भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा

रावणाच्या दाढी-मिशा मारूतीने जाळल्या

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हनुमंतासी न चले घात । स्वयें सांगे इंद्रजित ।
अवध्य वीर हा हनुमंत । साक्षेपें सांगत बिभीषण ॥ १ ॥
इंद्रजित जो कां ज्येष्ठ सुत । नानायुक्ती स्वयें सांगत ।
शस्त्रास्त्रीं ब्रह्मपाशांत । न चले पात हनुमंता ॥ २ ॥
शस्त्रशक्ती अस्त्रशक्ती । मंत्रशक्ती तंत्रशक्ती ।
कपटमायामोहनशक्ती । रणीं मारूती न धरवे ॥ ३ ॥
कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचा ब्रह्मपाश ।
बांधों न शके वानरास । जन्मपाश मुख्यत्वें ॥ ४ ॥
बिभीषण प्रिय भ्राता । सांगतसे परम हिता ।
शरण रिघावें श्रीरघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ ५ ॥
सर्वथा अवध्य हा मारूती । इंद्रजिताची उपपत्ती ।
बिभीषणाची भिन्न युक्ती । लंकापति सचिंत ॥ ६ ॥
राग आला रावणासी । तरी मारवेना हनुमंतासी ।
अवध्यता देखोनि त्यासी । दशमुखासी अति चिंता ॥ ७ ॥
हनुमंतासी न वधितां । सकळ कुळाच्या करील घाता ।
हा न मरे मारूं जातां । परम चिंता लंकेशा ॥ ८ ॥

रावण हनुमंतास त्याचे मरण कशात आहे ते विचारतो :

आण घालोनि श्रीरघुनाथा । मरण पुसे कपिनाथा ।
मरणानुक्रम आणूनि हाता । मग हनुमंता मारावे ॥ ९ ॥
ऐसें विचारोनि चित्तीं । पुसावया मरणयुक्ती ।
स्तवूं आदारिला मारूती । लंकापतीनें निजमुखे ॥ १० ॥
ऐकें वीरा हनुमंता । श्रीरामाच्या परम भक्ता ।
तुज मी पुसतसें आतां । सत्य तत्वतां सांगावें ॥ ११ ॥
असत्य वदों नये हरिभक्ता । शपथ घालितों रघुनाथा ।
मरण कैसेनि हनुमंत । यथार्थता सांगावें ॥ १२ ॥

त्याला उत्तर :

ऐकोन श्रीरामाची आण । हनुमान घाली लोटांगण ।
मज सर्वथा नाहीं मरण । सत्य जाण लंकेशा ॥ १३ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । गदगदां हांसे रावण ।
जन्मामागें अखंड मरण । मिथ्या भाषण अमरत्व ॥ १४ ॥

रावणाचा अविश्वास व त्याची कारणे :

म्हणती अमर निर्जरा देवा । तेही पावती मरणार्णवा ।
तेथें तुझा कायसा केवा । मिथ्या हेवा अमरत्वें ॥ १५ ॥
चौदा कल्पायुषी गरिमा । मार्कंडेयाचा मुख्य महिमा ।
तो जैं जाय मरणग्रामा । तैं झडे रामा रोमहर्षणासी ॥ १६ ॥
युगानुयुगीं लोम झडे ज्यासी । ऐसा तो लोमहर्षण ऋषी ।
तोही मरे बकदाल्भ्याचें श्वासीं । मरण बकदाल्भ्यासी हंसपक्षे ॥ १७ ॥
हंसाचा पंख जेव्हां झडे । तंव बकदाल्भ्याचें आयुष्य उडे ।
त्या हंसासी मरण रोकडें । जैं कां नख खंडे भृशुंडीचें ॥ १८ ॥
कूर्म हालवी निमख । तंव भृशुंडीस देख ।
मरण पावे आवश्यक । मरण अचूक सर्वांसी ॥ १९ ॥
एवं मरणपरंपरा । कदा न सोडी थोरथोरां ।
तेथें तूं पालेखाइरा । केंवी वानरा अमरत्व ॥ २० ॥
तपस्तेजें महाऋषीं । ते काळाची आंदणी दासी ।
श्रीरामनामीं प्रेम ज्यासी । काळ त्यापासीं कामारा ॥ २१ ॥
जागृतिसुषुप्तिसहित स्वप्न । ज्यासीं अखंड नामस्मरण ।
काळ त्याचें वंदी चरण । तेणें रावणा हे महिमा ॥ २२ ॥
भक्तिभावार्थे भजन । स्वयें जाणे श्रीभगवान ।
रावण विषयी अति दीन । त्यासीं हें ज्ञान केंवी लाभे ॥ २३ ॥
असो हे रावणाची स्थिती । मज श्रीरामाची भक्ती ।
माझ्या अमरत्वाची ख्याती । दावूं प्रतीत रावणा ॥ २४ ॥
हनुमंतीं श्रीरामभक्ति लाठी । तरी कां बोले मिथ्या गोष्टी ।
मिथ्या वदलासी चावटी । कशासाठीं मज सांगें ॥ २५ ॥
आदरें पुसतां रावणासीं । बुद्धि स्फुरलीं वानरासी ।
अपमानावया लंकेशासी । गुह्य त्यापासी अनुवादे ॥ २६ ॥

त्यावर मारूतीची प्रतिक्रिया :

रावण अतिशयेसीं कपटी । सत्य वदलों मी ज्या गोष्टी ।
सत्य वार्ता मानी खोटी । विकल्प पोटीं रावणा ॥ २७ ॥
सबाह्य असत्य सदोदित । त्यास न माने सत्यत्व ।
सत्यासीं सत्य भावार्थ । रावणांत तो नाहीं ॥ २८ ॥
रावणाचा विकल्प झडे । माझें सत्यत्व दिसे रोकडें ।
तें साधावया धडफुडें । रावणापुढें गुह्य सांगे ॥ २९ ॥
मरण पुससी विश्वासेंसी । तुवां मारिलें जटायूसी ।
तैंसेंच मजही तूं करिसी । तेणें धाकेंसीं वदें मिथ्या ॥ ३० ॥
रावण म्हणे हनुमंतासी । मरणभय जयापासीं ।
श्रीरामभक्ति कैंची त्यासीं । देहलोभ्यासी राम कैंचा ॥ ३१ ॥
हनुमान म्हणे लंकानाथा । परोपदेशीं अति योग्यता ।
तुझी मी देखतों तत्वतां । शेखीं कपटता तुजपासी ॥ ३२ ॥
कपटें होवोनि संन्यासी । चोरोनि आणिलें सीतेसी ।
सदाशिवें सोडविलासी । कपटें पावसीं कुळक्षय ॥ ३३ ॥
ऐसें हनुमंतें सांगतां । वर्म खोचले लंकानाथा ।
ऐक माझी मरणावस्था । तुज तत्वतां सांगेन ॥ ३४ ॥
ऐकावया मारूतीचें वचन । सरसावला दशानन ।
कपि सांगे विंदान । सावधान अवधारा ॥ ३५ ॥
असत्य नाही तुजसीं । मरण नाहीं माझ्या देहासी ।
मरण आहे पुच्छासी । तें मारिसी तैं मी मरें ॥ ३६ ॥

लंकेतील घराघरातून वस्त्रे आणिली व सर्व कापड बाजार
रिता केला तरी पुच्छ संपूर्ण गुंडाळलेच जाईना :

ऐकोनि कपीचें वचन । ज्येष्ठ इंद्रजित श्रेष्ठ प्रधान ।
अवघे म्हणती सत्य भाषण । सेनानी सैन्यसमवेत ॥ ३७ ॥
वायूपरीस पुच्छ चपळ । याचे पुच्छासीं प्रबळ बळ ।
पुच्छें निर्दळिलें सकळ । बळें गोळांगूळ ना मारवे ॥ ३८ ॥
पुच्छें मारिला रथसारथी । पुच्छें इंद्रजिता वाताहती ।
पुच्छें रणी लाविली ख्याती । वीरां घाती कपिपुच्छ ॥ ३९ ॥
इंद्रजित बोले देखोनि रण । पुच्छ अतिशयेंसी दारूण ।
पुच्छा मारूं जातां आपण । रणकंदन करील ॥ ४० ॥
पुच्छ खवळल्या अद्‌भुत । वीर मारील समस्त ।
लंका करील वाताहत । लंकानाथ केंवी वांचे ॥ ४१ ॥
इंद्रजित सेनानी प्रधान । अवघे कांपती पुच्छाभेण ।
तें देखोनि दशानन । स्वयें आपण विचारी ॥ ४२ ॥
हनुमंतासी पुसे रावण । पुच्छ अतिशयें दारूण ।
कैसेनि पावेल मरण । सत्य संपूर्ण सांगावें ॥ ४३ ॥
हनुमंत म्हणे दशशिरा । पुच्छाचें मरण अति दुस्तरा ।
तेलें तुपें भिजवोनि वस्त्रा । पुच्छा समग्रा गुंडाळावें ॥ ४४ ॥
हनुमान मारावया निर्धारीं । अग्नि लावावा पुच्छाग्री ।
ज्वाला धडाडिलिया अंबरी । मरण वानरीं तत्काळ ॥ ४५ ॥
उघडें राहिल्या तिळभरी । मरण नये पुच्छावरी ।
येईल राक्षसां महामारी । करील बोहरी लंकेची ॥ ४६ ॥
हनुमान न म्हणावा कपटी । मी सांगतों सत्य गोष्टी ।
ऐसी आंगवण असेल लाठी । तरी तूं वेष्टीं कपिपुच्छा ॥ ४७ ॥
ऐसी तुज असेल शक्ती । हें घे पुच्छ देतों हातीं ।
शीघ्रतें वस्त्रप्रयुक्तीं । अति निगुतीं गुंडाळावें ॥ ४८ ॥
पुच्छ गुंडाळावया ओढाओढी । स्त्रीपुरूषें नागवीं उघडीं ।
लंका नागविली रोकडी । कडोविकडी पुच्छाची ॥ ४९ ॥
सभा नागविली म्यां निशीं । लंका नागविली दिवसीं ।
पुच्छें करोनि कासाविसी । राक्षसांसी उगाणु ॥ ५० ॥
पुच्छ गुंडाळावयाचे मिसीं । राजद्वारीं चोहट्यापासीं ।
लंका नागवी करीन दिवसीं । राक्षसांसी गर्जोनी ॥ ५१ ॥
पुच्छ गुंडाळावयाचे चाडा । सांठवणें कापड तडतडा ।
तेलासाठीं लावूं झगडा । तेलिया राजदंडा करूं ठावो ॥ ५२ ॥
आवडी हनुमंताचे पोटीं । नगर नागवूं पुच्छासाठीं ।
अग्नि लावूं शंकात्रिकूटीं । राक्षसकोटी आजि भाजूं ॥ ५३ ॥
ऐसें विचारोनि चित्तीं । पुच्छ दिधलें रावणाहातीं ।
पुढें पुच्छाची व्युत्पत्ती । लाविली ख्याती ते ऐका ॥ ५४ ॥
रावण सांगे निजदासांसी । आगी लावा कपिपुच्छासी ।
भिजवोनि तैलघृतासीं । जीर्ण वस्त्रासी गुंडाळावें ॥ ५५ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । वीर शूर क्रोधी पूर्ण ।
क्रूर कर्कश अति दारूण । पुच्छ संपूर्ण गुंडेना ॥ ५६ ॥
वस्त्रें सरलीं पैं जीर्ण । नवीं गुंडाळावीं म्हणे रावण ।
नवीं सरलीं जाण । पुच्छ संपूर्ण गुंडेना ॥ ५७ ॥
घोंगडीं बारीक सकटें । सस्नेहें गुंडिली धुवटें ।
सखरें गुंडिलीं चोखटें । तरी न वेष्टे कपिपुच्छ ॥ ५८ ॥
घोंगडीं पांगडीं गुंडगीं खांडें । सखरें निखरें गुंडिलीं उदंडें ।
आणिली सगळीं दिंडे । तरी न गुंडे कपिपुच्छ ॥ ५९ ॥
चाटेवळी पडली ओस । तरी न पुरती पुच्छास ।
राजगृहींचीं असमसाहस । कपिपुच्छास न पुरती ॥ ६० ॥
समस्त चाटियांचे वस्त्रभार । राजगृहींची वस्त्रें मात्र ।
पुच्छ न गुंडेचि चौतकर । अति दुर्धर वाढलें ॥ ६१ ॥
पुच्छ वाढलें दुर्धर । धाकिंनला दशशिर ।
इंद्रजितादि निशाचर । सहपरिवार धाकती ॥ ६२ ॥
कपीचें मरण पुच्छापासीं । निश्चयें मानलें आम्हांसी ।
पुच्छ गुंडाळावें साक्षेपेंसी । येरयेरांपासीं सांगत ॥ ६३ ॥
पडदे गुंडिती फाडफाडूं । बैठका गुंडिती उधडउधडूं ।
चांदवें गुंडिती सोडसोडूं । पुच्छ माकडु नाटोपे ॥ ६४ ॥
पुच्छ गुंडिलें बहुतेक । उरलें असे भाग एक ।
तें गुंडाळावें आवश्यक । सकळ लोक सांगती ॥ ६५ ॥
पुच्छ गुंडाळावया लवडसवडीं । सभेची घेतलीं लुगडीं ।
वानरें सभा केली उघडी । कडोविकडीं नागविलीं ॥ ६६ ॥
सभा नागविली वीरें । आणिली रावणाची वस्त्रें ।
तरी पुच्छासीं न पुरे । ओढा वानरें लाविला ॥ ६७ ॥
सेवकां सांगे दशवक्त्र । नगरामाजी राहिली वस्त्रें ।
हिरोन आणा रे सत्वरें । पुच्छीं वानर बांधावा ॥ ६८ ॥
जांवई आणिला दिवाळसणा । कोणाचा पाहुणा कोणाचा मेहुणा ।
दूत करिती वस्त्रहरणा । शंखस्फुरणा ते करिती ॥ ६९ ॥
नगरीं नरनारी वागती । दूत त्यांची वस्त्रें हरिती ।
नागवीं पळती हळहळती । शंख करिती चहूंकडे ॥ ७० ॥
नोवरी कुमारी गरोदरी । सौभाग्याच्या निजनगरीं ।
वाणें देती घरोघरीं । साळंकारीं शोभती ॥ ७१ ॥
कपिपुच्छवेष्टनावारी । राजदूत वस्त्रें हरी ।
लाजा उघडिया पडती नारी । लंकापुरीं आकांत ॥ ७२ ॥
राजगृहीं ज्यांची चाली । नेसोनि धोत्रें वोली ।
भट्ट निघाले ते मंडळीं । वस्त्रें हरिलीं बुकलोनि ॥ ७३ ॥
भट्ट वस्त्रें न सोडिती । दूत निःशंक झोंबती ।
महाशंख नानायुक्ती । शंख करति व्युत्पन्न ॥ ७४ ॥
ओष्ठ मणगट जिव्हायुक्त । स्वर वर्ण अक्षरोक्त ।
शंख करति वेदोक्त । रावण जित कीं मेला ॥ ७५ ॥
अनुनासिक सानुनासिक । स्वरप्रयुक्त वेदपाठक ।
वेदव्युत्पत्ती करिती शंख । दशमुख निमाला ॥ ७६ ॥
दिवसा ढवळ्या नगराआंत । राजद्वारीं वाट पाडित ।
राजा असतां जीवें जित । पारिपत्य तो करीना ॥ ७७ ॥
बोंब करितां फुगलें पोट । हाका देतां सुकले कंठ ।
राजा निमाला पैं स्पष्ट । हा हा कटकट ब्राह्मणां ॥ ७८ ॥
हनुमान वीर जगजेठी । लंका नागविली पुच्छासांठी ।
शिणतां राक्षस कोट्यनुकोटी । पुच्छा शेवटीं वेष्ठवेना ॥ ७९ ॥
अद्यापि पुच्छाचा अगरडा । बुजाला नाहीं दिसे उघडा ।
पुच्छवेष्टनीं लावोनि वेढा । केला बापुडा रावण ॥ ८० ॥
पुच्छ वेष्टावयासाठीं । शिणतां राक्षसांच्या कोटी ।
पुच्छ वेष्टवेना वेष्टीं । अग्र शेवटीं उघडेंचि ॥ ८१ ॥
पुच्छ गुंडितां केवढें । अग्र अधिकाधिक वाढे ।
वेड लाविलें माकडें । मरण रोकडें राक्षसां ॥ ८२ ॥
चाटे रडती राजद्वारीं । कळकळती नरनारीं ।
बोंब सुटली घरोघरीं । लंकानगरीं आकांत ॥ ८३ ॥
दुर्गसंग्रहपरवडी । तेलातुपाची टांकीं गाढीं ।
अवघीं पडलीं कोरडीं । तिंबिता लुगडीं पुच्छार्थ ॥ ८४ ॥

