भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा

रावणाकडून बिभीषणाचा अपमान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

बिभीषणकृत हनुमंतप्रतापवर्णनाने सर्व सभा लज्जायमान :

कपिपुरूषार्थ अति प्रचंड । राक्षसांचें बळबंड ।
प्रताप ऐकतां काळें तोंड । लज्जा वितंड लंकेशा ॥ १ ॥
हनुमंताचें अति प्रबळ । बिभीषणें वानिलें बळ ।
तेणें राक्षसें सकळ । तळमळ पैं करिती ॥ २ ॥
राक्षस सेनानी प्रधान । अवघे जाले हीन दीन ।
सभा समस्त लज्जायमान । म्लानवदन दशमुख ॥ ३ ॥
हें देखोनि इंद्रजित । कोपें जालासें कृतांत ।
बिभीषणासीं बोलत । निजपुरूषार्थ वर्णोनी ॥ ४ ॥

इंद्रजिताचा संताप, स्वपराक्रम प्रौढी व बिभीषणाची निंदा :

इंद्रजित बोले कोपायमान । काकाजी तूं तंव धर्मसंपन्न ।
बुद्धियुक्तिप्रज्ञानपन्न । कनिष्ठ वचन कां वदसी ॥ ५ ॥
निंदोनि सेनानी रक्षोगण । निर्भर्त्सोनियां प्रधान ।
रामलक्ष्मणांची आंगवण । परम दारूण वानिसी ॥ ६ ॥
उद्देशून एक एक । तुवां निंदिलें आमुचें कटक ।
श्रीरामाची आगळिक । आत्यंतिक वानिसवी ॥ ७ ॥
तूं तंव प्रबुद्ध प्रज्ञाप्राज्ञ । युवराजाचें महिमान ।
रायाचें खोंचलें अंतःकरण । ऐसें कठिण कां वदसी ॥ ८ ॥
पाठी थापटिलिया येडका । अधिक हाणी चारी थडका ।
तैसें सेनानी सैनिका । सन्मान देखा तुवां द्यावा ॥ ९ ॥
सन्मान देतां निजसैन्यासी । अति उल्लास संग्रामासीं ।
शेखीं त्यातें निर्भर्त्सिसी । श्रीरामासी वानोनी ॥ १० ॥
राजा तुझा ज्येष्ठ बंधु । तूं अति कनिष्ठ वदसी वादु ।
तेणें युवराजसंबंधु । अति विरूद्ध वाढला ॥ ११ ॥
जैसा पिता तैसा चुलता । यौवराज्या असे तुझे माथां ।
ज्येष्ठा निंदोनि लंकानाथा । श्रीरघुनाथा वानिसी ॥ १२ ॥
आमुचा एकैक रक्षोगण । करील दोघांचे भक्षण ।
यासीं काइसें रणांगुण । रामलक्ष्मण तें किती ॥ १३ ॥
बापुडे रामलक्ष्मण । आमुचे दृष्टीस ते तृण ।
परीस माझी आंगवण । चरणां शरण नृप येती ॥ १४ ॥
वलयांकित राजोक्ति । यज्ञ भोगिता अमरपती ।
तो म्यां आणिलासें क्षिती । लंकेप्रती कामारा ॥ १५ ॥
आंसडोनियां ऐरावती । आरडत पाडिलासे क्षिती ।
दांत उपडोनि घेतला हातीं । त्रिजगतीं चळीं कांपे ॥ १६ ॥
माझी ऐकतांचि हाक । शूरगण एकाएक ।
अवघे पळती अधोमुख । जेंवी कां रंक अति दीन ॥ १७ ॥
इंद्रासहित अमरकोडी । ते म्या घातले बांधवडीं ।
तेथें काइसी रामाची प्रौढी । साह्य माकडीं वानिसी ॥ १८ ॥
अंगद सुग्रीव हनुमंत । नळ नीळ जांबुवंत ।
राक्षसां भक्ष्य हे समस्त । दांता दांत न लागतां ॥ १९ ॥
मनुष्य आमचें आहारीं । वानरें तंव कोशिंबिरीं ।
त्यांसी कायसीं झुंजारीं । क्षणामाझारी मारीन ॥ २० ॥
रणीं भिडोनि साटोपता । करीन श्रीरामाच्या घाता ।
रावण सांडोनि सकळ चिंता । सुखें सीता भोगावी ॥ २१ ॥
राम आणि लक्ष्मण । रणीं पाडीन विंधोनि बाण ।
निर्दळीन वानरगण । आंगवण पाहें माझी ॥ २२ ॥
ऐक इंद्रजिता साचार । तूं तंव अपक्व बालत्व ।
अहंकार माथ्याचा वाळला नाहीं जार । स्वहितविचार तुज नाहीं ॥ २३ ॥
अवधारीं विचारें विचारकोटी । विवेक धरोनियां पोटीं ।
समूळ ऐकें माझी गोष्टी । स्वहितदृष्टी तुज नाहीं ॥ २४ ॥
स्वहितदृष्टीं तुज नाहीं । जें बोलसी तें मिथ्या पाहीं ।
त्याही बोलाची नवलाई । मूळान्वयीं अवधारीं ॥ २५ ॥

श्रीरामांच्या पराक्रमाचे वर्णन :

म्हणसी आमचा एक रक्षोगण । भक्षील रामलक्ष्मण ।
ऐकोनि श्रीरामाआंगवण । मिथ्या भाषण कां वदसी ॥ २७ ॥
बाळपणीं विंधोनि बाण । ताटकेचा घेतला प्राण ।
सुबाहु मारिलां करितां रण । सैन्यगणसमवेत ॥ २८ ॥
बाणपिसारें सुटला वारा । तेणें मारीच उडविला अंबरा ।
श्रीराम अंतक निशाचरां । तूं निदसुरा उन्मादें ॥ २९ ॥
स्वयंवरी वाहता कोदंड । रावणाचें जाले काळें तोंड ।
तें श्रीरामें केले दुखंड । बळे प्रचंड श्रीराम ॥ ३० ॥
येचि सीतेची अभिलाखा । विराध मारिलासे देखा ।
तेचि गति दशमुखा । तुम्हाम मूर्खांचेनि बोलें ॥ ३१ ॥
शूर्पणखेनें करितां छळणा । स्वयें मुकली नाककानां ।
गार्‍हाणें देतसे खरदूषणां । तेही जाणा मारिले ॥ ३२ ॥
त्रिशिरा आणि खरदूषण । चौदा सहस्त्र रक्षोगण ।
रामें मारिले करोनि रण । दुर्धर बाण वर्षोनी ॥ ३३ ॥
नाहीं सैन्य रथसंपत्ती । एकला श्रीराम पदाती ।
त्यासी ऐसी ऐकोनि ख्याती । तूं कां दुर्मति वदलासी ॥ ३४ ॥
नकट्या शूर्पणखेच्या बोलीं । रावणें पापबुद्धि केली ।
सीता चोरितां भीक लागली । तैसी आली अवदसा ॥ ३५ ॥
चोरावया परनारी । राजा आणि होय भिकारी ।
जळो ते वाटिवेचि थोरी । निर्लज्ज भारी तूं एक ॥ ३६ ॥
दुजी वाटिव लंकानाथा । मरण देवोनि मारीचमाथां ।
छळोनि सुमित्रेच्या सुता । चोरोनि सीता पळाला ॥ ३७ ॥
लक्ष्मणाची मर्यादारेखा । नुल्लंघवेचि दशमुखा ।
मिथ्या बोलां बळाआवांका । काळमुखा पुरूषार्थ ॥ ३८ ॥
जटायूसीं करितां रण । रावणें दांतीं धरिलें तृण ।
त्यासी मारिलें करोनि छळण । पापी पूर्ण तुम्ही एक ॥ ३९ ॥
चोरी मारी पापी परव्दारी । इतुकें रावणाचे शिरीं ।
तेथें तुझें ज्येष्ठत्व भारी । बाजीगिरी जैसी विद्द्या ॥ ४० ॥
म्हणसी जिंतिला ऐरावती । आणि जिंतिला अमरपती ।
सुरवरांसी लाविली ख्याती । श्रीरामाप्रती तें न चालें ॥ ४१ ॥
वरूणशक्रब्रह्मादि ईश । हे श्रीरामाचे अंशानुअंश ।
हें तूं नेणसीं बाळभाष्य । जगीं जगदीश श्रीराम ॥ ४२ ॥
म्हणसी दमिला ऐरावती । चरणीं शिळा उद्धरती ।
श्रीरामाची परम शक्ती । बाळमती तूं नेणसी ॥ ४३ ॥

पापकर्मास सहाय्य केल्याबद्दल त्याला दोषः

बोलसीं स्वयें निजपुरूषार्था । मी मारीन श्रीरघुनाथा ।
रावणें सुखें भोगावी सीता । परदारता तूं महापापी ॥ ४४ ॥
रायासी सांगतां पापबुद्धी । तो वधावा सभेमधीं ।
राजपुत्र तूं दुर्बुद्धी । महामूढधी कुलघाती ॥ ४५ ॥
तूं एक मारिल्या जाण । सकळ कुळासी कल्याण ।
हे बुद्धि नायकतां रावण । कुळनिर्दळण पावेल ॥ ४६ ॥

इंद्रजिताची वल्गना :

