भावार्थरामायण अध्याय

 भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा

 भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा

सुग्रीवाशी सख्य

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुग्रीवाला स्नेहसंबंध जोडण्यासाठी श्रीराम पाचारण करितात :

वालिसुग्रीवजन्मकथा । ऐकोनि सुख श्रीरघुनाथा ।
संतोषोनियां हनुमंता । होये बोलता श्रीराम ॥१॥
सख्य करावें सुग्रीवासीं । हे मुख्य कर्तव्य आम्हांसी ।
तूंही सख्यार्थ आलासी । अतिशयेंसी सुख जालें ॥२॥
कबंधे सांगीतले मजपासीं । हृतदारदुःख सुग्रीवासी ।
सुखी करावया तयासी । ऋष्यमूकासी मी आलों ॥३॥
जो मज होय अनन्य शरण । त्याचें दुःख निर्दाळून ।
सुखी करावें संपूर्ण । ब्रीर्द जाण हें माझें ॥४॥
दुःख निरसूनि सुख द्यावयासी । मी आलों वनवासासी ।
वेगीं बोलावी सुग्रीवासी । सुखी त्यासी मी करीन ॥५॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । हनुमंत जाला सुखसंपन्न ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । केले उड्डाण उल्हासें ॥६॥

ऋष्यमूकात्स हनुमान्गवा मलयपर्वतम् ।
आचचक्षे तदा वीरः सुग्रीवाय महात्मने ॥१॥
अयं रामो महाप्राज्ञः संप्राप्तो दृढविक्रमः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा संख्यार्थं त्वामुपागतः ॥२॥

हनुमंत सुग्रीवाला श्रीरामांचा वृत्तांत सांगतो :

हनुमंते करोनि उड्डाण । सुग्रीवापासीं आला आपण ।
म्हणें तूं भाग्यें सभाग्य पूर्ण । श्रीरघुनंदन तुष्टला ॥७॥
राम लक्ष्मण महावीर । निःशंक निधडे धनुर्धर ।
तुजसीं करावया मित्राचार । आले साचार ऋष्यमूका ॥८॥
कोठील कोणाचे हे कोण । येथें यावया काय कारण ।
समूळ शोधिले म्यां जाण । सावधान अवधारीं ॥९॥
श्रीराम दाशरथी महावीर । बंधु लक्ष्मण धनुर्धर ।
श्रीरामकांता सीता सुंदर । वनीं विहार पित्राज्ञा ॥१०॥
पित्याचे मानोनि आज्ञेसी । दंडकारण्य वनवासीं ।
तेंही रहावें चौदा वर्षीं । फळमूळांसी सेवोनि ॥११॥
शून्याश्रमीं पंचवटीं । रावणें हरिली सीता गोरटी ।
तिची शुद्धि करावयासाठीं । आले जगजेठी ऋष्यमूका ॥१२॥
श्रीरामें उद्धरिलें कबंधासी । शापविमुक्त केलें त्यासी ।
तेणें सांगितलें श्रीरामापासीं । सुग्रीवासीं सुखी करीं ॥१३॥
सीताहरणदुःख श्रीरामासी । दारहरणदुःख सुग्रीवासी ।
समान दुःख तुम्हां दोघांसी । येरयेरांसी सुखी करा ॥१४॥
निःशेष वदूनि वाळीसी । सदार राज्य सुग्रीवासी ।
देवोनि करावयासी । किष्किंधेसी राम आला ॥१५॥
सांडोनि सीताशुद्ध्यर्थ । साधावया तुझा कार्यार्थ ।
कृपेनें आला श्रीरघुनाथ । भाग्यवंता सुग्रीवा ॥१६॥
श्रीराम प्रेमवत्सलू । श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू ।
श्रीराम भक्तकाजकृपाळू । दीनदयाळू श्रीराम ॥१७॥

श्रत्वा हनूमतो वाक्यं सुग्रीवो हृष्टमानसः ।
दर्शनीयतमो भूत्वा प्रीत्योवाच च राघवम् ॥३॥

सुग्रीवाला आनंद व त्याचें श्रीरामांकडे गमन :

ऐकोनि हनुमंताची गोष्टी । सुग्रीवासी आनंदकोटी ।
हनुमंताची पाठी थापटीं । प्रेमें संतुष्टीं आलिंगीं ॥१८॥
मेघगर्जनें मयूर नाचे । तैसा सुग्रीव हर्षें सांचें ।
संपूर्ण भाग्य हनुमंताचें । कोणे वाचे मी वानूं ॥१९॥
माझा साधितां निजस्वार्थ । जाला श्रीरामाचा आप्त ।
श्रीरामभाग्यें हा समर्थ । कृतकृत्यार्थ मी झालों ॥२०॥
सुमनमाळा सुकलियावरी । स्वयें सांडिजे जेवी दुरी ।
तेंवी श्रीरामभय होते भारीं । तें माळेच्या परी त्यागिलें ॥२१॥
घ्यावया श्रीरामाची भेटी । सुग्रीव निर्भय जाला पोटीं ।
श्रीराम लक्षोनियां दृष्टी । उठाउठीं आले दोघे ॥२२॥
धरोनि हनुमंताचा हात । जेथें होता श्रीरघुनाथ ।
सुग्रीव तेथें आला त्वरीत । शरणगत मी तुझा ॥२३॥

श्रीरामांजवळ सुग्रीवाची शरणागती :

तूं सत्यप्रतिज्ञ रघुवीर । माझा करावा अंगीकार ।
मी तुझा निजकिंकर । शरण साचार श्रीरामा ॥२४॥

एवं तद्वचनं श्रुत्वा सुग्रीवस्य सुभाषितम् ।
संप्रहृष्टमना हस्तं पीडयामास पाणिना ॥४॥
ततो रामस्य सुग्रीवः पाणिं जग्राह पाणिना ।
हृष्टः सौहृदमालंब्य पर्यष्वजत पीडितम् ॥५॥

ऐसें सुग्रीवसंभाषित । ऐकोनियां श्रीरघुनाथ ।
होवोनियां आनंदभरीत । जाला उदित खेवेंसी ॥२५॥
सुग्रीव घाली लोटांगण । श्रीरामें उचलिला हातीं धरुन ।
वानरें करोनि हस्तग्रहण । दिधलें आलिंगन हृदयेंसी ॥२६॥
हृदया हृदय लागलें । तंव हृदयस्थ एक जाले ।
सहज सुहृदत्व घडलें । आलिंगिलें एकमेकां ॥२७॥

श्रीरामांनी आलिंगन देऊन स्वागत केले :

श्रीरामहृदयस्थ चिद्घन । त्यासी देता आलिंगन ।
सुग्रीवहृदया समाधान । वाळिभवभान निमाले ॥२८॥
नरा वानरा पडली मिठी । आधिव्याधि शमली पोटीं ।
सांगणें पुसणें सरल्या गोष्टीं । आनंदकोटी सुग्रीवा ॥२९॥
दोघां सख्य जालें अलौकिक । अग्नीसूर्यप्रमाण साक्ष ।
कांहीं करणें न लगे देख । दोन्हींचें एक हृदय जालें ॥३०॥
दोहीचें हृदय जालें एक । तेंचि निजसख्याचे सख्य ।
आण प्रमाण देतां भाक । तो लौकिक अति अल्प ॥३१॥
श्रीरामसख्यापुढें जाण । बहिर्भूत आणप्रमाण ।
भाक तेथें केवळ तृण । सखा संपूर्ण श्रीराम ॥३२॥
श्रीरामसख्याची थोरी । अति अगाध चराचरीं ।
तें सख्य पावोनि वानरीं । जयजयकारी गर्जती ॥३३॥

सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वमुपागतौ ।
प्रहृष्टमनसौ प्रीतौ तावुभौ हरिराघवौ ॥६॥
अन्योन्यमभिवीक्षंतौ न तृप्तिमुपजग्मतुः ।
त्वं वयस्योऽसि हृद्यो मे एकं दुःखं सुखं न चौ ॥७॥

श्रीराम स्वयें नरपती । सुग्रीव स्वयें वानरपती ।
दोघां सख्यत्वाची स्थिती । अनन्य प्रीतीं आल्हाद ॥३४॥
जैसी प्रीति सुवाससुमनां । जैसी प्रीति जीवा मना ।
तैसी प्रीति सुग्रीवरघुनंदना । अन्योन्य जाणा अति प्रीति ॥३५॥
जैसी प्रीति गूळगोडीसीं । जैसी दीपकप्रकाशीं ।
नाना रसा आणि उदकासीं । रामा सुग्रीवासी अति प्रीति ॥३६॥
सुग्रीवें पाहतां श्रीरामचंद्रा । श्रीरामें पाहतां वानरेंद्रा ।
प्रीतीं पाहतां येरयेरां । दोहींच्या नेत्रां नव्हें तृप्ती ॥३७॥
जैसी प्रीति चकोरचंद्रां । तैसी प्रीति सुग्रीवरामचंद्रां ।
जैसी प्रीतीं जळा जळचरां । तैसी वानरां श्रीरामीं ॥३८॥
ऐसी श्रीरामा वानरां प्रीती । श्रीरामीं वानरां अनन्य भक्ती ।
ऐशिया ऐशिया प्रेमप्रीतीं । पाहतां तृप्ति नव्हे नेत्री ॥३९॥
श्रीराम सुग्रीव मारुती । तिघां झाली अनन्य प्रीती ।
मग बैसोनि सुखसंमतीं । अनुवादती निजगुज ॥४०॥
रावणाने सीतेला पळवून श्रीराम सुग्रीवाला सांगतात :
सुग्रीव म्हणे श्रीरघुपती । तुम्ही आले जीचेनी अर्थीं ।
ते म्यां देखिली सीता सती । गगनगतीं पै नेतां ॥४१॥

ह्रियमाणा मया द्दष्टा रक्षसा क्रूरकर्मणा ।
क्रोशंती राम रामेति लक्ष्मणेति च विस्वरम् ॥८॥
आत्मना पंचमं मां हि द्रष्ट्वा शैलतले स्थितम् ।
उत्तरीयं तदा त्यक्तं शुभान्याभरणानि च ॥९॥

रावणाचे खांदेवरी । वेगें नेतां गगनांतरीं ।
आम्हीं देखिली वानरीं । श्रीराम गजरीं आक्रंदें ॥४२॥
श्रीरामराया धांव धांव । राघवा तूं सवेग पाव ।
घेवोनि लक्ष्मणाचें नांव । दीर्घ स्वरें आक्रंदें ॥४३॥
रामनाम सीतारव । वानरीं ऐकिला पैं सर्व ।
आणिक जालें जी लाघव । तें अति अपूर्व ऐकें स्वामी ॥४४॥

सीतेने खाली टाकलेले अलंकार :

येचि पर्वतशिखरीं । आम्हीं असतां पंचवानरीं ।
उत्तरीयवास सीतासुंदरी । सालंकारीं त्यागिलें ॥४५॥
लक्षोनियां हनुमंता । वस्त्र अळकार सांडी सीता ।
तें आलें हनुमंताच्या हाता । सभाग्यता म्हणोनियां ॥४६॥
श्रीरामनामाचें उत्तरीयवस्त्र । रामनामांकित अलंकार ।
आम्हां दाखविले समग्र । राखे निरंतर मारुती ॥४७॥
रामनामीं ज्या विश्वास । असे भाग्य सभाग्य ज्यांस ।
तेचि पावती श्रीरामवास । भाग्यें बहुवस हनुमंत ॥४८॥

सीतेचे आक्रंदन व मारुतीचे उड्डाण :

रामनामे दीर्घस्वर । सीता आक्रंदे सुंदर ।
आम्हीं ऐकतां समग्र । हनुमान वीर खवळला ॥४९॥
मारोनि राक्षस दुर्धर । करोनि दीनांचा उद्धार ।
सोडवावया सीता सुंदर । हनुमान सत्वर उसळला ॥५०॥
रागें आपटोनि पुसाटी । वटारोनि आरक्त दृष्टी ।
वळोनिया वज्रमुष्टी । उठाउठीं उडाला ॥५१॥

रावणाचे लंकेत उड्डाण :

हनुमंताचे निजउड्डाण । गेलें ग्रहचक्र टाकोन ।
तळीं तेणें धाके रावण । गेला लंघोन सागरू ॥५२॥
गेला देखोनि लंकानाथ । हनुमंत क्रोध करी शांत ।
ऐसा ऐकोनि वृत्तांत अति विस्मित श्रीराम ॥५३॥

ते अलंकार पाहून श्रीरामांना परम दुःख :

ऐकोनि वानरांच्या गोष्टी । विस्मयौ सौमित्राच्या पोटीं ।
सीतालंकार पहावाया दृष्टीं । उठाउठीं आणविले ॥५४॥

उत्तरीयं गृहीत्वा तु स तान्याभरणानि च ।
इदं पश्चेति रामाय दर्शयामास वानरः ॥१०॥
ततो गृहीत्वा वासस्तु शुभान्याभरणानि च ।
हा प्रियेति रुदन्धैर्यमुत्सृज्य न्यपतद्‌भुवि ॥११॥

सीतालंकारवस्रांसी । हनुमंते दाखविलें श्रीरामासी ।
तेणें धरोनि हदयासीं । उकासाबुकसी स्फुंदत ॥५५॥
सीते मजसी का रुसलीसी । पुर्व प्रीति कां विसरलीसी ।
रागें मजसीं कां न बोलसी । कोठें गेलीसी प्रिय कांते ॥५६॥
सीतेचे देखोनि अळंकार । श्रीराम करी विलाप थोर ।
मूर्च्छित पडे सत्वर । विसंज्ञ अति विव्हळ ॥५७॥

सुग्रीवाकडून श्रीरामांचे सांत्वन, सीता शोधाचे आश्वासन व प्रतिज्ञा :

श्रीरामाची ऐकोनि व्यथा । सुग्रीवासी परमावस्था ।
सावध करोनि श्रीरघुनाथा । होय बोलता पुरुषार्था ॥५८॥
स्वामी तुज मज सख्य जालें असतां । तुझी निवारवेना व्यथा ।
तरी लागली लाज मित्रार्था । आणीन सीता शोधोनी ॥५९॥
कळिकाळाची मर्दिती मान । ऐसे माझे चौघे प्रधान ।
अमित मेळवीन वानरांचे सैन्य । सीता शोधोन आणीन ॥६०॥
स्वर्ग मृत्यु पाताळीं । नेली असतां जनकबाळी ।
घेवोनियां जगधांडोळी । सीता वेल्हाळी आणीन ॥६१॥
श्रीरामा वाहतों तुझी आण । सीता आणीन मी शुद्धि करोन ।
पुढतीं शिवतों तुझे चरण । परम प्रमाण हें माझे ॥६२॥
रूदन करूं नको श्रीरामा । ऐक माझी प्रमाणसीमा ।
अधःपतन जाण मज प्लवंगमा । श्रीरामा सीता जरी मी नाणीं ॥६३॥
सीताशुद्धि सांडोनि श्रीरामा । जरी गुंतेन आणिके कामा ।
तरी वानर अधमजन्मा । श्रीरामा सीता जरी नाणीं ॥६४॥
सांडोनि सीताशुद्धीच्या क्रमा । जरी मी लागेन आणिके कामा ।
तरी धिक्कार माझिया जन्मा । श्रीरामा सीता जरी नाणीं ॥६५॥
सीतावियोगविभ्रमा । दुःख न करीं श्रीरघूत्तमा ।
निमेषे आणीन श्रीरामरमा । प्रतापगरिमा पाहें माझी ॥६६।
लाजविला पितामह ब्रह्मा । लाजविला पूर्वजमहिमा ।
लाजविलें क्षात्रधर्मा । श्रीरामा सीता जरी नाणीं ॥६७॥

श्रीरामांची घोर प्रतिज्ञा :

