भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय दुसरा
सुग्रीवाची जन्मकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
दूतोऽहं प्रेषितस्तेन सुग्रीवेण महात्मना ।
राजा वानरमुख्यानां हनूमान्नाम वानरः ॥१॥
युवाभ्यां स हि धर्मात्मा सुग्रीवः सख्यमिच्छति ।
तस्य मां सचिवं विद्धि वानरं पवनात्मजम् ॥२॥
हनुमंत सुग्रीवाचा जन्मवृत्तांत विचारतो :
हनुमंत सांगे श्रीरामासी । मज सुग्रीवें तुम्हापासीं ।
धाडिले पहावया वृत्तांतासी । सख्य तुम्हांसीं करावया ॥२॥
देवदैत्यदानवांसी । रिघु नव्हे या वनासी ।
तेथें येतां तुम्हां मानवांसी । वानरांसी विस्मयो ॥३॥
धीर वीर गंभीरता । तुम्हां दोघां देखोनि येतां।
भयें आश्चर्य सुग्रीवाच्या चित्ता । निःशंकता देखोनि ॥४॥
सुग्रीवाची शोचीय अवस्था व इच्छा, मारुतीची भूमिका व श्रीरामांचे आश्वासन :
हृतदार हृतस्वार्थ । सुग्रीव वाळिभयें भीत ।
तुमचा इच्छितो साह्यार्त । मज तदर्थ धाडिलें ॥५॥
तुम्ही निःशंक निधडे वीर । वाळिभयार्थी साहाकार।तु
म्हांसीं करावया मित्राचार । पुसों साचार मी आलों ॥६॥
सुग्रीव तूं कोण म्हणसी । वानरस्वामित्व सुग्रीवासीं ।
माझा विश्वास सुग्रीवासीं । माझें त्यापासीं प्राधान्य ॥७॥
अत्यादरें अतिशयेंसी । माझा विश्वास सुग्रीवासीं ।
मैत्री वांछितो तुम्हांसी । अभय त्यासी देईं स्वामी ॥८॥
मी तंव केवळ तुझें निजबाळक । वानर सैन्येंसी देख ।
सुग्रीव होऊं पाहे सेवक । कृपा आवश्यक करीं रामा ॥९॥
श्रुत्वा हनूमतो वाक्यं रामो लक्ष्मणनब्रवीत् ।
प्रहृष्टवदनः श्रीमान्भ्रातरं पार्श्वतः स्थितम् ॥३॥
सचिवोऽयं कपींद्रस्य सुग्रीवस्य महात्मनः ।
तमेव कांक्षमाणस्य ममांतिकमिहागतः ॥४॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
कार्यसिद्धींचें लक्ष्मण । सांगे आपण सौमित्रा ॥१०॥
आम्ही ऐक्य वांछूं सुग्रीवासीं । तंव तेणेंचि धाडिलें प्रधानासी ।
तोही अति आप्त आम्हांसी । अतिशयेंसी जिवलग ॥११॥
येथें आलिया हनुमंता । आम्हांसी शिणणें न लगे आतां ।
सुलभत्वें प्राप्त होईल सीता । जाण तत्वतां सौमित्रा ॥१२॥
श्रीराम म्हणे हनुमंतासी । जें जें तूं कांही सांगसी ।
तें तें करीन निश्चयेंसी । तुझिया वचनासी नुल्लंघीं ॥१३॥
तुवां सांगितलें मजपासीं । तरी एके बाणें वधीन वाळीसी ।
सदार राज्य सुग्रीवासी । निमेषार्देसी मी देईन ॥१४॥
श्रीरामांचा प्रश्न व वाली सुग्रीवाचा वृत्तांत :
वाळी सुग्रीव हे दोघे जण । कैंचे कोणाचे हे कोण ।
यांचें समूळ कथन । मज संपूर्ण सांगावें ॥१५॥
– श्रीराम उवाच –
यच्छुतं वै ऋक्षराजो वालीसुग्रीवांचा पिता ।
जननी का तयोरेव न त्वया परिकीर्तिका ॥५॥
श्रीराम म्हणे हनुमंता । वालिसुग्रीवांचा पिता ।
ऋक्षराज ऐसी ऐकली कथा । त्यांची माता ते कोण ॥१६॥
वानरांचे सकळ सैन्य । कोणें केलें यांचे अधीन ।
या दोघांचें समूळ कथन । विवंचून मज सांगे ॥१७॥
यांचें कोण पूर्वभवन । यांसी कैसेनि प्राप्त हें स्थान ।
किष्किंधेचें राज्याभिषेचन । देता कोण पैं यांसी ॥१८॥
– हनूमानुवाच –
शृणु राम कथामेतां मया पृष्टः सकौतुकम् ।
कथयामास धर्मात्मा महर्षिः श्रूयतामिति ॥६।
सुखमास्ते यदा देवः पद्मयोनिश्चतुर्मुखः ।
योगमभ्यसतस्तस्य नेत्रेभ्यो यद्रसोऽस्रवत् ॥७॥
तद्गृहीतं भगवता पाणिना चावितुं ततः ।
समाश्वास्य प्रियैर्वाक्यैरुक्तः किल महात्मना ॥८॥
तस्मिन्प्रस्रवणे राम वानरः संबभूव ह ।
समाश्वास्य प्रियैर्वाक्यैरुक्तः किल महात्मना ॥९॥
ऋक्षाचा जन्म व बालक्रीडा :
हनुमंत म्हणे श्रीरघुनाथा । वालिसुग्रीवजन्मवार्ता ।
अगस्तिमुखें ऐकिली कथा । ते तुज आतां सांगेन ॥१९॥
ब्रह्मयाच्या नेत्रांमधून जाण । वानराचें जन्मस्थान ।
तेंही समूळीं कथन । सावधान अवधारीं ॥ २०॥
ब्रह्मा निजात्मयोगासनीं । बैसला असतां आत्मचिंतनीं ।
आनंदाश्रु स्रवतां नेत्रींहूनी । करीं धरोनी टाकिले ॥२१॥
नेत्रजळ सांडितां धरणीं । वानर जन्मला तत्क्षणीं ।
ब्रह्मा माता पिता दोन्ही । यालागुनी प्रतिपाळी ॥२२॥
तो ब्रह्मयाचा पढियंता । लडिवाड आवडता ।
निजशेजारीं निजविता । प्रतिपाळिता फळें मूळें ॥२३॥
ब्रह्मयाच्या आसनापासीं । नृत्य करीं विनोदेंसीं ।
नृत्यांगना गोवोनि पुसी । थाकासरिसीं त्यां पाडी ॥२४॥
उडोनि बैसे ऋषिशिरासीं । वांकुल्या दावी सुरवरांसी ।
तंव तंव आनंद ब्रह्मयासी । वानरेंसीं अति प्रीती ॥२५॥
जैसें पोटींचें लडिवाळ । तैसें तयाचें पुरवी कोड ।
त्याचा विनोद वाटे गोड । कवतुकें चाड तयाची ॥२६॥
ऋक्षराज ठेवोनि नांव । ब्रह्मा प्रतिपाळी वैभव ।
कांहीएक वर्तलें लाघव । अति अपूर्व ऐका स्वामीं ॥२७॥
सरोवराला उमेचा शाप :
वनीं विचरोनि अहर्निंशीं । वानर नित्य ये ब्रह्मयापासीं ।
यूका काढी दाढीमिशांसी । चहूं मुखांसी चुंबोनीं ॥२८॥
तो वानरू एकें दिवशीं । दूरी गेला वनवासासीं ।
सांडोनियां सत्यलोकासी । गिरिकैलासी परिभ्रमें ॥२९॥
कैलासगिरिबाह्यप्रदेशीं । उमाशाप बद्ध सरोवरासी ।
स्नान घडलें तयासी । स्रीत्व त्यासी पैं आलें ॥३०॥
निर्मळ जळीं उमावनीं । शिव आणि स्वयें भवानी ।
नग्न क्रीडा करिती दोनीं । उल्लासोनि स्वानंदें ॥३१॥
तंव तीर्थानिमित्त स्नानासी । तेथें आले सप्तऋषीं ।
देखोनि उमा लाजली त्यांसी । दोघें जळवासीं गुप्त जालीं ॥३२॥
उमा क्षोभोनि बोलिली वचन । सदाशिव करोनि भिन्न ।
जो नर येथें करील स्नान । स्रीत्व पूर्ण तो पावेल ॥३३॥
शाप ऐकतां दारुण । न करितां पैं आचमन ।
ऋषीश्वर पलायमान । शापबंधन सरोवरा ॥३४॥
कस्यचित्त्वथ कानस्य समतीतस्य वानरः ।
चलत्केसरमात्मानं कृत्वा तस्य तटे स्थितः ॥१०॥
ददर्श तस्मिन्सरसी वक्रच्छायामथात्मनः ।
कोऽयमस्मिन्मम रिपुर्वर्ततेऽन्तर्जले महान् ॥११॥
तदस्य दुष्टभावस्य करिष्यामि विनिग्रहम् ।
आत्मानं पातयामास तस्मिन्वानरसत्तमः ॥१२॥
उत्प्लुत्स तस्मात्सरस उत्थितः प्लवगः पुनः ।
तस्मिन्नेव क्षणे राम स्रीत्व प्राप स वानरः ॥१३॥
शापित सरोवरात उडी मारल्यामुळे ऋक्षाला स्त्रीत्व प्राप्त :
तेणें वानरें आपणासी । शृंगारोनि नाना सुमनांसी ।
येतां सरोवराच्या पासीं । प्रतिरुपासी देखिले ॥३५॥
वांकुल्या दावितां तयासीं । मारूं धांवतां आवेशी ।
तेंही येतां भारावयासी । धावे आवेशीं पैं स्वयें ॥३६॥
म्हणे हा मुख्य माझा वैरी । राहिलासे जळाभीतरीं ।
हाक फोडितो मजवरी । याची बोहरी मी करीन ॥३७॥
निजबळाचिया महाथोरीं । साटोपू धरूनियां शरीरीं ।
उडोनियां गगनोदरीं । उडी सरोवरीं घातली ॥३८॥
क्रोधाचिया क्रोधदृष्टीं । आंवळोनियां वज्र मुष्टी ।
पुच्छा वळोनियां वेंटी । उठउठीं उडी घाली ॥३९॥
सरोवरी उडी घालितां । वैरी नाढळेचि पैं हाता ।
सवेग रागें बाहेर येतां । निजपुरुषार्था मुकला ॥४०॥
लोपला निजपुरुषत्वाचा भावो । कुचादि योनि स्रीअवयवो ।
स्रीकटाक्ष हावभावो । जाला अपूर्व स्रीदेही ॥४१॥
अति सुंदर कमनीय कांता । तिसीं कामें भुलला सविता ।
कामें इंद्र भुलला तिसीं देखतां । स्रीकामता संभोग ॥४२॥
युगपत्सा तदा द्दष्टा देवाभ्यां सुरसुंदरी ।
कंदर्पवशगौ तौ द्दष्ट्वा तां संबभूवतुः ॥१४॥
अमोघरेतः शक्रस्य सुरेशस्य महात्मनः ।
वालेषु पतितं तेन वाली नाम्ना बभूव सः ॥१५॥
भास्करेणापि तस्यां वै कंदर्पवशवर्तिना ।
बीजं निषिक्तं ग्रीवायां विधानमनुवर्तिना ॥१६॥
ग्रीवायां पतिते बीजे सुग्रीवः समजायत ।
एवमुत्पाद्य तौ वीरौ वानरेंद्रौ महाबलौ ॥१७॥
तिला पाहून इंद्र व सूर्याचे कामोद्दीपन व त्यामुळे वीर्यस्खलन :
वानर ऋक्षराजासी जाण । अंगी स्रीत्व बाणलें संपूर्ण ।
तरी स्रीत्वाची आठवण । सर्वथा आपण स्मरेना ॥४३॥
त्यासी देखोनि अति सुंदर । शक्र सुर्य दोन्ही देवेंद्र ।
धांविन्नले कामातुर । पळे भयेंकरीं ऋक्षराज ॥४४॥
भयें सांगावया ब्रह्मयाजवळी । वानरी सवेग पळे भूतळीं ।
शक्र सुर्य कामसमेळीं । अंतराळीं धांविन्नलें ॥४५॥
नव्हतां तिच्या संभोगासीं । स्रीकामाच्या अति आवेशीं ।
वीर्यस्खलन जालें दोघांसी । समकाळेंसीं समवेत ॥४६॥
‘वाला’ मध्ये इंद्राचे वीर्य पडले म्हणून वाली हे नाव :
संस्कृतभाषेमाजी विख्यात । केशां नांव वाल म्हणत ।
इंद्रवीर्य पडलें तेथ । वालाग्रांत अमोघ ॥४७॥
वानरमस्तकां महाबळी । जन्म पावलासे वालसमेळीं ।
यालागीं नांव ठेविलें वाळी । आतुर्बळीं वानर ॥४८॥
मानेमध्ये (ग्रीवेवर) वीर्य पडले म्हणून ‘सुग्रीव’ हे नाव :
काय पडिलें मस्तकावरीं । वर तें पाहे जंव वानरी ।
सूर्यवीर्य कंठावरी । ग्रीवांतरी पडों सरलें ॥४९॥
ग्रीवेमाजी जन्मसंभव । यालागीं नांवें तो सुग्रीव ।
दोहीं बंधूंचे जन्मलाघव । अति अपूर्व परिसिलें ॥५०॥
दोघा पुञांसह ऋक्ष स्रीवेषात ब्रह्मदेवाजवळ जातो :
ऋक्षराज स्रीवेषेंसी । सपुञ आला ब्रह्मयापासीं ।
देखोनि त्याचिया रुपासी । ब्रह्मा मानसी विस्मित ॥५१॥
ब्रह्मा म्हणे अति सुंदर । दुष्टकर्मी देव अति दुर्धर ।
न म्हणती पात्रापात्र । करिती व्यभिचार वेश्येसीं ॥५२॥
ब्रह्मदेवाची शापवाणी :
इसी देखोनि अति सुंदर । अमोघवीर्याचा व्यभिचार ।
जो तो रमेल सुरवर । होईल जोजार पोरांचा ॥५३॥
मजपासोनि जन्म यासी । स्रीत्व पावला मूर्खत्वेंसी ।
शापमुक्त करावयासी । कैलासासी निघाला॥५४॥
ब्रह्मेदवाच्या विनंतिवरून ऋक्षाची शापमुक्तता :
ब्रह्मा विनवी पार्वतीसी । शापमुक्त करीं ऋक्षराजासी ।
येरी पुसोनि सदाशिवासी । केलें वानरासी निर्मुक्त ॥५५॥
सांडोनि भ्रमभुंजगभार । जेंवी सर्प रुपें होय दोर ।
तेवीं सांडोनी स्रीआकार । जाला वानर ऋक्षराज ॥५६॥
स्वप्नी ब्राह्मण होता अंत्यज । जागा होतां म्हणे मी द्विज ।
तेंवी सांडोनि स्रीत्वपुंज । जाला ऋक्षराज वानर ॥५७॥
अगाध संतांची संगती । सवेग वानरा शापमुक्ती ।
सुखी झाला प्रजापती । सुखात्मस्थिति ऋक्षराजा ॥५८॥
आतुर्बळी वानरमूर्ती । देखोनियां पुत्रसंतती ।
शक्र सुर्य सुखावती । संतुष्टती निजपुत्रां ॥५९॥
दत्वा तु कांचनीं मालां वानरेंद्रस्य वालिनः ।
अक्षयां गुणसंपूर्णां शक्रस्तु त्रिदिवं गतः ॥१८॥
सूर्योऽपि स्वसुतस्यास्य निरुप्य पवनात्मजम् ।
कृतेषु व्यवसायेषु जगाम सवितांबरम् ॥१९॥
वालीला पाहून इंद्राला आनंद व त्याला माला अर्पण :
देखोनि वाळीच्या निजबळा । इंद्रासी पुत्रसुखाचा सोहळा ।
कंठी निजकनकाची माळा । घातली गळां वाळीचिया ॥६०॥
हे माळा कंठीं असतां । कृतांतासीं युद्ध करितां ।
श्रम नव्हे त्या वर्षे शत झुंजतां । निराहारता निरुदकीं ॥६१॥
मालेचा प्रभाव व दुंदभीचा वध :
दुंदभीपाठीं लागतां बळी । निराहारी निरुदकीं युद्धकाळीं ।
कांहीं श्रमी नव्हेचि वाळी । तैं हे जवळी माळा होती ॥६२॥
हे माळा असतां कंठेंसीं । युद्ध करितां महाबळियासीं ।
कदा अपजयो नव्हे त्यासी । वरदमाळेसीं सदा विजयी ॥६३॥
वाळी सुग्रीव समानबळी । माळाबळें अधिक वाळी ।
युद्ध करितां रणकल्लोळीं । सुग्रीवासीं तळीं साद आणी ॥६४॥
स्वयें युद्ध करितां देख । माळा शत्रूसीं अति अतर्क्य ।
जो जो युद्धा ये सन्मुख । तो तो विमुख होय वरदमाळे ॥६५॥
मालेची निर्मिती :
कैंची माळा इंद्रासीं । वधूं जातां वृत्रासुरासी ।
कश्यपें दिधली सामर्थ्येंसी । निजविजयार्थासी सुरेंद्रा ॥६६॥
कश्यपसामर्थ्याची माळा । इंद्रें घातली वाळीच्या गळां ।
तेणें त्यासी प्रताप आगळा । कळिकाळा नावरे ॥६७॥
सूर्याने केलेली सुग्रीव व मारुतीची संगती :
इंद्रे देवोनि माळेसी । सामर्थ्य दिधलें वाळीसी ।
तैसेंचि सूर्ये सुग्रीवासी । हनुमंतासी निरविले ॥६८॥
हनुमंताच्या सामर्थ्यासी । प्रतीति आहे स्वयें सूर्यासी ।
बाळपणीं आला गिळावयासी । स्वयें राहूसी पळवूनी ॥६९॥
ऐसें जाणूनि हनुमंतासी । सुर्यें निरविलें सुग्रीवासीं ।
तुझेनि कीर्ति होईल यासी । श्रीरामासीं सख्यत्वें ॥७०॥
हनुमंत होईल श्रीरामभक्त । सुग्रीव त्याचेनि सनाथ ।
ऐसा जाणोनि भविष्यार्थ । सुग्रीवा निरवीत हनुमंता ॥७१॥
दोन पुत्रांसह उपभोगासाठी ऋक्षाला राजधानी दिली :
निजमाळा देवोनि वाळीसी । इंद्र गेला निजधामासी ।
सुग्रीवा निरवोनि हनुमंतासी । सुर्य गगनासी पैं गेला ॥७२॥
शक्र सूर्य गेले दोन्हीं । ऋक्षराजा पुत्र दोन्हीं ।
स्वयें ब्रह्मयानें आश्वासोनी । राजधानी त्यां देत ॥७३॥
द्दष्ट्वार्क्षराजं स्वं पुत्रं ब्रह्मा लोकपितामहः ।
सांत्वयित्वा ततः पश्चाद्देवदूतं समादिशत् ॥२०॥
गच्छ मद्वचनाद्दूत किष्किंधां नाम वै शुभाम् ।
विश्वकर्मकृतां दिव्यामतियोग्यां च शोभनाम् ॥२१॥
अभिषिंचय राजानमारोप्य महदासने ।
द्दष्टमात्राश्च ते सर्वे वानराणां चमूपतिः ॥२२॥
ऋक्षराजस्यं साह्यार्थं भविष्यति वशानुगः ॥२३॥
विश्वकर्म्याकडून किष्किंधानगरीची निर्मिती :
ऋक्षराजासी पिता माता । स्वयें स्वयमेव विधाता ।
गेलें पुरुषत्व आणिलें हाता । आश्वासिता होये ब्रह्मा॥७४॥
विश्वकर्मा पाचारूनि । किष्किंधा करवी राजधानी ।
नाना वृक्ष फळें शोभनी । नाना रत्नीं रत्नाढय ॥७५॥
दुर्ग दुर्गम रचिले वेगीं । दैत्यदानावां न लभे मागी ।
अतर्क्य तेथींचि रिगीनिगी । पुत्रप्रयोगीं करविलें ॥७६॥
मरीच्यादि ब्रह्मदूत । सवे देऊनि समस्त ।
ऋक्षराजाच्या अभिषेकार्थ । किष्किंधेआंत ते आले ॥७७॥
ब्रह्मयाची आज्ञा अति समर्थ । देशोदेशींचें वानर समस्त ।
सेनापति आले तेथ । अभिषेकार्थ ऋक्षराजा ॥७८॥
मुकुटकुंडले रत्नमेखळा । बाहुअंगदें रत्नमाळा ।
वानरा बाणली राजकळा ।सपुत्र सोहळा राज्याचा ॥७९॥
ऋक्षास राज्याभिषेक व वालीला युवराजपदाची प्राप्ती :
किष्किंधा मुख्य राजधानी । तेथें श्रेष्ठ वरासनीं ।
ऋक्षराज अभिषेकुनी । वानरसैन्यीं निजराजा ॥८०॥
अभिषेकिती ऋषीश्वर । वानर करिती जयजयकार ।
सुमनें वर्षतीं सुरवर । ब्रह्मा साचार तुष्टला ॥८१॥
ऋक्षराज महाबळी । यौवराज्यीं अभिषेकिला वाळी ।
सेनापति महाबळी । केला ते काळीं सुग्रीव ॥८२॥
ऐसा तो ऋक्षराज समर्थ । दोहीं पुत्रांसमवेत ।
किष्किंधाराज्य जालें प्राप्त । भाग्य समर्थ स्रष्ट्ययानें ॥८३॥
जें कां अकिंचन वानर । तेही केले राज्यधर ।
त्यांसी वंदिती सुरवर । पितृभाग्यें थोर सभाग्य ॥८४॥
त्रैलोकींचे वानर । वालिसुग्रीवांचे आज्ञाधर ।
पिता ऋक्षराज सधर । सेनासंभार असंख्य ॥८५॥
ऋक्षाच्या निधनानंतर वाली राजा होतो व सुग्रीव युवराज व नल सेनापती :
तो ऋक्षराज राजा जाण । काळगति पावला मरण ।
दोंघी पुत्रीं करुनि दहन । उत्तर विधान तिहीं केलें ॥८६॥
मिळोनि समस्त प्रधान । वाळीसी केलें अभिषेचन ।
कनिष्ठ सुग्रीवासी जाण । दिधलें संपूर्ण यौवराज्य ॥८७॥
वाळीनें पाहोनि बळ आणि नीती । धर्मयोद्धा आणि व्रती ।
तो नीळ केला सेनापती । गंभीरस्थिति दळभारीं ॥८८॥
वालिसुग्रीवांचा पिता । ऋक्षराजा नव्हे रघुनाथा ।
ह्या दोन्हींची एकमाता । दोहींचा पिता तो भिन्न भिन्न ॥८९॥
एक शक्रसुत येक सूर्यसुत । जगी विख्यात हे मात ।
ह्या दोहींचा निजवृत्तांत । समूळ साद्यंत सांगीतला ॥९०॥
ऐसें सांगोनियां कथन । हनुमंत घाली लोटांगण ।
सुग्रीवेंसी संख्य संपूर्ण । करावें कृपेनें श्रीरामा ॥९१॥
केवळ वनींचे वनचर । हे तंव नव्हती पालेखाईर ।
ब्रह्मकुळींचें कुळेश्वर । वीर दुर्धर नरयोध्ये ॥९२॥
समूळ यांची जुनाट कथा । ऐकोनि सुख जालें रघुनाथा ।
आलिंगिलें हनुमंता । उल्हासता स्वानंदे ॥९३॥
एकाजनार्दना शरण । वालिसुग्रीवजन्म कथन ।
समूळ जालें निरूपण । रामायण अतिगोड ॥९४॥
इति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
वालिसुग्रीवजन्मकथनं नाम द्वितीयः प्रसंगः ॥२॥
॥ ओंव्या ९४ ॥ श्लोक २३ ॥ एवं संख्या ११७ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय दुसरा भावार्थरामायण किष्किंधाकांड अध्याय दुसरा