संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा

इंद्रजिताचा मारुतीकडून अपमान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अखयाच्या निधनाने रावण दुःखी

अखया कुमार पाडिला रणीं । रावणें ऐकतांचि कानीं ।
शंख करित दाही वदनीं । लोळे धरणीं गडबडां ॥ १ ॥
मुकुट पडिला सभास्थानीं । हें प्रत्यक्ष देखोन नयनीं ।
रावण रडे आक्रंदोनी । विरूद्ध करणी म्यां केली ॥ २ ॥
बुद्धिभ्रंश झाला मजसी । कुमार धाडिला युद्धासी ।
रणीं वानरें मारिलें त्यासी । बोल कवणासीं ठेवावा ॥ ३ ॥
माझें जें कां अशोकवन । तें मज जालें शोकस्थान ।
कपीनें लंके घालोनि खान । पुत्रनिधान तेणें नेलें ॥ ४ ॥
आम्हां अवघ्यांदेखतां जाण । देहामाजि घालोनि खान ।
अखया नेला निजनिधान । नागवण मज आली ॥ ५ ॥
नव्हे त्याची चोरी मारी । हनुमान नव्हे पैं खानोरी ।
लाज लावोनि आमुचे शिरीं । अखया मारी पुरूषार्थें ॥ ६ ॥
अवघे बोलती प्रधान । आमुचे पुत्र पाडिले जाण ।
स्वयें संपादी रावण । श्रेष्ठ मरण संग्रामीं ॥ ७ ॥
अखया पुत्र पडिला रणी । शंख करी दाही वदनीं ।
बोलासारिखी नाहीं करणीं । निंद्याभिमानी रावण ॥ ८ ॥
सैन्य धाडिलें कोट्यानुकोटी । तें मारिले पुच्छासाठीं ।
वानरें पुरविली पाठी । रावणापोटीं धुकधुकी ॥ ९ ॥
अभिलाषितां शिवाची कांता । उमा मागितली भोगार्था ।
तें पाप बैसलें माझे माथां । रूद्र तत्वतां क्षोभला ॥ १० ॥
उमा ते तंव जगत्त्रयजननी । विषशें माझी सद्‌गुरूपत्‍नी ।
ते म्यां अभिलाषितां नयनीं । रूद्र क्षोभोनीं स्वयें आला ॥ ११ ॥
अखयासी क्षयो जाहला । सत्य स्वयें रूद्र क्षोभला ।
राक्षसांसी क्षयो आला । तो म्यां केला महादोष ॥ १२ ॥
हा तंव नव्हे गा वानर । क्षोभोनि आला काळाग्निरूद्र ।
कायसा राक्षसांचा भार । सर्व संहार येथें आला ॥ १३ ॥
जो जो धाडिला अशोकवनीं । तो तो पडिला काळाचे वदनीं ।
आतां धाडिला नवचे कोणी । रावण मनीं विचारी ॥ १४ ॥

रावणाची स्वतः च मारुतीबरोबर युद्धास जाण्याची तयारी :

अखयाचे कैवारासीं । धाडितां नये आणिकासी ।
मीच जाईन संग्रामासी । कांस सरिसी तेणें केली ॥ १५ ॥
म्यां वानर मारिल्यापाठीं । लंका निर्मुक्त संकटीं ।
वानरें मज मारिल्यापाठीं । सीता गोरटी निर्मुक्त ॥ १६ ॥
लाज लागली रावणासी । न सांगतांचि कोणासी ।
आंगीं बांधिलें कवचासी । संग्रामासी निघाला ॥ १७ ॥

ते समजताच इंद्रजिताचे आगमन :

ऐसें ऐकतांचि कानीं । इंद्रजित आला गजबजोनी ।
रावणातें नमस्कारूनि । सिंहासनी बैसविला ॥ १८ ॥
एकलें एक पैं वानर । वनवासीं ते पालेखाइर ।
त्यावरी जाणें दशशिर । शुद्ध विचार हा नोहे ॥ १९ ॥
वीरीं घेतला वानरदाक । धाडिता न वचे कोणी एक ।
मी तरी घरगुती सेवक । आवश्यक मज धाडीं ॥ २० ॥

त्याची स्वतः ला पाठविण्याविषयी रावणाला विनंती :

वीरीं वाढिवेचे बोल । रणांगणीं होती फोल ।
माझें बोलणें सत्य सखोल । जाणती सकळ सुरसिद्ध ॥ २१ ॥
माझ्या प्रतापाची ख्याती । तूंही जाणसी लंकापती ।
मज धाडावें शीघ्रगतीं । क्षणें मारुती आणीन ॥ २२ ॥
एकलें वानर तें किती । तुवां जाऊं नये लंकापती ।
मज धाडावें संग्रामार्थी । क्षणें मारूती आणीन ॥ २३ ॥
धरोनि रावणाचे चरण । इंद्रजित घाली लोटांगण ।
मागतां युद्धां आज्ञापन । आलें रुदन रावणा ॥ २४ ॥

त्याला पाठविण्याविषयी रावण साशंक :

चौदा सहस्त्र बनकर । ऐशीं सहस्त्र किंकर ।
जंबुमाळी प्रधानपुत्र । मारिले शूर सेनानी ॥ २५ ॥
देवा दानवांसी दुर्धर । बळियां बळी वीर शूर ।
तुझा बंधु अखया कुमार । वानरें मार दृढ केला ॥ २६ ॥
पाचारोनी रणांगणीं । वीर मारिले आइणींपाइणीं ।
ऐसा वानर दुर्धर रणीं । संमुख कोणी उरेना ॥ २७ ॥
वानरेंसी समान बळी । कोणी न दिसे भूमंडळीं ।
त्यासी तुज घेतां फळी । करील होळी रणमारें ॥ २८ ॥
जे गति जाहली अखयासी । ते गति होईल इंद्रजितासी ।
पुत्र धरोनि पोटासीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ २९ ॥

इंद्रजिताचे आश्वासन :

इंद्रजित म्हणे लंकानाथा । कायसी वानराची कथा ।
तूं का करिसी व्यर्थ चिंता । बांधोनि आतां आणीन ॥ ३० ॥
युद्धसंधीं गळा बांधोन । इंद्र आणिला जिंतोन ।
इंद्रजित हें अभिधान । तैंपासून मज जालें ॥ ३१ ॥
त्या मज वानरासीं रण । करितां तुज संदेह कोण ।
वानराचा गळा बांधोन । येथें आणीन भक्ति माझी ॥ ३२ ॥

रावण त्याला धाडतो व मायावी युद्धाचे प्रकार करण्याचे सुचवितो :

ऐकोनि इंद्रजिताचें वचन । सुखावला दशानन ।
दुर्धर धाडी निजसैन्य । देऊनी सन्मान पाठवी ॥ ३३ ॥
ऐकोनि इंद्रजिताचें वचन । रावण विचारी आपण ।
निराहारी ब्रह्मचारी पूर्ण । त्याचे निमरण मेघनादा ॥ ३४ ॥
वानरा येथें फळभक्षण । याचेनि इंद्रजित न पवे मरण ।
तरी युद्धासीं संदेह कोण । धाडी रावण आल्हादें ॥ ३५ ॥
अखया मारिला जगजेठी । तेणें रावण क्रोधदृष्टी ।
इंद्रजितासी सांगे गोष्टी । वानर कपटी मारावा ॥ ३६ ॥
ब्रह्मयापासोनि विद्या सकळ । शिकलासी अस्त्रबळ ।
तुजपासीं शस्त्रें सकळ । सृष्टीं सबळ तूं एक ॥ ३७ ॥
इंद्रादि देवां रणधांदडी । जिंतोनि अमर तेहतीस कोडी ।
घातलें लंकेचे बांधवडीं । गाढी प्रौढी तु पुत्रा ॥ ३८ ॥
करोनि मेघांचें तर्जन । हिरोनी त्याचें गडगर्जन ।
मेघनाद हें अभिधान । शोभे संपूर्ण तुज पुत्रा ॥ ३९ ॥
अस्त्रबळ शस्त्रबळ । बुद्धिबळ निजांगबळ ।
बळ मेळवोनियां सकळ । धरीं तत्काळ वानर ॥ ४० ॥
जरी नाटोपे करितां बळ । तरी त्वां त्याचा करावा छळ ।
तुजपासीं विद्या प्रबळ । गोळांगुळ धरावया ॥ ४१ ॥
प्रबळ बळें हनुमंता । तुजसीम तुकों नयें एथ ।
तुजपासीं शस्त्रास्त्रें समस्त । समायीं लागत तीं घेईं ॥ ४२ ॥
वेळ पाहोनि सावचित्त । युद्धा निघावें त्वरित ।
जयो पावसी निश्चित । लंकानाथ अनुवादे ॥ ४३ ॥

युद्धासाठी निघताना अशुभ चिन्हे :

पितृवाक्य आशीर्वचन । इंद्रजित ऐकोनि आपण ।
परमभक्तीं प्रदक्षिण । मस्तकीं चरण वंदिले ॥ ४४ ॥
इंद्रजित निघतां उल्लासेंसीं । नग्न कुमारी शिंके पाठींसीं ।
दचक पडिला रावणासीं । इंद्रजितासीं आशंका ॥ ४५ ॥
शिंक झाली पाठीसीं । भविष्य पुसे ब्रह्मयासी ।
ब्रह्मा सांगे रावणासी । अति गुह्यासी गुप्तत्वें ॥ ४६ ॥

ब्रह्मदेवास विचारता मरण येणार नाही याबद्दल आश्वासन :

अपेश यशीं यश अपेशीं । मरण नाही इंद्रजितासी ।
वानर आणी लंकेसीं । तुजपाशीं रावणा ॥ ४७ ॥
रणीं धरिजेल वानर । ऐकोनि ब्रह्मयाचें उत्तर ।
अवघे करिती जयजयकार । सैन्यसंभार सज्जोनी ॥ ४८ ॥

रावणाकडून विशेष आदेश :

गुह्य सांगे स्वयें रावण । वानर नव्हे साधारण ।
रणकर्कश अति दारूण । जाण संपूर्ण कृतांत ॥ ४९ ॥
जे जे गेले अशोकवनीं । ते ते पडले काळाचे वदनीं ।
सैन्य अश्व गज रथ गांजोनीं । वीर मर्दोनि निर्दळिले ॥ ५० ॥
जे जे देखिले हनुमंतें । ते ते निमाले निश्चितें ।
बोंब सांगावया पुरतें । नेदी वीरातें उरी उरों ॥ ५१ ॥
कवच न चले तयापुढें । वोडणखांडे तें बापुडें ।
कोण राहे तयापुढें । घायें रोकडें विभांडी ॥ ५२ ॥
शस्त्रें न रूपती बाण । न चले अस्त्रांचें प्रेरण ।
आपुले वांचवोनी प्राण । रणांगण साधावें ॥ ५३ ॥
गुह्य सांगतां तुजपासीं । परम शक्ति पुच्छासीं ।
पुच्छें निर्दळिलें सैन्यासी । महावीरांसी मारक ॥ ५४ ॥

मारूतीला पकडून आणण्याची प्रतिज्ञा :

इंद्रजित म्हणे असोत युक्ती । सत्य ब्रह्मयाची वचनोक्ती ।
गळा बांधोनियां मारूती । लंकेप्रती आणीन ॥ ५५ ॥
ऐकोनि इंद्रजिताचें उत्तर । वीरीं केला जयजयकार ।
झाला वाद्यांचा गजर । सैन्यसंभार चालिला ॥ ५६ ॥

महान् सैन्याची स्वारी :

मत्तमातंग महाथोर । शायशीं प्रयुक्तें कुंजर ।
शतानुशतकोटि रहंवर । असिवार असंख्य ॥ ५७ ॥
एक वळंघले उष्टरीं । एक वळंघले महाखरीं ।
एक चढले अश्वांवरी । गिरागजरीं गर्जत ॥ ५८ ॥
वारू उडविती जेंवी केसरी । नाचविती तींच पायांवरी ।
हो हो मा मा जी जी करी । यावा स्वरीं दाविजे ॥ ५९ ॥
वीर वांटीव आतुर्बळी । हस्तबाहुकरतळीं ।
कंगल टोप राघावळी । मुक्तामणिमेळीं पाखरा ॥ ६० ॥
अंगत्राणे पैं वीरांसी । लखलखीत तेजोराशी ।
हिरे माणिकें जडली त्यांसी । रविप्रभेसीं सम प्रभा ॥ ६१ ॥
शेळी साबळी शक्ति तोमर । अढाउ चव्हाण कोइतेकार ।
शूळत्रिशूळफरशधर । धनुर्धर पायांचे ॥ ६२ ॥
भिंडिमाळा चेंडू चक्रें । गदा मुद्गल परिघपत्रें ।
सिद्ध केलीं अग्निशस्त्रे । नाना यंत्रें रणमारा ॥ ६३ ॥
अलंगाईत बाणाईत । तुळणें वोढणे धडकित ।
कोइतेकार पैं तळपत । जेठी पिलंगत मुष्टिघाता ॥ ६४ ॥
खड्गहस्त खेटकहस्त । पटाईत पट्टि हस्त ।
जमदाढा कटारहस्त । अश्मपात पैं एका ॥ ६५ ॥
ऐसें पायांचे मोगर । वीर चालिले अपार ।
भाट गर्जती कैवार । गजगंभीर गडगर्ज ॥ ६६ ॥
पुढे पायांचे निधडे वीर । तयांमागें असिवार ।
त्यांचें पाठीसी रहंवर । राजकुमार त्यांमागें ॥ ६७ ॥
दांतीं लोहसेंब्या तिखट । वारिया न चले वाट ।
दोहीं बाहीं गजांचा थाट । मदोत्कट चालती ॥ ६८ ॥
श्वेत पीत अति आरक्त । बहुपताकीं सैन्य शोभत ।
पताकीं वाढवावया पुरूषार्थ । ब्रिदाईत वागविती ॥ ६९ ॥
सूर्यप्रभासमयुक्त । रथ निजतेजें लखलखीत ।
ध्वज पताका शोभत । ओळकंबत बहुमाळा ॥ ७० ॥
तडक फुटलें एकसरें । भिंडिमाळांचे पागोरे ।
खाखाइलीं रणतु रें । वीर गजरें गर्जती ॥ ७१ ॥
धडधडां विघातें पाहीं । निशाणे लागलीं एकचि घाई ।
विराणीं वाजती लवलाहीं । दुंदुभि पाही त्राहाटिल्या ॥ ७२ ॥
शंख मृदंग टाळघोळा । वाजती काहाळा किनकाहाळा ।
घर्घरित घोगरगळा । ध्वनि आगळा बुरंगांचा ॥ ७३ ॥
पांवे वाजती थापटेकरी । पट त्राहाटिल्या भेरी ।
चंड वाजिन्नल्या चंडमोहरी । निशाणें गजरीं गर्जतीं ॥ ७४ ॥
रणी वाजती गिडबिडीं । भेडां मळसूत्र लिडबिडी ।
ऐकोनि हनुमंताची प्रौढी । भय धाकही घेतला ॥ ७५ ॥
हनुमान एकला एक वानर । त्यावरी अमित दळभार ।
तरी धाकती समग्र । झणींव वानर मारील आम्हां ॥ ७६ ॥

मारूतीला आनंद व उल्लास :

ऐकोनि वाजंत्र्यांचा नाद । सैन्य देखोनि सन्निध ।
हनुमान करितो आल्हाद । राम गोविंद तुष्टला ॥ ७७ ॥
करावया राक्षसांसीं झगडा । मुहूर्तें केला बनउपाडा ।
इंद्रजिताचा पादाडा । रणीं रोकडा झाडीन ॥ ७८ ॥
माझे पुरवावया मनोरथ । आजि तुष्टला श्रीरघुनाथ ।
रणीं निर्दळोनी समस्त । इंद्रजित गांजीन ॥ ७९ ॥
अखया मारोनि रणीं । प्रथम केली म्यां बोहणी ।
येथोनि वीरांविया श्रेणी । रणीं मर्दूनी मारीन ॥ ८० ॥
पुच्छ नाचतें पैं धरणीं । सैन्य मारोनियां रणीं ।
पूजूं चामुंडा भवानी । मांसाची धणी भूतांसी ॥ ८१ ॥
पुच्छ अतिशयें सज्ञान । भूतां दिधले आमंत्रण ।
मांसभोजन रूधिरपान । कृपा करोनि सेवावें ॥ ८२ ॥
ज्याचे पोटीं जे आवडी । ते मज सांगावी रोकडी ।
ते ते पुरवीन परवडी । राक्षसकोडी मारोनी ॥ ८३ ॥
आजि हेचि भाजी भाकरी । तुम्हीं करावी न्याहारी ।
श्रीराम पुढें रणकेसरी । पंचधारी निववील ॥ ८४ ॥

शेपटीला सर्वांचा संहार करण्याची आज्ञा :

पुच्छासी गुज सांगे हनुमंत । जो जो आला सैन्यांत ।
परतों न द्यावा नगरांत । करावा घात अवघ्यांचा ॥ ८५ ॥
जो जो होईल शरणागत । त्यासी राखावें निश्चित ।
येर मारावे समस्त । आज्ञा समर्थ मानीं पुच्छा ॥ ८६ ॥
मानोनि स्वामीचें वचन । लंकाद्वारीं पुच्छ रक्षण ।
जो परतेल रक्षोगण । त्याचा प्राण घ्यावया ॥ ८७ ॥

इंद्रजिताचे प्रस्थान :

असो हे बहुसाला व्युत्पती । पुढील कथेची संगती ।
इंद्रजित आरूढला रथीं । रथप्रयुक्ती अवधारा ॥ ८८ ॥
रथचक्र तें प्रवाळ । आंख मरकताचा सुनीळ ।
धुरा आणि जूं तीतें इंद्रनीळ । उपराड सकळ रत्‍नांचे ॥ ८९ ॥
रथीं जुंपिले प्रबळ । नखी दंष्ट्री सिंह शार्दूळ ।
मुखें भयानकें अति विक्राळ । जिव्हा जाज्ज्वल अग्निप्राय ॥ ९० ॥
रथीं सारथी कपटराशी । अश्ववागोरे तयापासीं ।
इंद्रजित बैसला रथेशीं । निजचापासी सज्जोनी ॥ ९१ ॥
रथध्वज सुनीळनीळा । ध्वजपताका विचित्रलीळा ।
रत्‍नमुक्ताफळमाळा । रथीं बैसला इंद्रजित ॥ ९२ ॥
जैसा इंद्र सुरवेंसीं । तैसा इंद्रजित राक्षसेंसीं ।
मुक्ताफळांच्या झालरेसीं । अति शोभेसी सुप्रभा ॥ ९३ ॥
कनकदंडयुग्मचामरीं । उपभोग जाणविती नानापरी ।
ऐसिया सेनेसीं संभारीं । जयजयकारीं निघाला ॥ ९४ ॥
जैसी गरूडागमनीं शक्ती । तैसीच रथाची सवेग गती ।
रणीं जिणावया मारूती । शीघ्रगती निघाला ॥ ९५ ॥

असाळीचे आगमन, तिचा आवेश व विक्राळ वदन :

इंद्रजित येतां समदळीं । पुढें धाविन्नलीं असाळीं ।
जेणें मारिल अखया बळी । त्याची होळी मी करीन ॥ ९६ ॥
एकलें एक तें पालेखाईर । त्यावरी कोपे सैन्यभार ।
पिसाळले निशाचर । तो मी वानर मारीन ॥ ९७ ॥
ठाकोनि आली अशोकवन । संमुख हनुमंत देखोन ।
निकट वटारिले नयन । विक्राळ वदन पसरिलें ॥ ९८ ॥
एक जाभाडें भूतळीं । दुजें लाविलें नभ : स्थळीं ।
कराळ विक्राळ दांताळी । जिव्हा काळी मसमसीत ॥ ९९ ॥
करितां स्वानंदें युद्धासीं । आडवी आली हे राक्षसी ।
जेंवी साधितां निधानासी । पहिलें विवसीं पैं उठे ॥ १०० ॥
युद्धनिधानाजवळी । प्रथम विवसी हे असाळी ।
पहिलें हेचि देवोनि बळी । काळिके काळी चामुंडे ॥ १०१ ॥
भोजन करावया संतृप्ती । पहिलें लहान प्राणाहुती ।
ते संग्रामसमयीं तृप्तीं । प्राणाहुती असाळी ॥ १०२ ॥
प्रथम समिधा होमून । मग होमिती प्रधान ।
तैसीच असाळी हे जाण । समिधावदान संग्रामीं ॥ १०३ ॥
असाळीनें पसरिलें जाभाडें । न पाहतां मागें पुढें ।
हनुमंताची उडी पडे । मशकाएवढें धरी रूप ॥ १०४ ॥

सूक्ष्मरूपाने तिच्या मुखातून प्रवेश व काळीज घेऊन पोटातून बाहेर येणे :

नातळतांचि तिचे दांतां । जिव्हेंसींही नातळतां ।
उदरीं प्रवेशतां हनुमंता । न कळे तत्वतां राक्षसी ॥ १०५ ॥
वानर मुखीं प्रवेशलें । मुखींच्या मुखीं हारपलें ।
किंवा दातांतळीं दडालें । नाडलें पहिले जिव्हाग्रीं ॥ १०६ ॥
लीन झालें मुखापासीं । कीं पळालें श्वासोच्छ्वासीं ।
कोण गती वानरासी । असाळीसी लक्षेना ॥ १०७ ॥
आंबट तिखट खारट । गोड कडू कीं तुरट ।
चवी न कळेचि स्पष्ट । करी कटकट राक्षसी ॥ १०८ ॥
जिव्हादांतीं नाढळे होटीं । शेखीं तृप्त नव्हेचि पोटीं ।
वानरें ठकविल उठाउठीं । अतर्क्य दृष्टीं कळेना ॥ १०९ ॥
असाळीनें गिळिला हनुमंत । चुकला इंद्रजिताचा अनर्थ ।
लोकीं विस्तारिली मात । रणकंदनार्थ सैन्याचा ॥ ११० ॥
पहिलेंचि गिळितीं वानर । तरी कां मरता अखया कुमार ।
किंकर आणि बनकर । प्रधानपुत्र वांचतें ॥ १११ ॥
ऐसे लोक सांगती गोष्टी । तंव असाळीस शूळ पोटीं ।
हनुमंत काळीज धरिंलें मुष्टीं । लोळे सृष्टीं गडबडां ॥ ११२ ॥
करावया इंद्रजितासीं रण । हनुमंताची आवडी पूर्ण ।
तिचे उदरीं न राहे क्षण । केले विंदान ते ऐका ॥ ११३ ॥
उपडोनि काळिजाचा देंठ । बेंबीपासी फाडोनि पोट ।
हनुमंत निघोनियां प्रकट । केला उद्‌भट भुभुःकार ॥ ११४ ॥
ऐकतां तयाचा भुभुःकार । कांपिन्नले निशाचर ।
मुख्य दचकला धुर । सैन्यसंभार खळबळला ॥ ११५ ॥

असाळीचे निर्दळण :

रावणापासीं सांगती मात । असाळीनें गिळिला हनुमंत ।
सवेंचि दुसरी बोंब सांगत । केला निःपात असाळीचा ॥ ११६ ॥
राक्षस मावकर भारी । त्यांहूनि वानरीं विद्या थोरी ।
रिघोनि तियेचे उदरीं । महामारीं मारित ॥ ११७ ॥
जैसी बहीण शूर्पणखा । तैसीच हे असाळिका ।
हनुमंत मारितांचि देखा । दशमुखा बहु दुःख ॥ ११८ ॥
वानर पेटलें द्वंद्वासीं । करूं कोणकोणाच्या दुःखासी ।
काय होईल इंद्रजितासी । निजमानसीं धाकत ॥ ११९ ॥

इंद्रजित व मारूती यांचे द्वंद्वयुद्ध :

केला असाळीचा घात । ऐकोनि इंद्रजितें मात ।
कोपें चालिला कृतांत । हनुमंत दंडावया ॥ १२० ॥
देखोनियां हनुमंता । धिंवसा नव्हे सैन्या समस्ता ।
ऐसें कळलें इंद्रजितां । होय प्रेरिता निजरथ ॥ १२१ ॥
विजू गहगर्जे अंबर । तैसा धनुष्याचा टणत्कार ।
इंद्रजित निधडा महाशूर । रहंवर प्रेरिला ॥ १२२ ॥
ऐकोनि धनुष्याचा टणत्कार । वानरें केला भुभुःकार ।
नादें कोंदलें अंबर । गिरिकंदर दुमदुमिलें ॥ १२३ ॥
निधा उठिला पाताळीं । भूतें कळकळिती अंतराळीं ।
पक्षी भ्रमती नभोमंडळीं । बैसली टाळी दिग्गजांची ॥ १२४ ॥
इंद्रजिता युद्धाची आवडी । रथ प्रेरिला कडाडीं ।
वानरें उभविली पुच्छाची गुढी । नाचे आवडीं रणरंगीं ॥ १२५ ॥
एक रावणी राजकुमर । दुजा दूत वानर ।
एक राक्षसी राक्षसेंद्र । दुजा कपींद्र कपींमाजी ॥ १२६ ॥
दोघे वीर अति प्रबळ । समान बळ समान शीळ ।
दोघे संग्रामीं अति कुशळ । दोघे चपळ रणमारा ॥ १२७ ॥
दोघे भिडती महावीर । पाहूं आले सुरवर ।
सिद्ध गंधर्व ऋषीश्वर । नर किन्नर विमानीं ॥ १२८ ॥
शचीसहित शचीपती । सावित्रीसहित प्रजापती ।
उमेसहित उमापती । पाहूं येती संग्रामा ॥ १२९ ॥
खवळले दोघे वीर । काळकृतांत अति दुर्धर ।
दोघे जैसे काळाग्निरूद्र । युद्धीं सत्वर मिसळले ॥ १३० ॥
एक गज एक केसरी । एक हिरण्यकशिपु एक नरहरी ।
सहस्त्रबाहु परशुधारी । ऐशियापरी मिसळले ॥ १३१ ॥
एक सर्प एक सर्पारी । एक त्रिपुर एक त्रिपुरारी ।
एक मुर एक मुरारी । ऐशियापरी मिसळले ॥ १३२ ॥
इंद्रजित हाणी दुर्धर घाय । हनुमान फळें खाया विटाय ।
कुशी खाजवी डोळे मिचकाय । दाविता होय आंगठा ॥ १३३ ॥
इंद्रजित खवळोनि रणीं । वर्षलासें दुर्धर बाणीं ।
वानर वर्षला पाषाणीं । रणांगणीं गर्जोनी ॥ १३४ ॥
विंधी सुवर्णपुंख भाळीं । वानर हाणी सबळ शिळीं ।
एक हाणी गदामुद्गलीं । शाळताळीं पैं दुजा ॥ १३५ ॥
इंद्रजित वर्षे विचित्र कांडें । वानर वर्षे चापट धोंडे ।
रागें उडोन हाणितां खांडें । वृक्षखंडें ठोकिला ॥ १३६ ॥
साटोपें हाणितां शिवशक्ती । वानर वर्षे अति पर्वतीं ।
इंद्रजित वेडावला चित्तीं । रणीं मारूती नाटोपे ॥ १३७ ॥
एक चेंडुचक्र पैं सोडी । दुजा हाणी प्रचंड धोंडी ।
सवेग हाणितां लहुडी । समूळ धोंडी पैं दुजा ॥ १३८ ॥
पट्टिश हाणितां तवकें । वानरें हाणितां खडकें ।
फुटलें इंद्रजिताचें धैर्यमडकें । पडला अटके पुच्छाचें ॥ १३९ ॥
इंद्रजिताची रणव्युत्पत्ती । फावल्या रणीं लावी ख्याती ।
नाटोपतां पळे मागुती । पुच्छाप्रती बळ न चले ॥ १४० ॥
सैन्यासभोंवता चहूंकडां । पडला पुच्छाचा पैं वेढा ।
सरतां नये मागां पुढां । वानरें वेढा लाविलें ॥ १४१ ॥
पाषाणीं बाण करितां कूट । बाणीं पाषाण करी पीठ ।
युद्ध मांडलें अचाट । अति संकट इंद्रजिता ॥ १४२ ॥
वानर नाटोपे निजशक्ती । कपटें मारावा मारूती ।
कपट न चले पुच्छाप्रती । कपटघाती कपिपुच्छ ॥ १४३ ॥
इंद्रजित वर्षे शरधारीं । वानर वर्षे शिळाशिखरीं ।
सैन्या होतसे चकचुरी । आपांपरीं राक्षसां ॥ १४४ ॥
बोंब सुटली सैन्याआंत । इंद्रजित मेला कीं जीत ।
वानरें केला पर्वतघात । रणीं हुंबत राक्षस ॥ १४५ ॥
न चले शस्त्रअस्त्रयुक्ती । मागें सरतां नये पुच्छाहातीं ।
पुढें नाटोपे मारूती । चिंतावर्ती इंद्रजित ॥ १४६ ॥

मारूतीचे सामर्थ्य पाहून इंद्रजित सचिंत :

चिंतातुर देखोनि त्यातें । हनुमंत म्हणे इंद्रजितातें ।
शिळावृक्षीं न हाणीं तूतें । न हाणीं पर्वतें भाक माझी ॥ १४७ ॥
इंद्रजितनामाची ख्याती । जिंहीं बाणरी जिंतिला अमरपती ।
तया बाणी विंधोनि मजप्रती । विजयवृत्ति साधीं पां ॥ १४८ ॥
ज्या बाणांच्या कडाडीं । देव घातले बांधवडीं ।
ते मज विंधोनिया प्रौढीं । विजयाची गुढी उभारी पां ॥ १४९ ॥
ऐसें बोलता हनुमंता । राग आला इंद्रजिता ।
मंत्रयुक्ता अस्त्रां समस्तां । होय विंधिता अति कोपें ॥ १५० ॥

इंद्रजिताची शस्त्रास्त्रे त्याच्यावरच उलट फिरतात :

मंत्रयुक्तास्त्रप्रयुक्तीं । इंद्रजित वर्षे शरसंपत्ती ।
परता न सरेचि मारुती । शंका चित्तीं मानीना ॥ १५१ ॥
माझें अंगी बाण रूपती । ही शंका नाहीं हनुमंतीं ।
सुर नर आश्चर्य मानिती । तैसी ख्याती तेणें केली ॥ १५२ ॥
रामनामाचिया शक्तीं । नित्य निर्द्वंद्वस्थिति मारूती ।
तेणें इंद्रजितासीं ख्याती । हे ही उपपत्ती अवधारा ॥ १५३ ॥
पसरोनियां दोन्ही हात । बाण कवळोनियां समस्त ।
उसळोनियां गगनाआंत । बाण हाणित राक्षसां ॥ १५४ ॥
पडतां बाणांचा संपात । स्वयें सैन्य होय निःपात ।
घायीं राक्षस कुंथत । जालें विपरीत संग्रामीं ॥ १५५ ॥
हनुमंतासी करितां रण । इंद्रजित भुलला संपूर्ण ।
आपलें सैन्य मारी आपण । निर्वाणबाण वर्षोनी ॥ १५६ ॥
धनुष्यबाण हनुमंतासीं । हा संग्राम नाहीं त्यासीं ।
आवेशें भुली इंद्रजितासीं । निजसैन्यासी मारित ॥ १५७ ॥
माझे निर्वाणींचे बाण । वानरें कवळोनि संपूर्ण ।
आमचीं शस्त्रें आम्हांसी जाण । रणकंदन मांडिलें ॥ १५८ ॥
इंद्रजिताचे बाणांआंत । स्वानंदें हनुमंत विचरत ।
बाण मंत्रशक्तियुक्त । केले व्यर्थ हनुमंतें ॥ १५९ ॥
न चले शस्त्रांची खटपट । न चले अस्त्रांचे पैं नेट ।
न चले वानरांसी कपट । रणीं उद्‌भट गांजिलें ॥ १६० ॥
दिव्यास्त्रें एक एक । वानरें केलीं निरर्थक ।
इंद्रजितें घेतला धाक । जीवीं धुकधुक लागली ॥ १६१ ॥
इंद्रजितबाणांची शरसुटी । वानरें करोंनियां उटी ।
धांवोनि झोंबला पैं कंठीं । धनुष्य मुष्टीं मोडिलें ॥ १६२ ॥

मल्लयुद्धातही मारूतीकडून इंद्रजित हैराण :

सरली बाणांची निजओढी । तरी वानरा प्रौढी गाढी ।
मल्लविद्येची परवडी । कडोविकडी भीडती ॥ १६३ ॥
उरीं शिरीं आणि कोपरीं । तडवे हाणिती परस्परीं ।
कळा लावोनि भुजांवरी । हाणिती उदरीं चपेटघात ॥ १६४ ॥
सांभाळितां वानरलाते । तंव मस्तकीं हाणितला होतें ।
सांभाळितां दक्षिणहस्तें । तंव गांजीत डाव्यानें ॥ १६५ ॥
करितां मल्लविद्याव्युत्पत्ती । मागें पुच्छाच्या आघातीं ।
सव्याघ्र रथ आणि रथसारथी । नेले समाप्ती वानरें ॥ १६६ ॥
मारोनि सारथि भंगिला रथ । इंद्रजित केला दैवहत ।
न टळे पुच्छाचा आवर्त । रणीं हनुमंत नाटोपे ॥ १६७ ॥
ध्वज भंगिला आघातें । छत्रें भंगिलिं हाणोनि लातें ।
मुकुटा पाडोनियां तेथें । इंद्रजितातें गांजिलें ॥ १६८ ॥
भूतळीं समस्त ऋषीश्वर । गगनीं पाहती सुरवर ।
अवघे करति जयजयकार । विजयी वानर श्रीरामें ॥ १६९ ॥
एकाजनार्दना शरण । जाला इंद्रजिताचा अपमान ।
पुढें सैन्यनिर्दाळण । कपिबंधन अवधारा ॥ १७० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
इंद्रजितअपमानहनुमद्द्दस्तेन पंचदशोध्यायाः ॥ १५ ॥
॥ ओव्यां १७० ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय पंधरावा