संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा

हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मणाकडून पुढील वर्णनाचे वाचन

श्रीराम होवोनि सावचित । लक्ष्मणासीं स्वयें सांगत ।
पुढारां वाचीं ब्रह्मलिखित । अनुचरित कपीचें ॥ १ ॥
राक्षसदांतांचिया रासी । पाडोनि केलिया रणभूमीसीं ।
पुढें काय केलें लंकेसीं । तें मजपासी परिसवीं ॥ २ ॥
ऐकोनि श्रीरामाची गोष्टी । सुग्रीवासी आल्हाद पोटीं ।
हर्षल्या वानरांच्या कोटी । कथाकसवटी ऐकावया ॥ ३ ॥
वानरांच्या निजकोडी । सभा बैसली परवडी ।
हनुमंताची प्रतापप्रौढी । अति आवडीं ऐकावया ॥ ४ ॥
हनुमंताची प्रतापकीर्ती । वाचितां लक्ष्मणा परम प्रीती ।
अनुलक्षोनि श्रीराममूर्ती । पत्र प्रयुक्ती वाचित ॥ ५ ॥

इंद्रजिताचा पाडाव करून हनुमंत आपली शेपटी आवरून बसला

झाडोनि इंद्रजिताचा पादाडा । करोनि सैन्याचा नितोडा ।
काढोनि कपिपुच्छाचा वेढा । हनुमान गाढा बैसला ॥ ६ ॥
पुढती करावया रण । कोण कोण धाडी रावण ।
त्यांचें करावया निर्दळण । सावधान बैसला ॥ ७ ॥

त्याचे उरलेले सैन्य रावणला सर्व वृत्त निवेदन करते

गेला देखोनि हनुमंत । मीस करून वीर समस्त ।
आणिक घायाळ कुंथत । नगराआंत निघालें ॥ ८ ॥
वीरीं घेतलें घायवारें । रावणाचे सभेमाझारें ।
म्हणती पळा रें पळा रे । रणीं वानरें मारिजेल ॥ ९ ॥
रावण बापुडें तें किती । युद्धी नाटोपे मारूती ।
सेनानी सैन्य नेलें भस्मांतीं । करील शांति लंकेची ॥ १० ॥
समस्त सैन्या केली बोहरी । बोंब सुटली घरोघरीं ।
कळकळती नगरनारी । लंकापुरी आकांत ॥ ११ ॥
समरीं रावणाची थोरी । चोरोनियां परनारी ।
केली राक्षसांची बोहरी । महामारी वानरें ॥ १२ ॥
रणीं रावण मरता । लंकालोक स्वस्थ होता ।
करविलें इंद्रजिताच्या घाता । रणीं हनुमंता खवळोनी ॥ १३ ॥
करितां अखयाचा कैवार । रणीं मारविला ज्येष्ठ कुमर ।
बोंब करितां निशाचर । दशवक्त्रा हडबडिला ॥ १४ ॥

इंद्रजिताचा ठाव नसल्याने त्याविषयी मनात कुशंका

इंद्रजित मेला किंवा जीत । कोणी न सांगती मात ।
तेणें गजबजिला लंकानाथ । केला रणघात वानरें ॥ १५ ॥
इंद्रजित मारिला रणीं । तरीच मारिल्या वीरश्रेणीं ।
तो जरी असता सावधानी । कपि कैसेनि मारिता ॥ १६ ॥
शोधूं जावें जरी रणासीं । राक्षस भिती कपिपुच्छासीं ।
भूतीं भक्षिलें प्रेतांसी । तेथें कायसी ओळखी ॥ १७ ॥

रावणाचा शोक व ब्रह्मदेवास पाचारण

रणी निमाला ज्येष्ठ सुत । रावण मुखीं धूळ घालित ।
दाही मुखी शंख करीत । आक्रंदत अति दुःखें ॥ १८ ॥
दुःखें गडबडां लोळे । केश सुटले मोकळे ।
अश्रु स्त्रवतीं विशंती लोळे । पिटी कपालें अति दुःखे ॥ १९ ॥
इंद्रजिताचा केला घात । रणीं नाटोपे हनुमंत ।
वानरीं न चले पुरूषार्थ । लंकानाथ अति दुःखी ॥ २० ॥
ब्रह्मयानें सांगितलें मजपासीं । गळां बांधोनि वानरासी ।
इंद्रजित आणील तुजपासीं । असत्य त्यासी केंवी आलें ॥ २१ ॥
पाचारोनि चतुरानन । त्यासी पुसे दशानन ।
इंद्रजित आणील कपि बांधोन । तें तूं वचन करी सत्य ॥ २२ ॥

व त्याचें वचन सत्य करण्याचा आग्रह :

आम्हीं तंव तुझी संतती । तुझेंनि वरदें दाटुगे क्षिती ।
मज भेटवीं पुत्रसंतती । चरण तदर्थीं वंदिले ॥ २३ ॥
इंद्रजिताच्या निजवृत्तांता । तुझेनि नाणवे गा दूता ।
करितो कपि राक्षसघाता । त्यासी सर्वथा न वंचवे ॥ २४ ॥
मीच जावोनि अशोकवना । इंद्रजिताची विवंचना ।
समूळ जाणोनियां मना । मग दशानना सांगेन ॥ २५ ॥
इंद्रजित मेला किंवा जीत । ग्लानीं पुसें लंकानाथ ।
वानरें गांजिला अत्यद्‌भुत । आहे तो गुप्त म्हणे ब्रह्मा ॥ २६ ॥

ब्रह्मदेव मारूतीला भेटून त्याला पाशबद्ध होण्यास सांगतो

ऐसें सांगोनि लंकापती । वना आला प्रजापती ।
ब्रह्मा देखोनि मारूती । घातलें क्षितीं लोटांगण ॥ २७ ॥
कपि पुसे ब्रह्मयाप्रती । ऐसीं आवडी आहे चित्तीं ।
तुकोनि रावणाची शक्ती । करावी ख्याती लंकेसीं ॥ २८ ॥
ब्रह्मा सांगे हनुमंतासी । इंद्रजित तुझेनि भयेंसीं ।
लपालासें विवर प्रदेशीं । मी त्यापासीं जातसें ॥ २९ ॥

राक्षसाच्या हातून केव्हाही बांधला जाणार नाही असे मारूतीचे स्पष्ट उत्तर

इंद्रजिताचें करसंपुटीं । ब्रह्मपाश मानोनि कंठीं ।
यावें रावणाचे भेटी । लंकात्रिकूटीं कंदनार्थ ॥ ३० ॥
कपि म्हणे इंद्रजिताचे हातें । सर्वथा न मानीं पाशबंधातें ।
ब्रह्मदेवा तुझेनि हातें । ब्रह्मबंधातें मानीन ॥ ३१ ॥

इंद्रजिताला स्वतः व रावणाविषयी चिंता

ब्रह्मा म्हणे ऐसेंचि घडे । माझेनि हातें वाडेकोडें ।
हनुमंत पाशबंधनीं पडे । रावणापुढे न्यावया ॥ ३२ ॥
रणीं वानरा देवोनि पाठी । पळतां विवरा संकटीं ।
इंद्रजितासीं चिंता मोठी । लागली पोटीं धुकधुक ॥ ३३ ॥
रणीं गांजिलें माकडें । काय मुख दावूं रावणापुढें ।
इंद्रजित खळखळां रडे । अति सांकडें ओढवले ॥ ३४ ॥
रणीं मज येतें मरण । तरी पावतों कृतकल्याण ।
वांचल्याचें फळ कोण । काळें वदन तिहीं लोकीं ॥ ३५ ॥
इंद्रजित नावाची हे ख्याती । तिहीं लोकी माझी किर्ती ।
कीर्ती तेचि झाली अपकीर्ती । रणीं मारूती नाटोपे ॥ ३६ ॥
कपि केवळ पालेखाइर । आम्ही निधडे महावीर ।
रणीं न जिंकवे वानर । लज्जा थोर मज माझी ॥ ३७ ॥
काळें वदन लज्जानुवृत्तीं । मरण न ये मज वरदोक्ती ।
इंद्रजित पडतां चिंतावर्तीं । तंव ब्रह्मोक्ती आठवली ॥ ३८ ॥

ब्रह्मदेवाचे स्मरण व आगमन :

गळां बांधोनि मारूती । इंद्रजित आणील लंकेप्रती ।
स्वमुखें बोलिला प्रजापती । तो मज प्रत्यय यावा कीं ॥ ३९ ॥
पाचारावया चतुरानन । रणीं नुरेचि सेवकजन ।
माझा वांचलासे प्राण । विवरीं दडोन राहिलों ॥ ४० ॥
धाडावया नाहीं सेवकजन । बाहेर निघतां आपण ।
रोकडें कपिपुच्छें मरण । करी रूदन इंद्रजित ॥ ४१ ॥

इंद्रजित ब्रह्मदेव संवाद :

माझे पित्याच्या पित्याचा पिता । कैसेनि भेटेल विधाता ।
ऐसी इंद्रजित करी चिंता । तंव आला अवचिताळ परमेष्टी ॥ ४२ ॥
डोळां देखतांच परमेष्टी । इंद्रजित धीर धरी पोटीं ।
समूळ सांगे युद्धगोष्टी । केलें कष्टी वानरें ॥ ४३ ॥
रणीं गांजिलो मारुती । तो बांधवे माझे हातीं ।
ऐसी स्वामीची पूर्वोक्ती । कृपामूर्ति सत्य कीजे ॥ ४४ ॥
असत्य नव्हे ब्रह्मवचन । नारदें सांगितलें आपण ।
कपीसी ब्रह्मपाशबंधन । कृपा करोन मज द्यावें ॥ ४५ ॥

त्या ब्रह्मपाशात मारुती बांधला जाईना

मज दिधल्या पाशबंधन । तेव्हां रणरंगीं गर्जोन ।
ब्रह्मपाशीं कपि बांधोन । मग श्लाघेन वाटिवा ॥ ४६ ॥

इंद्रजिताने फेललेला पाश मारूती झुगारतो

विरिंचि देतां पाशबंधन । इंद्रजित मोकली कपि लक्षोन ।
वानरासी ब्रह्मपाशबंधन । सर्वथा जाण बांधीना ॥ ४७ ॥
हरिवरदान हरवरदान । बांधूं न शके ब्रह्मबंधन ।
पाश गेले पैं तुटोन । निर्बंधन मारूती ॥ ४८ ॥
पाशाचिया अनुवृत्तीं । रणीं खवळला मारूती ।
मरण मज असेल पुढती । इंद्रजिताचे चित्तीं चळकांप ॥ ४९ ॥
इंद्रजितें ब्रह्मपाश घालिता । ते न लगती हनुमंता ।
माझा रणधर्म गेला वृथा । जघन्यता मज आली ॥ ५० ॥
माझी अस्त्रशक्ती शस्त्रशक्ती । ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती ।
अवघी वृथा केली मारूतीं । राक्षसपंक्ती केवी चाले ॥ ५१ ॥
ब्रह्मपाश वृथा जाय । आणीक अस्त्रें करिती काय ।
वानरीं न चालती उपाय । आला अपाय राक्षसां ॥ ५२ ॥
ब्रह्मयाने दिधली खोटी शक्ती । यालागीं न धरवे मारूती ।
इंद्रजित कोपला ब्रह्मयाप्रती । तुझी दुष्टमति आम्हांवरी ॥ ५३ ॥
रावणें विभागिलें वेदांसीं । त्याचा राग तुझी मानसीं ।
निर्दाळावया राक्षसांसीं । बुद्धि सांगसी हनुमंता ॥ ५४ ॥
तूं आमुची मूळमूर्ती । आम्ही तुझी ब्रह्मसंतती ।
आम्हांसी देवोनि खोटी शक्ती । कपिहातीं मारविसी ॥ ५५ ॥।

ब्रह्मदेवाचा इंद्रजितावर दोषारोप :

ब्रह्मा म्हणे तूं विकल्पमूर्तीं । ब्रह्मद्वेषीं ब्रह्मघाती ।
तुझी नातळे ब्रह्मशक्ती । केंवी मारूती बांधवें ॥ ५६ ॥
ब्रह्मानुवादाचें उत्तर । गळां बांधोनि वानर ।
इंद्रजित आणील महावीर । तें साचार करीं वाक्य ॥ ५७ ॥
ब्रह्मा म्हणे इंद्रजिताप्रती । माझे पाश दे मज हातीं ।
गळां बांधोन देईन मारूती । लंकेप्रती न्यावया ॥ ५८ ॥
इंद्रजित म्हणे ब्रह्मयासी । म्यां मोकलिलें ब्रह्मपाशासीं ।
हनुमंतें बांधोनि राखिलें पुच्छीं । म्यां तुम्हांसी काय द्यावें ॥ ५९ ॥

ब्रह्मदेव मारूतीला विनवून पाशबद्ध करितो

ऐकोनि इंद्रजिताचें वचन । ब्रह्मा जाला हास्यवदन ।
कपीस ब्रह्मपाशबंधन केलें । विंदान तें ऐका ॥ ६० ॥
ब्रह्मा सांगे गा हनुमंता । तुज न लागे पाशबंधता ।
माझ्या सत्यवचनार्था । ब्रह्मपाशता मानावी ॥ ६१ ॥
एकोनि ब्रह्मयाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
तुझेनि बोलें देईन प्राण । पाशबंधन तें किती ॥ ६२ ॥
ऐसें बोलोनि हनुमंत । पाशबंधनीं पडे मूर्च्छागत ।
धरणीवरी निश्चेष्टित । धुकधुकीत भयभीत ॥ ६३ ॥
ब्रह्मपाशीं हनुमंत । पडिला देखोनि निश्चेष्टित ।
परी तो बंधमोक्षातीत । नित्य निर्मुक्त श्रीरामें ॥ ६४ ॥

ते पाहून राक्षसांना आनंद व मारूतीवर सर्वांचे प्रहार

जेंवी रवि थिल्लरांत । मूर्ख मानिती थिल्लरस्थ ।
तेंवी कपि ब्रह्मपाशांत । बांधिला हनुमंत राक्षसीं ॥ ६५ ॥
हनुमान बांधिला ब्रह्मपाशांत । विजयी वीर इंद्रजित ।
निशाणें त्राहाटिलीं लंकेआंत । लंकानाथ आल्हादे ॥ ६६ ॥
ब्रह्मयानें बांधिला हनुमंत । परी ब्रह्मबंधासीं अतीत ।
देखोनि धाकें इंद्रजित । करील अनर्थ लंकेसीं ॥ ६७ ॥
क्षितितळी निचेष्टित । पडिला देखोनि हनुमंत ।
राक्षस धांवोनि समस्त । त्यासी बांधीत वेलवाखीं ॥ ६८ ॥
एक बांधितीं चर्‍हाटें । साली बांधिती वृक्षफांटे ।
देखोनि हांसिजे मर्कटें । बंधन खोटें मजलागीं ॥ ६९ ॥
जो न बांधवे ब्रह्मपाशीं । तो केंवी बांधवे चर्‍हाटेंसीं ।
बंधनमिसें जातों लंकेसी । रावणासी गांजावया ॥ ७० ॥
आम्हांसी गांजिलें अशोकवनीं । रावणा गांजील लंकाभुवनीं ।
परम चिंता इंद्रजिताचे मनीं । अपेश जनीं मज आलें ॥ ७१ ॥
इंद्रजितें हनुमंत । बांधोनि आणिला लंकेआंत ।
हे अवघीच मिथ्या मात । जातो अनर्थ करावया ॥ ७२ ॥
जें ब्रह्मयानें सांगितलें कानीं । तेंचि हनुमंतें धरोनि मनीं ।
प्रवेशला लंकाभुवनीं । इंद्रजित मनीं भयभीत ॥ ७३ ॥
वानर पालेखाइर । त्याचा इंद्रजितासी धाक थोर ।
आम्ही निधडे निशाचर । क्षणें कपींद्र मारूं या ॥ ७४ ॥
म्हणोनि बांधिती रज्जुबंधनीं । एक बांधिती वाख वळोनी ।
एक बांधिती मुंजी चिरोनी । कपि बांधोनि आणिती ॥ ७५ ॥
पूर्वपश्चिमउत्तरेसीं । एक ओढिती दक्षेणेंसीं ।
हनुमाना करिती कासाविसी । कपि मानसीं हांसत ॥ ७६ ॥

हनुमंताचे पुढीळ कार्याविषयी विचार

राक्षसें केवळ वेडीं । व्यर्थ करिती ओढाओढी ।
लंका करीन कडाफोडी । पाडीन दरडी दुर्गाच्या ॥ ७७ ॥
मज नेलिया दुर्गाआंत । महावीरां करीन घात ।
मुख्य गांजीन लंकानाथ । दहनार्थ लंकेसीं ॥ ७८ ॥
कपि बांधिला महाबळी । म्हणोनि राक्षसीं पिटिली टाळी ।
गुढी आणिली रायाजवळी । सभामंडळीं लंकेच्या ॥ ७९ ॥
वज्रदेही हनुमंत । बुकी हाणी तो पडे मूर्च्छित ।
मुसळघायें उखळें हात । वीर मूर्च्छित कपिघातें ॥ ८० ॥

रावणासमोर नेल्यावर त्याचा क्रोध :

इंद्रजितासीं समवेत । हनुमान नेतां लंकेआंत ।
ब्रह्मा स्वमुखें मंत्र जपत । विपरीतार्थ तो ऐका ॥ ८१ ॥
गृहा वै प्रतिष्ठा हें सूक्त । ब्रह्मा स्वमुखें गडगर्जत ।
रामराज्य लंकेआंत । हनुमंतप्रवेशें ॥ ८२ ॥
रावणें देखोनि वानरा । दांत खाय करकरां ।
जिवें मारिलें अखयाकुमरा । यासी करा तिळखंड ॥ ८३ ॥
सकळ सैन्य समसगट । शस्त्रें हाणिती कडकडाट ।
लागतां शस्त्रें होती पीठ । ह्रदयस्फोट राक्षसां ॥ ८४ ॥
एकाचे उखळले हात । वीरीं विचकिलें पैं दांत ।
धापां दाटले समस्त । पडिले मूर्च्छित एकैक ॥ ८५ ॥
हनुमान रामनाम जपत । ससैन्य शस्त्रें हताहत ।
तें देखोनि लंकानाथ । कोपें कृतांत पैं जाहला ॥ ८६ ॥

रावणाचा खड्गप्रहार निष्फळ :

रावणें खड्गा घातला हात । बळें हाणितां हनुमंत ।
झणाणिला लंकानाथ । शस्त्रें हात लचकला ॥ ८७ ॥
धावो हाणितां प्रचंड । दणाणिलें त्याचें ब्रह्मांड ।
सरलें रावणाचें बळबंड । खालतें तोंड तेणें केलें ॥ ८८ ॥
घावो न मानीच हनुमंत । रावण चिंताग्रस्त ।
हनुमान गदगदां हांसत । व्यर्थ पुरूषार्थ रावणा ॥ ८९ ॥

त्यामुळे मारूतीकडून रावणाचा धिक्कार :

राक्षसघायांचा समेळ । ढेकणाऐसी त्याची बुळबुळ ।
तुझा घावो अति निर्बळ । जैसी पेळ कापसाची ॥ ९० ॥
सावध केलें लंकानाथा । तुझा मज थोर भ्रम होता ।
घावो हाणोनि आतां । केला वृथा पुरूषार्थ ॥ ९१ ॥
तुझ्या घायाच्या समेळीं । माझी न तुटे रोमावळी ।
श्रीरामासीं रणकल्लोळीं । घेसी फळी कैसेनि ॥ ९२ ॥
स्वयंवरीं वाहतां हरकोदंड । तेव्हां जालें काळें तोंड ।
तें श्रीरामें केलें दुखंड । युद्ध प्रचंड केंवी त्यासी ॥ ९३ ॥
तुझें शुभ चिन्ह कळलें आतां । स्वयें जालासी भीक मागता ।
भिकेमाजीही कपटता । श्रीरामकांता चोरिली ॥ ९४ ॥
गृहस्थाची जे पत्‍नी । ती भिक्षुकाची निजजननी ।
तूं तंव केवळ मातृगमनीं । सीतावरणीं उद्यत ॥ ९५ ॥
भिक्षा दे वो म्हणसी माते । शेखीं अभिलाषिसी सीते ।
महापापी तूं सर्वार्थें । संनिपातें घेतलासी ॥ ९६ ॥
बाप होणाराची थोरी । राजत्व सांडोनियां दूरी ।
झोळी घेवोनियां करीं । स्वयें भिकारी जालासी ॥ ९७ ॥
स्वयें होतांचि भिकारी । राजत्वपदवी पळे दूरी ।
जळों तें वेदभाष्य तुझी थोरी । परनारी चोरिसी ॥ ९८ ॥

रावणाची चिंता :

अवध्यता वानरासी । मारितां न मारवे आम्हांसी ।
विलोकोनि बोलतां सभेसीं । रावणासी अति चिंता ॥ ९९ ॥
येथें आणितां हनुमंत । आम्हांसी न जोडे पुरूषार्थ ।
हनुमान माझा करील घात । चळी कांपत रावण ॥ १०० ॥
रावणाचे सिंहासन । तयासमान पुच्छासन ।
हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥ १०१ ॥
दधमुखेंसीं संमुख । वानर बैसला निःशंक ।
रावणा लागली धुकधुक । अधोमुख स्वयें जाला ॥ १०२ ॥
इंद्रजितें हनुमंत । धरोनि आणिला लंकेआंत ।
सत्य जाला ब्रह्मवाक्यार्थ । मज अपघात ओढवला ॥ १०३ ॥
रावणाचें चित्तीं चिंता ऐसीं । कळों सरली हनुमंतासी ।
वानरचेष्टा मांडिल्या त्यासीं । लंकेशासीं गांजावया ॥ १०४ ॥

नंतर रावणापुढे मारूतीच्या चेष्टा व त्याची अवहेलना :

रावणासंमुख हनुमंत । बैसोनियां वांकुल्या दावित ।
कांखा कुशी खाजवीत । पुच्छ लावीत नाकासीं ॥ १०५ ॥
पुच्छ लावितांचि नाकी । केश भरले नासिकीं ।
रावण शिंकेवरी शिंकी । दशमुखीं ओकित ॥ १०६ ॥
दाहीं नाकीं शिंके थडथडां । होत शेंबुडाचा सडा ।
सिंहसनीं रोकडा । वानरें गाढां गांजिला ॥ १०७ ॥
पुढें शिंकेचें पडता नेट । बृहती वाजे परपराट ।
वानरचेष्टा अति वरिष्ठ । दशकंठ गांजिला ॥ १०८ ॥

रावण त्यास त्याची माहिती विचारतो :

राजसन्मान राजाभिमान । वानरें उडविला संपूर्ण ।
सिंहासनीं दशानन । लज्जायमान बैसला ॥ १०९ ॥
वानर न गणी राक्षसांसी । दृष्टी नाणी प्रधानसी ।
रावणें जाणोनि मानसीं । स्वमुखें कपीसी पूसत ॥ ११० ॥

मारुतीचे उत्तर :

रावण हेळसोनि बोले उत्तर । अरे तूं कोण कोणाचें वानर ।
तैसाचि हेळसोनि बोले कपींद्र । ऐकें साचार रावणा ॥ १११ ॥
एकें म्हणतांचि अरे । सवेंचि दुसरा म्हणे कां रें ।
तैसेचि मांडिलें वानरें । निशाचरें हेळसोनी ॥ ११२ ॥
मारिले वनकर किंकर । जंबुमाळी प्रधानकुमर ।
पंच सेनानी मारिले शूर । तो मी वानर हनुमंत ॥ ११३ ॥
करोनि वृक्षांचा उपाडा । झाडिला इंद्रजिताचा पादाडा ।
अखया कुमर मारिला गाढा । तो मी निधडा हनुमंत ॥ ११४ ॥
कोणाचा म्हणसी कैंचा कोण । येथें यावया काय कारण ।
पुशिल्या प्रश्नांचें प्रतिवचन । सावधान अवधारीं ॥ ११५ ॥
सुबाहु ताटकानिर्दळण । त्रिशिरा मारिला खर दूषण ।
त्या श्रीरामाचा दूत मी जाण । तुझा प्राण घेवो आलों ॥ ११६ ॥
कोदंडधारिदीक्षागुरू । सूर्यवंशी श्रीरामचंद्रु ।
त्याचा दूत मी वानरू । तुझा संहारू करूं आलों ॥ ११७ ॥
राक्षसराजा मी रावण । तुज वधावया कैंची आंगवण ।
तरी माझें बळ असाधारण । नाहीं प्रमाण मारावया ॥ ११८ ॥
लागतां बाहूची चपेट । मेरूमांदार होती पीठ ।
तेथें रावण दशमुख कीट । लंकात्रिकूट तें किती ॥ ११९ ॥
रावणाऐसे दशकंठी । रणीं मर्दीन कोट्यनुकोटी ।
तो मी लंकेची त्रिकूटी । वाममुष्टीं मर्दीन ॥ १२० ॥
म्हणती तुजसवें वानर । असती पाठिराखे अपार ।
मी एकांगवीर । पुरें दशशिर दंडावया ॥ १२१ ॥
मी तंव एकला एक वानर । श्रीरामकटकींचे किंकर ।
तुझें कोटि कोटि जुंझार । मजसमोर करीं उभे ॥ १२२ ॥
मशकें कोटी कोटी जुंझार । मज मारितां दशशिर ।
कोण राखेल निशाचर । सुरासुरा पाहूं पां ॥ १२३ ॥
सदाशिव तुज रक्षिता । तुवां चोरिली श्रीरामकांता ।
शिव पेटला तुझ्या घाता । चोरी करितां कोण राखे ॥ १२४ ॥
ब्रह्मा तुज नित्य साहाकारी । त्याचे वंशीं तूं दुराचारी ।
चोरीमारी आणि परद्वारी । ब्रह्मा तुजवरी क्षोभला ॥ १२५ ॥
ब्रह्मा शिव आणि शक्र । तुज क्षोभले सुर समग्र ।
मज मारिता दशशिर । कोण समोर राहील ॥ १२६ ॥
मुख्य त्वां चोरिली सीता सती । जटायु मारिला विश्वासघातीं ।
परिव्रतेसीं मागतां रती । प्रजापति क्षोभला ॥ १२७ ॥
मज मारिता दशवक्त्र । कुमर प्रधान सैन्य समग्र ।
रणीं मर्दोनि निशाचर । सीता सुंदर मग नेईन ॥ १२८ ॥

त्यामुळे इंद्रजितास कंप :

ऐकोनि हनुमंताची मात । इंद्रजित चळीं कांपत ।
धाकें बिभीषणासी सांगत । आला अपघात रावणा ॥ १२९ ॥
हनुमंताचा रणावर्त । भोगोनि इंद्रजित असे भीत ।
न साहवे पुच्छाचा घात । लंकानाथ केंवी वांचे ॥ १३० ॥
लंके आणोनि हनुमंत । कांही नव्हेचि पुरूषार्थ ।
आजि निमाला लंकानाथ । आला अंत राक्षसां ॥ १३१ ॥

त्याला व बिभीषणाला रावणाविषयी चिंता :

इंद्रजित बिभीषण सचिंत । कैसेनि वांचेल लंकानाथ ।
तंव बोलिला हनुमंत । अति पुरूषार्थ रामाचा ॥ १३२ ॥
रणीं मारीन रावण । करोनि सीता सोडवण ।
सीता घेवोनि जातां जाण । आडवा कोण येंऊ शके ॥ १३३ ॥
इतुकें करितां न लगे क्षण । परी श्रीरामें वाहिली आण ।
स्वहस्तें मारीन रावण । मिथ्या कोण करूं शके ॥ १३४ ॥
मारोनियां दशशिरां । स्वस्थ करावी वसुंधरा ।
सुखी करावें चराचरा । श्रीरामचंद्रा निजनेम ॥ १३५ ॥
सोडावी देवांची बांधवडी । तोडावी नवग्रहांची बेडी ।
उभारावी रामराज्याची गुढी । हे मर्यादा गाढी श्रीरामीं ॥ १३६ ॥

रावणाच्या शिरावर मारुतीचा नखाग्रांनी आघात

वानरें करोनि उड्डाण । जीवें मारावा दशानन ।
श्रीरामप्रतिज्ञापाळण । कपि रावण न मारीच ॥ १३७ ॥
रावणाचीं दाही शिरें । हनुमान खुडिता नखाग्रें ।
मर्यादा केली श्रीरामचंद्रें । म्हणोनि वानरें राखिला ॥ १३८ ॥
श्रीराममर्यादेचें उत्तर । सर्वथा नुल्लंघीच वानर ।
यालागीं तो दशशिर । जीवें कपींद्र न मारीच ॥ १३९ ॥
जीवें न मारीच वानर । मरणापरीस हें दुर्धर ।
निर्भत्सला दशशिर । तेंही सादर अवधारा ॥ १४० ॥

त्याचा मारूती धिक्कार करतो :

जळो ते रावणा तुझी थोरी । जळो तो राजा होय भिकारी ।
जळों तें कर्म करणें चोरी । परनारी पतिव्रता ॥ १४१ ॥
जळों तें तुझें रावणा कुळ । जळो तें रावणा तुझें शीळ ।
जळो तें रावणा तुझें बळ । पापी केवळ परद्वारी ॥ १४२ ॥
धिग्धिग् रावणा तुझा पुरूषार्थ । धिग्धिग् रावणा तुझा कर्तव्यार्थ ।
धिग्धिग् रावणा तुझें व्रत । स्वार्थ परमार्थ नाशिला ॥ १४३ ॥
धिग्धिग् रावणा तुझी राक्षसजाती । धिग्धिग् रावणा तुझी ख्याती ।
धिग्धिग् रावणा तुझी किर्ती । जाली अपकीर्ति तिहीं लोकीं ॥ १४४ ॥
धिग्धिग् रावणा तुझें जन्म । धिग्धिग् रावणा तुझें कर्म ।
धिग्धिग् रावणा तुझा धर्म । निद्य परम तिहीं लोकीं ॥ १४५ ॥
धिग्धिग् रावणा तुझी श्रीमंती । धिग्धिग् रावणा तुझी शक्ती ।
धिग्धिग् तो खड्ग तुझे हातीं । लोम मारूतीचें न तुटेचि ॥ १४६ ॥
धिग्धिग् जीवित्व तुझें क्षितीं । धिग्धिग् रावणा तुझी शौर्यशक्ती ।
परोक्ष चोरिली सीता सती । बाणभयें भीसी श्रीरामा ॥ १४७ ॥
चोरिली माझ्या स्वामीची नारी । त्या तुझी म्यां धरिली चोरी ।
चोर तो तंव प्रत्यक्ष वैरी । सहपरिवारीं मारीन ॥ १४८ ॥
देखतां सैन्य भट सुभट । तुझे मर्दीन वीसही होंट ।
तुझे छेदावया दशकंठ । आलों मी वाटा रामाचा ॥ १४९ ॥
ऐसें बोलता महाबळी । पिंजारिल्या रोमावळी ।
लांगूल त्राहाटिले भूतळीं । वाढलें निराळीं कपिपुच्छ ॥ १५० ॥
सवेंचि आठवले हनुमंता । श्रीराम वधील लंकानाथा ।
व्यर्थ कां मी क्षोभूं आतां । केलें शांत निजकोपा ॥ १५१ ॥
एकाजनार्दना शरण । केलें लंकेशगर्वहरण ।
जाळील लंकाभुवन । रणकंदन अवधारा ॥ १५२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें सुंदरकांडे एकाकारटिकायां
हनुमद्-रावणगर्वहरणं नाम ब्रह्मलिखिते द्वात्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३२ ॥
॥ ओव्यां १५२ ॥ श्लोक ११ ॥ एवं संख्या १६३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय बत्तिसावा