संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा

अतिकायाकडून रावणाची कानउघाडणी

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

आला ऐकोनि रघुनंदन । भयें भयभीत दशानन ।
प्रधान सेना अति उव्दिग्न । लंकाजन सकंपित ॥ १ ॥
चाकाटला रावण । तंव भेरी लावोनि निशाण ।
स्वयें आला रघुनंदन । वानरसैन्यसंभारीं ॥ २ ॥

लंकेत सर्वत्र हाहाकार व रावणावर दोषारोप :

शंख भेरी टाळ घोळ । काहळा वाजती चिनकाहळ ।
ढोळ पटह मांदळ । ध्वनि आगला बुरूंगें ॥ ३ ॥
धडैधडै विख्यात वाही । निशाणां लागली एक घाई ।
विराणीं वाजती दोहीं बाहीं । गिडबिड ठायीं गर्जती ॥ ४ ॥
ऐसा वाजंत्रांचा गजर । घेवोनि कपिकुळसंभार ।
लंके आला श्रीरघुवीर । केला भुभुःकार वानरीं ॥ ५ ॥
देखोनि श्रीरामाचा यावा । कल्पांत रावणाच्या जीवा ।
कायसा प्रधानाचा केवा । दुःखकालोवा राक्षसां ॥ ६ ॥
श्रीराम आला वानरभारीं । अति आकांत लंकापुरीं ।
शंख करिती घरोघरीं । नर नारी कळकळिती ॥ ७ ॥
वानरदळ देखोनि गाढें । एक चाले एकापुढें ।
एक एकामागें दडे । कोणीकडे दडावें ॥ ८ ॥
पळावया वाट नाही पुढें । वानरीं बळकाविलें हुडे ।
रावणाचें कर्म कुडें । मरण रोकडे सर्वांसीं ॥ ९ ॥
रावणअपराधासाठीं । मरती राक्षसांच्या कोटी ।
घरोघरीं बोंब उठी । वानर दृष्टीं देखोनी ॥ १० ॥

रावणाने प्रधानांचा केलेला धिक्कार व उपहास :

पापबुद्धि लंकानाथा । चोरोनि श्रीरामाची कांता ।
करविलें लंकेच्या घाता । उपाव आतां चालेना ॥ ११ ॥
पूर्वी सूचवी बिभीषण । सीता देवोनि रिघावें शरण ।
पापी नायके आपण । आलें मरण राक्षसां ॥ १२ ॥
आला देखोनि रघुनंदन । अति क्षोभला दशानन ।
पाचारोनियां प्रधान । बोले आपण तयांसी ॥ १३ ॥
घेवोनियां वानरसैन्य । लंके आला रघुनंदन ।
तरी तुम्हांसी नाहीं ज्ञान । मदें मैथुनविषयांध ॥ १४ ॥
समुद्रीं तारोनि पाषाण । सेतु बांधिला संपूर्ण ।
तरी तुम्हांस नाहीं ज्ञान । मदे मैथुनें विषयांध ॥ १५ ॥
श्रीराम येवोनि सहपरिवारीं । वानर ठाकिले उरावरी ।
तुम्ही सुषुप्तींत स्त्रियाजानूंवरीं । विषयसंचारीं विषयांध ॥ १६ ॥
सहलक्ष्मण वानरभारीं । श्रीराम आला लंकेवरी ।
तुम्ही विषयांध निदसुरी । आदळे वैरी तुम्ही नेणां ॥ १७ ॥
मद्द्यमैथुनीं तत्पर । नाहीं जवळी हेर चार ।
वैरियें घेतलें घर । तुम्ही पामर तें नेणां ॥ १८ ॥
पंचविषय पंचभूत । तुम्हांस लागलें निश्चित ।
लंके आला श्रीरघुनाथ । तुम्हीं सभ्रांत नेणांची ॥ १९ ॥
पूर्वल तुमचा बडिवार । म्हणा बापुडे ते वानर ।
वनचर पालेखाइर । आम्हांसमोर केंवी येती ॥ २० ॥
तेचि वानर महावीर । सेतु बांधोनि समग्र ।
लंके आले अति दुर्धर । देती भुभुःकार श्रीरामनामें ॥ २१ ॥
काळकृतांत दशानन । त्यांतें करोनि तृणासमान ।
सेतु बांधोनि वानरगण । युद्ध दारूण करूं आले ॥ २२ ॥
उपेक्षोनि वीर समस्त । मजचि लक्षोनि निश्चित ।
वानर युद्धासी उद्द्यत । अति समर्थ रणयोद्धें ॥ २३ ॥
रोकडें मांडलें असे रण । तुम्हीं करितां कपिहेळण ।
अवश्य तुमचा घेतील प्राण । कपि विचक्षण रणयोद्धें ॥ २४ ॥
तुमचिया असावधानता । लंके येणें श्रीरघुनाथा ।
वानरीं सेतुबंधनता । नेणों सर्वथा अति गर्वें ॥ २५ ॥

बिभीषणाच्या सूचनेची आठवण :

वानरवीर स्वयें समस्त । कडकडाटें सेतु बांधित ।
तें तुम्हीं नेणा गर्वोन्मत्त । मद्द्याभिभूत स्त्रीकामी ॥ २६ ॥
धनोन्मत्त मदोन्मत्त । स्त्रीकामें कामोन्मत्त ।
गर्वोन्मत्त बळोन्मत्त । पंचोन्मत्त तुम्ही सर्व ॥ २७ ॥
पंचोन्मत्त उन्मत्त पूर्ण । चोर हेर पाठविले कोण ।
माझ्या कार्याची आठवण । तुम्हांसी विस्मरण उन्मादें ॥ २८ ॥
सर्वदा रायाचें हित विचारी । यालागीं त्यासी म्हणिजे मंत्री ।
तें कार्य नाहीं तुम्हांमाझारी । विषयसंचारी विषयाचे ॥ २९ ॥
सकळ कार्य प्रधानाहातीं । ऐसी अनादि राजनीती ।
तुम्ही माझे विश्वासघाती । ठकिलें निश्चितीं निजस्वार्था ॥ ३० ॥
तुम्हांस मज विश्वासता । तुम्ही पेटलेति माझ्या घाता ।
लंके आणिलें श्रीरघुनाथा । कुळक्षयार्था समूळीं ॥ ३१ ॥
बिभीषण माझा धर्ममूर्तीं । तो बोलिला सत्य युक्ती ।
प्रधान तुझे विश्वासघाती । हेही प्रतीति मज आली ॥ ३२ ॥

इंद्रजिताचे आश्वासन :

उन्मादें मदोन्मत्त प्रधान । अविश्वासीं यांचें वदन ।
ऐसें बोलिला बिभीषण । प्रत्यक्ष प्रमाण मज आलें ॥ ३३ ॥
माझा बिभीषण येथें असता । तो सेतुचि बांधों न देता ।
येवों न देता रघुनाथा । माझ्या निजहिता कृतोपकारी ॥ ३४ ॥
तुमच्या वचना विश्वासोन । सखा दवडिला बिभीषण ।
आंगीं आदळला रघुनंदन । कपटी प्रधान मज माझें ॥ ३५ ॥
लंके आला रघुनंदन । सकोप रावणाचे वदन ।
ऐकोनि सेना प्रधान । लज्जायमान जाहले ॥ ३६ ॥
गजरें आला रघुनंदन । आंगीं आदळलें विघ्न ।
लज्जायुक्त प्रधान । कंपायमान भयभीत ॥ ३७ ॥
आला देखोनि रघुनाथ । रावण कोपें जाला कृतांत ।
प्रधानराक्षसेंसीं आकांत । प्राणावर्त सर्वांसी ॥ ३८ ॥
अधोवदनें अवघे स्तब्ध । कांहीं न बोलती शब्द ।
तया काळीं मेघनाद । करी अनुवाद जनकासी ॥ ३९ ॥
आला देखोनि श्रीरघुनाथा । तूं कां व्यर्थ भीसी ताता ।
कायसी रामलक्ष्मणांची कथा । कपि समस्त कोण गणी ॥ ४० ॥
इंद्र आणिला बांधोन । बंदीं घातले सुरगण ।
रामलक्ष्मण ते कोण । वानरगण कोण गणी ॥ ४१ ॥
वानर स्वयें पालेखाइर । रामलक्ष्मण मनुष्यमात्र ।
ते तंव आमचा नित्य आहार । भय दुर्धर तुज कैंचें ॥ ४२ ॥
स्वामीनें राहावें सुखें स्वस्थ । तूंही जाणसी माझा पुरूषार्थ ।
जे जे आले आहेत येथ । ते मी समस्त मारीन ॥ ४३ ॥
विकट बाण वीर श्रेणी । रामलक्ष्मण पाहीन रणीं ।
अंगद सुग्रीव राजे दोनी । रणीं शोधोनी मारीन ॥ ४४ ॥
ज्याचे पवाडे अद्‍भुत । कंदन केले लंकेआंत ।
तो मी मारीन हनुमंत । जांबवंत दूसरा ॥ ४५ ॥
नळ नीळ गंधमादन । तरस तरळ पनस सुषेण ।
एकैक वानर ससैन्य । निर्दळीन बाणाग्रें ॥ ४६ ॥
माझ्या बाणांची झडाडी । रामलक्ष्मणां प्रेतपरवडी ।
मारीन वानरांच्या कोडी । तीं बापुडीं मर्कटें ॥ ४७ ॥

प्रहस्ताचे भाषण :

ऐकोनि इंद्रजिताचें वचन । प्रहस्त बोले अति गर्जोन ।
राया तुझें शत्रुदमन । मी करीन एकला ॥ ४८ ॥
माझ्या मुसळघायापुढें । रामलक्ष्मण बापुडे ।
कायसे वानर बळियाडे । रणी रोकडें मारीन ॥ ४९ ॥
मुसळ साधन चक्राकार । अष्टांगी विषम मार ।
प्रहस्त दावी महावीर । दशशिर अनुलक्षी ॥ ५० ॥
राया तुझा शत्रुसंभार । म्या मारिला मानीं साचार ।
सेवोनि पद्मिनीकामसेजार । भोगीं विचित्र स्वयें भोग ॥ ५१ ॥

तसेच धूम्राक्षाची दर्पोक्ती :

ऐकोनि प्रहस्तनव्हाळी । धूम्राक्ष गर्जोनि वचन बोली ।
वानरसेना लंकामूळीं । आतुर्बळीं आदळली ॥ ५२ ॥
सन्नद्ध आम्ही अवघे जण । रात्रीं जावोनि आपण ।
निजले असतांचि जाण । वानरगण निर्दळूं ॥ ५३ ॥
सौमित्र आणि रघुपती । सुग्रीव अंगदादि जुत्पती ।
जावोनि मारूं रातोरातीं । रणसमाप्तीं शत्रूसी ॥ ५४ ॥
ऐसी करोनियां ख्याती । यश देऊं लंकापती ।
हेंचि आवडे माझे चित्तीं । वीरांप्रती सांगत ॥ ५५ ॥
ऐसी धूम्राक्षाचीं उत्तरें । निर्भत्सिलीं महोदरें ।
श्रीरामें नित्य रक्षिलीं वानरें । सहपरिवारें सुग्रीवें ॥ ५६ ॥

महोदर धूम्राक्षाचा धिक्कार करितो :

निजल्या वानरां करावा घात । हा कोण तुझा पुरूषार्थ ।
धूम्राक्षाची सभेआंत । निर्भर्त्सित महोदर ॥ ५७ ॥
श्रीराम नित्य सावधान । स्वयें रणी वानरगण ।
सुग्रीव राजा आपण । करी रक्षण अहोरात्र ॥ ५८ ॥
श्रीराम नित्य सावधान । छळितां मारीच पावला मरण ।
शूर्पणखा आपण । करितां छळण विटंबिली ॥ ५९ ॥
तेथें वानरांच्या निजघातीं । तुम्हांसीं जातां रातोरातीं ।
श्रीरामबाणाच्या संपातीं । मराल निश्चितीं एकैक ॥ ६० ॥
श्रीराम नित्य देखणा जाण । परी त्याचिया भात्याचे बाण ।
आंधारीं देखणें पूर्ण । घेती प्राण गिवसगिवसूं ॥ ६१ ॥
देखोनि श्रीरामदर्भशिखा । पाठी लागोन काका ।
हिंडवोनि तिहीं लोकां । शेखीं वामनेत्र देखा घेतला ॥ ६२ ॥
ऐसिया श्रीरामापुढें । घाला घालणें केंवी घडे ।
तुम्ही राक्षस उन्मत्त वेडे । मराल रोकडे श्रीरामबाणीं ॥ ६३ ॥
तुम्ही ऐका अवघे सावध । वानर आले अति उन्नद्ध ।
दुर्ग कर सन्नद्धबद्ध । दुर्गबळें युद्ध करूं त्यांसी ॥ ६४ ॥
हुडे अटाळें पौळी पागरें । ठायीं ठायी जडा यंत्रें ।
सन्नद्धबद्ध वीरानुवीरें । दुर्गव्दारें रक्षावीं ॥ ६५ ॥
दुर्धर या वानरांचें बळा । कपाटीं घाला रे अर्गळा ।
दृढ देखोनियां सांखळा । दळ समेळ संरक्षा ॥ ६६ ॥

अतिकायाची स्पष्टोक्ती :

ऐकोनि महोदराची मात । अतिकाय गदगदां हांसत ।
जो जो बोलिला पुरूषार्थ । तो तो व्यर्थ दिसताहे ॥ ६७ ॥
वानरांच्या उड्डाणापुढें । लंकादुर्ग तें बापुडें ।
अर्गळा सांखळा कवाडें । कोणीकडे आंवरती ॥ ६८ ॥
त्रिकूटाच्या शिखरांवरी । उडों शकिजेल वानरीं ।
तेथें तुमच्या दुर्गांची थोरी । तृणावारी गणीना ॥ ६९ ॥
स्वहित सांगतां बिभीषण । त्यासी केले नगरनिर्यापण ।
मजही बोलतां स्वधर्म पूर्ण । अवघे जण क्षोभाल ॥ ७० ॥
क्षमा कराल अवघे जण । तरी मी यथार्थ सांगेन ।
सत्यसंकल्प रघुनंदन । वृथा वल्गन प्रधानां ॥ ७१ ॥
इंद्रजित माझा ज्येष्ठ बंधू । पुरूषार्थ बोलतो असंबद्धू ।
करितां कपीसीं युद्धसंबंद्धू । तेणें सुबद्धू गांजिला ॥ ७२ ॥
तोचि इंद्रजित आतां । लाजेना वाटव बोलता ।
मिथ्या बोले रायादेखतां । अतिपुरूषार्था वल्गोनी ॥ ७३ ॥
मारीन लक्ष्मण रघुनाथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।
मारीन म्हणतां हनुमंत । सभेआंत लाजेना ॥ ७४ ॥
तैसाचि प्रहस्त प्रधान । जंबुमाळीं मारिल्या जाण ।
पुत्रशोकें करी शंखस्फुरण । हनुमंती रण न करीचि ॥ ७५ ॥
हनुमंतेंसी रण न करवे । तो प्रहस्त मुसळेंसीं धांवे ।
सुग्रीवादि कपि आघवे । मारीन लाघवें हे मृषा जल्प ॥ ७६ ॥
धूम्राक्ष महाबळवंत । निजल्या वानर समस्त ।
यांचा म्हणे मी करीन घात । थोर पुरूषार्थ हा त्याचा ॥ ७७ ॥
ऐसे मिथ्यावादी प्रधान । वृथा मिरविती आंगवण ।
त्यांसी विश्वासतां रावण । दुःख दारूण पावेल ॥ ७८ ॥

त्याची रावणाला विनंती :

तेचि समयीं वीराधि राजे । उभवोनियां दक्षिण भु्जे ।
अतिकाय स्वधर्म गर्जे । अवधारिजे राजेंद्रा ॥ ७९ ॥
रायें रक्षावे गोब्राह्मण । निर्भय प्रजांसी संरक्षण ।
करावें दुष्टांचें निर्दळण । परिपाळण साधूंचें ॥ ८० ॥
ऐशिया स्वधर्मनीती । ज्या रायांच्या वर्तती स्थिती ।
ते राजे सदा सुखी असती । धरा भोगिती निर्भये ॥ ८१ ॥
हित सांगतां बिभीषण । लत्ताघातें नगरनिर्यापण ।
मजही बोलतां स्वधर्म पूर्ण । दुष्ट दुर्जन न म्हणावें ॥ ८२ ॥
सुबुद्धि बिभीषण पवित्रु । दवडिला तुम्ही करोनि शत्रु ।
तूं पिता मी निजपुत्रु । धर्मविचारू अवधारीं ॥ ८३ ॥
जिकडे नित्य पापाचें आचरण । अकीर्ति अपेश अकल्याण ।
अति निंद्द्यत्वें पावे मरण । सत्य जाण लंकेशा ॥ ८४ ॥
जेथें नित्य धर्माचरण । यश कीर्ति कृतकल्याण ।
त्रैलोक्यीं विजयी होय आपण । सत्य जाण लंकेशा ॥ ८५ ॥
श्रीराम धर्मात्मा अति शुद्धू । तुझा न करितां अपराधु ।
तुवां कां चोरिली त्याची वधू । पापी सुबुद्धू जालासी ॥ ८६ ॥
सीता पतिव्रता संपूर्ण । करितां परदारहरण ।
खतेला पापीं तूं पूर्ण । कुळनिर्दळण अति पापें ॥ ८७ ॥
सीता आनिता लंकेआंत । तैंहूनि उठिले अति उत्पात ।
अखयादि वीर समस्त । केला अति घात हनुमंतें ॥ ८८ ॥
परदारपापसंकटीं । वानरांसी देवोनि पाठी ।
इंद्रजित पळे उठाउठीं । सैन्यकोटी मारवूनी ॥ ८९ ॥
परदारादिहरण । तें पाप अति दारूण ।
वानरें गांजिला रावण । लंकाभुवन जाळोनी ॥ ९० ॥
ऐसी देखतां प्रतीती । वृथा माना बलोन्मत्ती ।
गर्वे निमसील लंकापती । सैन्यसंपत्ती समूळ ॥ ९१ ॥
साष्टांग नमन रावणासी । दुसरें नमन इंद्रजितासी ।
तिसरें नमन प्रधानांसी । निजहितासी अवधारा ॥ ९२ ॥
माझे आवडीची कथा । श्रीरामासी अर्पोनि सीता ।
वांचवावें लंकानाथा । आणि समस्तां राक्षसां ॥ ९३ ॥
श्रीरामासी रिघोनि शरण । सीता अर्पितां आपण ।
अक्षय कुमर आणि रावण । सत्य वचन हें माझें ॥ ९४ ॥
सैन्य सेना आणि प्रधान । अक्षय राक्षसलंकाभुवन ।
भुक्तिमुक्ति अक्षय पूर्ण । त्रिसत्य वचन हें माझें ॥ ९५ ॥
सीता अर्पोनि आपण । श्रीराम रिघतां शरण ।
स्वप्नीं नाहीं जन्ममरण । परम कल्याण अति कीर्ति ॥ ९६ ॥
ऐसें स्वहिताचे उत्तर । स्वयें न मानी दशशिर ।
प्रधान न मानिती कुमर । मरणातुर उन्मादें ॥ ९७ ॥
मद्द्योन्मत्त धनोन्मत्त । बळोन्मत्त राज्योन्मत्त ।
अति गर्वे गर्वोन्मत्त । पंचोन्मत्त मरणार्थी ॥ ९८ ॥
पतंग दीपातें झडपिती । जळोनि स्नेही बुडती ।
तरी मागील झडप देती । मरणोन्मत्तीं उन्मत्त ॥ ९९ ॥
अभिलाषितां सीता सती । विरोधितां श्रीरघुपती ।
रावणा मरसी गर्वोन्मत्तीं । सैन्यसंपत्तीसमवेत ॥ १०० ॥
रावणा देखतां लंकेआंत । कपीनें केला अति आकांत ।
तेंही न माना तुम्ही समस्त । गर्वोन्मत्त मरणार्थीं ॥ १०१ ॥
भीड सांडोनि बोलिलों कठिण । यालागीं माझें लोटांगण ।
क्षमा करावें संपूर्ण । बाळभाषण हें माझें ॥ १०२ ॥
स्वहित नायके दशानन । अतिकायासी आलें रूदन ।
अश्रुपूर्ण जाले नयन । धरोनि मौन राहिला ॥ १०३ ॥
दुःख पावेल निजमाता । ऐशिया बोलाची कथा ।
येवों नेदीच वाक्पथा । अतिमौनता राहिला ॥ १०४ ॥

त्याचा रावणादिकांवर झालेला परिणाम :

ऐकोनि अतिकायाचें वचन । जीवीं खोंचला दशानन ।
इंद्रजित आणि खोंचले प्रधान । प्रतिवचन न देती ॥ १०५ ॥

सुंदरकांड संपूर्ण झाले :

एकाजनार्दना शरण । श्रोत्या वक्त्या पडलें मौन ।
सुंदरकांड जालें संपूर्ण । श्रीजनार्दननिजकृपा ॥ १०६ ॥
घेवोनि वाळिचें बळबंड । सुग्रीवा राज्य दिधलें प्रचंड ।
कपिसैन्य आणोनि उदंडा । सुंदरकांड संपविलें ॥ १०७ ॥
सीताशुद्धीचियें चाडां । वानरें वनीं देवोनि झगडा ।
हेमविवरीं घेवोनि झाडा । सुंदरकांडा संपविलें ॥ १०८ ॥
देवोनि समुद्रीं गडाडा । वानरी प्राण देतां पुढां ।
संपाती भेटोनि रोकडा । सुंदरकांडा संपविलें ॥ १०९ ॥
सीता शोधोनि धडफुडां । समुद्र उल्लंघोनि हनुमान गाढा ।
करोनि अशोकवना उपाडा । सुंदरकांडा संपविलें ॥ ११० ॥
मिष करोनि वनउपाडा । वनीं राक्षस करोनि रगडा ।
इंद्रजित गांजोनि गाढा । सुंदरकांड संपविलें ॥ १११ ॥
किंकरवनकरांचा तोडा । अखया उपटोनियां दुर्गापुढां ।
लंका जाळोनि भडभडां । सुंदरकांडा संपविलें ॥ ११२ ॥
शुद्धि सांगोनि रामापुढां । गेला सिंधूसीं स्वयें रोकडा ।
झाडोनि समुद्राचा पादाडा । सुंदरकांडा संपविलें ॥ ११३ ॥
दशयोजनें रूंद येवढा । दशयोजनें सेतु गाढा ।
राम आणोनियां लंकापुढां । सुंदरकांडा संपविलें ॥ ११४ ॥
संपवोनि सुंदरकांडा । पुढें युद्धकांडाचा झगडा ।
श्रीराम करील राक्षसरगडा । प्रतापवाडा अवधारा ॥ ११५ ॥
एकाजनार्दना शरण । सुंदरकांड संपवून ।
पुढे युद्धकांड निरूपण । गोड रामायण अवधारा ॥ ११६ ॥

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
रावणसेनासंवादे अतीकायरावणप्रबोधः श्रीरामलंकागमनं च नाम द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ४२ ॥
॥ ओव्यां ११६ ॥ श्लोक २२ ॥ एवं संख्या १३८ ॥

*** सुंदरकांड समाप्तम् ***

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बेचाळिसावा