संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा

हनुमंताचे समुद्रावरुन उड्डाण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

आख्याता गृध्रराजेन समुत्पत्य प्लवंगमाः ।
संगताः प्रीतिसंयुक्ता विनेदुः सिंहविक्रमाः ॥१॥

संपातीकडून सीतेची माहिती मिळाल्यामुळे वानरांना आनंद :

संपातीनें सीताशुद्धी । यथार्थ सांगितली बुद्धी ।
तेणें वानरांची मांदी । जयजयशब्दीं गर्जत ॥१॥
मिळोनि वानरांचा भार । सिंहनादाहूनि थोर ।
करिते जाले भुभुःकार । सीता सुंदर सांपडली ॥२॥
येरयेरां आलिंगण । येरयेरां अभिनंदन ।
सीता सांपडली चिद्रत्‍न । हर्षे उड्डाण करिताती ॥३॥
आमच्या कष्टांची जाली सिद्धी । आजि पावली सीताशुद्धी ।
म्हणोनि वानरांची मांदी । हर्षानुवादीं डुल्लत ॥४॥
येरयेरां दाविती वांकुल्या । येरयेरा करिती गुदगुल्या ।
सत्य सीताशुद्धी जालिया । आमची फिटली आशंका ॥१०५॥
अंगदे बैसोनि सपरिवार । शतयोजन हा सागर ।
उल्लंघो शके कोण वीर । तो विचार मांडिला ॥६॥
पाचारोनियां जुत्पती । समुद्रालंगनाचा अर्थीं ।
कोणासी किती आहे शक्ती । तं समस्तीं सांगावें ॥७॥

अथांगदवचः श्रुत्वा सर्वे वानरपुंगवाः ।
स्वां स्वां गतिं समुत्साहमूचुस्तत्र समाहिताः ॥२॥
गजो गवक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
मैदश्च द्विविदश्चैव सुषेणो जांबवान्नलः ॥३॥

अंगदाच्या प्रश्नावरुन वानरांचा पराक्रम :

ऐकोनि अंगदवचनोक्ती । अकरा जण सेनापती ।
समुद्रलंघनाचे अर्थीं । आपुलाली शक्ती सांगती ॥८॥
गज सांगे निजनिर्वाण । दश योजनें मज उड्डाण ।
गवाक्ष बोले प्रमाण । त्याहूनि द्विगूण शक्ति माझी ॥९॥
शरभ सांगे अति निगुतीं । तीस योजनें माझी शक्तीं ।
चाळीस योजनांची गती । बोले पुरुषार्थीं वृषभ तो ॥१०॥
शक्ति बोले गंधमादन । पन्नास योजनें मज उड्डाण ।
मैंद बोलिला आपणासाठी योजनें शक्ति माझी ॥११॥
द्विविद आपुली थोरी । उड्डाण योजनें सत्तरी ।
सुषेण महावीर वानरीं । सरीं नांवावरी नेवों नये ॥१२॥
तारेचा पिता जो सुषेण । पश्चिमशोधा धाडिला जाण ।
त्याचेनि नावें वीर आन । त्याचें उड्डाण चार विसा ॥१३॥
सांगावया निजपुरुषार्थ । लज्जायमान जांबवंत ।
सुखी न करवेचि श्रीरघुनाथ । बळाचा घात वार्धक्यें ॥१४॥

जांबवंताचा पराक्रम :

मज तारुण्यावस्था असती । तैं आणूनि सीता सती ।
सुखी करितों श्रीरघुपती । गेली शक्ती वार्धक्यें ॥१५॥

किंतु वक्ष्याम्यहं वीर्यमात्मनो यौवनोदये ।
सुषेणेन मया चैव वलियज्ञे सनातनः ॥४॥
प्रदक्षिणीकृतः पूर्व क्रममाणस्रिविक्रमः ।
विक्रमेण मया तात सशैलवनकानना ॥५॥
त्रिःसप्तकृत्यःपृथिवी परिक्रांता प्रदक्षिणम् ॥६॥

माझे तारुण्यपुरुषार्था । माझा मी सांगेन आतां ।
करूं नका उपहासता । समूळ कथा अवधारा ॥१६॥
बळियज्ञीं नारायण । वामनरुपी जावोनि आपण ।
करावया बळीचें छळण । जाला आपण त्रिविक्रम ॥१७॥
तेणें काळीं मी आणि सुषेण । दोघां पूर्ण तारुण्यपण ।
करावया त्रिविक्रमप्रदक्षिण । दोघे जण निघालों ॥१८॥
त्रिवार करिंतां प्रदक्षिण । सुषेणाची शक्ति क्षीण ।
चालतां मेटें वळली जाण । मूर्च्छापन्न तो पडिला ॥१९॥
ते काळीं माझीं आंगवण । लक्षोनि त्रिविक्रमचरण ।
पृथ्वी सशैलवनकानन । केलें प्रदक्षिण त्रिःसप्त ॥२०॥
एकवीस वेळां एके उच्छवासीं । करोनि पृथ्वीप्रदक्षणेसी ।
सवेंचि गेलों कैलासासी । महेशासी वंदावया ॥२१॥

गत्वा वेगेन कैलासमागतो विबुधालये ।
दैत्यः पर्वतहस्तः सन्देवेंद्रमभिपद्यत ॥७॥
बलदैत्यो मम पिता देवेंद्रेण हतः पुरा ।
इत्युक्त्वा पर्वंत तस्मै चिक्षेपासुरनंदनः ॥८॥
ततः पतनखेदात्तु पर्वतो जानुना धृतः ।
तेन भग्नश्च जानुर्मे जातोऽहं न्यूनविक्रमः ॥९॥
स कदाचिद्‌गतो हंतुं विबुधानृषिस तमान् ।
बलपुत्रमहं हत्वा क्रोधान्मृत्युमिवापरम् ॥१०॥

बलकथन :

वेगीं जावोनि कैलासासी । वंदोनियां महेशासी ।
बळपुत्र आला स्वर्गासी । इंद्रादिकांसी वधावया ॥२२॥
बळ दैत्य माझा पिता । इंद्रें वधिला अवचिता ।
त्याचा सूड घेईन आतां । करीन घाता इंद्राच्या ॥२३॥
येणें रागें दैत्यसुतें । मारावया इंद्रातें ।
पर्वत उचलोनियां हातें । कोपें अद्‌भुत चालिला ॥२४॥
इंद्रे हाणितलें वज्रघातें । वज्र घेलोनि डावे हातें ।
मग मारावया इंद्रातें । कोपें अद्‌भुत चालिला ॥२५॥
बळपुत्र महाबळी । पर्वत झेलोनि करतळीं ।
करावया इंद्राची रांगोळी । क्रोधानळीं चालिला ॥२६॥
येतां देखोनि गिरिवर । स्वर्गीं कांपती सुरवर ।
तों म्यां झेलिला सत्वर । उडी अति शीघ्र घातली ॥२७॥
पर्वत झेलिला त्वरेंकरी । तो निसटला दोहीं करीं ।
मग म्यां धरिला जानूंवरी । अमरपुरी वांचविली ॥२८॥
क्रोधे येतां बळपुत्रासीं । म्या दृढ युद्ध केलें त्यासीं ।
माझें बळें होतां कासाविसी । लघु लाघवेंसीं पळूं पाहे ॥२९॥
पर्वतघातें भग्नचरण । तेणेंसी शीघ्र करोनि उड्डाण ।
बळपुत्राचा घेतला प्राण । तेणें सुरगण सुखावले ॥३०॥
तैंपासूनि भग्नचरण । माझी वार्धक्यें शक्ति क्षीण ।
तरी समुद्रीं उड्डाण । नव्वस योजनें करीन ॥३१॥

नळ, नीळ जांबवंत वीर्यकथन :

नळ बोलिला आपण । समुद्रामाजी उड्डाण ।
सत्याण्णव योजनें करीन जाण । त्यावरी त्राण मज नाहीं ॥३२॥
नीळ बोलिला वचन । एकें उड्डाणें शत योजन ।
करीन समुद्रोल्लंघन । हे आंगवण पैं माझी ॥३३॥
वालिसुत राजकुमर । अंगद जो कां महावीर ।
समुद्रोल्लंघनप्रकार । निजनिर्धारें सांगत ॥३४॥
शतयोजनें अब्धिलंघन । एक उड्डाणें करीन जाण ।
पुढती यावयालागीं जाण । संदेहापन्न मति माझी ॥३५॥
एके उड्डाणें उठाउठीं । जाईन समुद्रपरतटीं ।
तेथें आलिया राक्षसथाटी । युद्ध निजनेटीं होय नव्हे ॥३६॥
माझें अंगी बाळपण । नाहीं निवडली आंगवण ।
तरी स्मरोनि श्रीरामचरण । सीता साधीन निमेषार्धें ॥३८॥
ऐकोनि अंगदाचें उत्तर । वानरीं केला जयजयकार ।
जुत्पती करिती जोहार । तूं राजकुमर आतुर्बळी ॥३९॥
आम्ही असतां सेवक सकळ । राजकुमर आणि तूं बाळ ।
समुद्रलंघनाचें स्थूळ । तुजवरी सळ नयें घालूं ॥४०॥

जांबवंत हनुमंताची स्तुती करितो :

अंगद म्हणे हें करितां । प्राण देणें लागेल समस्तां ।
सीताशुद्धीवीण जातां । अपमानता अनिवार ॥४१॥
तंव बोलिला जांबवंत ॥ हनुमंत वीर अति विख्य़ात ।
हा कां उगाचि असे पहात । अत्यद्‌भुत प्रतापी ॥४२॥
बाळपणीं आकळितां भानु । राहूचा निर्दळिला अभिमानु ।
याचा पिता प्रभंजनु । बळवाहनु हनुमंत ॥४३॥
त्यासी गर्भी ब्रह्मचर्यकौपीन । त्याचा देखणार रघुनंदन ।
माता अंजनी न देखे नग्न । ब्रह्मचारी पूर्ण कपिराज ॥४४॥

मारूतीचे उड्डाणकथन :

ऐसें बोलतां जांबवंत । स्तवनें हरिखला हनुमंत ।
लांगूल त्राहाटिलें रोमांकित । आल्हादयुक्त उठिला ॥४५॥
शतयोजनें अब्धिलंघन । तें माझें पादक्रमण ।
तुम्हांसी संदेह तो कोण । सीता आणीन निमेषार्घे ॥४६॥
करोनि रावणा उपहती । राक्षसा लावोनियां ख्याती ।
प्रतापें आणीन सीता सती । श्रीरघुपतिसुखार्थ ॥४७॥
आणिक एक विचार । तुम्हांसी सांगेन साचार ।
जेणें सुखी होय रघुवीर । तोही प्रकार मी करीन ॥४८॥
अवज्ञेनें आणितां सीता । कोप य़ेईल श्रीरघुनाथा ।
तरी गांजोनि लंकानाथा । शुद्धि मी आतां आणीन ॥४९॥

महासंहननोपतौ महान्तौ पुरुषर्षमौ ।
ऋष्यमूकात्पुनः शैलादुभौ तौ रामलक्ष्मणौ ॥११॥
आनयिष्यामि वैदेह्याः सकाशं वानरर्षभ ।
आनयिष्यामि तां देवीं । रामस्य महिषीं प्रियाम् ॥१२॥

राक्षसासी राम लक्ष्मण । वीर शूर दोघे जण ।
सीतेपासीं मी नेईन जाण । सकुळी रावण निर्दळावया ॥५०॥
ऋष्यमूकपर्वताहूनि जाण । घेवोनियां राम लक्ष्मण ।
घालीन लंकेवरी उड्डाण । सकुळी रावण मारावया ॥५१॥
अथवा मी आतुर्बळी । करीन राक्षसां रवंदळी ।
सीता आणीन रामाजवळी । हरिखें टाळी पिटित ॥५२॥
सीता आणीन रामापासीं । कां राम नेईन सीतेपासीं ।
अथवा शुद्धि आणिन तुम्हांपाशीं । या कार्यासी मी कर्ता ॥५३॥
लंकाद्वारीं रणकल्लोळीं । खेळेन शिरांची चेंडूफळी ।
लंकेची करीन होळी । तरी मी बळी हनुमंत ॥५४॥
सीताशुद्धि ते तंव किती । यालागीं कायसी कुंथा-कुंथी ।
सुखी रहावें समस्तीं । लंकेप्रती मी जातो ॥५५॥
ऐंसें बोलोनि आपण । समस्तांसीं घालोनि लोटांगण ।
अंगदें दिधलें आलिंगन । गर्जे गगन आल्हादें ॥५६॥
कपी हरिखले समस्त । त्यांसी हनुमंत बोलत ।
माझा उड्डाण अंगवात  । सहावया शक्त तुम्ही नव्हां ॥५७॥
माझे उड्डाणाचे निजनेटें । महेंद्र पृथ्वीमाजी दाटे ।
पर्वतशिखरें होती पीठें । कडे कपाटें बुजतील ॥५८॥
उड्डाणाचा अंगवात । पर्वत तुटोनि तळीं पडत ।
शिखरें तृणप्राय उडत । वृक्ष उपडत समूळीं ॥५९॥
वृक्ष उपडोनि समूळीं । परिभ्रमती अंतराळीं ।
शुष्क पर्णें वाहुटळीं । तैशा वेळुजाळी उडतील ॥६०॥
उचंबळेल समुद्रजळ । तेणें तिमेल ध्रुवमंडळ ।
दिग्गज कांपती चळचळ । अति तळमळ जळचरां ॥६१॥
अंगवाताचेनि घर्घरें । बैसती मेघांची दांतोरें ।
समुद्रगडगर्जनविसरें । येतील शाहारे कळिकाळा ॥६२॥
त्या नादाचा धाक अति दुर्धर । सुर नर धाकती निशाचर ।
तेथें तुम्हीं गा वानर । कैसेनि धीर धराल ॥६४॥
यालागीं तुम्ही वानरगण । हात धरोनि अवघे जण ।
पर्वत कवळा सत्राण । तरीच प्राण उरतील ॥६५॥
दक्षिणेचे पर्वतकडे । तुटोनि पडती झडाडें ।
तुम्हीं राहावें उत्तरेकडे । होवोनि गाढे सुलीन ॥६६॥
जैसा श्रीरामाचा बाण । तैसें करीन उड्डाण ।
लंकेमाजी प्रथम कंदन । बोहणी जाण मी करीन ॥६७॥
करीन इंद्रजितासीं सळ । तुकीन रावणाचें बळ ।
राक्षसांचें अमित दळ । तें मी सकळ गांजीन ॥६८॥
पाडोनि राक्षसदांतांसी । त्याच्या मी करीन राशी ।
मग मोजून कुडवेंसीं । घालीन सळेंसी रावण ॥६९॥
घेतां लंकेची घरधांडोळी । जरी न लभे जनकबाळी ।
लंका उपडोनी समूळीं । रामाजवळी आणीन ॥७०॥