ऐकोनि सुग्रीवाचे वचन । हास्य करी श्रीरघुनंदन ।
तुज राज्य दारा दिधल्यावीण । सीतास्मरण मज नाहीं ॥६८॥
मित्रकार्यापुढें जाण । सीताशुद्धि मज तृणासमान ।
वाहतों दशरथाची आण । सत्य जाण सुग्रीवा ॥६९॥
जें तूं बोलिलासी निर्वान । तें मज मानलें प्रमाण ।
तुझें कार्य न होता पूर्ण । सीता आगमन मज निंद्य ॥७०॥
वैश्वदेव बळिविधान । न करितां भोजन निंद्य जाण ।
तेंवी तुझें कार्य करितां पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७१॥
न करितां औपासन । स्वदारगमन वेश्येसमान ।
तेंवी तुझेंं कार्य न होतां पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७२॥
अतिथि दवडोनियां निराशन । जेंवी निंद्य होय निजभोजन ।
तेंवी तुझें कार्य न होतां पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७३॥
न करितां संध्यास्नान । यज्ञादि कर्में निंद्य जाण ।
तेंवी तुझें कार्य न होतां पूर्ण । सीताआगमन मज निंद्य ॥७४॥
जरी तुवां येथें आणिली सीता । तुजें कृतकार्य न होतां ।
तिसी मी न पाहें सर्वथा । मज आण दशरथाची ॥७५॥
सीतेचें आधीं कोठें गमन । शुद्धि केल्या मग आगमन ।
वाळिवधालागीं जाण । हें व्यवधान तंव नाहीं ॥७६॥
आधीं साधीन मित्रकार्यार्था । मग शोधोनि आणीन सीता ।
धनुष्यबाण घेवोनि हाता । वाळिवधार्था निघाला ॥७७॥

अद्यैव तं हनिष्यामि तव भार्यापहारिणम् ।
इमे हि मे महाभाग पत्रिणस्तिग्मतेजसः ॥१२॥
वालिसंज्ञममित्रं ते भ्रातरं कृतकिल्बिषम् ।
शरैर्विनिहतं पश्य विकीर्णमिव पर्वतम् ॥१३॥

सुग्रीवा ऐक सावधान । जेणे केलें तुझें दारहरण ।
त्या वाळीचा घेईन प्राण । तीक्ष्ण बाण सोडोनी ॥७८॥
माझे बाण अति तिखट । मंत्रोनि मारीन सदट ।
तेणें वाळीचा छेदोन कंठ । करीन सपाट बाण एकें ॥७९॥
वज्रें हाणीतला पर्वत । जैसा विखुरें पृथ्वीआंत ।
तैसा वाळी वधीन येथ । रूधिरोक्षत देखसी ॥८०॥

वालीचा पराक्रम व सुग्रीवाचे वर्णन :

क्षोभला देखोनि श्रीरघुनाथा । सुग्रीवें चरणीं ठेविला माथा ।
वाळीचिया अति पुरुषार्था । सावधानता अवधारीं ॥८१॥
अरुणोदयापूर्वी जाण । अविश्रमें श्रमेंवीण ।
सप्तसमुद्री करी स्नान । अर्ध क्षण न लागतां ॥८२॥
वाळी सव्यहस्तें पर्वत । सवेग टाकी गगनाआंत ।
वामहस्तें स्वयें झेलित । शतानुशत गिरिवर ॥८३॥

दुंदुभी दैत्याचा वध :

महिषासुराचा जेष्ठ सुत । दुंदुभी नाम महिष अति विख्यात ।
युद्धालागीं परम उदित । विचरत तिहीं लोकीं ॥८४॥
दुंदुभी जावोनि पाताळासीं । युद्ध मागे वरुणापासीं ।
तेणें धाडीलें हेमद्रीपासीं । जाय त्यासीं युद्ध करीं ॥८५॥
दुंदुभी येवोनि युद्धार्थ । हेमाद्रीतें पाचारित ।
तो म्हणे मी यदर्थ अशक्त । जाय युद्धार्थ तूं यमापासीं ॥८६॥
दुंदुभी पाचारी यमासी । यम विचारी मानसीं ।
वाळिहस्तें मृत्यु यासी । तेणें त्यापासीं धाडिलें ॥८७॥

दुंदभे युद्धदानाय नाहं प्रतिबलस्तव ।
युद्धं समबलेनैव कर्तव्यं च जयैषिणा ॥१४॥
किष्किंधां गच्छ रे तत्र वालिनामा हरीश्वरः ।
स युद्धतृष्णामाधूर्य मदं ते नाशयिष्यति ॥१५॥

यम म्हणे दुंदुभीसी । मज युद्ध न करवे तुजसीं ।
तूं युद्ध करीं वाळीसीं । तो समबळेंसीं बळिष्ठ ॥८८॥
वानर वाळी महाबळी । सबळ योद्धा आतुर्बळी ।
पाहता ये भूमंडळी । रणरवंदळी करील ॥८९॥
वाळी युद्धतृष्णातृषित । तूंही युद्धासी अति उद्यत ।
वाळीपासी जावोनि त्वरित । युद्ध पुरुषार्थ करीं त्यांसी ॥९०॥
तू म्हणसीं वाळी कोण । किष्किंधेचा राजा जाण ।
त्यासीं करावें युद्ध दारुण । आंगवण पाहों तुझी ॥९१॥
ऐसें ऐकातां वचन । दुंदुभी सवेग आला जाण ।
ठाकोनि पावला किष्किंधाभुवन । करी गर्जन युद्धार्थ ॥९२॥
येथें कोण सबळ वाळी । तेणें बाहेर निघावें याचिकाळीं ।
युद्धा यावें मजजवळी । रणरांगोळी मी करीन ॥९३॥
ऐकोनि दुंदुभियुद्धवादन । वाळी करोनि उड्डाण ।
सन्मुख आला पैं आपण । रागें गर्जोन भुभुःकारें ॥९४॥
ऐकातां भुभुःकार आरोळी । दुंदुभीची बैसली कानटाळी ।
म्हणे वानर हा महाबळी । केंवी आकळीं संग्रामीं ॥९५॥
वाळीसी हाणितां मुष्टिघात – दुंदुभीचा उखळला हात ।
तेणें धाकें पळे वनांत । अति गुप्त निजगावा ॥९६॥
प्रवेशता निजबिळीं । थापें हाणितला तया वेळीं ।
अशुद्ध वमूनी भूतळीं । प्राण तत्काळीं सांडिला ॥९७॥

कायं कैलाससंकाशमेतदस्ति प्रकाशते ।
उद्धर्तुमेको वाली वा शक्तोऽहं रघुसत्तम ॥१६॥
सर्वप्राणभृतां लोके तृतीयं नोपलक्षये ।
ईद्दशो विक्रमो यस्य जवे चानुत्तमा गतिः ॥१७॥

दुंदुभीचा अतिप्रचंड देह :

त्या दुंदुभीचे कलेवर । कैलासप्राय महाथोर ।
श्रीरामा पाहें पां साचार । अति दुर्धर सुरनरा ॥९८॥
तें उचलावया कलेवर । स्वयें शक्त वाळी वीर ।
दुसरा सुग्रीव वानर । तिसरा शुर असेना ॥९९॥
दुंदुभिदेहउद्धारार्थीं । धांडोळितां त्रिजगती ।
तिसरियाची न चले शक्ती । हे उचलिती दोघे बंधू ॥१००॥

रावणाची दुर्दशा :

तिजा जो उचली अंगभारें । त्याचेनि हस्तें वाळी मरे ।
भाकिलें मातंगऋषीश्वरे । निजनिर्धारें श्रीरामा ॥१०१॥
ऐसा वाळी बळी विख्यात । आणिक त्याचा पुरुषार्थ ।
तुज मी सांगेन इत्थंभूत । ऐक निश्चित श्रीरामा ॥१०२॥
वाळी करितां अनुष्ठान । त्यासी धरूं आला रावण ।
वीस भुजा पसरोन । बळें करून कवळूं गेला ॥१०३॥
तंव येरें पसरोनियां वामहस्त । विसां भुजासमवेत ।
आकळोनि लंकानाथ । काखेंआंत चेपिला ॥१०४॥
विक्षेप जाला अनुष्ठाना । वाळी सवेग उठिला स्नाना ।
काखे असोनि दशानना । तत्क्षणीं निघाला ॥१०५॥
रावण असोनि काखेतळीं । सप्तसागरीं करी आंघोलीं ।
नाकीं तोंडीं भरे जळीं । तेणे तळमळीं रावण ॥१०६॥
काखेहूनि निसटावयासी । सामर्थ्य नव्हे रावणासी ।
कळ लागली दाही शिसीं । कासाविस लंकानाथ ॥१०७॥
काखे सुदला रावण । हें वाळी गेला विसरोन ।
घरा आला स्नान करुन । अति विंदान तेथें जालें ॥१०८॥
आवडीं अंगद उचलिला वाळीं । तंव रावण पडीला भूतळीं ।
देखतां वानरीं सकळीं । भूतावळीं मिळाली ॥१०९॥
रावणाला खेळणे म्हणून अंगदाच्या पाळण्यावर बांधला :
दहा मुकुट मुखें शिरीं । तयासी धरोनि वानरी ।
अंगदाच्या पाळण्यावरी । खेळण्यावरी बांधिलें ॥११०॥
अंगदाचे धारोष्ण मूत । रिचवे रावणाच्या मुखाआंत ।
मुखावरी हाणी लात । मुलें चिमटीत सर्वांगें ॥१११॥

कश्यपमाळेमुळे वाली अजिंक्य :

एक मसी लाविती मुकासी । एकीं हिरतिलें मुकुटासी ।
काळें तोंड मोकळे केंसीं । रावण लंकेसी धाडीला ॥११३॥
ऐशा वाळीचिया पुरुषार्था विचारोनिया श्रीरघुनाथा ।
विक्रमें करवेल घाला । तरी त्या कार्यार्था अंगीकारीं ॥११४॥
वाळी सुग्रीव आम्ही समबळी । कश्यपमाळा वाळीजवळी ।
तेणें त्यासी ख्याती आगळी । युद्धकाळीं मज जिंके ॥११५॥
कश्यपमाळा वरद देख । युद्धीं जो जो सन्मुख ।
तो होईल विमुख । आपण विजयी निजवरदें ॥११६॥

कश्यपाच्या मानासाठी वालीला लपून मारणे :

श्रीराम स्वयें विचारी देख । वाळीस होऊं नये सन्मुख ।
आपण राहोनि विमुख । वाळी अवश्य वधावा ॥११७॥
कश्यपाचिया वरदार्था । अवतार न करवे अन्यथा ।
वाळीस वधावें विमुखता । मित्रकार्यार्था साधावें ॥११८॥

श्रीरामांचे आश्वासन, सुग्रीवाला आनंद :

सुग्रीव बोलिला जें आपण । सप्तताड विषम जाण ।
एकें बाणें करीं छेदन । वालिर्निदळण त्याचेनि ॥११९॥
वाळी सुग्रीव महावीरां । यांहोनि वेगळा जो आपण तिसरा ।
उचलील दुंदभीच्या कलेवरा । वाळिवानरा तो वधील ॥१२०॥
ऐसें बोलतां सुग्रीवासी । श्रीरामें आश्वासिलें त्यासी ।
दाखवी दुंदुभिकलेवरासी । आणि सप्ततालांसी छेदावया ॥१२१॥
दुंदुभिकलेवर मज तृण । वामांगुष्ठें उचलीन जाण ।
सप्ततालांचे छेदन । करीन संपूर्ण बाणें एकें ॥१२२॥
ऐसें बोलतांचि जाण । श्रीरामें धनुष्या वाहोनि गुण ।
म्हणे मज दावीं तालवन । सीतीं बाळ लावोनी ॥२२३॥
करावया वाळीचा घात । श्रीरामें धनुष्या घातला हात ।
सुग्रीव आनंदें नाचत । कृपा श्रीरघुनाथ तुष्टला ॥१२४॥
एकाजनार्दना शरण । सुग्रीवाशीं सख्य जालें पूर्ण ।
पुढे वाळीचें निर्दळण । स्वयें श्रीरघुनंदन करील ॥१२५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवसख्यनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
॥ ओंव्या १२५ ॥ श्लोक १७ ॥ एवं १४२ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

 भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा  भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा  भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा  भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा  भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तिसरा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *