संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा

सीतेचा पश्चाताप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेला रावणाच्या धमक्या :

रावणें भेडसावितां सीता । त्याच्या पत्‍न्या ज्या समस्ता ।
आश्वासिती श्रीरामकांता । नेत्रवक्त्रा खुणावूनि ॥ १ ॥

देवगंधर्वकन्याश्च विषेदू राक्षसीस्तदा ।
ओष्ठप्रकारैरपरा नेत्राकारैस्तथा परा : ॥१॥
सीतामाश्वासयामासुस्तर्जितां तेन राक्षसा ॥२॥

सीतेसी म्हणे स्वयें रावण । माझी भार्या न होतां पूर्ण ।
तुझा घेईन मी प्राण । नाक कान कापूनी ॥ २ ॥
फोडा इचे दोनी डोळे । वेगें मोडा रे सिसाळें ।
स्तन कापा मांसगोळे । अंत्रमाळे काढा वेगीं ॥ ३ ॥
तुझिया पातिव्रत्याची थोरी । भीड धरिली सहा मासवरी ।
आतां भोगीन बलात्कारीं । राम भिकारी वनवासी ॥ ४ ॥
रावणपत्‍न्यांनी सीतेला अभयाचे आश्वासन दिले :
ऐसीं गांजितां नानापरी । क्षोभोनि रावणाच्या नारी ।
आश्वासिती नानापरी । भय न धरीं तूं याचें ॥ ५ ॥
देवी गंधर्वी अति सुंदरी । नागकन्या निशाचरी ।
आश्वासिती सीता सुंदरी । खुणा करिती तें ऐका ॥ ६ ॥
ऐकी खुणाविती नेत्रांतरीं । एकींची संज्ञा ओष्ठांतरीं ।
एकी त्या निवारिती करीं । अंगुष्ठावरीं अनेका ॥ ७ ॥

रावणाला ब्रह्मदेवाचा शाप :

ब्रह्मशाप रावणशिरीं । झोंबों न शके परनारीं ।
यांचें कांहीं भय न धरीं । धीर धरीं श्रीरामकांते ॥ ८ ॥
सत्यलोकीं वनप्रदेशीं । रावण झोंबतां उर्वरीसीं ।
आजी नेम दिधला नलकूबरासी । तूं कां झोंबसी परदारे ॥ ९ ॥
बळें झोंबतां दशानन । उर्वशी करी आक्रंदन ।
तेथें आला चतुरानन । कोपायमान रावणा ॥ १० ॥
दुष्टा नष्टा लंकानाथा । येथोनि परदारेसीं झोबतां ।
पावसील मस्तकपाता । ब्रह्मशापता दुर्लंघ्य ॥ ११ ॥
ज्याचा निजभाव निर्मळ । त्यावरी कृपा करी सकळ ।
रावणशापाचें निजमूळ । स्त्रियांनी समूळ सांगितलें ॥ १२ ॥
असो हा मागील वृत्तांत । स्वयें देखे हनुमंत ।
मंदोदरीयें लंकानाथ । नेला घरांत तें ऐका ॥ १३ ॥

इत्युक्तो भार्यया राजा रावणः शत्रुकर्शनः ।
समादिश्य ततः सर्वा राक्षसीर्निर्जगाम हः ॥३॥
राक्षस्यो भीमरूपास्ताः सीतां सन्मतिमब्रुवन् ।
पौलस्त्यानां वरिष्ठस्य रावणस्य महात्मनः ॥४॥
दशग्रीवस्य भार्यात्वं सीते न बहु मन्यसे ।
तत : शूर्पनखा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥५॥
सुरामानीयतां क्षिप्रं सर्वशोकविनाशिनीम् ।
मनुष्यमांसेन समं विभुज्य रसमंततः ॥६॥
तेन सोन्मादसानंदं नृत्यामश्च निकुंभिलें ॥७॥

रावणाच्या हुकुमाप्रमाणे राक्षसींचे सीतेला भिवविणे :

मंदोदरीयें नाना युक्ती । कौसल्यादशरथउत्पत्ती ।
शिकवोनियां लंकापती । निजधामाप्रती नेती जाली ॥ १४ ॥
विकटा विक्राळा अति क्रूरी । राक्षसी पाचारिल्या समग्री ।
रावणा त्यांसी एकांत करी । सीता सती वश्य करा ॥ १५ ॥
भय दाखवावें गाढे । जें भय देखतांच पुढें ।
वश्य होय मजकडे । तैसीं चांभाडें पसरावीं ॥ १६ ॥
सामदामभेदकरीं । भय दाखवोनियां भारी ।
वश्य केलिया सीता सुंदरी । कृतोपकारी मी तुमचा ॥ १७ ॥
ऐसा करोनियां एकांत । रावण मंदोदरीसमवेत ।
निघता जाला निजधामांत । राक्षसी येत परतोनि ॥ १८ ॥
रावणें प्रेरिलिया सत्वरा । विकटा विक्राळा वक्रनेत्रा ।
मुखें पसरोनियां क्रूरा । सीतेसामोर्या धांविन्नल्या ॥ १९ ॥
एकी जटाकृतभारी । हरितजटा ते दूसरी ।
विस्तीर्ण कर्ण उदरावरी । स्थूळोदरी विक्राळा ॥ २० ॥
अहिमुखी हयमुखी महामारी । विकटा तिखटा चंडोदरी ।
आणिक राक्षसी घर्घरी । सीतेवरी धाविन्नल्या ॥ २१ ॥
शूळ पट्टिश मुग्दल लहुडी । शस्त्रें लख्लखींत गाढीं ।
इची करा गे ताडातोडी । भीड येवढी ते काय ॥ २२ ॥
तडतडां तोडोनि मांस नेऊं । इचें काळीज भाजोनि खाऊं ।
इचे हाडांचे मणी नेऊं । शिरा घेंऊं ओरपोनि ॥ २३ ॥
रावणा वरी ना जनकबाळा । हिच्या काढा अंत्रमाळा ।
वेगें निमटोनि हिचा गळा । खाऊं सगळा वांटूनि ॥ २४ ॥
काढा मारा आणी धरा । हिचीं शतखंडें करा ।
हाका मारिती दुर्धरा । दशशिरा वरीना ॥ २५ ॥

शूर्पणखेच्या पोकळ वल्गना :

अवघियांचे शेवटीं । आली शूर्पणखा नकटी ।
सीता लक्षोनियां दृष्टीं । सांगे गोष्टी फेफांत ॥ २६ ॥
आईक सीते रावणोत्पत्ती । मुख्य ब्रह्मयाचा पौलस्ती ।
त्याचा विश्रवा प्रजापती । रावण निश्चितीं तयाचा ॥ २७ ॥
रावण ब्रह्मयाची चौथी पिढी । वेदविभागीं प्रज्ञा गाढी ।
राज्य प्राप्त चौदा चौकडी । त्यासी तूं वेडी वरिसी ना ॥ २८ ॥
रावण ब्रह्मवंशी ब्राह्मण । श्रीराम सूर्यवंशी क्षत्रिय हीन ।
त्याची तुज आवड कोण । श्रेष्ठ वर्ण रावणाचा ॥ २९ ॥
रावणसत्ता सुरीं असुरीं । श्रीराम केवळ भिकारी ।
ऋद्धि सिद्धि रावणाघरीं । राम फळाहारी वनवासी ॥ ३० ॥
माझा बोल आईक आतां । होई रावणाची प्रियकांता ।
दिव्य भोग भोगी तत्वतां । सभाग्य सीता जग मानी ॥ ३१ ॥
सांडोनियां खरवाहन । गजस्कंधीं बैसतां जाण ।
जग वानी सभाग्यपण । तैसें पर्णन रावणाचें ॥ ३२ ॥

सीतेकडून अवहेलना :

शूर्पणखेचें ऐकोनि वचन । सीता सांडी हेळसून ।
जैसा हंस न पाहे शेण । तैसें वचन उपेक्षी ॥ ३३ ॥
सीता नेदी प्रतिवचन । शूर्पणखा कोपायमान ।
हिची जिव्हा कान कापून । रक्त पिईन नळीचें ॥ ३४ ॥

शूर्पणखेचा क्रोध :

आणा मद्दमैरेयांसी । इचे मांसें करूं उपहारासी ।
अंगें विभागूं विभागूं सकळांसी । खाऊं सीतेसी अवघ्याही ॥ ३५ ॥
सीतामेदमांसमेळें । मद्दासीं येथ चांगलें ।
खातां आनंदकल्लोळें । नाचूं निकुंबळें गोंधळीं ॥ ३६ ॥

सीतेची निर्भय व शांत वृत्ती :

राक्षसी त्या ऐशापरी । भेडसाविती अति दुर्धरी ।
सीता त्यांचें भय न धरी । श्रीरामचंद्री निजबोध ॥ ३७ ॥
न करी रूदन नव्हे दीन । श्रीरामसुखें सुखसंपन्न ।
राक्षसींचें भयमान । तृणासमान सीतेसी ॥ ३८ ॥
नित्य श्रीरामनामा स्मरतां । सीतादेहीं विदेहता ।
शंका न मनी देह छेदितां । तेंचि श्लोकार्थ अनुवादे ॥ ३९ ॥

छिन्ना भिन्ना विभक्ता वा दीप्ते वाग्नौ प्रवेशिता ।
रावणायोपतिष्ठेति किं प्रलापेन वाश्चिरम् ॥८॥

नांव वैदेही सीता सती । देहभयाची नाहीं भ्रांती ।
श्रीरामध्यानें भयनिवृत्ती । न मानी क्षिती देहाची ॥ ४० ॥

सीतेची श्रीरामांवरील अढळ निष्ठा :

छेदा भेदा खा समस्तीं । श्रीराम भोक्ता सर्वां भूतीं ।
परि नांवें न पाहें लंकापती । स्वप्नस्थिती स्पर्शेना ॥ ४१ ॥
देह करावा रामार्पण । तुम्हांत सबाह्य श्रीराम पूर्ण ।
तुम्ही करितांचि भक्षण । ब्रह्मार्पण देह माझा ॥ ४२ ॥
देह ठेवितां कृमि होती । तो लावावा उपकारार्थीं ।
मज भक्षावें तुम्हीं समस्तीं । भोक्ता सर्वां भूतीं श्रीराम ॥ ४३ ॥
देह छिन्नभिन्न करा समस्तीं । अथवा घाला अग्नीप्रती ।
परी नातळो लंकापती । जाणा निश्चितीं नेम माझा ॥ ४४ ॥
कराळविकराळवदनाकृती । घर्घर हाका माराल किती ।
नाहीं वरणें लंकापती । स्वप्नसुषुप्तीं जागृतीं ॥ ४५ ॥

त्याचा राक्षसींवर परिणाम :

निधडी देखोनि सीता सती । राक्षसी चळचळां कांपती ।
हे क्षोभलिया आम्हांप्रती । करील शांती अवध्यांचि ॥ ४६ ॥
आमुचा द्वेष न करी सीता । सर्वां भूती देखे रघुनाथा ।
रावण आज्ञेसीं छळितां । आम्हां समस्तां अवश्य निमणें ॥ ४७ ॥
इचेनि अभिलाषें रावण । सन्निपातें पावेल मरण ।
ऐशा राक्षसी आपआपण । स्वयें गुणगुण त्या करिती ॥ ४८ ॥

राक्षसी त्रिजटा वृद्धा इतरां स्वयमब्रवीत् ।
आत्मानं खादतानार्या न सीताभक्षणं हितम् ॥९॥
स्वप्नोऽप्ययं मया दृष्टो ह्रशुभो रोमहर्षणः ।
राक्षसानामभावाय भर्तुरस्या भवाय च ॥१०॥
श्रुत्वा पप्रच्छ सा भीता त्रिजटां तामिदं वच : ।
अशेषं श्रोतुमिच्छामि तव दुः स्वप्नदर्शनम् ॥११॥
राघवश्च मया दृष्टः चतुर्दतं महागजम् आरूढः
शैलसंकाशं सीतया सहलक्ष्मणः ॥१२॥

त्रिजटेचे स्वप्नकथन :

देवोनि महाभयगर्जन । करितां सीतेसी तर्जन ।
वृद्ध त्रिजटा क्षोभोन । कोपायमान बोलत ॥ ४९ ॥
त्रिजटा बिभीषणाची भगिनी । राक्षसी सत्वशिरोमणी ।
क्रूरा राक्षसीतें निवारूनी । सत्यवचनीं अनुवादे ॥ ५० ॥
म्यां केलें असतां शयन । सभाग्य देखिलें म्या स्वप्न ।
सीतेसी घालोनि लोटांगण । विरूद्ध वचन न वदावें ॥ ५१ ॥
सीतेसी खाऊं पाहतां राक्षसी । तुम्हीं खावें आपाआपणांसीं ।
सीता सती सत्वराशी । विरूद्ध इयेसी न वदावें ॥ ५२ ॥
सीता सर्वां भूतीं समान । तुम्हीं कां वदावे विरूद्ध वचन ।
जानकी जगदंबा परिपूर्ण । वंदा चरण तुम्ही हिचे ॥ ५३ ॥
ऐकोनि त्रिजटेचें वचन । राक्षसी झाल्या कंपायमान ।
कैंसे कैंसे देखिलें स्वप्न । कृपा करोन सांगावें ॥ ५४ ॥

रामसीतादर्शन :

स्वप्नीं देखिला श्रीरघुनाथ । श्वेत गज चौदंत ।
सीतासमवेत सालंकृत । लक्ष्मणयुक्त गजस्कंधीं ॥ ५५ ॥
चवरें ढाळिती सुरासुर । भाटीव करिती नरवानर ।
ऋषी करिती जयजयकार । वाद्दें अपार वाजती ॥ ५६ ॥
श्रीरामसीता अभेदस्थितीं । म्यां देखिलीं स्वप्नाप्रतीं ।
ते ऐका हो उपपत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥ ५७ ॥
सूर्यासवें प्रभा संगती । चंद्रीं चंद्रिका निवविती ।
वायूसवें जैसी गती । सीता सती तेंवी रामीं ॥ ५८ ॥
गुळासवें सुस्वादता । कर्पूरासवें सुगंधता ।
जळासवें शीतळता । तैसी सीता श्रीरामीं ॥ ५९ ॥
ऐसा श्रीराम सीता सती । स्वप्नीं देखे मी सभाग्यस्थिती ।
देखिली रावणाची दुर्गती । तेही उपपत्ती अवधारा ॥ ६० ॥

वरोहेण दशग्रीव : शिशुमारेण सत्कृत : ।
उष्ट्रेण च मया दृष्टो रक्तमाल्यानुलेपन : ॥१३॥
प्रयातो दक्षिणामाशां प्रविष्टो गोमयेर्हदे ।
कुंभकर्ण इंद्रजिच्च सर्वे राक्षसपुंगवा : ॥१४॥
पीत्वा तैलं प्रतताश्च क्रीडतो गोमयेर्हदे ॥१५॥

रावणादिकांची शोचनीय स्थिती :

स्वप्नीं रावण देखिला दृष्टी । सर्वांगीं शेंदुराची उटी ।
शेंदूर ओतिला लल्लाटीं । माळा कंठी आरक्त पुष्पांच्या ॥ ६१ ॥
दाहीं बोडकीं शिरा शिरीं । मसीका टिळक लाविला नाकावरी ।
सुसरी रावणातें धरी । अधोद्वारीं न्यावया ॥ ६२ ॥
सवेंचि बैसोनि उष्ट्रावरी । दक्षिणदिशे गमन करी ।
सवेचि देखें सूकरा वरीं । वैश्वानरीं क्रीडत ॥ ६३ ॥
गोमयाचे डोहाआंत । स्वेच्छा क्रीडे लंकानाथ ।
आणिक स्वप्नींचा वृत्तांत । अति अद्‌भुत तो ऐका ॥ ६४ ॥
इंद्रजित ससैन्य कुंभकर्ण । करोनियां तैलपान ।
गोमयर्हदीं क्रीडती नग्न । उन्मज्जनीं निमज्जनीं ॥ ६५ ॥
रावणनिद्रागृहावरी । वीज पडली एकसरीं ।
ऐसें देखिलें स्वप्नांतरीं । रावणावरी दुश्चिन्ह ॥ ६६ ॥

सीतेचे दुःख :

यालागीं सभाग्य सीता सती । तुम्हीं वंदावें सत्ववृत्तीं ।
ऐकोनिं त्रिजटावदंती । गेल्या समस्ती ओसरोनि ॥ ६७ ॥
हनुमान म्हणे त्रिजटा भली । राक्षसी हे सात्विक देखिली ।
अति युक्त बोलिली बोली । साह्य झाली सीतेसी ॥ ६८ ॥
सीता सभाग्य अशोक । अशोकवनीं बैसली देख ।
लौकिक रीतीं करी दुःख । तें कौतुक अवधारा ॥ ६९ ॥

राक्षसीवशगा याऽहं भर्त्स्यमाना सुदारुणम् ।
नाहं शक्ष्ये परित्यक्तं आत्मच्छेदेन जीवितम् ॥ १६ ॥
मोघं चरित्वा च तपो व्रतं च
त्यक्ष्यामि चेज्जीवितमत्यनल्पम् ।
विषस्य दाता तु न मेस्ति किंचित्
शस्त्रस्य वा वेश्मनि रावणस्य ॥ १७ ॥
इहस्थां मां न जानीते शंके लक्ष्मणपूर्वजः ।
हतेति का मां गत्वा च राघवात निवेदयेत् ॥ १८ ॥

रावणाचें बंदींत मी येथ । राक्षसींअधीन वनांत ।
स्वयें देवों न शके जीवित । रक्षण समस्त राक्षसीं ॥ ७० ॥
राक्षसी असतां राखणी । जीव तों न देववे माझेनी ।
मज एथें विष देतें कोणी । रावणजाचणी चुकती माझी ॥ ७१ ॥
शस्त्र घालावें म्यां पोटीं । तंव शस्त्रदाता न दिसे दृष्टीं ।
श्रीरामें सांडिली माझी गोष्टी । थोर संकटी मी पडिलें ॥ ७२ ॥

श्रीराम शोधायला न येण्याचे कारण :

रावणें हिरोनि वेगेंसीं । मज आणिलें लंकेसीं ।
हें ना कळलें श्रीरामांसी । म्हणोनि लागेसीं न पवेचि ॥ ७३ ॥
मज राखिलें लंकेसी । ऐसें कोण सांगेल श्रीरामांसी ।
अमित पुण्य आहे त्यासी । संख्या पुण्यासी असेना ॥ ७४ ॥

शुद्धिदानाचे फल :

अन्नदान उदकदान । सामवेदाचें अध्ययन ।
द्विजदारबंधमोचन । शुद्धी समान न येती ॥ ७५ ॥
कोटि अर्बुदें राजसूययज्ञ । ग्रहणीं कोटिगोदान ।
सुवर्णपूर्ण धरादान । शुद्धी समान नव्हेती ॥ ७६ ॥
सीताशुद्धीचें उत्तर एक । श्रीरामासी परम सुख ।
ब्रह्मज्ञान त्यापुढें रंक । होय अल्पक निजमोक्ष ॥ ७७ ॥
श्रीराम पावे परम सुख । भ्रांतिगत मोक्ष न यो तुक ।
ब्रह्मज्ञान तैसेंचि देख । यज्ञदानादिक कोण पुसे ॥ ७८ ॥
माझें व्रत तप दान शीळ । मी पतिव्रता निर्मळ ।
माझीं मजचि नव्हेति सफळ । झालीं निष्फळ रामेंवीण ॥ ७९ ॥
घाटा पडलिया हिरवा चणा । घाटा दिसे परी नाहीं दाणा ।
तैसें निष्फळ व्रत तप दान । रघुनंदनावांचोनी ॥ ८० ॥
श्रीराम पुरूष प्रकृति सीता । जो करी नित्य यांची ऐक्यता ।
तो पुण्यपुरूष याहीपरता । नाहीं सर्वथा तिहीं लोकीं ॥ ८१ ॥
त्याचेनि सुखी इहलोक । त्याचेनि सुखी परलोक ।
त्याचेनि पितरां मोक्षसुख । शिवादिक तेणें सुखी ॥ ८२ ॥

हनुमंताची मनःस्थिती :

सीतेसी श्रीरामाची गोष्टी । त्या मज होतील पुण्याच्या कोटी ।
हनुमान नाचे वृक्षसंपुटी । लाळघोंटी भेटावया ॥ ८३ ॥
धन्य धन्य सीता गोरटी । अनुवादली गोड गोष्टी ।
शब्दामृतें कर्ण घोटी । अर्थ चाटी अक्षरांचा ॥ ८४ ॥
श्रवणीं पडतांचि शब्द । अर्थ न घेतां परम मंद ।
हनुमंत तदर्थी अति प्रबुद्ध । अर्थावबोध घुटकोनी ॥ ८५ ॥
बुद्धि स्फुरली हनुमंता । आतां इची भेटी घेतां ।
विकल्प मानील पैं सीता । आला मागुता रावण ॥ ८६ ॥
तैं होऊनि आला संन्यासी । आतां आला वानरवेषीं ।
विकल्प रिघालिया सीतेसीं । मग भेटींसी ठाव कैंचा ॥ ८७ ॥
भेटी न घेवोनि स्वयें जातां । काय सांगूं श्रीरघुनाथा ।
दुरून देखिली म्यां सीता । हेंही सांगतां मूर्खत्व ॥ ८८ ॥
जो तो पुसेल हनुमंता । कैसी काय बोलली सीता ।
काय सांगावें समस्तां । वानरनाथा सुग्रीवा ॥ ८९ ॥
एकांती श्रीराम आपण । मज पुसे जे जे खूण ।
तेव्हा माझें काळें वदन । प्रतिवचन न देववे ॥ ९० ॥
समुद्र लंघोनि हनुमंत । आला गेला अवघें वृथा ।
वानर टोले देतील माथां । फटमारता करतील ॥ ९१ ॥
सीतेची न घेतां एकांतभेटी । हिच्या न पुसतां गुह्य गोष्टी ।
मज गेलिया परतटीं । राम जगजेठी क्षोभेल ॥ ९२ ॥

सीता संदेशरहितं मामितस्त्वरया गतम् ।
निर्दहेदपि काकुत्स्थ क्रोधनिर्दग्धचक्षुषा ॥ १९ ॥
यद्यनाश्वास्य गच्छामि शोकेनाभिनिपीडितम् ।
सर्वथा नास्ति संदेहो देहं त्यक्ष्यति जानकी ॥ २० ॥
प्राप्तदोषो भविष्यामि देशस्याकथने महान् ।
यदि चेद्योजयिष्यामि भर्तारं रामकारणात् ॥ २१ ॥
व्यर्थमागमनं तस्य ससैन्यस्य भविष्यति ॥ २२ ॥

एकांती न भेटतां सीता । तीतें गुह्यगोष्टीं न पुसतां ।
जरी मी भेटलों श्रीरघुनाथा । काळकृतांत तो क्षोभेल ॥ ९३ ॥
श्रीरामनेत्रींचा क्रोधाग्नीं । मज जाळील तत्क्षणीं ।
भेटी न घेतां सीताजननी । जातां येथूनी प्रमाद ॥ ९४ ॥
राक्षसीं गांजिली हे सीता । रामविरहें अति दुःखिता ।
तिसी आश्वासन न देतां । प्राण तत्वतां सांडील ॥ ९५ ॥
सीतेने सांडितां प्राण । अवघें खुंटलें रामायण ।
हेंही अपेश मजचि जाण । श्रीराम पूर्ण क्षोभेल ॥ ९६ ॥
सीतेनें सांडितां प्राणांसीं । हेंही अपेश माझे शिरासीं ।
हें न सांगतां श्रीरामापासीं । महादोषीं मी होईन ॥ ९७ ॥
शुभाशुभ यथार्थ वार्ता । सद्‌गुरुसी न सांगतां ।
परम दोष शिष्याचें माथां । वंचकता गुरूद्रोही ॥ ९८ ॥
दुःख नव्हे रघुनाथा । सुख पाहे सती सीता ।
सुख उपजे श्रीरघुनाथा । युक्ति हनुमंता आठवली ॥ ९९ ॥
न कळतां राक्षसासी । स्कंधी वाहोनि सीतेसी ।
स्वयें नेतां श्रीरामापांसी । सुख श्रीरामासी उपजेना ॥ १०० ॥
घेवोनि वानरांचें सैन्य । करीं सज्जोनि धनुष्यबाण ।
रामें वधावे रावण कुंभकर्ण । सपुत्र प्रधानसैन्येंसीं ॥ १०१ ॥
सोडावी देवांची बांदवडी । तोडावी नवग्रहांची बेडी ।
उभवावी रामराज्याची गुढी । कीर्ति चोखडी श्रीरामाची ॥ १०२ ॥
तेथें मज नेतां सीता सती । एवढी श्रीरामाची कीर्ती ।
माजेनि होऊ पाहे अपकीर्ती । हे तंव युक्ती न ये करूं ॥ १०३ ॥

सीतेला एकांतात भेटण्याचा मारूतीचा निश्चय :

एवं अवश्य भेटावी सीता । तेही भेटी अति गुप्ततां ।
रावणाराक्षसीं न देखतां । अति एकांता भेटावें ॥ १०४ ॥
मज भेटतां सीतेपासीं । विकल्प धरील मानसीं ।
पूर्वीं छळिलें संन्यासवेषीं । वानरतेंसी छळो आला ॥ १०५ ॥
विश्वासावया श्रीरामभद्रा । आधीं टाकूं श्रीराममुद्रा ।
भावार्थ देखोनि सीता सुंदरा । भेटी वानरा ते संधी ॥ १०६ ॥
सीताश्रीरामचंद्रा भेटी । सीतामुद्रिकासंवादगोष्टी ।
अनुपम्य कथाकसवटी । गोड गोष्टी सीतेच्या ॥ १०७ ॥
सीता मुद्रिकासंवादकथा । अति गोड त्या हनुमंता ।
यांपुंढे फिकेपण अमृता । सावधानता अवधारा ॥ १०८ ॥
याचें नाम सुंदरकांड । अमृतापरीस गोड ।
पुरवी ब्रह्मज्ञानाचें कोड । करी निवाड श्रोतयां ॥ १०९ ॥
एकाजनार्दना शरण । गोडिया गोड निरूपण ।
कथा नव्हें हें ब्रह्म परिपूर्ण । समाधान जीवशिवां ॥ ११० ॥
करितां कथानिरूपण । जीवाचे उडे जीवपण ।
शिवाचे झडे शिवपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटो ॥ १११ ॥
इति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीतानुतापो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
॥ ओव्यां १११ ॥ श्लोक २२ ॥ एवं संख्या १३३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय दहावा