इंद्रजित बोलतो निजबळ । तें तें मिथ्या पैं समूळ ।
सभा सर्वज्ञ ऐका सकळ । रायें प्रांजळ परिसावें ॥ ४७ ॥
प्रलोभावया लंकानाथा । मारीन म्हणसीं तूं रघुनाथा ।
हनुमंतेंसीं युद्ध करितां । तुझें पुरूषार्था देखिलें ॥ ४८ ॥
हनुमंतासीं रणीं भिडतां । शस्त्रें अस्त्रें गेली वृथा ।
कपिपुच्छ वाजतां माथां । धीर सर्वथा न धरवे ॥ ४९ ॥
दुर्धर शस्त्रांचे संपात । वानरें झेलोनि समस्त ।
तुझ्या सैन्या केला घात । रणीं हुंबत पाडिलें ॥ ५० ॥

हनुमंतापुढे इंद्रजिताची असहाय्यता :

सांगावया लंकेआंत । कोणीही नुरेचि जीवंत ।
कपीनें अवघियांचा केला घात । तुजदेखत इंद्रजिता ॥ ५१ ॥
त्यांची करावया सोडवण । तुझी न चलेचि आंगवण ।
कपीनें गांजिलें संपूर्ण । घायें प्राण जावों पाहे ॥ ५२ ॥
लघुलाघवी हनुमंत । मारिला सारथी भंगिला रथ ।
रणीं इंद्रजित केला विरथ । छत्रपात कपिपुच्छें ॥ ५३ ॥
मल्लविद्द्येची कुसरी । चपेट हाणितां उरी शिरीं ।
अशुद्ध वमितां जालासी चांचरी । पळावया दुरी ठाव नाहीं ॥ ५४ ॥
तुझ्या युद्धाची गति ऐसी । फावल्या मारावया शत्रूंसी ।
नातरी पळावें मेघांपासीं । कपिपुच्छासीं तें न चले ॥ ५५ ॥
पडिलें पुच्छाचें बिरडें । सरों नयें मागेंपुढें ।
इंद्राजित खळखळां रडे । वानरें गाढें गांजिलें ॥ ५६ ॥
रडत रडत अशुद्ध वमित । कपिपुच्छाभेणें धांवत ।
पळोनि गेलासी विवरांत । मुख्य पुरूषार्थ हा तुजा ॥ ५७ ॥
रायासंमुंख निजनिर्धारी । म्हणसी एकला मी श्रीराम मारीं ।
मिथ्या जल्पसीं सभेमाझारीं । निर्लज्ज भारीं तूं एक ॥ ५८ ॥
वानरा रणीं देवोनि पाठी । पळालासीं उठाउठीं ।
ऐसी तुझी वाटीव मोठी । समूळ खोटी बुद्धि तुझीं ॥ ५९ ॥

त्याच्या खोट्या प्रौढीचे परिणाम :

तुझी ऐकतांचि बुद्धि । रावण मरेल आधीं ।
मरेल राक्षसांची मांदी । कुळ त्रिशुद्धीं बुडेल ॥ ६० ॥
रायासंमुख आपण । सभेसीं वदें मिथ्या वचन ।
त्याचें काळें करोनि वदन । जिव्हा कर्ण छेदावे ॥ ६१ ॥
राजनीति ऐसी येथ । कुळघातकीं मारावा सुत ।
जेणें आणिला सभेआंत । तोही निश्चित मारावा ॥ ६२ ॥
जेणें प्रवेशिला व्दारीं । तोही मारावा निर्धारीं ।
कायसी इंद्रजिताची थोरी । निशाचरीं कुळपाश ॥ ६३ ॥
रावणाचा ज्येष्ठ सुत । यालागीं राखिला म्यां हात ।
तुझा अवश्य करावा घात । कुळक्षयार्थ चुकवावया ॥ ६४ ॥

बिभीषणाच्या भाषणाने सभा स्तब्ध होते :

ऐकोनि बिभीषणाची मात । प्रधानसैनिकवीरांआंत ।
वाढला क्रोधाचा आवर्त । जाला कृतांत लंकेश ॥ ६५ ॥
ऐकोनि बिभीषणाचें वचन । प्रधान जाले कोपायमान ।
सेनानीं वटारिलें नयन । खाती दशन सेनाधर ॥ ६६ ॥
एक अधरोष्ट चावती । एक करकरां दांत खाती ।
एक ते हात कुस्करिती । एक वळिती वज्रमुष्टि ॥ ६७ ॥
बिभीषणाचे उत्तरीं । एक निश्चित धुंधुःकारी ।
एक हांसती क्रोधाकारीं । क्षोभोनि सारे डुल्लत ॥ ६८ ॥
एक परस्परें बोलत । बिभीषण जाला उन्मत्त ।
इंद्रजितातें मारीन म्हणत । संमुख वदत लंकेशा ॥ ६९ ॥
चोरी मारी पापी परव्दारी । ऐसें बिभीषणाचें उत्तरीं ।
रावण खोंचला जिव्हारीं । क्रोधे करी तळमळ ॥ ७० ॥
सन्मुख न राहवे वानरीं । पळोनि गेलासि तूं विवरीं ।
इंद्रजित लाजिला ये उत्तरीं । मौन धरोनि राहिला ॥ ७१ ॥
बिभीषणासीं संमुख । बोलों न शकेचि दशमुख ।
मग इतर कोण बोले रंक । टकमक अवघ्यांसी ॥ ७२ ॥
एक बोलती सर्वज्ञ । बिभीषणाचें धर्मवचन ।
न मानितांचि दशानन । कुळनिर्दळण सपुत्र ॥ ७३ ॥

ते दृश्य पाहून महापार्श्वाची गर्वोक्ती :

सभा देखोनि तटस्थ । महापार्श्व उठिला गर्जत ।
बिभीषण जालासें उन्मत्त । राजा राजसुत निंदिला ॥ ७४ ॥
संमुख निंदिला राजा रावण । वानितो श्रीरामाचे गुण ।
याची येथें भीड कोण । अवघे जण काय पाहती ॥ ७५ ॥
युवराज प्रतापसिंधु । रावणाचा कनिष्ठ बंधु ।
येणें सांडिला सुह्रदसंबंधु । याचा वधु करावा ॥ ७६ ॥
मारा न म्हणेचि लंकानाथ । तरी आम्हीं करूं याचा घात ।
गलका उठिला सभेआंत । अति उन्मत्त हा जाला ॥ ७७ ॥

बिभीषणाने शांत राहून महापार्श्वाची उपेक्षा केली :

बिभीषणाची शांती भारी । क्रोध न येचि तिळभरी ।
मारावा म्हणतां निशाचरीं । भय भीतरीं बाधेना ॥ ७८ ॥
जैसा सागर अगाध । तैसा बिभीषणाचा बोध ।
निंदोनि बोलिला महापार्श्वद । स्वयें विषाद न मानीच ॥ ७९ ॥
जेंवी सिंहापासीं घुंगुरडें । तेंवी महापार्श्व बिभीषणापुढें ।
विरूद्ध बोलतां कैवाडें । कोपा न चढे बिभीषण ॥ ८० ॥
महापार्श्वेंसीं बिभीषण । स्वमुखें न बोलेचि आपण ।
तृणप्राय उपेक्षून । धरिलें मौन निजशांती ॥ ८१ ॥

बिभीषणाच्या सेवकांचे भाषण :

बिभीषणाचा अनुचर । परम आप्त प्रधान हेर ।
महापार्श्वेसीं उत्तर । गिरा गंभीर बोलिला ॥ ८२ ॥
बंधुबंधूंचिया निजहिता । राजा युवराज बोलता ।
तूं कां मध्यें कुंथसी वृथा । महामूर्खता तव आंगीं ॥ ८३ ॥

राजपुरूषांच्या संभाषणात सेवकाची लुडबुड कशासाठी :

दोनी धुरा अति आप्तता । स्वहिताचा विचार न करितां ।
मध्यें बोलों नये सर्वथा । बोले तो तत्वतां महामूर्ख ॥ ८४ ॥
जैसा राजा रावण । तैसाच युवराज बिभीषण ।
त्यांसी बोलतां कठिण । तुझा प्राण वांचेना ॥ ८५ ॥
रावणाच्या कनिष्ठ बंधूंसी । संवाद करितां धुरेसीं ।
तूं कां वृथा निंदा करिसी । निजप्राणासी मुकावया ॥ ८६ ॥

राजनीती ही अशी आहे :

ऐसी आहे राजनीती । दोनी धुरा संवाद करिती ।
त्यांमाजी मध्यें निंदा करिती । त्यांतें मारिती नृपनाथ ॥ ८७ ॥
राजा युवराज निजहितीं । वाद करिती राजनीतीं ।
येरयेरांते निखंदिती । तेथें तूं किती रे मशका ॥ ८८ ॥
बंधुबंधूंच्या हितानुवादीं । युक्ति निग्रह येती क्रोधीं ।
तेथें महापार्श्वा तूं दुर्बुद्धीं । निंदानुवादीं जल्पसी ॥ ८९ ॥
आला देखोनि हनुमंत । रायादेखतां तुम्ही पळत ।
आतां वाटिवे गर्जत । अति समर्थ निर्लज्जत्वें ॥ ९० ॥
तुम्ही राक्षसें रणीं दीन । नपुंसकाहूनि हीन ।
वाटिवे चाळवा दशानन । अति बोलोन पुरूषार्थ ॥ ९१ ॥
श्रीरामाचें एक वानर । मारिला अखया सैन्य समग्र ।
दमिला इंद्रजित ज्येष्ठ कुमर । लंकापुरा जाळोनी ॥ ९२ ॥
वानर वनचर पालेखाइर । त्यापुढें पळाले समग्र ।
येथें आलिया श्रीरामचंद्र । दुर्धर शर कोण साहे ॥ ९३ ॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । राक्षसकुळासी निर्दळण ।
तदर्थीं हितवादी बिभीषण । ते रावण नायके ॥ ९४ ॥
सीता अर्पोनि श्रीरघुपती । स्वस्थ राहावें समस्तीं ।
ऐसी बिभीषणाची युक्ती । तूं कां कुत्सितोक्तीं निंदिसी ॥ ९५ ॥

महापार्श्व लज्जित होतो :

एकोनि हेराचे वचन । महापार्श्व लज्जामान ।
खालतीं घालोनियां मान । दीनवदन राहिला ॥ ९६ ॥

बिभीषणाचे पुनः भाषण व भावी घोर परिणामांचे चित्रीकरण :

सत्त्ववंत धैर्यवंत । वीर्य माधुर्य बुद्धिवंत ।
ऐसा बिभीषणा क्षमायुक्त । रावणहितार्थ बुद्धि सांगे ॥ ९७ ॥
बुद्धि सांगतां पुढतपुढती । न माने रावणाचे चित्तीं ।
तरी सांगे पुनरावृत्ती । सीता रघुपती अर्पावया ॥ ९८ ॥
प्रहस्त महापार्श्व महोदर । इंद्रजित मुख्य कुमर ।
शुकसारणादि थोर थोर । ऐका समग्र बुद्धि माझी ॥ ९९ ॥
करोनि रावणा केशाकर्षण । सुबुद्धि सांगेन आपण ।
सीता करावी रामार्पण । कुळनिर्दळण चुकवावया ॥ १०० ॥
भूत लागलें हो ज्यासी । मंत्रवादी त्राहटी धरोनि केशीं ।
तेंवी सुबुद्धि सांगें रावणासी । सीता श्रीरामापासीं अर्पावया ॥ १०१ ॥
सीतासन्निपात रावणासी । तेणें कुळक्षयो राक्षसांसी ।
यालागीं धरोनिया केशीं । सुबुद्धि त्यासी शिकवीन ॥ १०२ ॥
याचि नांवें परम आप्त । याचि नावें सुह्रद समस्त ।
अपायीं पडतां लंकानाथ । त्यासी निश्चित वांचवावें ॥ १०३ ॥
कुटुंब निजवोनि गृहाप्रती । जो गृहादाहा करी प्राप्ती ।
त्यासी सज्ञान निवारिती । तैसी गती रावणा ॥ १०४ ॥
करितां श्रीरामासीं वैर । समस्त मरती निशाचर ।
सपुत्र मरेल दशशिर । प्रतिज्ञोत्तर हें माझें ॥ १०५ ॥
श्रीरामाचें एक वानर । त्यापुढे पळालेति समग्र ।
सुटल्या श्रीरामाचा शर । कोण दुर्धर साहेल ॥ १०६ ॥
तेलसाहाणे खरसाहाणे फुडा । लावी श्रीरामाचा बाण कुर्‍हाडा ।
कंकपत्राचा झडाडा । कोण त्यापुढां साहों शकें ॥ १०७ ॥
सुटला श्रीरामाचा बाण । धाकें मरेल रावण ।
अतिकाय इंद्रजित कुंभकर्ण । सेनानी प्रधान निमतील ॥ १०८ ॥
प्रहस्त महोदरा सोडिती प्राण । धाकें मरेल शुकसारण ।
सैन्य मरेल संपूर्ण । श्रीरामबाण येतांचि ॥ १०९ ॥
दुर्धर श्रीरामाचे बाण । समुद्र शोषोनियां पूर्ण ।
लंका निर्दळती रावण । सत्य वचन हें माझें ॥ ११० ॥
इंद्रादिकांचिया कोडी । न साहे श्रीरामबाणवोढी ।
धाकेंच पडती मुरकुंडी । राक्षसें बापुडीं तीं किती ॥ १११ ॥
यालागीं गा लंकानाथा । शीघ्र श्रीरामीं अर्पीं सीता ।
तुझें चरणीं ठेवितों माथा । विकल्प आतां धरूं नको ॥ ११२ ॥
जरी विकल्प धरिसी चित्ता । तरी न जिंकवे श्रीरघुनाथा ।
श्रीरामाची प्रतापकथा । ऐक आतां सांगेन ॥ ११३ ॥
वेगें आलिया रघुनाथ । तुज साहावया नाहीं पुरूषार्थ ।
गर्वें प्राण वेंचिसी व्यर्थ । सत्य वचनार्थ हा माझा ॥ ११४ ॥
निवारे श्रीरामबाणजाळ । तैसें तुज नाहीं शस्त्रबळ ।
करितां श्रीरामासीं सळ । रणीं विकळ पडशील ॥ ११५ ॥
रणीं जिंकावया रघुनाथा । तुझ्या आंगीं नाहीं सबळता ।
पडलासी धनुष्य वाहतां । सभेदेखतां स्वयंवरीं ॥ ११६ ॥
तुजदेखतां पुरदहनी । हनुमंतातें देखोनी ।
पळती प्रधान वीरश्रेणीं । केंवी राम रणीं जिंकवेल ॥ ११७ ॥
तुझें करोनि काळें तोंड । रामें धनुष्य केलें दुखंड ।
वृथा वाहसी बळवंड । तूं तंव लंड निर्लज्ज ॥ ११८ ॥
श्रीराम पाहावया संमुख दृष्टी । धैर्य नाहीं तुझे पोटीं ।
श्रीरामा लावोनि मृगापाठीं । सीता गोरटी चोरली ॥ ११९ ॥
व्हावया श्रीरामासंमुख । तुझेंन सरेचि काळें मुख ।
वृथा बोलसी दशमुख । लाज निःशेख तुज नाहीं ॥ १२० ॥
हरावया सीता सुंदरी । सामर्थ्य नाहीं तुझे शरीरीं ।
मग तूं जालासी भिकारी । तरी गुंफेमाझारी रिघवेना ॥ १२१ ॥
लक्ष्मणाची मर्यादारेखा । तुज नुल्लंघवे दशमुखा ।
रणीं पहावया रघुकुळटिळका । व्यर्थ आवांका जल्पसी ॥ १२२ ॥
तुझ्या आंगीं नाहीं बळ । म्हणसी युद्ध करील दळ ।
तें तंव पुरदाहें केवळ । केलें विकळ हनुमंतें ॥ १२३ ॥
इंद्रजिताचें बळ अद्‍भुत । कपीनें केलें हताहत ।
येथें आलिया श्रीरघुनाथ । कोणा सामर्थ्य साहावयासी ॥ १२४ ॥
यालागीं गा लंकानाथा । तुज सर्वथा न जिरे सीता ।
शरण रिघावें श्रीरघुनाथा । जनकदुहिता अर्पावी ॥ १२५ ॥

पुढील कार्याची सूचना :

श्रीरामा अर्पिल्या सीता । सकळ कल्याण समस्ता ।
हे सुबुद्धि ऐकें लंकानाथा । कुळाभिघाता चुकवावया ॥ १२६ ॥
नानापरींच्या विवेकयुक्तीं । म्यां सांगितल्या हितोक्ती ।
नाइकातां लंकापतीं । रणाभिवर्तीं मराल ॥ १२७ ॥
श्रीराम अवतारावतारी । पूर्ण ब्रह्म चराचरीं ।
त्याची कांता सीता सुंदरीं । तुज तिळभरी जिरेना ॥ १२८ ॥
म्हणसी श्रीराम बापुडें । तरी कां लपसी मागिलीकडे ।
चोरी करोनि पळसी पुढें । कर्म कुडे लंकेशा ॥ १२९ ॥
मारिले त्रिशिरा खर दूषण । श्रीरामासीं करावया रण ।
संमुख न वचे तुझें सैन्य । आंगीं आंगवण असेना ॥ १३० ॥
श्रीराम शक्त अथवा अशक्त । तुझा करूं शके घात ।
सीता अर्पोनि निश्चित । श्रीरघुनाथ सुखी करीं ॥ १३१ ॥
हे माझी बुद्धि नाइकतां । वैर केलिया श्रीरघुनाथा ।
तो तुझ्या करील घाता । सैन्यसमवेता सपुत्रा ॥ १३२ ॥
साह्य झालियाही कळिकाळ । अनिवार श्रीरामबाणजाळ ।
काळा गांजोनि तत्काळ । तुझें कंठनाळ छेदील ॥ १३३ ॥
माझा नाइकतां वचनार्थ । पाडोनि कळिकाळाचें दांत ।
श्रीराम तुझा करील घात । जाण निश्चित लंकेशा ॥ १३४ ॥
साह्य केलिया ब्रह्मशक्र । निवारें श्रीरामशर ।
शिव रामाचा किंकर । त्यासमोर तो नये ॥ १३५ ॥
श्रीराम शिवाची ध्येयमूर्ती । त्याची चोरली सीता सती ।
तेणें क्षोभला उमापती । वांचती गति नाहीं ॥ १३६ ॥
चोरी मारी आणि परव्दारीं । कपटवेषी संन्यासधारी ।
ब्रह्मा क्षोभला तुजवरी । वांचती परी तुज नाहीं ॥ १३७ ॥
राजा आणि अधर्मशीळ । त्यासी निर्दाळी कळिकाळ ।
काळें ग्रासिलें तुझें बळ । रणीं तत्काळ निमसील ॥ १३८ ॥
शक्तींमाजी आदिशक्ती । तुवां चोरिली सीता सती ।
क्षोभल्या शस्त्रदेवता समस्ती । तुझ्या घातीं उद्द्यत ॥ १३९ ॥
विचारितां विवेकविधी । तुज क्षयो आला त्रिशुद्धी ।
माझी नाइकतां बुद्धी । रणभिमर्दीं निमसील ॥ १४० ॥
रावणा ऐकें स्वहितवचन । श्रीरामासीं रिघोन शरण ।
सीता अर्पिल्या आपण । सकळ कल्याणा पावसी ॥ १४१ ॥
श्रीरामासीं रिघाल्या शरण । तुज बाधेन जन्ममरण ।
बाधूं न शकें व्दंव्दभान । कृतकल्याण पावसी ॥ १४२ ॥
गर्व न करीं लंकानाथा । श्रीरामचरणीं ठेवोनि माथा ।
सद्भावें अर्पिलिया सीता । स्वार्था परमार्था पावसी ॥ १४३ ॥

बिभीषणाची सूचना ऐकून रावणाचा क्रोध व त्याचा अधिक्षेप :

ऐकोनि बिभीषणाचें वचन । क्रोधे संतप्त रावण ।
त्याचे क्रोधाचें दारूणपण । श्लोकलक्षण अवधारा ॥ १४४ ॥
ऐकोनि बिभीषणाचें वचन । रावण जाला क्रोधसंपन्न ।
आरक्त वटारिले नयन । जैसें जास्वंद नव फुललें ॥ १४५ ॥
क्रोधें म्हणे रे बिभीषणा । नष्टा चांडाळा दुर्जना ।
मज हीनत्व स्थापोनि जाणा । रघुनंदन वानिसी ॥ १४६ ॥
सपुत्र प्रधान अवघें जणीं । आम्हांसी म्हणसी मराल रणीं ।
रामा स्थापिसी विजयस्थानीं । धन्य वाणी हे तुझी ॥ १४७ ॥
राम मनुष्य बापुडें । तें काय वानिसी मजपुढें ।
एके घायी चूर करीन हाडें । रडत त्याकडे तूं जाय ॥ १४८ ॥
जेंवी मार्जार बोका पाहे । आपलीं पिल्लीं आपण खाये ।
तैसाचि तूं राक्षसान्वयें । कुलक्षया एक हेतु ॥ १४९ ॥
आम्हांसि भेडसाविसी कैवाडें । म्हणसी तुम्हांसि मारितील माकडें ।
हीन दीन तूं बापुडें । श्रीरामाकडे सुखें जाये ॥ १५० ॥
ऐक माझें सत्य भाषण । आजिच निमाला बिभीषण ।
घटस्फोट सांडा त्यालागून । कुळदूषण कुळपाश ॥ १५१ ॥

बिभीषणाचे प्रत्युत्तर :

एकोनि रावणाचें वचन । विभीषण हास्यवदन ।
मुख्य धुरेंसींच मूर्खपण । तेथें शिकवण चालेना ॥ १५२ ॥
कनकबीज खाय आवेशें । तो बडबडी व्याघ्र ससे मासे ।
रावणा तुज जालें तैसें । सीताभिलाषें संनिपात ॥ १५३ ॥
रावणा सीतासंनिपात । प्रधान गर्वे मदोन्मत्त ।
विचार विवेक स्वहितार्थ । कोणें येथ मानावें ॥ १५४ ॥
कपट काम कामासक्ती । परदारा अधर्मरती ।
रावणा तुज मरणप्राप्ती । ससैन्यसंपत्ती सपुत्र ॥ १५५ ॥
करितां दुर्गाअभिलाषण । शुंभ निशुंभ निमाले ससैन्य ।
चंडमुंड रक्तबीज जाण । घेतला प्राण जगदंबें ॥ १५६ ॥
तैसी श्रीरामाची सीता सती । अभिलाषिता लंकापती ।
व्यर्थ मरसी मरणावर्तीं । सपुत्रसंपत्ती ससैन्य ॥ १५७ ॥
विष भक्षी त्याचे पंगतीं । जो बैसे त्या मरणप्राप्ती ।
त्यागोनि जाया तो सुमती । हे परम युक्ति लंकेशा ॥ १५८ ॥
शरण रिघोनि श्रीरघुपती । प्रेमें अर्पिल्या सीता सती ।
अर्थ स्वार्थ परमार्थप्राप्ती । हे परम युक्तीं ऐकें पां ॥ १५९ ॥

माझे सांगणे तुला पटत नाही म्हणून मी श्रीरामाकडे जातो :

माझी नायकतां युक्ती । तुज जिरेना सीता सती ।
गर्वे मरसी लंकापती । प्रतिज्ञा निश्चितीं हें माझी ॥ १६० ॥
तुम्हीं सांडिलें मी मेलों म्हणोन । आतां सुह्रदत्वें उरलें कोण ।
खुंटली स्वहिताची शिकवण । श्रीरामा शरण मी जातों ॥ १६१ ॥
श्रीरामा गेलिया शरण । मी पावेन कृतकल्याण ।
तुम्हांसी अवश्य आलें मरण । श्रीरामबाणप्रतापें ॥ १६२ ॥
शरण गेलिया श्रीरघुपतीं । चारी मुक्ती दासी होतीं ।
आनंदें ओसंडेल त्रिजगती । एवढी प्राप्ती श्रीरामें ॥ १६३ ॥
श्रीराम मारील एकीं एक । क्रिया कर्ता नुरेल देख ।
मीच देईन तिलोदक । आवश्यक तुम्हांसीं ॥ १६४ ॥
ऐकोनि बिभीषणाची गोष्टी । रावणा राग न माय पोटीं ।
खड्‍ग वसवोनि मुष्टिं । दांत होटीं चाविलें ॥ १६५ ॥

ते ऐकून रावणाचा संताप :

ऐकोनि बिभीषणाची मात । ह्रदयीं पोकळा लंकानाथ ।
रागें तयाकडे पाहत । जेंवी कां कृतांत काळाग्नि ॥ १६६ ॥
स्वभावें आरक्त नयन । त्यावरी होतां क्रोधसंपन्न ।
झाले लाखरंगासमान । विंशति नयन वटारिले ॥ १६७ ॥

हातात खड्‍ग घेऊन बिभीषणावर वार करणार
तोच त्याचा हात लचकला व रावण खाली कोसळला :

नयन आरक्त कल्लोळ । धाकें कांपती लोक सकळ ।
क्रोधें नेत्रीं निघती ज्वाळ । जाली खळबळ सभेंसी ॥ १६८ ॥
बिभीषणावरी घालावया उडी । कोशाबाहेरी खड्‍ग काढी ।
विजूतेजसम परवडी । पडली झांपडी सभेसीं ॥ १६९ ॥
प्रळयमेघ गर्जे कडाडीं । तेंवी रावण रागें गडाडी ।
घावो हाणावया निर्वडी । शस्त्र झाडी साटोपें ॥ १७० ॥
ऐकता रावणाची हाक । धाकें कांपती सकळ लोक ।
बिभीषण चित्ती निःशंक । न मानी धाक रामनामें ॥ १७१ ॥
माझा स्वामी श्रीशंकर । त्यासी म्हणसी रामकिंकर ।
तरी छेदीन तुझे वक्त्र । शस्त्र सत्वर उचलिलें ॥ १७२ ॥
उडोनियां आकाशाआंत । घावो हाणितां लंकानाथ ।
रावणाचा लचकला हात । श्रीराम रक्षित निजभक्ता ॥ १७३ ॥
चमत्कारें सुटली मुष्टी । शस्त्र गळोनि पडलें भूपृष्ठीं ।
रावणें धाक घेतला पोटीं । गोष्टीं उफराटी येथें झाली ॥ १७४ ॥
रावण चांचरे घावो हाणितां । पडला सिंहासनाखालता ।
राजपुरूषार्थ करोनि वृथा । राम रक्षिता भक्तासी ॥ १७५ ॥

बिभीषणावर लाथेचा प्रहार :

पुढती रावणें खड्‍ग घेतां । प्रहस्तें धांवोनि धरिलें हाता ।
कोप न सांवरे लंकानाथा । हाणिल्या लाथा बिभीषणा ॥ १७६ ॥
रावणें हाणितांचि लाथा । बिभीषणें चरण वंदिले माथां ।
शरण जावया श्रीरघुनाथा । सुमुहूर्तता हे माझी ॥ १७७ ॥
कोपा चढला लंकानाथ । त्यासी प्रहस्तें करोनि शांत ।
खड्‍ग घालोन दळाआंत । बैसविला स्वस्थ सिंहासनीं ॥ १७८ ॥

बिभीषण बेशुद्ध पडतो, त्याचे रामांकडे गमन :

रावणाची लागली लात । जेंवी पर्वतीं वज्रपात ।
बिभीषण पडतांचि मूर्च्छित । व्दंव्दनिर्मुक्त श्रीरामनामें ॥ १७९ ॥
अगाध बिभीषणाची शांती । अणुमात्र क्रोध न ये चित्तीं ।
कांहीं न बोलेचि दुरूक्ती । स्वस्थ चित्तीं बैसला ॥ १८० ॥
सुबुद्धि सांगावी सुह्रदता । ते गोष्टी खुंटली आतां ।
स्वस्थ असावें लंकानाथा । शरण रघुनाथा मी जातों ॥ १८१ ॥
स्वयें हाणोनियां लात । मज तुष्टला लंकानाथ ।
स्वामी भेटेल श्रीरघुनाथ । हें भाग्या प्राप्त तुझेनि ॥ १८२ ॥
एकाजनार्दना शरण । राम आश्वासीला बिभीषण ।
तें अति गोड निरूपण । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ १८३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
बिभीषणापमानो नाम षट्‌त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३६ ॥
॥ ओव्यां १८३ ॥ श्लोक ३२ ॥ एवं संख्या २१५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती  


तुमच्या शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी कृषी क्रांती ला नक्की भेट द्या 
ref:satsangdhara 

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय छत्तिसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *