संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बाविसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बाविसावा

गजेन्द्रउद्धार व हनुमंताचे श्रीरामदर्शनार्थ पुनरागमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ह्रदयीं अंतरात्मा सर्वज्ञ । त्याचेनि बुद्धिंद्रिये सज्ञान ।
तेणें काया वाचा मनें नमन । अनन्य शरण गजेंद्र ॥ १ ॥
भगवंतासी अनन्य शरण । होतां पालटे देहचिन्ह ।
इंद्रियांचे विपरीतज्ञान । तेंहि लक्षण अवधारा ॥ २ ॥
अनन्यत्वीं मन उन्मन । चित्त होय चैतन्यघन ।
बुद्धि होय समाधान । अहंता संपूर्ण सोहंत्वी विरे ॥ ३ ॥
तेव्हां भूतें होती चिदाकार । विषय होती तन्मात्र ।
अनन्यशरणत्वाचें सूत्र । संसारचरित्र परब्रह्म ॥ ४ ॥
होवावया अनन्य शरण । पाहिजे भाग्य सत्त्वसंपन्न ।
तेणें भाग्यें गजेंद्र गहन । करितो नमन भगवंता ॥ ५ ॥
ओंकार ब्रह्मरूप पूर्ण । त्यासी प्रकाशी चैतन्यघन ।
त्या भगवंतासी नमन । काय वाचा मनें अनन्यत्वें ॥ ६ ॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म । हें भगवद्गीतेंचे निजवर्म ।
स्वयें बोलिला पुरूषोत्तम । ॐकारब्रह्मवेदबीजत्वें ॥ ७ ॥
ॐकारबीज सनातन । स्वरवर्ण उच्चार ब्रह्मपूर्ण ।
भूतभौतिकें चैतन्यघन । त्या भगवंता नमन अनन्यत्वें ॥ ८ ॥
जो या सर्वा आदिकारण । स्वयें अकारण आपण ।
त्या श्रीपुरूषोत्तमासी नमन । अनन्यशरण अनन्यत्वें ॥ ९ ॥
ब्रह्मा विष्णु आणि महेश । हेहि ज्याचे अंशांश ।
ऐसा परेशाचा जो ईश । नमन माझें त्यास अनन्यत्वें ॥ १० ॥
त्याचें करूं जाता ध्यान । ध्येय ध्याता होय शून्य ।
ध्यानेंचि होय चैतन्यघन । त्यासी माझें नमन अनन्यत्वें ॥ ११ ॥
हें सर्व भासे ज्याचे ठायीं । ज्याचेनि सर्व प्रकाशलें पाहीं ।
जो सर्वी कोंदला ठायींच्या ठायीं । जो कीं सर्वही आपण ॥ १२ ॥
जेंवी गुळाचें कारलें केलें । देंठकांठियेनसीं गोडिये आलें ।
तेंवी हे सर्वही संचलें । असे ओतलें चिद्रूपत्वें ॥ १३ ॥
नाबदेचे नारळ गोमटे । कवटी काढिती ते करंटे ।
तेंवी चैतन्येंचि नेटपोंटे । भासे समसकटें सर्वरूप ॥ १४ ॥
तेथें जो देखे दोषगुण । तोचि नरकासी जाय आपण ।
मुनीचेनि शापें जाण । निजात्मखूण पावलों ॥ १५ ॥
जो कां मीतूंपणापरता । अनन्याशरण त्या भगवंता ।
ज्यासी नाहीं जन्मकथा । मरणवार्ता तो नेणें ॥ १६ ॥
ज्यासीं नाहीं जन्मकर्म । त्यासी कैंचें रूपनाम ।
देहाविणें गुणदोषकर्म । धर्माधर्म असेना ॥ १७ ॥
ऐसा जो कां भगवंत । स्वलीला लोकसंग्रहार्थ ।
ब्रह्मा विष्णु शिवा समस्त । अवतार धरीत गुणकर्में ॥ १८ ॥
उत्पत्तिकाळीं चतुरानन । तोचि स्थितिकाळीं विष्णु जाण ।
तोचि प्रळयीं त्रिनयन । नामाभिधान गुणधर्में ॥ १९ ॥
जोचि पेरी तोचि सोकरी । तोचि संवगणीही करी ।
तैसा एकचि श्रीहरी । गुणावतारी त्रिरूप ॥ २० ॥
नट नानावेष मांडी । संपादूनि सवेंच सांडी ।
नटासी नाहीं घडामोडीं । तैसी परवडी भगवंता ॥ २१ ॥
नाना अवतार धरितां । श्रीहरीस नाहीं जन्मकथा ।
धरिले अवतार सांडितां । मरणवार्ता तो नेणे ॥ २२ ॥

श्लोकांश – तस्मै नमः परेशाय

ऐसा परेशा परेश । अनंत शक्तींचा जो ईश ।
जो ब्रह्मण्य देव जगदीश । परम पुरूष परमात्मा ॥ २३ ॥
जो अरूपरूप परिपूर्ण । अनंत रूपें धरी आपण ।
त्या भगवंतासी लोटांगण । अनन्य शरण अच्युता ॥ २४ ॥
मजसारिखे अति दीन । स्वार्थीं विमुख पशूसमान ।
तुज आलिया अनन्य शरण । पाशछेदन तूं करिसी ॥ २५ ॥
नक्रपशुपाशग्रहण । हें तुच्छ यासी मानी कोण ।
कर्मपाश अति दारूण । कृपा करून छेदिसी ॥ २६ ॥
शरणागतांचें पाशछेदन । स्वस्वरूपीं होती लीन ।
ऐसी कृपा पूर्ण करून । आपुलें मुक्तपण त्यां देसी ॥ २७ ॥
त्यांसी देसी निजात्ममुक्ती । तेहीविशीं एक युक्ती ।
त्यांची छेदिसी समूळ भ्रांती । नित्य मुक्ति सहजेंचि ॥ २८ ॥
ऐशिया श्रीहरि कृपावंता । माझें नमन अनन्यता ।
तुझेनि नमनें भगवंता । दिसे आप्तता सर्वां भूतीं ॥ २९ ॥
सर्व भूतीं ह्रदयस्थ । अंतरात्मा तो भगवंत ।
द्रष्टेपणें सदोदित । असे नांदत प्रतिशरीरीं ॥ ३० ॥
भगवंताची सर्वां भूतीं । मनोन्मनें नित्य प्राप्ती ।
भगवत्कृपेची ही ख्याती । भक्त पावती अनन्यत्वें ॥ ३१ ॥
प्रत्यग्दृशा हे मात । भूतां सबाह्य सदोदित ।
देखणेपणें भगवंत । दृश्यद्रष्टातीत कोंदला ॥ ३२ ॥
बृहद्ब्रह्म सनातन । हें भगवंताचे अभिधान ।
त्यासी माझें अनन्य नमन । पाशबंधन छेदावया ॥ ३३ ॥
भगवंताची कृपा नव्हतां । कदा न तुटे अहंममता ।
ते अहंममतेची कथा । ऐक आतां सांगेन ॥ ३४ ॥
मी म्हणणें हा खोडा जाण । माझी स्त्री ती खीळ कठिण ।
गृहसामुग्री विविध धन । पाचरा संपूर्ण सुबद्ध ॥ ३५ ॥
तेथें अपत्याची आनंदगुढी । तो खोडा घातल्यावरी बेडी ।
कर्म लौकिक स्वजनआवडी । ये बेडीची कडी खळखळीत ॥ ३६ ॥
खोडा खिळी त्यावरी बेडी । कृपणतेची हातकडी ।
हे कुटुंबधाडीची बांधवडी । त्याहीवरी भरडी नित्य विषय ॥ ३७ ॥
खोड्याची खीळ ते स्त्री कठिण । त्या कठिणपणाचें विंदाण ।
निजमातेतें त्यागून । स्त्री आपणा आप्त होये ॥ ३८ ॥
मातृसेवा वेदविहिती । ते सांडूनियां निश्चितीं ।
स्त्रीकामाचीं आसक्तीं । वश करिती पुरूषातें ॥ ३९ ॥
दरवेशियाचें वानर जैसें । पुरूषाशी वश करी तैसें ।
नाचवी तैंसे नाचे बैसे । अनारिसें न करवे ॥ ४० ॥
जैंसे पाळिलें का श्वान । तैसा होय स्त्रीअधीन ।
लाविल्या लागे वसवसून । वारिल्या मौन धरोनि राहे ॥ ४१ ॥
मातृसेवा भुक्तिमुक्ति । जे म्हणती ते माता त्यागिती ।
स्त्रीकामाची आसक्ती । ज्ञाते होती अति भ्रांत ॥ ४२ ॥
मातृसेवा भुक्तिमुक्ति । स्त्री आसक्ती नरकप्राप्ती ।
ऐसें व्याख्यान जे करती । तेही मानिती स्त्री आप्त ॥ ४३ ॥
भ्रांतीमाजी सप्त पाश । अहंदारपुत्रपाश ।
गृहधनस्वजनपाश । आशापाश सातवा ॥ ४४ ॥
सत्संगति नाहीं ज्यांसी । रामनाम नाठवे त्यांसी ।
ते गुंतले कर्मपाशीं । ह्रदयस्थेंसीं नव्हे भेटी ॥ ४५ ॥
सप्तपाशांचे छेदन । करावया एक सत्संग जाण ।
त्या सत्संगाचें महिमान । सावधान अवधारा ॥ ४६ ॥
श्रवणमननीं निश्चळ वृत्तीं । निदिध्याससाक्षात्कारीं परम प्रीती ।
नाना चरित्रें श्रीहरीचीं गाती । धन्य त्रिजगतीं ते साधु ॥ ४७ ॥

श्रीकृष्ण व श्रीरामचंद्र यांच्यातील अवतारसाम्य व तुलना

अजन्मजन्म सोमवंशीं । अयोनिजा जन्म सूर्यवंशीं ।
एकें शोषिलें पूतनेसी । ताटिकेसीं पैं एकें ॥ ४८ ॥
एकें गुरूपुत्र आणिला । एकें गुरूयाग सिद्धी नेला ।
एकें गोवर्धन उचलिला । एकें बांधिला शिळासेतु ॥ ४९ ॥
एकें सोडोनि मातेसी । स्वयें गेला गोकुळासी ।
एकें सांडोनि निजराज्यासी । वनवासी दंडकीं ॥ ५० ॥
जागें न होतां कोणासीं । मथुरा नेली द्वारकेंसी ।
रामें अयोध्या निजगजरेंसीं । वैकुंठासी स्वयें नेली ॥ ५१ ॥
एक लोणियालागीं आपण । मातेपासीं करी रूदन ।
एक सीताशोकें जाण । करी रूदन वनवासीं ॥ ५२ ॥
ठकोनि मारिला कालयवन । वाळी मारिला शिंतरोन ।
शिशुपाळादिदैत्यकंदन । खरदूषण श्रीरामें ॥ ५३ ॥
कंसचाणूरनिर्दळण । मारिलें रावण कुंभकर्ण ।
उग्रसेना राज्यस्थापन । लंकाभुवन बिभीषणा ॥ ५४ ॥
श्रीरामव्रत एकपत्‍नी । कृष्ण ब्रह्मचारी स्त्रिया भोगूनी ।
कृष्णें तारिलें गोकुळ अवनीं । जगदुद्धरणी रामनाम ॥ ५५ ॥
ऐसें करितां हरिकीर्तन । व्यास जारजपुत्र पावन ।
चोरट्या वाल्मीकांचें जाण । रामायण शिववंद्य ॥ ५६ ॥
वर्णितां श्रीहरीची पदवी । दोघे जाले महाकवी ।
त्या दोघांचें ग्रंथगौरवीं । मुक्ति सर्वीं पाविजे ॥ ५७ ॥
अमंगळां करीं मंगळ । ऐसी हरिकीर्तीं निर्मळ ।
नाम मंगळा मंगळ । सुमंगळ हरिकीर्ति ॥ ५८ ॥

नाममहिमा

रामनामाचे परिपाटीं । दोष जळती आकल्पकोटी ।
भुक्ति मुक्ति लागे पाठीं । पावन सृष्टी रामनामें ॥ ५९ ॥
यमयातनेचे पितर । चिंतिताती निरंतर ।
एकादशी हरिजागर । वंशीं तत्पर होऊ कोणी ॥ ६० ॥
पुत्र अथवा भ्रातृपुत्र । दुहिता अथवा दौहित्र ।
करितां एकादशी जागर । यमप्रहार पैं चुके ॥ ६१ ॥
नामें नरकीं उद्धरती । नामें स्वर्गस्थांसी मुक्ती ।
ब्रह्मादिक अमरपती । जन्म वांछिती कलियुगीं ॥ ६२ ॥
कलियुगाची थोर ख्याती । नामासाठीं लोभे मुक्ती ।
स्त्रियादि अंत्यज उद्धरती । नामकीर्ति दाटुगी ॥ ६३ ॥
नामासीं नाहीं स्नानबंधन । नामासीं नाहीं विधिविधान ।
आसनीं भोजनीं शयनीं जाण । नाम पावना हरीचें ॥ ६४ ॥
निदसुरा निजशेजेंसीं । नामस्मरण जयापासीं ।
ब्रह्मादिका वंदिती त्यासी । चहूं मुक्तींसी माहेर ॥ ६५ ॥
नामासरसी वाजे टाळी । आशापाश होती होळी ।
तये कीर्तनसमेळीं । रंगीं वनमाळी डुल्लत ॥ ६६ ॥
हरिकीर्तनीं भक्तांआंत । हरिखें नाचें भगवंत ।
चरणरजें धूळिभूषित । असे डुल्लत स्वानंदें ॥ ६७ ॥
संकीर्तनसुखाचेनि उद्‌भटें । मज वैकुंठी न कंठे ।
रविबिंबाही आतुटें । सुख न वाटे मज तैंसे ॥ ६८ ॥
मुरडोनि योगियांचे मानसीं । धांवोनि जाय कीर्तनासी ।
तेथेंचि तिष्ठें अहर्निशीं । स्वानंदेंसीं डुल्लत ॥ ६९ ॥
माझिया भक्तांचे आवडीं । हरिकीर्तनीं घाली उडी ।
कीर्तनसुखाची मज गोडी । कडोविकडीं नाचत ॥ ७० ॥
भगवंते निजगुह्यासी । सांगितलें नारदापासीं ।
म्हणोनि तोही हरिकीर्तनासी । अहर्निशीं डुल्लत ॥ ७१ ॥
नामें निर्मुक्त महादोषी । ओस वस्ती यमलोकासीं ।
तीर्थीं मरती उपवासीं । यमनियमेंसीं लंघनें ॥ ७२ ॥
नामगजरेंचि निर्मुक्त । वही पाहे चित्रगुप्त ।
कोरीं पानें अवघीं तेथ । कर्मनिर्मुक्ति हरिनामें ॥ ७३ ॥
रामनामाची प्रथा गाढी । वहीचीं पानें खोडी ना मोडी ।
अवघी वहीच उघडी । केली रोकडी हरिनामे ॥ ७४ ॥
ऐसें करितां कीर्तन । श्रोते वक्ते दोघेजण ।
होती आनंदीं निमग्न । आनंदघन श्रीरामनामें ॥ ७५ ॥
रामनामाच्या आवर्तीं । त्यासी झाली स्वरूपप्राप्ती ।
ज्यांचिये दृष्टी त्रिजगती । मिथ्या प्रतीती फल्गुत्वें ॥ ७६ ॥
आदिब्रह्मा इंद्रादि देव । लोकपाळादि सर्व विश्व ।
वेदांतवाद रूपनाव । मिथ्या सर्व रामनामें ॥ ७७ ॥
एक रामनामासाठीं । ब्रह्मादि देवांची ही गोष्टी ।
फल्गुप्राय उडाले सृष्टीं । रामनामापुष्टी अगाध ॥ ७८ ॥
रामनाम हे चित्कळा । आवडीं आलिया ह्रदयकमळा ।
रामकळा कोंदल्या डोळां । संसार सगळा तृणप्राय ॥ ७९ ॥
रामनामापासीं विरक्ती । रामनामें परम प्राप्ती ।
रामनामें भुक्तिमुक्ती । यथानिगुतीं अवधारा ॥ ८० ॥
रामनाम स्मरतां नित्य । पाप निर्दळी आकल्पांत ।
पुण्या उपजवी अद्‌भुत । जें नित्यानित्य छेदक ॥ ८१ ॥
करितां नित्या नामस्मरण । तेणें उपजे परम पुण्य ।
जें भोगक्षये नव्हे क्षीण । ब्रह्म परिपूर्ण प्रापक ॥ ८२ ॥
नाम स्मरतां वैराग्यपूर्ण । इंद्रलोकादि ब्रह्मसदन ।
मिथ्या देखे जैसें स्वप्न । वैराग्य गहन त्या नामी ॥ ८३ ॥
ऐसीं जालिया विरक्ती । सद्‌गुरू तोचि ब्रह्ममूर्ती ।
ऐसी उपजे अभेदभक्ती । सर्वांभूतीं भगवंत ॥ ८४ ॥
अभेद गुरूभक्तीचें ज्ञान । सर्व भूतीं भगवद्‌भजन ।
भूतभौतिकें चैतन्यघन । ब्रह्मज्ञान या नांव ॥ ८५ ॥
ऐसऐसिया ब्रह्मस्थिती । जन्ममरणा सहज शांती ।
सजीव निर्दळे पैं भ्रांती । ते ही उपपत्ति अवधारा ॥ ८६ ॥
प्रपंच येथें जाला होता । हे समूळीं मिथ्या वार्ता ।
पुढें होईल मागुता । कदा कल्पांतीं घडेना ॥ ८७ ॥
ऐसी जे कां सहजस्थिती । या नांव सबीज निरसें भ्रांतीं ।
पुरूषा परमानंदप्राप्ती । हे निजख्याति अवधारा ॥ ८८ ॥
देवोनि परमानंदप्राप्ती । पुनः न परते मागुती ।
रामनामाच्या आवृत्ती । जडासी मुक्ती द्यावया ॥ ८९ ॥
रामनामस्मरणासाठीं । परमानंदीं पडे मिठी ।
ब्रह्मरूप प्रकटे सृष्टीं । आनंदकोटीं हरिनामें ॥ ९० ॥
ज्याचे नामाचें ऐसें महिमान । तो स्वामी जनी जनार्दन ।
त्यासी काया वाचा मनेंकरून । अनन्य शरण सद्‌भावें ॥ ९१ ॥
सद्‌भावेंसीं अनन्य शरण । ऐकतांचि दीनवदन ।
स्वयें धांविन्नला जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥ ९२ ॥

गजेंद्राच्या करूणार्त प्रार्थनेमुळे भगवंताचे आगमन व गजेंद्राचा उद्धार

दीनोद्धारीं त्वरान्वित । परम कृपाळु भगवंत ।
तेणें श्रीशुक हर्षयुक्त । असे सांगत परीक्षितीप्रति ॥ ९३ ॥
सगुण तेंचि निर्गुण । निर्गुण तेंचि सगुण ।
नामें ब्रह्मप्राप्ति पूर्ण । जगदुद्धार हरिनामें ॥ ९४ ॥
सविशेषनिर्विशेषस्थिती । ऐसी गजेंद्रें केली स्तुती ।
तेणें तुष्टला श्रीपतीं । कृपामूर्ती कृपाळु ॥ ९५ ॥
शक्र विरिंचि शंकर । इत्यादिक सुरवर ।
पदाभिमानीं थोर थोर । त्यांसी गजेंद्र उद्धरवेना ॥ ९६ ॥
समस्तांही सुरवरांसी । शिणतां निजसामर्थ्येसीं ।
न सोडवे गजेंद्रासीं । तया ह्रषीकेशीवांचोनी ॥ ९७ ॥
पृथक इंद्रियांची सत्ता । नित्य अधीन भगवंता ।
तयावांचूनि सर्वथा । दीनोद्धारता न करवे ॥ ९८ ॥
समस्तांहीं सुरवरांसी । नुद्धरवेचि गजेंद्रासी ।
तया काळीं ह्रषीकेशीं । अति त्वरेंसीं निघाला ॥ ९९ ॥
ऐकोन गजेंद्राचें स्तवन । सुदर्शन हातीं वसवून ।
शीघ्र गरूडावरी वळंघोन । श्रीभगवान चालिला ॥ १०० ॥
सकळ जीवांचा जीव । सर्व देव ज्याचे अवयव ।
सर्वात्मा श्रीकेशव । स्वयमेव चालिला ॥ १०१ ॥
ऐकोनि गजेंद्राचें स्तवन । येतां देखोनि गरूड वाहन ।
देव करिती दिव्य स्तवन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥ १०२ ॥
जयजयाजी दीनसंरक्षणा । जयजयाजी दीनपाळणा ।
जयजयाजी दीनोद्धारणा । कृपाळु पूर्णा पूर्णत्वें ॥ १०३ ॥
जयजयाजी भवभावना । जय जय भवभावनिर्मूळनिर्दळणा ।
जय जय भवगजपंचानना । जय जनार्दना जगद्‌गुरो ॥ १०४ ॥
येतां देखोनि श्रीपती । आपुलाल्या निजयुक्तीं ।
करिती नानापरींची स्तुती । विमानपंक्तीं सुरवर ॥ १०५ ॥
गरूडारूढ मेघश्याम । दोहीं पंखांचा आक्रम ।
रथंतरबृहत्साम । मनोरम सामग ॥ १०६ ॥
वामरथंतरसाम । दक्षिणपक्षबृहत्साम ।
नादें डुल्लत पुरूषोत्तम । गरूडागमन स्वानंदें ॥ १०७ ॥
यालागीं छंदोमय नाम । स्वयें पावला गरूडोत्तम ।
त्याचे गतीचा संभ्रम । अनुपम्य अवधारीं ॥ १०८ ॥
पृष्ठभागीं भगवंत । धरी चरण दोहीं हातांत ।
मुखीं श्रीहरिनाम स्मरत । सामगीत दो पक्षीं ॥ १०९ ॥
दोहीं हातीं चरणानुक्रम । पृष्ठीं मेघश्याम ह्रदयीं राम ।
मुखीं नेमस्त श्रीहरिनाम । बृहत्साम दो पक्षीं ॥ ११० ॥
ऐशी गरूडाची हे स्थिती । सबाह्य व्यापिली हरिभक्ती ।
यालागीं छंदोमय गाती । वेदानुवृत्ति अनुवाद ॥ १११ ॥
सपर्वत धरां सागरेंसीं । तुकितां तृणप्राय हरीसीं ।
ऐशियासी अहर्निशीं । गरूड पृष्ठेंसी वाहत ॥ ११२ ॥
ऐसा गरूडारूढ भगवंत । येते परमानंदे डुल्लत ।
तंव गजेंद्र ग्रहग्रस्त । आर्तभूत देखिला ॥ ११३ ॥
चक्र सरसावूनि हातीं । हरि म्हणे गरूडाप्रती ।
तुवां चालावें शीघ्रगतीं । गजेंद्राप्रती उद्धराया ॥ ११४ ॥
मनोवेगाचिया स्थिती । सहस्त्रादिख गरूडगती ।
तोही चालतां सर्वशक्ती । गति भगवंता मानेना ॥ ११५ ॥
करावया गजेंद्रोद्धारण । श्रीहरीस आलें पैं स्फुरण ।
बाहु थरकती सकंकण । आपणा आपण विसरला ॥ ११६ ॥
फिंजारल्या रोमावळी । वीरगुंठी सुटली मोकळीं ।
पुष्पें स्त्रवती क्षितितळीं । आतुर्बळी चालिला ॥ ११७ ॥
सांडोनियां गरूडवहन । सवेग वेगें उडी घालून ।
जेथें गजेंद्रग्रहण । शीघ्र आपण तेथें आला ॥ ११८ ॥
येरीकडे गजेंद्र जाण । ग्रहग्रस्त अति दीन ।
काय बोलिला करूणावचन । जेणें भगवंत पावला ॥ ११९ ॥
तया अगाध सरोवरीं । नक्रे गर्जून आक्रमिला करी ।
धरोनियां जलांतरीं । बलात्कारीं गांजिला ॥ १२० ॥
ग्रहग्रस्त मज देखोनि । मज सोडिलें माझिये पत्‍नीं ।
पुत्रें सांडिलें स्वजनीं । अंतीं कोणी न ये कामा ॥ १२१ ॥
मजला ग्रहाचे मुखीं अर्पूनी । अवघे जणीं जळ प्राशूनी ।
आम्हीं वाचलों महाविघ्नीं । उल्लासोनी गेलीं वना ॥ १२२ ॥
ऐसें तिही मज सांडितां । म्याही सोडिली त्यांची ममता ।
तेव्हां आठवलें चित्ता । हरि रक्षिता प्राणांतीं ॥ १२३ ॥
कृपा उपजली भगवंता । तरी तुटली दुस्तर ममता ।
आतां आठवतें चित्ता । हरि रक्षिता कृपाळु ॥ १२४ ॥
अंतकाळींचा सोयरा । एक श्रीहरिच निर्धारा ।
ऐसें मानलें गजेंद्रा । सपुत्रदारमोहत्यागें ॥ १२५ ॥
निःशेष गेलिया मोहममता । स्मरणादर पढिये चित्ता ।
भजनीं आवडीं भगवंता । उल्लसता स्वानंदें ॥ १२६ ॥
कांहीं अर्पावें भगवंता । अति संचितार्थ नये हाता ।
त्यावरी स्त्रीपुत्रांची सत्ता । स्वयें मागतां नेदिती ॥ १२७ ॥
अंती मागतां कांहीं नेदिती । शेखीं सन्निपात झाला म्हणती ।
संचितार्थीं तोंडीं माती । नागविती स्त्रीपुत्र ॥ १२८ ॥
म्हणती हा आतां मरेल । मरतां द्रव्यार्थ वेंचील ।
आम्हांस भिकेसी लावील । याचा बोल नायकावा ॥ १२९ ॥
ऐसें सुह्रदांचें संमत । अंती संचितार्थ नागवित ।
गृहस्थ मरे चरफडत । तैंसेंच प्राप्त गजेंद्रा ॥ १३० ॥
अर्पावया हरीस जवळी । काहीं नाहीं हातातळीं ।
शोधितां सरोवरजळीं । कमळ ते काळीं सांपडलें ॥ १३१ ॥
शुंडादंडीं कमळप्राप्ती । उल्लास गजेंद्राचे चित्तीं ।
आक्रोशें स्मरावया श्रीपती । विकळगती वाचेंसीं ॥ १३२ ॥
प्राण होतां पैं विकळ । वाचा अतिशयें विव्हळ ।
तरी पशुजन्म प्रेमळ । स्मरणशीळ गजेंद्र ॥ १३३ ॥
कमळ उचलोनि ऊर्ध्वगती । गजेंद्र पाहे अति प्रीतीं ।
गरूडारूढ लक्ष्मीपती । शंख चक्र हातीं देखिला ॥ १३४ ॥
दोघां होतां दृष्टादृष्टी । प्रेम उलथलें पोटीं ।
सुखें कोंदली सृष्टी । आनंदकोटि उल्लास ॥ १३५ ॥
पूर्वीं वाचा अति विव्हळ । हरि देखतां निजात्ममूळ ।
अक्षरीं अक्षण अविकळ । वाचा सफळ अनुवादे ॥ १३६ ॥
अच्युत अव्यय अव्यक्त । व्यक्ताव्यक्तत्वें अनंत ।
स्वप्रकाशें अदोदित । अजन्मा नित्य अविनाशीं ॥ १३७ ॥
नराचें नित्य आयतन । यालागीं नांवे नारायण ।
जगद्‌गुरू जनार्दन । अनन्य नमन पैं माझें ॥ १३८ ॥
भूतां संसार निगुती । भूतां जन्ममरणप्राप्ती ।
विद्याअविद्यातीतगती । भगवन्मूर्तिं नमस्ते ॥ १३९ ॥
वैराग्य आणि ऐश्वर्य । अद्वैतज्ञान औदार्य ।
श्री अनुवादे यश:कार्य । तया नमस्कार भगवंता ॥ १४० ॥
ऐकतां गजेद्रांचें आर्तवचन । स्वयें गरूडासन सोडून ।
सरोवरीं उडी घालून । आला भगवान कृपाळु ॥ १४१ ॥
चक्रें हाणोनियां नक्र । चक्रधारें फोडिलें वक्त्र ।
मगरमिठी अति दुस्तर । नक्र गजेंद्र सोडीना ॥ १४२ ॥
लागतां श्रीहरीचें चक्र । रूधिरें न्हाला तो नक्र ।
तरी न सोडी गजेंद्र । दृढ वैर द्विजशापें ॥ १४३ ॥
बाप कृपाळु भगवंत । दोहीं तळीं घालोनि हात ।
जळाबाहेर अकस्मात । काढिलें त्वरित भगवंते ॥ १४४ ॥
लागतां भगवंताचा हात । दोघे जण अति उद्धत ।
तेही जाले शापोन्मुक्त । भाग्यवंत समभाग्यें ॥ १४५ ॥
विमानीं देखतीं सुरवर । भूतळीं पाहती ऋषीश्वर ।
गगनीं देखती खेचर । गजेंद्रनक्रउद्धरण ॥ १४६ ॥
भगवंतें कृपा करून । दोघें बाहेर आणून ।
गजेंद्रा विमानीं घालून । श्रीभगवान निघाला ॥ १४७ ॥

नक्राच्या प्रार्थनेवरून त्याचाही उद्धार

जातां देखोनि भगवंत । नक्र गदगदां हांसत ।
त्यासी श्रीहरि पुसत । हास्य किमर्थ तुज आलें ॥ १४८ ॥
सर्वां भूतीं हरि समान । गर्जती वेदशास्त्रपुराण ।
त्या तुजपाशीं विषमपण । आजि संपूर्ण देखिलें ॥ १४९ ॥
उद्धरिलें गजेंद्रातें । मज कां उपेक्षिलें येथें ।
याचि देखोनि विषमतेतें । अत्यद्‌भुत हासिंनलों ॥ १५० ॥
हरि स्वमुखें सांगे आपण । गजेंद्रे केलें माझे स्मरण ।
पापपुण्या निर्दळण । उद्धरण पावला ॥ १५१ ॥
तुझें जालिया दर्शन । माझें पाप नव्हे क्षीण ।
पापबळें म्यां आपण । श्रीभगवान जिंकिला ॥ १५२ ॥
तुझेनि नामें पाप निर्दळे । तुज देखिल्या पाप न ढळे ।
माझे पापभेणें हरि पळे । म्यां जिंकिलें गोविंदा ॥ १५३ ॥
सकळ पापांतें संहारी । यालागीं नांव म्हणिजे हरी ।
माझ्या पापांची त्याहूनि थोरी । तुज म्यां हरि जिंकिलें ॥ १५४ ॥
अति वक्रोक्ती नक्रवचन । ऐकोनि संतोषिला भगवान ।
तुझें पहावया निजज्ञान । उपेक्षण म्यां केले ॥ १५५ ॥
माझ्या दर्शनाची प्राप्ती । तुज जाली ज्ञानस्फूर्ती ।
ऐसें बोलोनि श्रीपती । नक्र गजपती भेटविला ॥ १५६ ॥
नक्रें धरिले गजाचे चरण । तुझें करितां चरणग्रहण ।
मज भेटिला श्रीभगवान । तुझेनि जाण गजेंद्रा ॥ १५७ ॥
गजें घातलें लोटांगण । तुवां धरिले माझे चरण ।
मज आठवला श्रीभगवान । मज उद्धरण तुझेनि ॥ १५८ ॥
येरयेरांचा उपकार । परस्परें मानिती थोर ।
श्रीहरि भेटला साचार । पूर्ववैर उपशमे ॥ १५९ ॥
आम्ही तुम्ही दोघे जण । पूर्वी सखे बंधु ब्राह्मण ।
धनलोभें शाप जाण । गजनक्रपण पावलों ॥ १६० ॥
त्याही वैराची उपशांती । आजि पावलों निश्चितीं ।
पूर्वापरवैरशांती । भगवन्मूर्ति भेटली ॥ १६१ ॥
श्रीहरिसमान समता । दोघे पावले स्वरूपता ।
त्याही स्वरूपाची व्यवस्था । यथार्थता अवधारीं ॥ १६२ ॥
श्यामराजीवलोचन । ठाणमाण गुणलक्षण ।
रूपरेखा समसमान । दोघे अनन्य हरिरूप ॥ १६३ ॥
शंख चक्र गदा पद्म । तिघे दिसती समान सम ।
मुख्य कोणता पुरूषोत्तम । देवां दुर्गम लक्षेना ॥ १६४ ॥
रमा देखोनि तिन्ही मूर्ती । म्हणे भजावें कोणाप्रती ।
ब्रह्मादिक विस्मित चित्तीं । मूळमूर्ति लक्षेना ॥ १६५ ॥
संतोषोनि श्रीभगवान । स्वरूपता दे संपूर्ण ।
नेदी श्रीवत्सलांछन । मज अधीन नाहीं म्हणे ॥ १६६ ॥
ब्राह्मणाची दुर्वाक्यता । ह्रदयीं साहिल्या म्यां लाता ।
तैं श्रीवत्स लाभे हाता । सत्यवाक्यता वेदार्थ ॥ १६७ ॥
ज्यासी श्रीवत्सलांछन । तोचि स्वामी श्रीभगवान ।
येर ते भक्त तत्समान । साधु सज्ञान लक्षिती ॥ १६८ ॥
भगवद्‌भक्त इंद्रद्युम्न । त्याचें करितां उद्धरण ।
धरितां भक्ताचे चरण । उद्धरण नक्रासी ॥ १६९ ॥
भक्तसंगती जे जे लागत । ते ते तारी श्रीभगवंत ।
ऐसें गर्जे भागवत । तें पद प्राप्त नक्रासी ॥ १७० ॥
कृपाळु श्रीभगवंत । उद्धरिले निजभक्त ।
अवघे जयजयकार करित । सुर वर्षती दिव्य सुमनें ॥ १७१ ॥

गरूड अतिवेगाने येताच त्याच्या
क्षुधानिवारणासाठी त्या दोघांचे देह त्याला दिले

तंव गरूड धांपा देत । वेगें येतां त्वरान्वित ।
पुढें देखतां श्रीभगवंत । लज्जान्वित तो जाला ॥ १७२ ॥
मज न पुसतां श्रीपती । पुढें गेलासी कैसे रीती ।
गरूडा तुझी देखोनि मंद गती । गजेंद्रार्थी धांविन्नलो ॥ १७३ ॥
ऐकोनि श्रीस्वामींचे वचन । गरूड झाला लज्जायमान ।
मग घालोनि लोटांगण । धरिले चरण हरीचे ॥ १७४ ॥
आमच्या गतीची तूं गती आमच्या शक्तीची तूं शक्ती ।
आमचे मतीची तूं मती । कृपामूर्ति श्रीकृष्णा ॥ १७५ ॥
मज येतां त्वरायुक्त । क्षुधेनें पीडिलो बहुत ।
तूं तंव कृपाळु श्रीभगवंत । कांही आहारार्थ मज देईं ॥ १७६ ॥
श्रीहरि सांगे कृपा करून । गजनक्रदेह गहन ।
माझेनि हातें अति पावन । करीं भक्षण आहारार्थ ॥ १७७ ॥

इतक्यात भ्रूमंग पक्ष्याने दोन्ही प्रेते पकडली :

गरूड जंव आला तेथ । तंव देखिलें विपरीत ।
भ्रूमंगपक्षी आहारार्थ । सवेग धरित ते दोन्ही ॥ १७८ ॥
भ्रूमंगपक्षी भ्रमे गगनीं । गजेंद्र नक्र एकत्र दोनी ।
तेणें देखेतांचि नयनीं । झडप मारोनी धरियेले ॥ १७९ ॥
भ्रूमंगें धरितां तें दोन्ही । ताराक्ष देखे दुरूनी ।
गरूड येतांचि तळपोनी । भ्रूमंग धरोनि उडाला ॥ १८० ॥
तळीं गजेंद्र त्यावरी नक्र । भ्रूमंगपक्षी त्याहूनि थोर ।
गरूडें उचलितां सत्वर । माळा विचित्र परिलंबे ॥ १८१ ॥
गरूड भिडतां भ्रूमंगासी । तेणें सोडिलें गजनक्रांसी ।
गरूडें धरिलें नखाग्रेंसीं । घेवोनि तिघांसी उडाला ॥ १८२ ॥

गरूडाने तिघांना धरून उड्डाण केले :

मुखीं धरोनि भ्रूमंगासी । नखाग्रीं गजनक्रांसी ।
गरूड पाहे स्वस्थानासी । स्वयें आहारासी सेवावया ॥ १८३ ॥
येतां देखोनि गरूडासी । उल्हास कनकजांबूसी ।
स्वयें बोले आल्हादेंसी । खगेश्वरासीं तें ऐका ॥ १८४ ॥
हरिहस्तें गज नक्र पुनीत । गरूड केवल भगवद्‌भक्त ।
यांचा स्पर्श जालिया येथ । मी नित्य मुक्त होईन ॥ १८५ ॥
गजेंद्र भक्ताचें संगती । घातकी नक्र पावला मुक्ती ।
मीही याचिये संगतीं । नित्य मुक्ती पावेन ॥ १८६ ॥
जे जे लागले सत्संगतीं । ते ते नित्य पावले मुक्ती ।
कनकजांबू तदर्थी । गरूडाप्रती विनवित ॥ १८७ ॥

कनकजांबूच्या विनंतीने गरूडाचे शाखारोहण :

शत योजन विस्तार । माझी शाखा अत्यंत थोर ।
तेथें बैसोनि खगेश्वर । करीं आहार तिहींचा ॥ १८८ ॥
गरूड क्षुधेनें पीडिला । तिहींसी उडतां भागला ।
ऐकोनि कनकजांबूचे बोला । स्वयें बैसला शाखेंसीं ॥ १८९ ॥
गरूड पाहे तो तरूवर । जैसा कां मेरू गिरिवर ।
भोंवत्या शाखा शतसहस्त्र । योजनविस्तार शतसंख्या ॥ १९० ॥
पक्षियांची नीडें तयावरी । शतसहस्त्र लक्षांतरीं ।
फळपुष्पित संभारीं । तरूवरी विश्रांती ॥ १९१ ॥
पहावया गरूडाची थोरी । वालखिल्य साठी सहस्त्री ।
गुप्त पावले शाखांतरी । गरूड जीवरी बैसला ॥ १९२ ॥

तो बैसल्याबरोबर ती शाखा कडाडली :

गरूड बैसतांचि तेथ । शाखा मोडली कडकडीत ।
गरूड पाहे साशंकित । ऋषी लोंबत शाखेंसीं ॥ १९३ ॥

त्या शाखेवरील साठ सहस्त्र वालखिल्य ऋषींना
पीडा होऊ नये म्हणून गरूडाचे अधांतरीच राहणे

ऋषी लोंबती अधोमुख । शाखा सांडो नये देख ।
ऋषी पावतांचि दुःख । थोर नरक पावोन ॥ १९४ ॥
शाखा धरोनि वामचरणीं । गज नक्र दक्षिणचरणीं ।
मुखीं भ्रूमंगा धरोनी । गेला उडोनी आकाशीं ॥ १९५ ॥
शाखा शतयोजनविस्तार । साठी सहस्त्र ऋषीश्वर ।
दक्षिणचरणीं गजनक्र । मुखीं महाथोर भ्रूभंग ॥ १९६ ॥
सतुकेनसीं समवेत । गरूड आकाशी भ्रमत ।
बैसों न लाहे यथास्वस्थ । ऋषी समवेत दुखवती ॥ १९७ ॥
मज बैसतांचि तळीं । भारें ऋषींची होय रांगोळी ।
येणे धाकें महाबळी । नभोमंडळी भ्रमतसे ॥ १९८ ॥
घेवो न लाहे आहातांतें । बैसों न लाहे स्वस्थचित्तें ।
परम संकट गरूडातें । तेणें श्रीहरीतें स्मरत ॥ १९९ ॥
थोर पावलों आकांता । वेगीं पाव गा भगवंता ।
काय म्यां करावें आतां । अनाथनाथा उद्धरीं ॥ २०० ॥
जोहरीं रक्षिलें पांडवांसी । नग्न करितां द्रौपदीसी ।
पितयानें गांजितां प्रह्लादासी । तेंवी मजपासीं पावावें ॥ २०१ ॥

गरूडाचे प्रभूचा धावा केल्यावर काश्यप ऋषींचे दर्शन :

आतां उद्धरिलें गजेंद्रासी । तो तूं मज विसरलासी ।
उडी घालावया वेग तुजपासीं । कां रूसलासी गोविंदा ॥ २०२ ॥
जना सबाह्य जनार्दन । तुझें नांव जगज्जीवन ।
मी तुझें अनाथदीन । माझें विघ्न निवारीं ॥ २०३ ॥
गरूड श्रीहरीचा परम भक्त । तोही आनंदें नाम स्मरत ।
नामापासीं भगवंत । आहे डुल्लत स्वानंदे ॥ २०४ ॥
करितां हरिनामस्मरण । स्वयें विघ्न होय निर्विघ्न ।
गरूड पावला समाधान । तेंही विंदाण अवधारा ॥ २०५ ॥
गरूड भ्रमतां आकाशीं । भगवंताची कृपा कैसी ।
देखिलें पित्या काश्यपासी । तेजोराशी तपस्वी ॥ २०६ ॥

कश्यपांच्या विनंतीवरून वालखिल्यऋषी फांदी सोडून बदरीला निघून गेले

गन्धमादनपर्वतांत । कश्यप पिता तप आचरत ।
नभींहून देखिला अकस्मात । आला त्वरित त्यापासीं ॥ २०७ ॥
येतां देखोनि गरूडासी । वृत्तांत कळला कश्यपासी ।
देखोनि वालखिल्य ऋषी । कश्यप त्यांसी प्रार्थित ॥ २०८ ॥
घालोनियां लोटागंण । कश्यप विनवी कर जोडोन ।
गरूड माझें अपत्य दीन । कृपा करोन सोडावें ॥ २०९ ॥
गरूडाचें मनोगत । आणूनियां परमामृत ।
माता करावी निर्मुक्त । तदर्थीं सामर्थ्य तुम्हीं द्यावें ॥ २१० ॥
तुज करितां अनुष्ठान । नाहीं याचें सामर्थ्यज्ञान ।
येणें माता मुक्त करून । झाला वहन विष्णूचें ॥ २११ ॥
पहावया गरूडाचें सामर्थ्य । शाखेंसीं बैसलों समस्त ।
तंव हा बळिया बळवंत । विजयी निश्चित तिहीं लोकीं ॥ २१२ ॥
करोनि कश्यपासी नमन । देवोनि गरूडासी आशीर्वचन ।
वालखिल्यीं शाखा सोडोन । गेले तपोधन बदरीसी ॥ २१३ ॥
गेले वालखिल्य देखोन । गरूड पावला समाधान ।
करोनि पितयासी नमन । पुसे आपण ते ऐका ॥ २१४ ॥

गरूडाच्या विनंतीवरून कश्यपांनी सुचविल्याप्रमाणे
सुवर्णशाखा लंकेच्या पठारावर ठेविली

गरूड लोटांगण घाली । थोर जाजावलों वालखिल्यीं ।
मुक्त जालों तुझे बोलीं । शाखा आणिली ऋशिबाधें ॥ २१५ ॥
कनकजांबुशाखा सधर । शतयोजनें सविस्तार ।
इशीं सांडावया कोण थार । कोठें आहार म्यां घ्यावा ॥ २१६ ॥
देखोनियां कनकजांबूसी । ब्राह्मण धांवती छळावयासी ।
धनलोभे बहु द्विजांसी । बळ ब्राह्मणांसी चालेना ॥ २१७ ॥
जेथ न पावती ब्राह्मण । सांगावें जी तें कोण स्थान ।
तेथें शाखा निक्षेपून । करीं भोजन क्षुधार्थी ॥ २१८ ॥
क्षुधित ऐकोनि गरूडासी । कृपा उपजली कश्यपासीं ।
दुर्गम स्थान सांगे त्यासी । अगम्य सर्वांसी मनोवाचा ॥ २१९ ॥
दक्षिणसमुद्रामाझारीं । सुनाभि पर्वत लंकागिरी ।
शाखा ठेवोनि त्यावरी । भोजन करीं सुपुत्रा ॥ २२० ॥
ऐकोन कश्यपाचें वचन । स्वयें सुवर्णशाखा घेऊन ।
गज नक्र भ्रूभंगेंसी उडोन । आला आपण लंकेसीं ॥ २२१ ॥
लंकापाठार निरर्जन । सुवर्णशाखा तेथ ठेवून ।
गरूडें केलें पैं भोजन । सावधान हरिस्मरणे ॥ २२२ ॥
करिता भ्रूभंगभक्षण । ग्रासोग्रासीं कृष्णार्पण ।
करी नक्राचें भोजन । ब्रह्मार्पण स्मरणेंसीं ॥ २२३ ॥
भक्षितां त्या गजेंद्रासी । भोक्ता म्हणे ह्रषीकेशी ।
भक्त सेवी त्या त्या अर्थासी । हरिस्मरणेंसीं सावध ॥ २२४ ॥
गरूड पिडला क्षुधेसीं । भोजन करितां ये विधीसीं ।
पावला परम तृप्तीसीं । अल्हादेंसीं हरिस्मरणें ॥ २२५ ॥
फळ मूळ आणि जीवन । जें भक्त सेविती आपण ।
तें तें करिती ब्रह्मार्पण । तृप्ती संपूर्ण तेणें त्यांसी । २२६ ॥
अन्न ब्रह्म अहं ब्रह्म । ह्रदयीं भोक्ता आत्माराम ।
त्याचें कर्मचि परब्रह्म । हें जाणती मर्म ते धन्य ॥ २२७ ॥
भोजन करितां ऐसिये पंक्ती । आसहस्त्राची पंक्ती पुनाति ।
ऐसें बोलती वेदश्रुती । सभाग्या पंक्ती हरिभक्त ॥ २२८ ॥
ग्रासोग्रासीं हरिस्मरण । ऐसें जे करिती भोजन ।
तेथ भोक्त श्रीभगवान । भोक्तेपण त्या नाहीं ॥ २२९ ॥
ऐसिये भोजनप्रयुक्तीं । गरूडासी जाली परम तृप्ती ।
तेणें घ्यावया विश्रांती । केली आइती ते अवधारा ॥ २३० ॥
भारेंसीं भ्रमतां अतराळीं । गरूड भागला महाबळी ।
तेणें पावोनि पाखांतळी । केली ते वेळीं निजनिद्रा ॥ २३१ ॥
ऐसी घेऊनि विश्रांती । गरूड कैसा गेला शीघ्रगती ।
भगवद्‌भक्तपदप्रयुक्ती । भाग्यप्राप्ती लंकेसीं ॥ २३२ ॥
गरूडाचीं नखें स्पष्ट । लंकेसी रूतलीं तिखट ।
पडतां पर्जन्याचें वाहावाट । जालें त्रिकूट अति थोर ॥ २३३ ॥

कुबेराकरिता लंका शहराची निर्मिती :

कुबेराची अलकावती । रावणें हिरोनि घेतां वस्ती ।
त्यासी वारोनि प्रजापती । लंकापति तो केला ॥ २३४ ॥
विश्वकर्म्यातें घेऊन । स्वयें येवोनि चतुरानन ।
निर्माण केलें लंकाभुवन । दुर्ग दारूण दुर्गम ॥ २३५ ॥
विश्वकर्म्यानें झाडोनि कडे । त्रिकूट सज्ज केलें गाढें ।
लाग न लगे मागेंपुढें । चहूंकडे दुर्धर ॥ २३६ ॥
पडलंका मागिलीकडे । सुवेळा शोभे लंकेपुढें ।
निकुंबळागडे अवघडे । दक्षिणेकडे दुर्गम ॥ २३७ ॥
तया लंकेच्या शिखरीं । कनकशाखा होती वरी ।
आगी लावितां पुच्छेंकरीं । शाखा एकसरीं रस जाली ॥ २३८ ॥
हनुमंतें जाळिली लंका । सुवर्णाची ओतिली देखा ।
भगवद्‌भक्ताचा आवांका । दुःखदायका सुखरूप ॥ २३९ ॥
शाखा बहुकाळ पडली राहे । शेवाळली खडकप्राये ।
तेणें उपेक्षिली जाये । लक्षा न ये कोणासी ॥ २४० ॥

हनुमंताच्या लंकादहनात सुवर्णशाखेच्या दहनाने लंका सुवर्णमय झाली

मरूत मारूत प्रळयवन्ही । लंका जाळितां तिघीं जणीं ।
शाखा ओतिली रस होउनी । लंकाभुवनीं हेममय ॥ २४१ ॥
हनुमंत जाळितां देखा । हेममय ओतली शाखा ।
तैपासोनि सुवर्णलंका । समस्त लोंकां अनुवाद ॥ २४२ ॥
कपीनें करितां लंकादहन । लंका जाली सुवर्णवर्ण ।
मग सीतेपासीं येऊन । केलें नमन साष्टांगीं ॥ २४३ ॥
नमस्कार मरोनि सीतेसी । शीघ्र भेटावया श्रीरामासी ।
हनुमान आज्ञा पुसे तिसीं । अति त्वरेंसीं जावया ॥ २४४ ॥
भेटावया निजस्वामीसी । स्फुरण आलें हनुमंतासी ।
बाहु थरकती उल्लासीं । तळपे आकाशीं कपिपुच्छ ॥ २४५ ॥
मनें कवळिलें श्रीरामासी । श्रद्धा सीतेच्या पायापासीं ।
आज्ञा पुसावया तियेसी । एकाग्रतेंसीं तिष्ठत ॥ २४६ ॥
ऐसें देखोनि हनुमंता । उल्लास जानकीचे चित्ता ।
मारावया लंकानाथा । शीघ्र रघुनाथा आणावें ॥ २४७ ॥
ऐक हनुमंता सावधान । तुज मी देतें आशीर्वचन ।
मार्गीं बांधूं न शके विघ्न । राम चिद्धन पावसी ॥ २४८ ॥
ऐकोनि सीतेंचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
वंदोनि सीतेचे चरण । केलें उड्डाण वानरे ॥ २४९ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतासी श्रीरामदर्शन ।
तेथील गोड निरूपण । सावधान अवधारा ॥ २५० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
गजेंद्रोद्धरणंहनुमन्श्रीरामदर्शनागमनं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥ २२ ॥
॥ ओव्यां २५० ॥ श्लोक २७ ॥ एवं संख्या २७७ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara