भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तेरावा

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तेरावा

श्रीराम-हनुमंत संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुग्रीव अंगदाला हनुमंताच्या स्वाधीन करुन त्याच्यावरच सर्व भार टाकतो :

सीताशुद्धीस गेले वानर ।दक्षिणेसी संगद वीर ।
निघाले ही सहपरिवार । वानरवीरसमवेत ॥१॥

सह तारांगदाभ्या तु प्रस्थितो हनुमान्कपिः ।
सुग्रीवेण यथोद्दिष्टं तं तु देशं सुरासदम् ॥१॥

सु्ग्रीवें बोललावोनि हनुमंत । हातीं दिधला वािलसुत ।
सीताशुद्धीं रामकार्यार्थ । तुझेनि निजविजयी ॥२॥
अंगद वीर अति विख्यात । सवे नळ नीळ जांबुवंत ।
वानरवीर असंख्यात दुर्धर पंत दक्षिणे ॥३॥
सिद्धि न्यावया रामकार्यार्था । शुद्धि साधावया सीता ।
मुखरण करोनि हनुमंता । होय धाडिता सुग्रीव ॥
सीताशुद्धि माझे माथां । सुग्रीवें ठेविली तत्वतां ।
तेणें उल्लास हनुमंता । श्रीरामकांता शोधावया ॥५॥

हनुमंत श्रीरामांकडे जाण्याची अंगदाची आज्ञा मागतो :

कैसी आहे पां ते सीता । गुणलक्षणस्वरुपता ।
समूळीं पसोन श्रीरघुनाथा । वनीं गिंवसितां ओळखाया ॥६॥

हनुमंत श्रीरामांकडे जाण्याची अंगदाची आज्ञा मागतो :

कैसी आहे पां ते सीता । गुणलक्षणस्वरुपता ।
समूळीं पुसोन श्रीरघुनाथा । वनीं गिवसितां ओळखाया ॥६॥
सद्‌गुरुमुखें सद्‌भावें । स्वरुपनिश्चय न करवे ।
तरी ते वस्तुप्राप्ति न होय । व्यर्थ भोंवे वनवासीं ॥७॥
स्वरुपनिश्चयो न करितां । वानर पाहूं गेले सीता ।
त्यांसी न लभे ते सर्वथा । येतील आतां परतोनी ॥८॥
स्वरुपनिश्चय झाल्याविण । वस्तु प्राप्ती नव्हे जाण ।
हीन दीन खालती मान । येती परतोन अवघेही ॥९॥
वस्तुप्राप्तीविण देख । परते त्यांचे काळें मुख ।
देव पितर त्या विमुख । एक एक त्या हांसती ॥१०॥
तैसे न करावें आपण । निश्चय करोनि संपूर्ण ।
सर्वभूतीं सावधान । सीताचिद्रत्‍न शोधावें ॥११॥
ऐसें धरोनि मानसीं । हनुमंत पुसें अंगदासी ।
नमस्कारोनि श्रीरामासी । शीघ्र तुजपासीं येईन ॥१२॥
सुग्रीवें तुज सवें धाडितां । हर्ष ओसंडला चित्ता ।
पुसों विसरलो श्रीरघुनाथा । वंदोन आतां येईन ॥१३॥

अंगदाची विनयवृत्ती व मारुतीची स्तुती :

एकोनि हनुमंताचे वचन । अंगदे घातलें लोटांगण ।
नमस्कारोनि श्रीरामचरण । शीघ्र आपण येथे यावें ॥१४।
तुझेनि पिता वाळी निर्मुक्त । तुझेनि सुग्रीव सनाथ ।
तुझेनि आम्हां श्रीरघुनाथ । स्वामी संतत लाधला ॥१५॥
तुझेनि श्रीरामदर्शन । तुझेनि वानरां भवतरण ।
तुझेनि सुग्रीव राजासन । तुझे महिमान अगाध ॥१६॥
तूं स्वामीं आम्हां दास्य । तूं माउली आम्ही पोष्य ।
तूं सद्‌गुरु आम्ही शिष्य । सत्य भाष हे माझी ॥१७॥
ऐंसे असोनि तत्वतां । सेवक  म्हणविसीं हनुमंता ।
ऐसी तुझी अगाधता । वेदशास्रार्था अगस्य ॥१८॥

सर्व वानर अंगदाचे कौतुक करितात :

ऐकोनि अंगदाचें वचन । नळ नील जांबुवंत तारानंदन ।
अवघे घालिती लोटांगण । नमूनि चरण हनुमंताचे ॥१९॥
धन्य धन्य अंगदा तुझी वाणी । धन्य अंगदा तुझी जननी ।
धन्य धन्य तुझी करणी । वानरसैन्यीं तूं धन्य ॥२०॥
ऐसे वानर समस्त । अंगदाचे गुण वर्णित ।
हनुमंतासी शरणागत । अभिवंदित दोघांसी ॥२१॥
कुमार आणि विवेकता । राजा आणि विनीतता ।
यथार्थवादें रसाळ वक्ता । तेणें हनुमंता आल्हाद ॥२२॥
चुंबोनि अंगदाचें वदन । हर्षें दिधलें आलिंगण ।
दोघां सुखसमाधान । आनंदघन श्रीराम ॥२३॥

हनुमंताचा रामांना प्रश्न :

गहन गंभीर हनुमंत । आपला निजनिश्चितार्थ ।
कळों नेदीच लोकांत । पुसे गुह्यार्थ श्रीरामा ॥२४॥
ऐसें पुसोनि अंगदासी । हनुमंत आला श्रीरामापासीं ।
बैसोनियां एकांतासीं । सीता त्यापासीं पुसतसे ॥२५॥
गवेषितां दक्षिणेसीं । सीता भेटल्या आम्हांसी ।
आम्हीं ओळखावी कैसी । तिच्या स्वरुपासी मज सांगे ॥२६॥
रुपरेखा ठाणमाण । गुणगरिमा लक्षलावण्य ।
वस्ती स्थिति गति महिमान । कृपा करोनि मज सांगा ॥२७॥

श्रीरामांचे स्पष्टीकरण :

ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
निजशक्तीचें महिमान । निजलक्षण सांगत ॥२८॥
ऐक बापा हनुमंता । पुसो आलासी एकांता ।
मज तुज नाहीं भिन्नता । यर्थार्थ सीता सांगेन ॥२९॥

सीतेचे रुप व गुणवत्ता :

माझें स्वरुप चैतन्य घन । सीता चिच्छक्ति संपूर्ण ।
सीतेंसी मज वेगळे पण । अणुप्रमाण असेना ॥३०॥
श्रीराम गोडी सीता साकर । श्रीराम रस सीता नीर ।
श्रीराम घृत सीता क्षीर । चिदचिन्मात्र श्रीरामसीता ॥३१॥
मेळवितां द्रव्यांतर । अग्नी भासें द्रव्याकार ।
तेंवी सीता चिन्मात्र । दिसे साकार विश्वरुप ॥३२॥
नाबदेचे नारळ पूर्ण । कवटें काढी तो करंटा जाण ।
तेंवी सीता सच्चिद्धन । मनुष्यपण तीस नाहीं ॥३३॥
नारळ सर्वांगीं साकर । सीता चैतन्य साकार ।
तिचा इंद्रियव्यापार । चिदचिन्मात्रस्वभावें ॥३४॥
अर्धनारीनटेश्वर । दों स्वरुपीं एक शरीर ।
तेंवी सीता श्रीरामचंद्र । अभिन्नाकार भिन्नत्वें ॥३५॥
पुरुषभाग स्वयें लपवी । स्वइच्छा प्रकृतींतें नाचवी ।
प्रकृतिभाग जैं लपवी । प्रकटी पदवी पुरुषाची ॥३६॥
भ्रांति पडदा सोडितां जाण । मिथ्या प्रकूतिपुरुषभान ।
तेंवी सीताश्रीरघुनंदन । चैतन्य घनस्वरुप ॥३७॥
असतां भ्रांति पडदा साचार । तेथींचा हा निजनिर्धार ।
शोधूनियां न पाहती नर । तोचि विचार अवधारा ॥३८॥
दोहीं भागांचा व्यापार । जेंवी चालवी नटेश्वर ।
तेंवी सीता श्रीरामचंद्र । धरिती अवतार देवकार्या ॥३९॥
स्वपदी स्थापावया सुरवर । भक्तां द्यावया सुख साचार ।
सीता आणि श्रीरामचंद्र । धरिती अवतार स्वलीला ॥४०॥
अवताराच्या स्वलीळा । साकारें शोभे जनकबाळा ।
तिच्या स्वरुपाचा सोहळा । ऐकें कुशळा हनुमंता ॥४१॥
सीतेसी नित्य न गमनागमन । हे मुख्य ओळखावी खूण ।
सीतेचें अचरण चळण । चरणेंवीण गति तीसी ॥४२॥
द्वंद्वेंवीण पदद्वंद । तेचि सीतेचें निजपद ।
जीवशिवपणाचा उच्छेद । तो पदबंध सीतेचा ॥४३॥
फडा पुच्छा वांकुडा नाग । तो नाग म्हणती सोनेचि सांग ।
तेंवी गुल्फा जानू विभाग । सीतेची चांग चिन्मात्र ॥४४॥
सीतागुह्येंद्रियविचार । तिचे निजगुह्य श्रीरामचंद्र ।
तेथील रतिसुखाचें सार । असारसार श्रीराम ॥४५॥
श्रीसीतेंचें जें कां निजउदर । मळेंवीण निर्मळ साचार ।
चैतन्याग्नि वसवी जठर । तें माहेर जिवशिवां ॥४६॥
सीतेंचे जें हृदयभुवन । नित्य वसवी श्रीरघुनंदन ।
हे मुख्य हनुमंता ओळखण । सुखसंपन्न श्रीरामें ॥४७॥
आंगींच्या अंगीं वाढोनी दोनी । जीवशिव कुच दोन्ही स्थानीं ।
जग जिववी स्तनपानीं । कुचकामिनी स्तनभारें ॥४८॥
जीवशिवकुचाच्छादनीं । विद्या अविद्या पांखे दोनी ।
बांधिले त्रिगुणांचे कसूनी । श्रीरामावांचोनी कोण सोडी ॥४९॥
जीवशिवकुचांचे मर्दन । करिता एक श्रीरघुनंदन ।
येर बापुडें मशक कोण । मरेल रावण अभिलाषी ॥५०॥
श्रीरामानामाचें निजमणी । गांठ्याळ फिकेचे सांडोनी ।
अनुस्यूत तंतु घेवोनी । अनुसंधानीं ओंविले ॥५१॥
सौभाग्यकल्याणश्रेणी । जे अतर्क्य जननयनीं ।
कंठी श्रीराम आहेवमणी । जो शिरोमणी अलंकार ॥५२॥
कंठावरील चिबुका । रामश्यामें गोंदली देखा ।
रावण पाहता तिचिया मुखा । श्यामशंका तो मानी ॥५३॥
जनमुखींचे अधर अधर । सीतामुखींचे ते अधर सधर ।
आवडीं चुंबी श्रीराम चंद्र । तें सुखसार सीतेसी ॥५४॥
मुक्तपणाच्या विलासा । वनिताअधरीं सुवर्णफांसा ।
पडोनि मुक्त आलें नासा । रामपरेशा न भजोनी ॥५५॥
जानकीनाकींचे निजमोतीं । सहज देखे श्रीरघुपती ।
अधोमुखें ओळकंबती । मुक्तामुक्ती श्रीरामें ॥५६॥
जगमुखींचें नासिक । श्र्लेष्मागमनें पावे दुःख ।
जानकीमुखीं नाका बिक । चढलें देख श्रीरामें ॥५७॥
जानकीचे निजनयन । देखणेपणें सुनयन ।
तेणें देखणेपण जाण । श्रीराम परिपूर्ण तें देखे ॥५८॥
जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षराक्षर ।
भुतमात्रीं देखे अक्षर । चिदचिन्मात्र श्रीराम ॥५९॥
सीतेचे जे निजश्रवण । सावधान नित्य जाण ।
वचनाक्षरें रघुनंदन । समाधान श्रवणार्थी ॥६०॥
धन्य सीतेंचे कपाळ । श्रीरामनमनें नित्य सफळ ।
प्रेमकुंकुम सोज्वळ । सुखकल्लोळ श्रीरामें ॥६१॥
सीताहस्तक्रिया समस्त । कर्ता देखे श्रीरघुनाथ ।
श्रीराम हातांचाही हात । कर्मनिर्मुक्त श्रीरामें ॥६२॥
सीतासतीचे निजशिरीं । राम शिरोमणी शिरावरी ।
चिद्रत्‍नांच्या अलंकारीं । फरा त्यावरी शोभत ॥६३॥
गाळोनियां परम पीयूष । सोलींव सुखाचेंही निजसुख ।
तेणें ओतींव श्रीमुख । अलौकिक रामप्रिया ॥६४॥
जानकींचे मन सुमन । श्रीरामध्यानीं तें परिपूर्ण ।
मनीं मननचि निर्मन । सावधान श्रीरामें ॥६५॥
सीतेच्या चित्तीं रामचिंतन । तेणें चित्त चिंतविहीन ।
चित्तीं चित्त चैतन्यघन । समाधान श्रीरामें ॥६६॥
जानकीदेहींचा देंहाभिमान । अहंसोहंकोहंविहीन ।
करितां श्रीरामनामस्मरण । अहं पूर्णपरब्रह्म ॥६७॥
समुद्रीं विरोनि लवण । स्वयें समुद्र होय आपण ।
तेंवी सीतेचा अभिमान । होय परिपूर्ण श्रीरामें ॥६८॥
सीतादेहींची निजबुद्धी । नाहीं प्रपंच परत्र आधी ।
नाहीं जन्ममरणव्याधी । नित्यसमाधि श्रीरामें ॥६९॥
जानकीच्या निजदेहीं । देहा देहत्वचि नाहीं ।
देहीं वर्ततां विदेही । हे खुण पाहीं नित्यत्वें ॥७०॥
ऐसें सीतेचें लक्षण । ऐक आतां तिचे गुण ।
गुणागुणीं नित्य अगुण । स्वयें सगुण दिसताहे ॥७१॥
जानकींचे पाहतां ठाण । सर्वांसी दिसे साधारण ।
परी तीस ठेंगणें गमन । स्वरुपें सामान्य दिसतांहि ॥७२॥
सीतेंचे निजमहिमान । वेदशास्रां अगम्य जाण ।
सांगों जातां ठाणमाण । पडे मौन  चहूं वाचां ॥७३॥
सीतारुपरेखागुणलक्षण । सांगितलें ठाणमाण ।
आतां स्थितीचें महिमान । सावधान  अवधारीं ॥७४॥

सीतेची अवस्था :

सीतेची जेथ वसती घडे । तेथें राम राम स्मरती झाडें ।
पशुपक्षियां स्मरण घडे । पाषाण खडे राम स्मरती ॥७५॥
जानकी स्पर्शाचें जीवण । नित्य स्मरे श्रीरघुनंदन ।
जानकी जिवननिमग्न । त्यास समाधान श्रीरामें ॥७६॥
सीतासतीची निजधारा । नित्य स्मरे श्रीरामचंद्रा ।
सीतांगस्पर्शाचा वारा । श्रीराघवेंद्रस्मरणेंसीं ॥७७॥

हे सर्व ऐकत असता मारुतीचा ब्रह्मानंद :

सीतास्वरुपवृत्तांत । आदरें सांगे श्रीरघुनाथ ।
तें ऐकतां हनुमंत । पडे मूर्च्छित स्वानंदें ॥७८॥
सप्रेम प्रेमयुक्त । मूर्च्छित पडिला हनुमंत ।
कृपें कवडी श्रीरघुनाथ । हृदयाआंत आलिंगी ॥७९॥
देतां हनुमंता आलिंगण । श्रीराम नाठवे रामपण ।
मारुतीस नाठवे वानरपण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें जाला ॥८०॥
विरोनि गेलें मीतूंपण । खुंटले बोल तुटलें मौन ।
दोघे जाले चैतन्यघन । वस्तु परिपूर्ण परिपूर्णत्वें ॥८१॥
सीतेंचें स्वरुप सांगतां । धणी न पुरे श्रीरघुनाथा ।
धन्य धन्य श्रीरामकांता । तेणें हनुमंता उल्लास ॥८२॥
तुम्ही सीताशुद्धि करितां । या खुणा पहाव्या हनुमंता ।
असें श्रीरामें सांगतां । मारुतीचित्ता आल्हाद ॥८३॥
हनुमंत म्हणे श्रीरघुनाथा । इहीं लक्षिणीं लक्षितां ।
मी जाणेन जनकदुहिता । सीता सर्वथा मज नेणे ॥८४॥
पूर्वीं मज नाहीं देखिलें । पूर्वीं मज नाहीं ऐकिलें ।
अकस्मात रामें धाडिलें । सत्यत्वें बोल मानीना ॥८५॥

मारुतीला खुणा समजल्याचे रामांना आश्वासन :

ऐसाचि रावण कपटी । संन्यासवेषे घेऊनि भेटी ।
मज सिंतरिलें भिक्षेसाठीं । त्याचि परिपाटीं वानरु ॥८६॥
श्रीरामाच्या गोड गोष्टी । शुद्धि सांगतो गोमटी ।
परी हा वानर कपटी । विश्वास पोटीं मानीना ॥८७॥
जेथें विश्वास नाहीं पोटीं । तेथें जालिया व्यर्थ भेटी ।
भावार्थाच्या गुह्य गोष्टी । सीता गोरटी सांगेना ॥८८॥
नाहीं भेटी नाहीं गोष्टी । दुरोनि सीता देखिली दृष्टीं ।
ऐसिये शुद्धीचे परिपाटीं । तृणासाटीं सरेना ॥८९॥
सीतामनोगत सकळ । सीता वसती तें कोण स्थळ ।
रावणाचें किती बळ । तें मी सकळ शोधीन ॥९०॥
ऐंसे मनोगत श्रीरघुनाथा । जेणें मज आप्त मानील सीता ।
ऐसिया देखावें कार्यार्था । चरणीं माथा ठेविला ॥९१॥

रामांनी हनुमंताजवळ आपली मुद्रिका (अंगठी) दिली :

ऐसें बोलतां हनुमंता । परम सुख श्रीरघुनाथा ।
निजात्ममुद्रा होय देता । ठेवोनि माथां वरदहस्त ॥९२॥

ददौ तस्मै ततः प्रीतः स्वनामांकोपशोभितम् ।
अंगुलीयमाभिज्ञानं राजपुत्र्या परंतपः ॥२॥
एतद्द्दष्ट्वा हरिश्रेष्ठो दर्शने जनकात्मजा ।
मंस्यते मन्नियुक्तं त्वां लाघवं न करिष्यति ॥३॥

मुद्रिका देखिलिया दृष्टीं । सीता सुज न मानी कपटी ।
म्यां धाडिलासी शुद्धीसाठीं । सत्य गोरटी मानील ॥९३॥
श्रीरामनामांकित मुद्रा । देखतांचि सीता सुंदरा ।
आप्त मानील कपींद्रा । श्रीरामचंद्राचेनि धर्में ॥९४॥
मुद्रा देखोनि नामांकित । जीवाहूनियां परम आप्त ।
सीता मानील हनुमंत । रामकार्यार्थ साधील ॥९५॥
आधींच वानर बळवंत । त्यावरी मस्तकीं श्रीरामहस्त ।
श्रीराममुद्रा जाली प्राप्त । उल्लासत हनुमंत ॥९६॥

ती मुद्रिका कोठे पडू नये म्हणून आपल्या मुखात ठेविली :

घेईन त्रिभुवनीं घरधांडोळीं । शोधोनियां जनकबाळी ।
करीन राक्षसां रवंदळीं । हर्षे टाळी पिटिली ॥९७॥
श्रीराममुद्रा आली हाता । लंका जाळीन मी आतां ।
किती बळ लंकानाथा । तेंही सर्वथा तुकीन ॥९८॥
इंद्रजित बळी निशाचरी । त्यासीं मी करीन संग्राम थोरी ।
रावणा करीन थोर मारी । करीन बोहरी राक्षसां ॥९९॥
येणें हर्षें हनुमंत । नमस्कारुनि श्रीरघुनाथ ।
वेगीं उडाला गगनांत । रामाकार्यार्थ साधावया ॥१००॥
श्रीराममुद्रा घालितां हातीं उडतां गळोनि पडेल क्षितीं ।
वस्र नाहीं मारुतीप्रती । पालवाप्रती बांधावया ॥१०१॥
गांठीत घालितां गांठ्याळ । विकल्प मानी तो सट्याळ ।
आळ करी तो खत्याळ । जाण चांडाळ नाठवी तो ॥१०२॥
राम नावडे जयासी । तो जाणावा पापराशी ।
सकळ दोष तयापासीं । क्षयो त्यासी आकल्प ॥१०३॥
रामनाम न माने जयासी । अर्थवाद म्हणे नामासी ।
जितांचि प्रेतत्व त्यासी । स्पर्शों नये तयाला ॥१०४॥
धन्य युक्ति त्या कपींद्रा । हाता येतां श्रीराममुद्रा ।
मुखीं घालोनि वानरेंद्रा । केला थारा निहृदयीं ॥१०५॥
वानरांचे ठेवणें । गालफडां भरावे चणे ।
हनुमंतेंहि तैसेंचि करणें । मुखी घालणें श्रीराममुद्रा ॥१०६॥
जिव्हेपासून हृदयभुवन । नाममुद्रे सांठवण ।
हनुमंतें करोनि उड्डाण । शीघ्र गमन रामकार्या ॥१०७॥

हनुमंत पुनश्च अगंदाकडे आला :

नळ नीळ जाबंवंत । जेथें अंगद वाट पाहत ।
तेथें आला हनुमंत । सीताशुद्ध्यर्थ शोधावया ॥१०८॥
आला देखोनि हनुमंत । अंगद जाला हर्षयुक्त ।
वानरां आल्हाद बहुत । दक्षिणपंथ शोधावया ॥१०९॥
एकाजनार्दना शरण । शोधावया दिशा दक्षिण ।
वानरवीरां उल्लास पूर्ण । तेंही निरुपण अवधारा ॥११०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
श्रीरामहनुमत्संवादो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥
॥ ओंव्या ११० ॥ श्लोक ३ ॥ एवं संख्या ११३ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तेरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तेरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तेरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय  भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय तेरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *