं ।
हनुम्यानें करितां लंकाहोळी । तेव्हें तत्काळीं गिळीचना ॥ १५१ ॥
कपीनें करितां लंकाहोळी । वज्रहनूची बैसे दांतखिळी ।
धाकें लपाला अर्धजळीं । रायाजवळीं तैं नव्हता ॥ १५२ ॥

याप्रमाणे प्रधानांची मिथ्या दर्पोक्ति ऐकू
नये व सीता परत करावी हे श्रेयस्कर

ऐसी प्रधानाची वार्ता । समूळ मिथ्या लंकानाथा ।
श्रीरामासी अर्पावी सीता । कुल सर्वथा वांचवीं ॥ १५३ ॥

प्रधान लज्जायमान :

ऐकोनि बिभीषण वचन । प्रधान सेनानी रावण ।
अवघे जाले लज्जायमान । अधोवदन राहिले ॥ १५४ ॥
अपमानितां सर्वासीं । देखोनि क्षोभ इंद्रजितासीं ।
तोही आपण अति आवेशीं । बिभीषणासी बोलत ॥ १५५ ॥
पुढील प्रसंगीं अनुवाद । संवादामाजी विवाद ।
दोघां बंधूंसीं विरोध । परम क्रोध खवळेल ॥ १५६ ॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामासी अनन्य शरण ।
स्वयें होईल बिभीषण । तेंचि निरूपण अवधारा ॥ १५७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
बिभीषणेन रावणप्रधाननिर्भर्त्सनं नाम पंचत्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३५ ॥
॥ ओव्यां १५७ ॥ श्लोक ३७ ॥ एवं संख्या १९४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती  


तुमच्या शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी कृषी क्रांती ला नक्की भेट द्या 
ref:satsangdhara 

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पस्तिसावा