इति तस्य ब्रुवाणस्य सर्वे वानरपुंगवाः ।
चक्रुः प्रशंसां मुदिताः शक्रस्येव मरुद्‌गणाः ॥१५॥
तस्य पुष्पवतीं चक्रुर्वनमालां महात्मनः ।
चफुस्ते वानरश्रेष्ठा ब्रहुभ्यां मंगलानि च ॥१६॥
स तैः परिवृतः श्रीमान्वानरैर्वानरर्षभः ।
आरुरोह नगश्रेष्ठं महेंद्रमरिमर्दनः ॥१७॥

वानरांना आनंद व हनुमंताचे उड्डाण :

ऐसें हनुमंताचें वचन । ऐकोनियां वानरगण ।
हर्षे वंदिले त्याचे चरण । जेंवी मरुद्‌गण इंद्रासी ॥७१॥
श्रीरामस्मरणलीला । त्याचि सुमनांच्या माळा ।
वानरी विचित्र घातल्या गळां । वनीं वनमाळा शोभत ॥७२॥
परिवारला वानरभारीं । इंद्रासमान ज्याची थोरी ।
त्या चढला महेंद्रगिरीं । लंकापुरी लक्षोनी ॥७३॥
करोनियां श्रीरामस्मरण । देवोनि वानरां आलिंगन ।
करावयासी उड्डाण । आल्हाद पूर्ण हनुमंता ॥७४॥
मुखीं श्रीरामनाममुद्रा । ह्रदयीं धरोनि श्रीरामचंद्रा ।
उल्लंघावया समुद्रा । कपिकुंजरीं आल्हाद ॥७५॥
पाहतां निजबाहूंचे त्राण । अंगा आलें निजस्फुरण ।
लांगूल त्राहटिता जाण । रोमांच पूर्ण थरकती ॥७६॥

उड्डाणाची प्रतिक्रिया :

पुच्छ आदळितां बळी । शिळाशिखरां झाली रांगोळी ।
वृक्ष मिळाले पैं धुळी । पुष्पीं फळीं समवेत ॥७७॥
पक्षी कळकळती आकाशीं । महाप्रळय दिग्गजांसी ।
तरस तगर बिळवासी । सिंहसूकरांसी अति त्रास ॥७८॥
उड्डाण करितां महाबळी । पर्वत दाटला पायतळीं ।
तेणें तो रुपला भूतळीं । सर्प पाताळीं दडपलें ॥७९॥
अर्धसर्प दडपतां एक । बाहेर काढोनियां मुख ।
सक्रोध वमितां पै विख । शिळा निःशेख भस्म होती ॥८०॥
जैसीं उभारिलीं छत्रें । सर्पफणा तदाकारें ।
अर्ध दडपिलीं शरीरें । फुफूत्कारें गर्जती ॥८१॥
सर्पीं वर्मितां पैं गरळ । उठती अग्नीचे कल्लोळ ।
विख सरलिया  सकळ । अति विकळ तळमळती ॥८२॥
पर्वतीं दिव्यौषधी अनेक । दाटल्या स्त्रवती पीयूख चोख ।
तो रस लागताचि देख । निःशेष विख निमालें ॥८३॥
भारें दडपला पर्वतू । श्वेत पीत आरक्त धात ।
धारावर्तीं पैं स्रवतू । तेणें शोभतू गिरिराज ॥८४॥
वामन जाला त्रिविक्रम । तैसा वाढला तो वानरोत्तम ।
दृढ धरिला आक्रम । पराक्रम स्वामिकार्या ॥८५॥
पर्वणीं वाढें जेंवी समुद्र । तैसा वाढला कपींद्र ।
तेणें दचकला काळाग्निरुद्र । ऐसा भ्यासुर भासत ॥८६॥

समुद्रलंघनाचे कौतुक पाहण्यासाठी देवादिकांचा मेळावा जमला :

समुद्रलंगनकौतुक । पाहूं आले ब्रह्मादिक ।
सुरवर दाटले अनेक । सिद्ध गुह्यक गंधर्व ॥८७॥
नानापरींच्या विमानपंक्ती । नभीं दाटल्या नेणों किती ।
कैसा कैसा उडेल मारुती । पहावया समस्तां आल्हाद ॥८८॥
उम रमा आणि सावित्री । पाहूं आल्या नवही नारी ।
समुद्रामाजीं वानरीं । कैसेपरी उडिजेल ॥८९॥

उड्डाणाचे वर्णन :

समुष्टि बाहु धरोनि पुढां । वळून पुच्छाचा आंकडा ।
बळें उडतां पैं माकडा । पडिल तडा गिरीतटीं ॥९०॥
कडे खचले सागरीं । शिखरें उडालीं अंबरी ।
समूळ वृक्ष वारेनिकरीं । गगनांतरीं परिभ्रमत ॥९१॥
जैसा बोळवोनि अति आप्त । सुहृद माघारे परतत ।
तेंवी पाषाण वृक्ष समस्त । मागें पडत सागरीं ॥९२॥
विकट वानरें दिधली हाक । दुमदुमिले तिन्ही लोक ।
कळिकाळें घेतला धाक । सुर सांशक विमानीं ॥९३॥
जाणोनि पवनाची शक्ती । उल्लंघोनि मनोगती ।
लंका लक्षोनि मारुती । शीघ्रगतीं निघाला ॥९४॥
वेगें उडतां वानर । क्षोभें खवळला सागर ।
तेणें भुलले जळचर । येरां येर झोंबती ॥९५॥
अंगवातें मारुती । खुंटली रविचंद्रांची गती ।
ग्रहनक्षत्रें डळमळिती । निजात्मगती खुंटली ॥९६॥
हनुमंताच्या अंगदीप्तीं । नभीं शशि सुर्य लोपती ।
नक्षत्राच्या लाह्या होती । तेजें मारुती देदिप्यमान ॥९७॥
बाळसूर्याचा ओतिला । कीं शेंदुराचा रचिला ।
न तो कुंकुमाचा घडिला । तैसा देखिला हनुमंत ॥९८॥
हनुमंताच्या अंगप्रभा । नभत्व लोपताहे नभा ।
दिव्य तेजाचा निजगाभा । तैसी शोभा शोभत ॥९९॥
जैसा रामबाण नभाआंत । तैसा हनुमंत असे जात ।
साधावया स्वामिकार्यार्थ । त्वरान्वित मारुती ॥१००॥

हनुमंताच्या विश्रांतीसाठी जळातून वर यावे अशी सागराची मैनाद्रिला विनंती :

जैसे तप्तचामीकर । तैसा जातसे वानर ।
विश्राति द्यावया सत्वर । सांगे सागर मैनाद्री ॥१०१॥
मी सागराचा स्थापित । सूर्यवंशाचा नित्यांकित ।
त्वरेनें जातसे हनुमंत । रामकार्यार्थ साधावया ॥१०२॥

अस्य साह्यं देयमिक्ष्वाकुकुलवर्तिना ।
इक्ष्वाकुकुलजो रामो मम पूज्यतमः परम् ॥१८॥
कुरु साचिव्यमस्मांकं विना कल्पात्ययो भवेत् ।
सलिलादूर्ध्वमातिस्ठ विश्रमेच्च यथा कपिः ॥१९॥

मज पुज्यता सूर्यवंशी । साह्य व्हावें हनुमंतासी ।
विसांवा द्यावया वानरासी । अति त्वरेंसीं भागला ॥१०३॥
यालागीं तुवां मैनाद्री । वेगीं निघावें जळाबाहेरी ।
संमुख निघोनि झडकरी । कपींद्रा करीं विश्रांती ॥१०४॥
हनुमान जातो त्वरेंकरीं । विलंब होतां जाईल दूरी ।
इतकें माझें प्राधान्य करीं । देईं वानरा विश्रांती ॥१०५॥
विश्रांति दिधलिया वानरीं । सेवा उपतिष्ठे श्रीरामचंद्री ।
पुढील मार्ग लंकापुरी । क्षणामाझारीं पावेल ॥१०६॥
ऐकें मैनाद्रि गिरिनाथा । विश्रांति दिधलिया हनुमंता ।
सुखसंतोष श्रीरघुनाथा । हें कार्य सर्वथा तुवं कीजें ॥१०७॥

सागराच्या सांगण्यावरुन मैनाद्री वर येतो :

ऐसें सांगतां सागर । उल्लासें वाढला गिरिवर ।
सुद्वादफळें अरुवार । निर्मळ नीर कपिपूजा ॥१०८॥
विश्रांतीस्थळ अति प्रबळ । मंद सुगंध मयनानिळ ।
पंचम कूजती कोकिळ । झनत्कारे अलिकुळें ॥१०९॥
मागील जावोनि सकळ श्रम । पुढें विश्रांति पावे परम ।
ऐसा साधिला आराम । वानरोत्तम विश्रांती ॥११०॥
ऐसिया आरामकैवाडें । हनुमंताच्या मार्गापुढें ।
गिरि वाढला वाडेंकोडें । विश्रांतिचाडें कपींद्रा ॥१११।

मैनाद्री व हनुमंत यांची उंच होण्याची स्पर्धा :

वाढला देखोनि पर्वत । उंच वाढला हनुमंत ।
गिरि वाढला मार्ग रोधित । त्याहूनि हनुमंत उंचावला ॥११२॥
जंव जंव पर्वत वरती वाढे । तंव तंव मारुती गगनीं चढे ।
श्रम न बाधी तयाकडे । विश्रांतिचाडे उदास ॥११३॥
नभीं चढला योजनशत । द्विगुण वाढला पर्वत ।
हनुंमत चढला पांच शत । गिरिसप्त शत वाढला ॥११४॥
हनुमान चढला सहस्रवरी। इतकाचि वाढला गिरी ।
कपि चढला तयाहींवरी । समुद्रपरपारीं जावया ॥११५॥
गिरि वाढला लक्षकोटी । कपि चढला नभःपृष्ठीं ।
पर्वत स्वयें कपाळ पिटी । चरणभेटी मज नव्हे ॥११६॥

मैनाद्रीची हनुमंताला प्रार्थना :

लंघोनि जातां हनुमंत । ग्लानी मैनाक विनवित ।
तू कृपाळु श्रीरामदूत । उपेक्षित कां जासी ॥१७॥
तुझा लागलिया चरण । मी होईन अति पावन ।
यालागीं मी वाढलों गा जाण । नाहीं अभिमान तुजसीं मज ॥१८॥
सागरें सांगितलें मजप्रती । हनुमंता पूजावें अतिथी ।
यालागीं आलों मी तुजप्रती । द्यावया विश्रांति रामभक्ता ॥१९॥
सगरें स्थापिला साचार । यालागीं नांवों तो सागर ।
तूंही सूर्यवंशीचा किंकर । आम्ही समग्र दास तुझे ॥१२०॥
तुझ्या पित्याचा स्थापित । मी वसत आहें समुद्रांत ।
तोही अवधारीं वृत्तांत । उपेक्षित जाऊं नको ॥१२१॥
पूर्वीं पर्वत पक्षधर । उड्डाणें घेती अति दुर्धर ।
पुरें पट्टणें करिती चूर । नगरेंनगर भंगिती ॥१२२॥
इंद्रें घेवोनियां वज्र । गिरीपक्ष घेदिले समग्र ।
माझेही छेदावया दुर्धर । वज्रधर चालिला ॥१२३॥
मज होतां पलायमान । साह्य जाला तुझा पिता पवन ।
समुद्रीं आला गा घेवोन । तेणें हा प्राण वांचला ॥१२४॥
तुझ्या पित्याचा स्थापित । समुद्रामाजी होतों गुप्त ।
येतां देखोनि हनुमंत । विश्रांतिहेतू वाढलों ॥१२५॥

हनुमंताचे उत्तर :

ऐकोनि मैनाद्रीच्या वृत्तांता । कृपेनें सांगे निजकार्यार्था ।
शोधावया श्रीरामकांता। अति शीघ्रता मी जातों ॥१२६॥
आधीं असावी विश्रामता । मज द्यावी विश्रांतता ।
नामस्मरणें श्रीरघुनाथा । श्रमावस्था मज नाहीं ॥१२७॥
ज्यासी नाहीं नामीं विश्वास । त्यासी बाधी श्रम शोक त्रास ।
श्रीरामाचा निजदास । श्रमाचा लेश मज नाहीं ॥१२८॥
तरीही मैनाद्रीचे हनुमंताला विश्रांतीस आमंत्रणः
ऐकोनि हनुमंताचें वचन । मैनाद्रीस आलें रुदन ।
भाग्यें अभागी मी परिपूर्ण । हनुमंतचरण अप्राप्य ॥१२९॥
पर्वताचा खेद देखोन । हनुमंत बोलिला वचन ।
तुझे न घें फळ मूळ जीवन । अंगुलिस्पर्शन तुज न करीं ॥१३०॥
पर्वत म्हणे हनुमंता । कृपेनें हात ठेवीं माथां ।
इतकेन मी सनाथता । आणिक सर्वथा मागेंना ॥१३१॥
तंव इंद्र म्हणे मैनाद्री । जालासी हनुमंता साहाकारी ।
तुज मी सर्वथा न मारीं । समुद्राबाहेरी सुखें विचरें ॥१३२॥

मैनाद्री पर्वताच्या मनःशांतीकरिता त्याला अंगुलीचा स्पर्श व त्याचा परिणाम :

मग हनुमंते तये वेळीं । पर्वतीं ठेविली आंगोळी ।
भारें बैसला समुद्रतळीं । जाला पाताळीं हाहाकार ॥१३३॥
पन्नग म्हणती पर्वतावरी । अतिशय भार पडला भारी ।
करील सप्तपाताळचुरी । नवनागांतरी हाहाकार ॥१३४॥
आंगोळी ठेवितांचि शिरीं । पर्वत बुडाला सागरीं ।
कपि बैसला जरी वरी । तैं होता चकचुरी निर्नाम ॥१३५॥
इतुकी करोनि ख्याती । पुढें चािलला मारुती ।
ब्रह्मादिकां विस्मय चित्तीं । जयजय करिती सुर सिद्ध ॥१३६॥
इतुकी करोनि ख्याती । पुढें चालिला मारुती ।
उल्लंघावया अपांपती । शीघ्रगतीं निघाला ॥१३७॥
देव दानव अवघे जण । तेंही हनुमंताचा मार्ग रोधून ।
करावया चालिले विघ्न । तेंही कथन अवधारा ॥१३८॥

ततो देवाः सगंधर्वाः सिद्धाश्च ऋषयस्तदा ।
समब्रुवन्दानवानां मातरं सुरसां दनुम् ॥२०॥
अयं वातात्मजः श्रीमान्प्लवते सागरोपरि ।
हनूमान्नाम तस्य त्वं मुहूर्तं विघ्नमाचर ॥२१॥
बलमिच्छामहे ज्ञातं वयं चास्य पराक्रमम ।
किं करिष्यत्यपायं वा विषादं वा करिष्यति ॥२२॥

सागरावरी शीघ्र गमन । करिताहे वायुनंदन ।
राक्षसरुपें करावें विघ्न । गमनागमन खंडावें ॥१३९॥
किती बळ आहे हनुमंता । पहावया आवडी देवां समस्तां ।
दानवाची दनु जे माता । ते विघ्नार्था धाडिली ॥१४०॥
जावों शके निजात्मशक्ती । किंवा येईल काकुळती ।
काय करील मारुती । तें निश्चितीं आम्ही पाहूं ॥१४१॥

हनुमंताच्या सामर्थ्याची परिक्षा पाहण्यासाठी दनूला पाठविली :

दनु सुरसा दानवांची माता । कपटतेजें सतेजता ।
ऐकोनि देवांचि हे कथा । विघ्न हनुमंता करूं आली ॥१४२॥
आश्रयूनि समुद्रजळ । राक्षसी जाहली विकराळ ।
मुख पसरोनि कराळ । कपि तत्काळ गिळों आली ॥१४३॥
येणें मार्गे जे जे येती । ते ते माझें भक्ष निश्चितीं ।
तुम मी गिळीन पुसें युक्ती । रीघ मुखाप्रति वानरा ॥१४४॥
सीताशुद्धीसीं जातों लवलाहें । श्रीरामकार्यासी साह्य होयें ।
विघ्न न करीं वो भाये । तुझे पाये वंदितों ॥१४५॥
भोजनीं निवारीं क्षुधिता । तो सज्ञान अति मूर्खता ।
कैंचा राम कैंची सीता । तुज मी आतां भक्षिन ॥१४६॥
आपुलें चुकावया मरण । मज सांगसी ब्रह्मज्ञान ।
क्षुधेनें निमालिया प्राण । सुकृत कोण भोगील ॥१४७॥
राक्षसीयें पसरिलें वदन । हनुमंत जाला एक योजन ।
येरीं मुख पसरिलें द्विगुण । दशयोजन कपि जाला ॥१४८॥
मुख पसरी योजनें वीस । हनुमंत जाला योजनें तीस ।
येरी पसरिलें चाळीस । कपि पन्नास होऊं सरला ॥१४९॥
शत योजनें पसरी वक्त्र । तंव हनुमंत जाला अंगुष्ठमात्र ।
मुखीं रिघाला सत्वर । नभीं सुरवर देखती ॥१५०॥
देव म्हणती हनुमंता । सुरसेनें गिळिलें तत्वतां ।
शुद्धी करणें राहिली सीता । अति मूर्खता आम्हीं केली ॥१५१॥
हनुमंतें शीघ्र करितां गमन । आम्हीं कां करविलें विघ्न ।
आम्हां कोपेल श्रीरघुनंदन  । स्वर्गी सुरगण धाकती ॥१५२॥
हनुमंत रिघे राक्षसीवदनीं । अंतरीं पाहतां कश्यपपत्‍नी ।
दानवांची सखी जननी । माता सापत्‍नी देवांची ॥१५३॥
पवन जो कां माझा पिता । त्याची हे सावत्र माता ।
इच्या करों नये घाता । हृदयीं हनुमंता मानलें ॥१५४॥
रामकार्याचे त्वरेंकरीं । येथोनि निघावें बाहेरीं ।
वानराची युक्ती भारी । देखे कर्णरंध्रीं निर्गम ॥१५५॥
सुरसा चाटी अवाळें । वानर दांती तोंडी नाकळे ।
मुखीचें मुखीं हरपलें । किंवा गुंतलें दशनांतरी ॥१५६॥
राक्षसी घेतां वदनधांडोळी । तंव हनुमान निघे कर्णबिळीं ।
भुभुःकार देतां आतुर्बळी । पिटिशळी टाळी सुरवरीं ॥१५७॥
हनुमंत विवेकी अति ख्यात । न करोनि सुरसेचा घात ।
निर्गम देखिला श्रवणांत । विघ्नातीत रामनामें ॥१५८॥
विघ्नातीत श्रीरामभक्त । त्यामाजी मुखरण हनुमंत ।
श्रीरामनाम जे स्मरत । ये यशवंत अति अपूर्व तिहीं लोकीं ॥१६०॥

दनु व हनुमंत संघर्षांत हनुमंताची सुटका व त्याचे पुढे प्रयाण :

श्रीरामनाम मुखीं मुद्रा । हृदयीं स्मरण श्रीरामचंद्रा ।
कैचें विघ्न त्या कपींद्रा । क्षणें समुद्रा लंघील ॥१६१॥
न करोनि माझा जीवघात । हनुमंत निजबळें निर्मुक्त ।
देखोनि सुरसा संतोषत । आशीर्वाद देत हनुमंता ॥१६२॥

अब्रवीत्सुरसा देवी स्वेन रुपेण वानरम् ।
अर्थसिद्धयै हरिश्रेष्ठ गच्छ सौम्य यथासुखम् ॥२३॥
संयोजयस्व वैदेहीं राघवेण महात्मनां ॥२४॥

सांडोनि राक्षसी क्रूरता । सुरसा जाली शांत रुपता ।
अर्थसिद्धि पावसी हनुमंता । श्रीरामसीतासंयोगे ॥१६३॥
श्रीरामनामीं तुझी मिठीं यालागीं तूं दाटुगा सृष्टीं ।
तुझेनि रामसीतेंसी भेटी । रामराज्य सृष्टीं तुझेनि ॥६४॥
सीताशुद्धीची समयसिद्धी । तुझेनि होईल गा त्रिशुद्धी ।
निमेषें लंघिसील उदधी । तूं सद्बुद्धि कपींद्रा ॥१६५॥
ऐसें बोलोनि उत्तर । सुरसा वंदिला वानर ।
येरू निघांला सत्वर । समुद्रपार लंघावया ॥१६६॥
सुरसा देवी देवविघ्न । कपीनें जिंकिली न मारुन ।
पुढें सागरीं बळवाहन । केले कंदन तें ऐका ॥१६७॥
सकळ ग्रंथाचें माहेर । तें हें श्रीरामचरित्र ।
पवित्र वक्त्याचें वक्त्र । पवित्र श्रोत्र श्रोतियांचे ॥१६८॥
स्वामिसेवेसी विकिला प्राण । ब्रह्मज्ञानेचें भूषण ।
नवविधभक्तींचे जीवन । कपिकथन शिववंद्य ॥१६९॥
करितां हनुमंताचें स्मरण । विघ्न तेंचि होय निर्विघ्न ।
स्मरणें सुलभ ब्रह्मज्ञान । कथा पावन हनुमंतें ॥१७०॥
एकाजनार्दना शरण । कपिप्रतापकथा गहन ।
पुढें काय केलें कथन । सावधान अवधारा ॥१७१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
हनुमंतसमुद्रमध्यगमनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥
॥ ओंव्या १७१ ॥ श्लोक २४ ॥ एवं १९५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय सतरावा