तेलतुपाचा दुष्काळ :

तेलातुपाचा पैं तडा । नगरीं पडलासे रोकडा ।
पुच्छ गुंडितां माकडा । लाविलें वेडा लंकेशा ॥ ८५ ॥
तूप न मिळे खावया पुरतें । रावणा लागले रोकडे भाते ।
माखोनियां घ्यावया लेंकरातें । तूप कोणातें मिळेना ॥ ८६ ॥
टांकोटांक स्नेहासमाप्ती । घरोघरीं मालवे वाती ।
गडद पडलें लंकेप्रती । लाविली ख्याती कपिपुच्छें ॥ ८७ ॥
हनुमंताची कैसी युक्ती । ज्यांचें नगर त्याचे हातीं ।
नागवितां नानाप्रयुक्ती । लाविली ख्याती कपिपुच्छे ॥ ८८ ॥
नाहीं झगडा ना भांडण । करितां कपिपुच्छाचें वेष्टन ।
तृणप्राय केला रावण । गाढी आंगवण हनुमंता ॥ ८९ ॥
अल्प उरलें आहे अग्र । ऐसें सांगे दशशिर ।
यासी वेष्टोनि पीतांबर । मारूं वानर पुच्छदाहें ॥ ९० ॥
पीतांबरें श्वेतांबरें । पट्टकुळें मनोहरें ।
गुंडितांही क्षौमांबरें । पुच्छ नावरे कपीचे ॥ ९१ ॥
इंद्रजित धाके जीवाआंत । पुच्छें नाटोपे हनुमंत ।
अग्नि लाविलिया तेथ । करील अनर्थ लंकेसी ॥ ९२ ॥
तंव बोलिला विद्युन्माळी । वानरा आकळावया अति बळी ।
उघडी करा जनकबाळी । पुच्छ तत्काळीं आकळेल ॥ ९३ ॥
रावणही धाके मानसीं । पुच्छ न गुंडवे आम्हांसी ।
केंवी मारावें वानरासी । उपायो यासी दिसेना ॥ ९४ ॥
ऐसें ऐकता हनुमंतें । आवरिलें निजपुच्छातें ।
दूत सांगती रावणातें । आम्हीं पुच्छातें आकळिलें ॥ ९५ ॥

पुच्छ पेट घेईना :

आम्ही सेवक आतुर्बळी । पुच्छ आकळिलें समूळीं ।
म्हणोनि पिटिली एक टाळी । केला सकळीं गडगर्ज ॥ ९६ ॥
रावण सांगें सेवकातें । अग्नि लावा रे पुच्छातें ।
पाचारोनि लोहकारांतें । लाविले भाते अग्नीसी ॥ ९७ ॥
तिये काळी हनुमंतें । विनविलें निजपितयातें ।
वायु सत्य सखा अग्नीतें । ज्वाळा तेथें होऊं नेदीं ॥ ९८ ॥
ज्वाळा होऊं न द्यावी येथें । ऐसें नमून वायूतें ।
गांजावया राक्षसांतें । हनुमांन पुच्छार्थे खवळला ॥ ९९ ॥
भाते फुंकितां चौपासीं । अग्नि लागेना पुच्छासी ।
राक्षसें हाती कासाविसी । अग्नि पुच्छासी स्पर्शेना ॥ १०० ॥
रावण म्हणे हनुमंतासी । अग्नि कां न लागे पुच्छासीं ।
हनुमंत म्हणे रावणासी । तूं तंव आहेसी बहुमूर्ख ॥ १०१ ॥

मारूतीच्या सांगण्यावरून रावण स्वतः फुंकू लागला :

वेदविभाग केला व्युत्पत्ती । तो ही न सरे वेदव्यासोक्ती ।
संतासंत न कळे स्थिती । तूं जंव मूर्ति गर्वाची ॥ १०२ ॥
संतासंतविवेक अणुवी । समूळ नाहीं ज्याचें जीवीं ।
त्यासी न साजे राजपदवी । वृथा गर्वी तूं रावणा ॥ १०३ ॥
भातें फुंकितां अचेतन । केंवी जाळवेल सचेतन ।
हें तुज नाहीं विवेकज्ञान । परम अज्ञान रावणा ॥ १०४ ॥
वचन मानलें रावणासी । पाचारोनि निजविश्वासी ।
फुंकोनि अग्नि लावा पुच्छासी । राक्षसांपासीं सांगत ॥ १०५ ॥
राक्षस फुंकिता चौपासीं । पुच्छें दडपिलें अग्नीसी ।
खंवट घाण रिघे घ्राणासीं । कासाविसी राक्षसां ॥ १०६ ॥
खंवट घाणी अति प्रबळ । डोळां आसुवें मुखीं लाळ ।
एक श्वासीं खोकिती सबळ । हलकल्लोळ उठिला ॥ १०७ ॥
रावण म्हणे गा हनुमंता । पुच्छ कां न जळे फुंकितां ।
हनुमान म्हणे लंकानाथा । ऐक तत्वतां सांगेन ॥ १०८ ॥
गृहस्थे आमंत्रण नेदितां । भोजना न येववे अतीता ।
तेंवी तुवां न फुंकितां । अग्नि सर्वथा प्रज्वळेना ॥ १०९ ॥
गृहस्थें न करितां ब्रह्मार्पण । आपोशन न घेती ब्राह्मण ।
अग्नि न फुंकितां रावण । हुताशन प्रज्वळेना ॥ ११० ॥
एकमुखें हें फुंकिती । दहा मुखें तुज आहेती ।
तुवां फुंकिलिया लंकापती । पुच्छप्रदीप्ती हुताशनें ॥ १११ ॥
हनुमंताच्या निजयुक्ती । सत्य मानी लंकापती ।
पुच्छाग्नि फुंकावयाप्रती । केली आयती ते ऐका ॥ ११२ ॥
करोनियां शुद्धाचमन । प्रथम देवोनि घृतावदान ।
फुंकावया हुताशन । दशवदन बैसला ॥ ११३ ॥
रावणाचें पोटीं कपट । कपि जाळावया पुच्छासगट ।
येणें आवेशें दशकंठ । फुंकूं हव्यवाट बैसला ॥ ११४ ॥
रावणाचे निजचित्तीं । माझेनि मुखें पुच्छप्रदीप्ती ।
सांग जळालिया मारूती । जगी मत्कीर्ति स्फुरेल ॥ ११५ ॥
रावण तोंड परतें करी । हनुमान पुच्छ उचली वरी ।
पडला अपमान राजशिरीं । केली बोहरी खांडमिशां ॥ ११६ ॥

त्याबरोबर भडका उडून रावणाच्या दाढी-मिशा जळाल्या :

ऐसा धरोनि अभिमान । रावणें फुंकिता हुताशन ।
भडका एकसरें उठोन । जालें दहन दाढीमिशां ॥ ११७ ॥
प्रथम प्रारंभीं अपमान । दाढ्यामिशांचें जालें दहन ।
सिंहासनीं काळें वदन । लज्जायमान रावण ॥ ११८ ॥
कीर्तीची जाली अपकीर्ती । दुसरी लज्जा रावणाप्रती ।
पुढें काय करील मारूती । चिंतावर्ती रावण ॥ ११९ ॥
एकाजनार्दना शरण । हें प्रथम पुच्छप्रकरण ।
पुढें राक्षसां गांजणें । पुरदहन अवधारा ॥ १२० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावणस्य खांडमिशादहनं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
॥ ओव्यां १२० ॥ श्लोक ५ ॥ एवं संख्या १२५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अठरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *